M’Cheyne Bible Reading Plan
जलप्रलयाचा शेवट
8 पण देव नोहाला विसरला नाही; त्याने नोहाची व त्याच्या सोबत तारवात असलेल्या सर्व प्राण्यांची आठवण केली; देवाने पृथ्वीवर वारा वाहवला. आणि पाणी दिसेनासे होऊ लागले.
2 आकाशातून मुसळधार पडणारा पाऊस थांबला; आणि पृथ्वीच्या पोटातून उफाळून वर येणारे सर्व झऱ्यांचे पाणी वाहाण्याचे थांबले, 3-4 पृथ्वी भरुन टाकलेले पाणी ओसरुन खाली खाली जाऊ लागले. दिडशे दिवसानंतर पाणी इतके खाली आले की त्यामुळे 5 सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारु आरारात पर्वताजवळ थांबून पुन्हा जमिनीवर टेकले; पाणी सतत ओसरत राहिले आणि दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वताची शिखरे दिसू लागली.
6 चाळीस दिवसांनंतर नोहाने तयार केलेली तारवाची खिडकी उघडली 7 आणि एक कावळा बाहेर सोडला; तो पाणी संपून जमीन कोरडी होईपर्यंत इकडे-तिकडे उडत राहिला. 8 जमिनीच्या पृष्टभागावरुन पाणी उतरले आहे का नाही हे जाणून घेण्याकरिता नोहाने एका कबुतरालाही बाहेर सोडले.
9 जमीन अजून पाण्याने झाकलेली असल्यामुळे कबुतराला टेकायला जागा मिळाली नाही. म्हणून ते तारवाकडे परत आले तेव्हा नोहाने हात बाहेर काढून त्याला धरले व तारवाच्या आत घेतले.
10 सात दिवसानंतर नोहाने पुन्हा कबुतराला बाहेर सोडले; 11 तेव्हा ते दुपारी नोहाकडे परत आले तेव्हा त्याच्या चोचींत आँलीव्ह वृक्षाचे (म्हणजे जैतून झाडाचे) कोवळे पान होते. यावरुन जमीन सुकली असल्याचे नोहाला समजले, 12 आणखी सात दिवसांनी नोहाने कबुतराला पुन्हा बाहेर सोडले परंतु यावेळी मात्र ते परत आले नाही.
13 त्यानंतर नोहाने तारवाचे दार उघडले. जमीन सुकून गेली आहे असे होता नोहाला दिसले. हा वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस होता. नोहा तेव्हा 601 वर्षांचा होता. 14 दुसऱ्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवसापर्यंत जमीन खडखडीत कोरडी झाली होती.
15 नंतर देव नोहाला म्हणाला, 16 “तू, तुझी बायको, मुले व सुना यांना घेऊन आता तारवाच्या बाहेर नीघ; 17 तुझ्या बरोबर सर्वपक्षी, पशू जमिनीवर रांगणारे प्राणी या सर्वांना तारवातून बाहेर आण; ते प्राणी आपापल्या जातीची भरपूर संतती उत्पन्न करतील व पुन्हा पृथ्वी भरुन टाकतील.”
18 तेव्हा नोहा आपले पुत्र, बायको व सुना यांना घेऊन तारवातून बाहेर निघाला; 19 त्याच्या बरोबरचे सर्व पशू, रांगणारे प्राणी व पक्षी जातवारीने जोडीजोडीने तारवातून बाहेर निघाले.
20 त्यानंतर नोहाने परमेश्वराकरिता एक वेदी बांधली आणि देवाने अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्व शुद्ध पक्षी व सर्व शुद्ध पशू यांतून काही अर्पणासाठी घेतले आणि त्याने देवासाठी देणगी म्हणून त्यांचे वेदीवर होमार्पण केले.
21 परमेश्वराने त्या अर्पणाचा सुवास घेतला आणि त्याने त्याला आनंद झाला; परमेश्वर स्वतःस म्हणाला, “मानवास शिक्षा करण्याकरिता मी पुन्हा कधीही भूमिला असा शाप देणार नाही; आपल्या लहानपणापासूनच मानव दुष्ट आहे; तेव्हा येथून पुढे कधीही मी पृथ्वीवरुन सर्वसजीव सृष्टीचा नाश करणार नाही पुन्हा; 22 जोपर्यंत पृथ्वी राहील तो पर्यंत पेरणी व कापणी, थंडी व ऊन, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र व्हावयाची थांबणार नाहींत.”
येशू एका आजरी माणसाला बरे करतो(A)
8 येशू डोंगरावरून खाली आला. पुष्कळ लोक त्याच्यामागे चालत होते. 2 तेव्हा एक कुष्ठरोग झालेला मनुष्य त्याच्याकडे येऊन वाकून त्याच्या पाया पडून म्हणाला, “प्रभु, तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध करण्यास समर्थ आहात.”
3 मग येशूने आपला हात पुढे करुन त्याला स्पर्श केला व म्हटले, “तू शुद्ध व्हावेस अशी माझी इच्छा आहे,” आणि ताबडतोब तो कुष्ठरोगी बरा झाला. 4 “हे जे घडले ते कुणाला सांगू नकोस, तर जाऊन स्वतःला याजकांना दाखव आणि तू कुष्ठरोगमुक्त झालास ह्याचे प्रमाण म्हणून मोशेने ठरवून दिलेले अर्पण वाहून टाक. ह्यामुळे तू शुद्ध झाल्याचे लोकांना कळेल.”
येशू सेनाधिकाऱ्याच्या नोकराला बरे करतो(B)
5 येशू कफर्णहूम शहरास गेला. जेव्हा त्याने शहरात प्रवेश केला, तेव्हा एक सेनाधिकारी त्याच्याकडे आला 6 आणि विनंती करू लागला की, “प्रभु, माझा नोकर पक्षाघाताने खूपच त्रासलेला आहे व तो माझ्या घरात पडून आहे.”
7 येशू त्याला म्हणाला, “मी येऊन त्याला बरे करीन.”
8 तेव्हा सेनाधिकारी म्हणाला, “प्रभु, आपण माझ्या घरी यावे इतकी माझी योग्यता नाही. आपण फक्त शब्द बोला म्हणजे माझा नोकर बरा होईल. 9 कारण मी स्वतः दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करतो आणि माझ्या हाताखाली देखील अनेक शिपाई आहेत. मी एखाद्याला जा म्हणतो आणि तो जातो आणि दुसऱ्याला ये म्हटल्यावर तो येतो. मी माझ्या नोकराला अमूक कर असे सांगतो आणि तो ते करतो.”
10 येशूने जेव्हा हे ऐकले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले आणि जे त्याच्यामागुन चालत होते. त्यांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, इस्राएलात इतका मोठा विश्वास असलेला एकही मनुष्य मला आढळला नाही. 11 मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ जण पूर्वेकडून आणी पश्चिमेकडून येतील आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्यासह स्वर्गाच्या राज्यात मेजासभोवती मेजवानीसाठी बसतील. 12 परंतु जे खरे वारस आहेत. ते बाहेरच्या अंधरात टाकले जातील. तेथे रडणे व दात खाणे चालेल.”
13 मग येशू सेनाधिकाऱ्याला म्हणाला, “जा, तू जसा विश्वास धरलास तसे होईल.” आणि त्याच क्षणी त्याचा नोकर बरा झाला.
येशू अनेकांना बरे करतो(C)
14 मग येशू पेत्राच्या घरी आला. तेथे पेत्राची सासू तापाने आजारी पडली आहे, असे येशूने पहिले. 15 त्याने तिच्या हाताला स्पर्श केला तेव्हा तिचा ताप निघाला. मग ती उठून त्याची सेवा करू लागली.
16 त्या संध्याकाळी लोकांनी भूतबाधा झालेल्या पुष्कळ लोकांना त्याच्याकडे आणले येशूने शब्द बोलून ती भुते घालविली व सर्व प्रकारच्या रोग्यांना बरे केले 17 यशया संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. यशयाने असे म्हटले होते:
“त्याने आमच्या व्याधी स्वतःवर घेतल्या,
त्याने आमचे रोग वाहिले.” (D)
येशूला अनुसरणे(E)
18 आपल्या भोवती खूप लोक आहेत हे येशूने पाहिले तेव्हा त्याने त्यांना सरोवराच्या पलीकडे जाण्याची आज्ञा केली. 19 मग एक नियमशास्त्राचा शिक्षक त्याच्याकडे आला आणि म्हणाला, “गुरुजी, आपण जेथे जाल तेथे मी आपल्या मागे येईन.”
20 येशू त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना राहायला बिळे आणि आकाशातील पाखरांना घरटी आहेत. परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके सुद्धा टेकावयास जागा नाही.”
21 मग येशूच्या शिष्यांपैकी आणखी एक जण येशूला म्हणाला, “प्रभु, पहिल्यांदा मला जाऊ द्या व माझ्या वडिलांना पुरून येऊ द्या.”
22 पण येशू त्याला म्हणाला, “तू माझ्या मागे ये. जे मेलेले आहेत त्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे.”
येशू वादळ थांबवितो(F)
23 मग येशू नावेत गेल्यावर त्याच्यामागून त्याचे शिष्य नावेत गेले. 24 अचानक, समुद्रात इतके मोठे वादळ झाले की, नाव लाटांमध्ये पूर्णपणे गुरफटून गेली. आणि येशू तर नावेत झोपला होता. 25 तेव्हा शिष्य त्याच्याकडे गेले आणि त्यांनी त्याला जागे केले व म्हटले, “प्रभु, आम्हांला वाचवा, आपण बुडत आहोत.”
26 येशूने उत्तर दिले, “तुम्ही विश्वासात किती उणे आहात रे? तुम्ही का घाबरता?” मग त्याने उठून वारा व लाटा यांना अधिकारवाणीने शांत होण्यास सांगितले. वारा थांबला. समुद्र अगदी शांत झाला.
27 तेव्हा लोकांना मोठे आश्चर्य वाटले, ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे? वारा व समुद्र देखील त्याचे ऐकतात.”
येशू दोन माणसांमधून भूते काढतो(G)
28 मग येशू समुद्राच्या पलीकडे असलेल्या गरदेकरांच्या देशात आला, तेव्हा दोन भूतबाधा झालेली माणसे स्मशानातून येशूकडे आली. ही माणसे स्मशानातील कबरांध्ये राहत होती. ती फार भेसूर होती, त्यामुळे कोणीही त्यांच्या वाटेला जात नसे. 29 ती दोघे येशूकडे आली व म्हणाली, “देवाच्या पुत्रा, तुला आमच्याकडून काय पाहिजे? नेमलेल्या वेळेपूर्वीच तू आम्हांला शिक्षा करायला आलास काय?”
30 त्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर डुकरांचा एक कळप चरत होता. 31 ती भुते त्याला विनंती करू लागली, ती म्हणाली, “जर तू आम्हाला ह्यांच्यामधून काढून टाकणार असशील तर आम्हांला त्या डुकरांच्या कळपात जाऊ दे.”
32 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जा.” मग ती त्यांच्यामधून निघून डुकरांमध्ये गेली. तेव्हा तो संपूर्ण कळप कड्यावरून खाली धावत जाऊन पाण्यात बुडाला. 33 मग त्यांना चारणारे पळाले व त्यांनी नगरात जाऊन सर्वांना हे वर्तमान, तसेच भूतबाधा झालेल्यांचे काय झाले तेही सांगितले. 34 तेव्हा सर्व शहर येशूला भेटायला निघाले; आणि जेव्हा त्यांनी त्याला पाहिले तेव्हा येशूने त्यांच्या प्रदेशातून निघून जावे अशी विनंती त्यांनी त्याला केली.
एज्राबरोबर जाणाऱ्या कुटुंबप्रमुखांची यादी
8 बाबेलहून यरुशलेमला माझ्याबरोबर, (म्हणजे एज्रारोबर) आपापल्या घराण्यातली जी वडीलधारी मंडळी आणि इतर लोक आले त्यांची नावे आता देतो. अर्तहशश्त राजाच्या कारकीर्दीत आम्ही यरुशलेमला आलो. त्या सर्वांची नावे पुढीलप्रमाणे:
2 फिनहासाच्या वंशजांमधला गर्षोम, इथामारच्या वंशजांमधला दानीएल, दावीदच्या वंशजांपैकी हट्टूश,
3 शखन्याच्या वंशजातील परोशाच्या वंशजांमधला जखऱ्या, आणि आणखी 150 जण,
4 पहथ-मवाबाच्या वंशजातल्या जरह याचा मुलगा एल्यहोवेनय आणि त्याच्याबरोबरचे 200 लोक,
5 जट्टूच्या वंशजातल्या यहजोएलचा मुलगा शखन्या आणि 300 पुरुष.
6 आदीनच्या वंशजातल्या योनाथानाचा मुलगा एबद आणि त्याच्याबरोबचे 50 जण.
7 एलामाच्या वंशजातल्या अथल्याचा मुलगा यशाया आणि त्याच्याबरोबरचे 70 जण.
8 शफाट्याच्या वंशजातल्या मीखाएलचा मुलगा जबद्या आणि त्याच्याबरोबरचे 80 जण.
9 यवाबच्या वंशजातील यहीएलचा मुलगा ओबद्या आणि आणखी 218 जण.
10 बानीच्या वंशजातल्या योसिफ्याचा मुलगा शलोमिथ आणि त्याच्या बरोबरचे 160 लोक.
11 बेबाईच्या वंशजातील बेबाईचा मुलगा जखऱ्या आणि त्याच्याबरोबरचे 28 लोक.
12 अजगादच्या वंशजातल्या हक्काटानाचा मुलगा योहानान आणि त्याच्याबरोबरचे 110 लोक.
13 अदोनीकामच्या वंशजातले शेवटचे म्हणजे अलीफलेट, येऊएल, शमाया आणि त्यांच्याबरोबरचे 60 जण
14 आणि बिगवईच्या कुळातले उथई, जक्कू व त्यांच्याबरोबरचे 70 जण.
यरुशलेमला परत
15 मी (म्हणजे एज्राने) या सर्व लोकांना अहवाकडे वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाजवळ बोलावून घेतले. त्या ठिकाणी आमचा तीन दिवस मुक्काम होता. तेथे मला असे समजले की या लोकांमध्ये याजक होते पण लेवी नव्हते. 16 तेव्हा, अलियेजर, अरीएल, शमाया, एलनाथान, यारीब, एलनाथान, नाथान, जखऱ्या, आणि मशल्लूम या प्रमुखांना आणि योयारीब व एलनाथान या अध्यापकांना मी निरोप पाठवून बोलवून आणले. 17 त्यांना इद्दोकडे पाठवले. इद्दो हा कासिफ्या नगराचा मुख्य. त्याला आणि त्याच्या नातलगांना काय सांगायचे हे मी या मंडळींना सांगितले होते. इद्दोचे नातलगांना कासिफ्याच्या मंदिरातील सेवेकरी होते. परमेश्वराच्या मंदिरातील सेवाचाकरी प्रीत्यर्थ माणसे मिळावीत म्हणून मी माझ्या लोकांना इद्दोकडे पाठवले. 18 देवाचा आमच्यावर वरदहस्त असल्यामुळे इद्दोच्या नातलगांनी आमच्याकडे काहीजणांना पाठवले. लेवी वंशजातील महलीच्या वंशातला एक हुषार माणूस शेरेब्या महली हा लेवीच्या मुलांपैकी एक. लेवी हा इस्राएलांच्या वंशातलाच. शेरेब्याचे मुलगे आणि भाऊ यांनाही त्यांनी पाठवले. त्या वंशंजातील एकंदर अठराजण आमच्याकडे आले. 19 मरारी वंशातील हशब्या आणि यशाया आणि त्यांचे भाऊ व भाचे, असे एकंदर वीस जण. 20 शिवाय त्यांनी मंदिरातल्या सेवाचाकरीसाठी दोनशेवीस जणांना पाठवले. या लोकांच्या पूर्वजांना दावीदाने आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी लेवींचे मदतनीस म्हणून निवडले होते. त्या सर्वांची नावे यादीत लिहिलेली होती.
21 तिथे अहवा नदी किनारी मी सर्वांनी उपवास करावा अशी घोषणा केली. देवापुढे नम्र व्हावे आणि आमची मुलंबाळे, साधनसंपत्ती यांच्यासह आमचा पुढचा प्रवास सुखरुप व्हावा हा आमचा उपवासामागचा होतू होता. 22 प्रवासातल्या सुरक्षिततेसाठी राजाक़डे सैनिक आणि घोडेस्वार मागायचा मला संकोच वाटला. वाटचालीत शत्रूचा धोका होता. संरक्षण मागयचा संकोच वाटण्याचे कारण म्हणजे आम्ही राजा अर्तहशश्तला म्हणालो होतो, “जो देवावर विश्वास ठेवतो त्याची देव पाठराखण करतो. पण देवाकडे पाठ फिरवली तर देवाचा कोप होतो.” 23 म्हणून आम्ही आमच्या प्रवासासाठी उपवास आणि देवाची प्रार्थना केली. परमेश्वरानेही आमचा धावा ऐकला.
24 तेव्हा मी याजकांमध्ये जे प्रमुख होते अशा बारा जणांची निवड केली. मी शेरेब्या, हशब्या आणि त्यांचे आणखी दहा भाऊ यांची निवड केली. 25 मंदिरासाठी देण्यात आलेले सोने, चांदी आणि इतर चीजवस्तू यांचे नीट वजन करुन या गोष्टी मी या बारा याजकांना दिल्या. या वस्तू राजा अर्तहशश्त, त्याचे मंत्री, प्रमुख अधिकारी, आणि बाबेलमधील इस्राएल लोक यांनी दिल्या होत्या. 26 मी वजन केले त्याप्रमाणे चांदी 25 टन भरली, चांदीची तबके आणि इतर वस्तू 3 3/4 टन भरल्या. सोने 3 3/4 टन होते. 27 शिवाय मी सोन्याचे वीस कटोरे त्यांना दिले, त्यांचे वजन एकोणीस पौंड भरले. याखेरीज, सोन्याइतकीच किंमती अशी चकचकीत पितळेची दोन सुंदर तकबे मी त्यांना दिली. 28 मग मी त्या बारा याजकांना म्हणालो, “तुम्ही तसेच या वस्तू देखील देवाच्या दृष्टीने पवित्र आहेत. लोकांनी हे सोने चांदी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यासाठी दिलेली आहे. 29 तेव्हा त्यांची काळजीपूर्वक जपवणूक करा. या गोष्टी यरुशलेममधील मंदिराच्या प्रमुखांच्या हवाली करेपर्यंत त्यांची जबाबदारी तुमच्यावरच आहे. तुम्ही या वस्तू मुख्य लेवी आणि इस्राएलमधील वडीलधारी मंडळी यांच्या हाती सोपवा. ते त्यांचे वजन करुन त्या गोष्टी यरुशलेममधील मंदिराच्या खोल्यांमध्ये ठेवतील.”
30 यावर, एज्राने वजन करुन दिलेल्या खास भेटवस्तू आणि चांदी सोने याजकांनी व लेवींनी ताब्यात घेतले. यरुशलेममधील मंदिरात त्यांना घेऊन जाण्यास सांगण्यात आले.
31 पहिल्या महिन्याच्या बाराव्या दिवशी आम्ही अहवा नदीपासून यरुशलेमला जायला निघालो. देवाची आमच्यावर कृपा असल्यामुळे त्याने वैरी आणि वाटमारे यांच्यापासून आमचे संरक्षण केले. 32 आम्ही यरुशलेमला पोचलो. तेथे तीन दिवस विश्रांती घेतली. 33 चौच्या दिवशी मंदिरात गेलो आणि सोने-चांदी व इतर वस्तू वजन करुन उरीया याजकाचा मुलगा मरेमोथ यांच्याकडे दिल्या. तेव्हा फिनहासचा मुलगा एलाजार तसेच येशूवाचा मुलगा योजाबाद आणि बिन्नुईचा मुलगा नोअद्या हे लेवी, एवढे जण मरेमोथ बरोबर होते. 34 आम्ही प्रत्येक गोष्टीची मोजणी, वजन केले आणि एकंदर वजनाची नोंद केली.
35 त्यांनंतर बंदिवासातून परत आलेल्या यहुद्यांनी इस्राएलच्या देवाला यज्ञार्पणे वाहिली. सर्व इस्राएलकरता बारा बैल, शहाण्णव मेंढे, सत्याहत्तर नर कोकरे, पापार्पणासाठी बारा बोकड एवढे सगळे त्यांनी देवाला यज्ञात अर्पण केले.
36 मग या लोकांनी राजा अर्तहशश्तने दिलेले पत्र राजाच्या अधिकाऱ्यांना तसेच फरात नदीच्या पश्र्चिमेकडील भागावरच्या अधिकाऱ्यांना दिले. तेव्हा या सर्व अधिकाऱ्यांनी इस्राएल लोकांना आणि मंदिराला सहाय्य केले.
विश्वासणाऱ्यांवर संकट
8 स्तेफनाचा जो खून झाला त्याला शौलाची संमति होती. त्या दिवसापासून यरुशलेम येथील ख्रिस्ताच्या मंडळीचा मोठा छळ सुरु झाला. प्रेषितांशिवाय इतर सर्व विश्वासणारे शिष्य यहूदा व शोमरोन प्रांताच्या कानाकोपऱ्यात पांगून गेले.
Trouble for the Believers
2-3 काही धार्मिक माणसांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी त्यांनी फार शोक केला. शौलाने ख्रिेस्ताच्या मंडळीचा छळ करण्यास सुरुवात केली. तो घरोघर जाई. स्त्रिया व पुरुष यांना धरुन खेचून नेई व तुरुंगात टाकीत असे. 4 विश्वासणारे सगळीकडे पांगले होते. जेथे कोठे विश्वासणारे जात, तेथे ते लोकांना सुवार्ता सांगत.
शोमरोनात फिलिप्पाची सेवा
5 फिलिप्प [a] शोमरोनातील एका शहरात गेला. त्याने ख्रिस्ताचा संदेश दिला. तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले व त्याने केलेले चमत्कार पाहिले. 6 फिलिप्प ज्या गोष्टी त्यांना सांगत असे त्या ते लक्षपूर्वक ऐकत असत. 7 त्यांच्यापैकी पुष्कळांना अशुद्ध आत्मे लागले होते. पण फिलिप्पाने ते सर्व घालविले होते. ते माणसांच्या शरीरातून बाहेर पडताना मोठ्याने ओरडत बाहेर पडत असत. तेथे बरेच लंगडे व अर्धांगवायू झालेले लोक होते. फिलिप्पाने या लोकांना बरे केले. 8 यामुळे शहरातील लोक फार आनंदित झाले.
9 शिमोन नावाचा मनुष्य त्या नगरात राहत होता. तो जादूचे प्रयोग करीत असे. त्याच्या प्रयोगांमुळे लोक आश्चर्यचकित होत असत. तो स्वतःला फार मोठा समजत असे. 10 अगदी लहानापासून थोरापर्यंत लोक लक्षपूर्वक त्याचे ऐकत. ते म्हणत असत. “देवाची महान शक्ति असे ज्याला म्हणतात तोच हा मनुष्य आहे!” 11 त्याने आपल्या जादूमुळे बराच काळपर्यंत लोकांना चकीत केले असल्याने लोक त्याच्याकडे लक्ष देत असत. 12 परंतु जेव्हा देवाच्या राज्याविषयीची सुवार्ता आणि येशू ख्रिस्ताचे नाव फिलिप्पाने त्या लोकांना सांगितले तेव्हा त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. तेव्हा लोकांना बाप्तिस्मा देण्यात आला. त्यांच्यात जसे पुरुष होते तशा स्त्रियाही होत्या. 13 स्वतः शिमोनाने विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तो फिलिप्प बरोबर राहू लागला. आणि झालेले चमत्कार आणि अद्भुत चिन्हे पाहून शिमोन आश्चर्याने थक्क झाला.
14 यरुशलेममधील प्रेषितांनी हे ऐकले की शोमरोनातील लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला, म्हणून पेत्र व योहान यांना प्रेषितांनी शोमरोनातील लोकांकडे पाठविले. 15 जेव्हा पेत्र व योहान आले. तेव्हा त्यांनी शोमरोनी विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली. 16 या लोकांचा प्रभु येशूच्या नावात बाप्तिस्मा झाला होता, परंतु पवित्र आत्मा अजून त्यांच्यावर आला नव्हता. 17 मग पेत्र व योहान यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला.
18 शिमोनाने पाहिले की, प्रेषितांच्या हात ठेवण्याने लोकांना पवित्र आत्मा मिळाला, तेव्हा शिमोन प्रेषितांना पैसे देऊ लागला. 19 शिमोन म्हणाला, “मी ज्याच्यावर हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळेल, अशी शक्ति मला सुध्दा द्या.”
20 पेत्र शिमोनाला म्हणाला, “तुझा व तुइया पैशाचा नाश होवो! कारण, देवाचे दान पैशाच्या बळावर विकत घेण्याचा तू विचार केलास! 21 या कामात तू आमचा सहभागी होऊ शकणार नाहीस. कारण तुझे अंतःकरण देवासमोर योग्य नाही. 22 आपले ह्रदय बदल, तू ज्या या वाईट गोष्टी केल्या आहेत, त्या सोडून दे. प्रभूला (देवाला) प्रार्थना कर. कदाचित तुइया पश्चात्तप्त अंतःकरणामुळे तो तुला क्षमा करील. 23 कारण तुइया मनात कटू मत्सर भरलेला आहे. व तू पापाचा दास झालेला आहेस, हे मला दिसून आले आहे!”
24 शिमोनाने उत्तर दिले, “आपण दोघेही माइयासाठी देवाजवळ प्रार्थना करावी. यासाठी की, ज्या गोष्टीबद्दल तुम्ही बोललात त्यापैकी एकही गोष्ट माइयावर न येवो!”
25 नंतर दोन्ही प्रेषितांनी आपली साक्ष लोकांना दिली (जे त्यांनी येशूला करताना पाहिले होते ते सांगितले.) त्यांनी प्रभुचा संदेश त्यांना सांगितला. मग ते यरुशलेमला परत गेले. परत येताना वाटेत त्यांनी अनेक शोमरोनी गावांत सुवार्ता सांगितली.
इथिओपियाच्या मनुष्याला फिलिप्पा शिक्षण देतो
26 देवाचा दूत फिलाप्पाशी बोलला, तो म्हणाला “तयार हो आणि दक्षिणेकडे जा, यरुशलेमहून गाझाकडे जाणाऱ्या रस्त्याने जा-तो रस्ता वाळवंटातून जातो.”
27 मग फिलिप्प तयार झाला व गेला. रस्त्यात त्याला एक इथिओपियाचा मनुष्य भेटला, तो मनुष्य षंढ होता. तो इथिओपियाच्या कांदके राणीकडे उच्च पदावर अधिकारी म्हणून कामाला होता. तो राणीच्या खजिन्याचा मुख्य होता. तो यरुशलेमला उपासना करण्यासाठी गेला होता. 28 आता तो आपल्या घरी चालला होता. तो त्याच्या रथात बसला होता आणि यशया संदेष्टयाचे पुस्तक वाचत होता.
29 पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “त्या रथाजवळ जा!” 30 मग फिलिप्प त्या रथाजवळ धावत धावत गेला, तेव्हा तो मनुष्य वाचत असताना त्याने ऐकले, फिलिप्प त्याला म्हणाला, “तुम्ही जे वाचत आहात, त्याचा अर्थ तुम्हांला कळतो का?”
31 तो अधिकारी म्हणाला, “मला हे कसे समजेल? कोणीतरी याचा उलगडा करुन मला सांगायला हवे.” आणि त्याने फिलिप्पाला रथात चढून आपल्यापाशी बसण्यास बोलाविले. 32 पवित्र शास्त्रातील जो भाग तो वाचत होता, तो भाग पुढीलप्रमाणे होता:
“वधायला नेत असलेल्या मेंढरासारखा तो होता.
लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो शांत राहिला.
त्याने आपले तोंड उघडले नाही.
33 त्याला लज्जित केले गेले, त्याचे हक्क काढून घेतले गेले.
त्याच्या पिढीविषयी कोणतीही गोष्ट पुढे वर्णीली जाणार नाही.
कारण पृथ्वीवरील त्याचे जीवन संपविले गेले आहे.” (A)
34 तो अधिकारी फिलिप्पाला म्हणाला, “क्रुपा करुन मला सांगा, भविष्यवादी हे कोणाविषयी बोलतो आहे? तो स्वतःविषयी बोलत आहे की दुसन्या कोणाविषयी बोलत आहे?” 35 मग फिलिप्पाने तोंड उघडले व पवित्र शास्त्रातील या भागापासून सुरुवात करुन येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली.
36 ते दोघे प्रवास करीत असताना एका पाण्याच्या ठिकाणाजवळ (तळ्याजवळ) आले. अधिकारी म्हणाला, “पहा! येथे पाणी आहे! माझा बाप्तिस्मा करायला कोणती अडचण आहे?” 37 [b] 38 आणि षंढाने रथ थांबविण्याची आज्ञा केली. नंतर फिलिप्प व षंढ हे दोघे उतरुन पाण्यात गेले आणि फिलिप्पाने त्याचा बाप्तिस्मा केला. 39 जेव्हा ते पाण्याबाहेर आले, तेव्हा प्रभूच्या आत्म्याने फिलिप्पाला दूर नेले आणि त्या अधिकाऱ्याला फिलिप्प पुन्हा दिसला नाही. पण तो अधिकारी पुढे तसाच मोठ्या आनंदाने प्रवास करीत घरी गेला. 40 आपण अजोत नगरात आहोत असे फिलिप्पाला दिसून आले आणि पुढे जात असताना जी गावे लागली त्या सर्व गावात त्याने सुवार्ता सांगितली. नंतर तो कैसरीयाला गेला.
2006 by World Bible Translation Center