Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 32

अश्शूरच्या राजाचा हिज्कीयाला उपद्रव

32 हिज्कीयाने परमेश्वरावर भरवंसा ठेवून केलेल्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात उतरल्यावर अश्शूरचा राजा सन्हेरीब यहूदावर चाल करुन आला. नगराच्या तटबंदीबाहेर त्याने आपल्या सैन्यासह तळ ठोकला. आतील नगरांचा पाडाव करुन ती जिंकून घ्यायचा त्याने बेत केला. यरुशलेमवर हल्ला करायला सन्हेरीब आला आहे हे हिज्कीयाला कळले. तेव्हा तो आपल्या सरदारांशी आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांशी बोलला. त्यांच्या साहाय्याने व त्यांच्याशी मसलत करुन राजाने नगराबाहेरच्या झऱ्यांचे पाणी अडवायचा एकमताने निर्णय घेतला. त्या सर्वांनी त्याला मदत केली. झरे आणि आपल्या प्रांतामधून वाहणारी नदी लोकांनी एकत्र येऊन अडवली. ते म्हणाले, “अश्शूरच्या राजाला आत्ता इथवर आल्यावर पाणी कुठले मिळायला?” हिज्कीयाने पुढील उपाययोजनेने यरुशलेमची मजबुती वाढवली. तटबंदीची भिंत जिथे जिथे ढासळली होती तिथे बांधून काढली. भिंतीवर बुरुज बांधले. तटबंदीबाहेर दुसरा कोट केला. यरुशलेमच्या जुन्या भागाची पूर्वेची बाजू आणखी भक्कम केली. शस्त्रे आणि ढाली आणखी करवून घेतल्या. 6-7 हिज्कीयाने प्रजेवर सेनानायकांच्या नेमणुका केल्या, आणि नगराच्या वेशीजवळच्या चौकात त्यांची सभा घेऊन त्यांच्याशी उत्तेजनपर बातचीत केली. हिज्कीया त्यांना म्हणाला, “हिंमत बाळगा आणि द्दढ राहा. अश्शूरच्या राजाची किंवा त्याच्या विशाल सेनेची धास्ती घेऊ नका. आपली ताकद त्यांच्यापेक्षा जास्त आहे. अश्शूरच्या राजाजवळ फक्त मनुष्यबळ आहे. आपल्या बाजूला मात्र साक्षात परमेश्वर देव आहे. तोच आपल्याला मदत करील.” आपल्या युध्दात तोच लढेल अशाप्रकारे हिज्कीयाचे धीराचे बोलणे ऐकून लोकांना त्यावर विश्वास बसला आणि त्यांना हुरुप आला.

अश्शूरचा राजा सन्हेरीब याने लाखीशचा पराभव करण्याच्या हेतूने आपल्या सैन्यासह लाखीश नगराजवळ तळ दिला होता. तेथून त्याने यहूदाचा राजा हिज्कीया आणि यरुशलेममधील यहूदी लोक यांच्यासाठी आपल्या सेवकांमार्फत निरोप पाठवला.

10 सेवक म्हणाले की, “अश्शूरचा राजा सन्हेरीब याचा संदेश असा आहे. ‘यरुशलेमला वेढा पडला असताना कशाच्या भरवंशावर तुम्ही तिथे राहता? 11 हिज्कीयाचा हा तुम्हाला फसवण्याचा डाव आहे. यरुशलेममध्ये अडकून तुम्ही तहानभुकेने व्याकुळ होऊन मरावे असा त्याचा अंतःस्थ हेतू आहे. तो तुम्हाला म्हणतो, “अश्शूरच्या राजापासून आपला देव परमेश्वर आपले रक्षण करील.” 12 पण त्यानेच परमेश्वराची उंच स्थाने आणि वेद्या काढून टाकल्या. तुम्हा यहूदी आणि यरुशलेमच्या लोकांना त्याने सांगितले की तुम्ही फक्त एकाच वेदीवर उपासना केली पाहिजे आणि धूप जाळला पाहिजे. 13 माझ्या पूर्वजांनी आणि मी इतर देशांतल्या लोकांची कशी अवस्था करुन टाकली ती तुम्हाला माहीत आहे. त्या देशांतले दैवते काही आपल्या लोकांना वाचवू शकले नाहीत. मलाही ते त्यांचा नाश करण्यापासून परावृत्त करु शकले नाहीत. 14 माझ्या पूर्वजांनी इतर देशांना मातीला मिळवले. आपल्या लोकांना विनाशातून सोडवण्याची माझ्यासमोर कोणत्याही देवताची प्राज्ञा नाही. तेव्हा तुमचे दैवत तरी तुम्हाला वाचवू शकेल असे वाटते का? 15 हिज्कीयाच्या बतावणीला बळी पडू नका. आमच्या पासून आपल्या प्रजेचे रक्षण करण्यात कोणत्याच राष्ट्राच्या दैवताला अद्यापि यश आलेले नाही. तेव्हा तुमचा संहार करण्याला तुमचे दैवत माझ्या हातून तुम्हांला वाचवू शकेल असे समजू नका.’”

16 अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी परमेश्वर देवाची आणि देवाचा सेवक हिज्कीया याची निंदानालस्ती केली. 17 अश्शूरच्या राजाने पत्रांमध्ये परमेश्वर देवा विषयी अपमानकारक मजकूरही लिहिला. तो असा होता. “इतर देशांच्या दैवतांना मी केलेल्या संहारापासून आपल्या प्रजेला वाचवता आले नाही. तद्वतच हिज्कीयाचा देवही मला त्याच्या प्रजेचा नाश करण्यापासून थोपवू शकणार नाही.” 18 मग अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी तटबंदीवर उभ्या असलेल्या यरुशलेमच्या लोकांना घाबरवण्यासाठी हिब्रू भाषेत मोठ्याने आरडाओरडा केला. असे करुन यरुशलेम नगर ताब्यात घ्यायचा त्यांचा विचार होता. 19 जगभरचे लोक ज्या दैवतांची पूजा करतात त्या दैवतांविषयी हे सेवक वाईटसाईट बोलत राहिले. हे परमेश्वर म्हणजे लोकांनी निव्वळ हातांनी बनवलेल्या मूर्तीं यरुशलेमच्या परमेश्वरालाही या सेवकांनी त्या देवतांच्याच रांगेला बसवले.

20 यामुळे राजा हिज्कीया आणि आमोजचा मुलगा यशया संदेष्टा यांनी या प्रश्नावर स्वर्गाकडे तोंड करुन मोठ्याने प्रार्थना केली. 21 तेव्हा अश्शूरच्या राजाच्या छावणीवर परमेश्वराने आपला दूत पाठवला. या दूताने अश्शूरांचे सगळे सैन्य, त्यातील सरदार आणि अधिकारी यांना मारुन टाकले. एवढे झाल्यावर अश्शूरचा राजा माघार घेऊन आपल्या देशात परत गेला. त्याच्या प्रजेला त्याची शरम वाटली. राजा त्याच्या दैवताच्या देवळात गेला. तिथे त्याच्या पोटच्या मुलांनी तलवारीने त्याला ठार केले. 22 अशाप्रकारे परमेश्वराने अश्शूरचा राजा सन्हेरीब आणि त्याचे सैन्य यांच्यापासून हिज्कीया आणि यरुशलेमचे लोक यांचे संरक्षण केले. परमेश्वराला हिज्कीयाची आणि यरुशलेमच्या प्रजेची काळजी होती. 23 बऱ्याच जणांनी परमेश्वराला वाहायला भेटवस्तू आणल्या. यहूदाचा राजा हिज्कीया याच्यासाठी ही नजराणे आणले. या घटनेपासून सर्व राष्ट्रांना हिज्कीयाबद्दल आदर वाटू लागला.

24 या काळातच हिज्कीयाला आजारपणाने घेरले आणि तो मरणासन्न झाला. त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. परमेश्वर त्याच्याशी बोलला आणि परमेश्वराने त्याला एक संकेत दिला [a] 25 पण हिज्कीयाला गर्व वाटू लागला होता. त्यामुळे त्याने परमेश्वराने दाखवलेल्या दयाळूपणाबद्दल त्याला धन्यवाद दिले नाहीत. या गोष्टीमुळे हिज्कीयावर आणि यहूदा व यरुशलेमच्या लोकांवर परमेश्वर कोपला. 26 पण हे लोक आणि हिज्कीया यांचे ह्दयपरिवर्तन झाले आणि त्यांची वर्तणूक बदलली. त्यांच्यात नम्रता आली. त्यामुळे हिज्कीयाच्या हयातीत परमेश्वराचा रोष त्यांच्यावर ओढवला नाही.

27 हिज्कीयाची भरभराट झाली. त्याला मानसन्मान मिळाला. चांदी, सोने, किंमती रत्ने, मसाल्याचे पदार्थ, ढाली इत्यादी नाना तऱ्हेच्या वस्तू ठेवण्यासाठी त्याने कोठारे केली. 28 धान्य, नवीन मद्य, तेल या लोकांकडून आलेल्या गोष्टी ठेवायलाही कोठारे बांधली, गुरेढोरे आणि मेंढ्या यांच्यासाठी कोंडवाडे बांधले. 29 हिज्कीयाने नवीन नगरे वसवली. सर्व तऱ्हेचे पशू आणि मेंढरे यांचे कळप त्याच्याकडे होते. देवदयेने हिज्कीयाला समृध्दी आली. 30 याच हिज्कीयाने गीहोनचा यरुशलेममधला वरचा प्रवाह अडवून त्याला दावीद नगराच्या पश्चिमेकडून सरळ खाली आणले होते. हिज्कीयाला त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळाले.

31 एकदा देशात घडलेल्या चमत्कारांविषयी चौकशी करायला बाबेलच्या अधिपतींनी त्याच्याकडे राजदूत पाठवले. तेव्हा हिज्कीयाची पारख करावी आणि त्याचे मन जाणून घ्यावे म्हणून देवाने त्याला एकटे सोडले.

32 हिज्कीयाने केलेल्या इतर गोष्टी आणि त्याचा लोकांविषयीचा दयाळूपणा, त्याची धार्मिक कृत्ये, त्याची परमेश्वरा प्रती एकनिष्ठा याविषयी आमोजचा मुलगा यशया संदेष्टा याचे दृष्टांत आणि यहूदा व इस्राएल राजांचा इतिहास या ग्रंथांमध्ये लिहिलेले आहे. 33 हिज्कीया मरण पावला आणि त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. दावीदाच्या वंशजांच्या कबरीपाशी डोंगरावर लोकांनी त्याचे दफन केले. हिज्कीया मरण पावला तेव्हा यहूदा आणि यरुशलेममधील लोकांनी त्याला सन्मानपूर्वक निरोप दिला. हिज्कीयाच्या जागी त्याचा मुलगा मनश्शे गादीवर आला.

प्रकटीकरण 18

बाबेलचा नाश होतो

18 यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला आकाशातून खाली येताना पाहिले. त्याच्याकडे मोठे अधिकार होते. आणि त्याच्या गौरवाने पृथ्वी झळाळत होती. प्रचंड आवाजात तो ओरडला:

“पडली!
    महान बाबेल पडली!
ती दुष्ट आत्म्यांचे घर बनली आहे.
    आणि प्रत्येक दुष्ट आत्म्याचा आश्रय
आणि प्रत्येक अशुद्ध,
    धिक्कारलेल्या पक्षांचा
    आश्रय झाली आहे.
कारण तिच्या व्याभिचाराचा द्राक्षारस जो वेड लावणारा आहे
    तो सर्व राष्ट्रांनी प्याली आहेत.
पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला आहे
    आणि पृथ्वीवरील व्यापारी तिच्या अति संपत्तीने व ऐषारामाने श्रीमंत झाले आहेत.”

मग मी दुसरा एक आवाज आकाशातून ऐकला. तो म्हणाला:

“माइया लोकांनो, तिच्यातून बाहेर
    या यासाठी की तिच्या पापात तुमचा वाटा असू नये यासाठी
    की तुमच्यावर तिच्या कोणत्याही पीडा येऊ नयेत.
कारण तिची पापे स्वर्गाला भिडली आहेत.
    आणि देवाला तिच्या अपराधांची आठवण झाली आहे.
तिने ज्याप्रमाणे तुम्हाला दिले आहे, तसे तुम्ही तिचे परत करा.
    तिने जे काही केले आहे त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी करा
तिने दुसऱ्यांना दिले त्याच्या दुप्पट प्रमाणात
    तेच मद्य तिच्या प्याल्यात भरा.
तिने स्वतःला जसे गौरव आणि ऐषाराम दिला तितक्या प्रमाणात
    तुम्ही तिला छळ व दु:ख द्या.
ती तिच्या अंतःकरणात गर्वाने म्हणते, ‘मी राणीसाखी सिंहासनावर बसते,
    मी विधवा नाही.’
    आणि ‘मी केव्हाच शोक करणार नाही.’
म्हणून एका दिवसात तिच्या पीडा तिच्यावर येतील.
    (त्या पीडा म्हणजे): मृत्यू, शोक आणि दुष्काळ ती
आगीत भस्म होऊन जाईल
    कारण सामर्थ्यशाली प्रभु देव तिचा न्याय करील.

“पृथ्वीवरील ज्या राजांनी त्या स्त्रीशी व्यभिचार केला, आणि जे तिच्या विलासाच्या दिवसाचे भागीदार झाले, ते ती जळत असताना निघणारा धूर पाहून रडतील आणि तिच्याबद्दल शोक करतील. 10 तिच्या शारीरिक पीडांच्या भीतीमुळे ते राजे दूर उभे राहतील, आणि ओरडतील:

‘भयंकर! भयंकर, हे महान नगरी बाबेल,
    सामर्थ्याच्या शहरा!
एका तासात तुझा न्याय तुझ्यावर येईल!’

11 “पृथ्वीचे व्यापारी तिच्यासाठी रडतील आणि शोक करतील, कारण आता त्यांचा माल कोणीही घेणार नाही. 12 तो माल असा: सोने, चांदी, मौल्यावान रत्ने, मोती, तागाचे तलम कापड, किरमिजी, रेशमी व जांभळे कापड, निरनिराळ्या प्रकारचे सुगंधी लाकूड, सर्व प्रकारची हस्तीदंती पात्रे, मोलवान लाकडे, तांब्याची, लोखंडाची हस्तीदंती पात्रे, मोलवान लाकडे, तांब्याची, लोखंडाची व संगमरवरी पाषाणाची पात्रे. 13 दालचिनी, उटणे ऊद, धूप, द्राक्षारस व जैतुनाचे तेल, मैदा व गहू, गुरेढोरे व मेंढरे, घोडे व रथ, दासदासी, मानवी जीव.

14 ‘बाबेल, ज्या उत्तम गोष्टींची तुला अपेक्षा होती,
त्या गोष्टी आता तुझ्यापासून गेल्या आहेत तुझी सर्व श्रीमंती व वैभव नाहीसे झाले आहे.
    त्याची तुला परत कधी भरपाई होणार नाही.’

15 “ज्या व्यापाऱ्यांनी असा माल विकला, आणि त्यांची संपत्ति तिच्यापासून मिळविली ते तिच्या पिडेच्या भितीमुळे दूर उभे राहतील, ते रडतील व शोक करतील. 16 आणि ओरडतील:

‘भयंकर! भयंकर, हे महानगरी, तलम तागाचे,
    किरमीजी व जांभळे पोशाख
    नेसून जी नगरी सजली होती सोने,
    मौल्यवान रत्ने व मोती यांनी ती झगमगत होती!
17 एका तासात अशा प्रकारची प्रचंड संपत्ति नष्ट झाली!’

“प्रत्येक तांडेल, जलप्रवासी तसेच खलाशी आणि समुद्रावर पोट भरणारे सर्व लोक त्या नगरीपासून दूर राहतील. 18 आणि ती जळत असताना तिचा धूर ते पाहतील तेव्हा ते ओरडून म्हणतील, ‘या नगरीसारखी दुसरी एवढी महान नगरी झाली नाही.’ 19 मग ते आपल्या डोक्यात धूळ घालतील आणि शोक करतील.

‘भयंकर! भयंकर! हे महान नगरी,
    ज्या सर्वांकडे समुद्रात जहाजे आहेत ते तिच्या संपत्तीमुळे
    श्रीमंत झाले एका तासात तिचा सर्वनाश झाला.
20 हे स्वर्गा, तिच्याबद्दल आनंद कर!
    संतानो, प्रेषितांनो आणि संदेष्ट्यांनो आनंद करा!
तिने ज्या प्रकारे तुम्हाला नागविले त्याबद्दल देवाने तिचा न्याय केला आहे.’”

21 मग एका बलवान देवदूताने जात्याच्या मोठ्या तळीसारखा धोंडा उचलून तो समुद्रात टाकून दिला. आणि म्हणाला:

“अगदी अशीच महान बाबेल नगरी जोराने खाली फेकण्यात येईल
    आणि परत ती कधीही कोणाला सापडणार नाही.
22 वीणा वाजविणाऱ्यांचा, संगीत वाजविणाऱ्यांचा, बासरी वाजविणाऱ्यांचा
    आणि कर्णा वाजविणाऱ्यांचा आवाज परत कधी तुझ्या येथे ऐकू येणार नाही.
कोणताही कारागिरीचा व्यापारी
    तुझ्यामध्ये आढळणार नाही
तुझ्या येथे जात्याचा आवाज
    कधी ऐकू येणार नाही.
23 दिव्याचा प्रकाश तुझ्यामध्ये
    पुन्हा कधी प्रकाशणार नाही
तुझ्या येथे वधूवरांचा आवाज
    पुन्हा कधी ऐकू येणार नाही
तुझे व्यापारी जगातील मोठी माणसे होती
    तुझ्या जादूटोण्यामुळे सर्व राष्ट्रे बहकली गेली
24 त्या नगरीमध्ये संदेष्ट्यांचे देवाच्या पवित्र लोकांचे
    आणि जगात ज्यांची हत्या करण्यात आली अशांचे रक्त सांडल्याचे दिसून आले.”

जखऱ्या 14

निवाड्याचा दिवस

14 पाहा! परमेश्वराचा न्यायदानाचा ठराविक दिवस आहे. तुम्ही लुटलेली संपत्ती तुमच्या शहरात वाटली जाईल. यरुशलेमशी लढण्यासाठी मी सर्व राष्ट्रांना एकत्र करीन. ते नगरी ताब्यात घेतील आणि घरांचा नाश करतील. स्त्रियांवर बलात्कार करतील व अर्धे-अधिक लोक कैद केले जातील. पण उरलेल्या लोकांना नगरीतून नेले जाणार नाही. मग परमेश्वर त्या राष्ट्रांविरुध्द युध्द पुकारेल ते खरोखरीचे युध्द असेल. त्यावेळी, तो यरुशलेमच्या पूर्वेला असलेल्या जैतून पर्वतावर उभा राहील. जैतुन पर्वत दुभंगेल पर्वताचा काही भाग उत्तरेकडे व काही दक्षिणेकडे सरकेल. पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत एक खोल दरी निर्माण होईल. दरी जसजशी रुंदावून तुमच्याकडे सरकेल, तसतसे तुम्ही दूर पळायचा प्रयत्न कराल यहूदाचा राजा उज्जीया ह्याच्या काळात झालेल्या भूकंपाच्या वेळी तुम्ही जसे पळाला तसे पळाल. पण माझा परमेश्वर, देव तेथे अवतरेल आणि त्याच्याबरोब त्याचे सर्व पवित्र अनुयायी असतील.

6-7 तो एक विशेष दिवस असेल त्यावेळी प्रकाश, गारठा वा कडाक्याची थंडी नसेल. कसे ते परमेश्वरालाच ठाऊक. पण तेव्हा दिवसही नसेल वा रात्र. त्यामुळे, नेहमीच्या अंधाराच्या वेळीही प्रकाश असेल. तेव्हा यरुशलेममधून सतत जिवंत पाण्याचा झरा वाहील [a] त्याला दोन पाट फुटतील. एक पाट पूर्वेकडे वाहत जाईल तर दुसरा पश्चिमेकडे वाहत जाऊन भूमध्य समुद्राला मिळेल. तो संपूर्ण वर्षभर-हिवाळ्यात व उन्हाळ्यात वाहील. त्यावेळी, परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा असेल. परमेश्वर एकच आहे व त्याचे नावही “एक”च आहे. 10 तेव्हा यरुशलेम भोवतालचा सर्व प्रदेश अराबाच्या वाळवटासारखा ओसाड होईल. निगेवमधील गेबापासून रिम्मोनपर्यंत पसरलेल्या वाळवंटासारखा तो देश होईल. पण सर्व यरुशलेम मात्र पुन्हा उभारले जाईल-अगदी बन्यामीनच्या प्रवेशद्वारापासून ते पाहिल्या प्रवेशद्वारापर्यंत (कोपऱ्यावरच्या द्वारापर्यंत) आणि हनानेलच्या मनोऱ्यापासून (राजाच्या द्राक्षकुंडापर्यंत.) 11 लोक तेथे वस्ती करण्यास जातील. यापुढे कोणीही शत्रू त्यांचा नाश करायला येणार नाही. यरुशलेम अगदी सुरक्षित असेल.

12 पण यरुशलेमविरुध्द लढलेल्या राष्ट्रांना परमेश्वर शिक्षा करील. तो त्या राष्ट्रांना रोगराईने पछाडेल. जिवंतपणीच लोकांची कातडी कुजू लागेल. त्याचे डोळे त्यांच्या खाचांत आणि जिभा तोंडांत सडतील. 13-15 हा भयंकर रोग शत्रू-सैन्याच्या छावणीत पसरेल. त्यांच्या घोड्यांना, खेचरांना, उंटाना आणि गाढवांनाही हा भयंकर रोग होईल.

तेव्हा लोकांना खरोखरच परमेश्वरच परमेश्वराची भीती वाटेल प्रत्येकजण आपल्या शेजाऱ्याचा हात धरील आणि शेजारी एकमेकांशी भांडतील. [b] यहूदाचे लोक यरुशलेममध्ये लढतील. पण नगरीभोवतीच्या सर्व राष्ट्रांकडून त्यांना संपत्ती मिळेल त्यांना भरपूर सोने, चांदी आणि कपडालता मिळेल. 16 यरुशलेमशी लढण्यास आलेल्यापैकी काही वाचतील. आणि सर्वशक्तिमान परमेश्वराची उपासना करण्यासाठी ते दरवर्षी येतील. मंडपाचा सण साजरा करायला ते यरुशलेमला येतील. 17 पृथ्वीवरील कोणत्याही कुटुंबातील लोक यरुशलेमला प्रभुराजाची, सर्व शक्तिमान परमेश्वराची उपासना करायला गेले नाहीत तर परमेश्वर त्यांच्या प्रदेशात पाऊस पाडणार नाही. 18 जर मिसरमधील एखादे घराणे मंडपाचा सण साजरा करण्यासठी आले नाही, तर शत्रूंच्या राष्ट्रांत परमेश्वराने जो भयंकर रोग पसरविला होता, तो रोग त्यांना होईल. 19 “मंडपाच्या साणा”लान आल्याबद्दल मिसरला व इतर राष्ट्रांना ही शिक्षा असेल.

20 त्यावेळी, सर्व गोष्टी देवाच्या मालकीच्या असतील अगदी घोड्यांच्या सरंजामावरसुध्दा परमेश्वरासाठी पवित्र अशी चिठ्ठी असेल. परमेश्वराच्या मंदिरात वापरली जाणारी भांडी, वेदीवर वापरल्या जाणाऱ्या कटोऱ्यांइतकीच महत्वाची असतील. 21 खरे, म्हणजे, यरुशलेममधील व यहूदातील प्रत्येक ताटावर सर्वशक्तिमान परमेश्वरास पवित्र असे लिहिलेले असेल. परमेश्वराची उपासना करणारा प्रत्येकजण या भांड्यांमध्ये अन्न शिजवून खाऊ शकेल.

त्यावेळी सर्व शक्तिमान परमेश्वराच्या मंदिरात वस्तूंची खरेदी-विक्री करणारे कोणीही व्यापारी नसतील.

योहान 17

येशू त्याच्या अनुयायांसाठी प्रार्थना करतो

17 येशूने हे बोलणे संपविल्यावर आपले डोळे आकाशाकडे लावले आणि प्रार्थना केली: “पित्या, वेळ आली आहे, पुत्राचे गौरव कर, यासाठी की, पुत्र तुझे गौरव करील. तू त्याला जे दिले आहे त्या सर्वांना त्याने अनंतकालचे जीवन द्यावे यासाठी सर्व मनुष्यांवर तू त्याला अधिकार दिलास त्याप्रमाणे त्याने तुझे गौरव करावे. आणि अनंतकाळचे जीवन हेच की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. तू मला जे काम करायला दिले ते संपवून मी पृथ्वीवर तुला गौरविले. तर आता हे पित्या, जग होण्यापूर्वी तुझ्याबरोबर जे गौरव मला होते त्याद्वारे तू स्वतःबरोबर माझे गौरव कर.

“ज्यांना तू मला या जगातून दिलेस, त्यांना मी तुला प्रगट केले. ते तुझे होते, व तू त्यांना माझ्या स्वाधीन केलेस. आणि त्यांनी तुझे वचन पाळले, आता त्यांना माहीत आहे की, जे काही तू मला दिले आहेस ते तुझ्यापासून येते. कारण जी वचने तू मला दिली आहेस ती मी त्यांना दिली. आणि त्यांनी ती स्वीकारली, त्यांना निश्चितार्थाने माहीत होते की, मी तुझ्यापासून आलो आहे. आणि त्यांनी विश्वास ठेवला की तू मला पाठविले आहेस. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, मी जगासाठी प्रार्थना करीत नाही. तर ज्यांना तू माझ्या स्वाधीन केलेस, त्यांच्यासाठीच कारण ते तुझे आहेत. 10 माझ्याकडे जे काही आहे ते तुझे आहे आणि जे तुझे आहे ते माझे आहे. आणि त्यांच्याद्वारे गौरव माझ्याकडे आले आहे.

11 “आणि यापुढे मी जगात नाही, ते जगात आहेत, आणि मी तुझ्याकडे येत आहे, हे पवित्र पित्या, जे नाव तू मला दिले आहेस, त्या तुझ्या नावात त्यांना राख, यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे. 12 मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्थंत जे नाव तू मला दिलेस त्या तुझ्या नावात मी त्यांना राखले. आणि मी त्यांना संभाळले आणि ज्याने नाशाचा मार्ग निवडला होता त्याच्याशिवाय त्यांच्यातील कोणी नाश पावला नाही, हे यासाठी झाले की शास्त्रलेख पूर्ण व्हावा.

13 “पण आता मी तुझ्याकडे येत आहे. आणि त्यांच्यामध्ये माझा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी सांगतो.” 14 “मी त्यांना तुझे शब्द दिले आहेत आणि जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी या जगाचा नाही तसे तेही या जगाचे नाहीत.

15 “या जगातून तू त्यांना काढून घ्यावेस अशी माझी प्रार्थना नाही, पण दुष्टांपासून तू त्यांचे रक्षण करावेस. 16 जसा मी या जगाचा नाही, तसे तेसुद्धा या जगाचे नाहीत. 17 तू त्यांना सत्यात पवित्र कर, कारण तुझा शब्द हेच सत्य आहे. 18 जसे तू मला या जगात पाठविले तसे मी त्यांना या जगात पाठवितो. 19 त्यांच्यासाठी मी स्वतःला पवित्र करतो यासाठी की तेसुद्वा खऱ्या अर्थाने पवित्र व्हावेत.

20 “आणि मी फक्त त्यांच्यासाठीच विनंति करतो असे नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंति करतो. 21 यासाठी की, त्या सर्वांनी एक व्हावे, पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसेच त्यांनी आम्हांमध्ये असावे. यासाठी की, तू मला पाठविले असा जगाने विश्वास धरावा. 22 आणि तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यांना दिले आहे, यासाठी की जसे आपण एक आहो तसे त्यांनीही एक व्हावे. 23 मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये. ते पूर्णपणे ऐक्यात आणले जावेत यासाठी की, हे जगाला माहीत व्हावे की तू मला पाठविलेस आणि जशी तू माझ्यावर प्रीति केलीस तशी मीही त्यांच्यावर केली.

24 “हे पित्या, जे लोक तू मला दिलेस, त्यांनी मी जेथे आहे तेथे माझ्याबरोबर असावे असे मला वाटते. आणि त्यांनी माझे गौरव करावे, जगाच्या निर्मितीपूर्वी तू माझ्यावर प्रीति केली, म्हणून जे गौरव तू मला दिलेस, तेच हे गौरव आहे. 25 नीतिमान पित्या, जरी जग तुला ओळखत नाही, तरी मी तुला ओळखतो, आणि त्यांना माहीत आहे की, तू मला पाठविलेले आहेस. 26 मी त्यांना तुझा परिचय करून दिला आहे, व तुझी ओळख करून देतच राहीन, यासाठी की जे प्रेम तू माझ्यावर करतोस ते त्यांच्यावरही करावेस आणि मी स्वतः त्यांच्यामध्ये असावे.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center