Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 31

राजा हिज्कीयाच्या सुधारणा

31 अशा तऱ्हेने वल्हांडणाच्या उत्सवाची समाप्ती झाली. यरुशलेममध्ये त्यासाठी जमलेले इस्राएल लोक यहूदात आपापल्या गावी परतले. तिथे गेल्यावर त्यांनी दैवतांच्या दगडी मूर्ती फोडून टाकल्या. या खोट्या नाट्या दैवतांची पूजा होत असे. अशेराचे खांबही त्यांनी उखडून टाकले. यहूदा आणि बन्यामिन प्रांतातील सर्वच्यासर्व उंच स्थाने आणि वेद्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. एफ्राइम आणि मनश्शे या प्रदेशातील लोकांनीही तेच केले. गैर देवतांच्या प्रार्थनेसाठी बनवण्यात आलेल्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी नाश केला. तेव्हाच सर्व इस्राएल लोक घरोघरी गेले.

लेव्यांची आणि याजकांची गटागटां मध्ये विभागणी केलेली होती. त्यापैकी प्रत्येक गटाला आपापले विशेष कामकाज नेमून दिलेले होते. राजा हिज्कीयाने त्या सर्वाना आपला कारभार हाती घ्यायला सांगितले. होमार्पणे व शांतिअर्पणे वाहणे हे लेवींचे व याजकांचे नेमलेले काम होते. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे म्हणणे व परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणे हे ही त्यांचे काम होते. यज्ञात अर्पण करण्यासाठी म्हणून हिज्कीयाने आपल्या पशुधनातील काही पशू दिले. सकाळ संध्याकाळच्या दैनिक होमार्पणांखातर त्यांचा विनियोग करण्यात आला. शब्बाथ, नवचंद्रदर्शनी व इतर नैमित्तिक कार्ये या दिवशीही होमार्पणे होत असत. हे परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार होत असे.

आपल्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा लोकांना लेवी व याजक यांना द्यावा लागत असे. तो त्यांनी द्यावा अशी आज्ञा राजा हिज्कीयाने केली. त्यामुळे नियतकार्य निर्वेधपणे प्रभूच्या नियमशास्त्रानुसार करणे याजकांना व लेवींना शक्य झाले. ही आज्ञा सर्व प्रजेच्या कानी गेली. त्याबरोबर इस्राएल लोकांनी आपले धान्याचे पीक, द्राक्ष, तेल, मध आणि इतर बागायती उत्पन्न या सगळ्याचा एकदशांश भाग आणून दिला. यहूदातील नगरवासी इस्राएली व यहूदी लोकांनीही आपली गुरे आणि शेळ्यामेंढ्या यांचा दहावा हिस्सा जमा केला. परमेश्वर देवाप्रीत्यर्थ आखून दिलेल्या जागेत धान्याच्याही राशी त्यांनी आणून ओतल्या. त्यांनी या सर्व वस्तूंचे ढीग रचले.

लोकांनी या सर्व वस्तू आणून टाकायला तिसऱ्या महिन्यात सुरुवात केली आणि सातव्या महिन्यात हे काम संपले. राजा हिज्कीया आणि इतर सरदार यांनी जेव्हा या राशी पाहिल्या तेव्हा त्यांनी परमेश्वराला आणि इस्राएलच्या प्रजेला धन्यवाद दिले.

राजाने मग याजकांना आणि लेवींना या गोळा झालेल्या वस्तूंविषयी विचारले. 10 तेव्हा सादोकच्या घराण्यातला मुख्य याजक अजऱ्या हिज्कीयाला म्हणाला की, “लोक परमेश्वराच्या मंदिरात धान्य व या सगळ्या गोष्टी अर्पण करायला लागल्यापासून आम्हाला पोटभर खायला मिळू लागले आहे. अगदी तृप्त होईपर्यंत खाऊनही एवढे उरले आहे. परमेश्वराने आपल्या प्रजेला खरोखरच दुवा दिला आहे, म्हणून तर इतके शिल्लक राहीले आहे.”

11 हिज्कीयाने मग याजकांना परमेश्वराच्या मंदिरात कोठारे तयार ठेवायला सांगितली. त्याची आज्ञा अंमलात आणली गेली. 12 याजकांनी परमेश्वरासाठी अर्पण केलेल्या वस्तू धान्याचा अथवा पशूंचा दहावा हिस्सा, इतर काही वाहिलेल्या गोष्टी आत आणल्या आणि मंदिरातील कोठारात जमा केल्या. कोनन्या लेवी हा या भांडारावरचा प्रमुख अधिकारी होता. शिमी त्याच्या हाताखाली होता. शिमी कोनन्याचा भाऊ होता. 13 यहीएल, अजऱ्या, नहथ, असाएल, यरीमोथ, योजाबाद, अलीएल, इस्मख्या, महथ व बनाया यांच्यावर कोनन्या आणि शिमी या दोन भावांची देखरेख होती. राजा हिज्कीया आणि देवाच्या मंदिराचा प्रमुख अधिकारी अजऱ्या यांनी या माणसांची निवड केली.

14 लोकांनी देवाला स्वखुशीने अर्पण केलेल्या सगळ्या गोष्टींवर कोरेची देखरेख होती. परमेश्वराला वाहिलेल्या या गोष्टींचे वाटप करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. तसेच परमेश्वराला आलेल्या पवित्र भेटवस्तूंची वाटणी करण्याचेही काम त्याचेच होते. कोरे पूर्वेकडच्या प्रवेशद्वाराचा द्वारपाल होता. त्याच्या वडिलांचे नाव इम्नाह लेवी. 15 एदेन, मिन्यामीन, येशूवा, शमाया, अमऱ्या व शखन्या हे कोरेचे मदतनीस होते. याजक राहात त्या नगरात ते निष्ठेने आपली सेवा रुजू करत. याजकांच्या प्रत्येक गटांमधील आपापल्या भाऊबंदांना त्यांच्या वाटणीचा हिस्सा देत. हे वाटप करताना ते लहान मोठा अशा सर्वानाच सारखाच भाग देतअसत.

16 लेवी घराण्याच्या इतिहासात ज्यांची नावे नोंदलेली होती असे, तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे जे लेवी पुरुष परमेश्वराच्या मंदिरात नेमून दिलेल्या दैनंदिन कामासाठी जात त्यांना त्यांची वाटणी हे मदतनीस देत. अशाप्राकरे लेवींच्या प्रत्येक गटाला काम नेमून दिलेले होते. 17 याजकांना त्यांच्या वाटणीचा हिस्सा मिळत असे. ज्या लेवींची आपापल्या पितृकुळाप्रमाणे नोंद झाली होती त्यांना आणि किमान वीस वर्षे किंवा त्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लेवींना त्यांची वाटणी मिळत असे. त्यांच्यावरील जबाबदारीचे स्वरुप आणि त्यांचा गट यावर त्याचे प्रमाण ठरत. असे. 18 ज्या लेवींची वंशावळ्यांमध्ये नोदं झालेली होती त्या सर्वांच्या मुलाबाळांना, बायकांना मुलगे व मुली यांनाही आपापला हिस्सा मिळे. परमेश्वराच्या सेवेसाठी ते नेहमीच शुचिर्भूत होऊन तप्तर असत म्हणून त्यांना हे दिले जाई.

19 अहरोन वंशातील काही याजकांची लेवी राहात असत त्या गावांमध्ये शेत-शिवारे होती. काही अहरोनचे वंशज नगरांमध्येही राहात होते. तेव्हा त्या नगरातील माणसांची नावानिशी निवड करुन त्यांना आपल्या उत्पन्नातला वाटा या अहरोनवंशजांना द्यायला निवडले होते. वंशावळीत नोंदवलेले सर्वजण आणि पुरुष लेवी यांना हा वाटा मिळे.

20 राजा हिज्कीयाने अशाप्रकारे यहूदात चांगली कामगिरी केली. परमेश्वर देवाच्या दृष्टीने जे योग्य, बरोबर आणि सत्य ते त्याने केले. 21 हाती घेतलेल्या प्रत्येक कामात त्याला यश आले, उदाहरणार्थ, देवाच्या मंदिरातील उपासना, नियमशास्त्राचे पालन, परमेश्वराला शरण जाणे. हिज्कीयाने हे सर्व मनापासून केले.

प्रकटीकरण 17

श्र्वापदावर बसलेली तुच्छ स्त्री

17 सात वाट्या असलेल्या सात देवदूतांपैकी एक जण माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, “ये, मी तुला त्या अति नीच वेश्येला झालेली शिक्षा दाखवतो. ती बहुत जलांवर बसली आहे. पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला. आणि तिच्या लैंगिक पापाच्या द्राक्षारसाने पृथ्वीवरील लोक धुंद झाले आहेत.”

मग देवदूताने मला आत्म्याद्वारे वाळवंटात नेले. तेथे मी एका स्त्रीला किरमिजी रंगाच्या श्र्वापदावर बसलेले पाहिले. त्या श्र्वापदाच्या अंगावर वाईट नावे लिहिली होती. त्या श्र्वापदाला सात डोकी आणि दहा शिंगे होती, त्या स्त्रीने किरमिजी व जांभळी वस्त्रे घातली होती. तिने घातलेल्या सोने, जवाहिर व मोत्यांनी ती चमकत होती. तिच्या हातात सोन्याचा पेला होता, हा पेला वाईट गोष्टींनी आणि तिच्या लैंगिक पापांच्या अशुद्धतेने भरला होता. तिच्या कपाळावर नाव लिहिले होते. त्या नावाला गुपित अर्थ आहे. त्यावर असे लिहीले होते:

मोठी बाबेल वंश्यांची

व पृथ्वीवरील ओंगळ

गोष्टींची माता

मी पाहिले ती स्त्री रक्तसेवनाने मस्त झाली होती. ती देवाच्या पवित्र लोकांचे रक्त प्याली होती. ज्या लोकांनी येशूविषयी सांगितले त्याचे रक्त ती प्याली होती.

जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा फार आश्चर्यचकित झालो. मग देवदूत मला म्हणाला, “तू आश्चर्यचकित का झालास? मी तुला त्या स्त्रीचे आणि ती ज्या श्र्वापदावर बसली आहे, ज्याला सात डोकी व दहा शिंगे आहेत त्याचे रहस्य सांगतो. जो श्र्वापद तू पाहिला तो (पूर्वी) होता, आता तो नाही. आणि तो तळविरहीत बोगद्यातून येईल आणि नष्ट केला जाईल. पृथ्वीवर राहणारे लोक ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात पृथ्वीच्या स्थापनेपासून लिहिलेली नाहीत ते जेव्हा श्र्वापदाला पाहतील, तेव्हा ते आश्चर्यचकित होतील कारण तो (पूर्वी) होता, आता तो नाही आणि तरी तो येईल.

“यासाठी शाहणपण असलेल्या बुद्धीची आवश्यकता आहे. सात डोकी या सात टेकड्या आहेत, ज्यावर ती स्त्री बसते. 10 ते सात राजेसुद्धा आहेत. त्यापैकी पाच राजे पतन पावले आहेत. एक आहे आणि एक अजून आला नाही. पण जेव्हा तो येईल तेव्हा तो फारच थोडा वेळ थांबेल. 11 जो प्राणी (पूर्वी) होता आणि जो आता नाही तो आठवा राजा आहे. आणि तो त्या सात राजांपासून आहे. आणि तो आपल्या नाशाकडे जात आहे.

12 “जी दहा शिंगे तू पाहिलीस ते ज्यांना अजून सत्ताधिकार मिळाला नाही, असे दहा राजे आहेत. पण त्यांना श्र्वादाबरोबर एका घटकेसाठी राजासारखा अधिकार मिळेल. 13 त्यांचा एकच हेतू आहे. आणि ते त्यांची शक्ती व अधिकार श्र्वापदाला देतील. 14 ते कोकऱ्याबरोबर युद्ध करतील पण कोकरा त्यांच्यावर मात करील. कारण तो प्रभूंचा प्रभु व राजांचा राजा आहे. आणि त्याच्याबरोबर त्याने बोलाविलेले, निवडलेले, विश्वासू अनुयायी असतील.”

15 मग देवदूत मला म्हणाला, “जे पाण्यांचे प्रवाह तू पाहिले, ज्यावर वेश्या बसली होती, ते म्हणजे पुष्कळ लोक, समुदाय, राष्ट्रांचे व भाषा बोलणारे लोक आहेत. 16 तो श्र्वापद आणि दहा शिंगे तू पाहिलीस ते त्या वेश्येचा तिरस्कार करतील. ते तिला ओसाड, उजाड करतील आणि तिला नग्न सोडून देतील, ते तिचे मांस खातील, व अग्नीने तिला जाळतील. 17 देवाचे वचन पूर्ण होईपर्यंत, देवाने त्या श्र्वापदाला सत्ता चालविण्याचा अधिकार देण्याचे कबूल केले आहे. देवाने त्याचा हेतु पूर्ण करण्याचे त्यांच्या मनात घातले आहे. 18 जी स्त्री तू पाहिलीस ती मोठी नगरी आहे, जी पृथ्वीवरच्या राजांवर सत्ता गाजवील.”

जखऱ्या 13:2-9

यापुढे खोटे संदेष्टे राहणार नाहीत

सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी जगातील सर्व मूर्तींचे मी उच्चाटन करीन. लोकांना त्यांची नावेसुध्दा आठवणार नाहीत. मी ढोंगी संदेष्ट्यांचा आणि अशुध्द आत्म्यांचा नायनाट करीन. एखाद्याने भविष्य वर्तविणे चालूच ठेवले, तर त्याला शिक्षा केली जाईल. त्याचे स्वतःचे आई-वडील त्याला म्हणतील, ‘परमेश्वराच्या नावाने तू खोटे बोललास तेव्हा तुला मरणाशिवाय गत्यंतर नाही.’ भविष्य वर्तविल्याबद्दल त्याचे आई-वडील त्याला भोसकतील. त्यावेळी संदेष्ट्यांना स्वतःच्या दृष्टान्तांची आणि संदेशाची लाज वाटेल. ज्यावरुन संदेष्टा ओळखाला जातो असे सणाचे कापड ते वापरणार नाहीत. भविष्याच्या नावाखाली खोटेनाटे सांगून लोकांना फसविण्यासाठी ते असे कपडे घालणार नाहीत. ‘मी संदेष्टा नाही. मी शेतकरी आहे मी लहानपणापासून शेतीच करीत आलोय.’ असे ते सांगतील. पण इतर लोक त्याला विचारतील, ‘मग तुझ्या हातावर जखमा कसल्या?’ तेव्हा तो उत्तर देईल, ‘मित्राच्या घरात मला मार देण्यात आला!’”

सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “हे तलवारी, मेंढपाळांवर प्रहार कर. माझ्या मित्रावर वार कर. मेंढपाळावर प्रहार कर. माझ्या मित्रावर वार कर. मेंढपाळावर वार कर म्हणजे मेंढ्या पळून जातील आणि मी त्या लहान जीवांना शिक्षा करीन. त्या प्रदेशातील 2 3 लोक जखमी होऊन मरतील. पण 1 3 वाचतील मग वाचलेल्यांची मी परीक्षा घेईन. मी त्यांना खूप त्रास देईल. चांदीची शुध्दता सिध्द करण्यासठी तिला आगीत टाकले जाते. त्या आगीप्रमाणे संकटे येतील. सोन्याची पारख करतात तसा मी त्यांना पारखीन. मग ते माझा धावा करतील आणि मी त्यांना प्रतिसाद देईन. मी म्हणेण, ‘तुम्ही माझे लोक आहात.’ आणि ते म्हणतील, ‘परमेश्वर आमचा देव आहे.’”

योहान 16

16 “मी हे सर्व तुम्हांला सांगितले आहे ते यासाठी की, तुम्ही माझ्यावरील विश्वासविषयी भुलविले जाऊ नये. ते तुम्हांला सभास्थानाच्या बाहेर काढतील; खरे पाहता अशी वेळ येत आहे की, जो कोणी तुमचा जीव घेईल त्याला वाटेल की, आपण देवाची सेवाच करीत आहोत. आणि ते तुम्हांला असे जरूर करतील कारण त्यांना पिता किंवा मी माहीत नाही. मी तुम्हांला आता या गोष्टी सांगितल्या आहेत, म्हणून या गोष्टी घडण्याची वेळ येईल.

पवित्र आत्म्याचे कार्य

“तेव्हा मी तुम्हांला त्यांच्यविषयी सावध केले होते हे तुमच्या लक्षात येईल. परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडे आता मी जातो. ‘तरी तू कोठे जातोस’ असे तुम्हांतील कोणी मला विचारीत नाही. पण या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या आहेत म्हणून तुमचे अंतःकरण दु:खाने भरले आहे. तरी तुम्हांस खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या हिताचे आहे कारण मी गेलो नाही तर साहाय्यकर्ता तुमच्याकडे येणार नाही. पण जर मी गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन.

“आणि तो येऊन पाप, धार्मिकता आणि न्याय याविषयी जग दोषी आहे हे सिद्य करील. मी पापाविषयी सांगितले तर, लोक माझ्यावर विश्वास ठेवीत नाहीत. साहाय्यकर्ता (पवित्र आत्मा) त्यांना त्यांची जाणीव करून देईल 10 नीतिमत्वाविषयी मी पित्याकडे जात आहे. मी देवाशी प्रामाणिक असण्याचे तो साहाय्यकर्ता (पवित्र आत्मा) त्यांना पटवून देईल 11 हा साहाय्यकर्ता जगाला न्यायाचे सत्य पटवून देईल. कारण या जगाच्या अधिपतीचा (सैतान) न्याय होऊन चुकला आहे.

12 “मला आणखी पुष्कळ सांगावयाचे आहे. तुम्हांला झेपणार नाही इतके सांगायचे आहे. 13 पण जेव्हा तो सत्याचा आत्मा येतो, तेव्हा तो तुम्हांला सर्व सत्यात मार्गदर्शन करील, तो त्याचे स्वतःचे असे काही बोलणार नाही, तो जे ऐकतो तेच तो बोलेल, आणि जे अजून यावयाचे आहे, त्याविषयी तो तुम्हांला सांगेल. 14 जे माझे आहे त्यातून घेऊन आणि ते तुम्हांला कळवून तो माझे गौरव करील. 15 जे सर्व पित्याचे आहे, ते माझे आहे. या कारणासाठीच मी म्हणालो, की आत्मा जे माझे आहे त्यातून घेईल आणि ते तुम्हांला कळवील.

दु:ख आनंदामध्ये बदलेल

16 “थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही, नंतर थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.”

17 त्याच्या शिष्यांतील काही जण एकमेकांस म्हणाले, “तो असे म्हणतो याचा अर्थ काय? थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही. मग थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. कारण मी पित्याकडे जात आहे!” 18 ते विचारतच राहिले, “‘थोड्या वेळाने याचा अर्थ काय?’ तो काय म्हणत आहे हे आम्हांला समजत नाही.”

19 येशूने पाहिले की, याविषयी त्यांना काही विचारायचे आहे. म्हणून तो त्यांना म्हणाला, “तुम्ही एकमेकांना हे विचारीत आहात काय की, जेव्हा मी म्हणालो, ‘थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही, आणि मग थोडया वेळाने तुम्ही मला पाहाल?’ 20 मी तुम्हांला खरे सांगतो. जग आनंद करीत असताना तुम्ही रडाल आणि शोक कराल, तुम्ही दु:खी व्हाल, पण तुमचे दु:ख आनंदात बदलेल.

21 “जन्म देणाऱ्या स्त्रीला वेदना होतात कारण तिची वेळ आलेली असते. पण जेव्हा बाळ जन्मते तेव्हा ती सर्व वेदना विसरते. कारण एक बाळ या जगात जन्म घेते. 22 त्याप्रमाणे तुम्हाला आता खरोखर दु:ख आहे, पण मी तुम्हांला पुन्हा भेटेन, आणि तुम्ही आनंद कराल आणि कोणीही तुमचा आनंद हिरावून घेणार नाही. 23 त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे काही मागणार नाही, मी खरे सांगतो. माझ्या नावाने जे काही तुम्ही मागाल ते माझा पिता तुम्हांला देईल. 24 आतापर्यंत तुम्ही माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल आणि तुमचा आनंद परिपूर्ण होईल.

जगावर विजय

25 “जरी मी तुम्हांला रूपकाच्या भाषेत या गोष्टी सांगितल्या आहेत, तरी मी आणखी अशा प्रकारची भाषा बोलणार नाही, पण साधेपणाने पित्याविषयी तुम्हांला सांगेन. 26 त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल, आणि मी तुमच्यासाठी पित्याकडे विनंति करीन असे मी म्हणत नाही. 27 कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीति करतो कारण तुम्ही माझ्यावर प्रीति केली व माझ्यावर विश्वास ठेवला की, मी देवापासून आलो. 28 मी पित्यापासून आलो आणि जगात प्रवेशलो आणि आता मी जग सोडत आहे, आणि पित्याकडे पुन्हा जात आहे.”

29 मग येशूचे शिष्य म्हणाले, “आता तुम्ही स्पष्टपणे बोलत आहात आणि रूपकाची भाषा वापरीत नाही. 30 आता आम्हांला पक्के समजले की, तुम्हांला सर्व माहीत आहे. आणि तुम्हाला कोणी प्रश्न विचारण्याचीसुद्वा आवश्यकता नाही, यामुळे आमचा विश्वास बसतो की, आपण देवापासून आला आहात.”

31 येशूने उत्तर दिले, “आता तुम्ही विश्वास धरू लागला काय? 32 पण अशी वेळ येत आहे आणि आली आहे, जेव्हा तुमची पांगापांग होईल. प्रत्येक जण त्याच्या घरी जाईल. तुम्ही मला एकटेच सोडाल, तरीही मी एकटा नाही कारण माझा पिता मजबरोबर आहे.”

33 “मी तुम्हांला या गोष्टी सांगितल्या आहेत. यासाठी की माझ्यामध्ये तुम्हांला शांति मिळावी, या जगात तुम्हांला त्रास होईल, पण धीर धरा! मी जगावर मात केली आहे.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center