Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 27-28

यहूदाचा राजा योथाम

27 योथाम राजा झाला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये 16 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यरुशा. ती सादोकची मुलगी. योथाम परमेश्वराच्या दृष्टीने उचित तेच करीत असे. आपले वडील उज्जीया यांच्याप्रमाणेच तो परमेश्वराच्या आज्ञेत राहिला. पण त्याचे वडील जसे परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळायला गेले तसे मात्र त्याने केले नाही. लोकांचे दुर्वर्तन चालूच होते. परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा योथामने पुन्हा करवला. ओफेलच्या कोटावर त्याने बरेच बांधकाम केले. यहूदाच्या डोंगराळ प्रदेशात नगरे वसवली. जंगलात किल्ले आणि बुरुज बांधले. अम्मोन्यांचा राजा आणि त्यांचे सैन्य यांच्यावर योथामने चढाई केली आणि त्यांचा पराभव केला. त्यामुळे पुढील तीनवर्षे अम्मोनी योथामला 3 3/4 टन चांदी, 62,000 बुशेल गहू (किंवा 10,000 कोर) गहू आणि तेवढेच जव दरवर्षी देत असत.

परमेश्वर देवाने सांगितल्याप्रमाणे मनःपूर्वक आचरण केल्यामुळे योथामचे सामर्थ्य वाढले. त्याने केलेल्या इतर गोष्टी आणि लढाया यांची हकीकत इस्राएल व यहूदा राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे. योथाम गादीवर आला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. पुढे योथाम मरण पावला आणि त्याचे त्याच्या पूर्वजांशजारी दफन केले गेले. दाविदनगरांत लोकांनी त्याला पुरले. योथामच्या जागी आहाज हा त्याचा मुलगा राज्य करु लागला.

यहूदाचा राजा आहाज

28 आहाज राजा झाला तेव्हा वीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. आपला पूर्वज दावीद वागला तसे आहाजचे वर्तन नव्हते. त्याचे आचरण परमेश्वराला मान्य होणारे नव्हते. इस्राएलच्या राजांच्या दुर्वर्तनाचा त्याने कित्ता गिरवला. त्याने बआल देवतेच्या ओतीव मूर्ती पूजेसाठी केल्या. बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने धूप जाळला. आपल्या पोटच्या मुलांना त्याने अग्नीमध्ये आहूती करुन बळी दिले. या प्रदेशात राहणारे लोक जे भयंकर पाप करीत तेच त्याने केले. इस्राएल लोकांनी या भूमीवर पाऊल ठेवले तेव्हा परमेश्वराने त्या लोकांना तिथून घालवले होते. आहाजने उंच स्थानी, डोंगरावर तसेच प्रत्येक हिरव्यागार वृक्षाखाली यज्ञ केले आणि धूप जाळला.

5-6 आहाजच्या या पापांमुळे परमेश्वर देवाने अरामच्या राजाच्या हातून आहाजचा पराभव करविला. अरामच्या राजाने व त्याच्या सैन्याने आहाजचा पाडाव करुन यहूदाच्या लोकांना कैद केले व दिमिष्काला नेले. इस्राएलचा राजा पेकह याच्याकडूनही परमेश्वराने आहाजचा पराभव करवला. पेकहच्या वडलांचे नाव रमाल्या. पेकहच्या सैन्याने एका दिवसात यहूदाचे 1,20,000 शूर सैनिक ठार केले. आपले पूर्वज ज्या परमेश्वर देवाला शरण गेले त्या परमेश्वराची साथ सोडल्यामुळे यहूदी लोकांचा असा पराभव झाला. जिख्री हा एफ्राइममधला एक शूर योध्दा. त्याने राजा आहाजचा मुलगा मासेया, राजमहालाचा प्रमुख कारभारी अज्रीकाम आणि राजाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा अधिकारी एलकाना यांना ठार मारले.

इस्राएलच्या सैन्याने यहूदात राहणाऱ्या 2,00,000 जणांना पकडून नेले. हे सर्व त्यांचे नातलगच होते. या कैद्यांमध्ये बायका मुलेही होती. तसेच यहूदातील किंमती वस्तूही लुटून नेल्या. ही लूट आणि बंदिवान यांना ताब्यात घेऊन ते शोमरोन या नगरात आले. तिथे ओदेद नावाचा परमेश्वराचा एक संदेष्टा होता. शोमरोनला आलेल्या इस्राएली सैन्याला तो भेटला. ओदेद त्यांना म्हणाला, “तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यामुळे तुम्ही यहूदी लोकांचा पराभव करु शकलात कारण परमेश्वराचा यहूद्यांवर कोप झाला होता. पण तुम्ही अतिशय नीच पध्दतीने यहूद्यांना मारलेत, त्यांना शासन केलेत. त्यामुळे आता परमेश्वराच्या क्रोधाचा रोख तुमच्यावर आहे. 10 यहूदाच्या व यरुशलेमच्या लोकांना गुलाम करण्याचा तुमचा मानस आहे. परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही हे पाप केले आहे. 11 आता माझे ऐका. पकडून आणलेल्या या आपल्या भावाबहिणींना परत पाठवून द्या. परमेश्वराला तुमचा अनावर संताप आला आहे.”

12 एफ्राइमच्या काही प्रमुख मंडळींनी इस्राएलच्या सैनिकांना लढाईवरुन परतताना पाहिले. तेव्हा या प्रमुखांनी सैनिकांना भेटून चांगली समज दिली. योहानानचा मुलगा अजऱ्या, मशिल्लेमोथचा मुलगा बरेख्या, शल्लूमचा मुलगा यहिज्कीया, आणि हदलाईचा मुलगा अमासा ही ती नेते मंडळी होत. 13 ती इस्राएली सैन्याला म्हणाली, “यहूदाच्या कैद्यांना इकडे आणू नका. तसे केलेत तर तो परमेश्वराचा आपण केलेला मोठा अपराध ठरेल. आपल्या पापांमध्ये त्यामुळे आणखी भर पडेल. इस्राएलवर परमेश्वराचा कोप होईल.”

14 तेव्हा त्या सैनिकांनी कैदी आणि लुटलेली चीजवस्तू हे इस्राएल लोकांच्या आणि त्या प्रमुखांच्या हवाली केले. 15 तेव्हा अजऱ्या, बरेख्या, यहिज्कीया आणि अमासा यांनी पुढे होऊन कैद्यांना जवळ केले. त्यांतील उघड्या नागड्या लोकांना त्यांनी लुटीतले कपडेलत्ते दिले. जे अनवाणी होते त्यांना पादत्राणे दिली. त्या सर्वांना त्यांनी खाऊ पिऊ घातले. मर्दनासाठी तेल दिले. एवढे झाल्यावर या प्रमुखांनी चालायचे त्राण नसलेल्या कैद्यांना गाढवावर बसवले आणि या सर्वांना त्यांनी यरीहो या त्यांच्या गावी घरी नेऊन सोडले. यरीहोला खजुरीच्या झाडांचे नगर असेही म्हणतात. मग ही चार वडिलधारी मंडळी शोमरोनला परतली.

16-17 याचवेळी अदोमच्या लोकांनी यहूदावर चढाई करुन त्यांचा पाडाव केला. अदोम्यांनी यहूदी लोकांना कैद करुन नेले. तेव्हा राजा आहाजने अश्शूरच्या राजाकडे मदत मागितली. 18 पलिष्ट्यांनीही डोंगराळ तळवटीच्या भागातल्या गावांवर आणि दक्षिण यहूदावर हल्ला केला. बेथ-शेमेश, अयालोन, खदेरोथ, सोखो, तिम्ना आणि गिम्जो ही गावे त्यांच्या आसपासच्या खेड्यांसह काबीज केली. 19 परमेश्वराने यहूदाला संकटांनी जेरीला आणले कारण यहूदाचा राजा आहाज याने यहूद्यांना दुर्वर्तनाला प्रवृत्त केले होते. आहाजने परमेश्वराचे उल्लंघन केले होते. 20 तिल्गथ-पिल्नेसर हा अश्शूरचा राजा. यानेही आहाजला मदत करण्याऐवजी त्रासच दिला. 21 आहाजने परमेश्वराच्या मंदिरातील, राजमहालातील तसेच सरदारांच्या घरातील धनदौलत घेऊन अश्शूरच्या राजाला दिली पण त्याचाही फायदा झाला नाही.

22 या संकटकाळात आहाजच्या दुर्वर्तनात आणखी भरच पडली. तो परमेश्वरापासून दुरावला. 23 दिमिष्काच्या लोकांच्या दैवतांसाठी त्याने यज्ञ केले. या दिमिष्कांनी त्याला हरवले होते. तेव्हा त्याने विचार केला, “अरामचे लोक ज्या देवाची पूजा करतात ते देव त्यांना साहाय्य करतात. तेव्हा मी ही त्यांच्यासाठी यज्ञ केले तर ते मला सोडवतील.” म्हणून आहाज त्या दैवतांना शरण गेला. त्याच्या या कृत्यांमुळेच त्याचा आणि इस्राएल लोकांचा नाश होत गेला.

24 आहाजने देवाच्या मंदिरातली सगळी उपकरणी गोळा करुन त्यांची मोडतोड करुन विल्हेवाट लावली. परमेश्वराच्या मंदिराची दारे त्याने बंद करुन घेतली. वेद्या केल्या आणि त्या यरुशलेममध्ये चौका चौकात बसवल्या. 25 यहूदातील सर्व गावांमध्ये इतर देवतांच्या पूजेला धूप जाळण्यासाठी म्हणून उंच स्थाने केली. अशाप्रकारे वागून आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवाचा त्याने क्रोध ओढवून घेतला.

26 आहाजच्या बाकीच्या गोष्टी आणि त्याचे सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे आचरण यहूदा व इस्राएल राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहे. 27 आहाज मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. यरुशलेम नगरात लोकांनी त्याला पुरले. पण इस्राएलच्या इतर राजांचे जेथे दफन झाले त्या जागी मात्र नव्हे. आहाजचा मुलगा हिज्कीया हा पुढे राजा झाला.

प्रकटीकरण 14

मुक्त केलेल्यांचे गीत

14 मग मी पाहिले, आणि तेथे माइयासमोर कोकरा होता. तो सियोन पर्वतावर [a] उभा होता. त्याच्याबरोबर 1,44,000 लोक होते. त्यांच्या कपाळांवर त्याचे आणि त्याच्या पित्याचे नाव लिहिलेले होते.

आणि आकाशातून पुराच्या लाटांचा लोंढा आल्यासारखा आवाज, ढगांचा मोठा गडगडाटाचा आवाज ऐकला. जो आवाज मी ऐकला तो जणू काय अनेक लोक आपल्या वीणा वाजवीत आहेत तसा आवाज होता. ते लोक सिंहासनासमोर आणि चार जिवंत प्राण्यांसमोर आणि वडिलांसमोर नवे गीत गात होते. जे लोक पृथ्वीपासून मुक्त करण्यात आलेले, असे 1,44,000 तेच हे गाणे शिकू शकले. त्यांच्याशिवाय दुसरे कोणीही ते गीत शिकू शकले नाही.

हे लोक असे होते की त्यांनी स्त्रियांशी वाईट कर्म करुन स्वतःला भ्रष्ट केले नाही. त्यांनी स्वतःला शुद्ध राखले. कोकरा जेथे गेला तेथे ते गेले. हे पृथ्वीवरील लोकांमधून खंडणी भरुन मुक्त केलेले होते. देवाला आणि कोकऱ्याला अर्पिलेले ते पाहिले आहेत. त्यांच्या मुखात असत्य कधी आढलेले नाही, खोटे बोलण्याबद्दल ते निर्दोष होते.

तीन देवदूत

मग मी आणखी एक देवदूत हवेत उंच उडताना पाहिला. पृथ्वीवरील लोकांना सांगण्यासाठी म्हणजे प्रत्येक राष्ट्राच्या, वंशाच्या, भाषेच्या आणि जमातीच्या लोकांना सांगण्यासाठी त्या देवदूताकडे अनंतकाळचे शुभवर्तमान होते. देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला, “ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र, व पाण्याचे झरे निर्माण केले, त्या देवाचे भय धरा आणि त्याची स्तुति करा. देवाने न्याय करावा अशी वेळ आली आहे. देवाची उपासना करा.”

मग पहिल्या देवदूताच्या मागे दुसरा देवदूत गेला आणि म्हणाला, “तिचा नाश झालेला आहे! बाबेल हे मोठे शहर नष्ट झाले आहे. त्या नगरीने सर्व राष्ट्रांना तिच्या व्यभिचाराचा द्राक्षारस व देवाचा राग प्यायला लावला.”

तिसरा देवदूत पहिल्या दोन देवदूतांच्या मागे गेला. तिसरा देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला: “जो माणूस प्राण्याची आणि प्राण्याच्या मूर्तीची उपासना करतो, त्याला त्याच्या कपाळावर किंवा हातावर प्राण्याची खूण करु देतो, 10 तो मनुष्य देवाच्या रागाच्या सर्व शक्तीनिशी बनवलेला द्राक्षारस पिईल. त्या व्यक्तीला पवित्र देवदूतांसमोर व कोकऱ्यासमोर जळत्या गंधकाने पीडले जाईल. 11 आणि त्यांच्या जळत्या वेदनांतून अनंतकाळासाठी धूर निघेल, जे लोक प्राण्याची उपासना करतात आणि त्याच्या मूर्तीची उपासना करतात किंवा ज्यांना त्याच्या नावाचे चिन्ह आहे. त्यांना रात्र असो किंवा दिवस असो, विश्रांति मिळणार नाही.” 12 याचा अर्थ असा की, देवाच्या पवित्र लोकांनी धीर धरला पाहिजे. त्यांनी देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. आणि येशूमधील त्यांचा विश्वास टिकवला पाहिजे.

13 मग मी स्वर्गातून एक आवाज ऐकला, तो आवाज म्हणाला, “हे लिही: येथून पुढे, जे प्रभूमध्ये मेलेले आहेत, ते त्यांच्या श्रमापासून विश्रांति घेतील.”

आत्मा म्हणतो, “होय, हे खरे आहे. ते लोक आपल्या कठीण कामापासून विश्रांति पावतील. त्यांनी केलेल्या गोष्टी त्यांच्याबरोबर राहतील.”

पूथ्वीची कापणी

14 मी पाहिले आणि तेथे माझ्यासमोर पांढरा ढग होता. त्या ढगावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा दिसत होता. त्याच्या डोक्यावर सोनेरी मुगुट आणि त्याच्या हातात धारदार विळा होता. 15 मग आणखी एक देवदूत मंदिरामधून बाहेर आला व ढगावर बसलेल्यास मोठ्याने म्हणाला, “तुझा विळा घे व (पृथ्वीवरुन) पीक गोळा कर, कापणीची वेळ आली आहे, पृथ्वीचे फळ पिकले आहे.” 16 मग जो ढगावर बसला होता त्याने त्याचा विळा पृथ्वीवर चालविला. आणि पृथ्वीची कापणी केली.

17 मग दुसरा देवदूत स्वर्गातील मंदिरातून बाहेर आला. या देवदूताकडेसुद्धा धारदार विळा होता. 18 मग आणखी एक देवदूत वेदीकडून आला. या देवदूताचा अग्नीवर अधिकार होता. या देवदूताने धारदार विळा असलेल्या देवदूताला बोलाविले. तो म्हणाला, “तुझा धारदार विळा घे आणि पृथ्वीवरील द्राक्षाचे घड काढ. पृथ्वीची द्राक्षे पिकली आहेत.” 19 देवदूताने त्याचा विळा पृथ्वीवर चालवला. देवदूताने पृथ्वीची द्राक्षे गोळा केली आणि देवाच्या क्रोधाच्या घाण्यात टाकली. 20 ती द्राक्षे द्राक्षाच्या कुंडात शहराबाहेर तुडवीली गेली. त्यांतून रक्त वाहिले. त्याचा प्रवाह घोड्याच्या डोक्यापर्यंत पोहोंचेल इतका असून तो 200 मैलांपर्यंत वाहत गेला.

जखऱ्या 10

परमेश्वराचे वचन

10 वसंत ऋतूत पावसासाठी परमेश्वराची प्रार्थना करा. देव वीज पाठवील आणि पाऊस पडेल. देव प्रत्येकाच्या शेतातील पीक वाढवील.

लोक, भविष्य जाण्यासाठी, त्यांच्याकडील लहान मूर्तीचा व जादूटोण्याचा उपयोग करतात. पण ते सर्व व्यर्थ आहे. त्यांना दृष्टांन्त होतात आणि ते त्यांना पडलेल्या स्वप्नांबद्दल सांगतात. पण ते सर्व केवळ अर्थहीन थोतांड आहे. लोकांची स्थिती मदतीसाठी रडत सैरभैर फिरणाऱ्या मेंढ्यांसारखी आहे. पण त्यांना वळविणारा कोणीही मेंढपाळ नाही.

परमेश्वर म्हणतो, “मी मेंढपाळांवर (नेत्यांवर) फार रागावलो आहे, माझ्या मेंढरांच्या (लोकांच्या) ह्या स्थितीला मी त्यांना जबाबदार धरले आहे.” (यहूदातील लोक म्हणजे देवाच्या मेंढ्यांचा कळपच. सर्व शक्तिमान परमेश्वर ह्या कळपाची खरोखरच काळजी वाहतो. एखादा सैनिक जशी आपल्या सुंदर घोड्याची काळजी घेतो, तशीच काळजी देव ह्या माणसांची घेतो.)

“यहूदातून कूच करणाऱ्या सैन्याबरोबरच कोनशिला, तंबूच्या खुंट्या, युध्दात परावयाची धनुष्ये हे सर्व येईल. ते आपल्या शत्रूचा पराभव करतील. रस्त्यांतून चिखल तुडवीत जावे, तसे ते शत्रूला तुडवीत जातील. परमेश्वर त्यांच्याबाजूला असल्याने ते लढाई करतील आणि शत्रूच्या घोडदळाचासुध्दा पराभव करतील. मी यहूद्यांच्या लोकांना सामर्थ्यवान बनवीन. योसेफच्या वंशाला युध्द जिंकण्यास साहाय्य करीन. आणि त्यांना सुरक्षितपणे व सुखरुप परत आणीन. त्यांचे सांत्वन करीन आणि मी त्यांचा कधीच त्याग केला नव्हता, असेच त्यांच्याशी वागेन. मी परमेश्वर त्यांचा देव आहे व त्यांना मदत करीन. भरपूर मद्य घेतलेल्या सैनिकांप्रमाणे एफ्राईमचे लोक खूष होतील. लहान मुले आनंदून जातील. तेही खुष होतील. परमेश्वराबरोबरचा त्यांचा वेळ आनंदात जाईल.

“मी त्यांना शीळ वाजवून एकत्र बोलवीन. मी त्यांना खरोखर वाचवीन. त्यांची संख्या खूप वाढेल. होय! मी माझ्या लोकांना राष्ट्रां-राष्ट्रांत पांगवीत आलो आहे. पण त्या दुरदूरच्या ठिकाणीही ते माझे स्मरण ठेवतील. ते आणि त्यांची मुलेबाळे जगतील, वाचतील आणि परत येतील. 10 मी त्यांना मिसरमधून व अश्शूमधून परत आणीन मी त्यांना गिलादच्या भागात आणीन. पण तेथे पुरेशी जागा नसल्याने मी त्यांना लबानोनमध्ये राहू देईन.” 11 पूर्वी जसे देवाने आपल्या लोकांना मिसरच्या बाहेर आणले तसेच तो आता आणील. तेव्हा देवाने समुद्राच्या लाटांवर प्रहार करुन समुद्र दुभंगाविला होता आणि लोक तो संकटाचा समुद्र पार करुन आले होते. आता परमेश्वर नद्यांचे पाणी आटवील. तो अश्शूरचे गर्वहरण करील आणि मिसरची सत्ता नष्ट करील. 12 परमेश्वर त्याच्या लोकांना सामर्थ्यवान करील ते देवासाठी व त्याच्या नावासाठी जगातील. परमेश्वरानेच ह्या गोष्टी सांगितल्या.

योहान 13

येशू त्याच्या शिष्यांचे पाय धुतो

13 मग वल्हांडण सणापूर्वी येशूने आपण या जगातून निघून पित्याकडे जावे असा समय आला आहे, हे जाणून आपले स्वतःचे लोक जे जगात होते त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रीति केली.

मग संध्याकाळचे भोजन होण्याच्या वेळेस सैतानाने शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत याच्या मनात त्याला शत्रूंच्या हाती घावे असे आधीच घालून दिले असताना, आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे आणि आपण देवापासून आलो आणि आता देवाकडे जातो हे ओळखून, येशू जेवणावरून उठला, त्याने आपली बाह्यवस्त्रे काढून ठेवली व रुमाल घेऊन आपल्या कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊ लागला. आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने पुसू लागला.

मग तो शिमोन पेत्राकडे आला; पण पेत्र त्याला म्हणाला, “प्रभु, तू माझे पाय धुणार काय?”

येशूने उत्तर दिले, “मी आता जे करीत आहे, ते तुला आता कळणार नाही, तर पुढे तुला कळेल.”

पेत्र त्याला म्हणाला, “तू माझे पाय कधीही धुवायचे नाहीत.”

येशूने उत्तर दिले, “जर मी तुझे पाय धुतले नाहीत तर तुला माझ्या बरोबर वाटा नाही.”

शिमोन पेत्राने उत्तर दिले,“मग प्रभु माझे पायच नव्हे तर हात व डोकेही धुवा.”

10 येशूने उत्तर दिले, “ज्याची आंघोळ झाली आहे, त्याचे फक्त पाय धुतले तरी चालेल, कारण तो स्वच्छच आहे. तुम्ही स्वच्छ आहात पण सर्वच नाहीत.” 11 आपल्याला कोण धरून देणार हे येशूला माहीत होते, म्हणून “तुम्ही सर्वच शुद्ध नाहीत” असे तो म्हणाला.

12 जेव्हा त्याने त्याचे पाय धुण्याचे संपविले तेव्हा त्याने आपली बाह्यवस्त्रे घातली व आपल्या जागेवर आला. त्याने त्यांना विचारले, “मी काय केले हे तुम्हांला समजले काय? 13 तुम्ही मला ‘गुरुजी’ आणि ‘प्रभु’ म्हणता आणि योग्य म्हणता, कारण मी तोच आहे. 14 म्हणून मी जो प्रभु आणि गुरु असूनही मी तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुवावे. 15 कारण जसे मी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला उदाहरण घालून दिले. 16 मी खरे सांगतो, दास आपल्या मालकापेक्षा श्रेष्ठ नाही आणि पाठविलेला ज्याने पाठविले त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. 17 या गोष्टी जर तुम्ही समजता आणि त्या तुम्ही जर केल्या तर तुम्ही आशीर्वादित आहात.

18 “मी तुम्हां सर्वाविषयी बोलत नाही. ज्यांना मी निवडले ते मला माहीत आहेत. परंतु पवित्र शास्त्रात जसे लिहिले आहे तसे घडलेच पाहिजे: ‘जो माझी भाकर खातो त्याने माझ्यावर आपली टाच उचलली आहे.’ [a] 19 हे होण्याअगोदरच मी तुम्हांस सांगतो, यासाठी की जेव्हा हे होईल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा, की मी तो आहे. 20 मी तुम्हांस खरे सांगतो ज्या कोणाला मी पाठवितो त्याला जो स्वीकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो.”

येशू त्याच्याविरूद्ध कोण असेल ते सांगतो(A)

21 असे बोलल्यावर येशू आपल्या आत्म्यात व्याकुळ झाला आणि उघडपणे म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यातील एकजण मला धरून देईल.”

22 तेव्हा तो कोणाविषयी बोलतो असा संशय धरून शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. 23 आणि ज्याच्यावर येशू प्रीति करीत असे असा त्याच्या शिष्यातील एकजण येशूच्याजवळ खेटून बसला होता. 24 शिमोन पेत्राने त्या शिष्याला खुणावले आणि म्हणाला, “ज्याच्याविषयी तो बोलतो तो कोण आहे हे विचार.”

25 तेव्हा तो तसाच येशूच्या अगदी जवळ असता त्याल म्हणाला, “प्रभु तो कोण आहे?”

26 येशूने उत्तर दिले, “ज्याला मी भाकरीचा तुकडा ताटात भिजवून देईन तोच तो आहे.” मग त्याने भाकरीचा तुकडा ताटात बुडवून घेतला व तो शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत याला दिला. 27 त्याने भाकरीचा तुकडा घेतला आणि सैतानाने त्याचा ताबा घेतला. मग येशूने त्याला म्हटले, “तुला जे करायचे आहे ते लवकर कर.” 28 पण त्याने त्याला काय सांगितले हे जेवणास बसलेल्यांपैकी कोणाला कळले नाही. 29 कारण यहूदाजवळ पैशाचा व्यवहार होता. काहींना वाटले येशू त्याला भोजनास जे पाहिजे ते आणण्यासाठी सांगत आहे किंवा गरिबाला काही देण्याविषयी सांगत आहे.

30 यहूदाने भाकर घेतल्याबरोबर तो बाहेर गेला कारण ती वेळ रात्रीची होती.

येशू त्याच्या मरणाविषयी बोलतो

31 तो गेल्यावर येशू म्हणाला, “आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे आणि त्याच्याठायी देवाचे गौरव झाले आहे. 32 देव आपल्याठायी त्याचे गौरव करील. तो त्याचे गौरव लवकर करील.”

33 “माझ्या मुलांनो, अजून थोडा वेळ मी तुमच्याबरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी यहूद्यांस सांगितले की, जेथे मी जातो तेथे तुमच्याने येता येणार नाही, तसेच मी तुम्हांलाही आता सांगतो.

34 “मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करा. जशी मी तुम्हांवर प्रीति केली आहे तशीच तुम्हीही एकमेकांवर प्रीति करा. 35 तुमची एकमेकांवर प्रिति असली तर सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.”

पेत्र येशूला नाकारिल(B)

36 शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभु, तुम्ही कोठे जात आहात?”

येशूने उत्तर दिले, “जेथे मी जातो तेथे तुझ्याने येता येणार नाही. पण नंतर तू माझ्यामागे येशील.”

37 पेत्र त्याला म्हणाला, “माझ्याने आताच तुमच्या मागे का येता येणार नाही? मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे.”

38 मग येशूने उत्तर दिले, “तू खरोखर आपला जीव मजसाठी देशील? मी खरे सांगतो. तू मला तीन वेळा नाकारीपर्यंत कोंबडा आरवणार नाही.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center