M’Cheyne Bible Reading Plan
14 अबीयाला पुढे आपल्या पूर्वजांसोबत चिरविश्रांती मिळाली. दावीदनगरात लोकांनी त्याचे दफन केले. त्याचा मुलगा आसा हा त्याच्यानंतर राज्य करु लागला. आसाच्या कारकिर्दीत लोकांना दहा वर्षे शांतता लाभली.
यहूदाचा राजा आसा
2 आसाने परमेश्वर देवाच्या दृष्टीने न्याय्य आणि उचित असा कारभार केला. 3 त्याने मूर्तिपूजेसाठी वापरात येणाऱ्या चमत्कारिक वेद्या काढून टाकल्या. उच्च स्थाने पाडली आणि पवित्र मानले जाणारे स्तंभ फोडून टाकले. आसाने अशेरा देवीचे खांबही उदध्वस्त केले. 4 त्याने यहूदी लोकांना परमेश्वर देवाला अनुसरायची आज्ञा केली. त्यांच्या पूर्वजाचा देव तोच. त्या परमेश्वराने घालून दिलेल्या आज्ञा आणि नियम पाळायला फर्मावले. 5 यहूदाच्या सगळ्या नगरांमधली उच्च स्थाने आणि धूप जाळायच्या वेद्या आसाने काढून टाकल्या. आसाच्या कारकीर्दीत त्यामुळे राज्यात शांतता नांदत होती. 6 या काळात आसाने यहूदात भक्कम तटबंदीची नगरे बांधली. परमेश्वराने शांतता दिल्यामुळे या काळात आसा युध्दमुक्त राहिला.
7 आसा यहूदातील लोकांना म्हणाला, “ही नगरे बांधून त्याभोवती तटबंदी करु. त्यांना कोट, बुरुज, वेशी आणि अडसर करु. या प्रदेशात आपण राहात आहोत, तेव्हाच हे करु. परमेश्वर देवाला अनुसरल्यामुळे हा देश आपल्याला मिळाला आहे. त्याने आपल्याला स्वास्थ्यही दिले आहे.” तेव्हा त्यांनी ते बांधले व यश मिळविले.
8 आसाच्या सैन्यात यहूदाच्या वंशातील 3,00,000 जण आणि बन्यामिन वंशातील 2,80,000 लोक होते. यहूदी लोकांकडे मोठ्या ढाली आणि भाले होते. बन्यामिनाकडे लहान ढाली होत्या. तसेच धनुष्य-बाण होते. हे सर्व पराक्रमी आणि बलवान लढवय्ये होते.
9 पुढे जेरहने आसावर स्वारी केली. जेरह हा कूशी होता. त्याच्या कडे 10,00,000 सैनिक आणि 300 रथ होते. जेरह आपल्या सैन्याला घेऊन थेट मारेशा नगरापर्यंत आला. 10 आसा त्याच्याशी सामना करायला निघाला. मारेशा जवळच्या सफाथाच्या खोऱ्यात त्याने आपले सैन्य उभे केले.
11 आसा आपल्या परमेश्वर देवाला हाक मारुन म्हणाला, “परमेश्वरा, या बलाढ्य सेनेपुढे दुर्बलांना तूच मदत करु शकतोस. तूच आमच्या मदतीला उभा राहा. आम्ही तुझ्यावर भरवंसा ठेवून आहोत. तुझे नाव घेऊनच आम्ही या विशाल सेनेला तोंड देणार आहोत. परमेश्वर देवा, तुझ्यावर कोणी विजय मिळवू नये.”
12 मग परमेश्वराने आसाच्या यहूदा सेनेकडून कूशी सैन्याचा पराभव करवला. कूशी सैन्याने पळ काढला. 13 आसाच्या सैन्याने गरारपर्यंत कुशींचा पाठलाग केला. त्यात कूशींची एवढी प्राणहानी झाली की पुन्हा लढाईला उभे राहायचे बळ त्यांच्यात राहिले नाही. परमेश्वरापुढे आणि त्याच्या सैन्यापुढे ते पार धुळीस मिळाले. आसाच्या लोकांनी कूशींच्या मौल्यवान वस्तू लुटल्या. 14 गरारच्या आसपासच्या सर्व गावांचा आसाच्या सैन्याने पराभव केला. तिथल्या लोकांनी परमेश्वराची धास्ती घेतली. या गावांमध्ये लुटण्यासारखे बरेच काही होते. ते आसाच्या सैन्याने घेतले. 15 मेंढपाळांच्या वस्त्यांवर आसाच्या सैन्याने धाड घातली. तेथून त्यांनी बरीच मेंढरे आणि उंट घेतले आणि ते यरुशलेमला परतले.
आसाने केलेले बदल
15 ओबेदचा मुलगा अजऱ्या याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. 2 अजऱ्या आसाच्या भेटीला गेला आणि म्हणाला, “आसा मी काय म्हणतो ते ऐक. यहूदा आणि बन्यामिन लोकहो, तुम्हीही ऐका. जर तुम्ही परमेश्वराबरोबर राहिलात तर तो तुमच्याबरोबर राहील. जर तुम्ही त्याचा शोध केलात तर तो तुम्हाला भेटेल. पण तुम्ही त्याला सोडलेत तर तो ही तुम्हाला सोडेल. 3 इस्राएलला दीर्घकाळ पर्यंत खरा देव असा नव्हता, तसेच शिकवायला याजक किंवा नियमशास्त्र नव्हते 4 पण अडचणीत सापडल्यावर इस्राएल लोक पुन्हा परमेश्वर देवाकडे वळाले, तो इस्राएलचा देव आहे. त्यांनी देवाचा शोध घेतला आणि त्यांना तो सापडला. 5 त्या धकाधकीच्या काळात कोणीही सुरक्षितपणे प्रवास करु शकत नव्हता. सगळ्याच देशामध्ये अराजकाची स्थिती होती. 6 देश असोत की नगरे सगळी एकमेकांविरुध्द लढत होती. कारण परमेश्वराने सर्व प्रकारच्या संकटांनी त्यांना त्रस्त केले होते. 7 पण आसा, तू व इस्राएल लोकहो तुम्ही हतबल होऊ नका, धीर सोडू नका. यहूदांनो बन्यामिनांनो हिंमतीने वागा. तुमच्या सद्वर्तनाचे फळ तुम्हाला मिळेल.”
8 आसाला या शब्दांनी आणि ओबेद या संदेष्ट्याच्या संदेशाने धीर आला. त्याने यहूदा आणि बन्यामिनमधील अमंगळ मूर्ती हटवल्या. एफ्राइमचा जो डोंगराळ प्रदेश त्याने ताब्यात घेतला होता त्या प्रदेशातल्या गावांमधल्या मूर्तिही काढून टाकल्या. मंदिराच्या प्रवेशद्वारातील परमेश्वराच्या वेदीची डागडुजी केली.
9 मग त्याने यहूदा आणि बन्यामिनमधील सर्व लोक तसेच एफ्राइम, मनश्शे व शिमोन वंशातील जे लोक इस्राएल राष्ट्रातून यहूदांत आले होते त्यांना एकत्र बोलावले. आसाचा देव परमेश्वर याची त्याला साथ आहे हे पाहून लोक मोठ्या संख्येने आले.
10 आसाच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षाच्या तिसऱ्या महिन्यात आसा आणि हे सर्व लोक यरुशलेममध्ये एकत्र जमले. 11 त्यांनी 700 गुरे, 7,000 मेंढरे यांचे बली परमेश्वराला अर्पण केले. ही गुरे आणि लूट त्यांनी शत्रू कडून आणली होती. 12 तिथे त्यांनी जिवाभावाने परमेश्वर देवाची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या पूर्वजांचाही देव हाच होता.
13 जो परमेश्वर देवाची सेवा करणार नाही त्याला ठार करण्याचे ठरवले. मग अशी व्यक्ती लहान असो की मोठी, स्त्री असो की पुरुष 14 आसा आणि हे सर्व लोक यांनी परमेश्वरापुढे शपथ वाहिली. त्यांनी मोठ्याने जयघोष केला. कर्णे आणि रणशिंगे या वाद्यांचा नाद केला. 15 मनोभावे शपथ घेतल्यामुळे सर्व यहूदा लोकांना मनापासून आनंद झाला. एकचित्ताने ते परमेश्वराला शरण गेले. त्यांनी देवाचा शोध घेतला असता तो त्यांना सापडला होता. परमेश्वराने त्यांना चहूबाजूंनी स्वास्थ्य दिले.
16 आसा राजाने आपली आई माका हिलाही राजमाता पदावरुन दूर केले. कारण तिने अमंगळ अशा अशेरा देवीच्या स्तंभाची स्थापना केली होती. त्याने तो स्तंभ मोडून तोडून टाकला आणि किद्रोन खोऱ्यात जाळून टाकला. 17 यहूदातील उच्च स्थाने काढून टाकली नाहीत तरी पण तो आमरण परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला.
18 मग त्याने व त्याच्या वडिलांनी परमेश्वरासाठी करवून घेतलेल्या सोन्याचांदीच्या पवित्र वस्तू पुन्हा मंदिरात आणल्या. 19 आसाच्या पस्तिस वर्षांच्या कारकीर्दीत मग पुन्हा युध्द झाले नाही.
योहान स्वर्ग पाहतो
4 तेव्हा मी पाहिले आणि स्वर्गात दार माझ्यासमोर उघडलेले दिसले. आणि अगोदर जसा आवाज मी माझ्याशी बोलताना ऐकला होता तसाच आवाज मी ऐकला. तो आवाज कर्ण्याच्या आवाजासारखा होता. तो आवाज म्हणाला, “इकडे ये, आणि मी तुला यानंतर जे घडणार आहे ते दाखवितो.” 2 त्याच क्षणी आत्म्याने माझा ताबा घेतला. तेथे स्वर्गात माझ्यासमोर सिंहासन होते. कोणी एक त्यावर बसलेले होते. 3 त्यावर जो बसला होता तो यास्फे व सार्दी या रत्नांसारखा होता आणि सिंहासनाभोवती पाचूसारखे दिसणारे मेघधनुष्य होते.
4 सिंहासनाभोवती चोवीस आसने होती, आणि त्या आसनांवर शुभ्र कपडे घातलेले व डोक्यावर सोन्याचा मुगुट असलेले चोवीस वडील बसले होते. 5 सिंहासनापासून विजा व भिन्न आवाज निघत होते. शिवाय गडगडाट निघत होते. सिंहासनासमोर सात दिवे जळत होते. ते देवाचे सात आत्मे होते. 6 तसेच सिंहासनासमोर काचेच्या समुद्रासारखे काहीतरी दिसत होते. ते स्फटिकासारखे स्पष्ट होते.
मध्यभागी, सिंहासनाभोवती चार जिवंत प्राणी होते आणि ते डोळ्यांनी भरले होते. पुढे डोळा, मागे डोळे. 7 पहिला जिवंत प्राणी सिंहासारखा होता. दुसरा बैलासारखा होता. तिसऱ्याचा चेहरा मनुष्यासारखा होता. आणि चवथा उडत्या गरुडासारखा होता. 8 त्या प्रत्येक जिवंत प्राण्याला सहा पंख होते. व त्यांना सगळीकडे डोळे होते. त्यांच्या पंखाखालीसुद्धा डोळे होते. दिवस व रात्र न थांबता ते म्हणत होते:
“पवित्र, पवित्र, पवित्र, हा प्रभु देव सर्वसमर्थ
जो होता, जो आहे, आणि जो येणार आहे.”
9 जेव्हा जेव्हा ते जिवंत प्राणी सिंहासनावर बसलेल्याचा गौरव, सन्मान व उपकारस्तुति करीत होते आणि व जो सिंहासनावर बसलेला होता तो अनंतकाळपर्यंत जगत राहणारा आहे, 10 तेव्हा तेव्हा जो सिंहासनावर बसला होता आणि अनंतकाळपर्यंत राहतो त्याच्यासमोर चोवीस वडील पाया पडत होते आणि त्याची उपासना करीत होते. ते आपले मुगुट सिंहासनासमोर ठेवत होते. व म्हणत होते की:
11 “आमचा प्रभु आणि देव!
तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य प्राप्त करुन घेण्यास योग्य आहेस.
तू सर्व काही तयार केलेस
तुला वाटत होते म्हणून सर्व काही अस्तित्वात आले आणि करण्यात आले.”
देव लोकांना उत्तेजन देतो
2 सातव्या महिन्याच्या एकविसाव्या दिवशी हाग्गयला परमेश्वराकडून संदेश मिळाला: 2 यहूदाचा राज्यपाल आणि शल्तीएलचा मुलगा जरुब्बाबेल व प्रमुख याजक यहोसादाकचा मुलगा यहोशवा आणि इतर लोक यांच्याशी तू बोल. त्यांना ह्या गोष्टी सांग. 3 “तुमच्यातील कितीजण ह्या मंदिराकडे पाहून ह्याची तुलना आधीच्या नाश झालेल्या सुंदर मंदिराशी करण्याचा प्रयत्न करतात? तुम्हाला काय वाटते? आधीच्या मंदिराच्या तुलनेत हे काहीच नाही ना? 4 पण आता परमेश्वर म्हणतो, ‘जरुब्बाबेल, निराश होऊ नकोस.’ यहोसादाकच्या मुला, प्रमुख याजक यहोशवा, ‘नाउमेद होऊ नकोस. या देशाच्या सर्व लोकांनो, धीर सोडू नका. हे काम चालू ठेवा, मी तुमच्याबरोबर आहे.’ सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.”
5 परमेश्वर म्हणतो, “तुम्ही मिसर सोडले, तेव्हा मी तुमच्याबरोबर करार केला. मी माझ्या वचनाला जागलो. माझा आत्मा तुमच्यात आहे. तेव्हा घाबरु नका. 6 का? कारण सर्वशक्तिमान परमेश्वर हे सांगत आहे. अगदी थोड्या वेळात मी पुन्हा एकदा सर्व गोष्टी हलवून सोडीन आकाश आणि पृथ्वी कंपित करीन समुद्र आणि कोरडी जमीन यांना कंपित करीन. 7 मी राष्ट्रांना धक्का देईन आणि मग प्रत्येक राष्ट्र तुमच्याकडे संपत्ती घेऊन येईल मग हे मंदिर वैभवाने भरुन टाकीन. सर्वशक्तिमान परमेश्वर हे सांगत आहे. 8 त्यांच्याकडील सर्व सोने-चांदी माझ्या मालकीची आहे सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगत आहे. 9 आणि सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो की आताचे मंदिर हे आधीच्या मंदिरापेक्षा सुंदर असेल. मी ह्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करीन. लक्षात ठेवा, सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगत आहे.”
काम सुरु झाले आहे आशीर्वाद मिळतील
10 पारसचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षीच्या नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी हाग्गय संदेष्ट्याला परमेश्वराकडून पुढील संदेश मिळाला. 11 सर्वशक्तिमान परमेश्वर या गोष्टींविषयी नियम काय सांगत आहे, हे तू याजकांना विचारावे अशी मी तुला आज्ञा देतो. 12 “समजा एखादा माणूस वस्त्रांमधून मांस नेतो. ते मांस परमेश्वराला अर्पण करण्यासाठी आहे म्हणून ते पवित्र आहे. पण ज्या वस्त्रांत ते गुंडाळले आहे, त्या वस्त्राचा स्पर्श भाकरी, किंवा शिजविलेले अन्न, मद्य, तेल किंवा इतर अन्नाला झाला, तर ह्या स्पर्श झालेल्या सर्व वस्तू पवित्र होतील का?”
याजक उत्तरले, “नाही”
13 मग हाग्गयने विचारले, “एखाद्याने प्रेताला स्पर्श केला, तर तो अशुध्द होतो, ह्या माणसाने दुसऱ्या कोणत्या गोष्टीला स्पर्श केला, तर ती गोष्टसुध्दा अशुध्द होईल का?”
याजक म्हणाले, “हो! ती गोष्टसुध्दा अशुध्दच होईल.”
14 मग हाग्गय म्हणाला, “परमेश्वर देव, या गोष्टी सांगतो. ‘ह्या राष्ट्रातील लोकांबद्दलही असेच म्हणणे योग्य आहे. ते माझ्या दृष्टीने शुध्द व पवित्र नव्हते. म्हणून त्यांनी ज्या गोष्टींना स्पर्श केला, त्या अशुध्द झाल्या आणि ते वेदीवर जे जे अर्पण करतात ते ते अशुध्द आहे.
15 “‘आजच्या दिवसाच्या आधी काय घडले त्याचा विचार करा. परमेश्वराच्या मंदिराचे काम तुम्ही सुरु केलेत त्या पूर्वीच्या काळाचा विचार करा. 16 लोकांना वीस मापे धान्य पाहिजे असताना, राशीत दहा मापेच होते मद्यकुंडातून लोकांना पन्नास बुधले मद्य पाहिजे होते पर त्याच्यात फक्त वीसच बुधले मद्य होते. 17 का? कारण मी तुम्हाला शिक्षा केली. मी पाठविलेल्या रोगाने तुमची झाडे मेली. तुम्ही स्वतःच्या हाताने बनविलेल्या वस्तू मी पाठविलेल्या गारपिटीने नष्ट झाल्या. मी एवढे केले तरी तुम्ही मला शरण आला नाहीत.’ परमेश्वरच असे म्हणाला.”
18 परमेश्वर म्हणाला, “आज नवव्या महिन्याचा चोविसावा दिवस आहे. परमेश्वराच्या मंदिराच्या पायाचे काम तुम्ही पूर्ण केले आहे. आता ह्यापुढे काय होते त्यावर लक्ष ठेवा. 19 कोठारात अजून काही धान्य आहे का? नाही. केली, अंजीर, डाळिंबे, जैतुन ह्या झाडांकडे पाहा. त्यांना फळे धरत आहेत का? नाही. पण आजपासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन.”
20 हाग्गयला महिन्याच्या चोविसाव्या दिवशी, परमेश्वराकडून आणखी एक संदेश आला तो असा होता: 21 “राज्यपाल जरुब्बाबेलकडे जा. त्याला सांग की मी आकाश-पृथ्वी हालवीन. 22 मी पुष्कळ राजे आणि राज्ये उलथवून टाकीन. त्या दुसऱ्या लोकांच्या राज्यसत्तेचा मी नाश करीन. मी त्यांच्या रथांचा व सारथ्यांचा नाश करीन. आता त्या सैन्यांमध्ये मैत्री आहे. पण ते एकमेकांविरुध्द उठातील आणि तलवारीने एकमेकांना मारतील. 23 सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगत आहे शल्तीएलच्या मुला, जरुब्बाबेल, तू माझा सेवक आहेस मी तुझी निवड केली आहे, आणि त्यावेळी मी तुझा मुद्रांकित अंगठीप्रमाणे उपयोग करीन. मी ह्या गोष्टी केल्या आहेत ह्याचा तू साक्षी वा पुरावा असशील.”
सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
येशू आणि निकदेम
3 निकदेम नावाचा एक मनुष्य होता. निकदेम परूशी लोकांपैकी एक असून तो यहूदी लोकांचा एक महत्त्वाचा पुढारी होता. 2 एका रात्री निकदेम येशूकडे आला आणि म्हणाला, “रब्बी, तुम्ही देवाकडून पाठविलेले शिक्षक आहात हे आम्हांला माहीत आहे. कारण तुम्ही जे चमत्कार करता ते देवाच्या मदतीशिवाय कोणाही माणसाला करता येणार नाहीत.”
3 येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे सांगतो. प्रत्येक व्यक्तीचा नव्याने जन्म झालाच पाहिजे. जर एखाद्या माणसाचा नव्याने जन्म झाला नाही, तर देवाचे राज्य पाहू शकणार नाही.”
4 निकदेम म्हणाला. “जर एखादा माणूस म्हातारा असेल तर त्याचा नव्याने जन्म कसा होईल? तो आपल्या आईच्या उदरात परत जाऊ शकत नाही! म्हणून त्या व्यक्तीचा दुसऱ्यांदा जन्म होणारच नाही!”
5 येशूने उत्तर दिले. “मी तुम्हांला खरे सांगतो: मनुष्याचा पाण्याने आणि आत्म्याने जन्म झाला नाही तर त्याचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे शक्यच नाही. 6 मनुष्य मानवी आईवडिलांच्या उदरी जन्माला येतो. परंतु त्याच्या आत्मिक जीवनाचा जन्म पवित्र आत्म्यापासून होतो. 7 तुमचा नवीन जन्म झाला पाहिजे म्हणून मी तुम्हांला सांगितल्याबहल आश्चर्यचकित होऊ नका. 8 वाऱ्याला वहायला पाहिजे तिकडे तो वाहतो, वारा वाहताना तुम्हांला त्याचा आवाज ऐकू येतो. परंतु वारा कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला कळत नाही. आत्म्यापासून जन्म पावलेल्या प्रत्थेक माणसाचे असेच असते.”
9 निकदेम म्हणाला, “हे सारे कसे शक्य आहे?”
10 येशू म्हणाला, “तुम्ही इस्राएलाचे प्रमुख शिक्षक आहात. तरीही तुम्हांला या गोष्टी कळत नाहीत काय? 11 मी तुम्हांला खरे तेच सांगतो. आम्हांला जे माहीत आहे त्याविषयी आम्ही बोलतो, जे पाहिले त्याविष्यी आम्ही सांगतो. परंतु आम्ही जे सांगतो ते तुम्ही लोक मानीत नाही. 12 मी तुम्हांला जगातील गोष्टीविषयी सांगितले पण तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही. मग जर मी तुम्हांला स्वर्गातील गोष्टीविषयी सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवणारच नाही! 13 मनुष्याचा पुत्र असा एकमेव आहे जो वर स्वर्गात जेथे होता तेथे गेला आणि स्वर्गातून उतरुन खाली आला.”
14 “मोशेने अरण्यात असताना सापाल उंच केले. [a] मनुष्याच्या पुत्रालाही तसेच उंच केले पाहिजे. 15 अशासाठी की जो कोणी मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचे जीवन मिळू शकते.”
16 होय, देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनतंकाळचे जीवन मिळावे. 17 देवाने आपल्या पुत्राला जगात पाठविले. जगाचा न्याय करण्यासाठी देवाने आपला पुत्र पाठविला नाही, तर आपल्या पुत्राद्वारे जगाचे तारण व्हावे यासाठी देवाने त्याला जगात पाठविले. 18 जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय (दोषी ठरविले जाणे) होणार नाही. परंतु जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्याय झाल्यासारखाच आहे. कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्रावर विश्वास ठेवला नाही. 19 ज्या वस्तुस्थितीच्या आधारे लोकांचा न्याय केला जातो ती ही जगामध्ये प्रकाश आला, परंतु लोकांना प्रकाश नको होता. त्यांना अंधार पाहिजे होता. कारण लोक वाईट कृत्ये करीत होते. 20 वाईट कृत्ये करणारा प्रत्येक जण प्रकाशाचा द्वेष करतो. तो प्रकाशाकडे येत नाही. कारण त्याने केलेली सर्व वाईट कृत्ये तो प्रकाश उघड करील. 21 परंतु जो सत्य मार्गाने चालतो तो प्रकाशाकडे वळतो. आणि त्याने केलेली कामे देवाकडून झाली होती हे तो प्रकाश दाखवून देईल. [b]
येशू आणि बाप्तिस्मा करणारा योहान
22 त्यानंतर येशू आणि त्याचे शिष्य यहूदीया प्रांतात गेले. तेथे येशू आपल्या शिष्यांसह राहिला आणि लोकांचे बाप्तिस्मे केले. 23 योहान हा एनोन गावात लोकांचा बाप्तिस्मा करीत असे. एनोन गाव शालिमनगराजवळ आहे. तेथे भरपूर पाणी असल्याने योहान लोकांचा बाप्तिस्मा तेथे करीत असे. बाप्तिस्मा करून घेण्यासाठी लोक तेथे येत असत. 24 (योहान तुरुंगात जाण्याच्या अगोदर हे घडले.)
25 योहानाच्या काही शिष्यांचा दुसऱ्या यहूदी लोकांशी वादविवाद झाला. नियमशास्रात सांगितलेल्या शुद्धीकरणाच्या विधीविषयी ते वाद घालीत होते. 26 म्हणून ते शिष्य योहानाकडे आले व म्हणाले, रब्बी, यार्देन नदीच्या पलीकडे जो मनुष्य तुमच्याबरोबर होता तो आठवतो? तुम्ही त्याच्याविषयी साक्ष देखील दिली. तो मनुष्य लोकांना बाप्तिस्मा देत आहे, व पुष्कळजण त्याच्याकडे जात आहेत.
27 योहानाने उतर दिले, “देव जे देतो तेच माणसाला मिळते. 28 मी हे सांगताना तुम्ही स्वतःच ऐकले आहे की, ‘मी ख्रिस्त नाही. त्याच्याकरित मार्ग तयार करण्यासाठी देवाने ज्याला पुढे पाठविले तो मी आहे’. 29 ज्याला वधू असते तो वर असतो, वराला मदत करणारा वराचा मित्र वराची वाट पाहतो आणि वेगळया आवाजामुळे त्याच्या येण्याची चाहूल लागते काय, ते कान देऊन ऐकतो. वराची वाणी आली म्हणजे त्याच्या मित्राला आनंद होतो. तसाच आनंद मला वाटत आहे. आणि माझ्या आनंदाची वेळ आता आलेली आहे. 30 तो महान व्हावा आणि मी लहान व्हावे हे योग्यच आहे.”
स्वर्गातून येणारा
31 “जो (येशू) वरुन येतो तो इतर सर्वांहून थोर आहे. जो मनुष्य या जगापासून आला आहे तो जगाचा आहे. तो जगातल्याच गोष्टीविषयी बोलतो, परंतु जो स्वर्गातून आला तो (येशू) इतर लोकांहून थोर आहे. 32 त्याने जे ऐकले व पाहिले त्याविषयी सांगतो. परंतु तो सांगातो त्या गोष्टी कोणी स्वीकारीत नाहीत. 33 तो (येशू) जे सांगतो ते मान्य करणारा माणूस, देव सत्य आहे याचा पुरावाच देतो. 34 देवाने त्याला (येशूला) पाठविले. आणि देव सांगतो त्याच गोष्टीविषयी तो सांगतो. कारण देव त्याला आत्म्याने पूर्णपणे भरतो. 35 पिता पुत्रावर प्रीति करतो, पित्याने सर्व गोष्टींवरील अधिकार पुत्राला दिलेला आहे. 36 जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचे जीवन मिळते, पंरतु जो पुत्राची आज्ञा पाळीत नाही त्याला अनंतकाळचे जीवन कधीही मिळणार नाही. उलट देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.”
2006 by World Bible Translation Center