Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 11-12

11 यरुशलेमला आल्यावर रहबामने 1,80,000 उत्तम योध्दे जमवले. यहूदा आणि बन्यामिन या घराण्यांमधून त्याने ही निवड केली. इस्राएलशी युध्द करुन स्वतःकडे राज्य खेचून आणण्यासाठी त्याने ही जमवाजमव केली. पण परमेश्वराचा माणूस शमाया याच्याकडे परमेश्वराचा संदेश आला. परमेश्वर त्याला म्हणाला, “शमाया, यहूदाचा राजा, शलमोनपुत्र रहबाम याच्याशी तू बोल.तसेच यहूदा? आणि बन्यामिन इथल्या इस्राएल लोकांशीही बोल. त्यांना म्हणावे. परमेश्वराचे म्हणणे असे आहे ‘आपल्या बांधवांशीच लढू नका. प्रत्येकाने घरी जावे. मीच हे सर्व व्हायला कारणीभूत आहे.’” तेव्हा राजा रहबाम आणि त्याचे सैन्य यांनी परमेश्वराचा संदेश मानला आणि ते परतले. यराबामवर त्यांनी हल्ला केला नाही.

रहबाम यहूदाचे सामर्थ्य वाढवतो

रहबाम यरुशलेममध्ये राहिला. हल्ल्यांचा प्रतिकार करायला सज्ज अशी भक्कम नगरे त्याने यहूदात उभारली. बेथलेहेम, एटाम, तकोवा, बेथ-सूर, शोखो, अदुल्लाम, गथ, मारेशा, सीफ, अदोरइम, लाखीश, अजेका, 10 सोरा, अयालोन व हेब्रोन या नगरांची डागडुजी केली. यहूदा आणि बन्यामिन मधली ही गावे चांगली भक्कम करण्यात आली. 11 नगरे मजबूत झाल्यावर रहबामने त्यांच्यावर नायक नेमले. अन्नसामुग्री, तेल, द्राक्षारस यांचा साठा त्याने तेथे केला. 12 प्रत्येक नगरात ढाली आणि भाले यांचा पुरवठा करुन गावे अधिकच मजबूत केली. यहूदा आणि बन्यामिन मधील ही नगरे आणि तेथील लोक यांना रहबामने आपल्या नियंत्रणाखाली ठेवले.

13 समस्त इस्राएलमधील याजक आणि लेवी रहबामशी सहमत होते. ते त्याला येऊन मिळाले. 14 लेवींनी आपली शेती आणि शिवारे सोडली आणि ते यहूदा व यरुशलेम येथे आले. परमेश्वराप्रीत्यर्थ याजकाचे काम करायला यराबाम आणि त्याचे मुलगे यांनी लेवींना प्रतिबंध केला म्हणून ते आले.

15 यराबामने बोकड आणि वासरे यांच्या मूर्ती उच्चस्थानी स्थापन केल्या आणि त्यांच्या पूजेसाठी आपले याजक निवडले. 16 इस्राएलच्या सर्व वंशातील जे लोक इस्राएलचा देव परमेश्वर याच्याशी एकनिष्ठ होते ते ही, लेवींनी इस्राएल सोडल्यावर, परमेश्वराला यज्ञार्पणे करण्यासाठी यरुशलेमला आले. 17 त्यामुळे यहूदाचे राज्य बळकट झाले. त्यांनी शलमोनाचा पुत्र रहबाम याला तीन वर्षे पाठिंबा दिला. या काळात त्यांनी दावीद आणि शलमोन यांच्यासारखेच आचरण ठेवले.

रहबामचे घराणे

18 रहबामने महलथशी विवाह केला. तिचे वडील यरीमोथ आणि तिची आई अबीहईल. यरीमोथ हा दावीदाचा मुलगा. अबीहईल अलीयाबची मुलगी आणि अलीयाब हा इशायचा मुलगा. 19 महलथापासून रहबामला यऊश, शमऱ्या आणि जाहम हे मुलगे झाले. 20 मग रहबामने माकाशी विवाह केला. माका ही अबशालोमची नात. माकाला रहबामपासून अबीया, अत्थय, जीजा आणि शलोमीथ ही मुले झाली. 21 रहबामचे आपल्या इतर पत्नी आणि उपपत्नी यांच्यापेक्षा माकावर अधिक प्रेम होते. माका अबशालोमची नात. रहबामला अठरा पत्नी आणि साठ उपपत्नी होत्या. त्याला अठ्ठावीस मुलगे आणि साठ मुली होत्या.

22 अबीयाला रहबामने सर्व भावडांमध्ये अग्रक्रम दिला. कारण त्याला राजा करावे असा त्याचा मानस होता. 23 रहबामने मोठ्या चतुराईने आपल्या सर्व मुलांना यहूदा आणि बन्यामिनमधील नगरांमध्ये विखरुन ठेवले. त्यांना उत्तम रसद पुरवली. त्यांची लग्ने लावून दिली.

मिसरचा राजा शिशक याची यरुशलेमवर स्वारी

12 रहबामचे सामर्थ्य वाढले. त्याने आपले राज्य बळकट केले. पण त्याचबरोबर त्याने आणि इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पालन करण्याचे थांबवले.

रहबामच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी शिशकने यरुशलेमवर हल्ला चढवला. शिशक हा मिसरचा राजा होता. रहबाम आणि यहूदाचे लोक यांनी परमेश्वराचा मार्ग सोडल्यामुळे असे झाले. शिशककडे 12,000 रथ, 60,000 घोडेस्वार आणि अगणित पायदळ होते. त्याच्या सैन्यात लुबी, सुक्की व कुशी हे लोक होते. यहूदातील भक्कम नगरांचा पाडाव केल्यावर शिशकने आपले सैन्य यरुशलेमला आणले.

तेव्हा शमाया हा संदेष्टा रहबाम आणि वडीलधारी मंडळी यांच्याकडे आला. शिशकच्या धास्तीने ही सर्व वडीधारी मंडळी यरुशलेमला जमली होती. शमाया रहबामला आणि या सर्वांना म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे: ‘रहबाम, तू आणि यहूदाचे लोक यांनी माझा त्याग केला आहे. तुमचे आचरण माझ्या नियमांच्या विरुध्द आहे. तेव्हा मीही तुम्हाला सोडून शिशकच्या हाती दिले आहे.’”

तेव्हा यहूदाची ती वडीलधारी मंडळी आणि रहबाम यांना पश्चात्ताप झाला आणि ते विनम्र झाले. “परमेश्वर म्हणतो ते खरे आहे.” असे त्यांनी उदगार काढले.

ते नम्र झाले आहेत हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा पुन्हा शमायाला परमेश्वराचा संदेश आला. परमेश्वर त्याला म्हणाला, “राजा आणि ही मंडळी माझ्यापुढे नम्र झाल्यामुळे मी त्यांचा नाश करणार नाही. त्यांना तारीन. शिशक मार्फत त्यांना मी माझ्या कोपाचे लक्ष्य करणार नाही. पण यरुशलेमचे लोक शिशकचे चाकर होतील. माझी सेवा आणि इतर देशांतील राजाची सेवा यामधला भेद त्यांना कळावा म्हणून ते त्याचे अंकित होतील.”

शिशकने यरुशलेमवर स्वारी केली आणि परमेश्वराच्या मंदिरातील खजिना लुटून नेला. शिशक हा मिसरचा राजा होता. राजमहालातील खजिनाही त्याने लुटला. शलमोनाने केलेल्या सोन्याच्या ढाली त्याने हस्तगत केल्या. 10 त्या सोन्याच्या ढालीऐवजी रहबामने पितळेच्या ढाली केल्या. त्या त्याने महालाचे संरक्षण करणाऱ्या द्वारपालांना दिल्या. 11 राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा ते ढाली घेऊन पुढे होत. नंतर त्या पहारेदारांच्या खोलीत ठेवून देत.

12 रहबाम असा नम्र झाल्यामुळे परमेश्वराचा त्याच्यावरील कोप शमला. त्याचा परमेश्वराने पूर्ण नायनाट केला नाही. शिवाय यहूदात थोडा चांगुलपणाही शिल्लक होता.

13 रहबामने यरुशलेममध्ये आपले सामर्थ्य वाढवले. तो राज्यावर आला तेव्हा एक्के चाळीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सतरा वर्षे राज्य केले. इस्राएलच्या सर्व वंशांमधून परमेश्वराने यरुशलेमची निवड केली होती. आपले नाव राहावे म्हणून त्याने यरुशलेम निवडले होते. रहबामच्या आईचे नाव नामा; नामा अमोनीण नगरातली होती. 14 रहबामने वाईट गोष्टी केल्या कारण परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करण्याविषयी त्याने मनात निश्चय केला नव्हता.

15 शमाया हा संदेष्टा आणि इद्दो हा द्रष्टा यांच्या इतिहासात रहबामने आपल्या कारकीर्दीत केलेल्या सर्व गोष्टींची साद्यंत हकीकत आहे. शमाया आणि इद्दो वंशाळींचा इतिहास लिहीत. रहबाम आणि यराबाम या दोघांमध्ये नित्य लढाया होत. 16 रहबामने मृत्यूनंतर आपल्या पूर्वजांबरोबर विश्रांती घेतली. दावीदनगरात त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा अबीया गादीवर आला.

प्रकटीकरण 2

इफिस येथील मंडळीला

“इफिस येथील मंडळीच्या दूताला हे लिही:

“जो आपल्या उजव्या हातात सात तारे धरतो आणि सात सोनेरी दीपसमयांमधून चालतो त्याचे हे शब्द आहेतः

“तू काय करतोस ते मला माहीत आहे. तू खूप काम करतोस व धीर धरतोस हे मला माहीत आहे. मला हे माहीत आहे की दुष्ट मनुष्यांचा तू स्वीकार करीत नाहीस आणि जे स्वतःला प्रेषित समजतात पण जे तसे नाहीत त्यांची कसोटी तू घेतलेली आहेस आणि ते खोटे आहेत हे तुला समजले आहे. माझ्या नावासाठी तू धीर धरलास, माझ्या नावामुळे तू दु:ख सोसलेस आहे आणि तू थकला नाहीस.

“तरीही तुझ्याविरुद्ध माझे म्हणणे आहे: तू तुझी पहिली प्रीति सोडली आहेस. ज्या उंचीवरुन तू पडलास ते लक्षात आण! पश्चात्ताप कर व प्रथम जी कामे केलीस ती पुन्हा कर. जर तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी येईन आणि तुझी दीपसमई तिच्या ठिकाणाहून काढून टाकीन. पण असे काही आहे जे तू करतोस, तू निकलाईतांचा [a] कृत्यांचा द्वेष करतोस, मीही त्याच्या कृत्यांचा द्वेष करितो.

“आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको! जो विजय मिळवितो त्याला मी जीवनाच्या झाडाचे (फळ) खाण्याचा अधिकार देईन. ते झाड देवाच्या सुखलोकात आहे.

स्मुर्णा येथील मंडळीला

“स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला हे लिही:

“जो पहिला आणि शेवटला आहे त्याचे हे शब्द आहेत, जो मेला होता पण पुन्हा जीवनात आला.

“मला तुमचे क्लेश आणि गरीबी माहीत आहे. तरीही तुम्ही श्रीमंत आहात! ज्या वाईट गाष्टी लोक बोलतात त्याविषयी मला माहीत आहे, ते म्हणतात आम्ही यहूदी आहोत, पण ते नाहीत, ते सैतानाची सभा आहेत. 10 जे दु:ख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरु नकोस. मी तुला सांगतो, तुम्हांपैकी काहींना तुमची परीक्षा पाहण्यासाठी सैतानाकडून तुरुंगात टाकतील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मग मी तुम्हांला जीवनाचा मुगुट देईन.

11 “आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको, जो विजय मिळवितो त्याला दुसऱ्या मरणाची इजा होणारच नाही.

पर्गम येथील मंडळीला

12 “पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही:

“ज्याच्याकडे दोन्ही बाजूंनी धार असणारी तीक्ष्ण तरवार आहे, त्याचे हे शब्द आहेत, 13 मला माहीत आहे जेथे सैतानाचे सिंहासन आहे तेथे तुम्ही राहता. तरीही तुम्ही माझ्या नावात दृढ आहात. अंतिपाच्या काळामध्येसुद्धा माझ्यावर तुमचा असलेला विश्वास तुम्ही नाकारला नाही. अंतिपा माझा विश्वासू साक्षीदार होता. तो तुमच्या शहरात मारला गेला. सैतान जेथे राहतो असे ते तुमचे शहर आहे.

14 “तरीही तुमच्याविरुद्ध माझे म्हणणे आहे: तुमच्यात असे लोक आहेत की जे बलामाची शिकवण आचरणात आणतात. बलामाने बालाकाला इस्राएल लोकांना पाप करायला कसे लावायचे ते शिकविले. त्या लोकांनी लैंगिक पापे करुन आणि मूर्तीला वाहिलेले अन्न खाऊन पाप केले. 15 त्याचप्रमाणे निकलाईताची शिकवण आचरणारे तुमच्यामध्येसुद्धा काहीजण आहेत. 16 म्हणून पश्चात्ताप करा! नाहीतर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि आपल्या तोंडातील तरवारीने त्यांच्याशी लढेन.

17 “आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.

“जो विजय मिळवितो त्याला मी लपवून ठेवलेल्या मान्यातून काही देईन. मी त्याला पांढरा दगड (खडा) देईन ज्यावर नवीन नाव लिहिलेले असेल. ज्याला तो प्राप्त होईल त्यालाच ते समजेल.

थुवतीरा येथील मंडळीला

18 “थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही:

“देवाचा पुत्र हे सांगत आहे, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय चमकणाऱ्या पितळासारखे आहेत.

19 “मला तुमची कामे, तुमचे प्रेम आणि विश्वास, तुमची सेवा आणि धीर माहीत आहे. आणि तुम्ही पहिल्यापेक्षा आता जास्त करीत आहात हे माहीत आहे. 20 तरीसुद्धा तुमच्याविरुद्ध माझे म्हणणे आहे: इजबेल नावाची स्त्री जी स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि ती तिच्या शिकवणीने माझ्या सेवकांना अनैतिक लैंगिक पाप व मूर्तीसमोर ठेवलेले अन्न खावयास मोहविते. तरी तुम्ही तिला खुशाल तसे करु देता. 21 मी तिला तिच्या अनैतिक लेंगिक पापाविषयी पश्चात्ताप करण्यासाठी वेळ दिला आहे. परंतु ती तसे करायला तयार नाही.

22 “म्हणून मी तिला दु:खाच्या बिछान्यावर खिळवीन आणि जे तिच्याबरोबर व्यभिचाराचे पाप करतात त्यांना भयंकर दु:ख भोगावयास लावीन. जर ती तिच्या मार्गापासून पश्र्चात्ताप पावली नाही 23 तर मी तिच्या अनुयायांना ठार मारुन टाकीन. मग सर्व मंडळ्यांना हे कळेल की मी तो आहे जो अंतःकरणे आणि मने पारखतो. तुमच्या कृतींप्रमाणे मी प्रत्येकाला तुमचा मोबदला देईन.

24 “पण थुवतीरा येथील मंडळीतील जे दुसरे लोक आहेत जे तिची शिकवण आजरीत नाहीत त्यांना मी सांगतो की, ज्या तुम्ही सैतानाची म्हणविलेली खोल गुपिते जाणली नाहीत, त्या तुमच्यावर मी दुसरे ओझे लादणार नाही. 25 मी येईपर्यंत जे तुमच्याकडे आहे त्याला धरुन राहा.

26 “जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझ्या इच्छेप्रमाणे करतो त्याला मी राष्ट्रांवर अधिकार देईन. 27 तो त्यांच्यावर लोहदंडाने अधिकार गाजवील मातीच्या भांड्यासारखा तो त्यांचा चुराडा करील. जसा पित्याकडून मला अधिकार प्राप्त झाला आहे, check add footnote 28 तसा मीसुद्धा त्याला पहाटेचा तारा देईन. 29 आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.

सफन्या 3

यरुशलेमचे भविष्य

यरुशलेम, तुझे लोक देवाविरुध्द लढले. त्यांनी दुसऱ्यांना दुखाविले आणि तुला पापाचा डाग लागला. तुझ्या लोकांनी माझे ऐकले नाही. त्यांनी माझी शिकवण आत्मसात केली नाही. यरुशलेमने परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही. ती तिच्या देवाला शरण केली नाही. यरुशलेममधील नेते गुरगुरणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत. तिचे न्यायाधीश संध्याकाळी मेंढ्यांवर हल्ला करुन, सकाळी आपल्या भक्ष्याची काहीही नामोनिशाणी न ठेवणाऱ्या भुकेल्या लांडग्याप्रमाणे आहेत. तिचे संदेष्टे अविचारी असून जास्तीच जास्त हडप करण्यासाठी नेहमीच कट करीत असतात तिचे याजक पवित्र गोष्टी अपवित्र गोष्टींप्राणेच हाताळतात. देवाच्या शिकवणुकीचा त्यांनी वाईट उपयोग केला आहे. पण देव अजूनही त्या नगरीत आहे. आणि तो नेहमीच चांगला वागतो. देव कोणाचाही कधीच अपराध करीत नाही. तो त्याच्या लोकांना नेहमीच मदत करीत राहतो. योग्य निर्णय घेण्यास तो लोकांना रोजय मदत करतो. पण वाईट लोकांना त्यांनी केलेल्या वाईट गोष्टींची लाज वाटत नाही.

देव म्हणतो, “मी संपूर्ण राष्ट्रांचा नाश केला आहे. मी सरंक्षक बुरुज नष्ट केले आहेत. मी त्यांच्या रस्त्यांचा नाश केला आहे. आता येथून कोणीही जात नाही. त्यांची गावे निर्जन झाली आहेत. तेथे कोणीही राहात नाही. तू ह्यापासून धडा शिकावास, म्हणून तुला मी ह्या गोष्टी सांगत आहे. तू मला घाबरावेस व माझा मान राखावास, असे मला वाटते. जर तू असे वागलास, तर तुझ्या घराचा नाश होणार नाही. ठरविल्याप्रमाणे मग मी तुला शिक्षाही करणार नाही.” पण ते वाईट लोक, केल्या आहेत त्यापेक्षा अधिक वाईट गोष्टीच करु इच्छीत होते.

परमेश्वर म्हणाला, “थोडे थांब मी ऊभा राहून तुझा न्यायनिवाडा करण्याची वाट बघ! अनेक राष्ट्रांतील लोकांना गोळा करुन, तुला सजा देण्यासाठी त्यांचा वापर करण्याचा मला हक्‌क आहे. माझा तुझ्यावरचा राग दाखविण्यासाठी मी त्या लोकांचा उपयोग करीन. मी किती चिडलो आहे हे त्यावरुन कळेल. संपूर्ण देशाचा नाश होईल. त्यानंतर इतर देशातील लोकांना मी बदलून टाकीन. मग ते स्पष्ट भाषा बोलतील आणि परमेश्वराचे नाव घेतील. ते सर्वजण खांद्याला खांदा लावून एक होऊन. माझी उपासना करतील. 10 कूश देशातील नदीपलीकडचे लोकसुध्दा येतील. माझी विखुरलेली माणसे मला शरण येतील. माझी उपासना करणारे मला वाहण्यासाठी काही गोष्टी घेऊन येतील.

11 “मग, यरुशलेम, तुझ्या लोकांनी माझ्याविरुध्द केलेल्या दुष्कृत्यांची तुला लाज वाठणार नाही. का? कारण त्या वाईट लोकांना मी यरुशलेममधून बाहेर घालवीन. त्या गर्विष्ठांना मी दूर नेईन. माझ्या पवित्र पर्वतावर त्या माणसांतील कोणीही गर्विष्ठ असणार नाही. 12 माझ्या नगरीत (यरुशलेममध्ये) मी फक्त नम्र व लीन लोकांनाच राहू देईन. ते परमेश्वराच्या नावावर श्रध्दा ठेवतील. 13 इस्राएलमधील जिवंत राहिलेले लोक वाईट कृत्ये करणार नाहीत. ते खोटे बोलणार नाहीत. खोट्याच्या आधारे ते इतरांना फसविणार नाहीत. चरुन आडव्या होणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे ते शांत राहतील त्यांना कोणीही त्रास देणार नाही.”

हर्षगीतह्य

14 यरुशलेम, गा आणि सुखी हो!
    इस्राएल, आनंदाने जल्लोष कर!
यरुशलेम, आनंदात राहा! मजा कर!
15 का? कारण परमेश्वराने तुला शिक्षा करण्याचे थांबविले आहे.
    त्यांने तुझ्या शत्रूंचे भक्‌कम मोर्चे नष्ट केले आहेत.
इस्राएलचा राजा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.
    आता तुला कोणत्याही अरिष्टाची काळजी करण्याचे कारण नाही.
16 त्या वेळेला, यरुशलेमला, असे सांगितले जाईल.
    समर्थ हो! घाबरु नको!
17 परमेश्वर तुझा देव, तुमच्याबरोबर आहे.
    तो बलवान वीराप्रमाणे आहे.
    तो तुला वाचवील.
तो तुझ्यावर किती प्रेम करतो,
    हे तो तुला दाखवून देईल.
तुझ्याबरोबर तो किती सुखी आहे, हेही तुला दिसेल.
18     मेजवानीच्या वेळेला लोक असे हासतात,
आनंदात असतात, तसाच तो तुझ्याबरोबर हासेल आनंदात असेल.
    परमेश्वर म्हणाला, “मी तुझी अप्रतिष्ठा दूर करीन.
    त्या लोकांना मी तुला दुखवू देणार नाही. [a]
19 त्या वेळी, तुला हजा करणाऱ्यांना मी शिक्षा करीन.
    माझ्या इजा झालेल्या माणसांना मी वाचवीन.
    बळजबरीने दूर पळून जायला लागलेल्या माझ्या माणसांना मी परत आणीन.
मी त्यांना कीर्ती मिळवून देईन.
    सर्व लोक त्यांची प्रशंसा करतील.
20 त्या वेळी, मी तुला परत आणीन.
    मी तुम्हा सर्वांना परत एकत्र आणीन.
मी तुला प्रसिध्दी मिळवून देईन, सगळीकडचे लोक तुझी स्तुती करतील
    प्रत्यक्ष तुझ्या डोळ्यांदेखत मी कैद्यांना परत आणीन, तेव्हाच हे सर्व घडून येईल.”
परमेश्वरच असे म्हणाला आहे.

योहान 1

येशू जगात येतो

जगाची उत्पत्ति होण्यापूर्वी शब्द [a] अस्तित्वात होता, तो शब्द देवाबरोबर होता. आणि शब्द देव होता. तो शब्द सुरूवातीपासूनच देवाबरोबर होता. त्याच्याद्वारे (शब्दाच्या) सर्व काही निर्माण करण्यात आले त्याच्याशिवाय काहीच निर्माण करण्यात आले नाही. त्याच्यामध्ये जीवन होते. ते जीवन जगातील लोकांसाठी प्रकाश (समजबुद्धी, चांगुलपण) असे होते. हा प्रकाश अंधारात प्रकाशतो. पण त्या प्रकाशाला अंधाराने पराभूत [b] केले नाही.

योहान [c] नावाचा एक मनुष्य होता. देवाने त्याला पाठविले. तो लोकांना प्रकाशाविषयी (ख्रिस्ताविषयी) सांगण्यासाठी आला. यासाठी की, योहानाकडून प्रकाश विषयी ऐकून लोकांनी विश्वास ठेवावा. योहान तो प्रकाश नव्हता, परंतु लोकांना प्रकाशाविषयी सांगण्यासाठी योहान आला. खरा प्रकाश जगात येणार होता. हा प्रकाश सर्व लोकांना प्रकाश देतो.

10 शब्द अगोदरच जगात होता. त्याच्याद्वारेच जग निर्माण झाले. परंतु जगाने त्याला ओळखले नाही. 11 तो जगात आला, जे त्याचे स्वतःचे होते त्या लोकांकडे आला, परंतु त्याच्या स्वतःच्याच लोकांनी त्याला आपले मानले नाही. 12 काही लोकांनी त्याला आपले मानले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला. 13 ही मुले लहान बालके जन्मतात तशी जन्मली नाहीत. त्यांचा जन्म आईवडिलांच्या इच्छेने किंवा योजनेमुळे झाला नाही, तर त्यांचा जन्म देवाकडून झाला.

14 शब्द मनुष्य झाला आणि आमच्यामध्ये राहिला. आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते देवपित्याच्या एकमेव अशा पुत्राचे गौरव ख्रिस्ताशिवाय दुसरे असू शकत नाही. तो शब्द कृपा (दयाळूपणा) आणि सत्य यांनी पूर्णपणे भरला होता. 15 योहानाने त्याच्याविषयी लोकांना सांगितले. योहान म्हणाला, “ज्याच्याविषयी मी सांगत आहे तो हाच. मी म्हणालो, माझ्यानंतर येणारा माझ्याहून थोर आहे, तो माझ्या अगोदरपासुन आहे.”

16 शब्द (ख्रिस्त) हा कृपा (दयाळूपणा) व सत्य यांनी पूर्णपणे भरला होता. त्याच्याकडून आम्हांला भरपूर आशीर्वाद मिळाले. 17 मोशेद्वारे नियमशास्त्र दिले, पण दया व सत्याचा मार्ग ही येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त झाली. 18 कोणाही मनुष्याने आतापर्यंत देवाला कधी पाहिले नाही. परंतु एकमेव देव (येशू) जो बापाच्या उराशी आहे, तो पुत्राद्वारे आम्हांला प्रकट झाला आहे. [d]

योहान येशूविषयी लोकांना सांगतो(A)

19 यरूशलेम येथील यहूदी लोकांनी योहानाकडे काही याजक व लेवी [e] ह्यांना पाठविले. “तू कोण आहेस?” हे विचारण्यासाठी यहूदी लोकांनी त्यांना पाठविले. 20 योहान अगदी मोकळेपणाने बोलला. त्याने उत्तर देण्यास नकार दिला नाही. तो स्पष्टपणे म्हणाला, “मी ख्रिस्त [f] नाही.” योहानाने लोकांना तेच सांगितले.

21 यहूदी लोकांनी योहानाला विचारले, “तर मग तू कोण आहेस? तू एलीया [g] आहेस काय?”

योहानाने उत्तर दिले, “नाही, मी एलीया नाही.”

यहूदी लोकांनी विचारले, “तू संदेष्टा आहेस काय?”

योहानाने म्हटले, “नाही, मी संदेष्टा नाही.”

22 यावर यहूदी लोक म्हणाले, “तू कोण आहेस? तुझ्याविषयी आम्हांला सांग. ज्या लोकांनी आम्हांला पाठविले, त्यांना आम्ही काय उत्तर द्यावे हे तू आम्हांला सांग. तू स्वतःला कोण म्हणवितोस?”

23 योहानाने त्यांना यशया संदेष्ट्याच्या शब्दात सांगितले,

“मी वैराण रानात ओरडणाऱ्या मनुष्याची वाणी आहे:
    ‘प्रभूसाठी सरळ मार्ग तयार करा.’” (B)

24 परूशी लोकांनी या यहूदी लोकांना पाठविले होते. 25 हे लोक योहानाला म्हणाले, “तू म्हणतोस की, मी ख्रिस्त नाही; मी एलीया नाही किंवा मी संदेष्टाही नाही, मग तू लोकांचा बाप्तिस्मा का करतोस?”

26 योहानाने उतर दिले, “मी लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करतो. परंतु तुम्हांला माहीत नाही असा एक मनुष्य येथे तुमच्यात आहे. 27 माझ्यानंतर येणारा तो हाच मनुष्य आहे. त्याच्या वहाणांचे बंद सोडण्याइतकीही माझी लायकी नाही.”

28 यार्देन नदीपलीकडील बेथानी गावात या सर्व गोष्टी घडल्या. योहान तेथेच लोकांचा बाप्तिस्मा करीत असे.

येशू देवाचा कोकरा

29 दुसऱ्या दिवशी योहानाने येशूला आपणांकडे येताना पाहिले. योहान म्हणाला, “पाहा, हा देवाचा कोकरा. जगाचे पाप वाहून नेणारा. 30 याच्याविषयी मी बोलत होतो. मी म्हणालो, ‘माझ्यानंतर एक मनुष्य येणार आहे. परंतु तो माझ्याहून थोर आहे. तो माझ्या अगोदरपासून आहे. तो सदाजीवी आहे.’ 31 तो कोण होता हे मलाही माहीत नव्हते. परंतु मी पाण्याने बाप्तिस्मा [h] करीत आलो यासाठी की, येशू हाच ख्रिस्त आहे हे इस्राएलाला (यहूदी लोकांना) कळावे.”

32-34 नंतर योहान म्हणाला, “ख्रिस्त कोण होता हे मलाही माहीत नव्हते परंतु मी लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करावा म्हणून देवाने मला पाठविले. आणि देवाने मला सांगितले, ‘आत्मा खाली येऊन एका मनुष्यावर स्थिरावताना दिसेल. तोच मनुष्य पवित्र आत्म्याने [i] बाप्तिस्मा करील.’ योहान म्हणाला, हे होताना मी पाहिले आहे. स्वर्गातून पवीत्र आत्मा खाली उतरताना मी पाहिला. आत्मा कबुतरासारखा दिसत होता. आणि तो त्याच्यावर (येशूवर) येऊन स्थिरावला. म्हणून मी लोकांना सांगतो: ‘तो (येशू) देवाचा पुत्र आहे.’”

येशूचे पहिले शिष्य

35 दुसऱ्या दिवशी योहान पुन्हा तेथे आला. योहानाबरोबर त्याचे दोन शिष्य होते. 36 योहानाने येशूला जाताना पाहिले, योहान म्हणाला, “पाहा हा देवाचा कोकरा!” [j]

37 योहान हे बोलत असता त्या दोघा शिष्यांनी ऐकले, म्हणून ते योहानाचे शिष्य येशूच्या मागे गेले. 38 येशूने मागे वळून पाहिले तो दोघेजण आपल्यामागे येत आहेत असे त्याला दिसले. येशूने विचारले, “तुम्हांला काय पाहिजे?”

ते दोघे म्हणाले, “गुरूजी (रब्बी), तुम्ही कोठे राहता?”

39 येशूने उतर दिले, “माझ्याबरोबर या म्हणजे तुम्हांला दिसेल.” तेव्हा ते दोघेजण येशूबरोबर गेले. येशू राहत होता ती जागा त्यांनी पाहिली. ते त्या दिवशी येशूबरोबर तेथे राहिले. त्यावेळी सुमारे दुपारचे चार वाजले होते.

40 येशूविषयी योहानाकडून ऐकल्यावर ते दोघे जण येशूच्या मागे गेले. त्यांच्यापैकी एकाचे नाव अंद्रिया होते. अंद्रिया हा शिमोन पेत्राचा भाऊ. 41 अंद्रियाने पहिली गोष्ट ही केली की, आपला भाऊ शिमोन याला शोधून काढले. अंद्रिया शिमोनाला म्हणाला, “आम्हांला मशीहा सापडला आहे.”

42 शिमोनाला घेऊन अंद्रिया येशूकडे आला. शिमोनाकडे पाहून येशू म्हणाला, “तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस. तुला केफा [k] म्हणतील.”

43 दुसऱ्या दिवशी येशूने गालील प्रांतात जाण्याचे ठरविले. तेव्हा तो फिलिप्पाला भेटला. येशू त्याला म्हणाला, “माझ्यामागे ये.” 44 जसे अंद्रिया व पेत्र तसाच फिलिप्पही बेथसैदा या गावचा होता. 45 फिलिप्प नथनेलास भेटला व म्हणाला, “मोशेने नियमशास्त्रात जे लिहिले आहे त्याची आठवण कर. जो येणार आहे त्या मनुष्याविषयी मोशेने व संदेष्ट्यांनीही लिहिले. तो आम्हांला सापडला आहे. त्याचे नाव येशू आहे, तो योसेफाचा पुत्र असून नासरेथ गावचा आहे.”

46 परंतु नथनेल फिलिप्पाला म्हणाला. “नासरेथ! नासरेथमधून काही चांगले निघेल काय?”

फिलिप्प म्हणाला, “येऊन पहा.”

47 येशूने नथनेलाला आपल्याकडे येताना पाहिले, येशू म्हणाला, “हा येत असलेला मनुष्य खरोखर देवाच्या लोकांपैकी एक आहे. त्याच्यात खोटे काहीच नाही.”

48 “तुम्ही मला कसे ओळखता?” नथनेलाने विचारले.

येशूने उत्तर दिले, “तू अंजिराच्या झाडाखाली उभा होता. तेव्हाच मी तुला पाहिले. फिलिप्पने तुला माझ्याविषयी सांगण्यापूर्वीच.”

49 मग नथनेल येशूला म्हणाला, “रब्बी (गुरूजी) तुम्ही देवाचे पुत्र आहात. तुम्ही इस्राएलाचे राजे आहात.”

50 येशू नथनेलला म्हणाला, “तू अंजिराच्या झाडाखाली उभा असतानाच मी तुला पाहिले, असे मी सांगितले म्हणून तुझा माझ्यावर विश्वास बसला. परंतु यापेक्षा मोठमोठ्या गोष्टी तू पाहशील!” 51 येशू पुढे म्हणाला, “खरे तेच मी तुला सांगतो. स्वर्ग उघडलेला तुम्ही सर्व जण पाहाल. देवदूत वर चढताना आणि मनुष्याच्या पुत्रावर खाली उतरताना तुम्ही पाहाल.” [l]

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center