Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 2

शलमोनाचे मंदिराचे बांधकाम

परमेश्वराच्या नावाच्या सन्मानार्थ एक मंदिर तसेच स्वतःसाठी एक राजमहालही बांधायचे शलमोनाने ठरवले. डोंगरातून दगडाचे चिरे काढायला 80,000 पाथरवट आणि 70,000 मजूर त्याने नेमले. मजुरांच्या कामावर देखरेख करण्यासाठी शलमोनाने 3,600 मुकादम नेमले.

सोराचा राजा हिराम याला शलमोनाने निरोप पाठवला,

“माझे वडील दावीद यांना केलीत तशीच मला मदत करा. त्यांचे निवासस्थान बांधायला उपयोगी पडावे म्हणून तुम्ही गंधसरुचे लाकूड पाठवले होते. मी माझ्या परमेश्वर देवाच्या नावाच्या सन्मानार्थ एक मंदिर बांधणार आहे. तेथे आम्ही रोज परमेश्वरासमोर सुगंधी धूप जाळू तसेच एका खास मेजावर पवित्र भाकर ठेवू. शिवाय, रोज सकाळ संध्याकाळ, शब्बाथच्या दिवशी, दर नव चंद्रदर्शनी आणि आमचा देव परमेश्वराने नेमून दिलेल्या सहभोजनाच्या दिवशी आम्ही होमार्पणे वाहू. इस्राएल लोकांनी सर्वकाळ पाळायचा हा नियमच आहे.

“आमचा परमेश्वर हा सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून मी त्याच्यासाठी भव्य मंदिर उभारणार आहे. खरं म्हणजे परमेश्वरासाठी निवासस्थान बांधणे कोणालाही झालं तरी कसं शक्य आहे? स्वर्ग किंवा संपूर्ण विश्वही त्याला सामावून घ्यायला अपुरे आहे. तेव्हा त्याच्यासाठी म्हणून मंदिर बांधणे मलाही शक्य नाही. मी आपला त्याच्या प्रीत्यर्थ धूप जाळण्यासाठी फक्त एक ठिकाण बांधू शकतो. एवढेच.

“तर, सोने, चांदी, पितळ आणि लोखंड या धातुकामात प्रवीण असा कारागिर तुम्ही माझ्याकडे पाठवून दिलात तर बरे. त्याला जांभळे, किरमिजी आणि निळे वस्त्र करता यावे. कोरीव कामाचेही त्याला चांगले शिक्षण मिळालेले असावे. माझ्या वडिलांनी निवडलेल्या इतर कारागिरांबरोबर तो इथे यहूदा आणि यरुशलेममध्ये काम करील. लबानोनमधून माझ्यासाठी गंधसरु, देवदार आणि रक्तचंदन यांचे लाकूडही पाठवावे. लबानोनमधले तुझे लाकूडतोडे चांगले अनुभवी आहेत हे मला माहीत आहे. त्या तुमच्या सेवकाना माझे सेवक मदत करतील. मी बांधायला घेतलेले मंदिर चांगले विशाल आणि सुंदर होणार असल्यामुळे मला लाकूड मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. 10 लाकडासाठी वृक्षतोड करणाऱ्या तुमच्या सेवकांना मी पुढीलप्रमाणे मेहनताना देईनः 1,25,000 बुशेल गहू, 1,25,000 बुशेल जव, 115,000 गॅलन द्राक्षारस आणि 1,15,000 गॅलन तेल.”

11 हिरामने मग शलमोनाला उत्तर पाठवले. त्यात त्याने असा निरोप पाठवला की:

“शलमोन, परमेश्वराचे आपल्या प्रजेवर प्रेम आहे. म्हणून तर त्याने तुला त्यांचा राजा म्हणून नेमले.” 12 हिराम पुढे म्हणाला, “इस्राएलचा परमेश्वर देव धन्य असो. स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती त्यानेच केली. राजा दावीदाला त्याने सूज्ञ पुत्र दिला आहे. शलमोन, तू सूज्ञ आणि विचारी आहेस. तू परमेश्वरासाठी मंदिर तसेच स्वतःसाठी राजवाडा बांधायला निघाला आहेस. 13 हिराम अबी नावाचा एक कुशल कारागिर मी तुझ्याकडे पाठवतो. 14 त्याची आई दान वंशातील असून त्याचे वडील सोर नगरातले होते. हा कारागिर सोने, चांदी, पितळ, लोखंड, दगड आणि लाकूड यांच्या कामात तरबेज आहे. जांभळे, निळे आणि अत्यंत तलम असे उंची किरमिजी वस्त्र करण्यातही तो निपुण आहे. त्याला सांगितलेली कोणतीही गोष्ट तो तिचे योग्य रेखाटन करुन कोरुन काढू शकतो. तो तुझ्या आणि तुझ्या वडिलांच्या, माझ्या स्वामी दाविदाच्या कसबी कारागिरांबरोबर काम करील.

15 “तुम्ही गहू, जव, तेल आणि द्राक्षारस देण्याचे कबूल केले आहे ते सर्व आमच्या नोकरांना द्यावे. 16 आणि लबानोनमधून आम्ही तुम्हाला हवे तितके लाकूड झाडे तोडून पाठवू. ओडक्यांचे तराफे करुन आम्ही ते इथून समुद्रमार्गे यापो येथे पोचते करु. तेथून ते तुम्ही यरुशलेमला न्यावे.”

17 शलमोनाने यानंतर इस्राएलमधल्या सर्व उपऱ्या लोकांची गणना केली. दावीदाने गणती केली होती त्यानंतरची ही गणती. दावीद हा शलमोनाचा पिता. या गणनेत त्यांना 1,53,600 उपरे लोक मिळाले. 18 शलमोनाने त्यापैकी 70,000 जणांना ओझी वाहायला निवडले आणि 80,000 लोकांना डोंगरातून दगड काढायच्या कामासाठी निवडले. उरलेल्या 3,600 उपऱ्यांना या काम करणाऱ्यांवर देखरेख करणारे मुकादम म्हणून नेमले.

1 योहान 2

येशू आमचा साहाय्यकर्ता

माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करु नये यासाठी मी तुम्हांला या गोष्टी लिहीत आहे, पण जर एखादा पाप करतो तर पित्याकडे आमच्या वतीने विनवणी करणारा मध्यस्थ आमच्याकडे आहे. तो येशू ख्रिस्त आहे, जो नीतिमान आहे. तो अर्पण आहे जो आमचे पाप आमच्यापासून काढून घेतो आणि केवळ आमचेच पाप नव्हे तर सगळ्या जगाचे पाप काढून घेतो.

जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तर हाच मार्ग आहे ज्याविषयी आम्हाला खात्री आहे की, आम्ही देवाला खऱ्या अर्थाने ओळखले आहे. जो असे म्हणतो की, “मी देवाला ओळखतो!” आणि त्याच्या आज्ञा पाळत नाही तर तो लबाड आहे; आणि त्याच्यामध्ये सत्य नाही. पण जर कोणी देवाची शिकवण पाळतो, तर देवाविषयीचे त्याचे प्रेम त्याच्यामध्ये पूर्ण झाले आहे. हाच मार्ग आहे ज्याद्वारे आम्ही खात्री बाळगू शकतो की, आम्ही देवामध्ये आहोत. मी देवामध्ये राहतो असे जो म्हणतो, त्याने जसा येशू जगला तसे जगले पाहिजे.

इतर लोकांवर प्रेम करा अशी देवाने आज्ञा दिली

प्रिय मित्रांनो, मी तुम्हांला नवी आज्ञा लिहीत नाही तर जुनीच आज्ञा लिहीत आहे, जी तुम्हांला सुरुवातीपासूनच देण्यात आली होती. ती जुनी आज्ञा म्हणजे जो संदेश तुम्ही ऐकला आहे तीच आज्ञा आहे. शिवाय नवीन आज्ञेप्रमाणे मी तिजविषयी लिहीतो कारण या गोष्टीविषयीचे सत्य ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आणि तुमच्या जीवनामध्ये दर्शविण्यात आली. कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश अगोदरपासूनच प्रकाशत आहे.

जो असे म्हणतो की तो प्रकाशात आहे आणि तरीही आपल्या भावाचा द्वेष करतो तो अजूनसुद्धा अंधारात आहे. 10 जो आपल्या भावावर प्रेम करतो तो प्रकाशात राहतो, आणि त्याच्या जीवनामध्ये अशी कोणतीही गोष्ट नसते, जी एखाद्याला पापात पडण्यास भाग पाडते. 11 पण जो आपल्या भावाचा द्वेष करतो तो अंधारात आहे. तो अंधारात जगत आहे व तो कोठे जात आहे हे त्याला कळत नाही. कारण अंधारामुळे तो आंधळा झालेला आहे.

12 प्रिय मुलांनो, मी तुम्हांला लिहीत आहे,
    कारण ख्रिस्तामुळे तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे.
13 वडिलांनो, मी तुम्हांला लिहितो
    कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे, त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो,
मी तुम्हांला लिहीत आहे,
    कारण दुष्टावर तुम्ही जय मिळविला आहे.
14 मुलांनो, मी तुम्हांला लिहीत आहे,
    कारण तुम्हांला पिता माहीत आहे.
वडिलांनो, मी तुम्हांला लिहिले,
    कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे.
    त्याची तुम्हांला ओळख झाली आहे.
तरुणांनो, मी तुम्हांला लिहिले,
    कारण तुम्ही सशक्त आहात;
देवाचे वचन तुमच्यामध्ये राहते,
    कारण तुम्ही दुष्टावर मात केली आहे.

15 जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रेम करु नका. जर कोणी जगावर प्रेम करतो, तर पित्याविषयी त्याच्या अंतःकरणात प्रेम नाही. 16 कारण जगात जे सर्व काही आहे, ते म्हणजे पापी देहाला संतोषविणारी लैंगिक वासना, डोळ्यांची वासना, व संसाराविषयीची फुशारकी हे पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत. 17 जग व जगातील वासना नाहीशा होत आहेत. पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो अनंतकाळपर्यंत जगेल.

ख्रिस्ताच्या शंत्रूंना अनुसरु नका

18 माझ्या मुलांनो, शेवट जवळ आला आहे आणि तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहेत आणि आताही पुष्कळ ख्रिस्तविरोधी दिसू लागले आहेत. त्यामुळेच आम्हाला कळते की, शेवट जवळ आला आहे. 19 ते आमच्यातूनच बाहेर निघाले, पण ते खऱ्या अर्थाने आमच्यातील नव्हतेच, मी हे म्हणतो कारण जर ते खरेच आमच्यातील असते तर ते आमच्यात राहिले असते. पण ते गेले यासाठी की, त्यांना आम्हांला दाखवायचे होते की त्यांच्यातील कोणीच आमचा नव्हता.

20 पण जो पवित्र असा ख्रिस्त याने तुमचा आत्म्याने अभिषेक केला आहे, म्हणून तुम्हा सर्वांना सत्य माहीत आहे. 21 मी तुम्हांला सत्य माहीत नाही म्हणून लिहीत नाही पण तुम्हांला ते माहीत आहे कारण सत्यापासून कोणतेच असत्य येत नाही.

22 येशू हा ख्रिस्त नाही असे म्हणणारा खोटा नाही काय? असा मनुष्य ख्रिस्तविरोधी आहे. तो पिता आणि पुत्र या दोघांनाही नाकारतो. 23 जो पुत्राचा नाकार करतो त्याला पिताही नसतो, पण जो पुत्राला मानतो त्याला पिताही असतो.

24 तुमच्या बाबतीत जे तुम्ही सुरुवातीपासून ऐकले आहे, त्यामध्येच राहा, सुरुवातीपासून जे तुम्ही ऐकले त्यात जर तुम्ही राहाल, तर तुम्ही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल. 25 आणि देवाने आम्हांला जे देण्याचे अभिवचन दिले आहे: ते म्हणजे अनंतकाळचे जीवन होय.

26 जे तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्याविषयी मी तुम्हांला या गोष्टी लिहीत आहे. 27 पण तुमच्याबाबतीत म्हटले तर, ज्या (पवित्र व्यक्तीकडून) तुम्हांला अभिषेक करण्यात आला तो तुमच्यामध्ये राहतो. म्हणून दुसऱ्या कोणी तुम्हांला शिकवावे याची गरज नाही. त्याऐवजी ज्या आत्म्यासह तुमचा अभिषेक (पवित्र व्यक्तीकडून) झाला या सर्व गोष्टीविषयी तो तुम्हांला शिकवितो आणि लक्षात ठेवा की, तो खरा आहे आणि खोटा मुळीच नाही. जसे त्याने तुम्हाला जे करण्यास शिकविले आहे तसे तुम्ही ख्रिस्तामध्ये राहा.

28 म्हणून आता, प्रिय मुलांनो, ख्रिस्तामध्ये राहा, यासाठी की, जेव्हा ख्रिस्त प्रकट होइल, तेव्हा आम्हांला दृढविश्वास मिळेल व जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्याद्वारे आम्ही लज्जित केले जाणार नाही. 29 जर तुम्हांला माहीत आहे की, ख्रिस्त नीतिमान आहे तर जे लोक चांगले काम करतात ते देवाचे पुत्र आहेत हे देखील तुम्हाला कळेल.

नहूम 1

हे पुस्तक म्हणजे एल्कोश येथील नहूमला झालेला दृष्टांन्त आहे. निनवे [a] या शहराबद्दलचा हा शैंकसंदेश आहे.

परमेश्वर निनवेवर रागावला आहे

परमेश्वर हा ईर्षावान देव आहे
    परमेश्वर अपराध्यांना शिक्षा करतो
    आणि तो खूप रागावतो
परमेश्वर त्याच्या शत्रूंना शिक्षा करतो.
    तो त्याच्या शत्रूंवर रागावलेला असतो.
परमेश्वर जसा सहनशील आहे,
    तसाच सामर्थ्यवान आहे
परमेश्वर अपराधी लोकांना शिक्षा करील.
    त्यांना मोकळे सोडणार नाही
परमेश्वर वाईट माणसांना शिक्षा करण्यासाठी येत आहे झंझावात
आणि वादळ यांच्याद्धारे तो आपली शक्ती दाखवील माणूस जमिनीवर धूळीतून चालतो,
    तर परमेश्वर ढगांवरून चालतो.
परमेश्वर समुद्राला कठोरपणे बोलेल
    आणि समुद्र आटेल
तो सर्व नद्या कोरड्या पाडेल
    बाशान व कर्मेल येथील समृध्द प्रदेश सुकून नष्ट होईल
    लबानोनमधील फुले कोमेजतील.
परमेश्वर येईल
    तेव्हा पर्वतांचा भीतीने थरकाप होईल
    टेकड्या वितळून जातील
परमेश्वर येईल
    तेव्हा धरणी भयभीत होऊन थरथर कापेल.
एवढेच नाही तर,
    हे जग आणि त्यातील प्रत्येक माणूस भीतीने कापेल.
परमेश्वराच्या भयंकर क्रोधाला
    कोणीही तोंड देऊ शकणार नाही
त्याचा भयानक राग कोणीही सहन करू शकणार नाही त्याचा क्रोध अग्नीप्रमाणे धगधगणारा असेल.
    तो येताच खडक हादरतील.
परमेश्वर फार चांगला आहे.
    संकटसमयी तो सुरक्षित आश्रयस्थान आहे
    त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची तो काळजी घेतो
पण त्याच्या शत्रूंचा तो पूर्णपर्ण नाश करील
    पुराच्या लोंढ्याप्रमाणे परमेश्वर त्याना धुवून टाकील
    अंधारातून तो त्याच्या शत्रूंचा पाठलाग करील.
यहूदा, तू परमेश्वराविरुध्द कट कारचत आहेस?
पण परमेश्वर संपूर्ण विनाश करणार आहे.
    त्यामुळे तू पुन्हा त्रास देणार नाहीस.
10 भांड्याखाली जळणाव्या काटेरी झुडपाप्रमाणे
    तुझा संपूर्ण नाश होईल
सुक्या काटक्या जशा चटकन् जळून जातात,
    तसा तुझा पटकन् नाश होईल.

11 अश्शूर, तुझ्याकडून एक माणूस आला.
    त्याने परमेश्वराविरुध्द कट रचला.
    त्याने वाईट सल्ला दिला.
12 परमेश्वराने यहूदाला पुढील गोष्टी सांगितल्या:
“अश्शूरचे लोक चांगले बलवान आहेत.
    त्यांच्यापाशी मोठे सैन्य आहे; पण ते मारले जातील.
    त्यांचा अंत होईल माझ्या लोकांनो,
मी तुम्हाला त्रास दिला पण यापुढे,
    कधीही मी तुम्हाला त्रास देणार नाही.
13 आता मी तुमची अश्शूरच्या सत्तेपासून मुक्तता करीन
    मी तुमच्या मानेवरचे जोखड काढून घेईन
    तुम्हाला बांधणाव्या साखळ्या मी तोडून टाकीन.”

14 अश्शूरचा राजा परमेवर तुझ्याबद्दल पुढील आज्ञा देतो:
    “तुझे नाव लावायला तुझ्या वंशातील कोणीही उरणार नाही.
तुझ्या दैवळातील कोरलेल्या मूर्ती व धातूचे पतळे यांचा
    मी नाश करीन
मी तुझे थडगे तयार करत आहे.
    कारण तुझा विनाश लवकरच ओढवणार आहे.”

15 यहूदा पाहा!
    पर्वतांवरून कोण येत आहे, ते पाहा! शुभवार्तीघेऊन दूत येत आहे
    तो म्हणतो की तेथे शांतता आहे
यहूदा तुझे खास सण साजरे कर
    तू ज्या गोष्टी करण्याचे वचन दिले आहेस
त्या गोष्टी कर दुष्ट तुझ्यावर पुन्हा हल्ला करुन तुझा पराभव करणार नाहीत
    त्या सर्व दुष्टांचा नाश झाला आहे.

लूक 17

पाप आणि क्षमादान(A)

17 येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “ज्या गोष्टी लोकांना देवापासून दूर नेतात त्या येणे निश्चित आहे, परंतु ज्याच्यामुळे त्या येणार त्याची वाईट दशा होवो! त्याने या लहानातील एकाला पाप करावयास लावण्यापेक्षा त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात फेकणे हे त्याच्यासाठी अधिक बरे होईल. स्वतःकडे लक्ष द्या!

“जर तुमचा भाऊ पाप करतो तर त्याला धमकावा. आणि जर तो पश्चात्ताप करतो तर त्याची क्षमा करा. जर तो तुझ्याविरुद्ध दिवसातून सात वेळा पाप करतो आणि सात वेळा तुमच्याकडे येतो व म्हणतो, ‘मी पश्चात्ताप करतो,’ त्याला क्षमा करा.”

तुमचा विश्वास किती मोठा आहे?

मग शिष्य प्रभूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढव.”

प्रभु म्हणाला, “जर तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्याएवढा असेल तर तुम्ही या तुतीच्या झाडाला म्हणू शकता, ‘मुळासकट उपटून समुद्रात लावले जा.’ आणि ते तुमची आज्ञा पाळील.

चांगले सेवक व्हा

“समजा, तुमच्यापैकी एकाला एक सेवक आहे. व तो शेत नांगरीत आहे किंवा मेंढरे राखीत आहे. जेव्हा तो शेतातून परत येतो, तुम्ही त्याला, ‘ताबडतोब ये आणि जेवायला बैस’ असे म्हणाला का? उलट तुम्ही असे म्हणणार नाही का, ‘माझे भोजन तयार कर. आणि कामाचे कपडे घालून माझे खाणेपिणे चालू असताना माझी सेवा कर. त्यानंतर तू खाऊ पिऊ शकतोस?’ ज्या गोष्टी करण्याबद्दल तुम्ही नोकराला आज्ञा करता ते केल्याबद्दल त्याचे आभार तुम्ही मानता काय? 10 तुमच्या बाबतीतही हे तसेच आहे: जेव्हा तुम्हांला करण्यास सांगितलेली सर्व कामे तुम्ही केल्यावर असे म्हटले पाहिजे, ‘आम्ही कोणत्याही मानास पात्र नसलेले सेवक आहोत आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले आहे.’”

कृतज्ञ असा

11 येशू यरुशलेमाला जात असताना त्याने शोमरोन व गालील यांच्या सीमेवरुन प्रवास केला. 12 तो एका खेड्यात जात असताना, कुष्ठरोग झालेले दहा पुरुष त्याला भेटले, ते दूर उभे राहीले. 13 ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “येशू, गुरुजी आम्हांवर दया करा!”

14 जेव्हा त्याने त्यांना पाहिले, तेव्हा तो म्हणाला, “जा, आणि स्वतःला याजकांना दाखवा.” [a]

ते जात असतानाच बरे झाले, 15 जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की, आपण बरे झालो आहोत, तेव्हा तो परत आला व त्याने मोठ्या स्वरात देवाची स्तुति केली. 16 तो येशूच्या पायाजवळ उपडा पडला. आणि त्याने त्याचे उपकार मानले. तो शोमरोनी होता. 17 येशू त्याला म्हणाला, “दहाजण बरे झाले नव्हते काय? नऊजण कोठे आहेत? 18 या विदेशी माणासाशिवाय कोणीही देवाची स्तुति करण्यासाठी परत आला नाही काय?” 19 येशू त्याला म्हणाला, “ऊठ, आणि जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”

देवाचे राज्य तुम्हांमध्ये आहे(B)

20 एकदा, परुश्यांनी येशूला विचारले, देवाचे राज्य केव्हा येईल,

त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाच राज्यदृश्य स्वरुपात येत नाही. लोक असे म्हणणार नाहीत की 21 ते येथे आहे! किंवा ते तेथे आहे! कारण देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.”

22 पण शिष्यांना तो म्हणाला, “असे दिवस येतील की जेव्हा मनुष्याच्या पुत्राच्या गौरवाने येण्याच्या एका दिवसाची तुम्ही उत्सुकतेने वाट पाहाल. परंतु तो दिवस तुम्ही पाहू शकणार नाही. 23 आणि लोक तुम्हांला म्हणतील, ‘तेथे पाहा! तेथे जाऊ नका.’ किंवा त्यांच्यामागे जाऊ नका.

24 “कारण जशी वीज आकाशाच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत चमकते आणि प्रकाशते तसेच मनुष्याच्या पुत्राचे त्याच्या दिवसात होईल. 25 पण पहिल्यांदा त्याने पुष्कळ गोष्टीविषयी दु:ख भोगले पाहिजे. व या पिढीने त्याला नाकारले पाहिजे.

26 “जसे नोहाच्या दिवसांत झाले, तसेच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातदेखील होईल. ते खात होते, पीत होते, लग्न करीत होते. लग्न करुन देत होते. 27 नोहा तारवात जाईपर्यंत असे चालले होते. मग पूर आला. व त्या सर्वांचा नाश झाला.

28 “त्याचप्रकारे लोटाच्या दिवसात झाले तसे होईल: ते खात होते, पीत होते. विकत घेत होते. विकत देत होते. लागवड करीत होते. बांधीत होते. 29 परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून बाहेर पडला त्या दिवशी आकाशातून अग्नि व गंधक यांचा पाऊस पडला आणि सर्वांचा नाश केला. 30 मनुष्याचा पुत्र प्रगट होईल तेव्हा असेच होईल.

31 “त्या दिवशी जर एखादा छपरावर असेल व त्याचे सामान घरात असेल, त्याने ते घेण्यासाठी घरात जाऊ नये. त्याचप्रमाणे जो शेतात असेल त्याने परत जाऊ नये. 32 लोटाच्या पत्नीची आठवण करा.

33 “जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला गमावील आणि जो कोणी आपला जीव गमावील तो त्याला राखील. 34 मी तुम्हांला सांगतो, त्या रात्री बिछान्यावर दोघे असतील, त्यापैकी एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल. 35 दोन स्त्रिया धान्य दळत असतील, तर त्यांपैकी एक घेतली जाईल व दुसरी ठेवली जाईल. 36 शेतात दोघे असतील एकाला घेतले जाईल व दुसऱ्याला ठेविले जाईल.”

37 शिष्यांनी त्याला विचारले, “कोठे प्रभु?”

येशूने उत्तर दिले, “जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center