Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 इतिहास 23

लेवींची मंदिरातील सेवाकार्ये

23 आता दावीदाचे बरेच वय झाले होते. तेव्हा त्याने आपला मुलगा शलमोन याला इस्राएलचा राजा केले. इस्राएलमधील सर्व पुढारी मंडळी, याजक आणि लेवी यांना दावीदाने बोलावून घेतले. तीस आणि त्याहून अधिक वय असलेल्या लेवींची त्याने गणना केली. तसे एकंदर 38,000 लेवी होते. दावीद म्हणाला, “यांच्यापैकी 24,000 लेवी परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करतील. 6,000 अंमलदार आणि न्यायाधीश म्हणून काम करतील. 4,000 द्वारपाल होतील आणि 4,000 देवांची स्तुतिगीते गातील. त्यांच्यासाठी मी खास वाद्ये करवून घेतली आहेत. त्यांच्या साथीवर ते देवाची स्तुती करतील.”

लेवीचे मुलगे गेर्षोन, कहाथ आणि मरारी यांच्या घराण्यानुसार त्याने सर्व लेवींची तीन गटांमध्ये विभागणी केली.

गेर्षोनचे कुळ

गेर्षोन घराण्यात लादान आणि शिमी हे दोघे होते. लादान याला तीन मुले. यहीएल हा थोरला. नंतर जेथाम व योएल. शिमीचे मुलगे असे शलोमोथ, हजिएल व हरान. लादानच्या घराण्यांचे हे प्रमुख होते.

10 शिमीला चार मुलगे. यहथ, जीजा, यऊश आणि बरीया. 11 यहथ हा त्यांपैकी मोठा, दुसरा जीजा. यऊश आणि बरीया यांना मात्र फार संतती नव्हती त्यामुळे त्यांचे दोघांचे मिळून एकच घराणे धरले जाई.

कहाथचे कुळ

12 कहाथला चार मुलगे होते: अम्राम, इसहार, इब्रोन आणि उज्जियेल. 13 अहरोन आणि मोशे हे अम्रामचे मुलगे: अहरोन आणि त्याच्या वंशजाची खास कामाकरता निवड केली गेली होती. परमेश्वराच्या उपासनेच्या पवित्र कामाच्या तयारीसाठी त्यांना कायमचे वेगळे काढले गेले होते. परमेश्वरापुढे धूप जाळणे, परमेश्वराचे याजक म्हणून सेवा करणे, परमेश्वराच्या वतीने लोकांना आशीर्वाद देणे अशी त्यांची कामे होती.

14 मोशे हा देवाचा संदेष्टा होता. त्याचे मुलगे लेवीच्या वंशातच गणले जात. 15 गेर्षोम आणि अलियेजर हे मोशेचे मुलगे. 16 शबुएल हा गेर्षोमचा मोठा मुलगा. 17 रहब्या हा अलियेजरचा मोठा मुलगा. हा एकुलता एक होता. रहब्याला मात्र बरीच मुले झाली.

18 शलोमीथ हा इसहारचा पहिला मुलगा.

19 हेब्रोनचे मुलगे याप्रमाणे: यरीया मोठा, अमऱ्या दुसरा, यहजिएल तिसरा, यकमाम चौथा.

20 उज्जियेलचे मुलगे: पहिला मीखा आणि नंतरचा इश्शिया.

मरारीचे कुळ

21 महली आणि मूशी हे मरारीचे मुलगे. एलाजार आणि कीश हे महलीचे मुलगे. 22 एलाजारला मुलीच झाल्या त्याला पुत्र नव्हता. या मुलींचे विवाह नात्यातच झाले. त्या लग्न होऊन कीशच्या घराण्यात गेल्या. 23 मूशीचे मुलगे: महली, एदर आणि यरेमोथ.

लेवींची कर्तव्ये

24 हे झाले लेवीचे वंशज आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची शिरगणती झाली. ते घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या नावाची नोंद झालेली आहे. जे वीस किंवा त्याहून अधिक वयाचे होते त्यांनी परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणे हे त्यांचे काम.

25 दावीद म्हणाला, “इस्राएलचा देव परमेश्वर याच्यामुळे लोकांना शांती लाभली आहे. परमेश्वर यरुशलेमला कायमच्या वास्तव्यासाठी आला आहे. 26 तेव्हा लेवींना पवित्र निवासमंडप आणि उपासनेतील इतर उपकरणे सतत बाळगण्याची गरज नाही.”

27 लेवी कुळतील वंशजांची मोजदाद करणे ही दावीदाची इस्राएल लोकांना अखेरची आज्ञा होती. त्यानुसार वीस वर्षे आणि त्यापुढील वयाच्या माणसांची शिरगणती झाली.

28 अहरोनच्या वंशजांना परमेश्वराच्या मंदीरातील सेवेत मदत करणे हे लेवींचे काम होते. मंदिराचे आवार आणि बाजूच्या खोल्या यांची देखभाल ही त्यांच्याकडे होती. मंदिरातील सर्व पवित्र गोष्टी शुचिर्भूत ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती. देवाच्या मंदिरातील हे काम ते करत असत. 29 मंदिरातील विशेष भाकरी मेजावर ठेवणे, पीठ, धान्यार्पण करण्याच्या वस्तू बेखमीर भाकरी यावर त्यांची देखरेख होती. याखेरीज, तव्यावर भाजलेले, मळलेले सर्व काही सिध्द करणे, मोजून मापून त्या वस्तूंची तयारी करणे हे ही काम त्यांच्याकडे होते. 30 ते रोज सकाळ-संध्याकाळ परमेश्वराचे आभार मानायला आणि त्याची स्तुती करायला उभे राहत. 31 शब्बाथच्या दिवशी, नवचंद्र दर्शन आणि सणावाराला देवाची होमार्पणे ते तयार करत. नित्य आराधनाही त्यांच्याकडेच होती. एका वेळी किती लेवींनी हे करायचे याचे नियम घालून दिलेले होते. 32 त्यांना नेमून दिल्याप्रमाणे ते वागत. पवित्र निवासमंडपाची देखभाल करत. पवित्र स्थानाचा संभाळ करत. आपले आप्त. याजक आणि अहरोनचे वंशज यांना ते सहाय्य करत. याजकांना ते परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेत मदत करत.

1 पेत्र 4

बदललेली जीवने

ख्रिस्ताने जसा शरीरिक दु:खसहनाचा अनुभव घेतला, तसेच तुम्हीसुद्धा ख्रिस्ताची जशी चित्तवृति होती तशा प्रकारच्या चित्तवृत्तीने सज्ज व्हा. मी असे म्हणतो कारण ज्याने शारीरिक दु:खसहनाचा अनुभव घेतला आहे तो पाप करण्याचे सोडून देतो. म्हणून तो या जगात राहत असता आपल्या उरलेल्या पृथ्वीवरील जीवनात मानवी वासनांच्या आहारी जाणार नाही तर देवाची इच्छा पूर्ण करण्याकडे लक्ष देईल. कारण तुम्ही आजपर्यंत विदेशी लोकांसारखे आयुष्य जगत आला म्हणजे तुम्ही कामातुरपणाच्या कृतीत चालला, देहवासना, मद्यापान, बदफैलीपणा, रंगेलपणा आणि अमंगळ मूर्तिपूजा यात बेभान जीवन जगलात.

आता तुम्ही त्यांच्यासारखे वाहवत जात नाही याचे त्यांना आश्चर्य वाटते. म्हणून तुम्हांस शिव्याशाप देतात. ते त्यांच्या वागणुकीचा हिशोब येशू ख्रिस्त जो जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यास तयार आहे, त्यास देतील, कारण जे मेलेले आहेत त्यांनासुद्धा सुवार्ता सागण्यात आली होती यासाठी की, मनुष्यांप्रमाणेच शारीरिकदृष्ट्या त्यांचा न्याय व्हावा आणि आध्यात्मिकदृष्ट्या देवासमान सार्वकालिक जीवन जगावे.

देवाने दिलेल्या देणग्यांचे चांगले कारभारी व्हा

सर्व गोष्टींचा शेवट होण्याची वेळ जवळ आली आहे. म्हणून पूर्णपणे सावधानतेने वागा आणि प्रार्थना करण्यास सतत तयार राहा. सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की, एकमेकांवर सत्याने प्रेम करा. कारण प्रेम पापाच्या राशीवर पांघरुण घालते. कुरकुर न करता एकमेकांचा पाहूणचार करा. 10 तुमच्यातील प्रत्येकाने देवाकडील कारभारी या नात्याने तुम्हाला प्राप्त झालेल्या विविध दानांचा एकमेकांची सेवा करण्यासाठी काळजीपूर्वक वापर करावा. वेगवेगळी दाने असलेला कारभारी करतो तसा करावा. 11 सर्व बाबतीत येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला गौरव मिळावे, यासाठी जो भाषण करतो त्याने देवापासून आपल्याला वचन आले आहे असे बोलावे; जो सेवक आहे त्याने देवाने पुरविलेल्या सामर्थ्यानुसार सेवा करीत राहावे. यासाठी की सर्व गोष्टीत येशू ख्रिस्ताद्वारे देवाला गौरव दिले जावे. कारण गौरव व सामर्थ्य अनंतकालासाठी त्याचीच आहेत. आमेन.

ख्रिस्ती म्हणून दु:ख सहन करणे

12 प्रिय मित्रांनो, तुमच्यावर मोठे संकट येऊन तुमची कसोटी होते तेव्हा नवल वाटून घेऊ नका. 13 त्याऐवजी, तुम्ही ख्रिस्ताच्या दु:खसहनाचे भागीदार झाल्याबद्दल आनंद करा. यासाठी की, जेव्हा त्याचे गौरव प्रकट होईल तेव्हा तुम्ही आनंदाने आरोळी मारावी. 14 जर तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहात म्हणून कोणी तुमचा अपमान केला तर तुम्ही धन्य आहात. कारण देवाचा गौरवी आत्मा तुमच्यावर विसावतो. 15 म्हणून, तुमच्यातील कोणास खुनी, चोर, भ्रष्टाचारी किंवा इतरांच्या खाजगी व्यवहारात लुडबूड करणारा म्हणून दु:ख सोसावे लागू नये. 16 पण जर तुम्ही ख्रिस्ती म्हणून दु:ख सहन केले तर तुम्हांला त्याबद्दल लाज वाटण्याचे मुळीच कारण नाही. तर तुम्हांला “ख्रिस्ती” हे नाव मिळाल्याने देवाला गौरव द्यावे. 17 कारण देवाच्या घराण्यापासून सुरुवात करुन न्यायनिवाडा व्हावा अशी वेळ आली आहे. आणि त्याचा आरंभ पहिल्यांदा आपल्यापासून होईल, तर देवाच्या सुवार्तेचा सन्मान करण्याचे जे नाकारतील त्या लोकांचा शेवट कसा होईल बरे?

18 आणि “जर चांगल्या माणसाचे तारण होणे अवघड आहे
    तर मग जो अधार्मिक व पापी मनुष्य आहे त्याचे काय होईल?” (A)

19 तर मग ज्यांना देवाच्या इच्छेनुसार दु:ख सोसावे लागते, त्यांनी आपल्या निर्माणकर्त्या देवाच्या हाती आपले जीवन सोपवून द्यावे आणि त्यांनी चांगली कामे करीत राहावे.

मीखा 2

लोकांचे दुष्ट बेत

पाप करण्याचे बेत करणाऱ्यांवर संकट येईल.
    ते लोक आपल्या शय्येवर दुष्ट बेत करीत पडतात
आणि सकाळी फटफटताच, योजलेली वाईट कर्मे करतात.
    का? कारण त्यांच्या इच्छेप्रमाणे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे म्हणून.
त्यांना शेते हवे असतात, म्हणून ते ती घेतात.
    घरे हवी असतात, म्हणून घरे घेतात.
ते एखाद्याला फसवितात आणि त्याचे घर घेतात.
    एखाद्याची फसवणूक करुन त्याची जमीन घेतात.

लोकांना शिक्षा करण्याची परमेश्वराच्या योजना

म्हणूनच परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो.
“पाहा! ह्या कुटुंबाला संकटात टाकण्याचे मी योजीत आहे.
    तुम्ही स्वतःला वाचवू शकणार नाही. [a]
तुमचे गर्वहरण होईल.
    का? कारण वाईट वेळ येत आहे.
मग लोक तुमच्यावर गाणी रचतील.
    लोक ही शोकगीते म्हणतील:
‘आमचा विनाश झाला!
    परमेश्वराने आमची भूमी काढून घेतली आणि ती दुसऱ्यांना दिली.
हो खरेच! त्याने माझी जमीन काढून घेतली.
    परमेश्वराने आमची शेते घेऊन आमच्या शत्रूंमध्ये त्यांची वाटणी केली.
म्हणून आता आम्ही जमिनीचे मोजमाप करुन
    त्या जमिनीची वाटणी परमेश्वराच्या लोकात करु शकत नाही.’”

मीखाला उपदेश करण्यास मनाई

लोक म्हणतात, “आम्हाला उपदेश करु नको.
    आमच्याबद्दल वाईट गोष्टी सांगू नकोस
आमचे काहीही वाईट होणार नाही.”

पण याकोबच्या लोकांनो,
    मला ह्या गोष्टी सांगितल्याच पाहिजेत.
तुमच्या वाईट कृत्यांमुळे
    परमेश्वराची सहनशीलता संपुष्टात येत आहे.
तुम्ही नीट वागलात,
    तर मी तुमच्यासाठी चांगली बातमी आणीन.

परमेश्वराचे लोकच त्याचे शत्रू होतात

माझ्या लोकांनो, तुम्ही शत्रू म्हणून (परमेश्वराचे अथवा एकमेकाचे) उभे राहिलात.
    स्वतःला सुरक्षित समजणाऱ्या, जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचे तुम्ही कपडे चोरता.
पणे ते युध्दकैदी असल्यासारखे मानून
    तुम्ही त्यांच्या वस्तू काढून घेता.
तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रियांकडून
    चांगली घरे काढून घेतलीत.
त्यांच्या लहान मुलांपासून
    माझे वैभव काढून घेतले.
10 उठा आणि चालते व्हा!
    ही तुमची विसाव्याची जागा असणार नाही.
    का? कारण तुम्ही ही जागा उद्ध्वस्त केलीत.
तुम्ही ती अस्वच्छ केलीत.
    म्हणून तिचा नाश होईल.
    आणि तो विनाश भयंकर असेल.

11 ह्या लोकांना माझे ऐकावयाचे नाही.
पण एखादा खोटे सांगू लागला,
    तर ते स्वीकारतील.
जर खोटा संदेष्टा येऊन म्हणाला,
    “भविष्यकाळात चांगले दिवस येतील, द्राक्षरस आणि मद्याचा सुकाळ होईल, तर ते त्या खोट्या प्रेषितावर विश्वास ठेवतील.”

परमेश्वर त्याच्या लोकांना एकत्र आणील

12 हो! खरेच! मी याकोबच्या माणसांना एकत्र आणीन.
    वाचलेल्या इस्राएल लोकांना मी एकत्र करीन.
कुरणातील कळपाप्रमाणे वा मेंढवाड्यातील मेंढराप्रमाणे मी त्यांना एकत्र ठेवीन.
    मग पुष्कळ लोकांच्या गोंगाटाने ही जागा भरुन जाईल.
13 फोडणारा लोकांना ढकलून पुढे जाईल व लोकांच्या पुढे चालेल.
    तो वेशीचे दार फोडील आणि लोक ते गाव सोडतील.
त्या लोकांचा राजा त्यांच्यापुढे चालेल.
    परमेश्वर सर्व लोकांच्या पुढे असेल.

लूक 11

येशू प्रार्थने विषयी शिकवितो(A)

11 मग असे झाले की, तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता. प्रार्थना संपल्यावर शिष्यांपैकी एक जण त्याला म्हणाला, “प्रभु, योहानाने जशी त्याच्या शिष्यांना प्रार्थना शिकवली: त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना कशी करावी ते आम्हास शिकवा.”

मग तो त्यांना म्हणाला, “जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असे म्हणा:

‘पित्या, तुझे नाव पवित्र राखले जावो.
    तुझे राज्य येवो,
आम्हाला रोज लागणारी भाकर आज आम्हांला दे,
आणि आमच्या पापांची आम्हांला क्षमा कर,
    कारण आम्ही सुद्धा जे आमचे वाईट करतात त्यांची क्षमा करतो.
आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाइटापासून सोडीव.’”

मागत राहा(B)

5-6 मग येशू त्यास म्हणाला, “समजा तुमच्यापैकी कोणाला तरी एक मित्र होता. आणि तो त्याच्याकडे मध्यरात्री गेला व त्याला म्हणाला, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे, कारण माझा मित्र नुकताच प्रवास करुन माझ्याकडे आला आहे. आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काहीही नाही.’ आणि समजा तो मनुष्य आतून म्हणाला, ‘मला त्रास देऊ नको! अगोदरच दार लावलेले आहे. आणि माझी मुले माझ्याजवळ झोपलेली आहेत. मी तुला देण्यासाठी उठू शकत नाही.’ मी तुम्हाला सांगतो जरी तो उठून त्याला कांही देण्याची टाळटाळ करील तरी त्याच्या मित्राच्या आग्रही वृत्तीमुळे तो खात्रीने उठून त्याला पाहिजे ते देईल. आणि म्हणून मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हांस सापडेल आणि ठोठवा म्हणजे तुम्हांसाठी उघडले जाईल. 10 कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल. जो शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोठावतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल. 11 तुम्हांमध्ये असा कोण पिता आहे की, त्याच्या मुलाने त्याला मासा मागितला असता त्यास माशाऐवजी साप देईल? 12 किंवा जर मुलाने अंडे मागितले तर कोणता पिता त्याला विंचू देईल? 13 जर तुम्ही इतके वाईट असताना तुम्हांला तुमच्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे समजते, तर जे त्याच्याकडे मागतात त्यांना स्वर्गातील पिता किती तरी अधिक पवित्र आत्मा देईल?”

येशूचे सामर्थ्य देवापासून आहे(C)

14 येशू एक भूत काढीत होता. ते मुके होते. मग असे झाले की, जो मनुष्य बोलू शकत नव्हता तो, भूत बाहेर आल्यावर, बोलू लागला व लोकांचा जमाव चकित झाला. 15 परंतु त्यांच्यातील काही लोक म्हणाले की, “भुतांचा प्रमुख जो बालजबूल याच्या साहाय्याने तो भुते काढतो.”

16 काहींनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी स्वर्गातून चिन्ह मागितले. 17 पण त्यांच्या मनात काय होत हे त्याला माहीत होते आणि तो त्यांना म्हणाला, “आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि एखाद्या घरात एकमेकांविरुद्ध भांडतात तेव्हा त्या घराचे तुकडे होतात. 18 आणि तुम्ही म्हणता तशी जर भुतांमध्येही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? मी तुम्हांला हे विचारतो, कारण तुम्ही म्हणता मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो.. 19 पण जर मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, तर तुमचे अनुयायी (तुमची मुले) कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? म्हणून तेच तुमचा न्याय करतील. 20 परंतु जर मी देवाच्या साहाय्याने भुते काढतो, तर मग हे स्पष्ट आहे की, देवाचे राज्य तुमच्याकडे आले आहे.

21 “जेव्हा एखादा बलवान मनुष्य आपल्या सुरक्षिततेसाठी पूर्ण शस्त्रसामग्री बाळगतो आणि स्वतःचे रक्षण करतो तेव्हा त्याची मालमता सुरक्षित राहते. 22 परंतु कोणी त्याच्याहीपेक्षा अधिक बलवान त्याच्यावर हल्ला करुन त्याचा पराभव करतो, तेव्हा ज्या शस्त्रसामग्रीवर त्यांने भरंवसा ठेवला होता, ती तो घेऊन जातो व त्याला मिळालेली लूट आपल्या मित्रांना वाटतो.

23 “जो माझ्या पक्षाचा नाही, तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबरीने गोळा करीत नाही, तर तो उधळून टाकतो.

रिकामा मनुष्य(D)

24 “जेव्हा भूत माणसाबाहेर येते व ते विसावा घेण्यासाठी निर्जल प्रदेशात जागा शोधते. पण त्याला ती विश्रांति मिळत नाही. तेव्हा तो म्हणतो, ‘मी ज्या घरातून बाहेर आलो त्या घरात परत जाईन.’ 25 तो जातो आणि त्याला ते घर झाडून नीटनेटके केलेले आढळते. 26 नंतर तो जातो आणि आपणापेक्षा अधिक बळकट व दुष्ट असे सात आत्मे मिळवितो, आणि ते आत जातात आणि तेथेच राहतात. तेव्हा त्या मनुष्याची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.”

खरे धन्य लोक

27 असे घडले की, तो या गोष्टी बोलला तेव्हा गर्दीतील एक स्त्री मोठ्याने ओरडून त्याला म्हणाली, “धन्य ते गर्भाशय, ज्याने तुझा भार वाहिला व धन्य ती स्तने जी तू चोखलीस!”

28 परंतु तो म्हणाला, “जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य!”

आम्हांला पुरावा दे(E)

29 जसजसा लोकसमुदाय वाढू लागला, तेव्हा तो बोलू लागला, “ही पिढी दुष्ट पिढी आहे. ती चिन्ह मागत आहे, आणि योनाच्या चिन्हाशिवाय कोणतेही चिन्ह तिला दिले जाणार नाही. 30 कारण जसा योना निनवेच्या लोकांकरिता चिन्ह होता तसा मनुष्याचा पुत्रही या पिढीसाठी चिन्ह होईल.

31 “दक्षिणेकडची राणी [a] न्यायाच्या दिवशी या पिढीविरुद्ध उठेल आणि ती त्यांचा धिक्कार करील. कारण ती पृथ्वीच्या दक्षिण टोकाकडून शलमोनाचे शहाणपण ऐकण्यासाठी आली, आणि आता तर शलमोनापेक्षाही थोर असा कोणी एक येथे आहे.

32 “न्यायाच्या दिवशी निनवेचे लोक या पिढीबरोबर उभे राहतील व त्यांचा धिक्कार करतील. कारण योनाचा उपदेश ऐकून त्यांनी पश्चात्ताप केला पण आता योनापेक्षाही थोर असा कोणी येथे आहे.

जगासाठी प्रकाश असे व्हा(F)

33 “कोणी दिवा लावून तळघरात किंवा भांड्याखाली ठेवत नाहीत, उलट तो दिवठणीवर ठेवतात. यासाठी की जे कोणी आत येतात त्यांना प्रकाश दिसणे शक्य व्हावे. 34 डोळा हा तुमच्या शरीराचा दिवा आहे. जर तुमचे डोळे चांगले आहेत, तर तुमचे शरीरही प्रकाशाने भरलेले आहे. 35 पण ते जर वाईट आहेत तर तुमचे शरीर अंधकारमय आहेत तुमच्यातला प्रकाश हा अंधार तर नाही ना, याची काळजी घ्या. 36 जर तुमचे सर्व शरीर प्रकाश आहे आणि जर त्याचा एकही भाग अंधार नाही तर, जशी दिव्याची प्रकाशकिरणे तुझ्यावर प्रकाशतात, तसे ते पूर्णपणे प्रकाशतील.”

येशू परुश्यांवर टीका करतो(G)

37 जेव्हा येशूने आपले बोलणे संपविले तेव्हा एका परुश्याने त्याला आपलल्याबरोबर जेवायला बोलाविले. तो आत गेला आणि आपल्या जागी रेलून बसला. 38 परंतु त्याने जेवणापूर्वी हात धुतले नाहीत हे पाहून परुश्याला फार आश्चर्य वाटले. 39 तेव्हा प्रभु त्याला म्हणाला, “तुम्ही परुशी प्याला व ताट बाहेरुन स्वच्छ करता पण तुम्ही आतून अधाशीपणाने व फसवणुकीच्या दुष्टतेने भरले आहात. 40 तुम्ही मूर्ख लोक! ज्याने बाहेरील बाजू बनवली तो आतली बाजू बनवणार नाही का? 41 पण जे आतमध्ये आहे, ते गरीबांना द्या. आणि नंतर सर्व काही तुमच्यासाठी स्वच्छ होईल.

42 “परुश्यांनो तुम्हाला धिक्कार असो कारण तुम्ही पश्चात्ताप करता व पुदिन्याचा व प्रत्येक वनस्पतीचा दशांश देता. परंतु तुम्ही न्याय आणि देवाविषयीचे प्रेम याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही या गोष्टी प्रथम काराव्यात व मुख्य गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये.

43 “परुश्यांनो तुमचा धिक्कार असो, कारण तुम्हांला सभास्थानातील महत्त्वाच्या जागी बसणे आणि बाजारात नमस्कार घेणे आवडते. 44 तुमचा धिक्कार असो कारण तुम्ही खुणा न केलेल्या कबरांसारखे आहात, अशा कबरांवर लोक नकळत पाय देऊन चालतात.”

45 नियमशास्त्राचा एक शिक्षक येशूला म्हणाला, “गुरुजी, तुम्ही असे बोलता तेव्हा तुम्ही आमचासुद्धा अपमान करता.”

46 तेव्हा येशू म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचाही धिक्कार असो, कारण तुम्ही लोकांना वाहण्यास कठीण असे ओझे लादता व ते उचलण्यास तुमच्या एका बोटानेसुद्धा मदत करीत नाही. 47 तुमचा धिक्कार असो, कारण तुमच्या पूर्वजांनी ठार केलेल्या भविष्यवाद्यांसाठी तुम्ही कबरा बांधता. 48 अशा प्रकारे तुमच्या पूर्वजांनी केलेल्या कृत्यांचे समर्थन करता. 49 यामुळे देवाचे ज्ञानसुद्धा असे म्हणाले, ‘मी प्रेषित व संदेष्टे त्यांच्याकडे पाठवीन. त्यांपैकी काही जणांना ते ठार मारतील व काही जणांचा ते छळ करतील!’

50 “तेव्हा या पिढीस भविष्यवाद्यांचे जे रक्त जगाच्या प्रारंभापासून सांडले गेले त्याबद्दल दंड भरुन द्यावा लागेल. 51 म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून ते जखऱ्या जो देवाचे मंदिर व वेदी यांच्यामध्ये मराला गेला. खरोखर मी तुम्हांस सांगतो या पिढिला ते भरुन द्यावे लागेल.

52 “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचा धिक्कार असो. कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली काढून घेतली आहे. तुम्ही स्वतःही आत गेला नाहीत आणि जे आत जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनाही जाऊ दिले नाही.”

53 येशू तेथून निघून जात असता नियमशास्त्राचे शिक्षक व परुशी फार विरोध करु लागले व त्याला अनेक गोष्टीविषयी प्रश्न विचारु लागले. 54 तो जे बोलेल त्यामध्ये त्याला एखाद्या सावजाप्रमाणे पकडण्यासाठी टपून बसले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center