Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 इतिहास 18

दावीदाचा साम्राज्यविस्तार

18 पुढे दावीदाने पलिष्ट्यांवर स्वारी करुन त्यांचा पराभव केला. पलिष्ट्यांकडून त्याने गथ आणि त्याच्या आसपासची गावे काबीज केली.

मग त्याने मवाबवर हल्ला केला. मवाबी लोक दावीदाचे अंकित झाले आणि त्याला खंडणी देऊ लागले.

हदरेजरच्या सैन्याशीही दावीद लढला. हदरेजर हा सोबचा राजा. दावीदाने त्या सैन्याशी हमाथ नगरापर्यंत दोन हात केले. हदरेजर आपल्या राज्याची सीमा फरात नदीपर्यंत वाढवू पाहात होता म्हणून दावीदाने हे केले. हदरेजरकडून त्याने 1,000 रथ, 7,000 सारथी, आणि 20,000 सैन्य एवढे घेतले. हदरेजरच्या रथांचे जवळपास सर्व घोडेही दावीदाने जायबंदी केले. 100 रथांपुरते घोडे मात्र त्याने शाबूत ठेवले.

दिमिष्क नगरातील अरामी लोक हदरेजर याच्या मदतीला आले, पण त्यांच्यापैकी 22,000 जणांनाही दावीदाने जिवे मारले. अराममधील दिमिष्कात दावीदाने ठाणी बसवली. अरामीलोक दावीदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले. अशाप्रकारे दावीद जाईल तेथे परमेवराने त्याला विजयी केले.

हदरेजरच्या सैन्यातील अधिकाऱ्यांच्या सोन्याच्या ढाली दावीदाने काढून घेतल्या आणि यरुशलेमला आणल्या. टिमथ आणि कून या नगरांमधील पितळही हस्तगत केले. ही नगरे देखील हदरेजरच्याच आधिपत्याखाली होती. पुढे हे पितळ वापरुन शलमोनाने मंदिरासाठी गंगाळ स्तंभ आणि इतर वस्तू करवल्या.

तोवू हा हमाथ नगराचा राजा होता आणि हदरेजर सोबाचा. दावीदाने हदरेजरच्या सैन्याचा पाडाव केल्याची बातमी तोवूच्या कानावर आली. 10 तेव्हा त्याने हदोराम या आपल्या मुलाला दावीदाचे क्षेमकुशल विचारण्यासाठी आणि त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्याकडे पाठवले. दावीदाने हदरेजरचा पराभव केल्यामुळे तोवूने पाऊल उचलले. तोवू आणि हदरेजर यांच्यात लढाया होतच असत. हदोरामने दावीदाला सोने, रुपे, पितळ यांपासून बनवलेल्या वस्तूंचा नजराणा दिला. 11 राजा दावीदाने त्या वस्तू शुध्दीकरण करुन परमेश्वराला अर्पण केल्या. अदोम, मवाब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी लोकांकडून आलेल्या वस्तूही त्याने अशाच परमेश्वराला वाहिल्या.

12 सरुवेचा मुलगा अबीशाय याने क्षार खोऱ्यात अठरा हजार अदोमी लोकांना मारले. 13 अदोममध्ये अबीशयने मजबूत ठाणी बसवली आणि सर्व अदोमी दावीदाचे सेवक झाले. परमेश्वराने दावीदाला सर्वत्र जय मिळवून दिला.

दावीदाचे प्रमुख कारभारी

14 दावीदाने सर्व इस्राएलवर राज्य केले. त्याने प्रत्येक नागरीकाला उचित अशी न्यायाची वागणूक दिली. 15 सरुवेचा मुलगा यवाब हा दावीदाच्या सैन्याचा मुख्य अधिकारी होता. अहीलुदाचा मुलगा यहोशाफाट दावीदाचा वृत्तांत लेखक होता. 16 सादोक आणि अबीमलेख याजक होते. सादोक हा अहीटूबचा मुलगा आणि अबीमलेख हा अब्याथारचा. शवूशा हा लेखनिक होता. 17 यहोयादाचा मुलगा बनाया हा करेथी व पलेथी लोकांवरील जबाबदार अधिकारी होता. दावीदाचे मुलगे त्याच्याजवळ राहून महत्वाचे कारभार सांभाळत.

याकोब 5

स्वार्थी श्रीमंत लोकांना शिक्षा होईल

श्रीमंत लोकहो ऐका! तुमच्यावर जी संकटे येत आहेत त्याबद्दल रडा व आक्रोश करा. तुमची संपति नाश पावली आहे. व तुमच्या कपड्यांना कसर खाऊन टाकीत आहेत. तुमच्या सोन्याचांदीवर गंज चढला आहे. त्याच्यावर चढलेला गंज तुमच्याविरुद्ध साक्ष देईल आणि तुमचे शरीर अग्नीसारखे खाऊन टाकील. अशा युगामध्ये तुम्ही तुमचे धन साठवून वेगळे ठेवले आहे, ज्याचा शेवट जवळ आला आहे! पहा! तुमच्या शेतात कापणी करणाऱ्या मजुरांची मजुरी जी तुम्ही अडवून धरलीत ती ओरडून दु:ख करीत आहे आणि कापणी करणाऱ्यांचे रडणे प्रभु परमेश्वराच्या सैन्याच्या कानी पोहोंचले आहे.

जगात असताना तुम्ही ऐषरामात जगला आणि मन मानेल तसे वागला. वधावयाच्या दिवासासाठी खाऊनपिऊन तयार केलेल्या पशूसारखे तुम्ही पुष्ट झालात. जे लोक तुम्हांला काहीही विरोध करीत नाही अशा निरपराध लोकांना तुम्ही दोषी ठरविले आहे आणि त्यांची हत्या केली आहे.

धीर धरा

यासाठी बंधूंनो, प्रभूच्या येण्यापर्यंत धीर धरा, लक्षात ठेवा की, शेतकरी आपल्या शेतातील मोलवान पिकाची वाट पाहतो. तो धीराने त्याची वाट पाहतो. पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत वाट पाहतो. तुम्हीसुद्धा धीराने वाट पाहिली पाहिजे. धैर्य धरा, कारण प्रभूचे दुसरे आगमन जवळ आले आहे. बंधूंनो, एकमेकांविरुद्ध कुरकुर करण्याचे थांबवा, यासाठी की तुम्ही दोषी ठरू नये. पहा! न्यायाधीश दाराजवळ आत येण्यासाठी तयारीत उभा आहे.

10 बंधूंनो, दु:ख सहन करीत देवाच्या नावाने लोकांशी धीर धरून बोलणाऱ्या संदेष्ट्याचे उदाहरण तुम्ही आपल्यासमोर ठेवा. 11 त्यांनी दु:ख सहन केले म्हणून आपण त्यांना धन्य समजतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि तुम्हांला माहीत आहे की, प्रभूने ईयोबाच्या वतीने त्याचा शेवट कसा केला. प्रभु दयाळू आणि खूप कनवाळू आहे, ह्या गोष्टीचे त्याने प्रात्यक्षिक दाखविले.

Be Careful What You Say

12 याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे बंधूंनो, स्वर्गाच्या किंवा पृथ्वीच्या नावाने शपथ वाहायचे थांबवा किंवा इतर कोणत्याही प्रकारची शपथ वाहू नका. तुमचे “होय” हे “होयच” असू द्या. तुमचे “नाही” हे “नाहीच” असू द्या, यासाठी की तुम्ही देवाच्या परीक्षेत येऊ नये.

प्रार्थनेचे सामर्थ्य

13 तुमच्यातील कोणी संकटात आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय? त्याने स्तुतिगान करावे. 14 तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीतील वडिलांना बोलवावे व त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे, आणि प्रभूच्या नावाने त्याच्यावर तेल लावावे 15 विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्याला बरे करील व प्रभु त्याला उठविल. जर त्याने पापे केली असतील तर प्रभु त्याची क्षमा करील.

16 म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते. 17 एलीया हा आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. पाऊस पडू नये म्हणून त्याने कळकळीने प्रार्थना केली आणि नंतरची साडेतीन वर्षे देशात पाऊस पडला नाही. 18 मग त्याने पुन्हा प्रार्थना केली व आकाशाने पाऊस दिला आणि पृथ्वीने आपले धान्य उपजविले.

Helping People When They Sin

19 माझ्या बंधूंनो, जर तुमच्यापैकी कोणी चुकला किंवा सत्यापासून दूर भटकला असेल आणि जर कोणी त्याला परत आणले तर पापी मनुष्याला चुकीच्या मार्गावरून तो परत आणतो. 20 तो त्याचा जीव मरणाच्या दाढेतून सोडवितो. आणि त्याच्या पुष्कळ पापांची क्षमा होते.

योना 2

योनाने देवाची प्रार्थना

माशाच्या पोटात असतानाच योनाने त्याच्या परमेश्वर देवाची प्रार्थना केली तो म्हणाला,

“मी फार मोठ्या संकटात सापडलो होतो.
    मी मदतीसाठी परमेश्वराला हाक मारली,
    आणि त्याने मला ओ दिली.
जेव्हा मी खोल थडग्यात होतो तेव्हा,
    हे परमेश्वर, मी तुझी आळवणी केली
    आणि तू माझा आवाज ऐकलास.

“तू मला समुद्रात फेकलेस तुझ्या प्रचंड
    लाटा माझ्याभोवती पाणी होते.
मग मी विचार केला, ‘की मी आता अशा ठिकाणी जावे की जिथे तू मला पाहू शकणार नाहीस.’
    तरी पण मी तुझ्या पवित्र मंदिराकडे मदतीच्या आशेने पाहतच राहिलो.

“समुद्राच्या पाण्याने मला वेढले
पाण्याने माझे तोंड बुडाले
    आणि मी श्वासोच्छवास करु शकत नव्हतो
मी खाली खूप खोल समुद्रात गेलो
    माझ्या डोक्याभोवती समुद्रशेवाळ गुंडाळले गेले.
मी समुद्रतळाशी, पर्वताच्या पायथ्याशी होतो
    मला कायमचे असे बंदिवासात राहावे
लागणार असेच मला वाटले पण माझ्या परमेश्वर देवाने
    मला थडग्यातून बाहेर काढले परमेश्वरा,
तू मला नवजीवन दिलेस!

“माझ्या आत्म्याने सर्व आशा सोडून दिल्या होत्या
    पण मग मला परमेश्वराचे स्मरण झाले परमेश्वरा,
मी तुझी प्रार्थना केली
    आणि तुझ्या पवित्र मंदिरात ती तू ऐकलीस.

“काहीजण निरुपयोगी मूर्तीची पूजा करतात
    पण ते पूतळे त्यांना कधीच मदत करीत नाहीत.
फक्त परमेश्वरा मुळेच तारण मिळते,
    हे परमेश्वरा, मी तुला यज्ञ अर्पण करीन
मी तुझे स्तवन करीन आणि कृतज्ञता व्यक्त करीन
    मी तुला नवस बोलेन आणि तो फेडेन.”

10 मग परमेश्वर माशाशी बोलला आणि माशाने उलटी करून योनालाकोरड्या भूमीवर टाकले.

लूक 7

येशू एका नोकराला बरे करतो(A)

ज्या बोधकथा लोकांनी ऐकाव्यात असे त्याला वाटत होते त्या सांगण्याचे संपविल्यावर तो कफर्णहूमास गेला. तेथे एक रोमी शताधिपती होता. त्याचा गुलाम इतका आजारी होता की, तो मरावयास टेकला होता. हा गुलाम त्या शताधिपतीचा फार आवडता होता. जेव्हा शताधिपतीने येशूविषयी ऐकले तेव्हा त्याने काही यहूदी वडील जनांना त्याच्याकडे पाठविले, व अशी विनंति केली की, त्याने येऊन त्याच्या गुलामाला वाचवावे. जेव्हा ते येशूकडे आले तेव्हा त्यांनी मनःपूर्वक विनंति केली, ते म्हणाले, “तू त्याच्यासाठी हे करावेस कारण तो त्या योग्यतेचा आहे. कारण तो आमच्या लोकांवर प्रेम करतो, त्याने आमचे सभास्थान आम्हांला बाधून दिले.”

म्हणून येशू त्यांच्याबरोबर गेला. तो घरापासून दूर नव्हता, तोच शताधिपतीने मित्रांना असे सांगण्यासाठी पाठविले की, “प्रभु, आपण त्रास करुन घेऊ नका, कारण आपण माझ्या घरी यावे इतकी माझी योग्यता नाही. यासाठी मी स्वतः आपणाकडे येऊ नये असा विचार केला होता. परंतु तुम्ही फक्त शब्द बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार असून माझ्या अधिपत्याखाली शिपाई आहेत. मी एखाद्याला, ‘जा’ असे म्हणतो, आणि तो जातो, दुसऱ्याला ‘ये’ म्हणतो आणि तो येतो. मी माझ्या गुलामाला म्हणतो, ‘हे कर!’ आणि तो ते करतो.”

जेव्हा येशूने हे ऐकले तेव्हा त्याला त्याच्याविषयी (शताधिपतीविषयी) आश्चर्य वाटले. तो त्याच्यामागे येणाऱ्या जमावाकडे वळून म्हणाला, “मी तुम्हांला सांगतो, असा विश्वास मला इस्राएलात देखील आढळला नाही.”

10 ज्यांना पाठविले होते, ते घराकडे परतले, तेव्हा त्यांना आढळून आले की, तो सेवक बरा झाला आहे.

येशू एका मेलेल्या माणसाला जिवंत करतो

11 नंतर असे झाले की, येशू नाईन नावाच्या गावाला गेला. त्याच्याबरोबर त्याचे शिष्य व मोठा समुदाय होता. 12 तो गावाच्या वेशीजवळ आला असता, एका मेलेल्या माणसाला अंत्यविधीकरीता नेले जात होते. तो त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता. आणि ती विधवा होती. आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते. 13 जेव्हा प्रभुने तिला पाहिले, त्याला तिची अनुकंपा वाटली व तो तीला म्हणाला, “रडू नकोस.” 14 नंतर तो पुढे तिरडीजवळ गेला व तिला स्पर्श केला. जे लोक तिरडी वाहून नेत होते, ते थांबले. 15 तेव्हा येशू म्हणाला, “तरुणा, मी तुला सांगतो, ऊठ!” आणि तो मृत मनुष्य उठून बसला व बोलू लागला. मग येशूने त्याला त्याच्या आईकडे दिले.

16 ते सर्व भयचकित झाले, त्यांनी देवाचे गौरव केले; ते म्हणाले, “आमच्यामध्ये एक महान संदेष्टा प्रगट झाला आहे.” आणि म्हणाले, “देव त्याच्या लोकांना मदत करण्यास आला आहे!”

17 येशूविषयीची ही बातमी सर्व यहूदीयात आणि सभोवतालच्या परिसरात पसरली.

योहान प्रश्न विचारतो(B)

18 योहानाच्या शिष्यांनी योहानाला जाऊन हे सर्व सांगितले, नंतर योहानाने आपल्या दोन शिष्यांना बोलाविले 19 आणि त्याने त्यांना प्रभुकडे हे विचारण्यासाठी पाठविले की, “जो येणारा तो तूच आहेस की, आम्ही दुसऱ्या कोणाची तरी अपेक्षा करावी?”

20 जेव्हा लोक त्याच्याकडे आले, ते म्हणाले, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आम्हांला तुमच्याकडे हे विचारण्यास पाठविले आहे की, ‘जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्या कोणाची अपेक्षा करावी?’”

21 त्यावेळी येशूने अनेक लोकांचे रोग, आजार बरे केले, पुष्कळांमधील भुते काढली, आंधळ्यांना दृष्टी दिली. 22 येशूने त्यांना उत्तर दिले, “जा आणि तुम्ही जे ऐकले व पाहिले आहे ते योहानाला सांगा: आंधळे पाहतात, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले जिवंत केले जातात आणि गरीब लोक सुवार्ता ऐकतात. 23 जो मला अनमान न करता स्वीकारतो, तो धन्य.”

24 योहानाचे निरोपे गेल्यावर येशू समुदायाबरोबर योहानाविषयी बोलू लागला: “वाळवंटात तुम्ही काय पाहण्यासाठी गेला होता? वाऱ्याने वाकलेल बोरु? 25 नाही, मग काय पाहण्यासाठी तुम्ही गेला होता? कपडे घातलेला मनुष्य? नाही. तलम कपडे घालणारे आणि ऐषारामात राहणारे लोक राजवाड्यात राहतात. 26 पण तुम्ही बाहेर काय पाहण्यासाठी गोला होता? संदेष्टा? होय, मी तुम्हांला सांगतो, तुम्ही संदेष्ट्यापेक्षा काही तरी अधिक पाहिले आहे! 27 हाच तो ज्याच्याविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे,

‘पाहा, मी माझ्या संदेशवाहकाला माझ्यापुढे पाठवीत आहे.
    तो तुमच्यापुढे मार्ग तयार करील.’ (C)

28 मी तुम्हांला सांगतो, जे स्त्रियांपासून जन्मले त्यात योहानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. तरीही देवाच्या राज्यातील अगदी सामान्य माणूस सुध्दा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.”

29 (जेव्हा लोकांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी मान्य केले की, देवाची शिकवण चांगली आहे. जकातदारसुद्धा सहमत झाले. या लोकांना योहानाने अगोदरच बाप्तिस्मा दिला होता. 30 पण परुशी व नियमाशास्त्राच्या शिक्षकांनी देवाची त्यांच्याविषयी असलेली योजना नाकारली. त्यांनी योहानाला त्यांचा बाप्तिस्मा करु दिला नाही.)

31 “मग मी या पिढीची कोणाशी तुलना करु? ते कोणासारखे आहेत? 32 ते उनाड मुलांसारखे आहेत, ते बाजारात बसतात, ते एकमेकाला म्हणतात,

‘आम्ही तुमच्यासाठी पावा वाजविला
    पण तुम्ही नाचला नाही.
आम्ही तुमच्यासाठी शोकगीत गाईले
    पण तुम्ही रडला नाही.’

33 बाप्तिस्मा करणारा योहान हा भाकर किंवा द्राक्षारस खात किंवा पीत आला नाही. पण तुम्ही म्हणता, ‘त्याला भूत लागले आहे.’ 34 मनुष्याचा पुत्र खात पीत आला आणि तुम्ही म्हणता, ‘पाहा, तो खादाड, मद्यपी, जकातदारांचा आणि पाप्यांचा मित्र आहे.’ 35 ज्ञान तेव्हा योग्य ठरते, जेव्हा त्याचा वापर केल्याने झालेल्या गोष्टी योग्य असतात.”

शिमोन परुशी

36 कोणा एका परुश्याने येशूला त्याच्याबरोबर जेवणाचे आमंत्रण दिले, म्हणून तो परुश्याच्या घरी गेला व मेजासभोवती आपल्या जागेवर बसला.

37 तेथे त्या गावात एक स्त्री होती, ती पापी होती, जेव्हा तिला समजले की, येशू परुश्याच्या घरी जेवत आहे, तेव्हा तिने सुगंधी तेलाचे एक अलावास्त्र भांडे आणले. 38 ती त्याच्या पाठीमागे पायाशी उभी राहून रडत होती, ती आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. नंतर तिने ते आपल्या केसांनी पुसले, त्याच्या पायाचे मुके घेतले व त्यावर सुगंधी तेल ओतले.

39 ज्या परुश्याने हे आमंत्रण दिले होते त्याने ते पाहिले आणि तो स्वतःशी म्हणाला, “जर हा मनुष्य संदेष्टा असता, तर ही कोण व कशा प्रकारची स्त्री आपल्या पायाला स्पर्श करीत आहे, हे त्याला कळले असते!”

40 येशू त्याला म्हणाला, “शिमोना, मला तुला काही सांगायचे आहे.”

त्याने उत्तर दिले, “सांगा गुरुजी.”

41 येशू म्हणाला, “एका सावकाराचे दोन कर्जदार होते. एकाकडे पाचशे चांदीची नाणी आणि दुसऱ्याकडे पन्नास चांदीची नाणी असे कर्ज होते. 42 ते कर्ज फेडू शकत नसल्याने सावकाराने दोघांचीही कर्ज माफ केली, आता त्यांच्यापैकी कोण त्याच्यावर अधिक प्रेम करील?”

43 शिमोनाने उत्तर दिले, “मला वाटते, ज्याचे कर्ज जास्त होते तो.”

येशू त्याला म्हणाला, “तू बरोबर ओळखलेस.” 44 तो स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हणाला, “तू ही स्त्री पाहतोस काय? मी तुझ्या घरी आलो तेव्हा माझे पाय धुण्यास तू मला पाणी दिले नाहीस. परंतु हिने माझे पाय अंश्रूंनी ओले केले. ते तिने केसांनी पुसले. 45 तू मला साधे शुभेच्छालिंगन सुध्दा दिले नाहीस, पण मी आत आल्यापासून तिने माझ्या पायाचे मुके घेण्याचे थांबवले नाही. 46 तू माझ्या डोक्याला तेल लावले नाही, परंतु तिने माझ्या पायावर सुगंधी तेल ओतले. 47 यासाठी मी तुला सांगतो की तिच्या अनेक पापांची क्षमा झाली आहे. हे स्पष्ट आहे कारण तिने विपुल प्रेम दाखविले आहे. परंतु ज्याला कमी माफ केले आहे तो कमी प्रेम करतो.”

48 तेव्हा तो तिला म्हणाला, “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”

49 नंतर जे त्यांच्याबरोबर जेवत होते ते स्वतःशीच म्हणू लागले, “हा कोण आहे, जो पापांचीसुद्धा क्षमा करतो?”

50 पण तो स्त्रीला म्हणाला, “तुझ्या विश्वासाने तुला वाचविले आहे, शांतिने जा.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center