M’Cheyne Bible Reading Plan
यहूदाचा राजा आहाज
16 रमाल्याचा मुलगा पेकह इस्राएलचा राजा होता. त्याच्या सतराव्या वर्षी योथामचा मुलगा आहाज यहूदाचा राजा झाला. 2 आहाज तेव्हा वीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. परमेश्वराने जी कृत्ये निषिध्द म्हणून सांगितली ती त्याने केली. आपला पूर्वज दावीद याच्यासारखे तो परमेश्वराचे आज्ञापालन करत नसे. 3 त्याची वागणूक इस्राएलच्या राजांसारखी होती. आपल्या मुलालाही त्याने अग्नीतून चालायला लावले. इस्राएली आले तेव्हा परमेश्वराने ज्या लोकांना त्या प्रदेशातून जबरदस्तीने हद्दपार केले त्यांच्यासारखी भीषण कृत्ये आहाजने केली. 4 उंचस्थानातील पुजास्थळे, टेकड्यांवर तसेच प्रत्येक हिरव्यागर्द वृक्षाखाली त्याने यज्ञ केले, धूप जाळला.
5 अरामचा राजा रसीन आणि इस्राएलाचा राजा रमाल्याचा मुलगा पेकह यरुशलेमवर स्वारी करुन आले. रसीन आणि पेकह यांनी आहाजला घेरले. पण ते त्याचा पराभव करु शकले नाहीत. 6 अरामचा राजा रसीन याने यावेळी एलाथ हा भूभाग परत मिळवला. तेथून त्याने सर्व यहुद्यांना हुसकावून लावले. मग अरामी लोक त्याठिकाणी स्थायिक झाले. अजूनही त्यांची तिथे वस्ती आहे.
7 अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याच्याकडे आहाजने दूतामार्फत संदेश पाठवला की, “मी तुझा दास आहे, तुझ्या मुलासारखाच आहे. अराम आणि इस्राएलचे राजे माझ्यावर चाल करुन आले आहेत. तेव्हा माझ्या मदतीला ये आणि मला वाचव.” 8 आहाजने याखेरीज परमेश्वराच्या मंदिरातले आणि राजवाड्याच्या खजिन्यातले सोनेरुपे बाहेर काढले. ते त्याने अश्शूरच्या राजाला नजराणा म्हणून पाठवले.
9 अश्शूरच्या राजानेही आहाजच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि दिमिष्कावर स्वारी केली. दिमिष्क सर करुन तेथील लोकांना त्याने कीर येथे पकडून नेले. रसीनलाही त्याने ठार केले.
10 अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याला भेटायला आहाज दिमिष्काला गेला. तेथील वेदी त्याने पाहिली. तेव्हा तिचा नमुना आणि आराखडा त्याने उरीया या याजकाला पाठवला. 11 दिमिष्काहून आहाजने पाठवलेल्या त्या नमुन्याबरहुकूम उरीया याजकाने वेदी उभारली. राजा आहाज दिमिष्काहून परत येण्यापूर्वी त्याने काम पूर्ण केले.
12 राजाने दिमिष्काहून येताच वेदी पाहिली. तिच्यावर यज्ञ अर्पण केला. 13 होमार्पण आणि धान्यार्पणही केले. पेयार्पण केले तसेच शांतिअर्पणाचे रक्तही वेदीवर शिंपडले.
14 आत्ताची वेदी आणि परमेश्वराचे प्रार्थनामंदिर यांच्यामध्ये परमेश्वरासमोर जी पितळी वेदी होती ती आहाजने तिथून हलवली आणि आपल्या वेदीच्या उत्तरेला आणून ठेवली. 15 मग उरीया याजकाला त्याने आज्ञा केली, “मोठ्या वेदीवर सकाळचे होमार्पण, संध्याकाळचे धान्यार्पण, देशातील सर्व लोकांचे पेयार्पण करीत जा. तसेच होमार्पणाचे आणि यज्ञाचे रक्त त्या वेदीवर शिंपडत जा. पितळेची वेदी देवाला प्रश्न विचारण्याकरता माझ्या साठी असावी.” 16 उरीया याजकाने राजाची आज्ञा मानून त्याप्रमाणे सर्वकाही केले.
17 आहाजने मग बैठकी कापून त्याचे नक्षीदार कठडे काढून टाकले. बैठकींची स्नान पात्रे काढून टाकली. पितळी बैलांवरचा हौद काढून तो खाली फरसबंदीवर ठेवला. 18 शब्बाथ दिवसासाठी मंदिराच्या आत बांधलेली आच्छादित जागा काढून टाकली. राजासाठी असलेले बाहेरचे प्रवेशद्वारही आहाजने काढून टाकले. परमेश्वराच्या मंदिरातून हे सर्व काढून त्याने अश्शूरच्या राजाला दिले.
19 यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहाजचे सर्व पराक्रम लिहिलेले आहेत. 20 आहाजच्या निधनानंतर त्याचे दावीदनगरात पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. आहाजनंतर त्याचा मुलगा हिज्कीया नवा राजा झाला.
खऱ्या शिक्षणाला अनुसरणे
2 तू मात्र नेहमी सत्य किंवा निकोप शिक्षणाला शोभणाऱ्या अशा गोष्टी बोल. 2 वडील माणसांनी आत्मसंयमित, आदरणीय व शहाणे असावे आणि विश्वासात, प्रीतीत व सहनशीलतेत बळकट असावे.
3 त्याचप्रमाणे वृद्ध स्त्रिना आपल्या वागण्यात आदरणीय असण्याबाबत शिकीव. त्यां चहाडखोर नसाव्यात, तसेच त्यांना मद्यपानाची सवय नसावी व त्यांना जे चांगले तेच शिकवावे. 4 यासाठी की, त्यांनी तरुण स्त्रियांना, त्यांच्या पतींवर प्रेम करण्यास, त्यांच्या मुलांवर प्रेम करण्यास शिकवावे. 5 त्यांनी शहाणे व शुद्ध असण्यास, त्यांच्या घराची काळजी घेण्यास व दयाळू असण्यास, आपल्या पतींच्या अधीन असण्यास शिकवावे. यासाठी की देवाच्या संदेशाची कोणालाही निंदा करता येऊ नये.
6 त्याचप्रमाणे, तरुण मनुष्यांनी शहाणे व्हावे यासाठी त्यांना उत्तेजन देत राहा. 7 प्रत्येक गोष्टीत स्वतःला तू चांगल्या कामाचा कित्ता असे दाखवून दे. तुझ्या शिक्षणात शुद्धता व गंभीरता असावी. 8 ज्यावर कोणी टीका करू शकत नाही असा चांगल्या बोलण्याचा उपयोग कर. यासाठी की, जे तुला विरोध करतात त्यांनी लज्जित व्हावे.
9 गुलामांना, सर्व बाबतीत त्यांच्या मालकांच्या अधीन राहण्यासाठी व त्यांना संतोष देण्याविषयी व हुज्जत न घालण्याविषयी शिकीव. 10 तसेच चोरी करु नये तर पूर्णपणे विश्वासूपणा दाखविण्यास सांग. यासाठी की, त्यांनी आपला तारणारा देव याच्या शिकवणुकीला सर्व बाबतीत सन्मान मिळवून द्यावा.
11 कारण सर्व माणसांना देवाची तारक कृपा प्रगट झाली आहे. 12 ती आम्हाला शिकविते की, आपण अभक्ति व ऐहिक गोष्टींची हाव यांचा नकार करावा आणि या सध्याच्या जगात आपण सुज्ञपणाने व नीतीने वागावे, व देवाप्रती आपली भक्ती प्रकट करावी. 13 आणि आपली धन्य आशा म्हणजे आपला महान देव व आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्या गौरवी प्रकट होण्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहावी. 14 त्याने स्वतःला आमच्यासाठी दिले यासाठी की सर्व दुष्टतेपासून त्याने खंडणी भरून आम्हांस सोडवावे व चांगली कृत्ये करण्यासाठी आवेशी असलेले असे जे केवळ आपले लोक त्यांना स्वतःसाठी शुद्ध करावे.
15 या गोष्टीविषयी बोध करीत राहा आणि कडक शब्दात कानउघाडणी करीत राहा आणि हे पूर्ण अधिकाराने कर. कोणीही तुला तुच्छ मानू नये.
परागंदा अवस्थेचे दु:ख
9 इस्राएल, इतर राष्ट्राप्रमाणे आनंदोत्सव करू नकोस! तू वेश्येप्रमाणे वागलास आणि देवाचा त्याग केलास. प्रत्येक खव्व्यावर तू व्यभिचाराचे पाप केलेस. [a] 2 पण त्या खव्व्यांतील धान्य इस्राएलला पुरणार नाही. इस्राएलला पुरेसे मद्य मिळणार नाही.
3 इस्राएली परमेश्वराच्या भूमीत राहणार नाहीत. एफ्राईम मिसरला परत जाईल. अश्शूरमध्ये त्यांना निषिध्द भक्ष्य भक्षण करावे लागेल. 4 इस्राएल लोक देवाला मद्य अर्पण करणार नाहीत. ते परमेश्वराला बळी अर्पण करणार नाहीत. त्यांचे बळी प्रेत संस्कारात खाल्ले जाणाऱ्या अन्नसारखे असतील. जो कोणी ते खातो तो अशुध्द होतो. त्यांच्या भाकरी परमेश्वराला मंदिरात पोचणार नाहीत. त्या त्यांनाच खाव्या लागतील. 5 ते (इस्राएली) परमेश्वराच्या सुट्या व समारंभ साजरे करू शकणार नाहीत.
6 इस्राएल लोक निघून गेले. कारण शत्रूने त्यांच्याकडून सर्वकाही घेतले. पण मिसर त्यांचा स्वीकार करील. मोफ त्यांना मूठमाती देईल. त्यांच्या चांदीच्या खजिन्यांवर रानटी झुडुपे वाढतील. इस्राएल लोकांच्या राहण्याच्या ठिकाणी काटे उगवतील.
इस्राएलने खऱ्या संदेष्ट्यांना नाकारले
7 संदेष्टा म्हणतो, “इस्राएला, ह्या गोष्टी जाणून घे. शिक्षेची वेळ आली आहे. तुझ्या कुकर्मांची किंमत मोजण्याची वेळ आली आहे.” पण इस्राएलचे लोक म्हणतात, “संदेष्टे मूर्ख आहे. देवाचेच आत्मे असलेला हा माणूस वेडा आहे.” संदेष्टा म्हणतो, “तुमच्या दुष्कृत्यांबद्दल तुम्हाला शिक्षा होईल. तुमच्या तिरस्काराची सजा तुम्हाला मिळेल.” 8 परमेश्वर आणि संदेष्टा एफ्राईम वर लक्ष ठेवण्याऱ्या रखवालदाराप्रमाणे आहेत. पण रस्ताभर अनेक सापळे आहेत. आणि लोक संदेष्ट्याचा त्याच्या परमेश्वराच्या घरातसुध्दा, तिरस्कार करतात. 9 गिबाच्या घटनेमध्ये इस्राएल लोक जितके दुष्ट होते तितकेच ते (आजही) आहेत. परमेश्वर त्यांची पापे स्मरेल व त्यांना त्याबद्दल शिक्षा करील.
मूर्तिपूजेमुळे इस्राएलचा विद्ध्वंस झाला
10 वाळवंटातील ताज्या द्राक्षांप्रमाणे त्यावेळी इस्राएल होता. तुमचे पूर्वज मोसमातील अंजिराच्या पहिल्या बहराप्रमाणे मला दिसले. पण मग ते बाल-पौरा कडे आले आणि ते बदलले. ते कुजल्यासारखे झाले ते ज्यांच्यावर प्रेम करीत त्या भयंकर गोष्टीसारखे (दैवतांसारखे) झाले.
इस्राएलांना संतान होणार नाही
11 एफ्राईमचे वैभव पक्षाप्रमाणे दूर उडून जाईल तेथे गर्भधारणा होणार नाही, प्रसूतीही होणार नाहीत आणि म्हणून बालकेही असणार नाहीत. 12 पण जरी इस्राएलींनी मुले वाढविली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. मी त्यांना मुलांचा वियोग घडविन. त्यांना सोडून देईन. पण त्यांना संकटाशिवाय काही मिळणार नाही.
13 एफ्राईम आपल्या मुलांना सापळ्याकडे नेत आहे, हे मी पाहू शकतो एफ्राईम आपली मुले मारेकऱ्यापुढे आणतो. 14 परमेश्वर, त्यांना तुझ्या इच्छेप्रमाणे दे. गर्भापात होणारी गर्भाशये दे दूध न देणारे स्तन दे.
15 त्यांची सर्व पापे गिल्गालमध्ये आहेत.
म्हणून तेथपासूनच मला त्यांचा तिरस्कार वाटू लागला.
मी त्यांना बळजबरीने माझे घर सोडायला लावीन.
कारण ते दुष्कृत्ये करतात.
ह्यापुढे मी त्यांच्यावर प्रेम करणार नाही.
त्याचे नेते बंडखोर आहेत. ते माझ्याविरुध्द गेले आहेत.
16 एफ्राईमला शिक्षा होईल.
त्यांचे मूल मरत आहे.
ते नि:संतान होतील.
ते बालकांना कदाचित् जन्म देतील,
पण त्यांच्या पोटी जन्मलेल्या अमूल्य बालकांना मी ठार मारीन.
17 ते लोक माझ्या परमेश्वराचे ऐकणार नाहीत.
म्हणून तोही त्यांचे ऐकणार नाही.
आणि ते बेघर होऊन राष्ट्रांतून भटकतील.
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
126 परमेश्वर जेव्हा आपली परत सुटका करील
तेव्हा ते स्वप्नासारखे असेल.
2 आपण हसत आनंदाचे गाणे गात असू.
इतर देशांतील लोक म्हणतील,
“इस्राएलाच्या लोकांसाठी परमेश्वराने फार चांगली गोष्ट केली.”
3 होय, परमेश्वराने जर आपल्यासाठी ती चांगली गोष्ट केली
तर आपण खूप आनंदी होऊ.
4 परमेश्वरा, वाळवंटातले झरे पुन्हा पाण्याने भरुन वहायला लागतात.
तसं आम्हाला पुन्हा मुक्त कर.
5 एखादा माणूस बी पेरते वेळी दु:खी असू शकेल.
पण तो जेव्हा पीक गोळा करतो तेव्हा तो आनंदी असतो.
6 तो जेव्हा बी शेतात नेतो तेव्हा तो दु:खी होईल.
पण तो जेव्हा धान्य घरी आणतो तेव्हा आनंदी असतो.
शलमोनाचे वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र.
127 जर परमेश्वर घर बांधीत नसेल
तर ते बांधणारे लोक त्यांचा वेळ व्यर्थ घालवीत आहेत.
जर परमेश्वर शहरावर नजर ठेवीत नसेल
तर पहारेकरी त्यांचा वेळ वाया घालवीत आहेत.
2 भाकरी मिळव्यासाठी लवकर उठणे आणि
रात्री उशीरापर्यंत जागणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.
देव ज्या लोकांवर प्रेम करतो
त्यांची तो ते झोपेत असताना देखील काळजी घेतो.
3 मुले म्हणजे परमेश्वराने दिलेले नजराणे आहेत.
आईच्या शरीरातून मिळालेले ते फळ आहे.
4 तरुण माणसाची मुले सैनिकाच्या
भात्यातील बाणांसारखी आहेत.
5 जो माणूस त्याचा भाता मुलांनी भरुन टाकेल तो सुखी होईल.
त्या माणसाचा कधीही पराभव होणार नाही त्याची मुले सार्वजानिक ठिकाणी [a] त्याच्या शत्रूंविरुध्द त्याचे रक्षण करतील.
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
128 परमेश्वराचे सर्व भक्त सुखी आहेत.
ते देवाच्या इच्छे प्रमाणे जगतात.
2 तू ज्या गोष्टींसाठी काम करतोस
त्या गोष्टींचा तू उपभोग घेशील, तू आनंदी राहाशील आणि तुझ्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतील.
3 घरी तुझी बायको सुफलीत द्राक्षवेलीसारखी असेल.
मेजाभोवती तुझी मुले तू लावलेल्या जैतूनाच्या झाडांसारखी असतील.
4 परमेश्वर अशा रीतीने त्याच्या भक्तांना आशीर्वाद देईल.
5 परमेश्वर तुला सियोनवरुन आशीर्वाद देवो.
परमेश्वराच्या आशीर्वादाचा तू यरुशलेम मध्ये जन्मभर आनंद उपभोगावा अशी आशा करतो.
6 आणि तू तुझी नातवंडे पाही पर्यंत जगशील अशी मी आशा करतो.
इस्राएलमध्ये शांती नांदू दे.
2006 by World Bible Translation Center