Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 राजे 10

शोमरोनच्या वडीलधाऱ्यांना येहूचे पत्र

10 शोमरोनमध्ये अहाबला सत्तर मुलगे होते. शोमरोनमधील अधिकारी आणि वडीलधारी मंडळी यांना येहूने पत्रे पाठवली. तसेच ज्यांनी या अहाबच्या मुलांना वाढवले त्यांनाही पाठवली. पत्रात त्याने लिहिले. 2-3 “हे पत्र मिळाल्यावर तुमच्या धन्याच्या मुलांपैकी जो सगळ्यात गुणी आणि लायक मुलगा असेल त्याची निवड करा. रथ, घोडे इत्यादी तुमच्या जवळ आहेच. तुमचे वास्तव्यही मजबूत शहरात आहे. तुमच्याकडे शस्त्रास्त्रे आहेत. तुम्ही ज्या मुलाची निवड कराल त्याला त्याच्या बापाच्या सिंहासनावर बसवा. मग आपल्या धन्याच्या घराण्यासाठी लढा द्या.”

पण हे वाचून ती अधिकारी आणि वडीलधारी मंडळी फारच घाबरली. ते सर्व म्हणाले, “योराम आणि अहज्या हे दोन राजे सुध्द येहूला रोखू शकले नाहीत, तेव्हा आम्ही काय त्याला अडवणार?”

मग, अहाबच्या घराची देखभाल करणारा अधिकारी, नगराधिकारी, वडीलधारी मंडळी आणि त्या मुलांचे पालक यांनी येहूला खालील प्रमाणे संदेश पाठवला, “आम्ही तुझे सेवक आहोत. तू म्हणशील ते आम्ही करु. आम्ही कोणालाच राजा करत नाही. तुला योग्य वाटेल ते कर.”

शोमरोनच्या अधिकाऱ्यांकडून अहाबच्या मुलांची हत्या

येहूने मग त्या अधिकाऱ्यांना आणखी एक पत्र पाठवले. त्यात त्याने लिहिले, “तुमचा मला पाठिंबा असेल आणि तुम्ही माझ्या आज्ञेत असाल तर अहाबच्या मुलांचा शिरच्छेद करा. ऊद्या साधारण याच वेळेला त्यांना माझ्याकडे आणा.”

अहाबला सत्तर मुले होती आणि नगरातील अधिकाऱ्यांकडे ती होती. त्या अधिकाऱ्यांनी त्यांना वाढवले होते. या अधिकाऱ्यांना हे पत्र मिळाले तेव्हा त्यांनी या सर्वच्यासर्व सत्तर जणांना एकत्र आणून ठार केले. मग त्यांची मस्तके टोपल्यांमध्ये भरली. या टोपल्या इज्रेलला येहूकडे पाठवल्या. निरोप्याने येऊन येहूला सांगितले, “या लोकांनी राजपुत्रांची मुंडकी आणली आहेत.”

त्याला येहू म्हणाला, “नगराच्या वेशीजवळ त्या मुंडक्यांचे दोन ढीग करुन सकाळपर्यंत तिथे ठेवा.”

सकाळी येहू निघाला आणि लोकांपुढे उभा राहून त्यांना म्हणाला, “तुम्ही निरपराध आहात. मी माझ्या धन्याविरुध्द कट रचून त्याला ठार केले. पण अहाबच्या या मुलांची हत्या कोणी केली? तुम्हीच त्यांना मारलेत. 10 परमेश्वर बोलतो त्याप्रमाणेच सर्व घडते हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. अहाबच्या कुटुंबाबद्दल परमेश्वराने एलीयाकडून वदविले होते. आता परमेश्वराने आपण ज्या गोष्टी करु म्हणून सांगितले होते त्या सर्व करुन दाखवल्या आहेत.”

11 आणि येहूने इज्रेलमधल्या अहाबच्या सर्व कुटुंबियांना ठार केले. सर्व प्रतिष्ठित माणसे, जिवलग मित्र याजक यांची त्याने हत्या केली. अहाबच्या नातलगांपैकी कोणीही जिवंत राहिले नाही.

अहज्याच्या नातलगांचा वध

12 इज्रेल सोडून येहू शोमरोनला आला. वाटेत तो मेंढपाळांच्या तळावर थांबला. मेंढपाळ लोकर कातरतात त्या ठिकाणच्या एका घरात तो गेला. 13 यहूदाचा राजा अहज्या याच्या नातेवाईकांना तो भेटला. येहूने त्यांची चौकशी केली, “तुम्ही कोण आहात?”

ते म्हणाले, “आम्ही यहूदाचा राजा अहज्या याचे नातेवाईक. राजाची मुले आणि राजमातेची मुले यांची विचारपूस करायला आम्ही जात आहोत.”

14 तेव्हा येहू आपल्या बरोबरच्या लोकांना म्हणाला, “यांना जिवंत ताब्यात घ्या.”

तेव्हा येहूच्या लोकांनी त्यांना ताब्यात घेतले. ते सगळे मिळून बेचाळीस होते. बेथ एकेद जवळच्या विहिरीपाशी येहूने त्या सर्वाना ठार केले. येहूने कोणालाही जिवंत ठेवले नाही.

येहूची यहोनादाबशी भेट

15 तिथून निघाल्यावर येहूला रेखाबचा मुलगा यहोनादाब भेटला. तो येहूला भेटायलाच निघाला होता. येहूने त्याचे कुशल विचारुन म्हटले, “मी तुझा विश्वासू मित्र आहे, तसाच तूही आहेस ना?”

यहोनादाब म्हणाला, “होय, मी तुझा विश्वासू मित्र आहे.”

येहू म्हणाला, “तसे असेल तर मला तुझा हात दे.”

आणि येहूने त्याचा हात धरुन त्याला आपल्या रथात घेतले.

16 येहू यहोनादाबला म्हणाला, “चल माझ्या बरोबर. परमेश्वराबद्दल मला किती उत्कटता आहे ती बघ.”

तेव्हा यहोनादाब येहूबरोबर त्याच्या रथातून निघाला. 17 शोमरोनला पोंचल्यावर येहूने अहाबचे जे कोणी कुटुंबीय अजून जिवंत होते त्या सर्वाना मारले. एलीयाला परमेश्वराने सांगितले होते ते सर्व येहूने केले.

बाल देवतेच्या पूजकांना येहू बोलावतो

18 येहूने मग सर्वांना एकत्र बोलावले. त्यांना तो म्हणाला, “अहाबने बालची थोडी सेवा केली. पण येहू मात्र बालची बरीच सेवा करणार आहे. 19 आता बालच्या सर्व पुरोहितांना आणि संदेष्ट्यांना बोलावून घ्या. तसेच जे जे बालची पूजा करतात त्यांनाही बोलवा. यात कोणीही गैरहजर असता कामा नये. बालसाठी मला मोठा यज्ञ करायचा आहे. इथे जो येणार नाही त्याला मी ठार करीन हे नक्की”

येहूची ही सर्व बतावणी होती. त्याला बालच्या पूजकांचा संहार करायचा होता. 20 येहू म्हणाला, “बालसाठी पवित्र मेळ्याची तयारी करा.” तेव्हा पुरोहितांनी त्याची घोषणा केली. 21 येहूने मग इस्राएलभर संदेश पाठवला. बालचे समस्त पूजक जमले. एकही मागे राहिला नाही. बालच्या देवळात ते आल्यावर देऊळ भरुन गेले.

22 वस्त्र भांडार सांभाळणाऱ्याला येहू म्हणाला, “बालच्या या सर्व पूजकांसाठी वस्त्रे दे.” तेव्हा त्याने सर्वांसाठी वस्त्रे दिली.

23 मग येहू आणि रेखाबचा मुलगा यहोनादाब बालच्या देवळात शिरले. येहू तेथे जमलेल्या बालच्या सर्व पूजकांना म्हणाला, “तुमच्यात कोणी परमेश्वराचा सेवक नाही ना ते एकदा पाहून खात्री करुन घ्या. बालची पूजा करणारेच सर्व इथे आहेत ना ते पाहा.” 24 यज्ञ आणि होमार्पणे करण्यासाठी बालचे सर्व पूजक बालच्या देवळात शिरले.

बाहेर येहूने ऐंशीजणांना तयार ठेवले होते. त्यांना येहूने सांगितले होते, “कोणालाही आतून निसटू द्यायचे नाही. एखादा कोणी गेलाच तर त्याला जाऊ देणाऱ्याला आपला जीव गमवावा लागेल.”

25 स्वतः यज्ञात होमबली अर्पण केल्यावर लगेच हुजऱ्यांना आणि सरदारांना येहूने सांगितले, “आता, आत जा आणि बालची पूजा करणाऱ्यांना ठार करा. कोणालाही देवळातून जिवंत बाहेर येऊ देऊ नका.”

तेव्हा सरदारांनी धारदार तलवारींनी सर्व पूजकांना ठार केले. त्यांनी आणि हुजऱ्यांनी बाल देवतेच्या पूजकांचे मृतदेह बाहेर टाकले ते बालदेवळाच्या गर्भगृहात गेले 26 स्मृतिस्तंभ त्यांनी उखडून टाकले आणि देऊळ जाळले. 27 बालच्या स्मृतिस्तंभाचा त्यांनी चुराडा केला. बालच्या देवळाचाही विद्धवंस केला. त्या देवळाचे त्यांनी प्रसाधनगृह करुन टाकले. अजूनही लोक त्याचा तसाच वापर करतात.

28 अशा प्रकारे इस्राएलमधली बालची पूजा येहूने मोडून काढली. 29 पण नबाटचा मुलगा यराबाम याने जी पापे इस्राएलला करायला लावली त्यापासून येहू पूर्णपणे परावृत्त झाला नाही. बेथेल आणि दान इथली सोन्याची वासरे त्याने उध्वस्त केली नाहीत.

इस्राएलवर येहूचे राज्य

30 परमेश्वर येहूला म्हणाला, “तू चांगली कामगिरी केलीस. माझ्या मते जे उचित तसेच तू वागलास. अहाबच्या कुटुंबाचा मला हव्या त्या पध्दतीने तू विध्वंस केलास. तेव्हा आता तुझ्या पुढच्या चार पिढ्या इस्राएलवर राज्य करतील.”

31 पण परमेश्वराच्या नियमांना अनुसरुन मनःपूर्वक वर्तन ठेवणे येहूला जमले नाही. यराबामच्या ज्या दुष्कृत्यांमुळे इस्राएल पापाच्या गर्तेत गेला ते करण्यापासून तो स्वतःला थोपवू शकला नाही.

हजाएलकडून इस्राएलचा पराभव

32 याचवेळी परमेश्वराने इस्राएल प्रदेशाचे लचके तोडायला सुरुवात केली. अरामचा राजा हजाएल याने इस्राएलच्या सर्व सीमांवर पराभव केला. 33 यार्देन नदीच्या पूर्वेकडील प्रदेश त्याने जिंकला गाद, रऊबेन आणि मनश्शे यांच्या कुटुंबांच्या ताब्यांतील प्रदेशासकट सगळा गिलाद त्यात आला. तसेच अर्णोन खोऱ्यातील अरोएर पासून गिलाद आणि बाशानपर्यंतचा प्रदेश हजाएलने जिंकला.

येहूचा मृत्यू

34 इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात येहूच्या इतर पराक्रमांची नोंद आहे. 35 येहू मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दफन शोमरोनमध्ये केले. येहूचा मुलगा यहोआहाज त्यानंतर इस्राएलचा राजा झाला. 36 येहूने शोमरोन मधून इस्राएलवर अठ्ठावीस वर्षे राज्य केले.

2 तीमथ्थाला 1

येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या जीवनाविषयीच्या अभिवचनाची घोषणा करण्यास, देवाच्या इच्छेने पाठविलेला ख्रिस्त प्रेषित पौल याजकडून,

प्रिय मुलगा तीमथ्य याला,

देवपिता आणि आमचा प्रभु येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा दया व शांति असो.

आभारप्रदर्शन आणि उत्तेजन

माझ्या पूर्वजांप्रमाणे ज्या देवाची मी शुद्ध विवेकभावाने भक्ती करतो, त्या देवाचे मी उपकार मानतो; आणि रात्रंदिवस माझ्या प्रार्थनेत तुझी नेहमी आठवण करतो. माझ्यासाठी तू ढाळलेल्या अश्रूंची आठवण करताना तुला भेटण्याची आतुरतेने वाट पाहतो. यासाठी की मी आनंदाने भरूने जावे. तुझ्यातील प्रामाणिक विश्वासाचे मला स्मरण होते जो पहिल्यांदा तुझी आजी लोईसमध्ये होता आणि तुझी आई युनीकेमध्ये होता. आणि माझी खात्री आहे की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे. या कारणासाठी मी तुला आठवण करून देतो की, जेव्हा मी माझे हात तुझ्यावर ठेवले तेव्हा देवाच्या दानाची जी ज्योत तुला मीळाली ती तेवत ठेव. कारण देवाने आम्हांला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही. तर तो सावधानतेचा व सामर्थ्याची स्फूर्ति देणारा आत्मा दिला आहे.

म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरु नको किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाज धरू नको. तर माझ्याबरोबर सुवार्तेसाठी दु:ख सोस. देव तुला जे सामर्थ्य देतो त्याच्या साहाय्याने दु:ख सोस.

त्याने आम्हांला तारले आणि त्याने आम्हांला समर्पित जीवनासाठी पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा काळाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हांस दिली होती. 10 पण जी आता आम्हाला आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या भूतलावर अवतीर्ण होण्याने प्रगट करण्यात आली आहे. ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे अमरत्व व जीवन प्रकाशात आणले.

11 मला त्या सुवार्तेचा उपदेशक, प्रेषित आणि शिक्षक असे नेमले होते. 12 आणि या कारणांमुळे मीसुद्धा दु:ख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपविले आहे त्याचे तो रक्षण करील.

13 माझ्याकडून ऐकून घेतलेल्या सत्य शिक्षणाचा गाभा दृढ धर. आणि ख्रिस्त येशूमध्ये सापडणाऱ्या विश्वासाने व प्रीतीने ते कर. 14 आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे त्या चांगल्या ठेवीचे रक्षण कर.

15 आशिया प्रांतामध्ये असणाऱ्या सर्वांनी मला सोडले आहे हे तुला ठाऊकच आहे. त्यामध्ये फुगल व हर्मगनेस आहेत. 16 अनेसिफराच्या घरावर प्रभु दया दाखवो. कारण त्याने अनेकदा माझे समाधान केले आहे. आणि माझ्या तुरूंगात असण्याची त्याला लाज वाटली नाही. 17 उलट रोममध्ये असताना त्याने माझा तपास लागेपर्यंत कसोशीने माझा शोध केला. 18 प्रभु करो आणि त्याला त्या दिवशी प्रभुकडून दया मिळो कारण माझ्या इफिसातील वास्तव्य काळात त्याने अनेक प्रकारे माझी सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.

होशेय 2

“मग तुमच्या भावांना ‘तुम्ही माझे आहात’ आणि बहिणींना ‘त्याने तुमच्यावर दया केली’ असे म्हणाल.”

“तुम्ही आपल्या आईशी वाद घाला. खुशाल वाद घाला.कारण ती माझी पत्नी नाही व मी तिचा पती नाही. वेश्येप्रमाणे वागण्याचे सोडून देण्यास तिला सांगा. तिच्या स्तनापासून तिला तिच्या प्रियकरांना दूर करण्यास सांगा. तिने जर व्यभिचार करण्याचे सोडण्यास नकार दिला तर मी तिला नग्न करीन. तिला मी तिच्या जन्माच्या वेळच्या अवस्थेप्रमाणे टाकीन. मी तिचे लोक काढून घेईन मग ती ओसाड रूक्ष वाळवंटाप्रमाणे होईल, मी तिला तहानेने मारीन. तिची मुले ही वेश्येची मुले असल्याने मला त्यांची कीव येणार नाही. त्यांची आई वेश्येप्रमाणे वागली. तिला तिच्या कर्मांची लाज वाटली पाहिजे. ती म्हणाली, ‘मी माझ्या प्रियकराकडे जाईन ते मला अन्नपाणी देतील. ते मला लोकर, कापड, मद्या व जैतूनेचे तेल देतील.’

“म्हणून, मी (परमेश्वर) तुझा (इस्राएलचा) रस्ता काटे पसरवून आडवीन. मी भिंत बांधीन मग तिला मार्ग सापडू शकणार नाही. ती तिच्या प्रियकरांमागून धावेल पण त्यांना ती गाठू शकणार नाही. ती तिच्या प्रियकरांना शोधील, पण ते तिला सापडणार नाहीत. मग ती म्हणेल, ‘मी माझ्या पहिल्या पतीकडे (परमेश्वराकडे) परत जाईन. मी त्याच्याजवळ असताना माझे जीवन ह्याहून चांगले होते आतापेक्षा ते आयुष्यच बरं होते.’

“तिला धान्य, मद्य आणि तेल देणारा मीच एकमेच (परमेश्वर) आहे, हे तिला (इस्राएलला) कळले नाही. मी तिला आणखी चांदी-सोने देत राहिलो पण इस्राएली लोकांनी त्या चांदी-सोन्याचा उपयोग बआलच्या मूर्ता घडविण्याकरिता केला. म्हणून, मी (परमेश्वर) परत येईन. मी धान्य पिकताच माझे धान्य व द्राक्षे तयार होताच धान्य आणि द्राक्षरस परत घेईन. मी तिला तिचे उघडे शरीर झाकण्यासाठी दिलेली लोकर व कापड परत घेईन. 10 आता मी तिला उघडी करीन. ती नग्न होईल व तिचे सर्व प्रियकर तिला पाहू शकणार नाही. 11 मी तिचा सर्व आनंद नष्ट करीन. तिच्या सुट्या तिच्या अमावस्येच्या मेजवान्या व विश्रांतीचे दिवस मी काढून घेईन. तिच्या खास मेजवान्या मी बंद करीन. 12 मी तिच्या द्राक्षवेलींचा व तिच्या अंजिराच्या झाडांचा नाश करीन. ती म्हणाली होती, ‘माझ्या प्रियकरांनी मला या गोष्टी दिल्या’ पण मी तिच्या बागांचे रूप पालटून. त्या जंगलाप्रमाणे होतील. वन्या पशू येऊन झाडे खातील.

13 “तिने बालाची सेवा केली, म्हणून मी तिला शिक्षा करीन. तिने त्यांच्यापुढे धूप जाळला. तिने साजशृंगार केला. तिने दागदागिने व नथनी घातली मग ती तिच्या प्रियकरांकडे गेली व मला विसरली.” परमेश्वरच असे म्हणाला:

14 “म्हणून मी (परमेशवर) तिला शिकवीन. मी तिला वाळवंटात नेईन. मी तिच्याशी प्रेमाने बोलेन. 15 तेथे मी तिला द्राक्षमळे देईन अखोरची दरी आशेचे द्वार म्हणून देईन. मग तिच्या तरुणपणी मिसर देशातून बाहेर आल्यावर ज्याप्रमाणे तिने प्रत्युत्तर दिले होते, ती देईल.” 16 परमेश्वरच असे म्हणतो.

“त्या वेळेला ‘तू मला माझ पती’ म्हणून संबोधशील. मला ‘माझा बआल [a] असे म्हणणार नाहीस.’ 17 मी तिच्या तोंडातून बालाचे नाव काढून टाकीन. मग लोक कधीही बालाचे नाव घेणार नाहीत.

18 “त्या वेळेला, मी इस्राएली लोकांसाठी रानातल्या प्राण्यांबरोबर, आकाशातील पक्ष्यांबरोबर आणि जमिनीवर सरपटणाव्या प्राण्यांबरोबर एक करार करीन. मी धनुष्य तलवार व युध्दात वापरण्यात येणारी शस्त्रे मोडून टाकीन. त्या देशात एकही शस्त्र राहणार नाही. मी देश सुरक्षित करीन, त्यामुळे इस्राएलचे लोक शांतीने झोप घेतील. 19 आणि मी (परमेश्वर) तुला माझी चिरंतन वधू करीन. मी चांगुलपणा, न्याय, प्रेम व दया यांच्यासह तुला वधू करून घेईन. 20 मी तुला माझी विश्वासू वधू बनवीन. मग तू परमेश्वराला खरोखर जाणशील. 21 मी त्या वेळेला प्रत्युत्तर देईन.” परमेश्वर असे म्हणतो.

“मी आकाशाशी बोलेन व
    तो पृथ्वीवर पाऊस पाडील.
22 भूमी धान्य, मद्य व तेल देईल.
    त्यामुळे इज्रेलच्या गरजा भागतील.
23 तिच्या भूमीत मी तिचे पुष्कळ बीज [b] पेरीन.
    लो-रूमाहावर मी दया करीन.
लो-अम्मीला मी ‘माझे लोक’ म्हणीन.
    मग ते मला, ‘तू माझा परमेश्वर’ मानतील.”

स्तोत्रसंहिता 119:97-120

मेम

97 परमेश्वरा, मला तुझी शिकवण खूप आवडते.
    मी सतत तिच्याबद्दल बोलत असतो.
98 परमेश्वरा, तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा शहाणे करतात.
    तुझे नियम नेहमी माझ्याजवळ असतात.
99 मी माझ्या सगळ्या शिक्षकांपेक्षा शहाणा आहे.
    कारण मी तुझ्या कराराचा अभ्यास करतो.
100 जुन्या पुढाऱ्यांपेक्षा मला जास्त
    कळते कारण मी तुझ्या आज्ञा सांभाळतो.
101 तू मला प्रत्येक पावलाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून
    दूर ठेवतोस म्हणून परमेश्वरा, मी तू जे सांगशील ते करु शकतो.
102 परमेश्वरा, तू माझा गुरु आहेस
    म्हणून मी तुझे नियम पाळणे बंद करणार नाही.
103 माझ्या तोंडात तुझे शब्द
    मधापेक्षाही गोड आहेत.
104 तुझी शिकवण मला शहाणा करते.
    त्यामुळे मी चुकीच्या शिकवणीचा तिरस्कार करतो.

नून

105 परमेश्वरा, तुझे शब्द दिव्याप्रमाणे
    माझा मार्ग उजळतात.
106 तुझे नियम चांगले आहेत.
    मी ते पाळायचे वचन देतो आणि मी दिलेले वचन पाळीन.
107 परमेश्वरा, मी खूप काळ दुख: भोगले आहे.
    कृपा करुन आज्ञा दे आणि मला पुन्हा जगू दे.
108 परमेश्वरा, माझ्या स्तुतीचा स्वीकार कर
    आणि मला तुझे नियम शिकव.
109 माझे आयुष्य नेहमीच धोक्यात असते
    पण मी तुझी शिकवण विसरलो नाही.
110 दुष्ट लोक मला जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात.
    पण मी तुझ्या आज्ञा मोडल्या नाहीत.
111 परमेश्वरा, मी सदैव तुझ्या कराराप्रमाणे वागेन
    त्यामुळे मला खूप आनंद होतो.
112 मी अगदी नेहमी प्रयत्नपूर्वक
    तुझे नियमपाळायचा प्रयत्न करीन.

सामेख

113 परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत
    त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते.
114 मला लपव आणि माझे रक्षण कर.
    परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.
115 परमेश्वरा, वाईट लोकांना माझ्याजवळ फिरकू देऊ नकोस
    आणि मी माझ्या देवाच्या आज्ञा पाळीन.
116 परमेश्वरा, कबूल केल्याप्रमाणे तू मला आधार दे आणि मग मी जगेन.
    माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून माझी निराशा करु नकोस.
117 परमेश्वरा, मला मदत कर म्हणजे माझा उध्दार होईल.
    मी नेहमीच तुझ्या आज्ञांचा अभ्यास करीन.
118 परमेश्वरा, तुझे नियम मोडणाऱ्या प्रत्येकाला तू परत पाठव.
    का? कारण जेव्हा त्यांनी तुझ्या सांगण्या प्रमाणे वागायचे कबूल केले तेव्हा ते खोटे बोलले.
119 परमेश्वरा, तू वाईट लोकांना पृथ्वीवर कचऱ्याप्रमाणे फेकून दे.
    म्हणजे मग मी तुझ्या करारावर सदैव प्रेम करीन.
120 परमेश्वरा, मला तुझी भीती वाटते,
    मी घाबरतो आणि तुझ्या नियमांना मान देतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center