M’Cheyne Bible Reading Plan
अलीशा त्या शूनेमच्या बाईला स्थलांतर करायला सांगतो
8 अलीशामुळे जो मुलगा जीवंत झाला होता त्या मुलाच्या आईशी अलीशा बोलला. अलीशा म्हणाला, “तू आपल्या कुटुंबियासह दुसऱ्या देशात जा. कारण परमेश्वर या प्रदेशात दुष्काळ पाडणार आहे. आणि तो सात वर्षे चालेल.”
2 तेव्हा अलीशाच्या म्हणण्याप्रमाणे तिने केले. पलिष्ट्यांच्या देशात ती आपल्या कुटुंबियांसमवेत जाऊन सात वर्षे राहिली. 3 सात वर्षे उलटल्यावर ती पलिष्ट्यांच्या देशातून परत आली.
मग ती राजाला भेटायला निघाली. आपले घरदार आणि जमीन आपल्याला पुन्हा परत मिळावी यासाठी तिला राजाची मदत हवी होती.
4 अलीशा संदेष्ट्याचा सेवक गेहजी याच्याशी राजा बोलत बसला होता. राजा गेहजीला म्हणाला, “अलीशाने जी मोठमोठी कृत्ये केली ती कृपा करुन मला सांग.”
5 अलीशाने एका मृताला पुन्हा जिवंत कसे केले याविषयी गेहजी राजाला सांगत असतानाच जिच्या मुलाला अलीशाने जिवंत केले होते ती बाई राजासमोर आली. आपली जमीन आणि घर परत मिळावे यासाठी राजाची मदत मागायला ती आली होती. गेहजी म्हणाला, “स्वामी, हीच ती बाई आणि अलीशाने जीवदान दिले तो हाच मुलगा.”
6 राजाने त्या बाईची विचारपूस केली आणि ती राजाशी बोलली.
राजाने मग एका कारभाऱ्याला तिच्या मदतीला दिले आणि सांगितले, “तिच्या मालकीचे आहे ते सर्व तिला परत द्या. तसेच, ती हा देश सोडून गेली तेव्हापासून आतापर्यंतचे तिच्या शेतातले उत्पन्न तिला द्या.”
बेन-हदाद हजाएलला अलीशाकडे पाठवतो
7 अलीशा दिमिष्क येथे गेला. आरामचा राजा बेन-हदाद तेव्हा आजारी होता. एकाने त्याला सांगितले, “आपल्या इथे एक संदेष्टा आला आहे.” 8 तेव्हा बेन-हदाद हजाएलला म्हणाला, “नजराणा घेऊन त्या संदेष्ट्याच्या भेटीला जा. मी या दुखण्यातून बरा होईन की नाही ते परमेश्वराला विचारायला त्याला सांग.”
9 तेव्हा हजाएल अलीशाच्या भेटीला गेला. दिमिष्कातील उत्तमोत्तम पदार्थाचा नजराणा तो अलीशासाठी घेऊन गेला. या गोष्टी त्याने चाळीस उंटांवर लादल्या होत्या. हजाएल अलीशाकडे जाऊन म्हणाला, “तुमचा शिष्य अरामचा राजा बेनहदाद याने मला तुमच्याकडे पाठवले आहे. या दुखण्यातून आराम पडेल का असे त्यांनी विचारले आहे.”
10 तेव्हा अलीशा हजाएलला म्हणाला, “बेन-हदादला जाऊन सांग, ‘तू खात्रीने बरा होशील.’ [a] पण तो मरणार आहे असे खरे म्हणजे परमेश्वराने मला सांगितले आहे.”
अलीशाचे हजाएलबद्दल भविष्यकथन
11 एवढे बोलून मग देवाच्या माणसाने, हजाएल शरमिंदा होईपर्यंत त्याच्याकडे टक लावून पाहिले. नंतर अलीशाला रडू फुटले. 12 हजाएलने त्याला विचारले, “तुम्ही का रडत आहात?”
अलीशाने सांगितले, “इस्राएलवर तू अत्याचार करणार आहेस हे मला माहीत आहे म्हणून मला वाईट वाटते. त्यांची मजबूत नगरे तू जाळशील. आपल्या तलवारीने त्यांची तरुण माणसे कापून काढशील. त्यांच्या लहान मुलांना ठार करशील त्यांच्या गरोदर बायकांना चिरशील.”
13 हजाएल म्हणाला, “मी पडलो कुत्र्यासारखा क्षुद्र माणूस एक दुबळामाणूस या मोठ्या गोष्टी मी कसल्या करणार!”
अलीशा म्हणाले, “तू अरामचा राजा होणार असे परमेश्वराने मला वर्तवले आहे.”
14 मग हजाएल तिथून निघाला आणि आपल्या धन्याकडे आला. बेन-हदाद हजाएलला म्हणाला, “अलीशा तुला काय म्हणाला?”
हजाएल म्हणाला, “तुम्ही जगणार आहात असे अलीशाने मला सांगितले.”
हजाएलकडून बेन-हदादचा वध
15 पण दुसऱ्या दिवशी हजाएलने एक रजई घेतली आणि पाण्यात ती भिजवली मग ती बेनहदादच्या तोंडावर टाकली. त्याने बेन-हदाद गुदमरला आणि मरण पावला. अशा प्रकारे हजाएल नवा राजा झाला.
यहोरामच्या कारकीर्दीची सुरवात
16 यहोशाफाटचा मुलगा यहोराम यहूदाचा राजा होता. इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा योराम याच्या कारकिर्दीचे पाचवे वर्ष चालू असताना यहोराम इस्राएलच्या राज्यावर आला. 17 त्यावेळी यहोराम बत्तीस वर्षाचा होता. यरुशलेमवर त्याने आठ वर्षे राज्य केले. 18 पण इस्राएलच्या इतर राजांप्रमाणेच यहोराम वागला. परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये त्याने केली. अहाबच्या घरचे लोक वागत तसाच तो वागला. त्याची बायको अहाबची मुलगी होती म्हणून त्याने तसे केले. 19 पण परमेश्वराने आपला सेवक दावीद याला वचन दिलेले असल्यामुळे परमेश्वराने यहुद्यांचा नाश केला नाही. दावीदाच्या वंशातीलच कोणीतरी सतत गादीवर येईल असे वचन परमेश्वराने दावीदाला दिले होते.
20 यहोरामच्या कारकिर्दीत अदोम यहूदापासून वेगळा झाला. अदोमी लोकांनी स्वतःच राजाची निवड केली.
21 तेव्हा यहोराम आपले सर्व रथ घेऊन साईर येथे गेला. अदोमी सैन्याने त्याला वेढा घातला. यहोराम आणि त्याच्या बरोबरचे लोक यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आणि आपली सुटका केली. यहोरामचे लोक पळाले आणि घरी परतले. 22 अशाप्रकारे अदोमी यहूदांच्या सत्ते पासून वेगळे झाले आणि अजूनही ते तसेच मुक्त आहेत.
सुमारास लिब्नानेही बंड केले आणि यहूदापासून ते मुक्त झाले.
23 यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात यहोरामने जे जे केले त्याची नोंद आहे.
24 यहोराम मरण पावला आणि दावीद नगरात आपल्या पूर्वजांसोबत त्याचे दफन झाले. यहोरामचा मुलगा अहज्या मग राज्य करु लागला.
अहज्याच्या कारकिर्दीची सुरवात
25 इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा योराम याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी यहोरामचा मुलगा अहज्या यहुदाचा राजा झाला. 26 त्यावेळी अहज्या बावीस वर्षाचा होता. त्याने यरुशलेममध्ये एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या. इस्राएलचा राजा अम्री याची ती मुलगी. 27 परमेश्वराने जे करु नये म्हणून सांगितले ते ते अहज्याने केले. तो अहाबचा जावई होता. त्यामुळे अहाबच्या घराण्यातल्या लोकांसारखीच त्याची वागणूक होती.
हजाएलशी झालेल्या लढाईत योराम जखमी होतो
28 अहाबचा मुलगा योराम याच्या बरोबर अहज्या रामोथ गिलाद येथे अरामचा राजा हजाएल याच्यावर चढाई करुन गेला. अराम्यांनी योरामला जखमी केले. 29 तेथे झालेल्या दुखापतीतून बरे होण्यासाठी म्हणून राजा योराम इस्राएलला परत गेला. इज्रेलच्या प्रदेशात तो गेला. त्याला भेटायला यहोरामचा मुलगा अहज्या ही इज्रेलला गेला.
इतर लोकांबरोबर राहण्याचे काही नियम
5 वडील माणसाला कठोरपणे बोलू नको, उलट पित्याप्रमाणे त्याला बोध कर. 2 तरुणांना भावासारखे, वृद्ध स्त्रियांना आईसारखे, तरुण स्त्रियांना बहिणीसारखे पूर्ण शुद्ध भावाने वागीव.
3 ज्या विधवा खरोखरच निराधार आहेत त्यांची काळजी घे. 4 पण जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांची काळजी घेऊन आपला धर्म प्रत्यक्षात आणावा आणि अशा प्रकारे आपल्या आईवडिलांची किंवा आजीआजोबांची परतफेड करावी. कारण हे देवाला मान्य आहे. 5 जी स्त्री खरी विधवा आहे, व तिची काळजी घेण्यासाठी कोणी नाही तिची आशा देवावर असते व ती रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना व विनंत्या करीत असते. 6 पण जी विधवा चैनीत राहते, ती जरी जिवंत असेल तरी ती खरोखर मेलेली आहे. 7 म्हणून लोकांना याविषयी निक्षन सांग, यासाठी की, कोणालाही त्यांच्याकडे दोष दाखविण्यास वाव राहणार नाही. 8 पण जर कोणी त्याच्या स्वतःच्या नातेवाईकासाठी आणि विशेषतः त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे. व तो अविश्वासू माणसांपेक्षा वाईट आहे.
9 एखादी विधवा जी कमीत कमी साठ वर्षांची असेल, जिला सोडचिठ्ठी देण्यात आली नाही व जिचे दुसऱ्यांदा लग्न झाले नाही, अशाच स्त्रियांची विधवा म्हणून नोंद घ्यावी. 10 चांगले काम करण्याबद्दल तिचा नावलौकिक असेल व तिने मुलाबाळांना वाढवल असेल, जिने अनोळखी लोकांचे स्वागत केले असेल, संताचे पाय धुतले असतील, त्रासात असलेल्यांना मदत केली असेल व सर्व चांगले काम करण्यात स्वतःला वाहून घेतले असेल, तिचा विधवांच्या खास यादीत समावेश करावा.
11 पण तरुण विधवांची यादीत नोंद करण्याचे टाळावे. कारण जेव्हा त्या ख्रिस्ताला सोडून अविचारी होतात, तेव्हा त्यांना पुन्हा लग्न करावेसे वाटते. 12 आणि त्या दोषी धरल्या जातील, कारण त्यांनी त्यांचे मूळ वचन मोडलेले असते. 13 आणखी, त्या आळशी, त्या आळशी बनतात व घरोघरी फिरतात. त्या आळशी बनतात एवढेच नाही तर इतर लोकांच्या भानगडीत स्वतःला गुरफटून घेतात व इतरांविषयी खोटनाटे बोलतात. ज्या गोष्टी बोलू नयेत, त्या गोष्टी बोलतात. 14 यासाठी माझी अशी इच्छा आहे की, तरुण स्त्रियांनी (विधवांनी) लग्ने करावीत. मुलांचे संगोपन करावे व आपले घर चालवावे. आपल्या शत्रूला आपली निंदा करण्यास वाव मिळू देऊ नये. 15 मी तर असे म्हणतो कारण काही विधवा सैतानामागे जाण्यासाठी वळल्यादेखील आहेत.
16 जर एखाद्या विश्वासणाऱ्या स्त्रीच्या घरात विधवा स्त्रिया असतील तर तिने त्यांची काळजी घ्यावी [a] व मंडळीवर भार टाकू नये. यासाठी की ज्या खरोखरच विधवा आहेत त्यांना ते मदत करु शकतील.
More About Elders and Other Matters
17 जे वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या योग्यतेचे समजावे, विशेषतः जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना. 18 कारण पवित्र शास्त्र म्हणने, “धान्याची मळणी करताना बैलाला मुसक्या बांधू नको. [b] आणि मजुराचा त्याच्या मजुरीवर हक्क आहे.” [c]
19 दोन किंवा तीन साक्षीदारांनी पाठिंबा दिल्याशिवाय वडिलावरील आरोप दाखल करु नकोस. 20 जे पाप करीत राहतात त्यांचा जाहीरपणे निषेध कर. यासाठी की, इतरांनाही भय वाटावे.
21 देव, येशू ख्रिस्त व निवडलेले देवदूत यांच्यासमोर मी निक्षून आज्ञा करतो की, तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता या गोष्टी पाळ व पक्षपाताने काहीही करु नको.
22 देवाच्या सेवेसाठी नियुक्ती करण्याठी कोणावरही घाईने हात न ठेवण्याची सवय कर. इतरांच्या पापांत वाटेकरी होऊ नको. नेहमी स्वतःला शुद्ध राख.
23 नुसतेच पाणी पिण्याचे थांबव आणि तुझ्या पचनासाठी व वारंवारच्या दुखण्यासाठी द्राक्षारसाचा वापर कर.
24 काही लोकांची पापे स्पष्ट आहेत. व ती त्यांच्याअगोदर न्यायालयात जातात पण दुसऱ्या लोकांची पापे त्यांच्या मागून जातात. 25 त्याचप्रमाणे, चांगली कामेही स्पष्ट आहेत ती सुध्दा कायमची लपविता येत नाहीत.
12 “दुष्टान्तातील माणूस म्हणाला, त्या वेळी, महान राजपुत्र (देवदूत) मिखाएल उभा राहील. मिखाएल तुझ्या लोकांचा, यहूद्यांचा प्रमुख आहे, तेव्हा खूप संकटाचा काळ असेल. पृथ्वीवर राष्ट्र निर्माण झाल्यापासून असा काळ कधी आला नसेल, पण दानीएल, त्या वेळी तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे जीवनाच्या ग्रंथात नोंदविली गेली असतील, ते सर्व वाचतील. 2 पृथ्वीवरील खूप मृत व पुरलेले उठतील. काहींना चिरंजीवित्व लाभेल पण काहींना कायमची अप्रतिष्ठा व तिरस्कार लाभेल. 3 ज्ञानी आकाशाप्रमाणे तेजाने चमकून उठतील ज्या ज्ञानी लोकांनी इतरांना योग्य जीवनमार्ग शिकविला, ते सदासर्वकाळ ताऱ्यांप्रमाणे चमकतील.
4 “पण, दानीएला, तू हा संदेश गुप्त ठेव तू खाते बंद करून टाक अंतकाळापर्यंत हे तू गुप्त ठेवले पाहिजेस. खूप लोक इकडे तिकडे सत्यज्ञानाचा शोध घेतील आणि सत्यज्ञान वाढेल.”
5 मग मला, दानीएलला दोन दुसरी माणसे दिसली एक नदीकाठी माझ्याजवळ उभा होता आणि दुसरा पैलथडीला उभा होता. 6 तागाची वस्त्रे परिधान केलेला माणस नदीच्या पाण्यावर उभा होता. त्या दोघांतला एक त्याला म्हणाला, “ह्या विस्मयकारक गोष्टी खऱ्या व्हायला किती काळ लागेल?”
7 तागाचे कपडे परिधान केलेल्या व नदीच्या पाण्यावर उभ्या राहिलेल्या माणसाने आपले, उजवा व डावा दोन्ही हात स्वर्गाकडे उंचावले आणि त्याने चिरंतर देवाची शपथ घेऊऩ वचन देताना मी ऐकले, तो म्हणाला “तो काळ, एक वेळ, अनेक वेळा, (अ) आणि अर्धा [a] वेळेचा असेल. पवित्र लोकांच्या शक्तीचा बीमोड केला जाईल आणि मग या सर्व गोष्टी अखेरीला खऱ्या ठरतील.”
8 मी उत्तर ऐकले पण मला त्याचा अर्थ खरोखरच कळला नाही म्हणून मी विचारले “महाराज, ह्या सर्व गोष्टी खऱ्या ठरल्यावर काय होईल.?”
9 तो म्हणाला, “दानीएला तू तुझ्या जीवनाकडे लक्ष दे. संदेश गुप्त ठेवलेला आहे. अंताच्या क्षणापर्यंत तो गुप्तच राहील. 10 पुष्कळ लोकांना शुध्द केले जाईल ते स्वतःला स्वच्छ करतील. पण दुष्ट दुष्टच राहातील. त्यांना ह्या गोष्टी समजणार नाहीत पण सुज्ञांना सर्व समजेल.
11 “नित्याची होमार्पणे करणे बंद होईल. ह्या वेळेपासून ती भयंकर नाश करणारी गोष्टी घेडेपर्यंतचा काळ हा 1,290 दिवसांचा असेल. 12 जो वाट पाहील आणि 1,335 दिवसांच्या अखेरपर्यंत पोहोचेल, तो खूप सुखी होईल.
13 “दानीएल, तुझ्याबद्दल सांगायचे झाले तर, जा आणि शेवटपर्यंत तुझे जीवन जग. तुला विश्रांती मिळेल आणि अखेरील तू मृत्युलोकांतून उठशील आणि तुला तुझा हिस्सा मिळेल.”
जायिन
49 परमेश्वरा, तू मला दिलेल्या वचनाची आठवण ठेव.
ते वचन माझ्या मनात आशा निर्माण करते.
50 मी पीडित होतो, दु:खी होतो.
आणि तू माझे सांत्वन केलेस.
तुझ्या शब्दांनी मला परत जगायला लावले.
51 जे लोक स्वत:ला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझा सतत अपमान केला.
पण मी तुझ्या शिकवणी नुसार वागणे सोडले नाही.
52 मी नेहमी तुझ्या राहाणपणाच्या निर्णयांची आठवण ठेवतो.
परमेश्वरा, तुझे निर्णय मला समाधान देतात, माझे सांत्वन करतात.
53 दुष्ट लोक तुझी शिकवण आचरणे
सोडून देतात ते पाहिले की मला राग येतो.
54 घरात तुझे नियम हीच माझी गाणी आहेत.
55 परमेश्वरा, रात्री मला तुझे नाव
आणि तुझी शिकवण आठवते.
56 असे घडते कारण मी अगदी काळजी पूर्वक तुझी आज्ञा पाळतो.
हेथ
57 परमेश्वरा, तुझ्या आज्ञा पाळणे हेच माझे कर्तव्य आहे,
असा निर्णय मी घेतला आहे.
58 परमेश्वरा, मी पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे.
वचन दिल्याप्रमाणे तू माझ्याशी दयाळूपणे वाग.
59 मी माझ्या आयुष्याचा अगदी काळजी पूर्वक विचार केला
आणि मी तुझ्या कराराकडे परत आलो.
60 अजिबात उशीर न करता मी तुझ्या आज्ञा पाळायला धावत आलो.
61 वाईट लोकांनी माझ्याविषयी काही अनुदार उद्गार काढले.
पण परमेश्वरा, मी तुझी शिकवण विसरलो नाही.
62 मी मध्यरात्री तू घेतलेल्या तुझ्या चांगल्या निर्णयांबद्दल
तुला धन्यवाद देण्यासाठी उठतो.
63 जो कुणी तुझी उपासना करतो त्याचा मी मित्र आहे.
जो कुणी तुझ्या आज्ञा पाळतो त्याचा मी मित्र आहे.
64 परमेश्वरा, तुझे खरे प्रेम पृथ्वी व्यापून टाकते.
मला तुझे नियम शिकव.
तेथ
65 परमेश्वरा, तू माझ्यासाठी, तुझ्या सेवकासाठी चांगल्या गोष्टी केल्यास.
तू ज्या गोष्टी करण्याचे वचन दिले होतेस त्याच गोष्टी केल्यास.
66 परमेश्वरा, योग्य निर्णय घेण्याविषयीचे ज्ञान मला दे.
माझा तुझ्या आज्ञांवर विश्वास आहे.
67 दुख: सोसण्यापूर्वी मी बऱ्याच चुकीच्या गोष्टी केल्या
परंतु आता मी तुझ्या आज्ञा काळजी पूर्वक पाळतो.
68 देवा, तू चांगला आहेस आणि
तू चांगल्या गोष्टी करतोस. मला तुझे नियम शिकव.
69 जे लोक स्वत:ला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझ्याबद्दल खोटं सांगितलं पण परमेश्वरा,
मी तरी ही अगदी मनापासून तुझ्या आज्ञा पाळणे चालूच ठेवले.
70 ते लोक फार मूर्ख आहेत
पण मला तुझ्या शिकवणीचा अभ्यास करणे फार आवडते.
71 मी दुख: सोसले ते चांगले झाले.
त्यामुळेच मला तुझे नियम समजले.
72 परमेश्वरा, तूझी शिकवण माझ्यासाठी फार चांगली आहे.
ती सोन्याच्या व चांदीच्या हजार तुकड्यांपेक्षा चांगली आहे.
2006 by World Bible Translation Center