M’Cheyne Bible Reading Plan
सिनाय पर्वतावर एलीया
19 अहाब राजाने घडलेली सर्व हकीकत ईजबेलला सांगितली. सर्व संदेष्ट्यांना एलीयाने कसे तलवारीने कापून काढले तेही सांगितले. 2 तेव्हा ईजबेलने एलीयाला दूताकरवी निरोप पाठवला. तो असा, “तू त्या संदेष्ट्यांना मारलेस तसे मी तुला उद्या या वेळेपर्यंत मारणार आहे. यात मला यश आले नाही तर देवतांनीच मला मारावे.”
3 एलीया हे ऐकून घाबरला. आपला जीव वाचवायला त्याने पळ काढला. बरोबर त्याने आपल्या नोकराला घेतले होते. यहूदामधील बैरशेबा येथे ते गेले. आपल्या नोकराला तिथेच सोडून 4 तो पुढे दिवसभर वाळवंट तुडवत गेला. एका झुडुपाखाली तो बसला. आता मरण यावे असे त्याला वाटले. एलीया म्हणाला, “आता हे पुरे झाले, परमेश्वरा! मला आता मरु दे माझ्या पूर्वजांपेक्षा माझ्यात काय बरे आहे?”
5 एका झाडाखाली तो आडवा झाला आणि त्याला झोप लागली. तेव्हा एक देवदूत तिथे आला एलीयाला स्पर्श करुन म्हणाला, “उठ खाऊन घे.” 6 एलीया उठून पाहतो तर निखाऱ्यावर भाजलेली गोड भाकर आणि पाण्याचे मडके शेजारी ठेवलेले होते. एलीयाने ते खाल्ले, पाणी प्याला आणि तो पुन्हा झोपी गेला.
7 आणखी काही वेळाने तो देवदूत पुन्हा त्याच्याजवळ आला त्याने त्याला स्पर्श केला आणि त्याला म्हणाला, “ऊठ आणि थोडे खाऊन घे, नाहीतर पुढचा मोठा प्रवास करायला तुला शक्ती राहणार नाही.” 8 तेव्हा एलीया उठला त्याने खाल्ले आणि पाणी प्याला. त्याबळावर पुढे तो चाळीस दिवस आणि रात्री चालत राहिला. देवाचा डोंगर होरेब येथपर्यंत तो चालला. 9 तिथे एका गुहेत शिरुन त्याने रात्र काढली.
तेव्हा परमेश्वर एलीयाशी बोलला. तो म्हणाला, “एलीया, तू येथे का आला आहेस?”
10 एलीया म्हणाला, “सर्व शक्तिमान परमेश्वर देवा, मी आतापर्यंत तुझीच सेवा करत आलेलो आहे. माझ्याकडून होईल तितके मी केले पण इस्राएलच्या लोकांनी तुझ्याशी केलेल्या कराराचा भंग केलेला आहे. त्यांनी तुझ्या वेदीचा विध्वंस केला. तुझ्या संदेष्ट्यांना मारले. मीच एकटा काय तो अजून जिवंत आहे. पण आता ते माझ्याही जिवावर उठले आहेत.”
11 यावर परमेश्वर एलीयाला म्हणाला, “जा, या डोंगरावर माझ्यासमोर उभा राहा. मी तुझ्या जवळून जातो” मग जोराचा वारा सुटला. त्या सोसाट्याच्या वाऱ्याने डोंगरालाही तडे जाऊन मोठे मोठे खडक परमेश्वरासमोर पडले. पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. त्यानंतर धरणीकंप झाला, पण त्यातही परमेश्वर नव्हता. 12 धरणीकंपानंतर अग्नी प्रकटला. पण त्यातही परमेश्वर नव्हता. अग्री शमल्यावर मात्र शांत, मंजुळ स्वर ऐकू आला.
13 एलीयाने हा ध्वनी ऐकला तेव्हा अंगरख्याने चेहरा झाकून घेऊन तो गुहेच्या दाराशी जाऊन उभा राहिला. “एलीया, तू इथे का आला आहेस?” अशी वाणी त्याला ऐकू आली.
14 एलीया म्हणाला, “सर्व शक्तिमान परमेश्वर देवा, आतापर्यंत मी तुझ्याच सेवेत आयुष्य घालवले आहे. पण इस्राएल लोकांनी आपला करार मोडला आहे. त्यांनी तुझ्या वेदींचा विध्वंस केला. तुझ्या संदेष्ट्यांना ठार केले. मीच काय तो अजून जिवंत आहे. आणि आता ते माझ्या जिवावर उठलेत.”
15 तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “आता मागे जा आणि वाळवंटातून जाणाऱ्या रस्त्याने दिमिष्काला पोहोंचेपर्यंत चालत जा. दिमिष्कामध्ये जा आणि अरामचा राजा म्हणून हजाएलला अभिषेक कर. 16 निमशीचा मुलगा येहू याला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक कर. आणि आबेल महोला इथला शाफाटाचा मुलगा अलीशा याला पुढे तुझी जागा घेणारा संदेष्टा म्हणून अभिषेक कर. 17 हजाएल अनेक पापी माणसांना ठार करेल, त्याच्या तावडीतून जे सुटतील त्यांना येहू मारील. आणि यातूनही कोणी निसटले तर त्याला अलीशा मारील. 18 एलीया, इस्राएलमध्ये तूच काही एकटा निष्ठावान नाहीस, तेही बरेच जणांना मारतील. आणि तरीही बालपुढे कधी वाकले नाहीत असे सातजार लोक अजूनही आहेत. यांना मी जगू देईल. त्यांनी आयुष्यात कधी बालमूर्तीचे चुंबन घेतलेले नाही.”
अलीशा संदेष्टा होतो
19 तेव्हा एलीया तिथून निघाला आणि शाफाटाचा मुलगा अलीशा याच्या शोधात निघाला. अलीशा तेव्हा आपली बारा एकरांची जमीन नांगरत होता. एलीया आला तेव्हा अलीशा अगदी शेवटच्या एकरात होता. एलीया अलीशा जवळ आला. एलीयाने मग आपला संदेष्ट्याचा खास अंगरखा अलीशावर पांघरला. [a] 20 अलीशाने लगेच बैल सोडून दिले आणि तो एलीयाच्या मागे धावत गेला. अलीशा त्याला म्हणाला, “मला माझ्या आईवडीलांचा निरोप घेऊ दे. मग मी तुझ्याबरोबर येतो.”
एलीया म्हणाला, “ठीक आहे, जा माझी काही हरकत नाही.”
21 अलीशाने मग आपल्या आईवडीलांसमवेत सणासुदीसारखे जेवण घेतले. त्याने आपली बैलांची जोडी कापली. त्यांच्या मानेवरचे जू सरपण म्हणून वापरले त्यावर बैलांचे मांस शिजवले. सर्व लोकांना जेवायला बोलावले. मग अलीशा एलीयाच्या पाठोपाठ गेला. एलीयाच्या तो मदतनीस झाला.
पौलाचे थेस्सलनीकातील कार्य
2 बंधूंनो, तुमचे तुम्हांलाच माहीत आहे की, आम्ही तुम्हाला दिलेली भेट व्यर्थ झाली नाही. 2 पण तुम्हाला माहीत आहे की, आम्हांला मागे फिलिप्पै येथे त्रास आणि अपमान सहन करावा लागला. पण देवाच्या साहाय्याने मोठा विरोध झाला असताना देवाकडून येणारी सुवार्ता सांगण्यासाठी आम्हांला धैर्य प्राप्त झाले. 3 खरोखर आमची घोषणा आमच्याकडून झालेल्या चुकांमुळे किंवा अशुद्ध हेतूने किंवा भ्रमाने येत नाही. 4 उलट, ज्याप्रमाणे देवाने पसंत केलेले, सुवार्तेचे कार्य सोपविलेले असे आम्ही आहोत म्हणून आम्ही बोलतो. आम्ही मनुष्याला संतुष्ट करण्यासाठी नाही, तर देवाला, जो आमच्या उद्दिष्टांची परीक्षा घेतो
5 खरोखर, तुम्हांला माहीत आहे की, आम्ही तुमच्यासमोर खुशामत करणाऱ्या शब्दांनी बोललो नाही, किंवा आमचे उपदेश करणे हे आमचा लोभ झाकण्याचे खोटे कारण नव्हते, कारण देव आमचा साक्षी आहे! 6 किंवा आम्ही लोकांकडून, तुमच्याकडून किंवा दुसऱ्या कोणाकडून सन्मान मिळावा म्हणून अपेक्षा करीत नव्हतो. ख्रिस्ताचे प्रेषित या नात्याने, जरी आम्हांला आमचा अधिकार तुमच्यावर दाखविता आला असता.
7 तरीही आम्ही तुमच्यामध्ये आई जशी प्रेमाने तिच्या मुलाला स्वतःचे दूध पाजते आणि काळजी घेते, तसे आम्ही तुमच्यात सौम्य होतो. [a] असे लिहिले आहे. 8 कारण आम्हाला तुमच्याविषयी इतके प्रेम वाटले की, आम्ही तुमच्याबरोबर देवाकडून येणारी सुवार्ताच नव्हे तर आमचे स्वतःचे जीवनसुद्धा देण्यास तयार होतो. याचे कारण म्हणजे, तुम्ही आमच्यासाठी प्रिय झाला होता. 9 बंधूंनो, आम्ही देवाकडून आलेली सुवार्ता सांगत असताना, तुम्हाला आठवत असेल की आम्ही रात्रंदिवस किती कष्ट केले. आमचे कष्ट आणि श्रम तुम्ही जाणता ते यासाठी केले की, तुम्ही कोणावरही भार पडू नये.
10 तुम्ही साक्षी आहात आणि देवसुद्धा साक्षी आहे की, आम्ही किती धार्मिकतेने, न्यायाने आणि निर्दोष रीतीने तुम्हा विश्वासणाऱ्यांबरोबर वागलो. 11 आणि तुम्हाला हे चांगले माहीत आहे की, जसा पिता आपल्या मुलांना वागवितो तसे आम्ही तुम्हातील प्रत्येकाला वागविले आहे. 12 अशा प्रकारे आम्ही तुम्हांला उत्तेजन दिले, सांत्वन केले. आणि तुम्हांला साक्ष दिली की, देवाला आवडेल अशा प्रकारे वागा. जो त्याच्यात व गौरवात तुम्हाला बोलावितो.
13 आणि, या कारणासाठी आम्हीसुद्धा देवाचे सातत्याने आभार मानतो, कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून देवाचा संदेश ऐकला, तेव्हा तुम्ही तो मनुष्याकडून आलेला म्हणून स्वीकारला नाही, तर देवापासून आलेला जसा खरा होता तसाच स्वीकारला. देवाचा संदेश, जो तुम्हा विश्वास णाऱ्यांच्यामध्ये सुद्धा कार्य करीत आहे. 14 कारण बंधूनो, तुम्ही येशूमध्ये देवाच्या ज्या मंडळ्या यहूदीयात आहेत त्याचे अनुकरण करणारे झाला आहात, कारण त्यांनी यहूद्यांच्या हातून जसे दु:ख सोसले, तसेच तुम्ही तुमच्या देशबांधवांकडून दु:ख सोसले. 15 त्यांनी प्रभु येशूला आणि संदेष्ट्यांना मारले, त्यांनी आम्हांला बाहेर हाकलून लावले, ते देवाला संतोष देत नाहीत आणि ते सर्व लोकांच्या विरुद्ध आहेत. 16 यहूदीतर लोकांचे तारण होण्यासाठी आम्ही त्यांच्याशी बोलायला हवे, परंतु ते आम्हांला मना करुन एक प्रकारे पापच करीत आहेत. ते या पापाद्वारे जे ते नेहमी करीत आले आहेत आपल्या पापाचे माप भरत आले आहेत. आणि आता शेवटी आणि पूर्णतेने देवाचा क्रोध त्यांच्यावर ओढवला आहे.
पौलाची त्यांना पुन्हा भेटण्याची इच्छा
17 बंधूंनो, आमच्यासाठी, आम्ही तुमच्यापासून थोड्या वेळासाठी वेगळे झालो होतो. आम्ही शरीराने वेगळे झालो होतो, विचाराने नाही आणि आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी फार अधीर झालो होतो. आणि तुम्हांला भेटण्याची फार इच्छा होती. 18 होय, तुमची भेट घेण्याचा खरोखर आम्ही प्रयत्न केला होता. खरोखर मी पौलाने एकदा दोनदा प्रयत्न केला परंतु सैतानाने असे करण्यापासून आम्हाला परावृत केले. 19 शेवटी, जेव्हा आपला प्रभु येशू दुसऱ्यांदा येईल, तेव्हा त्याच्यासमोर उभे राहू तेव्हा आमची आशा, किंवा आनंद किंवा मुकुट काय असेल, ज्याचा आम्हांला अभिमान वाटेल? ते तुम्हीच नाही का? 20 होय, तुम्ही आमचा गौरव व आनंद आहात!
दानीएलला बाबेलला नेले
1 नबुखदनेस्सर हा बाबेलाचा राजा होता. नबुखद्नेस्सर यरुशलेमाला आला. आपल्या सैन्याच्या मदतीने त्याने यरुशलेमला वेढा घातला. यहूदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी [a] हे घडले. 2 परमेशवरानेच नबुखद्नेस्सराच्याकरवी यहूदाचा राजा यहोयाकीम याचा पराभव केला. नबुखद्नेस्सरने देवाच्या मंदिरातील ताटल्या व इतर वस्तू नेल्या आणि बाबेलमधील त्याच्या मूर्तीच्या देवळात ठेवल्या.
3 नंतर नबुखदनेस्सर राजाने अश्पनजला हुकूम केला. (अश्पनज हा, राजाच्या सेवेत असणाऱ्या नपुंसक अधिकाऱ्यांतील सर्वांत महत्वाचा अधिकारी होता.) राजाने अश्पनजला, काही इस्राएली लोकांना त्याच्या राजवाड्यात आणण्यास सांगितले. नबुखद्नेस्सरला महत्वाच्या घराण्यातील आणि राजघराण्यातील इस्राएली लोक हवे होते. 4 राजाला,सुदृढ, तरुण, ज्यांच्या अंगावर जखमेची खूण वा व्रण नाही, ज्यांच्या शरीरांत काहीही दोष नाही असे यहूदी तरुण हवे होते. ते देखणे व चाणाक्ष असावेत अशी राजाची अपेक्षा होती. त्यांनी सहजतेने पण लवकर सर्व गोष्टी शिकून राजाची सेवा करावी, अशी राजाची इच्छा होती. अश्पनजला, इस्राएलच्या त्या तरुणांना, खास्दी भाषा व लेखन शिकविण्यास सांगितले होते.
5 राजा नबुखद्नेस्सर, त्या तरुणांना, तो स्वतः जे अन्न खाई तेच अन्न व मद्य, ठरावीक प्रमाणात रोज देत असे. इस्राएलच्या ह्या तरुणांनी तीन वर्षांत सर्व शिक्षण पूर्ण करावे, अशी राजाची इच्छा होती. मग ते राजाच्या सेवेत रूज व्हायचे होते. 6 दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या असे ते चौघेजण होते. ते सर्व यहूदा वंशापैकी होते. 7 नंतर अश्पनाजने ह्या यहूदी तरुणांना बाबेलच्या लोकांच्या नावाप्रमाणे नावे दिली. ती अशी: दानीएलला बेल्टशस्सर, हनन्याला शद्रख, मीशाएलला मेशख, व अजऱ्याला अबेद्नगो.
8 दानीएलला राजाचे ते पौष्टिक अन्न व मद्य घेऊन, स्वतःला अपवित्र करून घेण्याची अजिबात इच्छा नव्हती. म्हणून त्याने ह्यासाठी अश्पनजची परवानगी मागितली.
9 देवाने अश्पनजला दानीएलशी चांगले व दयेने वागण्याची बुध्दी दिली. 10 पण अश्पनज दानीएलला म्हणाला, मला, माझ्या स्वामी, राजाची भीती वाटते. तुम्हाला असे अन्न व पेय देण्याचा हुकूम राजाने दिला आहे. तुम्ही हे अन्न खाल्ले नाहीत तर तुम्ही अशक्त व आजारी दिसू लागाल, तुमच्याच वयाच्या इतर तरुणांपेक्षा तुम्ही वाईट दिसु लागाल. राजाने हे पाहिले. तर तो माझ्यावर रागावेल आणि माझे डोकेसुध्दा कदाचित् उडवेल. माझ्या मृत्यूला मग तुम्हीच कारणीभुत व्हाल.
11 अश्पनजने दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या ह्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एका पहाकेऱ्याची नेमणूक केली होती. त्या पहारेकऱ्याबरोबर मग दानीएलचे बोलणे झाले. 12 दानीएल त्याला म्हणाला, “आम्हाला खाण्यास फक्त भाज्या व पिण्यास पाणी दे. असे तू दहा दिवस करून बघ. 13 दहा दिवसानंतर तू जे तरुण राजाने दिलेले अन्न खातात, त्यांच्याबरोबर आमची तुलना करून, कोण जास्त सुदृढ दिसतात, ते तुझे तूच ठरव. मग आम्हाला काय द्यायचे ह्याचा निर्णय तुझा तूच घे. आम्ही तुझे नोकर आहोत.”
14 तेव्हा पहारेकरी दानीएल, हनन्या, मीशाएल, व अजऱ्या व्या यांची चाचणी घ्यायला तयार झाला. 15 दहा दिवसानंतर पाहिले तर दानीएल व त्याच्या मित्रांची प्रकृती राजाचे पौष्टिक अन्न खाणाऱ्या इतर तरुणांपेक्षा निरोगी होती. 16 मग पहारेकऱ्याने, दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या ह्यांना राजाने दिलेल्या खास अन्नाऐवजी भाज्या देण्याचाच परिपाठ ठेवला.
17 देवाने ह्या चौघांना सुज्ञपणा व निरनिराव्व्या प्रकारचे साहित्य व विज्ञान शिकण्याची क्षमता दिली होती. दानीएलला तर सर्व प्रकारच्या दृष्टांन्ताबद्दल व स्वप्नांबद्दल समजू शके.
18 सर्व तरुणांनी तीन वर्षांत शिकून तयार व्हावे, अशी राजाची इच्छा होती. राजाने ठरवून दिलेल्या कालावधीनंतर म्हणजे तीन वर्षांनंतर अश्पनजने सर्व तरुणांना नबुखद्नेस्सर राजापुढे उभे केले. 19 राजा त्यांच्याशी बोलल्यावर, त्याच्या लक्षात आले की दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या ह्या चौघांएवढे कोणीही बुध्दिमान नाहीत. म्हणून ह्याच चौघांना राजाच्या पदरी ठेवले गेले. 20 जेव्हा जेव्हा राजाने त्यांना काही महत्वाचे विचारले, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचे ज्ञान व जाण दिसून आली. त्याच्या राज्यातील ज्ञानी माणसांपेक्षा वा मांत्रिकांपेक्षा हे दहापटीने हुशार आहेत, हे राजाच्या लक्षात आले. 21 म्हणून दानीएलला कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षापर्यंत राजाच्या पदरी ठेवून घेण्यात आले.
105 परमेश्वराला धन्यावाद द्या.
त्याच्या नावाचा धावा करा.
राष्ट्रांना तो करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगा.
2 परमेश्वराला गाणे गा; त्याची स्तुतिगीते गा.
तो ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल सांगा.
3 परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा.
तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा.
4 शक्तीसाठी परमेश्वराकडे जा.
मदतीसाठी नेहमी त्याच्याकडे जा.
5 तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्याची आठवण ठेवा त्याचे चमत्कार
आणि त्याचे शहाणपणाचे निर्णय याची आठवण ठेवा.
6 तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात.
तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात.
7 परमेश्वर आपला देव आहे.
परमेश्वर सर्व जगावर [a] राज्य करतो.
8 परमेश्वर देवाच्या कराराची सदैव आठवण ठेवा.
हजारो पिढ्या त्याच्या आज्ञांची आठवण ठेवा.
9 देवाने अब्राहामा बरोबर करार केला.
देवाने इसहाकाला वचन दिले.
10 नंतर त्याने याकोबासाठी नियम केला.
देवाने इस्राएल बरोबर करार केला.
तो सदैव राहील.
11 देव म्हणाला, “मी तुला कनानची जमीन देईन.
ती जमीन तुझ्या मालकीची होईल.”
12 अब्राहामाचे कुटुंब लहान होते, तेव्हा देवाने हे वचन दिले.
ते केवळ काही वेळ तिथे घालवणारे परके लोक होते.
13 ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात,
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करत होते.
14 पण देवाने लोकांना त्यांना वाईट वागणूक देऊ दिली नाही.
देवाने राजांना त्यांना दुख: न देण्याची ताकीद दिली.
15 देव म्हणाला, “मी निवडलेल्या माणसांना दुख: देऊ नका.
माझ्या संदेष्ट्यांचे काही वाईट करु नका.”
16 देवाने त्या देशात दुष्काळ आणला.
लोकांना खायला पुरेसे अन्न नव्हते.
17 पण देवाने योसेफ नावाच्या माणसाला त्यांच्या पुढे पाठवले.
योसेफ गुलामा सारखा विकला गेला.
18 त्यांनी योसेफाच्या पायाला दोर बांधले.
त्यांनी त्याच्या मानेभोवती लोखंडी कडे घातले.
19 योसेफाने सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्ष घडेपर्यंत तो गुलामच राहिला.
परमेश्वराच्या संदेशामुळे योसेफ बरोबर होता हे सिध्द् झाले.
20 तेव्हा मिसरच्या राजाने त्याला मोकळे सोडले.
राष्ट्रांच्या प्रमुखाने त्याला तुरुंगातून बाहेर काढले.
21 त्याने योसेफाला आपल्या घराचा मुख्य नेमले.
योसेफाने त्याच्या मालकीच्या सर्व वस्तूंची काळजी घेतली.
22 योसेफाने इतर प्रमुखांना सूचना दिल्या.
योसेफाने वृध्दांना शिकवले.
23 नंतर इस्राएल मिसरमध्ये आला.
याकोब हामच्या देशातच राहिला.
24 याकोबाचे कुटुंब खूप मोठे झाले.
ते त्यांच्या शत्रूंपेक्षा खूप बलवान झाले.
25 म्हणून मिसरचे लोक याकोबाच्या कुटुंबाचा द्वेष करु लागले.
त्यांनी त्याच्या गुलामांविरुध्द योजना आखल्या.
26 म्हणून देवाने त्याचा सेवक मोशे आणि
देवाने निवडलेला त्याचा याजक अहरोन यांना पाठविले.
27 देवाने मोशे आणि अहरोन यांचा हामच्या देशात
अनेक चमत्कार करण्यात उपयोग करुन घेतला.
28 देवाने अतिशय दाट काळोख पाठवला,
पण मिसरमधल्या लोकांनी त्याचे ऐकले नाही.
29 म्हणून देवाने पाण्याचे रक्तात रुपांतर केले
आणि सगळे मासे मेले.
30 त्यांचा देश बेडकांनी भरुन गेला.
राजाच्या शयनकक्षात देखील बेडूक होते.
31 देवाने आज्ञा केली आणि
माशा व चिलटे आली. ती सगळीकडे होती.
32 देवाने पावसाचे गारात रुपांतर केले.
सर्व देशांत विजा पडल्या.
33 देवाने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे नष्ट केली.
देवाने त्यांच्या देशातले प्रत्येक झाड नष्ट केले.
34 देवाने आज्ञा केली आणि टोळ व नाकतोडे आले.
ते संख्येने इतके होते की ते मोजता येत नव्हते.
35 टोळ व नाकतोड्यांनी देशातली सर्व झाडे खाऊन टाकली.
त्यांनी शेतातली सर्व पिके खाल्ली.
36 आणि नंतर देवाने त्यांच्या देशातल्या सर्व पहिल्या अपत्यांना ठार मारले.
देवाने त्यांच्या मोठ्या मुलांना मारले.
37 नंतर देवाने त्यांच्या माणसांना मिसरबाहेर काढले.
त्यांनी बरोबर सोने आणि चांदी आणली.
देवाचा कुठलाही माणूस ठेच लागून पडला नाही.
38 देवाचे लोक गेल्याचे पाहून मिसरला आनंद झाला.
कारण त्यांना देवाच्या लोकांची भीती वाटत होती.
39 देवाने ढग पांघरुणासारखे पसरले.
देवाने अग्नीच्या खांबाचा रात्री प्रकाशासाठी उपयोग केला.
40 लोकांनी अन्नाची मागणी केली आणि देवाने लावे आणले.
देवाने त्यांना स्वर्गातली भाकरी भरपूर दिली.
41 देवाने खडक फोडला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले.
वाळवटांत नदी वाहू लागली.
42 देवाला त्याच्या पवित्र वचनाची आठवण होती.
देवाला त्याचा सेवक अब्राहाम याला दिलेल्या वचनाची आठवण आली.
43 देवाने त्याच्या माणसांना मिसरमधून बाहेर आणले.
लोक आनंदाने नाचत बागडत, गाणी म्हणत बाहेर आले.
44 देवाने त्याच्या माणसांना इतर लोक राहात असलेला देश दिला.
देवाच्या माणसांना इतरांनी काम करुन मिळवलेल्या वस्तू मिळाल्या.
45 देवाने असे का केले?
त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची
शिकवण काळजीपूर्वक आचरावी म्हणून,
परमेश्वराची स्तुती करा.
2006 by World Bible Translation Center