M’Cheyne Bible Reading Plan
16 यानंतर परमेश्वर हनानीचा मुलगा येहू याच्याशी बोलला. हे बोलणे राजा बाशा याच्याविरुध्द होते. 2 “तुला मी मोठे केले. माझ्या इस्राएली लोकांचा नायक म्हणून तुला मी नेमले. पण तू यराबामच्या वाटेनेच गेलास. इस्राएलींच्या पापाला कारणीभूत झालास. त्यांच्या पातकांनी माझा क्रोध जागा झाला आहे. 3 तेव्हा बाशा, मी तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा नाश करणार आहे. नबाटाचा मुलगा यराबाम याच्या घराण्याचे केले तसेच मी तुझ्या बाबतीत करीन. 4 तुझ्या कुटुंबातील लोक नगरातल्या रस्त्यावर मरतील. कुत्री त्यांची प्रेते खातील. जे रानावनात मरतील ते पक्ष्यांचे भक्ष्य होतील.”
5 इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात बाशाच्या इतर पराक्रमांची हकीकत लिहीली आहे. 6 बाशाच्या मृत्यूनंतर तिरसा येथे त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा एला हा त्याच्यानंतर राज्य करु लागला.
7 तेव्हा परमेश्वराने येहू या संदेष्ट्याला संदेश दिला. हा संदेश बाशा आणि त्याचे कुटुंबीय यांच्या विरुध्द होता. बाशाने परमेश्वराविरुध्द बरीच पापे केली होती. त्याचा परमेश्वराला फार संताप आला होता. आधी यराबामच्या कुटुंबाने केले तेच बाशाने केले. बाशाने यराबामच्या कुळाचा संहार केला म्हणूनही परमेश्वराचा कोप झाला होता.
इस्राएलचा राजा एला
8 यहूदाचा राजा म्हणून आसाचे सव्विसावे वर्ष चालू असताना एला हा राजा झाला. एला हा बाशाचा मुलगा तिरसामध्ये त्याने दोन वर्षे राज्य केले.
9 जिम्री हा एला राजाचा अधिकारी होता. एलाच्या एकूण रथांपैकी अर्धे जिम्रीच्या ताब्यात होते. तरीही त्याने एलाविरुध्द कट केला. एला राजा तिरसा येथे अरसाच्या घरी मद्याच्या धुंदीत होता. अरसा हा तिरसा येथील महालावरचा मुख्य अधिकारी होता. 10 जिम्रीने सरळ घरात घुसून एला राजाला ठार केले. आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष होते. एलानंतर हा जिम्री इस्राएलचा राजा झाला.
इस्राएलचा राजा जिम्री
11 जिम्रीने राज्यावर आल्याबरोबर बाशाच्या घरातील सर्वांची हत्या केली. कोणालाही जिवंत ठेवले नाही. बाशाच्या मित्रांनाही त्याने ठार केले. 12 बाशाबद्दल येहू या संदेष्ट्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी उच्चारली त्याप्रमाणेच बाशाच्या घराण्याचा उच्छेद झाला 13 बाशा आणि त्याचा मुलगा एला यांच्या पापांमुळे हे झाले. त्यांनी स्वतः पापे केली आणि लोकांच्या पापांनाही ते कारण झाले. त्यांनी अनेक मूर्ती केल्यामुळे परमेश्वराचा कोप झाला.
14 इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात एलाच्या बाकीच्या गोष्टी आलेल्या आहेत.
15 आसाचे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष असताना जिम्री इस्राएलचा राजा झाला. जिम्रीने तिरसा येथे सात दिवस राज्य केले. त्याचे असे झाले, इस्राएलच्या सैन्याने पलिष्ट्यांच्या गिब्बथोन येथे तळ दिला होता. ते चढाई करण्याच्या तयारीत होते. 16 जिम्रीने राजाविरुध्द केलेल्या कारस्थानाची माहिती छावणीतल्या लोकांनी ऐकली. त्याने राजाचा वध केल्याचे त्यांना कळले. तेव्हा त्यांनी अम्री याला तिथल्या तिथे राजा केले. अम्री सेनापती होता. 17 तेव्हा अम्री आणि सर्व इस्राएली यांनी गिब्बथोन सोडून तिरसावर हल्ला केला. 18 नगर कब्जात घेतलेले जिम्रीने पाहिले. तेव्हा तो महालात घुसला आणि त्याने आग लावली. महाल आणि तो, दोघही आगीत भस्मसात झाले. 19 आपल्या पापांमुळेच तो मेला. परमेश्वराच्या दृष्टीने जे गैर ते त्याने केले. यानेही यराबामप्रमाणेच दुष्कृत्ये केली. इस्राएलच्या लोकांच्या पापांनाही यराबाम कारणीभूत झाला.
20 इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात जिम्रीच्या कारस्थानांची आणि बाकीच्या गोष्टींची माहिती आहे. एला राजाविरुध्द तो बंड करुन उठला तेव्हाची हकीकतही या पुस्तकात आहे.
इस्राएलचा राजा अम्री
21 इस्राएलच्या लोकांमध्ये दोन गट पडलेले होते. अर्धे लोक गिनथचा मुलगा तिब्री याच्या बाजूचे असून त्याला राजा करावे अशा मताचे होते. उरलेले अम्रीचे चाहते होते. 22 तिब्रीच्या बाजूला असलेल्या गटापेक्षा अम्रीला पाठिंबा देणाऱ्यांचा गट वरचढ होता. त्यामुळे तिब्री मारला गेला आणि अम्री राजा झाला. 23 यहूदाचा राजा आसा याला सत्तेवर आल्यावर एकतिसावे वर्ष चालू असताना अम्री इस्राएलचा राजा झाला. अम्रीने इस्राएलवर बारा वर्षे राज्य केले. त्यापैकी सहा वर्षे तो तिरसामध्ये होता. 24 त्याने शोमरोन टेकडी शेमर याच्याकडून सुमारे दीडशे पौंड चांदी देऊन विकत घेतली. या टेकडीवर त्याने नगर बांधले. शेमर या नावावरुनच त्याने नगराचे नाव शोमरोन ठेवले.
25 अम्रीच्या हातूनही परमेश्वराच्या दृष्टीने गैर गोष्टी घडल्या. आपल्या आधीच्या सर्व राजांपेक्षा हा वाईट होता. 26 नबाटाचा मुलगा यराबाम याने जी पापे केली तीच यानेही केली. यराबामने इस्राएल लोकांनाही पापे करायला लावली. त्यामुळे इस्राएलवर परमेश्वर देवाचा कोप ओढवला. दीडदमडीच्या दैवतांची त्याने पूजा केली म्हणून परमेश्वर संतापला.
27 अम्रीच्या इतर गोष्टी आणि त्याचे पराक्रम याची हकीकत इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात लिहिलेली आहे. 28 अम्री मरण पावल्यावर त्याचे शोमरोन येथे दफन झाले. त्याच्यानंतर त्याचा मुलगा अहाब हा राज्य करु लागला.
इस्राएलचा राजा अहाब
29 यहूदाचा राजा आसा याच्या काराकिर्दींच्या अडतिसाव्या वर्षी अम्रीचा मुलगा अहाब इस्राएलचा राजा झाला. शोमरोन या नगरातून त्याने इस्राएलवर बावीस वर्षे राज्य केले. 30 परमेश्वराने जे चुकीचे म्हणून सांगितले होते, ते सर्व अहाबने केले. आपल्या आधीच्या राजांपेक्षाही हा दुर्वर्तनी होता. 31 नबाटाचा मुलगा यराबाम याने केले ते तर अहाबने केलेच, पण ते पुरेसे वाटले नाही म्हणून की काय त्याने आणखी ही दुष्कृत्ये केली. एथबाल याची मुलगी ईजबेल हिच्याशी त्याने लग्न केले. एथबाल हा सिदोन्यांचा राजा होता. त्यानंतर अहाब बाल या दैवताच्या भजनी लागला. 32 शोमरोन येथे त्याने बालच्या पूजेसाठी देऊळ बांधले. वेदीही बांधली. 33 अशेराच्या पूजेसाठी स्तंभ उभारला. आपल्या आधींच्या राजापेक्षा याच्यावर इस्राएलच्या परमेश्वर देवाचा कोप जास्त झाला.
34 याच काळात बेथेलच्या हिएलने यरीहो नगर पुन्हा बांधले. हे काम त्याने सुरु केले तेव्हा त्याचा मोठा मुलगा अबीराम वारला. आणि नगराचे दरवाजे बांधून होत आले तेव्हा त्याचा सर्वात धाकटा मुलगा सगूब हा वारला. नूनचा मुलगा यहोशवा याच्यामार्फत परमेश्वराने जे भाकित केले त्यानुसार हे घडले. [a]
ख्रिस्तातील तुमचे नवे जीवन
3 म्हणून जसे तुम्हांला ख्रिस्ताबरोबर मेलेल्यामधून उठविले गेले आहे तर, स्वर्गातील म्हणजे ज्या वरील गोष्टी आहेत त्यासाठी प्रयत्न करा. जेथे ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे. 2 ज्या वरील (स्वर्गातील) गोष्टी आहेत त्याबद्दलचा विचार करा. ज्या गोष्टी पृथ्वीवरच्या आहेत त्यांचा विचार करु नका. 3 कारण तुम्ही मेलेले आहात आणि तुमचे नवे जीवन देवामध्ये ख्रिस्ताबरोबर लपलेले आहे. 4 जेव्हा ख्रिस्त. जो आमचे जीवन आहे. त्याच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेस प्रगट होईल. तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट व्हाल.
5 म्हणून तुमच्यामध्ये पृथ्वीतलावरील जे काही आहे ते सर्व जिवे मारा. जारकर्म, अशुद्धता, लोभ, दुष्ट इच्छा, अधाशीपणा, जी एक प्रकारची मूर्तिपूजा आहे. 6 कारण या गोष्टींमुळे देवाचा राग ओढवणार आहे. [a] 7 तुम्हीसुद्धा असेच जीवन जगत होता जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करीत होता.
8 पण आता, तुम्ही या सर्व गोष्टी बाजूला केल्या पाहिजेतः राग, क्रोध, दुष्टता, निंदा आणि तुमच्या मुखातील लज्जास्पद बोलणे, या सर्व गोष्टी तुम्ही दूर केल्याच पाहिजेत. 9 एकमेकाशी लबाडी करु नका. कारण तुम्ही जुना मनुष्य त्याच्या कृतीसह काढून टाकला आहे. 10 आणि तुम्ही नवीन मनुष्य धारण केला आहे. हे नवे रुप त्याच्या निर्माणकर्त्याच्या प्रतिमेप्रमाणे सतत नवे होत जाते. यासाठी की या नव्या मनुष्याला देवाचे पूर्ण ज्ञान मिळावे. 11 परिणाम म्हणून यहूदी व विदेशी असा कोणताही फरक नाही. एखाद्याची सुंता झालेला किंवा एखाद्याची सुंता न झालेला, बेताल, व असंस्कृत, गुलाम आणि स्वतंत्र मनुष्य असा कोणताही फरक नाही, पण ख्रिस्त हाच सर्व काही आहे आणि तो सर्व विश्वासणाऱ्यात आहे.
12 म्हणून, जसे देवाचे निवडलेले लोक जे पवित्र आहेत, तसे करुणा, दयाळूपणा, नम्रता, सौम्यता, आणि धीर हे परिधान करावे. 13 एकमेकांचे सहन करा. जशी प्रभुने तुम्हांला क्षमा केली तशी एखाद्याविरुद्ध तक्रार असेल तर एकमेकांना क्षमा करा. 14 या सर्वांवर प्रीतिचे वस्त्र परिधान करा. जे त्या सर्वांना एकत्र ठेवते आणि त्यांना परिपूर्ण करते. 15 आणि ख्रिस्ताची शांति जिच्यासाठी तुम्ही जे एका देहातील लोक त्या तुम्हांला बोलाविले होते ती तुमच्या अंतःकरणावर राज्य करो आणि नेहमी उपकार मानणारे व्हा.
16 ख्रिस्ताचा संदेश तुमच्यामध्ये त्याच्या सर्व वैभवाने राहावा. एकमेकांना महान असा शहाणपणाने शिकवा व बोध करा. स्तोत्रे, व गीते गा, आणि आध्यात्मिक गीते गाऊन उपकारस्तुतीसह आपल्या अंतःकरणात देवाला गीते गा. 17 आणि प्रत्येक गोष्ट जी तुम्ही बोलता किंवा करता ते प्रभु येशूच्या नावात करावे. यामुळे तुम्ही देवपित्याचे त्याच्याद्धारे आभार मानता.
लोकांबरोबर तुमचे जीवन
18 पत्नींनो, जसे प्रभूमध्ये योग्य आहे तसे तुम्ही आपल्या पतींच्या अधीन राहा.
19 पतींनो, आपल्या पत्नीवर प्रेम करा आणि त्यांच्याबरोबर कठीणतेने वागू नका.
20 मुलांनो, सर्व गोष्टीत आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा. कारण प्रभूच्या अनुयायांचे असे वागणे देवाला आनंद देणारे आहे.
21 वडिलांनो, आपल्या मुलाला चिडवू नका, म्हणजे ते निराश होणार नाहीत.
22 गुलामांनो, तुमच्या जगिक मालकाच्या सर्व आज्ञा पाळा आणि मनुष्याला संतोषविणाऱ्या, डोळ्यांनी देखरेख करण्यासाठी नव्हे तर त्याऐवजी पूर्ण मनाने प्रभूला भिऊन आज्ञा पाळा. कारण तुम्ही प्रभूचा आदर करता. 23 तुमच्या अंतःकरणापासून काम करा. जणू काय तुम्ही प्रभूसाठी काम करीत आहात, मनुष्यांसाठी नव्हे असे काम करा. 24 लक्षात ठेवा, प्रभू तुम्हांला तुमच्या स्वर्गीय वारशाचे बक्षीस देईल. ख्रिस्त जो तुमचा खरा धनी त्याची सेवा करीत राहा. 25 कारणे जो कोणी वाईट करतो, त्याचेसुद्धा तसेच होईल. देव असेच वागवील कारण त्याच्याकडे पक्षपात नाही.
राजा आणि सण
46 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “आंतल्या अंगणाचे पूर्वेकडचे दार कामाच्या सहा दिवसांत बंद असेल. पण शब्बाथ व अमावस्या ह्या दिवशी ते उघडले जाईल. 2 राजा, त्या दाराच्या द्वारमंडपापासून आता जाऊन दाराच्या खांबाशी उभा राहील. मग याजक त्याच्यासाठी होमार्मण व शांत्यर्पण करील. राजा दाराच्या उंबऱ्यात उपासना करील मग तो बाहेर जाईल. पण दार संध्याकाळशिवाय बंद होणार नाही. 3 देशातील लोकही शब्बाथ व नवचंद्रदिनी ह्या दोन दिवशी दारातूनच परमेश्वराची उपासना करतील.
4 “शब्बाथच्या दिवशी राजा होमार्पण करील. त्याने सहा निर्दोष कोकरे व निर्दोष मेंढा हे दिलेच पाहिजेत. 5 त्याने मेंढ्याबरोबर एक एफ (1/2 बुशेल) धान्य दिले पाहिजे. कोकरांबरोबर त्याने शक्य असेल तेवढे धान्य द्यावे. प्रत्येक एक एक (1/2 बुशेल) धान्याबरोबर त्याने 1 हीन (1 गॅलन) तेल दिले पाहिजे.
6 “नवचंद्रदिनी पहिल्या दिवशी त्याने एक निर्दोष गोऱ्हा दिला पाहिजे. तसेच त्याने सहा निर्दोष कोकरे व एक निर्दोष मेंढा द्यावा. 7 त्याने बैल व मेंढा ह्यांच्याबरोबर प्रत्येकी एक एफ (1/2 बुशेल) धान्य द्यावे. कोकरांबरोबर त्याने, त्याला शक्य असेल तेवढे धान्य द्यावे. मात्र प्रत्येक एफ बोरबर (1/2 बुशेल बरोबर) 1 हीन (गॅलन) तेल द्यावे.
8 “राजाने पूर्वद्वाराच्या द्वारमंडपापासून मंदिरात ये-जा केली पाहिजे.
9 “खास सणांच्या वेळी देशातील लोक परमेश्वरापाशी येतील. त्यावेळी उत्तरेकडच्या दारातून आत आलेल्याने दक्षिणेकडील दारातून बाहेर जावे व दक्षिणेकडच्या दारातून आत आलेल्याने उत्तरेच्या दारातून बाहेर जावे. कोणीही आलेल्या दारानेच बाहेर जाऊ नये. प्रत्येकाने सरळ दिशेनेच गेले पाहिजे. 10 जेव्हा लोक आत जातील, तेव्हा राजा आता जाईल व जेव्हा लोक बाहेर येतील, तेव्हा राजा बाहेर येईल.
11 “सणांच्या आणि विशेष सभांच्या वेळी, गोह्याबरोबर 1 एफ (1/2 बुशेल) धान्य दिलेच पाहिजे. तसेच प्रत्येक मेंढ्याबरोबरही 1 एफ (1/2 बुशेल) धान्य द्यायला हवे. कोकराबरोबर राजाने इच्छेप्रमाणे द्यावे मात्र 1 एफ (1/2 बुशेल) धान्याबरोबर 1 हीन (1 गॅलन) तेल दिलेच पाहिजे.
12 “जेव्हा राजा स्वसंतोष अर्पण परमेश्वरासाठी करील (कदाचित् ते होमार्पण असेल वा कदाचित् शांत्यर्पण असेल किंवा स्वसंतोषदर्शक असेल.) तेव्हा पूर्वेचे दार त्याच्यासाठी उघडले जाईल. मग शब्बाथच्या दिवसाप्रमाणे तो अर्पण करील. तो जाताच, दार लावून घेण्यात येईल.
प्रतिदिवसाची अर्पणे
13 “परमेश्वराला होमार्पण म्हणून रोज तुम्ही एक वर्षांचे निर्दोष कोकरु द्यावे, रोज सकाळी ते द्यावे. 14 आणखी रोज सकाळी कोकराबरोबर तुम्ही धान्यार्पण अर्पण करावे, तुम्ही त्यासाठी 1/6 एफ (14 वाडगे) पीठ व हे पीठ चांगले भिजण्यासाठी 1/3 हीन (1 गॅलन) तेल द्यावे. हे परमेश्वरासाठी रोज करावयाचे धान्यार्पण असेल. 15 होमार्पणासाठी लोक कोकरु, धान्यार्पण व तेल रोज सकाळी कायम देतील.”
राजाच्या वारसाहक्कासंबंधी नियम
16 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “जर राजाने आपल्या मालकीच्या जमिनीचा भाग, भेट म्हणून आपल्या एखाद्या मुलाला दिला, तर तो त्या मुलाच्या मालकीचा होईल. ती त्याची मालमत्ता होईल. 17 पण राजाने आपल्या मालकीच्या जमिनीचा काही भाग, आपल्या एखाद्या गुलामाला दिला, तर स्वातंत्र्याच्या वर्षापर्यंत [a] तो त्या गुलामाचा होईल. व त्यानंतर तो राजाला परत मिळेल. फक्त राजाची मुलेच राजाकडून मिळालेला भेट ठेवू शकतील. 18 राजा कोणाही माणसाची जमीन घेणार नाही अथवा कोणालाही सक्तीने जमीन सोडायला लावणार नाही. त्याने आपल्या मालकीच्या जमिनीचा काही भाग आपल्या मुलांना दिला पाहिजे. म्हणजे माझ्या लोकांना सक्तीने जमीन सोडावी लागणार नाही.”
खास स्वयंपाकघरे
19 मग त्या माणसाने मला दाराच्या जवळून पलीकडे नेले. उत्तरेकडे असलेल्या याजकाच्या पवित्र खोल्याकडे त्याने मला नेले. तेथे अगदी पश्र्चिमेला जागा असलेली मला दिसली. 20 तो माणूस मला म्हणाला, “येथे याजक दोषार्पणे व पापार्पणे शिजवितील, धान्यार्पणे भाजतील. का? कारण मग त्यांना हा पदार्थ बाहेरच्या अंगणात नेण्याची जरुरी नाही. जेथे सामान्य लोक असतात, तेथे त्यांना ह्या पवित्र गोष्टी न्याव्या लागणार नाहीत.”
21 मग मला त्या माणसाने बाहेरच्या पटांगणात आणले. त्याने मला पटांगणाच्या चारी कोपऱ्यात नेले. प्रत्येक कोपऱ्यात एक छोटासा चौक होता. 22 चारी कोपऱ्यात लहान चौक होते. प्रत्येक चौक 40 हात (70 फूट) लांब व 30 हात (52 फूट 6 इंच) रुंद होता. चारी कोपरे सारख्या मापाचे होते. 23 चारी चौकांच्या भोवताली विटांची भिंत होती. त्या भिंतीत स्वयंपाकासाठी जागा केलेली होती. 24 तो माणूस मला म्हणाला, “ह्या येथे मंदिराचे सेवक लोकांकरिता बळी दिलेल्या प्राण्यांचा पदार्थ शिजवितील.”
दु:खी माणसाची प्रार्थना तो अगदी दुबळा असतो आणि त्याला त्याची कैफियत परमेश्वरासमोर मांडायची असते तेव्हाचे स्तोत्र.
102 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक आणि
माझ्या मदतीसाठी मारलेल्या हाकेकडे लक्ष दे.
2 परमेश्वरा, मी संकटात असताना माझ्याकडे पाठ फिरवू नकोस.
माझ्याकडे लक्ष दे.
मी मदतीसाठी ओरडेन तेव्हा मला लगेच ओ दे.
3 माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे.
हळू हळू विझत चाललेल्या आगीप्रमाणे माझे आयुष्य आहे.
4 माझी शक्ती निघून गेली आहे.
मी वाळलेल्या, मरणाला टेकलेल्या गवताप्रमाणे आहे.
मी जेवण करण्याचे सुध्दा विसरलो.
5 माझ्या दुखामुळे माझे वजन कमी होत आहे.
6 मी वाळवंटात राहणाऱ्या घुबडाप्रमाणे एकाकी आहे.
जुन्या पडझड झालेल्या इमारतीतल्या घुबडाप्रमाणे मी एकाकी आहे.
7 मी झोपू शकत नाही.
मी छपरावर असलेल्या एकाकी पक्ष्याप्रमाणे आहे.
8 माझे शत्रू नेहमी माझा अपमान करतात.
ते माझी चेष्टा करतात आणि मला शाप देतात.
9 माझे अन्न हे माझे सर्वांत मोठे दु:ख आहे.
माझे अश्रू माझ्या पेयात पडतात.
10 का? कारण परमेश्वरा, तू माझ्यावर रागावला आहेस.
तू मला वर उचललेस पण नंतर मला दूर फेकून दिलेस.
11 दिवस अखेरीला पडणाऱ्या लांब सावल्यांप्रमाणे माझे आयुष्य आता जवळ जवळ संपत आले आहे.
मी वाळलेल्या आणि मरायला टेकलेल्या गवतासारखा आहे.
12 पण परमेश्वरा, तू सदैव असशील
तुझे नाव सदा सर्वकाळ राहील.
13 तू उंच जाशील आणि सियोन पर्वताचे सांत्वन करशील.
तू सियोनला दया दाखवण्याची वेळ आता आली आहे.
14 तुझ्या सेवकांना सियोनचे दगड आवडतात.
त्यांना त्या शहराची धूळपण आवडते.
15 लोक परमेश्वराच्या नावाची उपासना करतील.
देवा, पृथ्वीवरील सर्व राजे तुला मान देतील.
16 परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल लोक
पुन्हा त्याचे गौरव बघतील.
17 देवाने जिवंत ठेवलेल्या लोकांच्या प्रार्थनेला तो उत्तर देईल.
देव त्यांची प्रार्थना ऐकेल.
18 पुढील पिढीसाठी या गोष्टी लिहून ठेव
आणि पुढे ते लोक परमेश्वराची स्तुती करतील.
19 परमेश्वर त्या वरच्या पवित्र जागेतून खाली पाहील.
परमेश्वर स्वर्गातून खाली पृथ्वीकडे पाहील.
20 आणि तो कैद्यांची प्रार्थना ऐकेल.
ज्यांना मृत्युदंड झाला आहे त्यांना तो सोडवेल.
21 नंतर सियोनमधले लोक परमेश्वराबद्दल सांगतील.
ते यरुशलेममध्ये त्याच्या नावाची स्तुती करतील.
22 सगळी राष्ट्रे एकत्र येतील राज्ये
परमेश्वराची एकत्र सेवा करतील.
23 मला माझ्या शक्तीने दगा दिला.
माझे आयुष्य कमी झाले.
24 म्हणून मी म्हणालो, “मला तरुणपणी मरु देऊ नकोस.
देवा, तू कायमचाच जगणार आहेस!
25 तू खूप पूर्वी जग निर्माण केलेस.
तू तुझ्या हातांनी आकाश निर्माण केलेस.
26 जग आणि आकाश संपेल पण तू मात्र सदैव असशील.
ते कापडाप्रमाणे जीर्ण होतील आणि
कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील ते सगळे बदलले जातील.
27 पण देवा, तू मात्र कधीच बदलला जाणार नाहीस.
तू सर्वकाळ राहाशील.
28 आज आम्ही तुझे सेवक आहोत.
आमची मुले इथे राहातील
आणि त्यांचे वंशजसुध्दा तुझी उपासना करायला इथे असतील.”
2006 by World Bible Translation Center