Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 राजे 14

यराबामच्या मुलाचा मृत्यू

14 याच सुमारास यराबामचा मुलगा अबीया आजारी पडला. तेव्हा यराबाम आपल्या बायकोला म्हणाला, “तू शिलो येथे जाऊन तिथल्या अहीया या संदेष्ट्याला भेट. मी इस्राएलचा राजा होणार हे भाकित त्यानेच केले होते. तसेच वेष पालटून जा म्हणजे लोक तुला माझी पत्नी म्हणून ओळखणार नाहीत. संदेष्ट्याला तू दहा भाकरी, काहीगोड पुऱ्या आणि मधाचा बुधला दे. मग आपल्या मुलाबद्दल विचार. अहीया तुला काय ते सांगेल.”

मग राजाने सांगितल्यावरुन त्याची बायको शिलोला अहीया या संदेष्ट्याच्या घरी गेली. अहीया खूप वृध्द झाला होता आणि म्हातारपणामुळे त्याला अंधत्वही आले होते. पण परमेश्वराने त्याला सूचना केली, “यराबामची बायको आपल्या मुलाबद्दल विचारायला तुझ्याकडे येते आहे. तिचा मुलगा फार आजारी आहे.” मग अहीयाने तिला काय सांगायचे तेही परमेश्वराने त्याला सांगितले.

यराबामची बायको अहीयाच्या घरी आली. लोकांना कळू नये म्हणून तिने वेष पालटला होता. अहीयाला दारात तिची चाहूल लागली तेव्हा तो म्हणाला, “यराबामची बायको ना तू? आत ये आपण कोण ते लोकांनी ओळखू नये म्हणून का धडपड करतेस? मला एक वाईट गोष्ट तुझ्या कानावर घालायची आहे. परत जाशील तेव्हा इस्राएलचा परमेश्वर देव काय म्हणतो ते यराबामला सांग. परमेश्वर म्हणतो, ‘अरे यराबाम, इस्राएलच्या समस्त प्रजेतून मी तुझी निवड केली. तुझ्या हाती त्यांची सत्ता सोपवली. याआधी इस्राएलवर दावीदाच्या घराण्याचे राज्य होते. पण त्यांच्या हातून ते काढून घेऊन मी तुला राजा केले. पण माझा सेवक दावीद याच्यासारखा तू निघाला नाहीस, तो नेहमी माझ्या आज्ञेप्रमाणे वागत असे, मनःपूर्वक मलाच अनुसरत असे, मला मान्य असलेल्या गोष्टीच तो करी. पण तुझ्या हातून अनेक पातके घडली आहेत. तुझ्या आधीच्या कोणत्याही सत्ताधीशापेक्षा ती अधिक गंभीर आहेत. माझा मार्ग तू केव्हाच सोडून दिला आहेस. तू इतर देवदेवतांच्या मूर्ती केल्यास याचा मला खूप राग आला आहे. 10 तेव्हा यराबाम, तुझ्या घरात मी आता संकट निर्माण करीन. तुझ्या घरातील सर्व पुरुषांचा मी वध करीन. आगीत गवताची काडीही शिल्लक राहात नाही त्याप्रमाणे मी तुझ्या घराण्याचा समूळ उच्छेद करीन. 11 तुझ्या घरातल्या ज्याला गावात मरण येईल त्याला कुत्री खातील आणि शेतात, रानावनात मरणारा पक्ष्यांचे भक्ष्य होईल. परमेश्वर हे बोलला आहे.’”

12 अहीया संदेष्टा मग यराबामच्या बायकोशी बोलत राहीला. त्याने तिला सांगितले, “आता तू घरी परत जा. तू गावात शिरल्याबरोबर तुझा मुलगा मरणार आहे. 13 सर्व इस्राएल लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचे दफन करतील. ज्याचे रीतसर दफन होईल असा यराबामच्या घराण्याताला हा एवढाच कारण फक्त त्याच्यावरच इस्राएलचा देव परमेश्वर प्रसन्न आहे. 14 परमेश्वर इस्राएलवर नवीन राजा नेमील. तो यराबामच्या कुळाचा सर्वनाश करील. हे सगळे लौकरच घडेल. 15 मग परमेश्वर इस्राएलला चांगला तडाखा देईल. इस्राएल लोक त्याने भयभीत होतील. पाण्यातल्या गवतासारखे कापतील. इस्राएलच्या पूर्वजांना परमेश्वराने ही चांगली भूमी दिली. तिच्यातून या लोकांना उपटून परमेश्वर त्यांना युफ्राटिस नदीपलीकडे विखरुन टाकील. परमेश्वर आता त्यांच्यावर भयंकर संतापलेला आहे, म्हणून तो असे करील. अशेरा देवीचे स्तंभ त्यांनी उभारले याचा त्याला संताप आला. 16 आधी यराबामच्या हातून पाप घडले. मग त्याने इस्राएल लोकांना पापाला उद्युक्त केले. तेव्हा परमेश्वर त्यांना पराभूत करील.”

17 यराबामची बायको तिरसा येथे परतली. तिने घरात पाऊल टाकताक्षणीच तिचा मुलगा वारला. 18 सर्व इस्राएल लोकांना त्याच्या मृत्यूचे दु:ख झाले. त्यांनी त्याचे दफन केले. या गोष्टी परमेश्वराच्या भाकिताप्रमाणेच घडल्या. हे वर्तवण्यासाठी त्याने त्याचा सेवक अहीया या संदेष्ट्याची योजना केली होती.

19 राजा यराबामने आणखीही बऱ्याच गोष्टी केल्या लढाया केल्या, लोकांवर तो राज्य करत राहिला. इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात, त्याने जे जे केले त्याची नोंद आहे. 20 बावीस वर्षे तो राजा म्हणून सत्तेवर होता. नंतर तो मृत्यू पावला आणि आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा नादाब त्याच्यानंतर सत्तेवर आला.

21 शलमोनाचा मुलगा रहबाम यहूदाचा राजा झाला तेव्हा तो एक्के चाळीस वर्षाचा होता. यरुशलेममध्ये त्याने सतरा वर्षे राज्य केले. परमेश्वराने स्वतःच्या सन्मानासाठी या नगराची निवड केली होती. इस्राएलमधल्या इतर नगरांमधून त्याने हेच निवडले होते. रहबामच्या आईचे नाव नामा. ती अम्मोनी होती.

22 यहूदाच्या लोकांच्या हातूनही अपराध घडले आणि परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते त्यांनी केले. परमेश्वराचा कोप होईल अशा चुका त्यांच्या हातून होतच राहिल्या. त्यांच्या पूर्वजांच्या पापांपेक्षाही त्यांची पापे वाईट होती. 23 या लोकांनी उंचवट्यावरील देऊळे, दगडी स्मारके आणि स्तंभ उभारले. खोट्यानाट्या दैवतासाठी हे सारे होते. प्रत्येक टेकडीवर आणि हिरव्यागार वृक्षाखाली त्यांनी या गोष्टी बांधल्या.

24 परमेश्वराच्या पूजेचा एक भाग म्हणून लैंगिक उपभोगासाठी शरीरविक्रय करणारेही होते. अशी अनेक दुष्कृत्ये यहूदाच्या लोकांनी केली. या प्रदेशात याआधी जे लोक राहात असत तेही अशाच गोष्टी करत. म्हणून देवाने त्यांच्याकडून तो प्रदेश काढून घेऊन इस्राएलच्या लोकांना दिला होता.

25 रहबामच्या कारकिर्दीचे पाचवे वर्ष चालू असताना मिसरचा राजा शिशक याने यरुशलेमवर स्वारी केली. 26 त्याने परमेश्वराच्या मंदिरातील आणि महालातील खजिना लुटला. अरामचा राजा हददेजर याच्या सैनिकांकडून दावीदाने ज्या सोन्याच्या ढाली आणल्या होत्या त्याही त्याने पळवल्या. दावीदाने त्या यरुशलेममध्ये ठेवल्या होत्या. सोन्याच्या सगळ्या ढाली शिशकने नेल्या. 27 मग रहबामने त्यांच्या ऐवजी दुसऱ्या ढाली केल्या, पण या मात्र पितळी होत्या, सोन्याच्या नव्हत्या. महालाच्या दरवाजावर रखवाली करणाऱ्यांना त्याने त्या दिल्या. 28 राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा प्रत्येक वेळी हे शिपाई बरोबर असत. ते या ढाली वाहात आणि काम झाल्यावर त्या ढाली ते परत आपल्या ठाण्यात भिंतीवर लटकावून ठेवत.

29 यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात राजा रहबामच्या सर्व गोष्टींची नोंद आहे. 30 रहबाम यराबाम यांचे परस्परांत अखंड युध्द चाललेले होते.

31 रहबाम वारला आणि त्याचे आपल्या पूर्वजांबरोबर दफन झाले. दावीद नगरात त्याला पुरले. (याची आई नामा ती अम्मोनी होती) रहबामचा मुलगा अबीया नंतर राज्यावर आला.

कलस्सैकरांस 1

देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल आणि आमचा बंधु तीमथी याजकडून,

ख्रिस्तामध्ये आमचे जे विश्वासू बंधु आहेत, त्या कलस्सै येथील देवाच्या पवित्र लोकांना:

देव, आमचा पिता याजकडून तुम्हास कृपा व शांति असो.

आम्ही जेव्हा तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा आम्ही नेहमी देवाचे, जो आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता आहे त्याचे, आभार मानतो. कारण आम्ही ख्रिस्त येशूवरील तुमच्या विश्वासाविषयी आणि देवाच्या सर्व लोकांविषयी तुम्हाला वाटत असलेल्या प्रेमाविषयी ऐकले आहे. कारण स्वार्गमध्ये जी आशा तुमच्यासाठी राखून ठेवली आहे. तुम्ही पहिल्यांदा त्या आशेविषयी खऱ्या संदेशाद्वारे म्हणजेच सुवार्तेद्वारे ऐकले. जी सुवार्ता तुमच्याकडे आली आहे, संपूर्ण जगातून त्या सुवार्तेचे फळ मिळत आहे व ती वाढत आहे. ज्याप्रमाणे ती तुमच्यामध्येसुद्धा तशीच वाढत होती व फळ देत होती, ज्या दिवसापासून तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले व ती खरोखर काय आहे हे समजून घेतले तेव्हापासून ती कार्य करीत आहे. तुम्ही ते, आमचा सहसेवक एपफ्रास, जो आमच्या वतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे, त्याच्याकडून शिकून घेतले आहे. त्याने आम्हांला तुमचे प्रेम आत्म्यापासून आहे त्याविषयीही सांगितले.

या कारणासाठी, आम्हीसुद्धा तुमच्याविषयी ज्या दिवसापासून ऐकले, तेव्हापासून तुमच्यासाठी प्रार्थना करण्याचे थांबविले नाही. आम्ही प्रार्थना करीत आहोत की:

तुम्ही देवाच्या इच्छेच्या सर्व प्रकारच्या ज्ञानाने आणि आध्यात्मिक समंजसपणाने भरले जावे. 10 यासाठी की, त्याला योग्य असे तुम्ही चालावे. आणि सर्व बाबतीत त्याला आनंद द्यावा; आणि तुम्ही देवाच्या ज्ञानात वाढावे; 11 त्याच्या गौरवी सामर्थ्यात त्याच्या महान सामर्थ्यामुळे समर्थ बनण्यासाठी तुम्हांला सहनशीलता व धैर्य प्राप्त व्हावे.

12 आणि आनंदाने पित्याला धन्यवाद द्यावेत, ज्याने तुम्हांला प्रकाशात राहणाऱ्या देवाच्या लोकांचे जे वतन आहे त्यात वाटा मिळण्यासाठी पात्र केले. 13 देवाने अंधाराच्या अधिपत्यापासून आमची सुटका केली आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले. 14 पुत्राद्वारे आम्हांला आमच्या पापांची क्षमा मिळाली.

जेव्हा आम्ही खिस्ताकडे पाहतो तेव्हा आम्ही देवाला पाहतो

15 तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे
    आणि निर्माण केलेल्या
    सर्व गोष्टीत तो प्रथम आहे.
16 कारण स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व काही
    त्याच्या सामर्थ्याने निर्माण केले गेले.
    जे काही दृश्य आहे आणि जे काही अदृश्य आहे,
सिंहासने असोत किंवा सामर्थ्य असो, सत्ताधीश असोत किंवा अधिपती असोत
    सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण केले गेले.

17 सर्व गोष्टी निर्माण होण्याच्या अगोदरपासूनत तो अस्तित्वात आहे.
    सर्व गोष्टी त्याच्याद्वारे चालतात.
18 आणि तो शरीराचा म्हणजे मंडळीचा मस्तक आहे.
    तो प्रारंभ आहे, मृतांमधून पुनरुत्थान पावलेल्यांमध्ये तो प्रथम आहे.
यासाठी की प्रत्येक गोष्टीत
    त्याला प्रथम स्थान मिळावे.
19 कारण देवाने त्याच्या सर्व पूर्णतेत त्याच्यामध्ये राहण्याचे निवडले.
20     आणि ख्रिस्ताद्वारे सर्व गोर्ष्टींचा स्वतःशी म्हणजे त्या पृथ्वीवरील गोष्टी असोत,
    किंवा स्वार्गांतील गोष्टी असोत समेट करण्याचे ठरविले.
ख्रिस्ताने जे रक्त वधस्तंभावर सांडले त्याद्वारे देवाने शांति केली.

21 एके काळी तुम्ही परके होता आणि तुमच्या विचारांमुळे आणि तुमच्या दुष्ट कृत्यांमुळे तुम्ही देवाचे शत्रू होता. 22 परंतु आता, ख्रिस्ताच्या शरीरिक देहाने व त्याच्या मरणाने देवाने तुमचा त्याच्याशी समेट घडवून आणला आहे यासाठी की, त्याच्यासमोर पवित्र, निष्कलंक आणि दोषविरहीत असे सादर करावे. 23 तुम्ही तुमच्या विश्वासात दृढ व स्थिर असावे आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली आहे तिच्याद्वारे तुम्हांला दिलेल्या आशेपासून दूर जाऊ नये, ज्याचा मी पौल सेवक झालो.

मंडळीकरिता पौलाचे कार्य

24 आता, तुमच्यासाठी मला झालेल्या दु:खात मला आनंद वाटतो आणि माझ्या स्वतःच्या शरीरात मी ख्रिस्ताचे त्याच्या देहाचे म्हणजे मंडळीच्या वतीने ख्रिस्ताचे जे दु:ख कमी पडत आहे ते मी पूर्ण करीत आहे. 25 देवाच्या आज्ञेप्रमाणे मी एक त्यांच्यापैकी सेवक झालो. ती आज्ञा तुमचा फायदा व्हावा म्हणून दिली होती. ती म्हणजे देवाचा संदेश पूर्णपणे गाजवावा. 26 हा संदेश एक रहस्य आहे, जे अनेक युगांपासून आणि अनेक पिढ्यांपासून लपवून ठेवले होते. परंतु आता ते देवाने त्याच्या लोकांना माहीत करुन दिले आहे. 27 देवाला त्याच्या लोकांना माहीत करुन द्यायचे होते की, विदेशी लोकांमध्ये या वैभवी रहस्याची संपत्ती ख्रिस्त येशू जो तुम्हांमध्ये आहे आणि जो देवाच्या गौरवामध्ये सहभागी होण्याची आमची आशा आहे. 28 आम्ही त्याची घोषणा करतो. प्रत्येक व्यक्तीला सूचना देतो, व प्रत्येक व्यक्तीला शक्य ते ज्ञानाने शिकविण्याचा प्रयत्न करतो यासाठी की, आम्हांला प्रत्येक व्यक्ति ख्रिस्तामध्ये पूर्ण अशी देवाला सादर करता यावी. 29 या उद्देशाने मी झगडत आहे. ख्रिस्ताच्या शक्तीच्या उपयोगाने, जी माझ्यामध्ये सामर्थ्यशाली रीतीने कार्य करीत आहे.

यहेज्केल 44

बाहेरचे प्रवेशद्वार

44 नंतर त्या माणसाने मला परत, पूर्वेकडे तोंड असलेल्या, बाहेरच्या प्रवेशद्वारापाशी आणले. आम्ही प्रवेशद्वारा बाहेर होतो व ते बंद होते. परमेश्वर मला म्हणाला, “हे बंदच राहील. ते उघडणार नाही. ह्यामधून कोणीही प्रवेश करणार नाही. का? कारण इस्राएलच्या परमेश्वराने ह्यातून प्रवेश केला. म्हणून ते बंदच राहिले पाहिजे. लोकांचा राजा बंधुत्वदर्शक पदार्थ परमेश्वराबरोबर खाताना या प्रवेशद्वारात बसेल. प्रवेशद्वाराजवळच्या द्वारमंडपातून तो ये-जा करील.”

मंदिराचे पावित्र्य

मग त्या माणसाने मला उत्तरेकडच्या दारातून मंदिरासमोर आणले. मी पाहिले तर काय, परमेश्वराची प्रभा, परमेश्वराच्या मंदिरात, पसरत होती. मी जमिनीला डोके टेकवून नमस्कार केला. परमेश्वरा मला म्हणाला, “मानवपुत्रा, अगदी लक्षपूर्वक पाहा! तुझ्या डोळ्यांचा आणि कानांचा वापर कर. ह्या गोष्टी पाहा आणि परमेश्वराच्या मंदिराच्या विधिनियमाबाबत मी जे सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. मंदिराचे प्रवेश-मार्ग व पवित्र जागेचे बाहेर जाण्याचे मार्ग काळजीपूर्वक पाहा. मग माझे म्हणणे ऐकण्याचे नाकारणाऱ्या इस्राएलच्या सर्व लोकांना पुढील संदेश दे. त्यांना सांग. की परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: ‘इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही केलेल्या भयंकर गोष्टी मला अति झाल्या आहेत. ज्यांची खरोखरच सुंता झालेली नाही, जे पूर्णपणे माझे झाले नाहीत, अशा परक्यांना तुम्ही माझ्या मंदिरात आणले. अशा रीतीने तुम्ही माझे मंदिर अमंगळ केले. तुम्ही आपला करार मोडला, भयंकर कृत्ये केली आणि मला भाकरी, चरबी आणि रक्ताचे अर्पण केले पण ह्यामुळे माझे मंदिर अशुद्ध, अमंगळ झाले. माझ्या पवित्र वस्तूंची तुम्ही काळजी घेतली नाही. माझ्या पवित्र जागेची जबाबदारी तुम्ही परक्यांवर टाकली.’”

परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “कोणीही खरोखरीची सुंता न झालेला परका जरी तो कायमचा इस्राएल लोकांच्यात राहत असला तरी-माझ्या मंदिरात येता कामा नये. मंदिरात येण्याआधी त्यांची सुंता केली गेलीच पाहिजे, व त्याने संपूर्णपणे मला वाहून घेतले पाहिजे. 10 भूतकाळात, इस्राएलने जेव्हा माझ्याकडे पाठ फिरवीली, तेव्हा लेवींनी मला सोडले. आपल्या मूर्तीना अनुसरण्यासाठी, इस्राएलने माझा त्याग केला. लेवींच्या पापाबद्दल लेवींना शिक्षा होईल. 11 माझ्या पवित्र जागेची सेवा करण्यासाठी लेवींची निवड केली गेली होती. ते मंदिराच्या प्रवेशद्वारांचे रक्षण करीत, मंदिरात सेवा करीत. बळी देण्यासाठी लोकांनी आणलेल्या प्राण्यांचा ते बळी देत व लोकांसाठी होमार्पणे करीत. लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी त्यांची निवड केली गेली होती. 12 पण त्या लेवींनी माझ्याविरुध्द पाप करण्यात आणि त्यांच्या मूर्तींची पूजा करण्यात लोकांना मदत केली. म्हणून मी ‘त्यांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा होईल. असे वचन देतो.’” परमेश्वर, माझा प्रभू, हे म्हणाला.

13 “म्हणून याजकाप्रमाणे, लेवी मला अर्पण करण्यास काही आणणार नाहीत. ते माझ्या ‘पवित्र’ किंवा ‘अती पवित्र’ गोष्टींच्या जवळ येणार नाहीत. त्यांनी केलेल्या भयंकर कृत्यांचा काळिमा त्यांना वाहवा लागले. 14 पण मी त्यांना मंदिराची काळजी घेऊ देईन. ते मंदिरातील आवश्यक ती कामे करतील.

15 “सर्व याजक लेवी-वंशाचे आहेत. पण जेव्हा इस्राएलचे लोक माझ्या विरोधात गेले, तेव्हा फक्त सादोकच्या घराण्यातील लोकांनी माझ्या पवित्र जागेची काळजी घेतली. म्हणून फक्त सादोकचे वंशजच मला अर्पण करण्याच्या वस्तू माझ्याकडे घेऊन येतील. बळी दिलेल्या प्राण्यांची चरबी व रक्त मला वाहण्यासाठी तेच फक्त माझ्यापुढे उभे राहतील.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या. 16 “ते माझ्या पवित्र जागेत प्रवेश करतील. ते माझी सेवा करण्यासाठी माझ्या टेबलाजवळ येतील. मी त्यांना दिलेल्या गोष्टींची ते काळजी घेतील. 17 ते आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारातून आत आले की तागाची वस्त्रे घालतील. आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारात काम करताना अथवा मंदिरात सेवा करताना ते लोकरीची वस्त्रे वापरणार नाहीत. 18 ते तागाचे फेटे बांधतील. त्यांची अंतर्वस्त्रेही तागाची असतील. ज्यामुळे घाम येईल अशा प्रकारची कोणतीही वस्त्रे ते घालणार नाहीत. 19 माझी सेवा करताना घातलेली वस्त्रे, बाहेरच्या पटांगणात लोकांमध्ये जाण्यापूर्वी ते उतरवून ठेवतील ते ही वस्त्रे पवित्र खोल्यांत ठेवतील. मग ते दुसरे कपडे घालतील. अशा प्रकारे ते त्या पवित्र वस्त्रांना लोकांना शिवू देणार नाहीत.

20 “हे याजक मुंडन करणार नाहीत वा केस लांब वाढविणार नाहीत तेव्हा ते फक्त आपले केस कातरुन बारीक करतील. 21 आतल्या अंगणात जाताना याजकाने द्राक्षरस पिऊ नये. 22 कोणत्याही याजकाने विधवेशी वा घटस्फोटितेशी लग्न करु नये. त्यांनी इस्राएली कुमारिकेशी लग्न करावे. अथवा याजकाच्या विधवेशी लग्न केले तरी चालेल.

23 “तसेच याजाक लोकांना पवित्र व सामान्य ह्यातील भेद शिकवितील. ते लोकांना शुद्ध व अशुद्ध ह्यातील फरक समजवण्यास मदत करतील. 24 याजक न्यायालयाचे न्यायाधीश असतील. लोकांना न्याय देताना ते माझे कायदे पाळतील. ते माझ्या विशेष सणांचे विधिनियम पाळतील, माझ्या खास सुट्ट्यांच्या दिवसांचा मान आणि पावित्र्य राखतील. 25 मृताच्या जवळ जाऊन ते अशुध्द होणार नाहीत, पण मृत व्यक्ती जर याजकाची स्वतःची वडील, आई, मुलगा, मुलगी, भाऊ अथवा अविवाहित बहीण असेल, तर मात्र मृताजवळ गेले व अशुध्द झाले तरी चालेल. 26 याजकाला शुद्ध केल्यावर, त्याने सात दिवस थांबले पाहिजे. 27 मग तो पवित्र जागी जाऊ शकतो. पण ज्या दिवशी तो पवित्र जागेची सेवा करण्यासाठी आतल्या अंगणात जाईल, तेव्हा त्याने स्वतःसाठी पापार्पण करावे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

28 “लेवींच्या मालकीच्या जमिनीबद्दल: मी त्यांची मालमत्ता आहे. त्यांना इस्राएलमध्ये तुम्ही काहीही मालमत्ता (जमीन) देऊ नका. मी त्यांचा इस्राएलमधील वाटा आहे. 29 त्यांना धान्यार्पणे, दोषार्पणे, पापार्पणे खायला मिळतील. इस्राएलच्या लोकांनी परमेश्वराला अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट त्यांची असेल. 30 प्रत्येक पिकाच्या बहराचा पहिला भाग याजकाचा असेल. मळलेल्या पिठाचा पहिला भागसुद्धा तुम्ही याजकाला द्यावा. त्यामुळे तुमच्या घराला आशिर्वाद मिळतील. 31 आपोआप मेलेला व हिंस्र श्र्वापदांनी मारुन फाडलेला कोणताही प्राणी वा पक्षी याजकानी खाऊ नये.

स्तोत्रसंहिता 97-98

97 परमेश्वर राज्य करतो आणि पृथ्वी आनंदित होते.
    दूरदूरचे प्रदेश आनंदित होतात.
परमेश्वराच्या भोवती दाट काळे ढग आहेत.
    चांगुलपणा आणि न्याय त्याच्या राज्याला मजबुती आणतात.
अग्नी परमेश्वराच्या पुढे जातो
    आणि शत्रूंचा नाश करतो.
त्याची वीज आकाशात चमकते.
    लोक ती बघतात आणि घाबरतात.
परमेश्वरा समोर पर्वत मेणासारखे वितळतात.
    ते पृथ्वीच्या मालकासमोर वितळतात.

आकाशांनो, त्याच्या चांगुलपणा विषयी सांगा
    प्रत्येक माणसाला देवाचे वैभव बघू द्या.
लोक त्यांच्या मूर्तीची पूजा करतात.
    ते त्यांच्या “देवाला” नावजतात.
परंतु त्या लोकांना लाज वाटेल.
    त्यांचे “देव” परमेश्वरापुढे झुकतील आणि त्याची प्रार्थना करतील.
सियोन ऐक आणि आनंदी हो यहुदाच्या शहरांनो, आनंदी व्हा का?
    कारण परमेश्वर योग्य निर्णय घेतो.
परात्पर परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीचा राजा आहेस.
    तू इतर “देवापेक्षा” खूपच चांगला आहेस.
10 जे लोक परमेश्वरावर प्रेम करतात त्यांना वाईट गोष्टी आवडत नाहीत म्हणून देव त्याच्या लोकांना वाचवतो.
    देव त्याच्या भक्तांना दुष्टांपासून वाचवतो.
11 चांगल्या लोकांवर प्रकाश
    आणि सुख चमकते.
12 चांगल्या माणसांनो, परमेश्वरात आनंदी व्हा.
    त्याच्या पवित्र नावाला मान द्या.

स्तुतिगान

98 परमेश्वराने नवीन आणि अद्भुत गोष्टी केल्या
    म्हणून त्याच्यासाठी नवीन गाणे गा.
त्याच्या पवित्र उजव्या बाहूने
    त्याच्याकडे विजय परत आणला.
परमेश्वराने राष्ट्रांना त्याची उध्दाराची शक्ती दाखवली.
    परमेश्वराने त्यांना त्याचा चांगुलपणा दाखवला.
त्याच्या भक्तांना इस्राएलाच्या लोकांशी असलेला देवाचा प्रामाणिकपणा आठवला.
    दूरच्या प्रदेशातील लोकांना देवाची वाचवण्याची शक्ती दिसली.
पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसा, परमेश्वराचा जयजयकार कर.
    त्वरेने त्याचे गुणवर्णन करायला सुरुवात कर.
वीणे, परमेश्वराची स्तुती करा.
    वीणेच्या झंकारांनो, त्याची स्तुती करा.
कर्णे आणि शिंग वाजवून आपल्या राजाचे,
    परमेश्वराचे गुणवर्णन करा.
समुद्र, पृथ्वी आणि त्यावरील सर्व वस्तूंना
    जोर जोरात गाऊ द्या.
नद्यांनो, टाळ्या वाजवा पर्वतांनो,
    सगळ्यांनी बरोबर गाणे गा.
परमेश्वरासमोर गा.
    कारण तो जगावर राज्य करायला येत आहे.
तो जगावर न्यायाने राज्य करेल,
    तो लोकांवर चांगुलपणाने राज्य करेल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center