Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 राजे 11

शलमोन आणि त्याचा जनानखाना

11 स्त्रियांबद्दल शलमोनाला आकर्षण होते. इस्राएल देशाच्या बाहेरच्याही अनेक स्त्रिया त्याच्या आवडत्या होत्या. फारोच्या मुलीखेरीज, हिती, मवाबी, अम्मोनी, अदोमी, सिदोनी अशा परक्या देशातील स्त्रियांनाही त्याने आपलेसे केले. परमेश्वराने पूर्वीच इस्राएल लोकांना सांगितले होते “परक्या देशातील लोकांशी विवाह संबंध ठेवू नका. तसे केलेत तर ते तुम्हाला त्यांच्या दैवतांच्या भजनी लावतील.” असे असूनही शलमोन या बायकांच्या प्रेमात पडला. त्याला सातशे बायका होत्या. (त्या सर्व इतर देशांच्या प्रमुखांच्या मुली होत्या) उपपत्नी म्हणून त्याला आणखी तीनशे दासीही होत्या. ह्या बायकांनी त्याला देवापासून दूर जाण्यास भाग पाडले. तो वृध्द झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याला इतर दैवतांकडे वळवले. आपले वडील दावीद याच्या प्रमाणे शलमोन परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला नाही. सिदोनी लोकांच्या अष्टोरेथ देवाची त्याने पूजा केली. तसेच अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिलकोम यालाही त्याने भजले. अशाप्रकारे त्याने परमेश्वराचा अपराध केला. आपले वडील दावीद यांच्याप्रमाणे तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला नाही.

कमोश या मवाबी लोकांच्या भंयकर दैवताच्या पूजेसाठी शलमोनाने एक पूजास्थळ बांधले. हे यरुशलेम नजीकच्या टेकडीवर होते. त्याच टेकडीवर मोलख या अम्मोनी लोकांच्या भयंकर दैवतासाठीही एक स्थळ केले. आपल्या इतर, प्रत्येक देशातल्या बायकांसाठीही त्याने अशीच सोय केली. त्या आपापल्या ठिकाणी धूप जाळत आणि आपापल्या दैवतांसाठी यज्ञ करत.

इस्राएलचा देव परमेश्वर याच्यापासून शलमोन परावृत्त झाला. तेव्हा परमेश्वराचा शलमोनावर कोप झाला. परमेश्वराने शलमोनाला दोनदा दर्शन दिले होते. 10 इतर दैवतांच्या मागे त्याने जाऊ नये असे बजावले होते. पण शलमोनाने परमेश्वराच्या या आज्ञेचे उल्लंघन केले. 11 तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तू आपण होऊन आपल्या कराराचा भंग केला आहेस. माझी आज्ञा तू पाळली नाहीस. तेव्हा तुझ्या कडून राज्य हिसकावून घेण्याची मी प्रतिज्ञा करतो. तुझ्या एखाद्या सेवकाला मी ते देईन. 12 पण तुझे वडील दावीद यांच्यावर माझे प्रेम होते. त्याखातर तू हयात असेपर्यंत मी तुलाच राज्यावर ठेवीन तुझा मुलगा गादीवर बसेपर्यंत वाट पाहीन. मग त्याच्याकडून ते घेईन. 13 तरी सगळेच राज्य हिसकावून घेणार नाही. एकाच घराण्यावर त्याची सत्ता ठेवीन. दावीदासाठी मी एवढे करीन. तो माझा आवडता सेवक होता. तसेच यरुशलेमसाठी मला एवढे केले पाहिजे कारण ते नगर मी निवडले आहे.”

शलमोनाचे शत्रू

14 आणि मग परमेश्वराने अदोममधल्या हदादला शलमोनाचा शत्रू केले. हदाद अदोमच्या राजघराण्यातला होता. 15 त्याचे असे झाले दावीदाने पूर्वी अदोमचा पराभव केला होता. यवाब तेव्हा दावीदाचा सेनापती होता. तो अदोम येथे मृतांचे दफन करायला गेला. त्याने सर्वांची कत्तल केली होती. 16 यवाब आणि सर्व इस्राएल लोक यांनी अदोममध्ये सहा महिने मुक्काम केला. त्या काळात त्यांनी अदोममध्ये कुणाही पुरुषाला जिवंत ठेवले नाही. 17 हदाद त्यावेळी अगदी लहान होता. तेव्हा तो मिसर येथे पळून गेला. त्याच्या वडीलांचे काही सेवकही त्याच्याबरोबर गेले. 18 मिद्यानहून पुढे ते सर्व पारान येथे गेले. तिथे त्यांना आणखी काही जण येऊन मिळाले. मग हा सगळा जथा मिसरला गेला. मिसरचा राजा फारो याच्याकडे त्यांनी आश्रय घेतला. फारोने हदादला राहायला एक घर आणि थोडी जमीन देऊ केली. त्याच्या अन्नवस्त्राची सोय केली.

19 फारोची हदादवर मर्जी बसली. तेव्हा त्याने आपल्या मेहुणीशी त्याचे लग्नही लावून दिले. (तहपनेस ही राजाची राणी होती) 20 या तहपनेसच्या बहिणीचे हदादशी लग्न झाले. त्यांना गनुबथ नावाचा मुलगा झाला. राणी तहपनेसच्या संमतीने तो राजवाड्यात फारोच्या मुलां बरोबरच वाढला.

21 दावीदाच्या मृत्यूची खबर हदादने मिसरमध्ये ऐकली. सेनापती यवाब मरण पावल्याचेही त्याला कळले. तेव्हा हदाद राजा फारोला म्हणाला, “मला माझ्या मायदेशी परत जाऊ दे.”

22 तेव्हा फारो त्याला म्हणाला, “येथे तुला हवे ते सर्व काही मी दिले आहे. असे असताना तू परत का जातोस?”

तेव्हा हदादने पुन्हा जाऊ देण्याबद्दल विनंती केली.

23 देवाने शलमोनासाठी आणखी एक शत्रू निर्माण केला. तो म्हणजे रजोन. हा एल्यादाचा मुलगा. सोबाचा राजा हददेजर याचा रजोन हा सेवक होता. त्याच्याकडून तो पळाला. 24 दावीदाने सोबाच्या सैन्याचा पाडाव केल्यानंतर रजोनने काही माणसे जमवली आणि त्या टोळीचा तो नायक बनला. दिमिष्कामध्ये जाऊन मग तो राहिला. तिथला राजा झाला 25 अरामवर रजोनने राज्य केले. इस्राएलबद्दल त्याला चीड होती, तेव्हा शलमोनाच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याचे इस्राएलशी वैरच होते. हदाद आणि रजोन यांनी मिळून इस्राएलला बराच त्रास दिला.

26 नबाट याचा मुलगा यराबाम हा शलमोनाचा एक सेवक. हा एफ्राईम घराण्यातला असून सरेदा नगरातील होता. याच्या आईचे नाव सरुवा. त्याचे वडील वारले होते. हा यराबाम पुढे राजाच्या विरुध्द गेला.

27 त्याची कथा अशी. मिल्लोचे बांधकाम आणि दावीदनगराच्या तटबंदीला पडलेली खिंडारे बुजवण्याचे काम शलमोन करुन घेत होता. 28 यराबाम हा अंगापिडाने मजबूत होता. हा या कामाला चांगला असल्याचे शलमोनाने हेरले आणि त्याला योसेफ घराण्यातील कामगारांचा अधीक्षक म्हणून नेमले. 29 एकदा यराबाम यरुशलेमच्या बाहेर गेला होता. तेव्हा त्याला शिलो येथील अहीया नावाचा संदेष्टा वाटेत भेटला. अहीयाने नवीन अंगरखा घातला होता. या दोघांखेरीज तेव्हा त्या भागात आणखीकोणी नव्हते.

30 अहीयाने आपला अंगरखा काढला आणि त्याचे फाडून बारा तुकडे केले.

31 मग अहीया यराबामला म्हणाला, “यातले दहा तुकडे तू स्वतःजवळ ठेव. इस्राएलचा देव परमेश्वर याने सांगितले आहे ‘शलमोनाच्या हातातून राज्य काढून घेऊन त्यातील दहा वंशाचा अधिकार मी तुला देईन. 32 आणि दावीदाच्या घराण्यात फक्त एकाच वंशाची मालकी शिल्लक ठेवीन. माझा सेवक दावीद आणि हे यरुशलेम नगर यांच्या खातर मी एवढे करीन. इस्राएलच्या सर्व वंशांतून मी यरुशलेम नगराची निवड केली आहे. 33 शलमोनाने माझा त्याग केला म्हणून मी त्याच्याकडून राज्य काढून घेणार आहे. सिदोन्यांची देवी अष्टोरेथ, मवाबचा कमोश, अम्मोन्यांचा मिलकोम या खोट्यानाट्या दैवतांचे तो भजनपूजन करतो. जे योग्य आणि न्याय्य ते आता तो करत नाही. माझ्या आज्ञा आणि नियम तो पाळत नाही. त्याचे वडील दावीद ज्या पध्दतीने जगले तसे याचे नाही. 34 तेव्हा आता त्याच्या घराण्यातून मी सत्ता काढून घेत आहे. मात्र शलमोन जिवंत असेपर्यंत तोच गादीवर राहील. माझा सेवक दावीद याच्या लोभाखातर मी एवढे करीन. माझे सर्व नियम आणि आज्ञा दावीदने पाळल्या म्हणून मी त्याला निवडले. 35 पण त्याच्या मुलाच्या हातून मी राज्य काढून घेणार आहे आणि यराबाम, दहा घराण्यावरील सत्ता मी तुझ्या हाती सोपवीन. 36 शलमोनाच्या मुलाची एका वंशावरील सत्ता तशीच अबाधित ठेवीन. म्हणजे यरुशलेममध्ये माझा सेवक दावीद याचा वंशजच सतत राज्य करील. यरुशलेम हे नगर मी आपले स्वतःचे म्हणून निवडले. 37 बाकी तुला हवे तेथे तू राज्य करशील. सर्व इस्राएलवर तुझी सत्ता चालेल. 38 माझ्या आज्ञांचे पालन करत तू योग्य मार्गाने आयुष्य घालवलेस तर मी हे तुला देईन. दावीदाप्रमाणे माझ्या सर्व आज्ञा आणि नियम पाळलेस तर माझी तुला साथ असेल. दावीदा प्रमाणेच तुझ्याही घराण्याला मी राजघराणे करीन. इस्राएल तुला देईन. 39 शलमोनाच्या वर्तणुकीची शिक्षा मी त्याच्या मुलांना करीन. पण काही काळापुरती, सर्वकाळ नव्हे.’”

शलमोनाचा मृत्यू

40 शलमोनाने यराबामच्या वधाचा प्रयत्न केला. पण यराबामने मिसरला पलायन केले. मिसरचा राजा शिशक याच्याकडे तो गेला. शलमोनाच्या मृत्यूपर्यंत यराबाम तिथेच राहिला.

41 शलमोनाने सत्तेवर असताना बऱ्याच मोठमोठ्या आणि सुज्ञपणाच्या गोष्टी केल्या. शलमोनचा इतिहास या पुस्तकात त्या सर्व लिहिलेल्या आहेत. 42 यरुशलेममधून त्याने सर्व इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले 43 मग तो वारला तेव्हा त्याच्या पूर्वजांशेजारी दावीदनगरामध्ये त्याचे दफन करण्यात आले.

फिलिप्पैकरांस 2

संघटित व्हा आणि एकमेकांची काळजी घ्या

जर मग ख्रिस्तात तुमच्यामध्ये काही उत्तेजन आहे, जर तुमच्यामध्ये तुमच्या प्रीतितून वाढणारे सांत्वन आहे, जर तुमच्यामध्ये आत्म्यात काही भाग आहे, जर तुमच्यामध्ये जिव्हाळा व कळवळा आहे, तर मला पूर्णपणे आनंदी करा. मी सांगतो की, तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करता, एकमेकांविषयी सारखेच प्रेम आहे तर आत्म्यात एक व्हा, आणि एकच उद्देश असू द्या. हेवा किंवा पोकळ व्यर्थ अभिमानाने काहीही करु नका. उलट नम्रतेने एकमेकांना स्वतःपेक्षा चांगले माना. प्रत्येक व्यक्तीने केवळ आपलेच हित पाहू नये, तर प्रत्येकाने दुसऱ्यांचे हितसुद्धा पाहावे.

ख्रिस्ताकडून निस्वार्थी होण्याचे शिका

ख्रिस्त येशूच्या ठायी जे विचार होते तसेच तुमचेही असू द्या.

जरी तो देवाच्या स्वरुपाचा होता,
    तरी देवासारखे असणे हे संपत्ती राखून ठेवण्यासारखे मानले नाही.
उलट त्याने सर्व काही सोडून दोल,
    आणि त्याने गुलामाचे स्वरुप धारण केले आणि मनुष्याचे रुप धारण केले
व तो आपल्या दिसण्यात मनुष्यासारखा झाला.
    त्याने स्वतःला नम्र केले.
    आणि मरेपर्यंत तो आज्ञाधारक राहिला.
    होय, वधस्तंभावरच्या मरणापर्यंत तो नम्र झाला.
म्हणून देवाने सुद्धा त्याला अत्युच्च केले,
    व सर्व नावाहून जे नाव श्रष्ठ आहे ते त्याला दिले.
10 यासाठी की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे आहेत
    त्या सर्वांनी येशूच्या नावाच्या महिम्यासाठी गुडघे टेकावेत.
11 व प्रत्येक जिभेने जाहीर करावे की,
    “येशू खिस्त हा देव पिता आहे.”

देवाला पाहिजे तसे लोक व्हा

12 म्हणून माझ्या प्रियांनो, जसे तुम्ही मी प्रत्यक्ष असतानाच नव्हे तर आता दूर असतानासुद्धा आज्ञा पाळता तसे भीतीने कापत तुमचे तारण पूर्ण होण्यासाठी कार्य करीत राहा. 13 कारण देवच असा एक आहे जो तुमच्यामध्ये कार्य करण्याची इच्छा निर्माण करतो व तो संतुष्ट होईल अशा रीतीने कार्य पूर्णत्वास नेतो.

14 प्रत्येक गोष्ट तक्रार किंवा भांडण न करता करा, यासाठी की, 15 तुम्ही निर्दोष व शुद्ध असे या कुटिल व विपरीत पिढीतील लोकांमध्ये असावे. आणि त्यांच्यामध्ये अंधाऱ्या जगातील प्रकाशासारखे चमकावे. 16 तुम्ही त्यांना जीवनाचे वजन सांगत असता, माझे शर्यतीत धावणे व्यर्थ झाले नाही असे मला दिसते, यासाठी की ख्रिस्ताच्या परत येण्याच्या दिवशी मला तुमचा अभिमान वाटावा.

17 तुमच्या यज्ञार्पणासमवेत तसेच तुमच्या विश्वासाच्या सेवेसमवेत जरी मी अर्पिला गेलो तरी ते आनंदाने करतो आणि तुमच्या समवेत आनंदी बनतो. 18 त्याच प्रकारे, तुम्हीसुद्धा आनंदी असावे, आणि तुमच्या आनंदात मला सहभागी करावे.

तीमथ्यी व एपफ्रदीत यांच्याविषयी बातमी

19 पण मला आशा आहे, प्रभु येशूच्या साहाय्यने मी लवकरच तीमथ्यीला तुमच्याकडे पाठवीन यासाठी की, तुमच्याविषयीच्या बातमीने मला उत्तेजन मिळावे. 20 तोच एक आहे ज्याला पाठविण्याची माझी इच्छा आहे कारण माझ्यासारख्याच भावना असणारा दुसरा कोणी माझ्याजवळ नाही आणि त्याला तुमच्या कल्याणाची मनापासून कळकळ आहे. 21 सर्व जण त्यांच्या हिताकडेच लक्ष देतात व ख्रिस्ताच्या हिताकडे लक्ष देत नाहीत. 22 आणि तुम्हांला त्याचा स्वभाव माहीत आहे, सुवार्ता वाढविण्यासाठी जसे मुलगा पित्याची सेवा करतो तशी त्याने त्याच्या योग्यतेने माझ्याबरोबर सेवा केली आहे. 23 त्याला तुमच्याकडे पाठविण्याविषयी मी आशा करीत आहे. माझ्याबाबतीत काय होते ते कळताच त्याला तुमच्याकडे पाठविन. 24 आणि माझा असा विश्वास आहे की, देवाच्या साहाय्याने मला स्वतःलासुद्धा तुमच्याकडे येणे लवकरच शक्य होईल.

25 एपफ्रदीत, जो माझा बंधु आहे. सहकारी व सहशिपाई आहे, त्याला तुमच्याकडे पाठविण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटले, तसेच तो तुमचा प्रतिनिधी आहे जो माझ्या गरजेच्या वेळी मला साहाय्य करतो. मी असे करण्याचे ठरविले आहे कारण तो तुम्हा सर्वांना भेटण्यास आतुर झाला आहे. 26 मी त्याला पाठवितो कारण त्याला तुम्हांला फार भेटावेसे वाटते. तुम्ही तो आजरी असल्याचे जे ऐकले त्यामुळे त्याला काळजी वाटत आहे. 27 तो खरोखरच आजारी होता, अगदी मरणाला टेकला होता, पण देवाने त्याच्यावर करुणा केली; त्याच्यावरच केली असे नाही, तर माझ्यावरही केली; यासाठी की, मला आणखी दु:ख होऊ नये. 28 म्हणून, अधिक अधीरतेने, मी त्याला पाठवित आहे. यासाठी की जेव्हा तुम्ही त्याला पाहाल तेव्हा पुन्हा एकदा तुम्ही आनंदी व्हाल आणि मी निश्रिंत असेन. 29 म्हणून, प्रभूमध्ये त्याचे स्वागत करा आणि अशा लोकांचा सन्मान करा, कारण ख्रिस्ताच्या कामासाठी तो जवळजवळ मेला होता. 30 त्याने त्याचे जीवन धोक्यात घातले, यासाठी की, माझी सेवा करण्यात तुमच्या जी उणीव होती ती भरुन काढावी.

यहेज्केल 41

मंदिरातील पवित्रस्थान

41 त्या माणसाने मला मंदिराच्या पवित्र स्थानात आणले. त्यांने खोलीच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींचे मोजमाप घेतले. ते प्रत्येक बाजूला 6 हात (10 फूट 6 इंच) जाड होते. दार 10 हात (17 फूट 6 इंच) रुंद होते. दाराच्या बाजू, प्रत्येक बाजूला, 5 हात (8 फूट 9 इंच) होती. त्या माणसाने ती खोली मापली. ती 40 हात (70 फूट) लांब व 20 हात (35 फूट) रुंद होती.

मंदिराचे परम पवित्र स्थान

मग तो माणूस शेवटच्या खोलीत गेला आणि त्याने दाराच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींचे मोजमाप घेतले. प्रत्येक बाजूची भिंत 20 हात जाड होती. आणि 7 हात रुंद होती. दार 6 हात रुंद होते. मग त्या माणसाने दालनाची लांबी मोजली. ती 20 हात (35 फूट) लांब व 20 हात (35 फूट) रुंद होती. मधल्या दालनात प्रवेश करण्याआधी तो मला म्हणाला, “ही सर्वांत पवित्र जागा आहे.”

मंदिराभोवती असलेल्या इतर खोल्या

मग त्याने मंदिराच्या भिंतीचे मोजमाप घेतले. ती 6 हात जाड होती. मंदिराच्या भोवताली असलेल्या बाजूच्या खोल्या 4 हात (7 फूट) रुद होत्या. बाजूच्या खोल्या वेगवेगळ्या तीन मजल्यांवर होत्या. एकावर एक अश्या त्या होत्या. प्रत्येक मजल्यावर 30 खोल्या होत्या. मंदिराच्या भिंतीना कंगोरे केलेले होते. बाजूच्या खोल्यांना ह्या कंगोऱ्यांचा आधार होता. पण मंदिराला मात्र त्या जोडलेल्या नव्हत्या. ह्या खोल्या वर रुंद होत गेल्या होत्यां. मंदिराभोवतालच्या खोल्यांच्या भिंत्तीवर अरुंद होत गेल्या होत्या. म्हणून सर्वांत वरच्या मजल्यावरील खोल्या जास्त रुंद होत्या. जिना खालच्या मजल्यापासून दुसऱ्या मजल्यावरुन सर्वांत वरच्या मजल्यावर गेला होता.

मंदिराच्या सर्व बाजूंनी फरसबंदी पाया असल्याचे मला दिसले. बाजूला खोल्यांचा पाया संपूर्ण एक पट्टी (10 फूट 6 इंच) उंच होता. बाजूच्या खोल्यांनी बाहेरची भिंत 5 हात (8 फूट 9 इंच) जाड होती. 10 बाजूच्या खोल्या आणि याजकाच्या खोल्या ह्याच्यामध्ये मोकळी जागा होती. ती मंदिराच्या सर्व बाजूंनी 20 हात (35 फूट) एवढी होती. 11 बाजूच्या खोल्यांची दारे फरसबंदीवर उघडत. हा फरसबंदी पाया भिंतीचा भाग नव्हता. एक दार उत्तरेकडे तर दुसरे दक्षिणेकडे होते. फरसबंदी पाया सर्व बाजूंनी 5 हात (8 फूट 9 इंच) रुंद होता.

12 मंदिराच्या पश्र्चिमेकडची राखीव केलेल्या जागेतील इमारत 70 हात रुंद आणि 90 हात लांब होती. त्या इमारतीची भिंत सर्व बांजूनी 5 हात (8 फूट 9 इंच) जाड होती. ती 90 हात (175 फूट इंच) लांब होती. 13 मग त्या माणसाने मंदिराचे मोजमापे केले. मंदिराची 100 हात (175 फूट) लांबी होती. भिंतीसकट इमारत आणि अंगण ह्यांची लाबीही 100 हात (175 फूट) होती. 14 मंदिराची पूर्वेकडची समोरची बाजू आणि अंगण 100 हात (175 फूट) रुंद होते.

15 मंदिराच्या पिछाडीला आरक्षीत जागेत असलेल्या इमारतीचे तोंड पटांगणाकडे होते. ह्या इमारतीची आणि तिच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीची लांबी त्या माणसाने मोजली. ती 100 हात (175 फूट) भरली.

सर्वांत पवित्र गाभारा, पवित्र जागा आणि आतल्या पटांगणाकडे उघडणारा द्वारमंडप ह्याच्या भिंतींना 16 लाकडी तक्तपोशी होती. सर्व खिडक्या व दारांना लाकडी चौकटी होत्या. दाराजवळ मंदिरात, जमिनीपासून खिडक्यांपर्यंत लाकडी तक्तपोशी होती. दाराच्या वरच्या भिंतींनाही अशी तक्तपोशी होती. 17 आतल्या खोलीच्या आणि बाहेरच्या दालनाच्या सर्व भिंतींवर कोरिवकाम केलेले होते.

18 तेथे करुब देवदूतांच्या आकृती आणि खजुरीची झाडे कोरलेली होती. करुब देवदूतांच्यामध्ये खजुरीचे झाड कोरलेले होते. प्रत्येक करुबाला दोन तोंडे होती. 19 त्या दोन तोंडांपैकी एक माणसाचे व एक सिंहाचे होते. व ती तोंडे खजुरीच्या झाडाकडे पाहत होती. हे कोरिवकाम सर्व मंदिरात केलेले होते. 20 मधल्या दालनाच्या (पवित्र गाभाऱ्याच्या) सर्व भिंतींवर जमिनीपासून दाराच्या वरच्या भागापर्यंत करुब देवदूत व खजुरीची झाडे कोरलेली होती.

21 पवित्र गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूंच्या भिंती चौकोनी होत्या. 22 सर्वांत पवित्र जागेच्या समोर वेदी प्रमाणे दिसणारी लाकडी वस्तू होती. ती 3 हात (5 फूट 3 इंच) इंच व 2 हात (3 फूट 6 इंच) लांब होती. तिचे कोपरे, तळ व बाजू लाकडाच्या होत्या तो माणूस मला म्हणाला, “हे देवाच्या समोर असते, तेच टेबल आहे.”

23 (पवित्र जागा) आणि सर्वांत पवित्र गाभारा ह्यांना दोन दोन दारे होती. 24 प्रत्येक दरवाजा दोन लहान दारांचा बनलेला होता. प्रत्येक दरवाज्याला दोन झुलती दारे होती. 25 इतर भिंतीप्रमाणे मधल्या दालनाच्या (पवित्र जागेच्या) दारांवर, करुब देवदूत व खजुरीची झाडे कोरलेली होती. द्वारमंडपाच्या बाहेरच्या बाजूच्या दर्शनी भागावर लाकडाचे आच्छादन होते. 26 खिडक्यांभोवती चौकटी होत्या. आणि द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूच्या भिंती द्वारमंडपाचे छत आणि मंदिराच्या सभोवतालच्या खोल्या ह्यांच्यावर खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम केलेले होते.

स्तोत्रसंहिता 92-93

शब्बाथचे स्तुतिगीत.

92 परमेश्वराची स्तुती करणे चांगले असते.
    परात्पर देवा, तुझ्या नावाचे उपकारस्मरण करणे चांगले असते.
तुझ्या प्रेमा बद्दल सकाळी गाणे आणि
    रात्री तुझ्या इमानीपणाबद्दल जयजयकार करणे चांगले असते.
देवा, तुझ्यासाठी दहा तारांच्या वीणेवर
    आणि सतारीवर संगीत वाजवणे चांगले असते.
परमेश्वरा, तू ज्या गोष्टी केल्यास त्यामुळे तू आम्हाला खरोखरच सुखी केले आहेस,
    आम्ही त्याबद्दल आनंदाने गातो.
परमेश्वरा, तू फारच महान गोष्टी केल्यास
    तुझे विचार समजून घेणे आम्हाला फार जड जाते.
तुझ्याशी तुलना करता माणसे म्हणजे मूर्ख जनावरे आहेत.
    ज्याला काहीही कळू शकत नाही अशा मूर्खासारखे आम्ही आहोत.
वाईट लोक तणाप्रमाणे जगतात आणि मरतात.
    ते ज्या कवडीमोलाच्या गोष्टी करतात,
    त्या गोष्टींचा कायमचा नाश होतो.
परंतु परमेश्वरा, तुला सदैव मान मिळेल.

परमेश्वरा, तुझ्या सगळ्या शत्रूंचा नाश होईल.
    वाईट गोष्टी करणाऱ्या सर्व लोकांचा नाश होईल.
10 पण तू मला बलवान बनवशील.
    मी ताकदवान शिंग असलेल्या मेंढ्यासारखा असेन.
पण तू माझी माझ्या खास कामासाठी निवड केलीस.
    तू तुझे ताजेतवाने करणारे तेल माझ्यावर ओतलेस.
11 मी माझे शत्रू माझ्याभोवती बघतो.
ते भल्या मोठ्या बैलाप्रमाणे माझ्यावर चालकरुन येण्याच्या तयारीत आहेत.
    ते माझ्याबद्दल काय बोलतात ते मी ऐकतो.

12-13 परंतु चांगला माणूस वाढणाऱ्या खजुराच्या झाडाप्रमाणे असतो.
    चांगला माणूस लबानोनमधल्या मोठ्या देवदार वृक्षासारखा असतो.
चांगली माणसे परमेश्वराच्या मंदिरात लावलेल्या मजबूत वृक्षासारखी असतात.
    आमच्या देवाच्या मंदिरातील अंगणात ती झपाट्याने वाढतील.
14 ते जुने झाल्यावरही फळे देत राहातील.
    ते सशक्त हिरव्या झाडासारखे असतील.
15 परमेश्वर चांगला आहे हे प्रत्येकाला दाखवण्यासाठी ती (चांगली माणसे) तेथे आहेत
    तो माझा खडक असून तो काहीही चुकीचे करत नाही.

93 परमेश्वर राजा आहे.
    त्याने ऐश्वर्य आणि सामर्थ्य वस्त्राप्रमाणे पांघरले आहे.
तो सज्ज आहे त्यामुळे सर्व जग सुरक्षित आहे.
    ते कंपित होणार नाही.
देवा, तुझे राज्य कायमचे अस्तित्वात राहिले आहे.
    देवा, तू सदैव जीवंत आहेस.
परमेश्वरा, नद्यांचा आवाज प्रचंड मोठा आहे.
    आदळणाऱ्या लाटांचा आवाज खूप मोठा आहे.
समुद्राच्या आदळणाऱ्या लाटा फार ताकदवान आहेत आणि
    त्यांचा आवाज खूप मोठा आहे.
    परंतु वरचा परमेश्वर अधिक ताकदवान आहे.
परमेश्वरा, तुझे नियम सदैव राहातील. [a]
    तुझे पवित्र मंदिर खूप काळ उभे राहील.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center