Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 राजे 7

शलमोनाचा राजवाडा

राजा शलमोनाने स्वतःसाठी महालही बांधला. त्याला तेरा वर्षे लागली. लबानोनचे वनातील घरही त्याने बांधले. ते 150 फूट लांब, 95 फूट रुंद आणि 45 फूट उंच होते. देवदाराच्या स्तंभांच्या त्याला चार रांगा असून प्रत्येक स्तंभावर नक्षीदार घुमटी होती. या स्तंभांवरुन देवदाराच्या तुळ्या घातलेल्या असून त्यावर छत म्हणून देवदाराच्या लाकडाची पाटण होती. प्रत्येक ओळीत पंधरा खांब अशा पंचेचाळीस खांबांवर तुळ्या होत्या. भिंतींवर समोरासमोर येतील अशा खिडक्यांच्या तीन ओळी होत्या. दोन्ही टोकांना तीन तीन दरवाजे होते. दाराची कवाडे आणि चौकटी काटकोन चौकोनात होत्या.

शलमोनाने एक द्वारमंडपही उभारला होता. हा राजासनाचा मंडप 75 फूट लांब आणि 45 फूट रुंद होता. दर्शनी बाजूला आधार देणाऱ्या स्तंभांची रांग होती.

न्यायनिवाडा करण्यासाठीही त्याने एक दालन बांधून घेतले. त्याला त्याने “न्यायासनाचा मंडप” असे नाव दिले होते. हे दालनही जमिनीपासून छतापर्यंत गंधसरुच्या लाकडाने आच्छादलेले होते.

याच्याच आतल्या बाजूला त्याचे घर होते. त्याची बांधणी न्यायासनाच्या मंडपासारखीच होती. मिसरच्या राजाची मुलगी म्हणजे शलमोनची बायको हिच्यासाठीही त्याने असाच महाल बांधून घेतला.

या सर्व इमारतींच्या बांधकामात किंमती दगडी चिरे वापरले होते. पुढून मागून घासून ते करवतीने योग्य मापाने कातले होते. पायापासून वळचणीपर्यंत त्यांचाच वापर केला होता. अंगणाभोवतालच्या भिंतीही याच बहुमूल्य दगडांनी बांधल्या होत्या. 10 पायासाठी वापरलेले चिरेही असेच प्रशस्त व भारी होते. काहींची लांबी 15 फूट व इतरांची बारा फूट होती.

11 त्यांच्यावर आणखी चांगल्या प्रतीचे चिरे आणि गंधसरुचे वासे होते. 12 महाल, मंदिर आणि द्वारमंडप यांच्या भोवताली भिंत होती. तिला दगडांच्या तीन ओळी आणि गंधसरुच्या लाकडाची एक ओळ होती.

13 राजा शलमोनाने सोराहून (तायरहून) हिराम नावाच्या माणसाला निरोप पाठवून यरुशलेम येथे बोलावून घेतले. 14 हिरामची आई नफताली वंशातील होती. त्याचे वडील सोराचे (तायरचे) होते. ते चांगले तांबट होते पण ते मरण पावले होते. हिराम हा एक अनुभवी आणि कसबी तांबट होता. म्हणून राजाने त्यालाच बोलावून घेतले. त्यानेही हे आमंत्रण स्वीकारले. राजाने हिरामला सर्व पितळी कारागिरीवरील प्रमुख म्हणून नेमले. हिरामने पितळेपासून बनवलेल्या सर्व वस्तू घडविल्या.

15 हिरामने दोन पितळी स्तंभ घडवले. प्रत्येक स्तंभ सत्तावीस फूट उंचीचा आणि अठरा फूट परिघाचा होता. हे स्तंभ पोकळ असून पत्र्याची जाडी तीन इंच होती. 16 शिवाय त्याने साडेसात फूट उंचीचे दोन पितळी महिरपदार खांबही बांधले. 17 या खांबाच्या घुमट्यांना आच्छादायला म्हणून दोन जाळीदार, साखळीची आच्छादने केली. 18 मग त्याने पितळेचे, डाळिंबाच्या आकारांचे शोभिवंत कळस केले. घुमट्यांच्या जाळ्यांवर या कळसांच्या दोन रांगा बसवल्या. 19 साडेसात फूट उंचीचे जे स्तंभ होते त्याच्या घुमट्या फुलाच्या आकाराच्या होत्या. 20 या घुमट्या स्तंभांवर बसवलेल्या होत्या. परडीच्या आकाराच्या जाळीवर त्या बसवलेल्या होत्या. या सगळ्या कळसांच्या भोवती रांगेने वीस डाळिंबे लावली होती. 21 हे दोन पितळी स्तंभ हिरामने द्वारमंडपाशी लावले. दक्षिणेकडील खांबाला याखीन आणि उत्तरे कडील खांबाला बवाज असे नाव ठेवले. 22 फुलाच्या आकारांचे कळस या खांबांवर चढवले आणि या दोन स्तंभांचे काम संपले.

23 यानंतर हिरामने पंच धातूचा एक गोल हौद केला. याला त्याने “समुद्र” असे नाव दिले. याचा परिघ पंचेचाळीस फूट होता. या काठापासून त्या काठापर्यंत त्याची लांबी पंधरा फूट होती आणि खोली साडेसात फूट. 24 या हौदाच्या कडेल्या बाहेरच्या बाजूला एक पट्टी बसवली होती. तिच्या खाली पितळी रानकाकड्यांच्या दोन रांगा होत्या. या काकड्या हौदाचाच एक भाग म्हणून एकसंधपणे करुन घेतल्या होत्या. 25 बारा पितळी बैलांच्या पाठीवर हा हौद विसावलेला होता. बैलांची तोंडे बाहेरच्या बाजूला होती. तिघांची तोंडे उत्तरेला, तिघांची दक्षिणेला, तिघांची पूर्वेला आणि तिघांची पश्र्चिमेला होती. 26 हौदाची जाडी तीन इंच रुंदीची होती. आणि वरची कड कटोऱ्याच्या कडेसारखी अथवा फुलासारखी उमललेली होती. यात अकरा हजार गॅलन पाणी मावत असे.

27 मग हिरामने दहा पितळी पालख्या केल्या. प्रत्येक पालखी सहा फूट लांब, सहा फूट रुंद आणि साडे चार फूट उंच होती. 28 चौकटीत बसवलेल्या चौकोनी पत्र्यांनी या पालख्या केल्या होत्या. 29 पत्रे आणि चौकट यांच्यावर पितळी सिंह, बैल व करुब देवदूत यांचे कोरीव काम होते. सिंह आणि बैल यांच्याखाली फुलांची वेलबुट्टी बसवलेली होती. 30 प्रत्येक पालखीला पितळी धुऱ्यांवर पितळेची चार चार चाके लावलेली होती आणि चारही कोपऱ्यातून प्रशस्त घंगाळासाठी पितळी आधार दिलेले होते. त्यांनाही फुलांचे सुबक काम केलेले होते. 31 बैठकीला वरच्या बाजूला चौकट होती. बैठकीपासून ती अठरा इंच वर होती. घंगाळाचे वाटोळे तोंड सत्तावीस इंच व्यासाचे होते. चौकटीवरही पुन्हा पितळेत कोरीवकामाची नक्षी होती. चौकटीवरही पुन्हा पितळेत कोरीवकामाची नक्षी होती. चौकट मात्र गोल नसून चौकोनी होती. 32 सांगाड्याच्या खालची चार चाके सत्तावीस इंच व्यासाची होती. आणि चाकांच्या धुऱ्या पालखीबरोबरच घडलेल्या, एकसंध होत्या. 33 रथाच्या चाकांसारखी ही चाके होती. आणि त्याच्या धुऱ्या धावा, आरे आणि तुंबे असे सर्व काही ओतीव पितळेचे होते.

34 प्रत्येक पालखीच्या चारही कोपऱ्यांना आधार दिलेले होते. तेही एकसंध होते. 35 प्रत्येक पालखीला वरुन एक पितळेची पट्टी होती. तीही अंगचीच होती. 36 पालखीची बाहेरची बाजू आणि चौकट यांच्यावर करुब देवदूत, सिंह, खजूरीची झाडे यांचे कोरीवकाम पितळेत केलेले होते. ही नक्षी अगदी भरगच्च असून त्यात कुठेही मोकळी जागा नव्हती. शिवाय भोवताली फुलांची नक्षी होती. 37 हिरामने अशाप्रकारे अगदी एकसारख्या एक अशा दहा पितळी पालख्या घडवल्या. हे सर्व ओतीव काम होते त्यामुळे त्या तंतोतंत एकसारख्या होत्या.

38 हिरामने अशीच दहा गंगाळी केली. ती या दहा पालख्यांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे होती. प्रत्येक गंगाळ सहाफुटी होते. त्यात दोनशेतीस गॅलन पाणी मावू शकत असे. 39 मंदिराच्या उत्तरेला आणि दक्षिणपूर्व कोपऱ्यात म्हणजेच आग्नेय दिशेला हौदाची योजना केली. 40-45 याखेरीज हिरामने वाडगी, पावडी, लहान गंगाळी बनवली. शलमोनाने सांगितले ते सर्व हिरामने केले. परमेश्वराच्या मंदिरासाठी हिरामने ज्या वस्तू घडवल्या त्यांची यादी पुढीलप्रमाणे:

दोन स्तंभ स्तंभांच्या कळसांवर बसवायच्या

दोन घुमट्या त्यांच्या भोवतीच्या

दोन जाळ्या या दोन जाळ्यांची

चारशे डाळिंबांच्या दोन-दोन रांगा,

गंगाळासाहित पालख्या दहा पायातळी

बारा बैल असलेला विशाल हौद याखेरीज हंडे,

पातेली, पावडी अशी परमेश्वराच्या मंदिरासाठी वेगवेगळी पात्रे.

राजाच्या इच्छेखातर हिरामने हे केले. ते सर्व लखलखीत पितळेच होते. 46-47 या सगळ्यासाठी किती पितळ लागले ते राजाने बघितले नाही. वजन करायचे म्हटले तरी ते खूपच होते. त्यामुळे या सर्व चीजवस्तूंचे नक्की वजन कधीच माहीत झाले नाही. सुक्कोथ आणि सारतान यांच्यामध्ये यार्देन नदीच्या तीरावर राजाने हे काम करायला सांगितले. पितळ वितळवून मातीच्या साच्यात हे ओतकाम करण्यात आले.

48-50 शलमोनाने मंदिरासाठी सोन्याच्याही कितीतरी वस्तू करवून घेतल्या. त्या अशा:

सोन्याचे मेज

(देवाची सोन्याची वेदी समर्पित भाकर ठेवण्यामाठी)

चोख सोन्याच्या दीपमाळा. (या अतिपवित्र गाभाऱ्यासमोर डावीउजवीकडे पाच-पाच लावलेल्या होत्या)

सोन्याची फुले, दिवे आणि चिमटे

वाडगे दिवे लखलखीत, उजळलेले ठेवायची साधने.

पेले ताम्हने शुद्ध सोन्याची रक्षापात्रे मंदिराची प्रवेशद्वारे.

51 परमेश्वराच्या मंदिराचे हे काम शलमोनाने स्वतःच्या पसंतीप्रमाणे करवून घेतले. मग आपले वडील दावीद यांनी या हेतूने राखून ठेवलेल्या सर्व वस्तू बाहेर काढल्या. त्या सर्व मंदिरात आणल्या. परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यात ही सोन्यारुप्याची चीजवस्तू जमा केली.

इफिसकरांस 4

शरीराचे ऐक्य

म्हणून मी, जो प्रभूमधील कैदी, (दास) तो तुम्हांला विनंती करतो, देवाकडून तुम्हांला जे पाचारण झालेले आहे, त्याला शोभेल अशा प्रकारे राहा. नेहमी नम्रता, सौम्यता दाखवा. आणि सहनशीलतेने एकमेकांबरोबर प्रीतीने राहा. शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत प्रयत्न करा. एक शरीर व एकच आत्मा आहे. ज्याप्रमाणे तुम्हालाही एकाच आशेत सहभागी होण्यास बोलाविले होते. एक प्रभु, एक विश्वास, एक बाप्तिस्मा, एक देव आणि पिता जो सर्वांचा मालक आहे. जो प्रत्येक गोष्टीद्वारे कार्य करतो आणि जो प्रत्येकात आहे,

ख्रिस्ताच्या दानाच्या मोजमापाप्रमाणे आपणांस प्रत्येकाला कृपेचे विशेष दान दिले आहे. यासाठीच पवित्र शास्त्र असे म्हणते.

“जेव्हा तो उच्चस्थानी चढला,
    तेव्हा त्याने युद्धकैद्दांस आपणांबरोबर नेले
    आणि त्याने लोकांना देणग्या दिल्या.” (A)

आता, जेव्हा ते असे म्हणते, “वर चढला” तर त्याचा अर्थ काय? म्हणजे तो पृथ्वीच्या खालील प्रदेशात सुध्दा उतरला असाच होतो की नाही? 10 जो खाली उतरला तोच वर सर्व स्वर्गांहून उंच ठिकाणी चढला. यासाठी की सर्व गोष्टी त्याला भरता याव्यात. 11 आणि त्याने स्वतःच काही लोकांना प्रेषित, इतर काही जणांना भविष्य सांगणारे सुवार्तिक, तर दुसऱ्यांना मेंढपाळ व शिक्षक असे होण्याची दाने दिली. 12 ख्रिस्ताने त्या देणग्या देवाचे लोक सेवेच्या कार्यासाठी तयार करण्यास व आत्मिकरीतीने ख्रिस्ताचे शरीर सामर्थ्यवान होण्यासाठी दिल्या. 13 आम्हा सर्वांना आमच्या पित्यातील एकत्वापणामुळे विश्वासाची आणि देवाच्या पुत्राविषयीच्या ज्ञानाची जाणीव होते आणि पूर्णत्वाची जी परिमाणे ख्रिस्ताने आणली आहेत त्या उच्चतेपर्यंत पोहोंचून परिपक्व मनुष्य होण्यासाठी आमची वाढ होते.

14 हे असे आहे म्हणून यापूढे आपण लहान बाळकासारखे नसावे. म्हणजे माणसांच्या कपटाने त्यांची लबाडी जी कपटयोजनेला महत्त्व देते, अशा प्रत्येक नव्या शिकवणुकीच्या वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडे तिकडे हेलकावणारे होऊ नयेत 15 त्याऐवजी आपण प्रेमाने सत्य बोलावे आणि प्रत्येक मार्गाने ख्रिस्तासारखे होण्यासाठी वाढावे. ख्रिस्त हा मस्तक आहे. 16 ज्यावर सर्व शरीर आधारित आहे, ते आधार देणाऱ्या प्रत्येक अस्थिबंधनाने जोडलेले आणि एकत्र बांधलेले असते. आणि प्रत्येक भाग त्याने जसे कार्य करायला पाहिजे तसे करतो, संपूर्ण शरीर वाढते व प्रीतीत बळकट होत जाते.

अशा मार्गाने तुम्ही जगावे

17 म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात सावध करतो: ज्याप्रमाणे विदेशी त्यांच्या मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतात तसे चालू नका. 18 त्यांची अंतःकरणे अंधकारमय अशा स्थितीत आहेत आणि देवापासून जे जीवन येते त्यापासून ते वेगळे झाले आहेत. कारण ते अजाण आहेत, आणि त्याची अंतःकरणे कठीण झाली आहेत. 19 त्यांना आता कशाचीच लाज वाटत नाही व त्यांनी स्वतःला कामातुरपणाला वाहून घेतले आहे व प्रत्येक प्रकारच्या अशुद्धतेच्या सवयीला वाहून घेतले आहे. 20 परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्त शिकला नाही. आणि 21 मला यात काही शंका नाही की, तुम्ही त्याच्याविषयी ऐकले आहे. आणि येशूमध्ये जे सत्य आहे त्याप्रमाणे त्याचे अनुयायी म्हणून ते सत्य तुम्ही शिकला असाल. 22 तुमच्या पूर्वीच्या जीवनाविषयी, तुम्हांला तुमच्या जुन्या मनुष्यापासून सुटका करुन घेण्यास शिकविले होते, जो मनुष्य फसवणुकीच्या इच्छेने अशुद्ध झाला आहे. 23 यासाठी तुम्ही अंतःकरणामध्ये व आत्म्यात नवे केले जावे आणि 24 नवा मनुष्य तुम्ही धारण करावा, जो देवाप्रमाणे निर्माण केलेला आहे.

25 म्हणून लबाडी करु नका! “प्रत्येक व्यक्तीने त्याच्याबरोबरच्या व्यक्तीशी खरे तेच बोलावे.” 26 “तुम्ही रागवा पण पाप करु नका.” सूर्यास्तापूर्वी तुम्ही तुमचा राग सोडून द्यावा. 27 तुमचा पराभव करण्याची सैतानाला संधी देऊ नका. 28 जो कोणी चोरी करील असेल तर त्याने यापुढे चोरी करु नये. उलट, त्याने आपल्या हातांनी काम करावे यासाठी की जो कोणी गरजू असेल त्याला त्यातून वाटा देण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी असावे.

29 तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो, तर आध्यात्मिक सामर्थ्यासाठी ज्याची लोकांना गरज आहे ते चांगले मात्र निघो. यासाठी की, जे ऐकतील त्यांना आशीर्वाद प्राप्त होईल. 30 आणि देवाच्या पवित्र आत्म्याला दु:खी करु नका. कारण तुम्ही आत्म्याबरोबर देवाची संपत्ती म्हणून तारणाच्या दिवसासाठी शिक्का मारलेले असे आहात. 31 सर्व प्रकारची कटुता, संताप, राग, ओरडणे, देवाची निंदा ही सर्व प्रकारच्या दुष्टाईबरोबर तुम्हामधून दूर करावी. 32 एकमेकांबरोबर दयाळू आणि कनवाळू व्हा. आणि देवाने ख्रिस्तामध्ये क्षमा केली तशी एकमेकांना क्षमा करा.

यहेज्केल 37

सुक्या हाडांचा दृष्टान्त

37 परमेश्वराचे सामर्थ्य माझ्यावर आले. परमेश्वराच्या आत्म्याने मला गावातून उचलून दरीच्या मध्यभागी आणून ठेवले. ती दरी मृतांच्या हाडांनी भरलेली होती. दरीत जमिनीवर पुष्कळ हाडे पडलेली होत. त्यामधून परमेश्वराने मला चालायला लावले. ती हाडे अगदी सुकलेली असल्याचे मी पाहिले.

मग, परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही हाडे जिवंत होऊ शकतील का?”

मी उत्तरलो, “परमेश्वर देवा, ह्याचे उत्तर फक्त तुलाच माहीत आहे.”

परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “माझ्यावतीने त्या हाडांशी बोल. त्यांना सांग ‘सुक्या हाडांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका. परमेश्वर, माझा प्रभू, तुम्हाला पुढील गोष्टी सांगतो: मी तुमच्यात प्राण निर्माण करीन मग तुम्ही जिवंत व्हाल. मी तुमच्यावर स्नायू आणि मांस चढवीन आणि त्यावर कातडे ओढीन. मग तुमच्यात प्राण ओतीन. म्हणजे तुम्ही पुन्हा जिवंत व्हाल. मग तुम्हाला समजून चुकेल की मीच परमेश्वर व प्रभू आहे.’”

मग मी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, त्याच्यावतीने हाडांशी बोललो. माझे बोलणे सुरु असतानाच, मला मोठा आवाज ऐकू आला. हाडांचा खुळखुळाट झाला. ती एकमेकांना जोडली गेली. माझ्या डोळ्यासमोर हाडांवर स्नायू, मांस व कातडे चढले. पण ती शरीरे हालली नाहीत. कारण त्यांत प्राण नव्हता.

मग परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “माझ्यावतीने वाऱ्याशी बोल. त्याला पुढील गोष्टी माझ्यावतीने सांग: ‘सर्व बाजूंनी येऊन तू ह्या शरीरात स्पंदन निर्माण कर त्यांच्यात प्राण घाल, म्हणजे ती पुन्हा जिवंत होतील.’”

10 मग मी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे वाऱ्याशी बोललो. मग मृत शरीरांत जीव आला. ती जिवंत होऊन उभी राहिली ते पुष्कळ लोक होते. ते मोठे सैन्यच होते.

11 मग परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही हाडे म्हणजे जणू काही सर्व इस्राएली कुळच आहे. इस्राएलचे लोक म्हणतात, ‘आमची हाडे सुकून गेली आहेत. [a] आम्हाला आशा राहिलेली नाही. आमचा संपूर्ण नाश झाला आहे.’ 12 म्हणून त्यांच्याशी माझ्यावतीने बोल. त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो ‘माझ्या माणसांनो, मी कबरी उघडून तुम्हाला कबरीतून बाहेर काढीन. मग मी तुम्हाला इस्राएलच्या भूमीत आणीन. 13 माझ्या माणसांनो, मी कबरी उघडून तुम्हाला त्यातून बाहेर काढल्यावर त्यांना कळेल की मीच परमेश्वर आहे. 14 मी तुमच्यात माझा आत्मा [b] ओतीन. म्हणजे मग तुम्ही पुन्हा जिवंत व्हाल. मग मी परमेश्वर असल्याचे कळेल. मी सांगितलेल्या गोष्टी मी घडवून आणल्या, हे ही तुमच्या लक्षात येईल.’” परमेश्वरच हे सर्व बोलला.

यहुदा व इस्राएल यांचे एकीकरण

15 मला परमेश्वराचे शब्द पुन्हा ऐकू आले. तो म्हणाला, 16 “मानवपुत्रा, एक काठी घे आणि तिच्यावर पुढील संदेश लिही. ‘ही काठी यहूदा आणि त्याचे मित्र [c] इस्राएलचे लोक यांच्या मालकीची आहे.’ मग दुसरी काठी घेऊन तिच्यावर लिही ‘ही एफ्राईमची काठी योसेफ व त्याचे मित्र इस्राएलचे लोक यांच्या मालकीची आहे.’ 17 मग त्या दोन काठ्या एकत्र जोड. तुझ्या हातांत ती एकच काठी असेल.

18 “तुझे लोक तुला ह्याचा अर्थ विचारतील. 19 त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: ‘मी एफ्राईमच्या आणि त्याच्या मित्रांच्या म्हणजेच इस्राएलच्या लोकांच्या हातांत असलेली योसेफाची काठी घेईल. मग ती मी यहुदाच्या काठीबरोबर ठेवीन. माझ्या हातांत त्या दोन काठ्यांची एकच काठी होईल.’

20 “त्या काठ्या हातांत तुझ्या पुढे धर. त्यांच्यावर तू नांवे लिहिली आहेस. 21 लोकांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो: ‘इस्राएल लोक वेगवेगळ्या राष्टांत गेले आहेत. तेथून त्यांना मी बाहेर काढीन. मी त्यांना सगळीकडून आणून, एकत्र गोळा करीन आणि त्यांना त्यांच्या देशात परत आणीन. 22 इस्राएलच्या पर्वतीय क्षेत्रात मी त्यांचे एकच राष्ट्र करीन. त्या सर्वांचा मिळून एकच राजा असेल. यापुढे ती वेगवेगळी दोन राष्ट्रे असणार नाहीत, त्याचे दोन राज्यात विभाजन होणार नाही. 23 ते यापुढे स्वतःला त्या मूर्ती मुळे वा पुतळ्यांमुळे अमंगळ होणार नाहीत. त्यांनी पापे केलेल्या सर्व ठिकाणापासून मी त्यांना सुरक्षित ठेवीन. त्यांना धुवून शुद्ध करीन. मग ते माझे होतील व मी त्यांचा देव होईन.

24 “‘माझा सेवक, दावीद, हा त्यांचा राजा होईल. त्या सर्वांना मिळून एकच मेंढपाळ असेल. ते माझ्या नियमाप्रमाणे वागतील आणि माझ्या कायद्यांचे पालन करतील. मी त्यांना करायला सांगितलेल्या गोष्टी ते करतील. 25 माझा सेवक, याकोब, याला मी दिलेल्या भूमीवर ते राहतील. तुमचे पूर्वज तेथेच राहात होते. आता माझी माणसे तेथे राहतील. ते, त्यांची मुले, नातवंडे कायमची तेथे राहतील. दावीद हा माझा सेवक त्यांचा कायमचा नेता असेल. 26 मी त्यांच्याबरोबर शांतता करार करीन. तो करार कायमस्वरुपी असेल. मी त्यांना त्यांची जमीन देण्यास, त्यांची संख्या वाढवून देण्यास, त्यांच्या तेथेच कायमचे माझे पवित्र स्थान ठेवण्यास कबूल आहे. 27 त्यांच्यामध्येच माझा पवित्र तंबू असेल. हो! मी त्यांचा देव असेल व ते माझे लोक असतील. 28 मग इतर राष्ट्रांना कळून येईल की मी परमेश्वर आहे आणि इस्राएलमध्ये चिरंतन असे माझे पवित्र स्थान करुन त्या लोकांना मी माझी कायमची खास माणसे बनविली आहेत.’”

स्तोत्रसंहिता 87-88

कोरहाच्या मुलाचे स्तुतिगीत

87 देवाने आपले मंदिर यरुशलेमच्या पवित्र डोंगरावर बांधले.
    परमेश्वराला सियोनचे द्वार इस्राएलमधल्या इतर ठिकाणापेक्षा अधिक आवडते.
हे देवाच्या नगरी लोक तुझ्याबद्दल आश्चर्यजनक गोष्टी सांगतात.

देव त्याच्या सर्व माणसांची यादी ठेवतो त्यापैकी काही मिसर आणि बाबेल मध्ये राहातात.
    त्यापैकी काहींचा जन्म पलेशेथ, सोर आणि कूश येथे झाला.
सियोनात जन्मलेल्या प्रत्येकाला देव ओळखतो.
    सर्वशक्तिमान देवाने ते नगर बांधले.
देव त्याच्या सर्व लोकांविषयीची यादी ठेवतो.
    प्रत्येकाचा जन्म कुठे झाला ते त्याला माहीत आहे.

देवाचे लोक यरुशलेमला खास सण साजरा करण्यासाठी जातात.
    ते खूप आनंदी आहेत.
ते गाणी गातात, नाच करतात.
    ते म्हणतात, “सगळ्या चांगल्या गोष्टी यरुशलेम मधून येतात.”

कोरहाच्या मुलाचे स्तुतीगीत प्रमुख गायकासाठी हेमान एज्राही याचे दुःखद आजाराविषयीचे मास्कील

88 परमेश्वरा, देवा, तू माझा तारणारा आहेस.
    मी रात्रंदिवस तुझी प्रार्थना करीत आहे.
कृपा करुन माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
    दयेखातर माझी प्रार्थना ऐक.
माझ्या आत्म्याला हे दु:ख पुरेसे आहे.
    मी आता लवकरच मरणार आहे.
लोक मला आताच मृत आहे असे समजून वागवतात.
    मी जगायला अगदी शक्तिहीन आहे असे समजून वागवतात.
मला तू मृत माणसात शोध.
    मी थडग्यात असलेल्या प्रेतासारखा आहे.
ज्याला तू विसरलास असा एक मृतात्मा, तुझ्यापासून
    आणि तुझ्या निगराणीपासून दूर गेलेला असा एक.
तू मला जमिनीतल्या त्या खड्‌यांत टाकलेस.
    होय, तूच मला त्या अंधाऱ्या जागेत ठेवलेस.
देवा, तू माझ्यावर रागावला होतास
    आणि तू मला शिक्षा केलीस.

माझे मित्र मला सोडून गेले.
    ज्याला कोणीही स्पर्श करु इच्छीत नाही.
अशा माणसाप्रमाणे ते मला टाळतात.
    मी घरात बंद झालो आहे आणि मी बाहेर पडू शकत नाही.
अति दुःखाने रडल्यामुळे माझे डोळे दुखत आहेत.
    परमेश्वरा, मी सतत तुझी प्रार्थना करीत आहे.
माझे बाहू उभारुन मी तुझी प्रार्थना करत आहे.
10 परमेश्वरा, तू मृतांसाठी चमत्कार करतोस का?
    भुते उठून तुझी स्तुती करतात का? नाही.

11 थडग्यातले मृत लोक तुझ्या प्रेमाबद्दल बोलू शकत नाहीत.
    मृत्युलोकांतील मृतलोक तुझ्या इमानीपणाविषयी बोलू शकत नाहीत.
12 अंधारात पडलेले मृतलोक तुझी अद्भुत कृत्ये पाहू शकत नाहीत.
    विस्मृतीच्या जगातले मृतलोक तुझ्या चांगुलपणाविषयी बोलू शकत नाहीत.
13 परमेश्वरा, मी तुला मदत करण्याविषयी विचारत आहे.
    प्रत्येक दिवशी पहाटे मी तुझी प्रार्थना करतो.
14 परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास?
    तू माझे ऐकायला नकार का देतोस?
15 मी तरुणपणापासूनच अशक्त आणि आजारी आहे.
    मी तुझा राग सोसला आहे आणि मी असहाय्य आहे.
16 परमेश्वरा, तू माझ्यावर रागावला होतास
    आणि शिक्षा मला मारुन टाकीत आहे.
17 दु:ख आणि वेदना सदैव माझ्याबरोबर असतात.
    मी माझ्या दु:खात आणि वेदनात बुडून मरत आहे असे मला वाटते.
18 आणि परमेश्वरा, तूच माझ्या आप्तेष्टांना आणि इष्ट मित्रांना मला सोडून जाण्यास भाग पाडलेस.
    केवळ भयाण अंधकार माझी सोबत करत माझ्याजवळ राहिला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center