Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 शमुवेल 23

दावीदाचे अखेरचे बोल

23 दावीदाची ही अखेरची वचने:

“इशायपुत्र दावीदाचा हा संदेश देवामुळे ज्याला थोरवी
    प्राप्त झाली त्याचा हा संदेश.
याकोबच्या देवाचा हा अभिषिक्त
    राजा इस्राएलचा गोड गळ्याचा गायक
परमेश्वराचा आत्मा माझ्या मार्फत बोलला
    त्याचे शब्द माझ्या मुखी होते.
इस्राएलचा देव हे बोलला
    इस्राएलचा दुर्ग मला म्हणाला,
‘जो न्यायाने राज्य करतो,
    जो देवाविषयी आदर बाळगून राज्य करतो.
तो माणूस उष: कालच्या प्रभे सारखा असेल,
    निरभ्र सकाळ असावी तसा असेल,
पावसानंतर येणाऱ्या उन्हासारखा असेल,
    पाऊस कसा तर ज्याच्यामुळे जमिनीतून कोवळे गवत तरारून येतं असा.’

“देवाने माझे घराणे बळकट व सुरक्षित केले.
    देवाने माझ्याबरोबर एक कायमचा करार केला.
तो सर्व दृष्टींनी माझ्या भल्याकरताच आहे याची त्याने खातरजमा करून घेतली.
    त्याने असा मजबूत करार केला आणि आता तो त्याचा भंग करणार नाही.
हा करार म्हणजे माझा उध्दारच होय.
    हा करार म्हणजेच मला हवे होते ते सर्व काही होय.
परमेश्वर माझ्या घराण्याची.
    भरभराट करील.

“पण दुष्ट माणसे काट्यांसारखी असतात.
    लोक काटा धरून ठेवत नाहीत, फेकून देतात.
त्याचा स्पर्श झाला तर लाकडी
    आणि पंचधातूचा भाला टोचावा तशा वेदना होतात.
(होय, असा माणूस काट्यासारखा असतो)
    त्यांना आगीच्या भक्ष्य स्थानी टाकतील
    आणि ती जळून खाक होतील.”

दावीदाचे सैन्य

दावीदाच्या पदरी असलेल्या वीरांची नावे अशी:

योशेब-बश्शेबेथ तखमोनी. हा रथावरच्या सेवकांचा मुख्य होता. असनी अदीनो म्हणूनही त्याला ओळखतात. त्याने एका वेळी आठशे जणांना ठार केले.

त्याच्या खालोखाल. अहोही येथील दोदय याचा मुलगा एलाजार. पलिष्ट्यांना आव्हान दिले त्यावेळी दावीदाबरोबर असलेल्या तीन वीरांपैकी एक. ते युध्दाच्या तयारीने आले, पण इस्राएल सैनिक पळून गेले होते. 10 थकून अंगात त्राण राहिलं नाही तोपर्यंत एलाजार पलिष्ट्यांशी लढत राहिला. तलवार घटृ पकडून त्याने लढा चालू ठेवला. परमेश्वराने त्या दिवशी मोठा विजय घडवून आणला. एलाजारची युध्दात सरशी झाल्यावर मग लोक तिथे आले. पण शत्रू सैनिकांच्या मृतदेहावरच्या वस्तू गोळा करायला तेवढे ते आले.

11 हरार येथील आगे याचा मुलगा शम्मा हा ही होता. पलिष्टी चालून आले तेव्हा एका कडधान्याच्या शेतात हे युध्द झाले. लोकांना पलिष्ट्यांसमोरुन पळ काढला. 12 पण शम्मा शेताच्या ऐन मध्यावर उभा राहिला आणि त्याने एकट्याने त्यांना तोंड दिले. त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. परमेश्वराने इस्राएलला त्यादिवशी मोठा विजय मिळवून दिला.

13 दावीद एकदा अदुल्लामच्या गुहेत होता आणि पलिष्टी सैन्याचा तळ खाली रेफाईच्या खोऱ्यात होता. त्यावेळी तीस शूरांपैकी तिघेजण दावीदाकडे जायला म्हणून थेट गुहेपर्यंत अक्षरश: सरपटत गेले.

14 नंतर एकदा दावीद गडावर असताना पलिष्ट्यांची टोळी बेथलहेम येथे होती. 15 दावीद आपल्या गावाचे पाणी पिण्यासाठी व्याकुळ झाला तो म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतले पाणी मला कुणी आणून दिले तर किती बरे होईल.” खरोखरच कोणी तसे करावे म्हणून तो बोलत नव्हता. तो आपला उगाच तसे म्हणाला. 16 पण या तीन शूरांनी पलिष्ट्यांच्या ठाण्यातून धाडसाने तोंड देत मार्ग काढला आणि बेथलहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतले पाणी काढून दावीदाला प्यायला आणून दिले. दावीदाने ते प्यायचे नाकारले. त्याने ते परमेश्वराला अर्पण म्हणून जमिनीवर ओतून टाकले. 17 दावीद म्हणाला, “परमेश्वरा, हे मी कसे पिऊ? हे पाणी मी प्यायलो तर ज्यांनी आपले प्राण माझ्यासाठी धोक्यात घातले त्यांचे रक्तच मी प्राशन केल्यासारखे होईल.” म्हणून तो ते पाणी प्याला नाही. त्या तीन शूर वीरांनी यासारखी अनेक धाडसे केली.

इतर शूर योध्दे

18 सरूवेचा मुलगा यवाब याचा भाऊ म्हणजे अबीशय. अबीशय या तीन वीरांचा नायक होता. आपल्या भाल्याने त्याने तीनशे शत्रू सैनिकांना ठार केले. आणि त्या तिघांमध्ये नाव मिळवले. 19 त्या तिघांमध्ये तो सर्वाधिक प्रसिद्ध होता. त्यांचा तो नायकही होता. पण तो त्यांच्यापैकी नव्हता.

20 यहोयादा याचा मुलगा बनाया हाही एक होता. तो एका पराक्रमी माणसाचा पुत्र होता. तो कबसेल इथून आलेला होता. बनायाने बरेच पराक्रम गाजवले. मवाबमधील अरीएलच्या दोन मुलांना त्याने मारले. एकदा बर्फ पडत असताना त्याने गुहेत शिरून सिंह मारला. 21 एका धिप्पाड मिसरी माणसालाही त्याने मारले. या मिसरी माणसाच्या हातात भाला होता तर बनायाच्या हातात फक्त काठी. बनायाने त्याचा भाला हिसकावून घेतला आणि त्याच्याच भाल्याने त्या मिसरी माणसाचा जीव घेतला. 22 बनायाने अशी बरीच कृत्ये केली. त्यानेही या तिघांइतकाच नावलौकिक मिळवला. 23 तो तीस वीरांच्या (तीस वीर-दावीदाच्या अतिशय शूर सैनिकांचा गट म्हणजे हे लोक होत.) पेक्षा अधिक प्रसिद्ध होता. पण तरी पहिल्या तिघांच्या पदाला तो पोचला नाही. दावीदाने त्याला आपल्या अंगरक्षकांचा प्रमुख म्हणून नेमले.

तीस शूर वीर

24 यवाबाचा भाऊ असाएल हा त्या तिसातला एक होता. बाकीच्या वीरांची नावे पुढीलप्रमाणे:

बेथलहेममधील दोदो याचा मुलगा एलहानान,

25 शम्मा हरोदी,

अलीका हरोदी,

26 हेलस पलती,

इक्केश तकोई याचा मुलगा ईरा,

27 अबीयेजर अनाथोथी,

मबुन्नय हुशाथी,

28 सलमोन अहोही,

महरय नटोफाथी,

29 बाना नटोफाथी याचा मुलगा हेलेब,

बन्यामीनच्या वंशातील, गिबामधला रीबय याचा मुलगा इत्तय,

30 बनाया पिराथोनी,

गाश झऱ्याजवळचा हिद्दय,

31 अबी-अलबोन अर्वाथी,

अजमावेथ बरहूमी,

32 अलीहाबा शालबोनी,

याशेन घराण्यातला

योनाथान, 33 शम्मा हारारी,

शारार अरारी याचा मुलगा अहीयाम,

34 माकाथीचा मुलगा अहसबय याचा मुलगा अलीफलेट,

अहिथोफेल गिलोनी याचा मुलगा अलीयम,

35 हेस्री कर्मेली,

पारय अर्बी

36 सोबा मधील नाथोन याचा मुलगा इगाल,

बानी यादी,

37 सेलक अम्मोनी,

सरुवेचा मुलगा यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी,

38 ईर इथ्री,

गारेब इथ्री,

39 उरीया हित्ती.

असे एकंदर सदतीस.

गलतीकरांस 3

विश्वासाद्वारे देवाचा आशीर्वाद येतो

अहो मूर्ख गलतीकरांनो! ज्या तुमच्या डोळ्यांसमोर येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलेले जाहीर रितीने तुम्हांला वर्णन करुन सांगितले होते त्या तुम्हांला कोणी भुरळ घातली आहे? मला तुमच्याकडून ही एक गोष्ट शिकायची आहे? आत्म्याची दाने तुम्हाला नियमशास्त्राचे पालन करण्याने मिळाली आहेत की सुवार्ता ऐकून तिच्यावर विश्वास ठेवल्याने मिळाली आहेत? तुम्ही इतके मूर्ख आहात का की, जे जीवन तुम्ही आत्म्यात सुरु केले ते आता देहाने पूर्ण करीत आहात? तुम्ही व्यर्थच इतकी दु:खे अनुभवली का? माझी आशा आहे की ती व्यर्थ नव्हती. देव जो तुम्हांला आत्मा पुरवितो आणि तुम्हामध्ये चमत्कार करतो, तो तुम्ही नियमशास्त्राचे पालन करता म्हणून का सुवार्ता ऐकून तीवर विश्वास ठेवला म्हणून तो हे करतो.

ते, अब्राहामाविषयी पवित्र शास्त्र सांगते तसे आहे: “त्याने देवावर विश्वास ठेवला, आणि ते त्याच्यासाठी देवाकडून नीतिमत्त्व असे गणण्यात आले.” मग तुम्हाला समजले पाहिजे की जे विश्वास ठेवतात, तेच अब्राहामाचे खरे वंशज आहेत. पवित्र शास्त्राने आधीच सांगितले आहे की, देव विदेशी लोकांना त्यांच्या विश्वासाने नीतिमान ठरवील. त्याने अब्राहामाला पूर्वीच सुवार्ता सांगितली की, “तुझ्याद्वारे सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.” म्हणून ज्यांचा विश्वास आहे त्यांना विश्वासणाऱ्या अब्राहामासह आशीर्वाद मिळेल.

10 परंतु नियमशास्त्राच्या कृतीवर जे अवलंबून राहतात ते शापित आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, “नियमशास्त्राच्या पुस्तकात लिहिलेल्या सर्व गोष्टी करण्यात जो कोणी टिकून राहत नाही, तो शापित असो.” 11 नियमशास्त्रामुळे कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरत नाही, हे उघड आहे. कारण शास्त्र सांगते की, “विश्वासामुळे नीतिमान मनुष्य जगेल.”

12 नियमशास्त्र विश्वासाचे नाही. त्याऐवजी पवित्र शास्त्र असे सांगते की, “जो कोणी ते पाळतो तो त्यामुळे जगेल.” 13 ख्रिस्ताने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून मुक्त केले आहे. आपणासाठी शाप होऊन त्याने हे केले. असे लिहिले आहे: “प्रत्येकजण जो कोणी झाडावर टांगला आहे तो शापित असो.” 14 ख्रिस्ताने आम्हाला मुक्त केले यासाठी की, अब्राहामाला मिळालेला आशीर्वाद ख्रिस्ताद्वारे विदेश्यांना मिळावा. यासाठी की विश्वासाद्वारे आम्हांला आत्म्याचे अभिवचन मिळावे.

नियमशास्त्र आणि अभिवचन

15 बंधूंनो, मी तुम्हांला रोजच्या जीवनातील उदाहरण देतो. ज्याप्रमाणे मनुष्यांनी केलेला करार कोणीही रद्द करत नाही किंवा त्यात भर घलीत नाही. याबाबतीतसुद्धा तसेच आहे. 16 अब्राहामाला व त्याच्या वंशजांना अभिवचने दिलेली होती. लक्षात घ्या की, ते “आणि त्याच्या वंशजांना” असे अनेकजणांसांबंधी म्हणत नाही, तर जसे काय ते एका व्यक्तीला म्हणते, “आणि तुझ्या संतानाला” (आणि तो वंशज) ख्रिस्त आहे. 17 माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की, देवाने अगोदर निश्चित केलेला करार चारशे तीस वर्षे उशिरा आलेल्या नियमशास्त्राने अभिवचन रद्द करण्यास केला नव्हता.

18 कारण वतन जर नियमशास्त्रावर अवलंबून होते, तर येथून पुढे ते अभिवचनावर अवलंबून असणार नाही. परंतु देवाने अभिवचनामुळे अब्राहामाला मुक्तपणे हे वतन दिले.

19 तर मग, नियमशास्त्राचा उद्देश काय होता? ज्या संतानाला वचन दिले होते त्याच्या येण्यापर्यंत पापामुळे ते अभिवचनाला जोडण्यात आले होते. नियमशास्त्र हे देवदूताकरवी मोशे या मध्यस्थाच्या होती देण्यात आले. 20 आता मध्यस्थ हा फक्तएकाच पक्षाचा नसतो. पण देव एकच आहे आणि त्याची अभिवचने दुसऱ्या पक्षावर अवलंबून नाहीत.

मोशेच्या नियमशास्त्राचा हेतु

21 नियमशास्त्र हे देवाच्या अभिवचनाविरुद्ध आहे, असा याचा अर्थ होतो का? अर्थातच नाही! कारण लोकांना जीवन आणण्यासाठी जर नियमशास्त्र देण्यात आले असेल, तर मग नीतिमत्त्व त्याच नियमशास्त्राद्वारे येईल. 22 पण पवित्र शास्त्राने स्पष्ट केले आहे की, संपूर्ण जग ह पापाच्या सामर्थ्याने जखडून टाकले होते, यासाठी की, जे अभिवचन देण्यात आले होते ते जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्यांना देण्यात यावे.

23 हा विश्वास येण्याअगोदर नियमशास्त्राने आपणांस कैद्याप्रमाणे पहाऱ्यात ठेवले होते. आणि हा येणारा विश्वास आम्हांला प्रगट होईपर्यंत आम्हांला कैदी म्हणून ठेवण्यात आले होते. 24 त्यामुळे आपल्या विश्वासाच्या आधारे आपण नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र जे आपणांला ख्रिस्ताकडे घेऊन येणारे होते, ते आपले पालक होते. 25 पण आता हा विश्वास आलाच आहे, तर यापुढे आम्ही या कडक पालकाच्या अधीन नाही.

26-27 कारण तुम्ही सर्व सुवार्तेवर विश्वास ठेवल्यामुळे येशू ख्रिस्ताद्वारे देवाचे पुत्र आहात. कारण तुम्ही जितक्यांनी ख्रिस्तात बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. 28 तेथे यहूदी किंवा ग्रीक, गुलाम किंवा स्वतंत्र, पुरुष किंवा स्त्री हा भेदच नाही. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूमध्ये एक आहात. 29 आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर तुम्ही अब्राहामाचे संतान आणि देवाने अब्राहामाला दिलेल्या वचनानुसार वारस आहात.

यहेज्केल 30

बाबेलचे सैन्य मिसरवर चढाई करील

30 मला पुन्हा परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला, “मानवपुत्रा, माझ्यावतीने बोल. ‘मी पुढील गोष्टी सांगतो असे सांग.

“‘ओरडून सांग
    “तो भयंकर दिवस येत आहे.”
तो दिवस नजीक आहे.
हो! परमेश्वराचा न्यायाचा दिवस जवळ आहे.
    तो ढगाळ दिवस असेल.
    ती राष्ट्रांची न्यायनिवाडा करण्याची वेळ असेल.
मिसरविरुद्ध तलवार उठेल.
    मिसरच्या पतनाच्या वेळी कुश देशातील लोकांचा भीतीने थरकाप उडेल.
बाबेलचे सैन्य मिसरच्या लोकांना कैदी करुन नेईल.
    मिसरचा पाया उखडला जाईल.

“‘खूप लोकांनी मिसरबरोबर शांतता करार केला. पण ते सर्व म्हणजे कुशी पूटी लूदी, अरेबिया येथील लोक, मिश्र जाती, कूबी आणि इस्राएल लोक यांचा नाश होईल.

“‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो:
मिसरला मदत करणारे आपटतील,
    त्यांच्या सत्तेचा तोरा उतरेल.
मिग्दोलपासून सवेनेपर्यंतचे मिसरचे लोक युद्धात मारले जातील.”
परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला,
मिसर नाश झालेल्या देशांच्या मालिकेत जाऊन बसेल.
    मिसर त्या ओसाड देशांपैकी एक होईल.
मी मिसरमध्ये आग लावीन
    आणि मिसरच्या सर्व सहाय्यकांचा नाश करीन.
मगच त्यांना कळेल की मी परमेश्वर आहे.

“‘त्याच वेळी, मी बाहेर दूत पाठवीन ते जहाजातून कूशला वाईट बातमी सांगण्यासाठी जातील. आता कूशला सुरक्षित वाटते. पण मिसरच्या शिक्षेच्या वेळी कूशमधील लोकांचा भीतीने थरकाप उडेल. ती वेळ येत आहे!’”

10 परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो की
“मिसरच्या लोकांचा नाश करण्यासाठी
    मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरचा उपयोग करीन.
11 सर्व राष्ट्रामध्ये, नबुखद्नेस्सर
    व त्याचे लोक भयंकर आहेत
    आणि मिसरचा नाश करण्यासाठी मी त्यांना आणीन.
ते मिसरविरुद्ध तलवारी उपसतील.
    ती भूमी प्रेतांनी भरुन टाकतील.
12 मी नाईल नदीला कोरडी करीन
    आणि ती जागा दुष्टांना विकीन.
मी, परमेश्वर, सांगतो की
    परक्यांकरवी मी ती भूमी ओसाड करीन.”

मिसरच्या मूर्तीचा नाश होईल

13 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो:
“मी मिसरमधील मूर्तींचा सुध्दा नाश करीन.
    मी नोफातील पुतळे त्यापासून दूर करीन.
ह्यापुढे मिसरमध्ये कोणीही नेता नसेल.
    मी मिसरमध्ये भीतीचे साम्राज्य निर्माण करीन.
14 मी पथ्रोसला ओसाड करीन.
    सोअनास आग लावीन
    मी नोला शिक्षा करीन.
15 मिसरचा गड जो सीन त्यावर मी माझा संपूर्ण राग काढीन.
मी नोच्या लोकांचा नाश करीन.
16 मी मिसरला आग लावीन.
    सीनला खूप वेदना होतील.
सैनिक नो शहरात घुसतील
    आणि नोफाला रोज नव्या नव्या अडचणी येतील.
17 आवेन व पी बेसेथ येथील तरुण युद्धात मारले जातील
    आणि स्त्रियांना धरुन नेतील.
18 ज्या दिवशी मी मिसरचे नियंत्रण मोडीन, तो दिवस तहपन्हेसचा काळा दिवस असेल.
    मिसरच्या उन्मत्त सत्तेचा अंत होईल.
मिसरला ढग झाकेल आणि
    त्याच्या मुलींना कैद करुन नेले जाईल.
19 अशा रीतीने, मी मिसरला शिक्षा केल्यावर,
    त्यांना मी परमेश्वर आहे, हे पटेल.”

मिसर कायमचा दुर्बल होईल

20 परागंदा काळातील अकराव्या वर्षांच्यां पहिल्या महिन्याच्या (एप्रिलच्या) सातव्या दिवशी, मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला, 21 “मानवपुत्रा, मिसरच्या राजाचा फारोचा हात (सत्ता) मी मोडला आहे. त्याला कोणीही मलमपट्टी करणार नाही व औषधही लावणार नाही. तो बरा होणार नाही. त्यांच्या हाताला तलवार धरण्याची शक्ती येणार नाही.”

22 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “मी मिसरचा राजा फारो याच्याविरुद्ध आहे. मी त्याचे दोन्ही हात एक चांगला असलेला व दुसरा मोडलेला, मोडीन. मी त्याला त्याच्या हातातून तलवार टाकायला भाग पाडीन. 23 मी मिसरच्या लोकांना राष्ट्रां-राष्ट्रांत विखरुन टाकीन. 24 मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करीन. मी माझी तलवार त्याच्या हाती देईन. पण मी फारोचे हात तोडीन. मग तो मरणयातना भोगणाऱ्या माणसाप्रमाणे आक्रोश करील. 25 मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करीन, पण फारोचे हात तोडून टाकीन. मग त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.

“मी माझी तलवार बाबेलच्या राजाला देईन. तो ती मिसरवर उपसेल. 26 मी मिसरी लोकांना इतर राष्ट्रांत विखरुन टाकेल म्हणजे त्यांना मीच परमेश्वर आहे हे कळेल.”

स्तोत्रसंहिता 78:38-72

38 परंतु देव दयाळू होता.
    देवाने त्यांना त्यांच्या पापांबद्दल क्षमा केली आणि त्याने त्यांचा नाश केला नाही.
देवाने अनेक वेळा स्वत:चा राग आवरला.
    त्याने स्वत:ला खूप राग येऊ दिला नाही.
39 ती केवळ माणसेच आहेत याची देवाने आठवण ठेवली.
    लोक वाऱ्याप्रमाणे आहेत. तो वाहातो आणि ओसरतो.
40 त्या लोकांनी वाळवंटात देवाला अनेक संकटांत टाकले
    त्यांनी त्याला खूप दु:खी केले.
41 मग लोकांनी पुन्हा पुन्हा देवाच्या सहनशक्तीची परीक्षा घेतली,
    त्यांनी इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराला खूप दु:ख दिले.
42 ते लोक देवाची शक्ती विसरले.
    देवाने त्यांचा किती वेळा त्यांच्या शत्रूंपासून बचाव केला हे ते विसरले.
43 मिसर देशातल्या चमत्कारा बाबत ते विसरले.
    सोअन प्रांतातला चमत्कारही ते विसरले.
44 देवाने नद्यांचे रक्तात रुपांतर केले.
    मिसरमधले लोक पाणी पिऊ शकले नाहीत.
45 देवाने चावणाऱ्या माशांचे थवे पाठवले.
    ते मिसरमधल्या लोकांना चावले, देवाने बेडूक पाठवले.
    त्यांनी मिसरमधल्या लोकांच्या आयुष्याचा नाश केला.
46 देवाने त्यांची पिके नाकतोड्यांच्या हवाली केली
    आणि इतर झाडांवर टोळ धाड पाठवली.
47 देवाने त्यांच्या द्राक्षवेलींचा नाश करण्यासाठी गारांचा पाऊस पाडला
    आणि झाडांचा नाश करण्यासाठी त्याने बर्फाचा उपयोग केला.
48 देवाने गारांच्या वर्षावाने त्यांच्या प्राण्यांचा नाश केला
    आणि त्यांच्या पशुधनावर त्याने वीज पाडली.
49 देवाने मिसरच्या लोकांना आपला राग दाखवला.
    त्याने त्याचे विध्वंसक दूत त्यांच्याविरुध्द पाठवले.
50 देवाने आपला राग व्यक्त करण्यासाठी एक मार्ग शोधला.
    त्याने त्या लोकांपैकी कुणालाही जगू दिले नाही.
    त्याने त्यांना एका भयंकर रोगाचे बळी केले.
51 देवाने मिसरमध्ये जन्मलेल्या सर्व पहिल्या मुलांना मारुन टाकले.
    त्याने हाम कुटुंबात जन्मलेल्या पहिल्या मुलांनाही मारले.
52 नंतर देवाने इस्राएलला मेंढपाळा सारखे नेले.
    त्याने त्याच्या लोकांना मेंढ्यासारखे वाळवंटात नेले.
53 त्याने त्याच्या माणसांना काळजीपूर्वक मार्गदर्शन केले
    देवाच्या माणसांना कशाचीच भीती वाटली नाही.
    देवाने त्यांच्या शत्रूंना लाल समुद्रात बुडविले.
54 देवाने त्याच्या माणसांना त्याच्या पवित्र देशात
    त्याने त्याच्या सामर्थ्याने घेतलेल्या डोंगरावर नेले.
55 देवाने इतर देशांना ती जमीन सोडून जायला भाग पाडले.
    देवाने प्रत्येक कुटुंबाला जमिनीचा त्यांचा हिस्सा दिला.
    देवाने इस्राएलाच्या प्रत्येक कुटुंबाला राहायला स्वःतचे घर दिले.
56 परंतु त्यांनी सर्वशक्तिमान देवाची परीक्षा घेतली आणि त्याचे त्याला खूप वाईट वाटले.
    त्या लोकांनी देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत.
57 इस्राएलाच्या लोकांनी देवाकडे पाठ फिरवली.
    जसे त्याचे पूर्वज त्याच्याविरुध्द गेले तसेच ते त्याच्या विरुध्द गेले.
    ते वाकवलेल्या धनुष्याप्रमाणे अतिशय वाईट होते.
58 इस्राएलाच्या लोकांनी प्रार्थनेसाठी उंच जागा बांधल्या आणि देवाला क्रोधित केले.
    त्यांनी चुकीच्या देवाचे पुतळे केले आणि देवाला असूया आणली.
59 देवाने हे ऐकले आणि तो खूप रागावला,
    देवाने इस्राएलला पूर्णपणे झिडकारले.
60 देवाने शिलोहचा पवित्र तंबू सोडून दिला.
    देव लोकांच्या बरोबर त्यांच्या तंबूत राहिला.
61 देवाने इतर देशांना त्याच्या माणसांना पकडू दिले.
    शत्रूंनी देवाचे “सुंदर रत्न” घेतले.
62 देवाने त्याच्या माणसांवरचा त्याचा राग व्यक्त केला,
    त्याने त्यांना युध्दात मरु दिले.
63 तरुण माणसे जळून मेली आणि ज्या मुलींशी ते लग्न करणार होते
    त्यांनी विवाहाची गाणी म्हटली नाहीत.
64 याजक मारले गेले पण विधवा
    त्यांच्यासाठी रडल्या नाहीत.
65 शेवटी आमचा प्रभु झोपेतून उठलेल्या माणसासारखा,
    खूप द्राक्षारस प्यायलेल्या सैनिकासारखा उठला.
66 देवाने त्याच्या शत्रूंना माघार घ्यायला भाग पाडले आणि त्यांचा पराभव केला.
    देवाने त्याच्या शत्रूचा पराभव केला आणि त्यांना कायमची नामुष्की आणली.
67 परंतु देवाने योसेफाच्या कुटुंबाला झिडकारले,
    देवाने एफ्राईमच्या कुटुंबाचा स्वीकार केला नाही.
68 नाही, देवाने यहुदाच्या कुटुंबाला निवडले,
    देवाने त्याच्या आवडत्या सियोन पर्वताची निवड केली.
69 देवाने त्याचे पवित्र मंदिर उंच पर्वतावर बांधले.
    देवाने त्याचे मंदिर पृथ्वीसारखे कायमचे राहील असे बांधले.
70 देवाने दावीदाला स्वत:चा खास सेवक म्हणून निवडले.
    दावीद मेंढ्यांच्या वाड्यांचे रक्षण करीत होता.
    परंतु देवाने त्याला त्याच्या कामापासून दूर नेले.
71 दावीद मेंढ्यांची काळजी घेत होता.
    परंतु देवाने त्याला त्या कामापासून दूर नेले.
देवाने दावीदाला त्याच्या माणसांकडे, याकोबाच्या माणसांकडे,
    इस्राएलाच्या माणसांकडे आणि देवाच्या मालमत्तेकडे लक्ष देण्याचे काम करायला सांगितले.
72 आणि दावीदाने त्यांना शुध्द मनाने मार्ग दाखवला,
    त्याने त्यांना शहाणपणाने मार्ग दाखवला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center