Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 शमुवेल 22

दावीदाचे देवाप्रीत्यर्थ स्तुतिगीत

22 शौल आणि इतर शत्रू यांच्या हातून देवाने सोडवल्याबद्दल दावीदाने हे स्तुतिगीत म्हटले.

परमेश्वर हा माझा दुर्ग माझा गड माझ्या सुरक्षिततेचा आधार
    तो माझा देव माझ्या संरक्षणासाठी मी या दुर्गाच्या, देवाच्या आश्रयाला जातो.
देव म्हणजे माझी संरक्षक ढाल आहे त्याचे सामर्थ्य माझे रक्षण करते.
    परमेश्वर म्हणजे माझी लपण्याची जागा,
माझ्या सुरक्षिततेचे ठिकाण उंच डोंगरात असलेले.
    क्रूर शत्रूपासून तो मला वाचवतो.
त्यांनी माझी चेष्टा केली.
    पण मी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला
    आणि शत्रूपासून माझा बचाव करण्यात आला.

(शत्रूंना माझा जीव घ्यायचा होता) मृत्यूच्या लाटा माझ्याभोवती थैमान घालत होत्या.
    मृत्युसदनाला नेणाऱ्या पुराच्या लोंढ्यात मी सापडलो होतो.
कबरीचे पाश माझ्या भोवती आवळले होते.
    मृत्यूचा सापळा माझ्यासमोर तयार होता.
तेव्हा मी परमेश्वराचा धावा केला. होय,
    मी त्यालाच शरण गेलो.
देव त्याच्या मंदिरात होता त्याने माझा धावा ऐकला.
    मदतीसाठी केलेला माझा आक्रोश त्याने ऐकला.
तेव्हा धरती डळमळली,
    हादरली स्वर्गाचा पाया थरथरला
    कारण देवाचा कोप झाला होता.
त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता.
    मुखातून अग्निज्वाळा बाहेर पडत
    होत्या ठिणग्या बरसत होत्या.
10 आकाश फाडून परमेश्वर खाली अवतरला.
    काव्व्याकुटृ ढगावर उभा राहिला.
11 करुबावर आरुढ होऊन तो उडत होता.
    वाऱ्यावर स्वार झाला होता.
12 परमेश्वराने दाट काळे ढग स्वतःभोवती तंबू सारखे वेढून घेतले होते.
    त्याने त्या दाट गडगडणाऱ्या मेघामध्ये पाणी भरुन ठेवले होते.
13 त्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला की
    निखारे धगधगू लागले.
14 परमेश्वर आकाशातून गरजला
    त्याचा आवाज सर्वत्र दुमदुमला
15 त्याने विजांचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली.
    परमेश्वराने विजा पाठवल्या आणि लोक भीतीने सैरावैरा पळाले

16 परमेश्वरा, तुझ्या घनगंभीर आवाजात तू बोललास तेव्हा
    तुझ्या नाकपुड्यातील सोसाट्याच्या उच्छ्‌वासाने
(समुद्राचे पाणीही मागे हटले) समुद्राचा तळ दिसू लागला,
    पृथ्वीचा पाया उघडा पडला.

17 मला परमेश्वराने आधार दिला वरुन तो खाली आला.
    मला धरून त्याने संकटांच्या खोल पाण्यातून बाहेर काढले.
18 शत्रू मला वरचढ होता. त्यांना माझा मत्सर वाटला.
    शत्रू बलाढ्य होता पण परमेश्वराने मला वाचवले.
19 मी अडचणीत होतो तेव्हा शत्रूने माझ्यावर हल्ला केला.
    पण देवाने मला आधार दिला.
20 परमेश्वराचा माझ्यावर लोभ आहे म्हणून त्याने मला सोडवले.
    मला त्याने सुरक्षित स्थळी नेले.
21 मी केले त्याचे फळ परमेश्वर मला देईल कारण मी योग्य तेच केले.
    मी गैर काही केले नाही, तेव्हा त्याचे चांगले फळ तो मला देईल.
22 कारण मी परमेश्वराचे आज्ञापालन केले.
    देवाविरुध्द कोणताही आपराध मी केला नाही.
23 परमेश्वराचे निर्णय मी नेहमी ध्यानात ठेवतो.
    त्याच्या नियमांचे पालन करतो.
24 माझे आचरण शुध्द
    आणि निर्दोष आहे.
25 तेव्हा परमेश्वर त्याचे फळ मला देणारच.
    कारण माझी वर्तणूक योग्य आहे.
त्याच्या दृष्टीने मी वावगे केलेले नाही.
    तेव्हा तो माझे भले करील.

26 एखाद्याचे आपल्यावर खरे प्रेम असेल तर आपणही त्याची भरपाई खऱ्या प्रेमाने करु.
    तो आपल्याशी प्रामाणिक असेल तर आपणही प्रामाणिक राहू.
27 परमेश्वरा, जे लोक चांगले आणि शुध्द आचरणाचे आहेत त्यांच्याशी तूही तसाच वागतोस.
    पण दुष्ट आणि बदमाशांशी तूही कुटिलतेने वागतोस.
28 परमेश्वरा, दीनांना तू मदत करतोस,
    गर्विष्ठांना धडा शिकवतोस
29 परमेश्वरा, तू माझा दीप आहेस
    माझ्या भोवतीचा अंधकार तू उजळवून टाकतोस
30 परमेश्वरा, तुझ्या मदतीनेच मी सैन्यावर चाल करु शकतो.
    देवाच्या मदतीनेच मी शत्रूंची भिंतसुध्दा पार करु शकतो.

31 देवाची सत्ता सर्वंकष आहे.
    देवाचे वचन कसोटीला उतरलेले आहे.
    जे त्याच्यावर भरवसा टाकतात त्यांचे तो रक्षण करतो.
32 या परमेश्वरा खेरीज दुसरा देव कोणता?
    याच्याखेरीज भक्कम दुर्ग कोण?
33 देव माझा मजबूत दुर्ग आहे.
    सात्विक लोकांना तो आपल्या मार्गाने नेतो.
34 देव मला हरणासारखे वेगाने पळण्यास मदत करतो.
    तो मला आत्मविश्वास देतो आणि उच्च स्थानावर तो मला अढळ ठेवतो.
35 युध्दकलेत तो मला तरबेज बनवतो त्यामुळे
    माझे बाहू भक्कम धनुष्याने शिरसंधान करु शकतात.

36 देवा, तूच मला वाचवलेस आणि जिंकायला मदत केलीस.
    शत्रूचा पाडाव करण्यात मला हात दिलास.
37 माझ्या पायांत बळ दे म्हणजे
    मी न अडखळता ताठ चालू शकेन.
38 शत्रूंचा नि:पात होईपर्यंत मला त्यांचा पाठलाग करायचा आहे.
    त्यांचा उच्छेद होई पर्यंत मी परतणार नाही.
39 त्यांचा मी नाश केला.
    त्यांचा पराभव केला.
आता ते शत्रू डोके वर काढू शकणार नाहीत.
    होय, ते माझ्या पायदळी तुडवले गेले.

40 देवा, युध्दात तू मला वरचढ केलेस.
    शत्रूचा पाडाव केलास.
41 त्यांना मला पाठ दाखवायला लावलेस,
    म्हणजे मी त्यांच्यावर वार करु शकेन.
42 शत्रू मदतीसाठी याचना करु लागले
    पण कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही.
त्यांनी देवाचा धावाही केला
    त्यानेही त्यांच्याकडे पाठ फिरवली.
43 माझ्या शत्रूची मी खांडोळी केली.
    जमिनीवरच्या धुळीसारखे ते कणपदार्थ बनले.
त्यांचा मी चेंदामेंदा केला.
    चिखल तुडवावा तसे मी त्यांना तुडवले.

44 माझ्यावर जे चाल करुन आले त्यांच्यापासून तू मला संरक्षण दिलेस.
    त्यांच्यावर राज्यकर्ता म्हणून मला नेमलेस.
    ज्यांना मी कधी बघितले नव्हते ती राष्ट्रे माझे दास झाली.
45 आता दूर देशचे लोक माझे ऐकतात,
    जेव्हा ते माझी आज्ञा ऐकतात,
तात्काळ माझा शब्द मानतात.
    माझा त्यांना धाक वाटतो.
46 भीतीने ते गर्भगळीत होतात.
    हे परदेशी लोक जिथे लपून बसले होते ती जागा सोडून भीतीने थरथर कापत बाहेर येतात.

47 परमेश्वर जिवंत आहे.
    माझ्या दुर्गाची मी स्तुती करतो देव महान आहे.
    तो माझा रक्षणकर्ता दुर्ग आहे.
48 त्यानेच माझ्या शत्रूंना धडा शिकवला.
    लोकांना माझ्या शासनामध्ये ठेवले.
49 देवा, तू माझे वैऱ्यांपासून रक्षण केलेस.

मला विरोध करणाऱ्यांचा पाडाव करण्याचे सामर्थ्य मला दिलेस.
    दुष्टांपासून मला वाचवलेस.
50 म्हणून मी राष्ट्राराष्ट्रांमध्ये आभारपूर्वक तुझी स्तुतिस्तोत्रे गाईन.
    तुझे नामसंकीर्तन करीन.

51 परमेश्वर राजाला युध्दात विजयी करतो.
    आपल्या अभिषिक्त राजाबद्दल परमेश्वर खरे प्रेम दाखवतो.
    दावीद आणि त्याचे वंशज यांचे तो निरंतर कल्याण करील.

गलतीकरांस 2

इतर प्रेषितांनी पौलाचा स्वीकार केला

मग चौदा वर्षांच्या काळानंतर मी पुन्हा यरुशलेमास गेलो. मी बर्णबाबरोबर गेलो. तीतालासुद्धा माझ्याबरोबर घेतले. मी जावे असे देवाने मला प्रगट केले, म्हणून मी गेलो. ज्याप्रमाणे मी पूर्वी यहूदीतर लोकामध्ये सुवार्ता सांगितली तशी मी खाजगीपणे पुढाऱ्यांच्या सभेतसुद्धा सुवार्ता सांगितली. यासाठी की, भूतकाळातील किंवा चालू स्थितीला माझे काम व्यर्थ जाऊ नये.

त्याचा परिणाम असा झाला की, तीत, जो माझ्याबरोबर होता, तो ग्रीक असतानाही त्याला सुंता करवून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही. कारण ख्रिस्त येशूमध्ये आम्हांला जे स्वातंत्र्य मिळाले ते हेरण्यासाठी व आम्हांला गुलाम करता यावे म्हणून ज्या खोट्या विश्वासणाऱ्यांना आत आणणयात आले त्यामुळे हे झाले. सुवार्तेमधील सत्य तुमच्याजवळच राहावे म्हणून आम्ही क्षणभरदेखील त्यांना वश झालो नाही.

जे लोक महत्त्वाचे आहेत असे लोक समजत होते त्यांच्याकडून मला काहीही मिळाले नाही. जे कोणी ते होते त्यांच्यामुळे मला काही फरक पडला नाही; सर्व माणसे देवासमोर सारखीच आहेत. काहीही असो, त्या प्रतिष्ठित माणसांनी माझ्यामध्ये किंवा माझ्या संदेशांमध्ये कोणतीही भर टाकली नाही. उलट, जेव्हा ते म्हणतात की, विदेशी लोकांना सुवार्ता सांगण्याचे कार्य माझ्यावर सोपविण्यात आले आहे, ज्याप्रमाणे पेत्राला यहूदी लोकांना सुवार्ता सांगण्याचे कार्य सोपविलेले आहे. कारण ज्याने पेत्राला यहूदी लोकाकरिता प्रेषित बनविले त्यानेच मला विदेशी लोकांकरिता प्रेषित बनविले. म्हणून याकोब, पेत्र व योहान ज्यांची मंडळीचे आधारस्तंभ म्हणून प्रसिद्धी होती, त्यांनी देवाने मला दिलेला अधिकार ओळखला आणि बर्णबा व माझ्याशी सहभागितेचे चिन्ह म्हणून हात मिळविला व सहमती दर्शविली की आम्ही विदेशी लोकांमध्ये जाऊन संदेश द्यावा. आणि त्यांनी जाऊन यहूदी लोकांना उपदेश करावा. 10 त्यांनी फक्त हेच सांगितले की, त्यांच्या गरिबांना मदत करण्याची आम्ही आठवण ठेवावी, आणि मी ते सर्व करण्यास राजी होतो एवढेच नव्हे तर ते करण्यास अधीर झालो होतो.

पेत्राची चूक झाली असे पौल दाखवून देतो

11 पण, जेव्हा पेत्र अंत्युखियात आला तेव्हा मी त्याला उघडपणे विरोध केला, कारण त्याने स्पष्टपणे चूक केली होती. 12 कारण याकोबाने पाठविलेली काही माणसे येण्यापूर्वी पेत्र विदेशी लोकांबरोबर जेवत असे. पण जेव्हा ते (याकोबाने पाठविलेले यहूदी) आले तेव्हा त्याने अंग काढून घेतले आणि तो विदेशी लोकांपासून वेगळा झाला, कारण या यहूदी लोकांचा विश्वास होता की, विदेशी माणसांची सुंता झालीच पाहिजे, म्हणून त्यांची त्याला भीती वाटत होती. 13 व बाकीचे यहूदी लोकसुद्धा त्याच्या ढोंगामध्ये सामील झाले, येथपर्यंत की, बर्णबासुद्धा त्यांच्या ढोंगाला वश झाला. 14 जेव्हा मी पाहिले की, सुवार्तेच्या सत्याच्या सरळ मार्गात ते योग्य प्रकारे वागत नाहीत, तेव्हा मी सर्वासमोर पेत्राला म्हणालो, “जर तू जो यहूदी आहेस व यहूदीतरांप्रमणे वागत आहेस व यहूदी माणसाप्रमाणे वागत नाहीस तर तू विदेशी लोकांना यहूदी लोकांच्या चालीरीतींचे अनुकरण करण्यास त्यांना कसे भाग पाडू शकतोस?”

15 आम्ही जन्माने यहूदी आहोत आणि “पापी यहूदीतर लोकांपैकी” नाही. 16 तरीही आम्हांला माहीत होते की, मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याने ठरतो, म्हणून आम्ही आमचा विश्वास येशू ख्रिस्तावर ठेवला आहे. यासाठी की, ख्रिस्तावरील विश्वासाने आम्ही नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे. कारण कोणीही देहधारी मनुष्य नियमाशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरणार नाही.

17 पण जर, आम्ही ख्रिस्तामध्ये नीतिमान होण्याचे पाहतो, तर आम्ही यहूदीसुद्धा विदेश्यांप्रमाणे पापी असे आढळतो. याचा अर्थ असा आहे की, ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? 18 अर्थातच नाही! कारण जर मी या सोडून दिलेल्या पद्धतीप्रमाणे पुन्हा शिकविण्यास सुरुवात केली, तर मी नियमशास्त्र मोडणारा होतो. 19 कारण नियमशास्त्रामुळे मी नियमशास्त्राला “मेलो” यासाठी की मी देवासाठी जगावे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेलो. 20 यासाठी की यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो, आता देहामध्ये जे जीवन मी जगतो ते मी ज्याने माझ्यावर प्रीती केली आणि माझ्याऐवाजी स्वतःला दिले त्या देवाच्या पुत्रावरील विश्वासाने जगतो. 21 मी देवाची कृपा नाकारीत नाही. कारण जर नीतिमत्व नियम शास्त्रामुळे मिळत असेल तर ख्रिस्त विनाकारण मरण पावला.

यहेज्केल 29

मिसरबाबत संदेश

29 परागंदा अवस्थेच्या दहाव्या वर्षाच्या, दहाव्या महिन्याच्या बाराव्या दिवशी मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला, “मानवपुत्रा, मिसरचा राजा फारो याच्याकडे पाहा, माझ्यावतीने त्याच्याबद्दल व मिसरबद्दल बोल. त्याला सांग ‘प्रभू, माझा परमेश्वर, म्हणतो:

“‘मिसरचा राजा, फारो, मी तुझ्याविरुद्ध आहे.
    तू नाईल नदीकिनारी पडून राहणारा प्रचंड समुद्रातला राक्षस आहेस.
तू म्हणतोस, “ही माझी नदी आहे!
    मी ही नदी निर्मिली”

4-5 “‘पण मी तुझ्या जबड्यात गळ अडकवीन.
    नाईल नदीतील मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील.
मी तुला आणि त्या माशांना नदीतून ओढून बाहेर काढीन
    व जमिनीवर टाकीन.
तेथून तुम्हाला कोणी उचलणार नाही
    वा पुरणार नाही.
मी तुम्हाला पक्षी व हिंस्र पशू यांच्या स्वाधीन करीन.
    तुम्ही त्यांचे भक्ष्य व्हाल.
मगच मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना
    कळून येईल की मीच परमेश्वर आहे.

“‘मी ह्या गोष्टी का करीन.?
कारण इस्राएलचे लोक मिसरवर अवलंबून होते.
    पण मिसर म्हणजे गवताचे कमकुवत पाते होता.
इस्राएलचे लोक मिसरवर विसंबले.
    पण मिसरने फक्त त्यांचे हात आणि खांदे विंधले.
ते तुझ्या आधारावर राहिले.
    पण तू त्यांची पाठ मोडून पिरगळलीस.’”

म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो,
“मी तुझ्याविरुद्ध तलवार आणीन.
    मी तुझी सर्व माणसे व सर्व प्राणी नष्ट करीन.
मिसर ओसाड होईल. त्याचा नाश होईल.
    मग त्यांना समजेल की मी देव आहे.”

देव म्हणाला, “मी असे का करीन.? कारण तू म्हणालास ‘नदी माझी आहे. मी तिला निर्माण केले.’ 10 म्हणून मी (देव) तुझ्याविरुद्ध आहे. मी नाईल नदीच्या पुष्कळ पाटांच्या विरुद्ध आहे. मी मिसरचा संपूर्ण नाश करीन. मिग्दोलपासून सवेनेपर्यंतच नव्हे, तर कुशाच्या सीमेपर्यंतची तुझी सर्व गावे मी ओस पाडीन. 11 कोणी मनुष्य वा प्राणी मिसरमधून जाणार नाही. 12 चाळीस वर्षे कोणीही तेथे राहणार नाही. मी मिसऱ्यांना इतर राष्ट्रांत विखरुन टाकीन. मी त्यांना परदेशात रोवीन.”

13 प्रभू, माझा परमेश्वर, म्हणतो, “मी मिसरच्या लोकांना पुष्कळ राष्ट्रांत विखरुन टाकीन. पण 40 वर्षानंतर मी त्यांना पुन्हा एकत्र करीन. 14 मिसरच्या कैद्यांना मी परत आणीन. मी त्यास त्यांच्या जन्मभूमीत पथ्रोस देशात परत आणीन. पण त्यांचे राज्य महत्वाचे राहणार नाही. 15 ते अगदी कमी महत्वाचे राज्य होईल. ते कधीच इतर राष्ट्रांपेक्षा वरचढ होणार नाही. मी त्याला एवढे लहान करीन की ते दुसऱ्या राष्ट्रांवर सत्ता गाजविणार नाही. 16 आणि इस्राएलचे लोक पुन्हा कधीही मिसरवर विसंबणार नाहीत. इस्राएल लोकांना त्यांचे पाप आठवेल. मदतीसाठी देवाकडे न जाता आपण मिसरकडे गेलो हे त्यांना आठवेल आणि त्यांना समजेल की मीच परमेश्वर, प्रभू, आहे.”

मिसर बाबेलला मिळेल

17 परागंदा अवस्थेच्या सत्ताविसाव्या वर्षाच्या, पहिल्या महिन्याच्या (एप्रिलच्या) पहिल्या दिवशी, मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला. 18 “मानवपुत्रा, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने आपल्या सैन्याला सोरविरुद्ध जोराची लढाई करायला लावली. त्यांनी प्रत्येक सैनिकाचा गोटा केला. ओझी उचलून त्यांच्या खांद्याची सालटी निघाली. नबुखद्नेस्सरने व त्याच्या सैन्याने सोरचा पराभव करण्यासाठी खूप कष्ट घेतले. पण ह्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले नाही.” 19 म्हणून परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “मिसरची भूमी मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यास देईन. तो मिसरच्या लोकांना घेऊन जाईल. मिसरमधील मौल्यवान वस्तूही तो घेईल. हा नबुखद्नेस्सरच्या सैन्याचा मोबदला असेल. 20 मिसरची भूमी मी नबुखद्नेस्सराला त्याच्या मेहनतीचे बक्षीस म्हणून दिली आहे. का? कारण त्यांनी हे काम माझ्यासाठी केले.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

21 “त्याच दिवशी, मी इस्राएलाच्या लोकांना सामर्थ्यवान करीन. मग तू त्यांच्याशी बोलू शकशील आणि त्यांचे लक्ष तुझ्याकडे जाईल. [a] त्यांना मीच परमेश्वर आहे.” हे कळेल.

स्तोत्रसंहिता 78:1-37

आसाफाचे मास्कील.

78 लोकहो! माझी शिकवण ऐका,
    मी काय सांगतो ते ऐका!
मी तुम्हांला ही गोष्ट सांगेन.
    मी तुम्हांला ही जुनी गोष्ट सांगेन.
आम्ही ती गोष्ट ऐकली आणि आम्हाला ती चांगली माहीत आहे.
    आमच्या वाडवडिलांनी आम्हाला ती गोष्ट सांगितली होती.
आणि आम्ही ती विसरणार नाही.
    आमचे लोक शेवटच्या पिढीपर्यंत ती गोष्ट सांगत राहातील.
आम्ही परमेश्वराची स्तुती करु
    आणि त्याने केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल सांगत राहू.
परमेश्वराने याकोबा बरोबर करार केला.
    देवाने इस्राएलला कायदा दिला.
    देवाने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या.
    त्याने आमच्या पूर्वजांना त्यांच्या वंशजांना नियम शिकवायला सांगितला.
नवीन मुले जन्माला येतील, तीच पुढे मोठी होतील आणि ती त्यांच्या मुलांना गोष्टी सांगतील
    या प्रमाणे लोकांना अगदी शेवटच्या पिढीपर्यंत नियम समजेल.
म्हणून ते सगळे लोक देवावर विश्वास ठेवतील.
    देवाने जे केले ते ते विसरणार नाहीत.
    ते अत्यंत सावधगिरीने त्याच्या आज्ञा पाळतील.
जर लोकांनी त्यांच्या देवाच्या आज्ञा त्यांच्या मुलांना शिकविल्या तर ती मुले त्यांच्या पूर्वजांसारखी होणार नाहीत.
    त्यांचे पूर्वज देवाविरुध्द गेले.
त्यानी देवाच्या आज्ञा पाळायचे नाकारले.
    ते लोक फार हट्टी होते ते देवाच्या आत्म्याशी प्रामाणिक नव्हते.

एफ्राइमच्या लोकांजवळ शस्त्रे होती.
    परंतु ते रणांगणावरुन पळून गेले.
10 त्यांनी देवाबरोबर झालेला त्यांचा करार पाळला नाही.
    त्यांनी त्याची शिकवण आचरायला नकार दिला.
11 एफ्राईमचे लोक देवाने केलेल्या महान गोष्टी विसरले.
    देवाने दाखवलेल्या अद्भुत गोष्टी ते विसरले.
12 मिसर देशातल्या सोअन प्रांतात देवाने
    त्यांच्या वाडवडिलांना त्याची महान शक्ती दाखवली.
13 देवाने लाल समुद्र दुभंगला आणि लोकांना पलिकडे नेले.
    पाणी एखाद्या भिंतीसारखे त्यांच्या दोन्ही बाजूला उभे होते.
14 देव रोज त्यांना उंच मेघाच्या साहायाने दिवसा
    व रात्री अग्नीच्या प्रकाशात मार्ग दाखवीत नेत असे.
15 देवाने वाळवंटात पाषाण फोडला
    त्याने लोकांना पृथ्वीच्या गर्भातून पाणी दिले.
16 देवाने खडकातून नदीसारखे
    खळखळणारे पाणी बाहेर आणले.
17 परंतु लोकांनी देवाविरुध्द पाप करणे चालूच ठेवले.
    ते वाळवंटात सुध्दा सर्वशक्तिमान परमेश्वराच्या विरुध्द गेले.
18 नंतर त्या लोकांनी देवाची परीक्षा घ्यायचे ठरवले.
    त्यांनी त्यांची भूक भागवण्यासाठी देवाकडे अन्नाची मागणी केली.
19 त्यांनी देवाविरुध्द तक्रारी केल्या.
    ते म्हणाले, “देव आम्हांला वाळवंटात अन्न देऊ शकेल का?
20 त्याने दगडाला प्रहार केला आणि त्यातून पुरासारखे पाणी बाहेर येऊ लागले
    तो आम्हांला भाकरी आणि मांस नक्कीच देईल.”
21 त्या लोकांनी म्हटलेले परमेश्वराने ऐकले.
    देव याकोबावर फार रागावला देव इस्राएलवर फार रागावला.
22     का? कारण लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.
देव त्यांना वाचवील यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही.
23-24 पण नंतर देवाने ढग बाजूला केले
    आणि त्यातून त्याने त्यांच्यावर अन्नासाठी मान्नाचा वर्षाव केला.
आकाशाचे दरवाजे उघडावेत तसा हा प्रकार होता
    आणि आकाशातील गोदामातून धान्याचा वर्षाव होत राहिला.
25 लोकांनी देवदूताचे अन्न खाल्ले.
    देवाने त्यांचे समाधान करण्यासाठी भरपूर अन्न पाठवले.
26-27 देवाने पूर्वेकडचा घोंगावणारा वारा पाठवला
    आणि त्यांच्यावर लावे पक्षी पावसाप्रमाणे कोसळले
देवाने दक्षिणेकडून वारा वाहायला लावला
    आणि निळे आकाश काळे झाले कारण आकाशात खूप पक्षी होते.
28 ते पक्षी छावणीच्या अगदी मध्य भागी,
    त्या लोकांच्या तंबूच्या अवती भोवती पडले.
29 त्यांच्याकडे भरपूर खायला होते
    परंतु त्यांनी त्यांच्या भुकेलाच पाप करायला लावले.
30 त्यांना त्यांची भूक आवरली नाही,
    म्हणून त्यांनी ते पक्षी रक्त काढल्याशिवायच खाल्ले.
31 देव त्यांच्यावर खूप रागावला आणि त्याने त्यांतल्या अनेकांना मारुन टाकले.
    त्यातल्या अनेक निरोगी तरुण माणसांना देवाने मारले.
32 परंतु लोकांनी पुन्हा पाप केले.
    देव ज्या अद्भुत गोष्टी करतो त्यांवर ते अवलंबून राहिले नाहीत.
33 म्हणून देवाने त्यांचे कवडी मोलाचे
    आयुष्य भयानक संकटात संपवले.
34 देवाने जेव्हा जेव्हा त्यातल्या काहींना ठार मारले तेव्हा तेव्हा उरलेले लोक पुन्हा त्याच्याकडे वळले.
    ते देवाकडे धावत परतले.
35 देव त्यांचा खडक आहे याची आठवण त्यांना आली.
    सर्वशक्तिमान देवाने त्यांना वाचवले याची त्यांना आठवण झाली.
36 आपण देवावर प्रेम करतो असे ते म्हणाले परंतु ते खोटे बोलले,
    ते मनापासून बोलत नव्हते.
37 त्यांचे मन खरोखरच देवाजवळ नव्हते.
    ते कराराशी प्रामाणिक नव्हते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center