M’Cheyne Bible Reading Plan
दावीदाची युध्दाची तयारी
18 दावीदाने आपल्या बरोबरच्या लोकांची शिरगणती केली. मग, शंभर-शंभर, हजार हजार माणसांवर अधिकारी, सरदार नेमले. 2 सर्वांची त्याने तीन गटात विभागणी केली. यवाब, अबीशय (यवाबाचा भाऊ आणि सरुवेचा मुलगा) आणि गथ येथील इत्तय या तिघांना एकेक गटाचे प्रमुख म्हणून नेमले आणि सर्वांची रवानगी केली.
तेव्हा राजा दावीद त्यांना म्हणाला, “मी ही तुमच्याबरोबर येतो.”
3 पण लोक म्हणाले, “नाही, तुम्ही आमच्याबरोबर येता कामा नये. कारण आम्ही युध्दातून पळ काढला किंवा आमच्यातले निम्मे लोक या लढाईत कामी आले तरी अबशालोमच्या लोकांना त्याची फिकीर नाही. पण तुम्ही एकटे आम्हा दहाहजारांच्या ठिकाणी आहात. तेव्हा तुम्ही शहरात राहावे हे बरे. शिवाय गरज पडली तर तुम्ही आमच्या मदतीला यालच.”
4 तेव्हा राजा लोकांना म्हणाला, “मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करीन.”
राजा मग वेशीपाशी उभा राहिला. सैन्य बाहेर पडले, शंभर आणि हजाराच्या गटात ते निघाले.
5 यवाब, अबीशय आणि इत्तय यांना राजाने आज्ञा दिली, “माझ्या साठी एक करा. अबशालोमशी सौम्यपणाने वागा.” राजाची ही आज्ञा सर्वांच्या कानावर गेली.
दावीदाच्या सैन्याकडून अबशालोमच्या सैन्याचा पराभव
6 अबशालोमच्या इस्राएल सैन्यावर दावीदाचे सैन्य चालून गेले. एफ्राईमच्या अरण्यात ते लढले. 7 दावीदाच्या सैन्याने इस्राएलाचा पराभव केला. त्यांची वीस हजार माणसे त्यादिवशी मारली गेली. 8 देशभर युध्द पेटले. त्या दिवशी तलवारीला बळी पडली त्यापेक्षा जास्त माणसे जंगलामुळे मेली.
9 अबशालोमचा दावीदाच्या अधिकाऱ्यांशी सामना झाला तेव्हा अबशालोम बसून निसटायचा प्रयत्न करु लागला. ते खेचर एका मोठ्या एला वृक्षाच्या खालून जात असताना त्याच्या जाडजूड फांद्यामध्ये अबशालोमचे डोके अडकले. खेचर निघून गेले आणि अबशालोम अधांतरी लोंबकळत राहिला.
10 एकाने हे पाहिले आणि यवाबाला सांगितले, “अबशालोमला मी एला वृक्षावरून लोंबकळताना पाहिले.”
11 यवाब त्या माणसाला म्हणाला, “मग तू त्याचा वध करुन त्याला जमिनीवर का पाडले नाहीस? मी तुला दहा रौप्यमुदा आणि एक पट्टा इनाम दिला असता.”
12 तो माणूस म्हणाला, “तुम्ही हजार रौप्यमुद्रा देऊ केल्या असत्या तरी मी राजकुमाराला इजा पोचू दिली नसती. कारण तुम्ही, अबीशय आणि इत्तय यांना राजाने केलेला हुकूम आम्ही ऐकला आहे. राजा म्हणाला होता, ‘लहान अबशालोमला घातपात होणार नाही याची काळजी घ्या.’ 13 अबशालोमला मी मारले असते तर राजाला ते समजलेच असते. आणि तुम्ही मला शिक्षा केली असती.”
14 यवाब म्हणाला, “इथे वेळ दवडण्यात काही अर्थ नाही.”
अबशालोम अजून जिवंत असून एलावृक्षात अजून तसाच लटकत होता. यवाबाने तीन भाले घेतले आणि ते अबशालोमवर फेकले. भाले अबशालोमच्या हृदयातून आरपार गेले. 15 यवाबाजवळ दहा तरुण सैनिक त्याचे लढाईतील मदतनीस म्हणून होते. त्यांनी भोवती जमून अबशालोमचा वध केला.
16 यवाबाने रणशिंग फुंकले आणि लोकांना अबशालोमच्या इस्राएली सैन्याचा पाठलाग थांबवायला सांगितले. 17 यवाबाच्या माणसांनी अबशालोमचा मृतदेह अरण्यातील एका खंदकात नेऊन टाकला. वर दगडांची रास रचून तो खंदक भरुन टाकला.
अबशालोमबरोबर आलेल्या इस्राएलानी पळ काढला आणि ते घरी परतले.
18 अबशालोमने राजाच्या खोऱ्यात पूर्वीच एक स्तंभ उभारलेला होता. आपले नाव चालवायला मुलगा नाही म्हणून त्याने त्या स्तंभाला स्वतःचेच नाव दिले होते. आजही तो “अबशालोम स्मृतिस्तंभ” म्हणून ओळखला जातो.
यवाब दावीदाकडे हे वृत्त पाठवतो
19 सादोकचा मुलगा अहीमास यवाबाला म्हणाला, “मला धावत जाऊन ही बातमी राजाला सांगू दे. परमेश्वराने त्याच्या शत्रूचा नि:पात केला आहे हे मी त्याला सांगतो.”
20 यवाब त्याला म्हणाला, “आज तुला दावीदाकडे ही बातमी घेऊन जाता येणार नाही. नंतर जाऊन तू सांग पण आज नको. कारण खुद्द राजाचा मुलगा मरण पावला आहे.”
21 मग यवाब कूश येथील एकाला म्हणाला, “तू पाहिलेस त्याचे वर्तमान राजाला जाऊन सांग.”
त्या माणसाने यवाबला अभिवादन केले मग तो दावीदाकडे निघाला.
22 सादोकचा मुलगा अहीमास याने पुन्हा यवाबाकडे विनवणी केली “काय होईल ते होईल, पण मलाही त्या कूशीच्या पाठोपाठ धावत जाऊ दे.”
यवाब म्हणाला, “मुला. तू ही बातमी नेऊन काय करणार? त्यासाठी काही तुला इनाम मिळायचे नाही.”
23 अहीमास म्हणाला, “त्याची मला पर्वा नाही मला जाऊ द्या.”
तेव्हा यवाबाने त्याला परवानगी दिली.
अहीमास मग यार्देनच्या खोऱ्यातून धावत निघाला. त्याने त्या कूशीला मागे टाकले.
दावीद बातमी ऐकतो
24 राजा वेशीच्या दोन दरवाजांमध्येच बसला होता. तेव्हा पहारेकरी तटबंदीवरील छपरावर चढला. त्याने इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्याला एक माणूस धावत येताना दिसला. 25 पहारेकऱ्याने हे राजाला ओरडून मोठ्याने सांगितले.
राजा दावीद म्हणाला, “तो एकटाच असेल तर त्याचा अर्थ तो काहीतरी बातमी घेऊन येत आहे.”
धावता धावता तो माणूस शहराच्या जवळ येऊन पोचतोय तोच 26 पहारेकऱ्याने आणखी एकाला धावत येताना पाहिले. पहारेकरी द्वाररक्षकाला म्हणाला, “तो पाहा, आणखी एक माणूस एकटाच धावत येतोय.”
तेव्हा राजा म्हणाला, “तो ही बातमी आणतोय.”
27 पहारेकरी म्हणाला, “पहिल्याचे धावणे मला सादोकचा मुलगा अहीमास याच्यासारखे वाटते.”
राजा म्हणाला, “अहीमास चांगला गृहस्थ आहे. त्याच्याजवळ चांगलीच बातमी असणार”
28 अहीमासने “सर्व कुशाल असो” असे म्हणून राजाला वाकून अभिवादन केले. पुढे तो म्हणाला, “देव परमेश्वराला धन्यवाद द्या. धनीस्वामी, तुमच्याविरुध्द ज्यांनी उठाव केला त्यांना परमेश्वराने पराभूत केले आहे.”
29 राजाने विचारले, “अबशालोमचे कुशल आहे ना?”
अहीमास म्हणाला, “यवाबाने मला पाठवले तेव्हा मोठी धांदल उडालेली दिसलेली, पण ती कशाबद्दल हे मला कळले नाही.”
30 राजाने मग त्याला बाजूला उभे राहून थांबायला सांगितले. अहीमास त्याप्रमाणे पलीकडे झाला आणि थांबला.
31 मग तो कूशी आला तो म्हणाला, “माझ्या स्वामीसाठी ही बातमी आहे. तुमच्या विरुद्ध पक्षाच्या लोकांना परमेश्वराने चांगली अद्दल घडवली.”
32 राजाने त्याला विचारले, “अबशालोम ठीक आहे ना?”
त्यावर कूशीने सांगितले, “तुमचे शत्रू आणि तुमच्या वाईटावर असलेले लोक या सगळ्यांची त्या तरुण माणसा सारखीच (अबशालोमसारखी) गत होवो.”
33 (यावरुन अबशालोम मरण पावला हे राजाला उमगले) तो फार शोकाकुल झाला. वेशीवर बांधलेल्या खोलीत तो गेला. तेथे त्याला रडू कोसळले. आपल्या दालनात जाताना तो म्हणाला, “अबशालोम, माझ्या मुला, तुझ्या ऐवजी मीच मरायला हवे होते रे पोरा!”
पौल आणि खोटे प्रषित
11 माझी आशा आहे की, आपण माझा थोडासा मूर्खपणा माझ्यासाठी सहन कराल. पण तो तुम्ही करीतच आहा. 2 मला तुमचा हेवा वाटतो व तो दैवी हेवा वाटतो. मी तुम्हांला एक पती देण्याचे (म्हणजे) ख्रिस्ताला देण्याचे अभिवचन दिले होते. यासाठी की मला तुम्हांला शुद्ध कुमारिका असे त्याला सादर करता येईल. 3 पण मला भीति वाटते की जसे हळेला फसविण्यात आले व ते सर्पाच्या धुर्ततेने फसविण्यात आले, तसे तुमचे मनही कसेतरी तुमच्या प्रामाणिकपणापासून आणि ख्रिस्ताच्या शुद्ध भक्तीपासून दूर नेले जाईल. 4 कारण जर एखादा तुमच्याकडे येऊन आम्ही जो येशू गाजवितो त्यापेक्षा वेगळ किंवा तुम्ही जे शुभवर्तमान स्वीकारले, त्यापेक्षा वेगळे शुभवर्तमान स्वीकारले तर तुम्ही ते सहज सहन करता.
5 पण मला वाटते मी अति श्रेष्ठ प्रेषितांपेक्षा कुठल्या प्रकारे कमी आहे असे नाही. 6 मी प्रशिक्षित वक्ता नसेन. परंतु मला ज्ञान आहे. आम्ही हे तुम्हांला प्रत्येक प्रकारे पूर्णपणे स्पष्ट केले आहे.
7 तूम्ही उंच व्हावे म्हणून मी आपणांला नीच केले म्हणजे मी देवाचे शुभवर्तमान तुम्हांला फुकट सांगितले यात मी पाप केले काय? 8 तुमची सेवा करण्यासाठी मी दुसऱ्या मंडळ्यांकडून वेतन घेऊन त्यांना लुटले. 9 आणि मी तुम्हांजवळ होतो तेव्हा मला कमी पडले असतानाही मी कोणाला भार असा झालो नाही. कारण मासेदिनियाहून जे बंधु आले त्यांनी माझी गरज पुरविली. आणि सर्व गोष्टीत मी तुम्हांस ओझे होऊ नये म्हणून मी स्वतःस ठेवले आणि यापुढेही ठेवीन. 10 ख्रिस्ताचे खरेपण माझ्यामध्ये आहे म्हणून मी सांगतो की, अखया प्रांतात कुणीही माझ्या आभिमानास विरोध करणार नाही. 11 का? कारण मी तुम्हांवर प्रेम करीत नाही काय? देव जाणतो की, मी तुमच्यावर प्रेम करतो!
12 आणि मी जे करतो ते मी करीत राहीन यासाठी की, जे आमच्याबरोबर समानता साधण्याची संधी शोधत आहेत. ज्या गोष्टीविषयी ते अभिमान बाळगतात, त्यांना मी त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल असे करीन. 13 कारण असे लोक खोटे प्रेषित आहेत, ते फसविणारे कामगार आहेत, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रुप धारण करणारे आहेत 14 आणि यात आश्चर्य नाही, कारण सैतानदेखील प्रकाशाच्या दूताचे रुप धारण करतो. 15 म्हणून त्याचे सेवकही जर न्यायीपणाच्या सेवकाचे रुप धारण करतात, त्यामुळे त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, त्यांचा शेवट त्यांच्या कार्याप्रमाणे होईल.
पौल त्याच्या दु:खसहनाविषयी सांगतो
16 मी पुन्हा म्हणतो: कोणीही मला मूर्ख समजू नये, पण जर तुम्ही समजता तर जसा मूर्खाचा तसा माझा स्वीकार करा. यासाठी की मी थोडासा अभिमान बाळगीन. 17 या आत्मप्रौढी मिरविण्याच्या प्रकारामध्ये मी जसा प्रभु बोलतो तसे बोलत नाही. तर मूर्खासारखे बोलतो. 18 जसे बरेच लोक जगिक गोष्टीविषयी प्रौढी मिरवितात, तशी मीही प्रौढी मिरवीन. 19 तुम्ही शहाणे असल्याने मूर्खांचे आनंदाने सहन करता! 20 वस्तुतः जे कोणी तुम्हाला गुलाम करते, किंवा छळ करते किंवा तुमचा गैर फायदा घेते किंवा स्वतः पुढे येण्याचा प्रयत्न करते किंवा तुमच्या तोंडावर मारते तरी तुम्ही त्यांचे सहन करता. 21 आम्ही जणू अशक्त असल्यासारखे मी लज्जेने बोलतो.
पण ज्याविषयी कोणी अभिमान धरण्याविषयी धीट असेल त्याविषयी मीही धीट आहे (हे मी मूर्खापणाने बोलतो) 22 ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? (मी हे मूर्खासारखे बोलतो) मी अधिक आहे. 23 मी पुष्कळ कठीण काम केले आहे. सारखा तुरुंगात जात होतो, पराकाष्ठेचे फटके खाल्ले, पुन्हा आणि पुन्हा मरणाला सामोरे गेलो. 24 पाच वेळेला यहूंद्याकडून मला एकोणचाळीस फटके बसले. 25 तीन वेळा काठीने मारण्यात आले, एकदा मला दगडमार करण्यात आला, तीन वेळा माझे जहाज फुटले, खुल्या समुद्रात मी एक रात्र व एक दिवास घालविला. 26 मी सातत्याने फिरत होतो, नदीच्या प्रवासात धोका होता. लुटारुंकडून धोका होता. माझ्या स्वतःच्या देशबांधवांकडून धोका होता. विदेशी लोकांकडून, शहरांमध्ये धोका होता. डोंगराळ प्रदेशात धोका होता. समुद्रात धोका होता, खोठ्या बंधूंकडून धोका होता.
27 मी कष्ट केले आणि घाम गाळला, व पुष्कळ वेळा जागरण केले. मला भूक माहीत आहे. तहान माहीत आहे. पुष्कळ वेळा मी अन्नाशिवाय राहिलो, थंडीत व उघडा असा मी राहिलो, 28 या सर्व गोष्टीशिवाय मी दररोज मंडळ्याप्रती माझ्या असलेल्या आस्थेमुळे दबावाखाली होतो. 29 कोण अशक्त आहे, आणि मला अशक्तपणा माहीत नाही? कोण पापात पडला आहे? आणि मी माझ्यामध्ये जळत नाही?
30 जर मला अभिमान बाळगायचा असेल तर, माझ्या अशक्तपणा दाखविणाऱ्या गोष्टीविषयी मी अभिमान बाळगीन. 31 देव आणि प्रभु येशूचा पिता, ज्याची अनंतकाळपर्यंत स्तुति केली पाहिजे, तो हे जाणतो की मी खोटे बोलत नाही. 32 दिमिष्कात अरीतास राजाचा राज्यपाल याने मला अटक करण्यासठी शहराला पहारा दिला होता. 33 पण मला दोपलीत बसवून खिडकीतून गावकुसावरुन उतरविण्यात आले आणि त्याच्या हातून मी निसटलो.
अम्मोनकरिता भविष्यकथन
25 मला परमेश्वराचा संदेश मिळाला, तो म्हणाला, 2 “मानवपुत्रा, अम्मोनच्या लोकांकडे पाहा आणि माझ्यावतीने त्यांच्याशी बोल. 3 त्यांना सांग, ‘माझ्या परमेश्वर प्रभुचा संदेश ऐका. परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो की माझ्या पवित्र स्थानाचा नाश झाला, तेव्हा तुम्हाला खूप आनंद झाला. इस्राएलची भूमी उद्ध्वस्त करण्यात आली, तेव्हा तुम्ही इस्राएलच्या भूमीच्या विरुद्ध होता. यहूदी लोकांना कैदी म्हणून नेण्यात आले, तेव्हा तुम्ही यहूदी लोकांच्याविरुध्द होता. 4 म्हणून मी तुम्हाला पूर्वेकडच्या लोकांच्या ताब्यात देईन. ते तुमची जमीन घेतील. तुमच्या देशात त्यांचे सैन्य तळ ठोकेल. ते तुमच्यामध्ये राहतील. ते तुमचे अन्न व दूध भक्षण करतील.
5 “‘मी राब्बा शहराचे उंटासाठी कुरण करीन व अम्मोन देशाला मेंढ्यांचा कोंडवाडा करीन. मगच तुम्हाला समजेल की मीच देव आहे. 6 परमेश्वर असे म्हणतो, की यरुशलेमचा नाश झाला म्हणून तुम्हाला आनंद झाला. तुम्ही टाळ्या पिटल्यात व थै थै नाचलात. इस्राएलच्या अपमानाची तुम्हाला मजा वाटली. 7 म्हणून मी तुम्हाला शिक्षा करीन. सैनिकांनी युद्धात लुटलेल्या अमूल्य वस्तूंप्रमाणे तुम्ही व्हाल. तुम्ही तुमचा वारस गमवाल. तुम्ही दूरदेशी मराल. मी तुमच्या देशाचा नाश करीन. मगच तुम्हाला मीच परमेश्वर आहे.! हे समजून येईल.’”
मवाब व सेईर यांच्याविषयी भविष्यकथन
8 परमेश्वर, माझा प्रभू पुढीलप्रमाणे गोष्टी सांगतो: “मवाब व सेईर (अदोम) म्हणतात ‘यहूदा इतर राष्ट्रांप्रमाणेच आहे.’ 9 मी मवाबचा खांदा कापीन. देशाला भूषणावह असलेली बेथ-यशिमोथ, बाल-मौन, किर्याथाईम ही सीमेवरची शहरे मी काढून घेईन. 10 मग ही शहरे मी पूर्वेच्या लोकांना देईन. त्यांना तुमची भूमी मिळेल. मी त्यांना अम्मोनच्या लोकांचा नाश करु देईल. अम्मोन हे एक राष्ट्र होते, ह्याचा लोकांना विसर पडेल. 11 मी मवाबला शिक्षा करीन. मग त्यांना मीच परमेश्वर आहे. हे कळेल.”
अदोमबद्दल भविष्यकथन
12 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “अदोमचे लोक यहूदाच्या लोकांच्याविरुद्ध गेले आणि त्यांनी त्यांचा सूड घेण्याचा प्रयत्न केला. म्हणून अदोमचे लोक अपराधी आहेत.” 13 म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो: “मी अदोमला शिक्षा करीन. मी अदोमवासीयांचा व तेथील प्राण्यांचा नाश करीन. तेमानापासून ददानापर्यंत सर्व अदोम देशाचा मी नाश करीन. अदोमची माणसे लढाईत मारली जातील. 14 मी माझ्या लोकांच्या, इस्राएलच्या हातून, अदोमचा सूड उगवीन. अशा रीतीने, माझा अदोमवरचा राग इस्राएलचे लोक दाखवून देतील. मग मी अदोमला शिक्षा केल्याचे अदोमच्या लोकांना कळेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
पलिष्ट्यांकरिता भविष्यकथन
15 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “पलिष्ट्यांनी सूड घ्यायचा प्रयत्न केला. ते फार क्रूर होते. त्यांनी आपला राग खूप काळ मनात दाबून धरला.” 16 म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, “मी पलिष्ट्यांना शिक्षा करीन. हो! करथच्या लोकांचा मी नाश करीन. समुद्राकाठी राहणाऱ्या लोकांचा मी संपूर्ण नाश करीन. 17 मी त्या लोकांना शिक्षा करीन. मी सूड घेईन. माझ्या रागाने मी त्यांना धडा शिकवीन. मग त्यांना मीच परमेश्वर असल्याचे कळेल.”
भाग दुसरा
(स्तोत्रसंहिता 73-89)
आसाफाचे स्तोत्र
73 देव इस्राएल बरोबर खरोखरच चांगला वागला.
शुध्द ह्रदय असलेल्या लोकांशी देव चांगला वागतो.
2 मी जवळ जवळ घसरलो
आणि पाप करायला लागलो.
3 दुष्ट लोक यशस्वी होतात हे मी पाहिले
आणि मी त्या गर्विष्ट लोकांचा मत्सर करायला लागलो.
4 ते लोक आरोग्य संपन्न आहेत.
त्यांना जीवन जगण्यासाठी लढा द्यावा लागत नाही. [a]
5 त्या गर्विष्ट लोकांना आपल्यासारखे दु:खभोगावे लागत नाही.
दुसऱ्या लोकांवर येतात तशी संकटे त्यांच्यावर येत नाहीत.
6 म्हणून ते अतिशय गर्विष्ठ आणि तिरस्करणीय लोक आहेत.
ते ज्या प्रकारची आभूषणे आणि भपकेदार कपडे घालतात त्या वरुन हे कळून येते.
7 जर त्या लोकांना एखादी गोष्ट आवडली तर ते सरळ जातात आणि ती घेऊन येतात.
त्यांना जे काही करायची इच्छा होते ते ते करतात.
8 ते दुसऱ्यांविषयी दुष्ट आणि वाईट गोष्टी बोलतात ते गर्विष्ठ आणि दुराग्रही आहेत.
आणि दुसऱ्या लोकांचा कसा फायदा उठवायचा याचा ते सतत विचार करीत असतात व त्याप्रमाणे योजना आखतात.
9 आपण म्हणजेच देव असे त्या गर्विष्ठ लोकांना वाटते
आपण पृथ्वीचे राज्यकर्ते आहोत असे त्या लोकांना वाटते.
10 म्हणून देवाची माणसे सुध्दा त्यांच्याकडे वळतात
आणि त्यांनी सांगितलेली कामे करतात.
11 ते दुष्ट लोक म्हणतात, “आम्ही काय करतो ते देवाला माहीत नाही,
सर्वशक्तिमान देवाला ते माहीत नाही.”
12 ते गर्विष्ठ लोक दुष्ट आहेत, पण ते श्रीमंत आहेत
आणि अधिक श्रीमंत होत आहेत.
13 मग मी माझेच मन शुध्द का करु?
मी माझे हात स्वच्छ का करु.
14 देवा, मी दिवसभर त्रास भोगतो
आणि तू मला रोज सकाळी शिक्षा देतोस.
15 देवा, मला इतर लोकांशी याबद्दल बोलायची इच्छा होती.
परंतु त्यामुळे तुझ्या माणसांचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते हे मला माहीत होते.
16 या गोष्टी समजण्याचा मी खूप प्रयत्न केला
पण तुझ्या मंदिरात येण्यापूर्वी ते माझ्यासाठी फारच कठीण होते.
17 मी देवाच्या मंदिरात गेलो
आणि नंतर मला कळले.
18 देवा, तू त्या लोकांना खरोखरच एका धोकादायक परिस्थितीत टाकले आहेस.
खाली पडून सर्वनाश ओढवून घेणे त्यांना फारच सोपे झाले आहे.
19 अचानक संकटे येऊ शकतात
आणि नंतर त्या गर्विष्ठ माणसांचा नाश होतो.
भयंकर गोष्टी घडू शकतात
आणि मग त्यांचा सर्वनाश होतो.
20 परमेश्वरा, ते लोक म्हणजे झोपून
उठल्यावर विसर पडणाऱ्या स्वप्नासारखे आहेत.
आपल्या स्वप्नात येणाऱ्या राक्षसाप्रमाणे
तू त्या लोकांना अदृष्य करशील.
21-22 मी फार मूर्ख होतो.
मी श्रीमंत आणि दुष्ट माणसांचा विचार केला आणि मी गोंधळून गेलो.
देवा, मी गोंधळलो होतो आणि तुझ्यावर रागावलो होतो.
मी एखाद्या मूर्ख आणि अज्ञानी प्राण्यासारखा वागलो.
23 मला जे जे लागेल ते सर्व माझ्याजवळ आहे.
मी नेहमी तुझ्या जवळ असतो.
देवा, तू नेहमी माझा हात धरतोस.
24 देवा, तू मला मार्ग दाखव तू मला चांगला उपदेश कर
आणि नंतर तू मला गौरवाप्रत नेशील.
25 देवा, स्वर्गातही तू माझ्याजवळ असशील आणि जेव्हा तू जवळ असशील
तेव्हा या पृथ्वीवरचे मला आणखी काय हवे असणार?
26 कदाचित् माझ्या शरीराचा आणि मनाचा नाश होईल
परंतु माझ्याजवळ मला आवडत असलेला खडक आहे.
देव सदैव माझ्याजवळ असतो.
27 देवा, जे लोक तुला सोडून जातात ते लोक हरवतील.
जे लोक तुझ्याशी प्रामाणिक नाहीत त्यांचा तू नाश करशील.
28 मी मात्र देवाकडे आलो आहे.
आणि ती माझ्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे.
मी परमेश्वराला माझा प्रभु आणि माझी सुरक्षित जागा बनवले.
देवा, तू माझ्यासाठी ज्या गोष्टी केल्यास त्याबद्दल सांगण्यासाठी मी आलो आहे.
2006 by World Bible Translation Center