M’Cheyne Bible Reading Plan
नाथान दावीदाशी बोलतो
12 परमेश्वराने नाथानला दावीदाकडे पाठवले. तेव्हा नाथान दावीदाकडे आला. नाथान म्हणाला, “एका नगरात दोन माणसे होती. एक श्रीमंत होता आणि एक गरीब. 2 श्रीमंत माणसाकडे मेंढरे आणि गुरे भरपूर होती. 3 पण गरीबाकडे त्याने विकत घेतलेल्या एका लहान मेंढी खेरीज काही नव्हते. त्याने मेंढीला खाऊपिऊ घातले. या गरीब माणसाच्या मुलाबाळांबरोबर ती वाढली. त्याच्याच अन्नातला घास ती खाई, त्याच्याच कपातले पाणी ती पिई. त्याच्याच छातीवर डोके ठेवून झोपे. त्या गरीबाला ती मेंढी मुलीसारखीच होती.
4 “एकदा एक प्रवासी श्रीमंत माणसाकडे आला. त्या प्रवाश्याला खाऊपिऊ घालायची श्रीमंत माणसाची इच्छा होती. पण आपल्या गुरामेंढरांमधून त्याला काही काढून घ्यायचे नव्हते. तेव्हा त्याने त्या गरीब माणसाची मेंढी घेतली. तिला मारले आणि त्या प्रवाश्यासाठी अन्न शिजवले.”
5 दावीदाला या श्रीमंत माणसाचा फारच राग आला. तो नाथानला म्हणाला, “परमेश्वराची शपथ, या माणसाला प्राणदंड मिळाला पाहिजे 6 त्या मेंढीच्या चौपट पैसे त्याने भरले पाहिजेत. कारण त्याचे हे भयंकर कृत्य करताना त्याला दया आली नाही.”
नाथान दावीदाला त्याच्या पापाबद्दल सांगतो
7 तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, “तूच तो माणूस आहेस. इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, ‘इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला. तुला शौलापासून वाचवले. 8 त्याचे घरदार आणि बायका तुझ्या स्वाधीन केल्या. इस्राएल आणि यहूदाचा तुला राजा केले. एवढे पुरेसे नव्हते म्हणून तुला आणखीही देत राहिलो. 9 असे असताना तू परमेश्वराची आज्ञा का मोडलीस? त्याच्या दृष्टीने वाईट असे कृत्य का केलेस? उरीया हित्तीला तू तलवारीने मारलेस आणि त्याच्या बायकोचा स्वतःची बायको म्हणून स्वीकार केलास. होय, अम्मोन्यांच्या तलवारीने तू त्याचा वध करवलास. 10 तेव्हा आता ही तलवार तुझ्या कुटुंबाचा पिच्छा सोडणार नाही. तू उरीया हित्तीच्या बायकोचे हरण केलेस. तुला माझी पर्वा नाही हेच यातून दिसते.’
11 “परमेश्वर म्हणतो, ‘आता तुझ्यावर संकटे कोसळतील. अडचणींना सुरुवात तुझ्या घरातूनच होईल. तुझ्या बायका तुझ्यापासून मी हिरावून घेऊन त्या तुझ्या एका आप्ताच्याच हवाली करीन. तो तुझ्या बायका बरोबर झोपेल आणि ही गोष्ट सर्वांसमक्ष घडेल. 12 बथशेबाचा उपभोग तू गुपचूप घेतलास पण हे मात्र सूर्याच्या साक्षीने, सर्व इस्राएलां देखत होईल.’”
13 मग दावीद नाथानला म्हणाला, “माझ्याहातून परमेश्वराचा मोठाच अपराध घडला आहे.”
नाथान तेव्हा दावीदाला म्हणाला, “परमेश्वराने हा तुझा अपराध पोटात घातला आहे. तू मरणार नाहीस. 14 पण परमेश्वराच्या शत्रूंना तू त्याचा उपहास करायला मोठेच निमित्त दिलेस. तेव्हा हा तुझा मुलगा मरेल.”
दावीद आणि बथशेबा यांच्या मुलाचा मृत्यू
15 यानंतर नाथान घरी परतला. उरीयाची पत्नी बथशेबा आणि दावीद यांना झालेला मुलगा परमेश्वराच्या कोपामुळे खूप आजारी पडला. 16 दावीदाने बाळासाठी देवाची प्रार्थना केली. दावीदाने अन्नपाण्याचा त्याग केला. घरात जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला.
17 घरातील वडीलधाऱ्या माणसांनी येऊन दावीदाला जमिनीवरुन उठवायचा खूप प्रयत्न केला. पण काही केल्या दावीद तिथून हलेना. त्यांच्याबरोबर खायला प्यायलाही त्याने नकार दिला. 18 सातव्या दिवशी ते मूल मरण पावले. मुलाच्या मृत्यूची बातमी दावीदाला द्यायला त्याचे नोकर कचरु लागले. ते म्हणाले, “मुलगा जिवंत असतानाही आम्ही दावीदाशी बोलायला गेलो तरी तो ऐकत नसे. मग आता तर मूल मरण पावले असे आम्ही सांगितले तर तो आपल्या जिवाचे काही बरेवाईट करुन घेईल.”
19 पण आपल्या नोकरांची कुजबूज दावीदाने ऐकली. त्यावरुन मूल गेल्याचे तो मनोमन उमजला. त्याने नोकरांना विचारले, “मूल गेले का?”
नोकरांनी “होय” म्हणून उत्तर दिले.
20 तेव्हा दावीद जमिनीवरून उठला त्यांने आंघोळ केली, कपडे बदलून तयार झाला. मग आराधना करण्यासाठी परमेश्वराच्या मंदिरात गेला. त्यानंतर घरी जाऊन त्याने खायला मागितले. सेवकांनी त्याला वाढले आणि तो जेवला.
21 दावीदाचे सेवक त्याला म्हणाले, “तुम्ही असे का वागत आहात? मूल जिवंत असताना तुम्ही अन्नत्याग केलात. शोक केलात पण मुलगा वारल्यावर मात्र तुम्ही उठलात आणि खाल्लेत.”
22 दावीदाने सांगितले, “मूल जिवंत होते तेव्हा मी अन्न वर्ज्य केले आणि शोक केला कारण मला वाटले, न जाणो, परमेश्वराला माझी दया येईल आणि बाळ जगेल 23 पण आता ते गेलेच तेव्हा आता मी कशासाठी उपास करु? मुलाचे तर प्राण मी परत आणू शकत नाही. ते गेलेच. एक दिवस मीच त्याच्या भेटीला जाईन पण तो आता परत येणे नाही.”
शलमोनचा जन्म
24 दावीदाने मग आपली बथशेबा हिचे सांत्वन केले. तिच्याशी त्याने शरीर संबंध केला. बथशेबा पुन्हा गरोदर राहिली. तिला दुसरा मुलगा झाला. दावीदाने त्याचे नाव शलमोन ठेवले. शलमोनावर परमेश्वराचा लोभ होता. 25 त्याने नाथान या संदेष्ट्यामार्फत दावीदाला निरोप पाठविला नाथानने त्याचे नांव यदीद्या, म्हणजेच “देवाला प्रिय” असे ठेवले. देवाच्या वतीने नाथानने हे केले.
दावीद राब्बा काबीज करतो
26 अम्मोन्यांच्या राब्बावर हल्ला करुन यवाबाने हे राजधानीचे नगर काबीज केले. 27 यवाबाने निरोप्यामार्फत दावीदाला निरोप पाठवला “राब्बाशी झुंज देऊन मी हे जलनगर हस्तगत केले आहे. 28 आता इतर लोकांना एकत्र आणून या शहराचा ताबा घ्या. मी घेण्यापूर्वी हे करा. मी जर आधी ताबा घेतला तर ते नगर माझ्या नावाने ओळखले जाईल.”
29 दावीद मग सर्व लोकांना घेऊन राब्बाकडे गेला. राब्बा येथे लढाई करुन त्याने त्याचा ताबा घेतला. 30 त्यांच्या राजाच्या मस्तकावरचा मुकुट [a] दावीदाने काढला. हा मुकुट सोन्याचा असून त्याचे वजन सुमारे पंचाहत्तर पौंड होते. त्यात मौल्यवान रत्ने जडवलेली होती. तो मुकुट लोकांनी दावीदाच्या मस्तकावर ठेवला. दावीदाने बऱ्याच किंमती वस्तू आपल्याबरोबर आणल्या.
31 राब्बा नगरातील लोकांनाही त्याने बाहेर नेले. त्यांना कुऱ्हाडी, करवती, लोखंडी दाताळी यांनी काम करायला लावले. त्यांच्याकडून जबरदस्तीने वीटकामही करुन घेतले. सर्व आम्मोनी नगरांमध्ये दावीदाने असेच केले. नंतर दावीद आपल्या सैन्यासह यरुशलेमला परतला.
5 आता आम्हांला माहीत आहे की, जेव्हा जगिक घर ज्यामध्ये आम्ही राहतो, नष्ट झाले, तर आम्हाला देवापासून मिळलेले अनंतकाळचे घर स्वर्गात आहे. ते मानवी हातांनी बांधलेले नाही. 2 दरम्यान आम्ही कण्हतो, आमच्या स्वर्गीय निवासस्थानासह पोशाख करण्यास आम्ही आतुर झालो आहोत. 3 कारण जेव्हा आम्ही पोशाख करु, तेव्हा आम्ही नग्न दिसणार नाही. 4 कारण या घरामध्ये आम्ही असताना आम्ही कण्हतो, आणि ओझ्याने दबले जातो. कारण वस्त्रहीन असण्याची आमची इच्छा नसते, पण आमची इच्छा आहे की, आमच्या स्वर्गीय निवासस्थानाने पोशाख करावा. यासाठी की जे मर्त्य आहेत ते जीवनाने गिळावे. 5 आता देवानेच आम्हांला नेमक्या याच कारणासाठी निर्माण केले, आणि हमी म्हणून पवित्र आत्मा दिला, जो येणार आहे त्याबद्दलची खात्री बाळगा.
6 म्हणून आम्हांला नेहमीच विश्वास असतो आणि माहीत असते की, जोपर्यंत आम्ही या शरीरात राहत आहोत, तोपर्यंत आम्ही प्रभुपासून दूर आहोत. 7 आम्ही विश्वासाने जगतो, जे बघतो त्याने 8 आम्हांला विश्वास आहे, मी म्हणतो, आणि शरीरापासून दूर राहण्याचे आम्ही पसंत करु. आणि प्रभुसंगती राहू. 9 म्हणून त्याला संतोषविणे हे आम्ही आमचे ध्येय करतो, आम्ही शरीराने जगत असलो किंवा प्रभुपासून दूर असलो तरी. 10 कारण आम्हांला सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहायचे आहे. आणि प्रत्येकाला त्याचे जे प्रतिफळ मिळणार आहे. म्हणजे शरीरात असताना ज्या वाईट किंवा चांगल्या गोष्टी केल्या त्याप्रमाणे बक्षिस मिळेल.
देवाचे मित्र होण्यासाठी लोकांना मदत करणे
11 म्हणून आम्ही जाणतो की देवाचे भय कशासाठी धरायचे व त्यासाठी आम्ही मनुष्यांना वळविण्याचे प्रयत्न करतो. आम्ही जे आहोत ते देवासमोर स्पष्ट आहोत. आणि माझी आशा आहे की, तुमची सद्विवेकबुध्दि आम्हांला जाणते. 12 आम्ही तुमच्यासमोर आमची पात्रता पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत नाही. पण आमच्याविषयी तुम्ही अभिमान बाळगावा यासाठी संधी देत आहोत, यासाठी की तुम्ही अशांना उत्तर द्यावे की जे पाहिलेल्या गोष्टीविषयी अभिमान बाळगतात आणि अंतःकरणात जे आहे त्याविषयी बाळगत नाहीत. 13 जरी आम्ही वेडे असलो तरी ते ख्रिस्तासाठी, जर आम्ही आमच्या योग्य मनःस्थितीत असलो तर ते तुमच्यासाठी. 14 कारण ख्रिस्ताचे प्रेम आम्हाला भाग पाडते, कारण आमची खात्री झाली आहे की, जर एक सर्वांसाठी मेला आणि म्हणून सर्व मेले. 15 आणि तो सर्वांसाठी मेला, यासाठी की जे जगतात त्यांनी स्वतःसाठीच जगू नये तर जो त्यांच्यासाठी मेला व पुन्हा उठला त्याच्यासाठी जगावे.
16 म्हणून आतापासून जगिक दृष्टीकोनातून आम्ही कोणाला मानत नाही, तरी एकेकाळी आम्ही ख्रिस्ताला अशाप्रकारे मानले. पण आता आम्ही तसे करीत नाही. 17 म्हणून, जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, तर तो नवी उत्पत्ति आहे. जुने गेल आहे. नवीन आले आहे! 18 हे सर्व देवापासून आहे त्याने ख्रिस्ताद्वारे आमच्याशी स्वतःचा समेट केला आणि आम्हांला समेटाची सेवा दिली. 19 देव ख्रिस्तामध्ये जगाशी स्वतःचा समेट करीत होता. मनुष्यांची पापे त्यांच्याविरुद्ध मोजत नव्हता. आणि त्याने आम्हांला समेटाचा संदेश दिला आहे. 20 म्हणून आम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहोत, जणू काय देव आमच्या द्वारे त्याचे आवाहन करीत होता. ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हांला विनंति करतो. देवाशी समेट करा. 21 ज्याच्याठायी पाप नव्हते त्याला आमच्यासाठी देवाने पाप केले. यासाठी की त्याच्यामध्ये आम्ही देवाचे नीतिमत्व व्हावे.
19 देव मला म्हणाला, “इस्राएलच्या नेत्यांबद्दल हे शोकगीत तू गायलेच पाहिजेस.
2 “‘तुझी आई सिंहीणीसारखी आहे.
ती तरुण सिंहांबरोबर झोपते.
ती तरुण सिंहाबरोबर झोपली
आणि तिला बरीच पिल्ले झाली.
3 त्यापैकी एक पिल्लू उठते त्याची वाढ होऊन
तो शक्तिशाली तरुण सिंह झाला आहे.
तो शिकार करायला शिकला आहे.
त्याने माणसाला मारुन खाल्ले.
4 “‘लोकांनी त्याची गर्जना ऐकली,
आणि त्यांनी त्याला सापळ्यात पकडले
लोकांनी त्या सिंहाला वेसण घालून मिसरला नेले.
5 “‘ते छावा नेता होईल असे आई सिंहीणीला वाटले.
पण आता तिची पूर्ण निराशा झाली आहे.
मग तिने दुसऱ्या छाव्याला
शिकवून तयार केले.
6 तो तरुण सिंहाबरोबर शिकारीला गेला.
तो, बालवान, तरुण, असा सिंह झाला.
तो स्वतः शिकार करायला शिकला.
त्याने माणसाला मारुन खाल्ले.
7 त्याने राजवाड्यांवर हल्ला केला, व शहरांचा नाश केला.
त्या सिंहाची गर्जना ऐकताच, त्या देशातील प्रत्येक माणूस बोलायलासुध्दा घाबरत असे.
8 मग त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी त्याच्यासाठी सापळा लावला,
आणि त्यांनी त्याला पकडले.
9 त्यांनी त्याला वेसण घालून पिंजऱ्यात कोंडले.
त्यांनी त्या सिंहाला सापळ्यात अडकविले.
मग त्यांनी त्याला बाबेलच्या राजाकडे नेले.
आता, इस्राएलच्या डोंगरातून
त्याची गर्जना तुम्हाला ऐकू येऊ शकत नाही.
10 “‘पाण्याकाठी लावलेल्या
द्राक्षवेलीसारखी तुझी आई होती.
तिला भरपूर पाणी मिळाल्यामुळे
खूप ताणे फुटले.
11 मग तिच्या फांद्या खूप वाढल्या.
त्या हातातील काठ्यांप्रमाणे
व राजदंडाप्रमाणे झाल्या.
12 तो वेल उंचच उंच वाढली.
तिला खूप फांद्या फुटून ती ढगांपर्यंत पोहोचली.
13 “‘पण त्या वेलीला मुळापासून उपटून फेकून देण्यात आले.
पूर्वेकडील उष्ण वाऱ्यांमुळे तिची फळे वाळली.
मजबूत फांद्या मोडल्या, आणि त्या फांद्या आगीत टाकल्या गेल्या.
14 आता ती द्राक्षवेल, रुक्ष व निर्जल वाळवंटी प्रदेशात लावली आहे.
सर्वांत मोठ्या फांदीला लागलेली आग पसरली.
त्या आगीने सर्व डहाळ्यांचा व फळाचा नाश केला.
आता हातात धरण्याची काठी व राजदंड उरला नाही.’
हे मृत्यूबद्दलचे शोकगीत, मृत्यूसाठीच, गायिले गेले.”
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र
64 देवा, माझे ऐक, माझ्या शत्रूंनी मला घाबरविले आहे.
त्यांच्यापासून मला वाचव.
2 माझे माझ्या शत्रूंच्या गुप्त योजनांपासून रक्षण कर.
त्या दुष्ट लोकांपासून मला लपव.
3 त्यांनी माझ्याबद्दल अगदी वाईट खोटं सांगितलं आहे.
त्यांच्या जिभा धारदार तलवारी सारख्या आहेत.
त्यांचे कटू शब्द बाणाप्रमाणे आहेत.
4 ते लपून बसतात आणि त्यांचे बाण एका साध्याभोळ्या
आणि प्रामाणिक माणसावर फेकतात.
5 वाईट करण्यासाठी ते एकमेकांना प्रोत्साहन देतात व सापळे रचण्याबाबत चर्चा करतात.
“आपले सापळे कोणीही बघणार नाही” असे ते एकमेकांना सांगतात.
6 लोक अतिशय कुटिल असू शकतात.
लोक काय विचार करतात ते कळणे अवघड आहे.
7 परंतु देवदेखील त्याचे “बाण” मारु शकतो
आणि त्यांना काही कळण्या आधीच वाईट लोक जखमी होतात.
8 वाईट लोक इतर लोकांना त्रासदायक गोष्टी करण्याच्या योजना आखतात.
परंतु देव त्यांच्या योजना निष्फळ बनवतो
आणि त्या त्रासदायक गोष्टी त्यांच्याच वाट्याला येतील असे करतो.
आणि नंतर जो कोणी त्यांना पाहातो तो मस्तक विस्मयाने हलवतो.
9 देवाने काय केले ते लोक पाहातील.
ते इतरांना देवाबद्दल सांगतील,
त्यामुळे सगळ्यांना देवाबद्दल अधिक काही कळेल
आणि त्याला आदर देण्याचे ही त्यांना कळेल.
10 परमेश्वराची सेवा करण्यास चांगल्या व्यक्तिला आनंद वाटतो.
तो देवावर विसंबून राहातो.
चांगल्या प्रामाणिक लोकांनी हे पाहिल्यावर ते देवावर विश्वास ठेवतात.
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
65 सियोनातील देवा, मी तुझी स्तुती करतो.
मी कबूल केल्याप्रमाणे तुला अर्पण करीत आहे.
2 तू केलेल्या गोष्टींबद्दल आम्ही लोकांना सांगतो.
आणि तू आमची प्रार्थना ऐकतोस.
तू तुझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाची प्रार्थना ऐकतोस.
3 जेव्हा आमची पापे आम्हांला खूप जड होतात
तेव्हा तू माफ करतोस आणि त्यांची भरपाई करतोस.
4 देवा, तू तुझ्या लोकांची निवड केलीस.
आम्ही तुझ्या मंदिरात येऊन तुझी प्रार्थना करावी यासाठी तू आमची निवड केलीस आणि आम्ही खूप आनंदी आहोत.
तुझ्या मंदिरातल्या आणि तुझ्या पवित्र राजवाड्यातल्या
सगळ्या सुंदर विस्मयकारक गोष्टी आमच्या जवळ आहेत.
5 देवा, आम्हाला वाचव.
चांगले लोक तुझी प्रार्थना करतात आणि तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देतोस.
तू त्यांच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी करतोस.
सर्व जगभरचे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात.
6 देवाने त्याच्या शक्तीने पर्वत निर्माण केले.
आपण त्याची शक्ती आपल्या भोवती सर्वत्र पाहतो.
7 देवाने उन्मत्त झालेल्या खवळलेल्या समुद्राला शांत केले.
देवाने पृथ्वीवर लोकांचे “महासागर” निर्माण केले.
8 सर्व जगातील लोक तू केलेल्या विस्मयजनक गोष्टींनी आश्चर्यचकित झाले आहेत.
सूर्योदय आणि सुर्यास्त आम्हाला खूप आनंदी बनवतात.
9 तू जमिनीची काळजी घेतोस तू तिच्यावर सिंचन करतोस
आणि तिला धान्य उगवायला सांगतोस.
देवा तू झरे पाण्याने भरतोस
आणि पिकांना वाढू देतोस.
10 तू नांगरलेल्या जमिनीवर पाऊस पाडतोस.
तू शेतजमीन पाण्याने भिजवतोस.
तू जमीन पावसाने भुसभुशीत करतोस.
आणि तू त्यावर छोट्या रोपट्यांना उगवू देतोस.
11 तू नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या हंगामाने करतोस
तू भरपूर पिकांनी गाड्या भरतोस.
12 वाळवंट आणि डोंगर गवताने भरले आहेत.
13 आणि कुरणे मेंढ्यांनी झाकली गेली आहेत.
दऱ्या धान्यांनी भरल्या आहेत.
प्रत्येक जण आनंदाने गात आहे आणि ओरडत आहे.
2006 by World Bible Translation Center