M’Cheyne Bible Reading Plan
दावीद अनेक युध्दे जिकंतो
8 यानंतर दावीदाने पलिष्ट्यांचा पराभव केला आणि त्यांच्या राजधानीच्या शहरावरील त्यांची सत्ता त्यांच्या हातून काढून घेतली. 2 मवाबातील लोकांचाही त्याने पराभव केला. त्या सर्वांना त्याने जमिनीवर पडून रहायला लावले आणि दोरीच्या सहाय्याने त्यांच्या रांगा केल्या त्यापैकी दोन रांगांतील लोकांना ठार केले आणि तिसऱ्या रांगेतील लोकांना जीवदान दिले. अशाप्रकारे मवाबातील हे लोक दावीदाचे अंकित बनले. त्यांनी दावीदाला खंडणी दिली.
3 रहोबचा मुलगा हजर हा सोबाचा राजा होता. फरात नदीजवळच्या आपल्या जमिनीचा ताबा घ्यायला, तिची हद्द निश्चित करायला दावीद तिकडे गेला तेव्हा त्याने या हददेजरचा पराभव केला. 4 सतराशे घोडेस्वार आणि वीसहजारांचे पायदळ त्याने हददेजर कडून बळकावले. रथाचे शंभर घोडे वगळता सर्व घोड्यांना त्याने कुचकामी करुन टाकले.
5 दिमिष्कामधील अरामी लोक हददेजरच्या मदतीला आले. त्या बावीस हजार अरामींनाही दावीदाने ठार केले. 6 मग त्याने दिमिष्कातील अरामात आपली ठाणी बसवली. हे अरामी लोकही दावीदाचे अंकित झाले आणि त्यांनी खंडणी आणली. दावीदाला परमेश्वराने तो जाईल तेथे यश दिले.
7 हददेजरच्या सैनिकांकडील सोन्याच्या ढाली दावीदाने ताब्यात घेऊन त्या यरुशलेमला आणल्या 8 हददेजरच्या ताब्यातील बेटा आणि बेरोथा (हददेजरची नगरे) येथील अनेक पितळी वस्तुही दावीदाने आणल्या.
9 हमाथचा राजा तोई याने, दावीदाने हददेजरच्या संपूर्ण सैन्याचा पाडाव केल्याचे ऐकले. 10 तेव्हा त्याने आपला मुलगा योराम याला राजा दावीद याच्याकडे पाठवले. हददेजरशी लढाईकरुन त्याचा पाडाव केल्याबद्दल योरामने त्याचे अभिनंदन करुन त्याला आशीर्वाद दिले. (हददेजरने यापूर्वी तोईशी लढाया केल्या होत्या) योरामने सोने, चांदी आणि पितळेच्या भेटवस्तू दावीदासाठी आणल्या होत्या. 11 दावीदाने त्या स्वीकारुन परमेश्वराला अर्पण केल्या. या आधीच्या समार्पित वस्तूंबरोबरच त्या ठेवून दिल्या. आपण पराभूत केलेल्या राष्ट्रामधून दावीदाने लूट आणलेली होती. 12 दावीदाने अरामी, मवाबी, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी यांचा पराभव केला. रहोबचा मुलगा, सोबाचा राजा हददेजर याचा पराभव केला. 13 क्षार खोऱ्यातील अठरा हजार अरामींचा पाडाव करुन तो परत आला तेव्हा त्याचा जयजयकार झाला. 14 अदोम मध्ये त्याने शिपायांची ठाणी बसवली. अदोमच्या सर्व प्रांतात अशी ठाणी बसवली. अदोमलोक त्याचे अंकित झाले. जेथे जाईल तेथे परमेश्वराने दावीदाला विजय मिळवून दिला.
दावीदाचे राज्य
15 दावीदाची सत्ता सर्व इस्राएलवर होती. त्याने प्रजेला न्यायाने धर्माने वागवले 16 सरूवेचा मुलगा यवाब सेनापती होता. अहीलुदाचा मुलगा यहोशाफाट हा अखबारनवीस होता. 17 अहीटुबाचा मुलगा सादोक आणि अब्याथारचा मुलगा अहीमलेख हे याजक होते. सराया कार्यवाह होता. 18 यहोयादचा मुलगा बनाया हा करेथी आणि पलेथी [a] यांचा प्रमुख होता. दावीदाची मुले महत्वाचे नेते होते.
शौलाच्या कुटुंबियांवर दावीदाची मेहेरनजर
9 दावीदाने विचारले, “शौलाच्या घराण्यातील कोणी व्यक्ती अजून राहिली आहे का? योनाथानसाठी मला तिच्यावर दया दाखवली पाहिजे”
2 सीबा नावाचा एक चाकर शौलाच्या घराण्यातला होता. दावीदाच्या सेवकांनी त्याला दावीदासमोर पाचारण केले. दावीदाने त्याला विचारले, “तूच सीबा काय?”
सीबा म्हणाला, “होय, मीच तुमचा दास सीबा.”
3 तेव्हा राजा म्हणाला, “शौलाच्या घराण्यातील कोणी आहे काय? देवाच्या कृपेचा लाभ त्याला मिळाला पाहिजे.”
सीबा राजाला म्हणाला, “योनाथानचा मुलगाच आहे. तो दोन्ही पायांनी पांगळा झाला आहे.”
4 तेव्हा दावीदाने सीबाला त्याचा ठावठिकाणा विचारला.
सीबाने सांगितले, “तो लो-दबार येथे, अम्मीएलचा मुलगा माखीर याच्या घरी आहे.”
5 तेव्हा राजा दावीदाने योनाथानच्या मुलाला आणण्यासाठी तेथे माणसे पाठवली. 6 योनाथानच्या मुलगा मफीबोशेथ आला आणि राजापुढे नतमस्तक होऊन उभा राहिला, “मफीबोशेथ?” राजाने विचारले.
मफीबोशेथ म्हणाला, “होय, मीच तुमचा सेवक मफीबोशेथ.”
7 त्याला दावीद म्हणाला, “भिऊ नको. माझा तुझ्यावर लोभ आहे. तुझ्या वडीलांसाठी मी एवढे करीन. तुझे आजोबा शौल यांची सर्व जमीन मी तुला परत देईन. माझ्या पंक्तीला नेहमी बसण्याचा मान तुला मिळेल.”
8 मफीबोशेथने पुन्हा दंडवत घातले. तो म्हणाला, “मेलेल्या कुत्र्या एवढीही माझी किंमत नाही. पण आपण या सेवकावर कृपादृष्टी करत आहात.”
9 दावीदाने मग शौलचा सेवक सीबा याला बोलवले. त्याला तो म्हणाला, “शौलाच्या मालकीचे जे जे काही आहे ते मी या तुझ्या मालकांच्या नातवाला, मफीबोशेथला दिले आहे. 10 त्याची जमीन तू कसायची. तुझी मुले आणि सेवक यांनी एवढे केले पाहिजे. तुम्ही शेतात पीक काढा म्हणजे तुझ्या मालकाच्या नातवाचा त्यावर निर्वाह होईल. पण तो नेहमी माझ्या पंक्तीला जेवेल.”
सीबाला पंधरा मुलगे आणि वीस नोकर होते. 11 सीबा दावीदाला म्हणाला, “मी तुमचा दास आहे. माझ्या धन्याच्या राजाच्या हुकुमाप्रमाणेच मी वागेन.”
तेव्हा मफीबोशेथ दावीदाच्या मुलांप्रमाणेच दावीदाच्या पंक्तीला बसून जेवू लागला. 12 मफीबोशेथला मीखा नावाचा लहान मुलगा होता. सीबाच्या परिवारातील सर्व लोक मफीबोशेथचे चाकर झाले. 13 मफीबोशेथ दोन्ही पायांनी पांगळा होता. यरुशलेम येथे त्याचे वास्तव्य होते. तो नित्य राजाच्या टेबलावर भोजन करीत असे.
2 म्हणून मी असा निश्चय केला की, मी पुन्हा तुमची दु:खदायक अशी भेठ घेणार नाही. 2 कारण जर मी तुम्हांला दु:ख देतो तर मला तुमच्याशिवाय आनंद कोण देईल? 3 आणि मी तुम्हांस हे यासाठी लिहिले की, मी आल्यावर ज्यांच्यापासून मी आनंदी व्हावे त्यांच्यापासून मला दु:ख होऊ नये. मला तुम्हा सर्वांविषयी विश्वास आहे की, माझा आनंद तो तुम्हा सर्वांचादेखील आहे. 4 कारण मी अत्यंत दु:खाने व कळवळून हे लिहित आहे पण तुम्हांला खिन्न करावे म्हणून नव्हे तर तुमच्याविषयी माझ्या मनात जी प्रीति आहे तिची खोली तुम्हांला समजावी म्हणून लिहित आहे.
ज्याने चूक केली त्याला क्षमा करा
5 जर कोणी कोणाला दु:ख दिले असेल तर त्याने फक्त मलाच ते दिले असे नाही, तर काही प्रमाणात तुम्हा सर्वांना दिले आहे. त्यासंबंधी मी फार कठीण होऊ इच्छित नाही. 6 अशा मनुष्यांना सगळ्यांनी मिळून दिलेली शिक्षा पुरे. 7 आता त्याऐवजी तुम्ही त्याला क्षमा केली पाहिजे आणि त्याचे सांत्वन केले पाहिजे. यासाठी की अति दु:खाने तो दबून जाऊ नये. 8 मी विनंति करतो, म्हणून तुमचे त्याच्यावरील प्रेम पुन्हा व्यक्त करा. 9 मी तुम्हांला लिहिण्याचे कारण हेच की तुम्ही परीक्षेत टिकता की नाही व प्रत्येक बाबतीत तुम्हा आज्ञाधारक राहता की नाही हे पाहावे. 10 जर तुम्ही एखाद्याला क्षमा करता तर मीसुद्धा त्याला क्षमा करीन. आणि ज्याची ज्या कशाची मी क्षमा केली आहे, आणि त्यातूनही जर काही क्षमा करण्याचे राहिले असेल-तर मी ख्रिस्ताच्या नजरेत तुमची क्षमा केली आहे. 11 यासाठी की सैतानाने आम्हांवर वरचढ होऊ नये. कारण त्याच्या योजना आम्हाला माहीत नाहीत असे नाही.
त्रोवस येथील पौलाची काळजी
12 जेव्हा मी ख्रिस्ताच्या सुवार्तेकरिता त्रोवसास आलो तेव्हा प्रभूमध्ये मजसाठी दार उघडल्यावर, 13 माझा भाऊ तीत मला तेथे सापडला नाही, म्हणून माझ्या आत्म्याचे सामाधान झाले नाही. पण तेथील लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियास गेलो.
14 पण देवाचे आभार मानतो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हांला विजयी करतो व त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध आमच्याद्धारे सगळीकडे पसरवितो. 15 कारण आम्ही, जे तारले जात आहोत व जे नाश पावत आहेत ते देवाला वाहिलेला ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत. 16 हरवलेल्यांसाठी आम्ही मरणाचा वास आहोत तर जे तारले गेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही जीवनाचा सुगंध आहोत. आणि या कामासाठी बरोबरीचा कोण आहे? 17 इतरांसारखे आम्ही फायद्यासाठी देवाच्या वचनाचे काम करीत नाही. याउलट ख्रिस्तामध्ये देवासमोर आम्ही देवाने पाठविलेल्या माणसांसारखे प्रामाणिकपणे बोलतो.
16 मला मग परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला, 2 “मानवपुत्रा, यरुशलेमच्या लोकांना त्यांनी केलेल्या भयंकर कृत्यांबद्दल सांग. 3 ‘परमेश्वर, माझा प्रभू, यरुशलेमला पुढील गोष्टी सांगतो, असे तू त्याना सांगितले पाहिजे. तुझ्या इतिहासावर नजर टाक. कनानमध्ये तुझा जन्म झाला. तुझे वडील अमोरी व आई हित्ती होती. 4 यरुशलेम, तू जन्मलीस तेव्हा तुझी नाळ कापायला कोणीही नव्हते. कोणीही मीठ टाकून तुला आंघोळ घातली नाही वा तुला दुपट्यात गुंडाळले नाही. 5 यरुशलेम, तू अगदी एकटी होतीस. कोणाला तुझ्यासाठी वाईट वाटले नाही वा कोणीही तुझी काळजी घेतली नाही. तू जन्मताच, तुझ्या आईवडिलानी तुला शेतात टाकून दिले. त्यावेळी तू रक्ताने माखलेली होतीस, तुझ्या अंगावर वारही तशीच होती.
6 “‘त्याच वेळी मी तुझ्याजवळून गेलो. मी तुला रक्तात लोळताना व हातपाय हालविताना पाहिले. तू रक्ताने माखली होतीस. पण मी तुला म्हणालो, “जिवंत राहा” खरेच, तू रक्ताने माखलेली असूनसुद्धा मी म्हणालो “जिवंत राहा.” 7 शेतातल्या रोप्याला जगवावे, तसे तुला जगवायला मी मदत केली. तू वाढत गेलीस आणि तरुणी झालीस. तू वयात आलीस, तुझ्यात तारुण्याची लक्षणे दिसू लागली. तुझे केसही वाढू लागले, पण तरीसुद्धा तू विवस्त्रच होतीस, उघडीच होतीस. 8 मी तुला पाखरले. तू प्रणयोत्सुक झाली होतीस. म्हणून माझे वस्त्र तुला लपेटून [a] मी तुझी नग्नता झाकली. मी तुला लग्नाचे वचन दिले. मी तुझ्याबरोबर करार केला आणि तू माझी झालीस.’” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला. 9 “‘मी तुला आंघोळ घातली. तुझ्या अंगावरचे रक्त धुवून काढले. तुझ्या अंगाला तेल चोळले. 10 मी [b] तुला उत्तम वस्त्रे व मऊ चामड्याचे जोडे दिले. तुझ्या डोक्याला तागाचा पट्टा गुंडाळला व तुला रेशमी ओढणी पांघरली. 11 मग मी तुला काही दागिने दिले. तुझ्या हातात बांगड्या व गळ्यात हार घातला. 12 मी तुला नथ, कर्णभूषणे आणि सुंदर मुकुट देऊन सजविले. 13 तू तुझ्या सोन्या-चांदीच्या अलंकारात व ताग, रेशीम यांच्या कशिदा काढलेल्या वस्त्रांत फारच सुंदर दिसत होतीस. तू चांगल्यातले चांगले अन्न खाल्लेस. तुझे सौंदर्य अप्रतिम होते. तू राणी झालीस! 14 तुझ्या सौंदर्याने तुला प्रसिद्धी मिळाली. पण माझ्यामुळे तू सुंदर झालीस!’” परमेश्वराने, माझ्या प्रभूने ह्या गोष्टी सांगितल्या.
15 देव म्हणाला, “पण तू आपल्या सौंदर्यावरच विश्वास ठेवायला सुरवात केलीस. तू तुझ्या चांगल्या नावाचा उपयोग करुन माझा विश्वासघात केलास. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाबरोबर तू वेश्येप्रमाणे वागलीस. त्या सर्वांच्या तू स्वाधीन झालीस. 16 तुझ्या सुंदर वस्त्रांचा उपयोग तू तुझी पूजास्थाने सजविण्यासाठी केलास. आणि तेथे तू वेश्येसारखे वर्तन केलेस. तुझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाच्या तू स्वाधीन झालीस. 17 मग मी तुला दिलेल्या सोन्या चांदीच्या अलंकाराचा उपयोग तू पुरुषांचे पुतळे बनविण्यासाठी केलास आणि त्या पुतळ्यांशीही व्यभिचार केलास. 18 सुंदर कापड आणून तू त्या मूर्तींना कपडे शिवलेस. मी तुला दिलेले अत्तर आणि धूप तू त्या मूर्तींपुढे ठेवलास. 19 मी तुला भाकरी, मध व तेल दिले. तेही तू त्या मूर्तींना दिलेस. तू खोट्या देवांनी प्रसन्न व्हावे म्हणून सुगांधित द्रव्ये म्हणून ह्या सर्व गोष्टी त्यांना अर्पण केल्यास. त्या खोट्या देवांबरोबर तू वेश्येप्रमाणे वागलीस.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
20 देव म्हणाला, “आपल्याला मुले झाली. पण तू आपली मुले घेतलीस व त्यांना ठार करुन खोट्या देवांना अर्पण केलेस. मला फसवून त्या खोट्या देवांकडे जाताना तू जी दुष्कृत्ये केलीस त्यातील ही फक्त काहीच होत. 21 तू माझ्या मुलांचा वध केलास आणि अग्निद्वारा त्यांना त्या खोट्या देवापर्यंत पोहोचविलेस. 22 तू माझा त्याग केलास आणि अशी दुष्कृत्ये केलीस. तुला तुझ्या बालपणाचे विस्मरण झाले. मला तू सापडलीस तेव्हा तू नग्नावस्थेत रक्तात लोळत होतीस हे तुला आठवले नाही.
23 “ह्या सर्व दुष्कृत्यानंतर हे यरुशलेम, तुझे भले होणार नाही.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो. 24 “ह्या सर्व गोष्टीनंतर, तू त्या खोट्या देवांना पूजण्यासाठी मातीचा ढिगारा रचलास. प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर तू अशी पूजास्थाने बांधलीस. 25 प्रत्येक रस्त्याच्या सुरवातीला तू मातीचे ढिगारे रचलेस. तू तुझ्या सौंदर्याला कमीपणा आणलास, तुझ्या सौंदर्याचा उपयोग तू तुझ्या जवळून जाणाऱ्या प्रत्येकाला पकडण्यासाठी केलास. त्यांना तुझे पाय दिसावे म्हणून तू तुझी वस्त्रे वर उचललीस आणि त्यांच्याबरोबर वेश्येसारखी वागलीस. 26 मग मोठे लिंग असलेल्या शेजाऱ्याकडे, मिसरकडे तू गेलीस व मला संतापविण्यासाठी त्याच्याबरोबर अनेकदा व्यभिचार केलास. 27 म्हणून मी तुला शिक्षा केली. तुझ्या भत्तयातील काही भाग (जमीन) मी काढून घेतला. तुझ्या शत्रूंना म्हणजेच पलिष्ट्यांच्या मुलींना (शहरांना) त्यांना पाहिजे तसे तुझ्याशी वागू दिले. तुझी दुष्कृत्ये पाहून त्यांनासुध्दा धक्काबसला. 28 मग तू अश्शूरकडे व्यभिचार करण्यासाठी गेलीस. पण तुझे समाधान होऊ शकले नाही. तुझी कधीच तृप्ती झाली नाही. 29 म्हणून मग तू कनानकडे वळलीस व तेथून खास्द्यांकडे गेलीस. पण अजूनही तू तृप्त नाहीस. 30 तू खूपच दुर्बल आहेस. म्हणूनच सर्व पुरुषांनी (देशांनी) तुला पापे करायला लावले. तू निर्दयपणे हुकमत चालवणाऱ्या वेश्येप्रमाणे वागलीस.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
31 देव म्हणाला, “पण तू पूर्णपणे वेश्यावृत्ती पत्करली नाहीस. तू प्रत्येक रस्त्याच्या टोकाला मातीचे ढिगारे रचलेस व प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर पूजास्थाने बांधलीस. तू सर्व पुरुषांबरोबर व्यभिचार केलास. [c] पण तू, वेश्येप्रमाणे, त्यांच्याजवळ मोबदला मागितला नाहीस. 32 व्यभिचारिणी, तुला स्वतःच्या पतीऐवजी परक्यांबरोबर व्यभिचार करायला आवडतो. 33 बहुतेक वेश्या पुरुषांना पैसे देण्यास भाग पाडतात. पण तूच सर्व प्रियकरांना पैसे दिलेस. तू व्यभिचारासाठी तुझ्याकडे बोलविलेल्या सर्व पुरुषांना पैसे दिलेस. 34 तू बहुतेक वेश्यांच्या अगदी उलट वागलीस. त्या पुरुषांकडून सक्तीने पैसे घेतात, तर तू तुझ्याबरोबर व्यभिचार करण्यासाठी उलट पुरुषांनाच पैसे देतेस.”
35 वारांगने, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐक. 36 परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो, “तू पैसा खर्च केलास आणि तुझ्या प्रियकरांना आणि घाणेरड्या देवांना तुझे नग्न शरीर पाहू दिलेस, तुझ्याबरोबर व्याभिचार करु दिलास. तुझ्या मुलाना ठार मारुन त्यांचे रक्त खोट्या देवांना भेट म्हणून दिलेस. 37 म्हणून मी तू ज्यांच्यावर प्रेम केलेस, त्या तुझ्या सर्व प्रियकरांना आणि ज्यांचा तू तिरस्कार करतेस त्यांना, एकत्र आणीन आणि तुझे नग्न शरीर पाहू देईन. [d] तुझे संपूर्ण नग्न शरीर ते पाहतील. 38 मग मी तुला शिक्षा करीन. खुनी व व्यभिचाराचे पाप केलेल्या स्त्रीप्रमाणे मी तुला शिक्षा करीन. क्रोधाविष्ट व मत्सरी पतीकडून व्हावी, तशी शिक्षा तुला होईल. 39 मी त्या तुझ्या प्रियकरांच्या हाती तुला देईन. ते तुझे मातीचे ढिगारे उद्ध्वस्त करतील. तुझी पूजास्थाने जाळतील. तुझी वस्त्रे फाडतील आणि तुझे सुंदर अलंकार घेतील. मला तू ज्या अवस्थेत सापडलीस, त्याच अवस्थेत (उघडी व नग्न) तुला ते सोडतील. 40 तुला ठार करण्यासाठी लोकांना जमवून ते तुझ्यावर दगड फेकतील. मग तलवारीने तुझे तुकडे तुकडे करतील. 41 ते तुझे घर (मंदिर) जाळतील. इतर स्त्रियांना कळावे म्हणून ते तुला शिक्षा करतील. मी तुला वेश्येप्रमाणे वागू देणार नाही. तुझ्या प्रियकरांना पैसे देऊ देणार नाही. 42 मग माझा राग व मत्सर निवळेल मी शांत होईन. पुन्हा कधीही रागावणार नाही. 43 हे सर्व का घडलं? कारण बालपणी काय घडले ह्याचे तुला विस्मरण झाले. तू वाईट गोष्टीबद्दल मला तुला शिक्षा करावी लागली. पण तू त्याहून भयंकर गोष्टी करण्याचा बेत केलास.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
44 “तुझ्याबद्दल बोलणाऱ्या सर्व लोकांना आता आणखी एक गोष्ट सांगायला मिळेल. ‘ती म्हणजे, खाण तशी माती (जशी आई, तशी लेक)’ 45 तू तुझ्या आईची मुलगी शोभतेस खरी! पतीची किंवा मुलांची तुला पर्वा नाही. तू अगदी तुझ्या बहिणीप्रमाणे आहेस. तुम्ही दोघीनी ही तुमच्या पतींचा व मुलांचा तिरस्कार केला. तू तुझ्या आईवडिलांसारखी आहेस. तुझी आई हित्ती तर वडील अमोरी होते. 46 तुझी मोठी बहीण शोमरोन होय. ती तुझ्या उत्तरेला तिच्या मुलींबरोबर (गावांसह) राहत होती. तुझी धाकटी बहीण सदोम [e] ही तुझ्या दक्षिणेला तिच्या मुलींसह (गावांसह) राहत होती. 47 त्यांनी केलेली भयंकर कृत्ये तू केलीसच पण त्यांच्यापेक्षाही वाईट कृत्ये केलीस. 48 मी परमेश्वर व प्रभू आहे. मी जिवंत आहे. माझ्या प्रतिज्ञेवर सांगतो की सदोम व तिच्या मुलींनी, तुझ्याइतकी व तुझ्या मुलींइतकी दुष्कृत्ये कधीच केली नाहीत.”
49 देव म्हणाला, “तुझी बहीण सदोम आणि तिच्या मुली गर्विष्ठ होत्या. त्यांना अन्नधान्याची विपुलता होती आणि त्यांच्याजवळ भरपूर वेळ होता. पण त्यांनी गरिबांना असहाय्य लोकांना मदत केली नाही. 50 सदोम व तिच्या मुली अती गर्विष्ट झाल्या, आणि त्यांनी माझ्या समोर भयानक गोष्टी करण्यास सुरवात केली. मी ते पाहताच त्यांना शिक्षा केली.”
51 देव म्हणाला, “शोमरोनने तुझ्याहून अर्धीसुद्धा दुष्कृत्ये केली नाहीत. तू तिच्यापेक्षा खूपच जास्त भयानक कृत्ये केलीस. तू तुझ्या बहिणीपेक्षा खूपच जास्त पाप केलेस. तुझ्या तुलनेत सदोम व शोमरोन बऱ्याच म्हणायच्या. 52 तेव्हा आता तुला अपमान सहन केलाच पाहिजे. तुझ्या बहिणींना तुझ्या तुलनेत, तूच चांगले ठरविले आहेस. तू भयंकर गोष्टी केल्या आहेस, तेव्हा तुला लज्जित व्हावेच लागेल.”
53 देव म्हणाला, “मी सदोम आणि तिच्या भोवतीच्या गावांचा नाश केला. मी शोमरोनचा आणि त्याच्या भोवतालच्या गावांचाही नाश केला, आणि आता, यरुशलेम, मी तुझा नाश करीन. मी ती शहरे पुन्हा वसवीन. यरुशलेम, तुलासुध्दा मी पुन्हा वसवीन. 54 मी तुझे सांत्वन करीन. मग तू स्वतः केलेली दुष्कृत्ये आठवून लज्जित होशील. 55 तेव्हा तुझी आणि तुझ्या बहिणींची पुन्हा उभारणी होईल. सदोम व तिच्याभोवतालची गावे, शोमरोन व तिच्या आजुबाजूची गावे आणि तू व तुझ्या सभोवतीची गावेही पुन्हा वसविली जातील.”
56 देव म्हणाला, “पूर्वी तू गर्विष्ठ होतीस. तेव्हा तू आपल्या बहिणीची सदोमची, चेष्टा केलीस. पण आता तू पुन्हा तसे करणार नाहीस. 57 तुला शिक्षा होण्याआधी, तुझे शेजारी तुझी थट्टा करण्याआधी, तू अशी वागलीस. अरामच्या आणि पलिष्ट्यांच्या मुली आता तुझी चेष्टा करीत आहेत. 58 तू केलेल्या दुष्कृत्यांबद्दल तुला दु:ख भोगलेच पाहिजे.” परमेश्वर असे म्हणाला.
59 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “तू मला जसे वागवलेस, तसेच मी तुला वागवीन. तू आपल्या लग्नाचे वचन मोडलेस. आपल्यातील कराराचा मान राखला नाहीस. 60 पण आपण केलेल्या कराराची मला आठवण असेल. मी तुझ्याबरोबर करार केला होता. आणि तो कायम चालू राहणार आहे. 61 मी तुझ्या बहिणींना तुझ्याकडे आणीन आणि त्यांना तुझ्या मुली करीन. हे आपल्या करारात नव्हते, पण मी हे तुझ्यासाठी करीन. मग तुला तुझ्या दुष्कृत्यांचे स्मरण होऊन लाज वाटेल. 62 मग मी तुझ्याबरोबर माझा करार करीन. मग तुला कळेल की मीच परमेश्वर आहे. 63 मी तुझ्याशी चांगले वागीन. मग तू माझे स्मरण ठेवशील आणि तू केलेल्या वाईट कृत्यांची तुला लाज वाटेल. तू जे काय केलेस, त्याबद्दल मी तुला क्षमा करीन. मग तुला पुन्हा लज्जित व्हावे लागणार नाही.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
प्रमुख गायकासाठी “नष्ट करु नको” या चालीवर आधारित दावीताचे मिक्ताम
58 न्यायाधीशांनो, तुम्ही तुमच्या निर्णयात न्यायी आहात काय?
तुम्ही लोकांचा न्यायाने निवाडा करीत आहात काय?
2 नाही, तुम्ही फक्त वाईट गोष्टी करण्याचाच विचार करता.
तुम्ही या देशात हिंसक कृत्ये करीत आहात.
3 त्या वाईट लोकांनी जन्मल्याबरोबर दुष्कर्म करायला सुरुवात केली.
ते जन्मापासूनच खोटारडे होते.
4 ते सापासारखेच भयंकर आहेत आणि नागाप्रमाणे त्यांना ऐकू येत नाही.
ते सत्य ऐकायला नकार देतात.
5 नागाला गारुड्याचे संगीत वा गाणे ऐकू येत नाही
आणि ती दुष्ट माणसे या सारखी आहेत.
6 परमेश्वरा, ती दुष्ट माणसे सिंहासारखी आहेत.
म्हणून परमेश्वरा तू त्यांचे दात पाड.
7 ते लोक वाहून जाणाऱ्या पाण्याप्रमाणे नाहीसे होवोत.
ते रस्त्यातल्या गवताप्रमाणे तुडवले जावोत.
8 चालताना विरघळून जाणाऱ्या गोगलगायी प्रमाणे ते विरघळून जावोत.
जन्मत: मेलेल्या व दिवसाचा प्रकाश न पाहिलेल्या बाळा प्रमाणे त्यांचे होवो.
9 भांडे तापविण्यासाठी काट्या पेटवितात.
तेव्हा त्यात चटकन् जळणाऱ्या काट्यांप्रमाणे त्यांचे होवो.
10 वाईट लोकांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल जर त्यांना शिक्षा झाली
तर चांगल्या माणसाला आनंद होईल,
तो त्या दुष्टांच्या रक्तात आपले पाय धुवेल.
11 असे जेव्हा घडेल तेव्हा लोक म्हणतील “चांगल्या माणसांना त्यांचे फळ मिळाले,
जगाला न्याय देण्यासाठी देव खरोखर आहे.”
प्रमुख गायकासाठी “नष्ट करु नकोस” या चालीवर आधारलेले दावीदाचे मिक्ताम दावीदला मारण्यासाठी शौलाने त्याच्या घरावर नजर ठेवायला माणसे पाठविली त्या वेळचे.
59 देवा, मला माझ्या शत्रूंपासून वाचव माझ्याशी लढायला जे लोक आले आहेत
त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी मला मदत कर.
2 वाईट कृत्ये करणाऱ्यांपासून मला वाचव.
मला त्या खुन्यांपासून वाचव.
3 बघ, ते बलवान लोक माझी वाट पहात आहेत.
ते मला मारण्यासाठी थांबले आहेत.
परंतु मी पाप केले नाही किंवा कुठला गुन्हा केला नाही.
4 ते माझा पाठलाग करीत आहेत परंतु मी काहीही चूक केली नाही.
परमेश्वरा, ये आणि स्वत:च बघ.
5 तू सर्वशक्तिमान परमेश्वर आहेस.
इस्राएलचा देव आहेस.
ऊठ आणि त्या लोकांना शिक्षा कर.
त्या दुष्ट देशद्रोह्यांना अजिबात दयामाया दाखवू नकोस.
6 ते दुष्ट लोक संध्याकाळच्या वेळी गावात
येणाऱ्या कुत्र्यांसारखे गुरगुरत आणि शहरातून फिरत येतात.
7 त्यांच्या धमक्या आणि अपमानित करणारे शब्द ऐक.
ते अतिशय दुष्ट गोष्टी बोलतात
आणि कुणी ते ऐकेल याची त्यांना पर्वा नसते.
8 परमेश्वरा, त्यांना हास,
त्या सर्वांचा उपहास कर.
9 देवा, तू माझी शक्ती आहेस.
मी तुझी वाट पाहात आहे देवा, तू माझी उंच पर्वातावरील सुरक्षित जागा आहेस.
10 देव माझ्यावर प्रेम करतो.
आणि तो मला जिंकण्यासाठी मदत करतो.
तो मला माझ्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी मदत करील.
11 देवा, तू त्यांना फक्त मारुन टाकू नकोस नाही तर माझे लोक त्यांना विसरुन जातील.
माझ्या रक्षणकर्त्या तू त्यांची दाणादाण उडव आणि तुझ्या शक्तीने त्यांचा पराभव कर.
12 ते दुष्ट लोक शाप देतात आणि खोटे बोलतात.
ते ज्या गोष्टी बोलले त्याबद्दल त्यांना शिक्षा कर.
त्यांचा अंहकार त्यांना सापळ्यात अडकवू दे.
13 रागाने तू त्यांचा नाश कर,
त्यांचा सर्वनाश कर.
नतंर लोकांना कळेल की देव याकोबाच्या लोकांवर आणि सर्व जगावर राज्या करतो.
14 ते दुष्ट लोक गुरगुरणाऱ्या कुत्र्यांप्रमाणे
रात्री शहरातून हिंडत येतात.
15 ते खाण्यासाठी अन्न शोधतील पण त्यांना काही मिळणार नाही
आणि झोपायला जागाही मिळणार नाही.
16 परंतु मी तुझी स्तुती करणारे गाणे गाईन.
रोज सकाळी मी तुझ्या प्रेमाचा आनंद घेईन का?
कारण तू माझी उंच पर्वतावरची सुरक्षित जागा आहेस
आणि संकटात मी तुझ्याकडे धाव घेऊ शकतो.
17 मी तुझे गुणवर्णन करणारे गाणे गाईन.
का? कारण तू माझी उंच पर्वतावरील सुरक्षित जागा आहेस.
माझ्यावर प्रेम करणारा देव तूच आहेस.
2006 by World Bible Translation Center