M’Cheyne Bible Reading Plan
देवाचा करारकोश यरुशलेममध्ये आणतात
6 दावीदाने पुन्हा इस्राएलमधून निवडक तीस हजार माणसे निवडून सैन्य तयार केले. 2 त्यासह तो पवित्र करार कोश यरुशलेमला आणण्यासाठी यहूदातील बाला येथे गेला. देवाची उपासना करायची असली म्हणजे हा कोश जेथे असेल तेथे लोकांना जावे लागे. हा पवित्र करार कोश म्हणजे देवाचे सिंहासन आहे. करुब देवदूतांच्या प्रतिकृती त्यावर होत्या. त्यावर परमेश्वर राजासारखा बसलेला होता. 3 अबीनादाबच्या डोंगरावरील घरातून दावीदाच्या लोकांनी हा पवित्र कोश आणला. मग तो एका नव्या गाडीवर ठेवला. अबीनादाबचे मुलगे उज्जा आणि अह्यो हे ती गाडी हाकीत होते.
4 अबीनादाबच्या डोंगरावरील घरातून हा पवित्र कोश त्यांनी वाहून आणला. अह्यो पवित्र कोशापुढे चालू लागला.
5 तेव्हा देवदाराच्या लाकडापासून केलेली नानाविध वाद्ये आणि वीणा, सारंगी, डफ, डमरु, झांजा वाजवत दावीद आणि त्याच्या बरोबरचे सर्व इस्राएल लोक नाचत कोशापुढे चालू लागले. 6 ते सर्व नाखोनच्या खळ्यापाशी आले तेव्हा बैल अडखळल्याने कोश गाडीतून पडायला लागला. तेव्हा उज्जाने तो सावरला. 7 पण परमेश्वराचा त्याच्यावर कोप होऊन उज्जाला मरण आले. पवित्र कोशाला स्पर्श करुन त्याने देवाविषयी अनादर दाखवला. तेव्हा करार कोशाशेजारीच उज्जा गतप्राण झाला. 8 या घटनेमुळे दावीद फार खिन्न झाला आणि त्याने या जागेचे नाव “पेरेस-उज्जा” म्हणजेच “उज्जाला शासन” असे ठेवले. आजही ते नाव प्रचलित आहे.
9 मात्र दावीदाला त्या दिवशी परमेश्वराचा धाक वाटू लागला. तो मनात म्हणाला, “आता मी हा पवित्र कोश माझ्याकडे कसा आणू?” 10 परमेश्वराचा पवित्र कोश (पवित्र कोशाची पेटी) आपल्याबरोबर दावीद नगरात आणण्याची दावीदाची इच्छा नव्हती आणि त्याने तो कोश (दावीदानगरात न हलवता) एका बाजूस नेऊन गथच्या ओबेद-अदोम याच्या घरी ठेवला. 11 तिथे तो कोश तीन महिने होता. ओबेद-अदोमच्या कुटुंबाला देवाने आशीर्वाद दिला.
12 पुढे लोक दावीदाला म्हणाले, “ओबेद अदोमच्या कुटुंबाला आणि त्याच्या सर्व मालमत्तेला परमेश्वराचा आशीर्वाद आहे. कारण पवित्र करार कोश तेथेच आहे.” तेव्हा दावीदाने तो पवित्र कोश त्याच्या घरातून आपल्याकडे आणला. यावेळी दावीदाचा आनंद गगनात मावत नव्हता. 13 कोश वाहून नेणारे लोक सहा पावले चालून गेल्यावर दावीदाने एक बैल आणि एक धष्टपुष्ट गोऱ्हा यांचा बळी दिला. 14 सुती एफोद घालून दावीद परमेश्वरापुढे नाच करत होता.
15 दावीद आणि सर्व इस्राएल लोक आनंदाने बेभान झाले होते. नगरात कोश आणताना ते जयजयकार करत होते. शिंग वाजवत होते. 16 शौलाची मुलगी मीखल हे सर्व खिडकीतून पाहात होती. कोश नगरात आणत असताना दावीद त्यापुढे नाचत. उड्या मारत होता. मीखलने हे पाहिले तेव्हा तिला खेद वाटला. दावीद स्वतःचे हसे करुन घेत आहे असे तिला वाटले.
17 या करार कोशासाठी दावीदाने राहुटी उभारली होती. त्यात योग्य जागी इस्राएली लोकांनी तो ठेवला. मग दावीदाने परमेश्वरापुढे होमार्पणे आणि शांत्यर्पणे वाहिली.
18 हे झाल्यावर दावीदाने सर्वांना सर्वशक्तिमान परमेश्वराच्या वतीने आशीर्वाद दिले. 19 शिवाय इस्राएलाच्या प्रत्येक स्त्री पुरूषांस त्याने भाकरीचा तुकडा, किसमिसाच्या ढेपेचा तुकडा आणि खजूर मिश्रित भाकरीचा तुकडा दिला. मग सर्वजण आपापल्या घरी गेले.
मीखलचा दावीदावरील राग
20 दावीद मग घरातील सर्वांना आशीर्वाद द्यायला घरात आला. तेव्हा शौलकन्या मीखल हिने त्याला गाठले आणि ती म्हणाली, “इस्राएलाच्या राजाने आज आपला मान राखला नाही. नोकरा चाकरांमोर, दासी समोर त्या मूर्खांपैकीच एक असल्याप्रमाणे तुम्ही आपले कपडे काढलेत.”
21 तेव्हा दावीद तिला म्हणाला, “तुझे वडील किंवा तुझ्या घराण्यातील दुसरे कोणी या सर्वांना वगळून परमेश्वराने मला निवडले आहे. सर्व इस्राएलांचा मी नेता आहे. तेव्हा मी परमेश्वरापुढे असाच नाचतगात जाणार. 22 मी याच्याही पुढची पायरी गाठीन. तुला आदर नसेल कदाचित् पण ज्या दासींचा तू उल्लेख केलास त्यांना माझ्याबद्दल अभिमान वाटतो.”
23 शौलाची कन्या मीखल हिला मूलबाळ झाले नाही. ती तशीच विनापत्य वारली.
इतर विश्वासणाऱ्यांसाठी वर्गणी
16 आता, देवाच्या लोकांकरीता वर्गणी गोळा करण्यविषयी, जसे मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे तुम्हीही तसे करावे. 2 प्रत्येक रविवारी तुम्हांतील प्रत्येकाने आपल्या घरी, जो काही त्याला नफा मिळाला असेल त्यातून काढून ठेवावे आणि बचत करावी. 3 मी येईन तेव्हा ज्या माणसांना तुम्ही मान्यता द्याल त्यांना मी ओळखपत्रे देऊन तुमच्या देणग्या यरुशलेमला नेण्यासाठी पाठवीन. 4 आणि जर माझेसुद्धा जाणे योग्य असेल तर ते माझ्याबरोबर येतील.
पौलाच्या योजना
5 मी मासेदोनियातून जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन कारण मासेदोनियातून जाण्याची माझी योजना आहे. 6 परंतु कदाचित शक्यतो मी तुमच्याबरोबर काही काळ घालवीन किंवा हिवाळासुद्धा तुमच्यात घालवीन. यासाठी की मी जिकडे जाणार आहे तिकडे तुम्ही मला पाठवावे. 7 जाता जाता तुम्हांला भेटण्याची माझी इच्छा नाही. कारण जर देवाची इच्छा असेल तर तुमच्यासमवेत काही काळ घालवावा अशी इच्छा मी धरतो. 8 पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिसात राहीन 9 कारण माझ्यासाठी मोठे आणि परिणामकारक दार उघडले आहे. आणि असे अनेक आहेत जे मला विरोध करतात.
10 जर तीमथ्य आला तर तो तुमच्याजवळ निर्भयपणे कसा राहील याकडे लक्ष द्या. कारण तोही माझ्यासारखेच प्रभूचे कार्य करीत आहे. 11 यास्तव कोणीही त्याला तुच्छ मानू नये. तर मग त्याने माझ्याकडे यावे म्हणून त्याला शांतीने पाठवा. कारण इतर बंधूंबरोबर त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे.
12 आता आपला बंधु अपुल्लोविषयी, इतर बंधूंबरोबर त्याने तुमच्याकडे यावे म्हणून मी त्याला भरपूर उत्तेजन दिले. परंतु आताच त्याने तुमच्याकडे यावे अशी देवाची इच्छा नव्हती. त्याला संधी मिळाल्यावर तो येईल.
पौल आपले पत्र संपवितो
13 सावध असा, तुमच्या विश्वासात बळकट राहा. 14 धैर्यशील व्हा. सशक्त व्हा. प्रत्येक गोष्ट जी तुम्ही कराल ती प्रीतीत करा.
15 बंधूंनो, मी तुम्हांला बोध करतो तुम्हांला स्तेफनच्या घराची माहिती आहे आणि जाणीवही आहे की ते अखयाचे प्रथम फळ आहे. त्यांनी स्वतः संतांची सेवा करण्याचे ठरविले आहे. 16 प्रत्येक जण जो या कार्यात सामील होतो व प्रभुसाठी श्रम करतो अशा लोकांच्या तुम्हीसुद्धा अधीन व्हा.
17 स्तेफन, फर्तुतात आणि अखायिक हे आल्याने मला आनंद झाला. कारण तुम्ही माझ्यासाठी जे केले ते तुम्ही करु शकला नसता. 18 कारण त्यांनी माझा व तुमचा आत्मा प्रफुल्लीत केला आहे. अशा लोकांना मान्यता द्या.
19 आशियातील मंडळ्या तुम्हांला सलाम सांगतात. अक्विला, प्रिस्कील्ला व जी मंडळी त्यांच्या घरात जमते, ती प्रभूमध्ये तुम्हांला फार सलाम सांगतात, 20 सर्व बंधु तुम्हांला सलाम सांगतात, पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा.
21 मी, पौल स्वतः माझ्या स्वतःच्या हाताने हा सलाम लिहीत आहे.
22 जर कोणी प्रभूवर प्रीति करीत नाही, तर तो शापित होवो.
“मारानाथा; हे प्रभु ये”
23 प्रभु येशूची कृपा तुम्हांबरोबर असो!
24 ख्रिस्त येशूमध्ये माझी प्रीति तुम्हां सर्वांबरोबर असो.
14 इस्राएलमधील काही वडीलधारी माणसे (नेते) माझ्याकडे आले. माझ्याशी बोलण्यासाठी ते बसले. 2 मला परमेश्वराचा संदेश आला. तो म्हणाला, 3 “मानवपुत्रा, हे लोक तुझ्याशी बोलायला आले आहेत. मला तू त्यांचा हिताच्या गोष्टी विचाराव्यास अशी त्यांची इच्छा आहे. पण अजूनही त्यांच्याजवळ त्या अमंगळ मूर्ती आहेत. त्यांना पाप करायला लावणाऱ्या ह्या गोष्टी त्यांनी जवळ बाळगल्या आहेत. ते अजूनही त्यांची पूजा करतात. मग ते सल्ला विचारण्यासाठी माझ्याकडे कशाला येतात? मी त्यांच्या प्रश्र्नंना उत्तर द्यावे का? नाही! 4 पण उत्तर मी त्यांना देईन. मी त्यांना शिक्षा करीन. तू ह्या गोष्टी त्यांना सांगच. ‘परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो: जर कोणी इस्राएली संदेष्ट्यामार्फत मला सल्ला विचारु लागला, तर संदेष्ट्याऐवजी मीच त्याच्या प्रश्र्नाला उत्तर देईन. जरी त्याच्याजवळ त्या घाणेरड्या मूर्ती असल्या, त्याला पापाला प्रवृत करणाऱ्या गोष्टी त्याने जवळ बालगल्या आणि त्यांची तो अजूनही पूजा करीत असला, तरी मी त्याच्या प्रश्र्नाला उत्तर देईन. त्याच्याजवळ त्या अंमगळ मूर्ती असल्या, तरी मी त्याच्याशी बोलेन. 5 का? कारण मला त्यांच्या हृदयात हात घालायचा आहे. त्या गलिच्छ मूर्तीसाठी त्यांनी माझा त्याग केला असला तरी, मी त्यांच्यावर प्रेम करतो, हे मला त्यांना दाखवायचे आहे.’
6 “म्हणून इस्राएलच्या लोकांना पुढील गोष्टी सांग. ‘परमेश्वर, माझा प्रभु, म्हणतो, त्या अमंगळ मूर्तीचा त्याग करुन माझ्याकडे परत या. त्या भयानक खोट्या देवांपासून दूर व्हा. 7 एखादा इस्राएली वा इस्राएलमध्ये राहणारा परका हिताच्या गोष्टीसाठी संदेष्ट्याकडे जाऊन माझा सल्ला काय आहे ते विचारू लागला, तर मी त्याला सल्ला देईन. त्याच्याजवळ जरी त्या घाणेरड्या मूर्ती असल्या, त्याला पाप करायला लावणाऱ्या गोष्टी त्याने जवळ बाळगल्या आणि तो त्यांची अजूनही पूजा करीत असला, तरी मी त्याच्या प्रश्र्नाला उत्तर देईन. आणि माझे उत्तर असे असेल. 8 मी त्याच्याकडे पाठ फिरवीन. मी त्याचा नाश करीन. तो इतरांसाठी एक उदाहरण होईल. लोक त्याला हसतील. माझ्या लोकांतून मी त्याला बाजूला काढीन. मगच तुम्हाला कळेल की मीच परमेश्वर आहे. 9 जर एखाद्या संदेष्ट्याने चुकीचे उत्तर दिले, तर मी, देवाने त्याला तसे [a] करण्यास भाग पाडले आहे. मी त्याच्याविरुद्ध माझे सामर्थ्य वापरीन. मी त्याचा नाश करीन आणि माझ्या माणसांतून इस्राएल लोकातून त्याला काढून टाकीन. 10 म्हणजेच सल्ला विचारणारा, आणि त्याला उत्तर देणारा (संदेष्टा) ह्या दोघांनाही सारखीच शिक्षा होईल. 11 का? म्हणजे तो संदेष्टा माझ्या माणसांना माझ्यापासून दूर नेणार नाही, माझे लोकही पापांत बरबटणार नाहीत. मग ते माझे खास लोक होतील, आणि मीच त्यांचा देव असेन.’” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
12 मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला, 13 “मानवपुत्रा, माझा त्याग करणाऱ्या आणि पाप करणाऱ्या राष्ट्रांला मग ते राष्ट्र कोणतेही असो मी शिक्षा करीन. त्यांचा अन्न पुरवठा मी बंद करीन. मी कदाचित् देशात दुष्काळ पाडीन व लोक व प्राणी यांना देशातून बाहेर काढीन. 14 नोहा, दानीएल व इयोब हे तिथले असले, आणि तरीसुध्दा मी त्या देशाला शिक्षा करीन. आपल्या चांगुलपणाने फारतर ते स्वतःचा जीव वाचवू शकत असले तरी त्या देशाला वाचवू शकत नाही.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
15 देव म्हणाला, “अथवा, कदाचित् मी हिंस्र प्राणी त्या देशात सोडीन आणि ते सर्व लोकांना ठार मारतील. त्या हिंस्र प्राण्यांमुळे कोणीही त्या देशामधून प्रवास करणार नाही. 16 जर नोहा, दानीएल व इयोब तेथे राहात असते, तर मी त्यांचे रक्षण केले असते. ते तिघे स्वतः चे प्राण वाचवू शकले असते. पण माझ्या प्राणाची शपथ घेऊन मी प्रतिज्ञा करतो ते इतरांचे प्राण वाचवू शकले नसते. त्यांच्या मुला-मुलींनाही ते वाचवू शकले नसते. पापी देशाचा नाश केला जाईल.” परमेश्वर माझा प्रभू, हे म्हणाला.
17 देव म्हणाला, “किंवा मी कदाचित् त्या देशावर चढाई करण्यासाठी शत्रूसैन्य पाठवीन. ते सैनिक त्या देशाचा नाश करतील. मी तेथील सर्व माणसांना व प्राण्यांना देशाबाहेर हालवीन. 18 जर नोहा, दानीएल व इयोब तेथे राहत असते, तर मी त्या तिघा सज्जानांना वाचविले असते. ते स्वतःचा प्राण वाचवू शकले असते पण माझी शपथ घेऊन वचन देतो की ते इतरांना म्हणजेच त्यांच्या मुलामुलींनासुध्दा वाचवू शकले नसते. त्या पापी देशाचा नाश केला जाईल” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या.
19 देव म्हणाला, “वा मी त्या देशात कदाचित् रोगराई पसरवीन. मी माझ्या क्रोधाचा त्यांच्यावर वर्षाव करीन. मी त्या देशातील सर्व लोकांचा व प्राण्यांचा मुक्काम तेथून हालवीन. 20 तेथे जर नोहा, दानीएल व इयोब राहात असते, तर ते सज्जन असल्यामुळे मी त्यांना वाचविले असते. ते तिघे स्वतःचे प्राण वाचवू शकले असते. पण माझी शपथ घेऊन वचन देतो की ते इतराना म्हणजे त्यांच्या मुलामुलींना सुद्धा वाचवू शकले नसते.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
21 मग परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, “यरुशलेमाची स्थिती किती वाईट होणार त्याचा विचार कर. शत्रू सैनिक, उपासमार, रोगराई आणि हिंस्र प्राणी या चारही शिक्षा मी त्यांना करीन. त्या देशातील सर्व माणसांना व प्राण्यांचा मी नाश करीन. 22 काही लोक त्या देशातून निसटतील, ते आपल्या मुलांमुलीना घेऊन, मदतीसाठी तुझ्याकडे येतील. मग ते लोक खरोखर किती वाईट आहेत, हे तुला कळेल आणि यरुशलेमवर मी आणलेली सर्व संकटे पाहून तुला बरेच वाटेल. 23 ते कसे जगतात आणि कोणत्या वाईट गोष्टी करतात हे तू पाहिल्यावर, त्यांना शिक्षा करण्यास सबळ कारण आहे, हे तुला पटेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे दावीदाचे मास्कील
55 देवा, माझी प्रार्थना ऐक
कृपा करुन माझी दयेची प्रार्थना टाळू नकोस.
2 देवा, कृपा करुन माझे ऐक
आणि मला उत्तर दे मला माझ्या तक्रारी सांगू दे.
3 माझे शत्रू माझ्याविरुध्द वाईट बोलले,
तो दुष्ट माणूस माझ्यावर ओरडला.
माझे शत्रू रागात होते आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला.
त्यांनी माझ्यावर संकटाचा पाऊस पाडला.
4 माझे ह्रदय धडधडत आहे
मी खूप घाबरलो आहे.
5 मी भीतीने थरथर कापत आहे.
मी भयभीत झालो आहे.
6 मला कबूतरासारखे पंख असते तर किती बरे झाले असते.
मी उडून विश्रांतीसाठी एखादी जागा शोधली असती.
7 मी खूप दूर वाळवंटात गेलो असतो.
8 मी पळून जाईन, मी माझी सुटका करेन.
मी संकटांच्या वादळापासून दूर पळून जाईन.
9 प्रभु त्यांचा खोटेपणा बंद कर. [a]
या शहरात मला खूप हिंसा आणि भांडणे दिसत आहेत.
10 माझ्या भोवती संकटे आहेत.
दिवस रात्र आणि शहराच्या सर्व भागात संकटे आहेत
या शहरात महाभयंकर घटना घडत आहेत.
11 रस्त्यावर बरेच गुन्हे घडत आहेत.
लोक सर्वत्र खोटे बोलत आहेत आणि फसवणूक करत आहेत.
12 जर शत्रूंनीच माझा अपमान केला
तर मी तो सहन करु शकेन.
जर शत्रूंनीच माझ्यावर हल्ला केला
तर मी लपू शकेन.
13 परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस माझा मित्र,
माझा साथी, माझा दोस्त.
14 आपण आपली गुपिंतं एकमेकांना सांगितली
आपण देवाच्या मंदिरात बरोबर प्रार्थना केली.
15 माझे शत्रू त्यांची वेळ यायच्या आधीच मरावेत अशी माझी इच्छा आहे,
जिवंतपणीच त्यांचे दफन व्हावे असे मला वाटते.
का? कारण ते त्यांच्या घरात भयंकर गोष्टी करण्याच्या योजना आखतात.
16 मी देवाला मदतीसाठी हाक मारीन
आणि परमेश्वर माझे रक्षण करील.
17 मी देवाशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी बोलतो.
मी देवाला माझ्या तक्रारी सांगतो आणि तो त्या नीट ऐकतो.
18 मी पुष्कळ लढाया लढलो आहे.
पण देवाने मला नेहमीच सोडविले व सुखरुप परत आणले.
19 देव माझ्या बोलण्याकडे लक्ष देतो.
तो अनादि अनंत काळचा राजा मला मदत करेल.
माझे शत्रू त्यांचे जीवन बदलणार नाहीत.
ते देवाला घाबरत नाहीत.
आणि त्याला मान ही देत नाहीत.
20 माझे शत्रू त्यांच्या मित्रांवर हल्ले करतात.
ज्या गोष्टी करण्याचे त्यांनी कबूल केलेले असते त्या ते करत नाहीत.
21 माझे शत्रू गोड बोलण्यात पटाईत आहेत.
ते शांतीविषयी बोलतात आणि प्रत्यक्षात मात्र युध्दाच्या योजना आखतात.
त्यांचे शब्द लोण्यासारखे मऊ असतात
परंतु ते सुरीसारखे कापतात.
22 तू तुझ्या चिंता परमेश्वराकडे सोपव
आणि तो तुझी काळजी घेईल.
परमेश्वर चांगल्या लोकांचा कधीही पराभव होऊ देणार नाही.
23 देवा, त्या खोटारड्या आणि खुनी माणसांना त्यांचे
आयुष्य अर्धे राहिलेले असतानाच त्यांच्या थडग्यात पाठव
आणि माझे म्हणशील तर, माझा तुझ्यावर भरंवसा आहे.
2006 by World Bible Translation Center