Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 27

दावीद पलिष्ट्यांचा आश्रय घेतो

27 पण दावीद मनात म्हणाला, “कधीतरी शौल मला पकडेल आणि ठार मारेल. त्यापेक्षा पलिष्ट्यांच्या भूमीत आश्रय घेणे उत्तम. तेव्हाच इस्राएलमध्ये माझा शोध घ्यायचे शौल थांबवेल. माझी त्याच्या तावडीतून सुटका होईल.”

मग दावीद आपल्या बरोबरच्या सहाशे माणसांना घेऊन इस्राएल सोडून गेला. मवोखचा मुलगा आखीश याच्याकडे ते सगळे आले. आखीश गथचा राजा होता. दावीद मग आपल्या बरोबरचे लोक आणि त्यांचा परिवार यांच्यासह गथ येथे आखीशच्या राज्यात राहिला. इज्रेलची अहीनवाम आणि कर्मेलची अबीगईल या दावीदाच्या दोन बायकाही त्याच्यासह होत्या. अबीगईल म्हणजे नाबालची विधवा. दावीद गथ येथे पळून गेला असल्याचे लोकांकडून शौलला कळले. तेव्हा त्याने दावीदचा पाठलाग सोडून दिला.

दावीद आखीशला म्हणाला, “माझ्यावर तुझी मेहेरनजर असेल तर या मुलखातील एखाद्या ठिकाणी मला राहायला जागा दे. मी केवळ एक सेवक आहे. मी असेच कुठेतरी राहायला पाहिजे, तुझ्याबरोबर इथे राजधानीच्या शहरी नव्हे.”

तेव्हा आखीशने त्याला सिकलाग हे नगर वस्तीला दिले. ते तेव्हापासून आजतागायत यहूदांच्या राजांच्या ताब्यात आहे. दावीद त्या पलिष्ट्यांच्या मुलखात एक वर्ष चार महिने राहिला.

दावीद आखीशाला फसवतो

शूर जवळच्या तेलेमपासून पार मिसरर्यंत जे अमालेकी आणि गशूरी लोक राहात त्यांच्यावर दावीदाने आपल्या माणसांसह हल्ले केले. त्यांचा पराभव करुन त्यांना लुटले. त्या भागातील सर्वांना दावीदाने नेस्तनाबूत केले. त्यांची मेंढरे, गाई गुरे, गाढवे, उंट, कापड चोपड लुटून आखीशच्या स्वाधीने केले. पण त्याने या लोकांपैकी कोणालाही जिवंत ठेवले नाही.

10 हे दावीदाने अनेकदा केले. कोणत्या लढाईवरुन ही लूट आणली असे आखीशने दरवेळी विचारल्यावर दावीद प्रत्येक वेळी सांगत असे, “यहूदाच्या दक्षिण भागावर हल्ला केला.” किंवा “यहरमेलीच्या दक्षिण प्रांतात लढाई केली” किंवा “केनीच्या दक्षिण प्रदेशावर चढाई केली” [a] 11 पराभूतांपैकी कोणालाही त्याने गथला जिवंत येऊ दिले नाही. दावीदला वाटायचे, “त्यांच्यापैकी कोणी इथे आले तर प्रत्यक्षात काय आहे ते आखीशला कळायचे.”

पलिष्ट्यांच्या भूमीत असेपर्यंत दावीदाने असेच केले. 12 दावीदाने आखीशचा विश्वास संपादन केला. आखीश मनात म्हणाला, “इस्राएलचे लोक आता दावीदचा द्वेष करतात. त्याच्याशी त्यांचा उभा दावा आहे. तेव्हा दावीद आता चिरकाल माझीच सेवा करील.”

1 करिंथकरांस 8

मूर्तीला अर्पिलेल्या अन्राविषयी

आता, मूर्तिंना अर्पण केलेल्या गोष्टीविषयी: आम्हाला माहीत आहे की, “आम्हा सर्वांना ज्ञान आहे.” ज्ञान लोकांना गर्वाने फुगविते. परंतु प्रीति लोकांना बलवान होत जाण्यास मदत करते. जर एखाद्याला वाटत असेल की, त्याला काही माहीत आहे, तर जसे त्याला कळायला पाहिजे तसे त्याला माहीत नसते. पण जर कोणी देवावर प्रीति करतो तर देवाला तो माहीत असतो.

म्हणून मूर्तिला वाहिलेल्या अन्राविषयी आपल्याला माहीत आहे की, “जगामध्ये खरी मूर्तिच नाही.” आणि त्या एकाशिवाय दुसरा देव नाही. आणि जरी लोक त्यांना देव म्हणतात, तरी असे अनेक तथाकथित देव आहेत जे स्वर्गात किंवा पृथ्वीवर आहेत (आणि पुष्कळ देव व पुष्कळ प्रभु आहेत) परंतु आमच्यासाठी फक्त एकच देव जो पिता तो आहे. आणि ज्याच्यासाठी आपण जगतो आणि ज्याच्यापासून सर्व गोष्टी येतात आणि फक्त एकच प्रभु येशू ख्रिस्त आहे. ज्याच्याद्वारे सर्व गोष्टी अस्तित्वात येतात व ज्याच्याद्वारे आपण जगतो.

पण प्रत्येकाला हे ज्ञान नसते. काहींना, ज्यांना आतापर्यंत मूर्तीची उपासना करण्याची सक्य होती ते असे मांस खातात व असा विचार करतात ते मूर्तीला वाहिलेले होते. आणि त्यांची सद्सद्विवेकबुद्धि दुर्बल असल्याने त्यांच्या कृत्यांना डागाळलेली आहे. परंतु अन्र आपणाला देवाजवळ आणणार नाही. जर आम्ही खाल्ले नाही तर वाईट होणार नाही किंवा खाल्ले तर अधिक चांगले होणार नाही.

तुमचा हा अधिकार जे दुर्बल आहोत त्यांच्यासाठी अपराध तर नाही याकडे लक्ष द्या. 10 कारण तू जो या गोष्टीचे ज्ञान असलेला त्या तुला दुर्बल बुद्धिच्या कोणी मूर्तिच्या मंदिरात जेवताना पाहिले, तर तो दुर्बल असून त्याची विवेकबुद्धि आत्यंतिक प्रबळ झाल्याने मूर्तीला वाहिलेले मांस खाण्यास त्याला उत्तेजन मिळणार नाही काय? 11 तो जो दुर्बल आहे, त्या तुझ्या भावासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा तुझ्या ज्ञानामुळे नाश होतो. 12 आणि अशा प्रकारे तुझ्या बंधूविरुद्ध पाप करुन आणि त्याच्या दुर्बल विवेकबुध्दीला जखम करुन तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता. 13 म्हणून अन्र जर माझ्या बंधूना पाप करायला लावते तर मी कधीही मांस खाणार नाही. यासाठी की माझ्या बंधूने पाप करु नये.

यहेज्केल 6

मग पुन्हा मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलच्या पर्वतांकडे वळ. माझ्यातर्फे त्यांच्याविरुद्व बोल. त्या पर्वंतांना पुढील गोष्टी सांग. ‘इस्राएलच्या पर्वतांनो, परमेश्वराकडून, माझ्या प्रभूकडून आलेला संदेश ऐका. देव, माझ्या प्रभू, टेकड्या, पर्वत, घळी, दऱ्या या सर्वांना उद्देशून म्हणतो की पाहा! मी (म्हणजेच देव) तुमच्याविरुद्व लढण्यासाठी शत्रूला आणीत आहे. मी तुमच्या उच्चस्थानांचा नाश करीन. 4-5 तुमच्या वेदींचे तुकडे तुकडे केले जातील, तुमच्या धूप दानांचा ही चुराडा केला जाईल. तुमची प्रेते मी त्या घाणेरड्या मूर्तीपुढे फेकून देईन. मी तुमची हाडे तुमच्या वेदींभोवती पसरवीन. त्या गलिच्छ मूर्तीपुढे मी इस्राएल लोकांची प्रेते टाकीन. तुमचे लोक कोठेही राहात असले तरी त्यांचे वाईट होईल. त्यांची शहरे दगडमातीचे ढिगारे होतील. त्यांच्या उच्चस्थानांचा नाश होईल. का? कारण त्यांचा परत कधीही पूजेसाठी उपयोग केला जाऊ नये! त्या सगळ्या वेदींचा नाश केला जाईल. लोक त्या घाणेरड्या मूर्तीची पुन्हा कधीही पूजा करणार नाहीत. लोक त्या घाणेरड्या मूर्तींची पुन्हा कधीही पूजा करणार नाहीत. त्या धूपदानांचे तुकडे तुकडे केले जातील. तुम्ही तयार केलेल्या सर्व गोष्टींचा नाश केला जाईल. तुमचे लोक मारले जातील. मग तुम्हाला कळेल की मीच परमेश्वर आहे.’”

देव म्हणाला, “तुमच्यातील काही लोकांना मी निसटू देईन. ते दुसऱ्या देशांत थोड्या काळाकरिता राहतील. मी त्यांना विखरुन टाकीन आणि दुसऱ्या देशांत राहायला भाग पाडीन. मग ह्या वाचलेल्या [a] लोकांना कैदी म्हणून नेले जाईल. त्यांना सक्तीने दुसऱ्या देशांत राहावे लागेल. पण ते लोक माझे स्मरण ठेवतील. मी त्यांचे ह्दयपरिवर्तन केले. म्हणून त्यांनी केलेल्या दुष्कृत्याबद्दल ते स्वतःचीच घृणा करतील. भूतकाळात, त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली, माझा त्याग गेला. आपल्या नवऱ्यला सोडून दुसऱ्‌या पुरुषांच्या मागे लागणाऱ्या बाईप्रमाणे, ते त्या गलिच्छ मूर्तींच्या मागे लागले. त्यांनी भयंकर कृत्ये केली. 10 पण ‘मीच परमेश्वर आहे’ हे त्यांना कळेल. त्यांना हेही कळेल की मी एखादी गोष्ट करायचे ठरविले, की ती करणारच. त्याचे वाईट मीच केले, हे त्यांना समजेल.”

11 नंतर परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “टाळ्या वाजवून आणि तुझे हातपाय आपटून इस्राएलच्या लोकांनी केलेल्या दुष्कृत्यांविरुद्ध बोल. ते रोगराईने व उपासमारीने मरतील अशी त्यांना ताकीद दे. ते युद्धात कामी येतील, असे त्यांना सांग. 12 दूरचे लोक रोगराईने मरतील. ह्या जागेच्या आसपासचे लोक लढाईत मरतील. मगच माझा राग शांत होईल. 13 आणि तेव्हाच तुम्हाला मीच परमेश्वर आहे हे कळेल, जेव्हा तुमची प्रेते, तुमच्या घाणेरड्या मूर्ती आणि तुमच्या वेदी यांच्यापुढे पडतील, तेव्हाच तुम्हाला मी परमेश्वर असल्याचे समजून येईल. उंच टेकड्या, पर्वत, हिरवी झाडे, दाट पालवीची एलाची झाडे अशा ठिकाणी म्हणजेच तुमच्या पूजेच्या प्रत्येक ठिकाणी प्रेते पडतील. ह्या सर्व ठिकाणी तुम्ही बळी अर्पण केले आणि घाणेरड्या मूर्तींपुढे सुवासिक धूप जाळला. 14 पण मी माझा हात उगारीन व तुला आणि तुझ्या लोकांना शिक्षा करीन. मी मग ते लोक कुठेंही राहात असोत, ह्या देशांचा नाश करीन. तो मग दिबला वाळवंटा पेक्षा ओसाड होईल. तेव्हाच त्यांना मीच परमेश्वर आहे हे कळून येईल.”

स्तोत्रसंहिता 44

प्रमुख गायकासाठी कोरहाच्या कुटुंबासाठी मास्कील

44 देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे.
    आमच्या वडिलांनी तू त्यांच्या आयुष्यात काय केलेस ते सांगितले,
    खूप पूर्वी तू काय केलेस तेही त्यांनी सांगितले.
देवा, तू तुझ्या सर्व शक्तीने हा देश इतर लोकांपासून घेतलास
    आणि तो आम्हाला दिलास
तू त्या परदेशी माणसांना चिरडलेस
    तू त्यांना हा देश सोडायला भाग पाडलेस.
हा देश आमच्या वडिलांच्या तलवारीने मिळवलेला नाही.
    त्यांच्या कणखर बाहूंनी त्यांना विजयी केले नाही.
हे घडले कारण तू त्यांच्या बरोबर होतास.
    देवा तुझ्या पराक्रमी शक्तीमुळे आमचे वाडवडील वाचले का?
    कारण तू त्यांच्यावर प्रेम केलेस.
देवा, तू माझा राजा आहेस आज्ञा दे
    आणि याकोबाच्या माणसांना विजयाप्रत ने.
देवा, तुझ्या मदतीने आम्ही शत्रूला मागे रेटू.
    तुझ्या नावाने आम्ही आमच्या शत्रूवर चालून जाऊ.
माझ्या धनुष्यबाणांवर माझा विश्वास नाही.
    माझी तलवार मला वाचवू शकणार नाही.
देवा, तू आम्हाला मिसर पासून वाचवलेस.
    तू आमच्या शत्रूंना लाजवले आहेस.
आम्ही रोज देवाची स्तुती करु आम्ही
    तुझ्या नावाची सदैव स्तुती करत राहू.

परंतु देवा, तू आम्हाला सोडून गेलास.
    तू आम्हाला अडचणीत टाकलेस तू आमच्याबरोबर लढाईत आला नाहीस.
10 तू आमच्या शत्रूंना आम्हाला मागे रेटू दिलेस.
    शत्रूंनी आमची संपत्ती घेतली.
11 तू आम्हाला मेंढ्यासारखे खायचे अन्न म्हणून देऊन टाकले.
    तू आम्हाला राष्ट्रांमध्ये इतस्तत: विखरुन टाकले.
12 देवा, तू आम्हाला कवडीमोलाने विकलेस.
    तू किंमतीसाठी घासाघीस देखील केली नाहीस.
13 तू शेजाऱ्यांमध्ये आमचे हसे केलेस.
    आमचे शेजारी आम्हाला हसतात.
    ते आमची मस्करी करतात.
14 आम्ही म्हणजे लोकांनी सांगितलेली हसवणूक आहोत,
    ज्यांना स्वत:चा देश नाही असे लोकही आम्हाला हसतात आणि मान हलवतात.
15 मी लाजेने वेढला गेलो आहे.
    दिवसभर मला माझी लाज दिसते.
16 माझ्या शत्रूंनी मला अडचणीत आणले
    माझे शत्रू माझी चेष्टा करुन जशास तसे वागायचा प्रयत्न करतात.
17 देवा, आम्ही तुला विसरलो नाही तरीही तू आम्हाला या सगळ्या गोष्टी करतोस
    आम्ही तुझ्याबरोबर केलेल्या करारनाम्यावर सही केली तेव्हा खोटे बोललो नाही.
18 देवा, आम्ही तुझ्यापासून दूर गेलो नाही.
    आम्ही तुझा मार्ग चोखाळणे बंद केले नाही.
19 परंतु देवा, तू आम्हाला कोल्हे राहातात त्या जागेत चिरडलेस,
    मृत्यूसारख्या अंधाऱ्याजागेत तू आम्हाला झाकलेस.
20 आम्ही आमच्या देवाचे नाव विसरलो का?
    आम्ही परक्या देवाची प्रार्थना केली का? नाही.
21 देवाला खरोखरच या गोष्टी माहीत असतात.
    त्याला आपल्या ह्रदयातल्या अगदी आतल्या गुप्त गोष्टीही माहीत असतात.
22 देवा आम्ही रोज तुझ्यासाठी मारले जात आहोत.
    मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे आम्ही आहोत.
23 प्रभु, ऊठ तू का झोपला आहेस?
    ऊठ आम्हाला कायमचा सोडून जाऊ नकोस.
24 देवा, तू आमच्यापासून लपून का राहात आहेस?
    तू आमची दु:ख आणि संकट विसरलास का?
25 तू आम्हाला घाणीत ढकलून दिले आहेस
    आम्ही धुळीत [a] पोटावर पडलो आहोत.
26 देवा, ऊठ! आम्हाला मदत कर.
    मेहेरबानी करुन आम्हाला वाचव.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center