M’Cheyne Bible Reading Plan
दावीद आणि योनाथान यांची घनिष्ठ मैत्री
18 शौलाशी चाललेले दावीदाचे बोलणे झाल्यावर योनाथान मनाने दावीदाच्या निकट आला. दावीदावर तो स्वतःइतकेच प्रेम करु लागला. 2 त्या दिवसापासून शौलाने दावीदला आपल्याजवळच ठेवून घेतले. त्याला तो आपल्या वडीलांकडे परत जाऊ देईना. 3 योनाथानचे दावीदावर अपार प्रेम होते. त्याने दावीदाशी एक करार केला. 4 योनाथानने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून दावीदला दिला. आपला गणवेष इतकेच नव्हे तर धनुष्य, तलवार कमरबंद हे ही दिले.
दावीदचे यश शौल पाहतो
5 शौलने मग दावीदला अनेक लढायांवर पाठवले. सगळीकडे त्याने विजय मिळवला. तेव्हा शौलाने दावीदला सेनापतिपद दिले. याने शौलच्या अधिकाऱ्यांसह सर्वजण खूश झाले. 6 दावीद पलिष्ट्यांचा सामना करायला लढाईवर जाई तेव्हा मुक्कामावर परतताना इस्राएलमधल्या सर्व गावातल्या स्त्रिया त्याच्या स्वागताला समोर येत. त्या आनंदाने गात नाचत. डफ, वीणा वाजवत. शौलच्या समोरच हे चाले. 7 त्या म्हणत,
“शौलाने हजार शत्रूंना ठार केले
तर, दावीदाने लाखो मारले.”
8 या गीतामुळे शौलाची मर्जी फिरली आणि त्याला संताप आला. “दावीद लाखो शत्रूंना ठार करतो आणि मी फक्त हजारोंना मारतो असे या म्हणतात काय” 9 तेव्हा पासून तो दावीदाकडे असूयेने आणि ईर्ष्येने पाहू लागला.
शौलला दावीदचे भय
10 दुसऱ्याच दिवशी शौला मध्ये दुष्ट आत्म्याचा संचार झाला. शौल बेफाम होऊन बडबड करु लागला. दावीद तेव्हा नित्याप्रमाणे वीणा वाजवत होता. 11 शौलच्या हातात तेव्हा भाला होता. शौलला वाटले, “याला आपण भिंतीशी खिळवावे.” शौलने मग दोनदा भाला नेम धरुन मारला पण दोन्ही वेळा दावीद निसटला.
12 दावीदाला परमेश्वराची साथ होती. आणि शौलाचा त्याने त्याग केला होता. तेव्हा दावीदबद्दल शौलच्या मनात धास्ती होती. 13 शौलाने दावीदाला दूर पाठवले. हजार सैनिकांचा अधिकारी म्हणून त्याला नेमले. दावीदाने या सैन्याचे लढाईत नेतृत्व केले. 14 परमेश्वर दावीदाच्या पाठीशी होता. तेव्हा दावीदला सर्व ठिकाणी यश मिळाले. 15 जिकडे तिकडे त्याची सरशी होताना पाहून शौलाला दावीदची आणखीच धास्ती वाटू लागली. 16 पण इस्राएल आणि यहूदामधील सर्व लोकांचे मात्र दावीदवर प्रेम होते. युध्दात त्यांच्या पुढे राहून त्यांच्यासाठी त्याने लढाया केल्यामुळे त्यांचा दावीदवर जीव होता.
आपल्या मुलीचे दावीदशी लग्न्न करुन देण्याची शौलची इच्छा
17 शौल मात्र दावीदाच्या जिवावर उठला होता. त्याला पेचात पकडण्यासाठी शौलाने एक योजना आखली. तो दावीदाला म्हणाला, “ही मेरब माझी मोठी मुलगी. तू हवे तर हिच्याशी लग्न कर. मग तू आणखीन सामर्थ्यवान होशील. तू माझ्या मुलासारखाच होशील. मग तू परमेश्वराच्या वतीने लढाया कर.” ही एक युक्ती होती. प्रत्यक्षात शौलाचा विचार वेगळाच होता. “आता मला त्याचा जीव घ्यायला नको. परस्पर पलिष्टीच त्याचा काटा काढतील” असा त्याचा बेत होता.
18 पण दावीद म्हणाला, “माझे घराणे तुमच्या तोलामोलाचे नाही. मीही काही मोठा माणूस नव्हे. तेव्हा मी राजकन्येशी कसा विवाह करु?”
19 त्यामुळे जेव्हा मेरबचा विवाह दावीदशी व्हायचा तो महोलाच्या अद्रीएलशी झाला.
20 शौलाची दुसरी मुलगी मीखल हिचे दावीदवर प्रेम होते. लोकांनी ही गोष्ट शौलाच्या कानावर घातली. तेव्हा त्याला फारच आनंद झाला.
21 त्याने विचार केला. “आता मीखलमुळे माझा बेत सफल होईल. तिचे लग्न मी दावीदाशी करुन देतो. मग पलिष्टी त्याचा वध करतील.” आणि दुसऱ्यांदा शौलाने दावीदाला लग्नाची अनुमती दिली.
22 शौलाने आपल्या अधिकाऱ्यांना आज्ञा दिल्या. त्यांना तो म्हणाला, “त्याला विश्वासात घेऊन हळूच सांगा, ‘राजाला तू आवडतोस. तू त्याच्या अधिकाऱ्यांच्या मर्जीतला आहेस. तेव्हा राजाच्या मुलीशी तू लग्न्न कर.’”
23 शौलाच्या अधिकाऱ्यांनी दावीदाला हे सर्व सांगितले. पण तो म्हणाला, “राजाचा जावई होणं सोपं आहे असं तुम्हाला वाटतं का? मी सामान्य, निर्धन माणूस, तिच्यासाठी खर्च कुठून करणार?”
24 दावीदाचे मनोगत शौलाच्या अधिकाऱ्यांनी शौलाला सांगितले. 25 शौल त्यांना म्हणाला, “त्याला सांगा, राजाला तुझ्याकडून हुंडा नको आहे. फक्त शत्रूंचा सूड उगवावा म्हणून त्याला पलिष्ट्यांच्या शंभर अग्रत्वचा तेवढ्या हव्या आहेत.” हे अर्थात कपट होते. अशाने पलिष्टी दावीदाचा काटा काढतील असे त्याला वाटले.
26 अधिकाऱ्यांनी हे सर्व दावीदला सांगितले. दावीदाला राजाचा जावई होणे पसंत पडले. तेव्हा त्याने भराभर पावले उचलली. 27 तो काही लोकांना बरोबर घेऊन पलिष्ट्यांवर चालून गेला. त्याने दोनशे [a] पलिष्ट्यांना मारले. त्यांच्या अग्रत्वचा काढून दावीदाने त्या शौलाला दिल्या.
कारण राजाचा जावई व्हायचे त्याच्या मनात होते. 28 शौलाने दावीदाशी मीखलचे लग्न करुन दिले. दावीदला परमेश्वराची साथ आहे आणि आपल्या मुलीचे, मीखलचे, त्याच्यावर प्रेम आहे हे शौलच्या लक्षात आले. 29 तेव्हा तो मनातून आणखी धास्तावला. तो दावीदाला सतत पाण्यात पाहात होता.
30 पलिष्ट्यांचे सरदार सतत इस्राएलींवर चालून जात. पण दावीद दरवेळी त्यांना पराभूत करी. शौलाचा तो एक यशस्वी अधिकारी होता. त्यामुळे दावीदची ख्याती पसरली.
पौलाला काही गोष्टी शेवटी सांगायच्या आहेत
16 किंख्रिया येथील मंडळीची सेविका, आमची बहीण फिबी हिची मी तुम्हांला शिफारस करतो 2 की, संतांना योग्या अशा प्रकारे तुम्ही तिचा स्वीकार करावा. आणि तिला तुमच्याकडून जी मदत लागेल ती करावी कारण माझ्यासह ती पुष्कळांना मदत करणारी होती.
3 ख्रिस्तामध्ये माझे सहकारी प्रिस्किल्ला आणि अक्विला यांना सलाम सांगा. 4 ज्यांनी माझ्यासाठी आपले जीव धोक्यात घातले होते. त्यांचे केवळ मीच आभार मानतो असे नाही, तर विदेशात स्थापन झालेल्या मंडळयाही आभार मानतात.
5 त्याशिवाय त्यांच्या घरी जी मंडळी जमते तिलाही सलाम सांगा.
माझा प्रिय मित्र अपैनत जो ख्रिस्तासाठी आशिया खंडातील प्रथम फळ आहे यालाही सलाम सांगा.
6 मरीया जिने तुमच्यासाठी फार काम केले तिला सलाम सांगा.
7 अंद्रोनीक आणि युनिया, माझे नातेवाईक आणि सहबंदिवान जे प्रेषितांमध्ये नामांकित आहेत व ख्रिस्तात माझ्यापूर्वी होते त्यांना सलाम सांगा.
8 प्रभुमध्ये माझा प्रिय आंप्लियात याला सलाम सांगा. 9 ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान
व माझा प्रिय मित्र स्ताखु यांना सलाम सांगा. 10 ख्रिस्तामध्ये पसंतीस उतरलेला अपिल्लेस याला सलाम सांगा.
अरिस्तबूल याच्या घरातील मंडळीस सलाम सांगा. 11 माझा नातेवाईक हेरोदियोन
आणि नार्किसास याच्या घरातली मंडळी जी प्रभूमध्ये आहे त्यांना सलाम सांगा. 12 त्रुफैना आणि त्रफीसा जे प्रभूमध्ये श्रम करणारे आहेत त्यांना सलाम सांगा.
प्रिय पर्सिस जिने प्रभूमध्ये फार श्रम केले आहेत तिला सलाम सांगा.
13 प्रभूमध्ये निवडलेला रुफ आणि त्याची आई जी माझीही आई आहे तिला सलाम सांगा.
14 असुंक्रित, फ्लगोन, हर्मेस, पत्रबास, हर्मास आणि त्यांच्याबरोबर जे बंधु आहेत त्यांना सलाम सांगा.
15 फिललग, युलिया, निरिय, त्याची बहीण ओलुंपा आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व संतगण यांना सलाम सांगा.
16 पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा.
ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हांला सलाम सांगतात.
17 बंधूजनहो, मी तुम्हांस विंनति करतो की, तुम्हांला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे कलह आणि असंतोष निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवा व त्यांच्यापासून दूर राहा. 18 असे लोक आपल्या प्रभूची सेवा करीत नाहीत, परंतु स्वतःच्या पोटाची सेवा करतात. आपल्या मधुर व खुशामत करणाऱ्या भाषणाने भोळ्या लोकांची फसवणूक करता. 19 त्यांच्यापासून दूर राहा कारण सर्व विश्वास णाऱ्यांना तुंम्ही किती आज्ञाधारक आहात हे माहीत आहे, म्हणून तुम्हाविषयी मी फार आनंदात आहे, परंतु मला तुम्ही जे चांगले त्याविषयी शहाणे आणि वाईटाविषयी भोळे असावे असे वाटते.
20 शांतीचा देव लवकरच सैतानाला तुमच्या पायदळी तुडवील आपल्या
प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांबरोबर असो.
21 माझा सहकारी तिमथ्य त्याचप्रमाणे माझे नातेवाईक लुक्य, यासोन व सोसिपतेर हे तुम्हांला सलाम सांगतात.
22 पौलासाठी हे पत्र लिहून देणारा मी तर्तिय तुम्हांला प्रभुमध्ये सलाम सांगतो.
23 माझे व सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस तुम्हांला सलाम सांगतो, नगराचा खजिनदार एरास्त आणि आमचा भाऊ क्वर्त तुम्हांला सलाम सांगतात. 24 (आपला प्रभु येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन.)
25 आता देव जो तुमच्या विश्वासात, तुम्हांला मी सांगत असलेल्या सुवार्तेप्रमाणे आणि प्रभु येशू ख्रिस्ताविषयी विदित करण्यास व तुमच्या विश्वासात स्थिर करण्यास समर्थ आहे, त्याला व देवाच्या रहस्याच्या प्रकटीकरणाला, धरुन जे पुष्कळ काळपर्यंत गुप्त ठेवले होत ते प्रकट करणाऱ्या देवाला गौरव असो. 26 परंतु आता आपणांला भविष्यवाद्यांच्या लिखाणाद्वारे दाखवून दिले आहे की, हे गुप्त सत्य सनातन देवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व परराष्ट्रीयांनी विश्वासापासून आज्ञाधारकपणा निर्माण करावा यासाठी माहीत करुन दिले आहे. 27 एकच ज्ञानी देव त्याला येशू ख्रिस्ताद्वारे युगानुयुगे गौरव असो. आमेन.
एकजण स्वतःच्या दु:खाची कारणमीमांसा करतो
3 खूप संकटे पाहिलेला मी एक माणूस आहे.
परमेश्वराने आम्हाला काठीने मारताना मी प्रत्यक्ष पाहिले.
2 परमेश्वराने मला प्रकाशाकडे
न नेता, अंधाराकडे नेले.
3 परमेश्वराने त्याचा हात माझ्याविरुध्द केला.
दिवसभर, त्याने आपला हात, पुन्हा पुन्हा, माझ्याविरुद्ध चालविला.
4 त्यांने माझी त्वचा आणि मांस नष्ट केले
आणि माझी हाडे मोडली.
5 परमेश्वराने माझ्याभोवती दु:ख व त्रास ह्यांच्या भिंती उभारल्या.
त्यांने दु:ख व त्रास माझ्याभोवती उभे केले.
6 त्याने मला अंधकारात बसायला लावले.
माझी स्थिती एखाद्या मृताप्रमाणे केली.
7 परमेश्वराने मला बंदिवान केल्यामुळे मी बाहेर येऊ शकलो नाही.
त्याने मला मोठमोठ्या बेड्या घातल्या.
8 मी जेव्हा मदतीसाठी आक्रोश करतो,
तेव्हासुध्दा परमेश्वर माझा धावा ऐकत नाही.
9 त्याने दगडधोड्यांनी माझ्या रस्त्यात अडथळा निर्माण केला आहे.
त्याने माझा मार्ग वाकडा केला आहे.
10 परमेश्वर, माझ्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसलेल्या, अस्वलासारखा आहे.
लपून बसलेल्या सिंहासारखा तो आहे.
11 परमेश्वराने मला माझ्या मार्गावरुन दूर केले.
माझे तुकडे तुकडे केले.
माझा नाश केला.
12 त्याने त्याचे धनुष्य सज्ज केले.
त्याने मला त्याच्या बाणांचे लक्ष्य बनविले.
13 त्याने माझ्या
पोटात बाणाने मारले.
14 मी माझ्या माणसांमध्ये चेष्टेचा विषय झालो.
सर्व दिवसभर, ते मला उद्देशून गाणी गातात व माझी टर्र उडवितात.
15 परमेश्वराने मला हे विष (शिक्षा) प्यायला दिले.
हे कडू पेय त्याने मला भरपूर पाजले.
16 परमेश्वराने मला दाताने खडे फोडायला लावले.
मला धुळीत लोटले.
17 मला पुन्हा कधीही शांती मिळणार नाही, असे मला वाटले.
मी चांगल्या गोष्टी तर विसरलो.
18 मी मनाशी म्हणालो, “परमेश्वराच्या कृपेची
मला मुळीच आशा नाही.”
19 परमेश्वरा, लक्षात ठेव.
मी फार दु:खी आहे, व मला घर नाही.
तू दिलेल्या कडू विषाचे (शिक्षेचे) स्मरण कर.
20 मला माझ्या सर्व त्रासांची आठवण आहे.
म्हणूनच मी दु:खी आहे.
21 पण मी पुढील काही गोष्टींचा विचार
केला की मला आशा वाटते.
22 परमेश्वराच्या प्रेम व दयेला अंत नाही.
परमेश्वराची करुणा चिरंतन आहे.
23 ती प्रत्येक दिवशी नवीन, ताजी असते.
परमेश्वरा, तुझी विश्वासार्हता महान आहे.
24 मी मनाशी म्हणतो, “परमेश्वर माझा देव आहे.
म्हणूनच मला आशा वाटेल.”
25 परमेश्वराची वाट पाहणाऱ्यांवर
व त्याला शोधणाऱ्यांवर तो कृपा करतो.
26 परमेश्वराने आपले रक्षण करावे
म्हणून मुकाट्याने वाट पाहणे केव्हाही चांगले.
27 परमेश्वराचे जोखड वाहणे केव्हाही बरेच.
ते तरूणपणापासून वाहणे तर फारच चांगले.
28 परमेश्वर त्याचे जोखड मानेवर ठेवत असताना
माणसाने मुकाट्याने एकटे बसावे.
29 माणसाने परमेश्वरापुढे नतमस्तक व्हावे.
कोणी सांगावे, अजूनही आशा असेल.
30 जो मणुष्य मारत असेल त्याला खुशाल गालात मारू द्यावे
व तो अपमान सहन करूण घ्यावा.
31 परमेश्वर लोकांकडे कायमची पाठ फिरवित नाही,
हे माणसाने लक्षात ठेवावे.
32 परमेश्वर जेव्हा शिक्षा करतो,
तेव्हा तो दया पण दाखवितो.
हा त्याचा दयाळूपणा त्याच्या जवळील
महान प्रेम व थोर करुणा ह्यामुळे आहे.
33 लोकांना शिक्षा करण्याची देवाची इच्छा नसते.
लोकांना दु:ख द्यायला त्याला आवडत नाही.
34 परमेश्वराला ह्या गोष्टी पसंत नाहीत.
पृथ्वीवरील सर्व बंदिवानांना कोणीतरी पायाखाली तुडविणे, त्याला आवडत नाही.
35 एका माणसाने दुसऱ्याशी अन्यायाने वागणे त्याला पसंत नाही.
पण काही लोक अशा वाईट गोष्टी सर्वश्रेष्ठ ईश्वारासमक्ष करतात.
36 एका व्यक्तिने दुसऱ्या व्यक्तिला फसविणे परमेश्वराला आवडत नाही.
ह्या अशा गोष्टी परमेश्वराला अजिबात पसंत नाहीत.
37 परमेश्वराच्या आज्ञेशिवाय, कोणी काहीही बोलावे
आणि ते घडून यावे असे होऊ शकत नाही.
38 सर्वश्रेष्ठ देवच इष्ट
वा अनिष्ट घडण्याची आज्ञा देतो.
39 एखाद्याच्या पापांबद्दल परमेश्वराने
त्याला शिक्षा केल्यास तो माणूस तक्रार करू शकत नाही.
40 आपण आपली कर्मे पाहू या
आणि तपासू या व नंतर परमेश्वराकडे परत जाऊ या.
41 स्वर्गातील परमेश्वराकडे
आपण आपले हृदय व हात उंचावू या.
42 आपण त्याला म्हणू या, “आम्ही पाप केले, आम्ही हट्टीपणा केला.
म्हणूनच तू आम्हाला क्षमा केली नाहीस.
43 तू क्रोधाविष्ट झालास आमचा पाठलाग केलास
आणि दया न दाखविता आम्हाला ठार केलेस.
44 कोणतीही प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून
तू स्वतःला अभ्रांनी वेढून घेतलेस.
45 दुसऱ्या राष्ट्रांसमोर तू आम्हाला कचरा
व धूळ ह्यासारखे केलेस.
46 आमचे सर्व शत्रू
आम्हाला रागाने बोलतात.
47 आम्ही घाबरलो आहोत.
आम्ही गर्तेत पडलो आहोत.
आम्ही अतिशय जखमी झालो आहोत.
आम्ही मोडून पडलो आहोत.”
48 माझ्या लोकांचा झालेला नाश पाहून मी रडते.
माझ्या डोळयांना धारा लागल्या आहेत.
49 माझे डोळे गळतच राहतील,
मी रडतच राहीन.
50 परमेश्वरा, तू आपली नजर खाली
वळवून आमच्याकडे पाही पर्यंत मी रडतच राहीन.
तू स्वर्गातून आमच्याकडे लक्ष
देईपर्यंत मी शोक करीन.
51 माझ्या नगरातील सर्व मुलींची स्थिती पाहून
माझे डोळे मला दु:खी करतात.
52 निष्कारण शत्रू बनलेल्या लोकांनी
पाखरासारखी माझी शिकार केली आहे.
53 मी जिवंत असताना त्यांनी मला खड्ड्यात लोटले
आणि माझ्यावर दगड टाकले.
54 माझ्या डोक्यावरुन पाणी गेले.
मी मनाशी म्हणालो, “आता सर्व संपले.”
55 परमेश्रा मी तुझ्या नांवाने हाक मारली परमेश्वरा,
खड्ड्यातून तुझ्या नांवाचा धावा केला.
56 तू माझा आवाज ऐकलास.
तू तुझ्या कानावर हात ठेवले नाहीस.
माझी सुटका करण्याचे तू नाकारले नाहीस.
57 मी धावा करताच तू आलास.
तू मला म्हणालास, “घाबरू नकोस.”
58 परमेश्वरा, तू माझे रक्षण केलेस
तू मला पुनर्जीवन दिलेस.
59 परमेश्वरा, तू माझा त्रास पाहिला आहेस.
आता मला न्याय दे.
60 माझ्या शत्रूंनी मला कसे दुखविले
आणि माझ्याविरुद्ध कसे कट रचले ते तू पाहिले आहेस.
61 त्या शत्रूंनी केलेला माझा अपमान आणि माझ्याविरुध्द आखलेले बेत तू.
परमेश्वरा, ऐकले आहेस.
62 सर्व काळ, शंत्रूचे बोलणे व
विचार माझ्या विरुध्द आहेत.
63 परमेश्वरा, बसता उठता
ते माझी कशी खिल्ली उडवितातत ते पाहा.
64 परमेश्वरा, त्यांना योग्य ते फळ दे.
त्यांच्या कार्मांची परत फेड कर.
65 त्यांचे मन कठोर कर.
नंतर त्यांना शाप दे.
66 क्रोधाने त्यांचा पाठलाग कर व त्यांचा नाश कर.
ह्या आकाशाखाली, परमेश्वरा, त्यांचा नाश कर.
दावीदाचे स्तोत्र दावीद अबिमलेखापुढे वेड्यासारखा वागला तेव्हा त्याने दावीदाला हाकलून दिले. अशा रीतीने दावीद त्याला सोडून गेला
34 मी परमेश्वराला नेहमी धन्यवाद देईन.
माझ्या ओठांवर नेहमी त्याची स्तुती असेल.
2 विनम्र लोकांनो ऐका आणि आनंदी व्हा
माझ्या मनाला परमेश्वराचा गर्व वाटतो.
3 देवाच्या महानते बद्दल माझ्या बरोबर सांगत चला.
आपण त्याच्या नावाला प्रतिष्ठा देऊ या.
4 मी देवाकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने माझे ऐकले.
मला ज्या सर्व गोष्टींची भीती वाटत होती त्यापासून त्याने मला वाचवले.
5 देवाकडे मदतीसाठी वळा तुमचा स्वीकार होईल
लाज वाटून घेऊ नका.
6 या गरीब माणसाने परमेश्वराकडे मदत मागितली
आणि परमेश्वराने माझे ऐकले.
त्याने माझी सर्व संकटांतून मुक्तता केली.
7 परमेश्वराचा दूत त्याच्या भक्तांभोवती छावणी बांधतो.
परमेश्वराचा दूत त्यांचे रक्षण करतो व त्यांना संकट मुक्त करतो.
8 परमेश्वराचा अनुभव घ्या आणि तो किती चांगला आहे
ते शिका जो परमेश्वरावर अवलंबून असतो तो खरोखरच सुखी होईल.
9 परमेश्वराच्या पवित्र लोकांनी त्याची भक्ती केली पाहिजे.
परमेश्वराच्या भक्तांसाठी सुरक्षित अशी दुसरी जागा नाही.
10 शक्तिशाली माणसे दुबळी आणि भुकेली बनतील.
परंतु जे लोक देवाकडे मदतीसाठी जातात त्यांना चांगल्या गोष्टी मिळतील.
11 मुलांनो माझे ऐका आणि
मी तुम्हाला परमेश्वराला कसा मान द्यायचा ते शिकवीन.
12 जर एखाद्याचे जीवनावर प्रेम असेल
आणि त्याला जर खूप आणि चांगले जगायचे असेल तर,
13 त्याने वाईट गोष्टी बोलायला नकोत.
त्याने खोटे बोलायला नको.
14 वाईट कृत्ये करणे सोडून द्या.
चांगली कृत्ये करा.
शांतीसाठी काम करा.
शांती मिळे पर्यंत तिच्या मागे धावा.
15 परमेश्वर चांगल्या लोकांचे रक्षण करतो.
तो त्यांची प्रार्थना ऐकतो.
16 परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्या लोकांच्या विरुध्द आहे.
तो त्यांचा सर्वनाश करतो.
17 परमेश्वराची प्रार्थना करा, तो तुमचे ऐकेल.
तो तुम्हाला तुमच्या सर्व संकटांतून वाचवेल.
18 काही लोकांवर खूप संकटे येतात आणि ते गर्व करायचे थांबवतात.
परमेश्वर अशा लोकांच्या जवळ असतो.
तो त्या विनम्र लोकांचे रक्षण करतो. [a]
19 चांगल्या लोकांच्या मागे अनेक संकटे येतील.
परंतु परमेश्वर त्यांना त्यांच्या प्रत्येक संकटातून वाचवतो.
20 परमेश्वर त्यांच्या सर्व हाडांचे रक्षण करेल.
त्यांचे एकही हाड तो मोडू देणार नाही.
21 परंतु संकटे वाईट माणसांना मारुन टाकतील चांगल्या
माणसांच्या सगळ्या शत्रूंचा नाश होईल.
22 परमेश्वर त्याच्या सेवकांच्या आत्म्यांना वाचवतो.
ते लोक त्याच्यावर अवलंबून असतात तो त्यांचा विनाश होऊ देणार नाही.
2006 by World Bible Translation Center