Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 1

एलकाना आणि त्याचे कुटुंबीय यांची शिलोह येथे भक्ती

एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील रामा येथला, एलकाना नावाचा एक गृहस्थ होता. हा एलकाना सूफ घराण्यातला असून यरोहाम (किंवा यरामील) याचा मुलगा. यरोहाम एलिहूचा मुलगा आणि एलिहू तोहूचा. तोहू, एफ्राईम घराण्यातील सूफचा मुलगा होय.

एलकानाला दोन बायका होत्या. एकीचे नाव हन्ना आणि दुसरीचे पनिन्ना. पनिन्नाला मुलंबाळं होती, पण हन्नाला मात्र अजून मूल झाले नव्हते.

एलकाना दरवर्षी रामा या आपल्या गावाहून शिलोह येथे जात असे. तेथे तो यज्ञ आणि सर्वशक्तीमान परमेश्वराची भक्ती करत असे. तेथे हफनी आणि फिनहास हे एलीचे मुलगे याजक म्हणून पौरोहित्य करीत होते. एलकाना दर यज्ञाच्या वेळी पनिन्ना आणि तिची मुले यांना त्यांच्या वाटचे अन्न देई. हन्नालाही तो समान वाटा देई. परमेश्वराने तिची कूस उजवलेली नसतानाही तो देई, कारण हन्नावर त्याचे खरेखुरे प्रेम होते.

हन्नाचा पाण उतारा

पनिन्ना दर वेळी काहीतरी बोलून हन्नाला दु:खवी. मूलबाळ नसल्यावरुन दूषणे देई. असे दरवर्षी चालायचे. शिलो येथील परमेश्वराच्या मंदिरात सर्व कुटुंबीय जमले की पनिन्नाच्या बोलण्यामुळे हन्ना कष्टी होई. एकदा असेच एलकाना यज्ञ करीत असताना हन्ना दु:खीकष्टी होऊन रडू लागली. ती काही खाईना. एलकाना ते पाहून म्हणाला, “तू का रडतेस? तू का खात नाहीस? तू का दु:खी आहेस? तुला मी आहे-मी तुझा नवरा आहे. तू असा विचार कर की मी दहा मुलांपेक्षा अधिक आहे.”

हन्नाची प्रार्थना

सर्वांचे खाणे पिणे झाल्यावर हन्ना गूपचूप उठली आणि परमेश्वराची प्रार्थना करायला गेली. एली हा याजक तेव्हा परमेश्वराच्या पवित्रस्थानाच्या दरवाजाजवळ आपल्या आसनावर बसला होता. 10 हन्ना अतिशय खिन्न होती. परमेश्वराची प्रार्थना करताना तिला रडू कोसळले. 11 परमेश्वराला ती एक नवस बोलली. ती म्हणाली, “हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझे दु:ख तू बघतोच आहेस. माझा विसर पडू देऊ नकोस. तू मला मुलगा दिलास तर मी तो तुलाच अर्पण करीन. तो परमेश्वराचा नाजीर होईल. तो मद्यपान करणार नाही. त्याचे आम्ही जावळ काढणार नाही.”

12 हन्नाची प्रार्थना बराच वेळ चालली होती. त्यावेळी एलीचे तिच्या तोंडाकडे लक्ष होते. 13 ती मनोमन प्रार्थना करत होती त्यामुळे तिचे ओठ हलत होते पण शब्द बाहेर फुटत नव्हते. त्यामुळे ती दारुच्या नशेत आहे असे एलीला वाटले. 14 एली तिला म्हणाला, “तू फार प्यायलेली दिसतेस. आता मद्यापासून दूर राहा.”

15 हन्ना म्हणाली, “महाशय, मी कोणतेही मद्य घेतलेले नाही. मी अतिशय त्रासलेली आहे. परमेश्वराला मी माझी सर्व गाऱ्हाणी सांगत होते. 16 मी वाईट बाई आहे असे समजू नका. मी फार व्यथित आहे, मला फार दु:खं आहेत म्हणून मी खूप वेळ प्रार्थना करीत होते इतकंच.”

17 तेव्हा एली म्हणाला, “शांतीने जा. इस्राएलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो तुला देवो.”

18 “तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात अशी आशा आहे.” असे त्याला म्हणून हन्ना निघाली. तिने नंतर थोडे खाल्लेही. आता तिला उदास वाटत नव्हते.

19 दुसऱ्या दिवशी पहाटे उठून परमेश्वराची भक्ती करुन एलकानाचे कुटुंबीय रामा येथे आपल्या घरी परतले.

शमुवेलचा जन्म

पुढे एलकाना आणि हन्नाचा संबंध आला तेव्हा परमेश्वराला तिचे स्मरण झाले. 20 यथावकाश तिला दिवस राहिले व मुलगा झाला. हन्नाने त्याचे नाव शमुवेल ठेवले. ती म्हणाली, “मी परमेश्वराकडे त्याला मागितले म्हणून त्याचे नाव शमुवेल.”

21 एलकाना त्या वर्षी यज्ञ करण्यासाठी आणि देवाला बोललेले नवस फेडण्यासाठी शिलो येथे सहकुटुंब गेला 22 हन्ना मात्र गेली नाही. ती म्हणाली, “मुलगा जेवण खाऊ शकेल इतपत मोठा झाला की मी त्याला शिलोहला घेऊन जाईन. त्याला परमेश्वराला वाहीन. तो नाजीर होईल. मग तो तिथेच राहील.”

23 हन्नाचा पती एलकाना त्यावर म्हणाला, “तुला योग्य वाटेल तसे कर. तो खायला लागेपर्यंत तू हवी तर घरीच राहा. परमेश्वराने दिलेला आशीर्वाद खरा ठरो.” तेव्हा हन्ना घरीच राहिली कारण शमुवेल अंगावर पीत होता. त्याचे दूध तुटेपर्यंत ती राहिली.

हन्ना शमुवेलला घेऊन सिलो येथे एलीकडे जाते

24 तो पुरेसा मोठा झाल्यावर हन्ना त्याला शिलोहे येथे परमेश्वराच्या मंदिरात घेऊन आली. तिने तीन वर्षाचा एक गोऱ्हा वीस पौंड पीठ आणि द्राक्षरसाचा बुधला हे ही आणले.

25 ते सर्व परमेश्वरासमोर गेले. एलकानाने नेहमी प्रमाणे परमेश्वरासमोर गोऱ्ह्याचा बळी दिला. [a] मग हन्नाने मुलाला एलीच्या स्वाधीन केले. 26 ती एलीला म्हणाली “महाशय, माझ्यावर कृपादृष्टी असू द्या मी खरे तेच सांगते. मीच इथे तुमच्याजवळ बसून पूर्वी परमेश्वराजवळ याचना केली होती. 27 परमेश्वराकडे मी मुलगा मागितला आणि परमेश्वराने माझी इच्छा पूर्ण केली. परमेश्वराने हा मुलगा मला दिला. 28 आता मी तो परमेश्वराला अर्पण करते. तो आयुष्यभर परमेश्वराची सेवा करील.”

हन्नाने मग मुलाला तिथेच ठेवले [b] आणि परमेश्वराची भक्ती केली.

रोमकरांस 1

प्रेषित होण्यासाठी पाचारण केलेला; देवाची सुवार्ता सांगण्यासाठी वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा सेवक पौल याजकडून. देवाच्या संदेष्ट्यांच्या द्वारे पवित्र शास्त्रात पूर्वी सांगितलेली होती, 3-4 ती ही सुवार्ता देवाचा पुत्र प्रभु येशू ख्रिस्त जो देहाने एक मनुष्य म्हणून दाविदाच्या वंशात जन्माला आला याच्याविषयी आहे.पण पवित्रतेच्या आत्म्याच्याद्वारे तो मरणातून पुन्हा जिवंत झाला त्यामुळे त्याच्या सामर्थ्यासह “देवाचा पुत्र” असा गणला गेला.

त्या आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्हांला कृपा आणि प्रेषित पद मिळाले आहे. अशासाठी की जे यहूदी नाहीत त्यांच्यामध्ये त्याच्या नावांकरिता विश्वासाच्या आज्ञापालनामुळे जो आज्ञाधारकपणा निर्माण होतो तो निर्माण करावा. तुम्हीही त्या यहूदी नसलेल्यांमध्ये आणि देवाकडून येशू ख्रिस्ताचे अनुयायी होण्यासाठी बोलाविलेले आहात.

ज्या लोकांवर देवाने प्रेम केले आहे व त्याचे पवित्र जन होण्यासाठी बोलाविलेले असे जे लोक रोममध्ये आहेत त्या सर्वांना मी लिहित आहे.

आपला पिता व प्रभु येशू ख्रिस्त यांजकडून तुम्हांस कृपा व शांति असो.

आभाराची प्रार्थना

सुरुवातीलाच तुम्हां सर्वांसाठी येशू ख्रिस्ताद्वारे मी देवाचे आभार मानतो, कारण तुमचा विश्वास जगात सगळीकडे जाहीर होत आहे. देव माझा साक्षी आहे, ज्याची सेवा मी आत्म्याने त्याच्या पुत्राची सुवार्ता सांगून करतो. मी तुमची नेहमी आठवण करतो. 10 माझ्या प्रार्थनेत मी नेहमी मागतो, जर देवाची इच्छा असेल तर शेवटी मला तुम्हांला भेटता येणे शक्य व्हावे. 11 मला तुम्हांला भेटण्याची फार इच्छा आहे. यासाठी की काही आध्यात्मिक दानांविषयी तुम्हांबरोबर सहभागी व्हावे आणि तुम्ही बलवान व्हावे. 12 म्हणजे जोपर्यंत मी तुमच्यामध्ये आहे तोपर्यंत आपण एकमेकांना विश्वासामध्ये मदत करु. माझ्या विश्वासामुळे तुम्हांला व तुमच्या विश्वासामुळे मला फायदा होईल.

13 बंधूनो, पुष्कळ वेळा तुम्हांला भेट देण्याची मला इच्छा झाली. यासाठी की, जसे मला यहूदीतरांमध्ये मिळाले, तसे तुमच्यामध्येसुद्धा फळ मिळावे. परंतु आतापर्यंत मला तुमच्यापर्यंत येण्यास अडथळे आले हे तुम्हांला माहीत असावे.

14 मी सर्व लोकांची-ग्रीक आणि ग्रीक नसलेले, शहाणे आणि मूर्ख-सेवा केली पाहिजे. 15 त्यासाठीच तुम्ही जे रोममध्ये आहात त्या तुम्हांला सुद्धा सुवार्ता सांगण्याची माझी फार इच्छा आहे.

16 मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण देवाचे सामर्थ्य जो कोणी विश्वास ठेवतो त्या सर्वासाठी तारण आहे. प्रथम यहूद्यांकारिता आणि नंतर ग्रीकांसाठी. 17 कारण सुवार्तेमध्ये देवाचे नितिमत्व ते विश्वासापासून विश्वास असे प्रगट झाले आहे. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, “नितिमान विश्वासाद्वारे वाचेल.”

सर्व लोकांनी चुका केल्या आहेत

18 लोकांनी केलेल्या प्रत्येक अनितीच्या कृत्यांमुळे व जे आपल्या अनीतीने सत्य दाबून ठेवतात, त्यांच्यामुळे स्वर्गातून देवाचा क्रोध प्रगट होतो. 19 हे असे होत आहे कारण देवाविषयीचे ज्ञान त्यांच्यात दिसून येते व देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे.

20 जगाच्या निर्मितीपासून देवाचे अदृश्य गुण, त्याचे सनातन सामर्थ्य व त्याचे देवपण हे देवाने ज्या गोष्टी निर्माण केल्या त्यावरुन प्रगट होतात. आणि जर तुम्हांला हे कळत नाही, तर ह्याचे तुम्हांला कसलेच समर्थन करता येणार नाही.

21 कारण जरी त्यांना देव माहीत होता तरी त्यांनी देव म्हणून त्याचा आदर केला नाही, किंवा त्याचे आभार मानले नाहीत, उलट ते आपल्या विचारात निष्फळ झाले आणि मूर्ख अंतःकरणे अंधकारमय झाली. 22 जरी गर्वाने त्यांनी स्वतःला शहाणे समजले तरी ते मूर्ख ठरले. 23 आणि अविनाशी देवाचे गौरव याची मर्त्य मानव, पक्षी, चार पायाचे प्राणी, सरपटणारे प्राणी यांच्यासारख्या दिसणाऱ्या प्रतिमांशी अदलाबदल केली.

24 यासाठी देवाने त्यांना त्यांच्या मनातील वाईट वासनांच्या व वैषयिक अशुद्धतेमुळे सोडून दिले आणि त्यांनी एकमेकांच्या देहाचा अनादर करावा यासाठी त्यांस मोकळीक दिली. 25 त्यांनी देवाच्या खरेपणाशी लबाडीची अदलाबदल केली व निर्माणकर्त्याऐवजी जे निर्मिलेले त्याची उपासना केली. निर्माणकर्ता सर्वकाळ धन्यवादित आहे. आमेन.

26 तेव्हा त्याची त्यांना शिक्षा मिळावी म्हणून देवाने नाईलाजाने त्यांना त्यांच्यावर सोडून दिले. त्यांना लाजिरवाण्या वासनांच्या स्वाधीन केले. त्यांच्या स्त्रियांनी स्त्रियांशी अनैसर्गिक संबंध ठेवले. 27 तसेच पुरुषांनी स्त्रियांबरोबर नैसर्गिक संबंध ठेवणे बाजूला ठेवले व ते एकमेकाविषयी वासनेने पेटून निघाले. पुरुषांनी पुरुषांशी अनुचित कर्म केले आणि आपल्या ह्या निर्लज्ज कृत्यांमुळे त्यांना त्यांच्यामध्ये हे फळ मिळाले.

28 आणि जेव्हापासून त्यांनी देवाला ओळखण्याचे नाकारले, तेव्हापासून देवाने त्यांना अशुद्ध मनाच्या हवाली केले व ज्या अयोग्य गोष्टी त्यांनी करु नयेत त्या करण्यास मोकळीक दिली. 29 ते सर्व प्रकारची अनीति, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा, हेवा, खून, भांडणे, कपट, कुबुद्धि यांनी भरलेले असून दुसऱ्याविषयी नेहमी वाईट विचार करतात. 30 ते चहाडखोर, दुसऱ्याची निंदा करणारे, देवाचा तिटकारा करणारे, उद्धट, बढाया मारणारे, वाईट मार्ग शोधून काढणारे, आईवडिलांची आज्ञा न मानणारे; तसेच 31 मूर्ख, दिलेले वचन मोडणारे, कुटुंबियांबद्दल वात्सल्य नसणारे, दुष्ट असे आहेत. 32 देवाच्या नितिमत्वाचा जो नियम सांगतो की, जे लोक असे वागतात ते मरणास योग्य आहेत असे जरी त्यांना माहीत होते तरी ते त्या गोष्टी करतात इतकेच नव्हे तर जे असे करतात त्यांना मान्यताही देतात.

यिर्मया 39

यरुशलेमचा पाडाव

39 अशा रितीने यरुशलेमचा पाडाव झाला. यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यात बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपले संपूर्ण सैन्य घेऊन यरुशलेमवर चालून आला. नगरीचा पाडाव करण्यासाठी त्याने नगरीला वेढा घातला. आणि सिद्कीयाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षाच्या चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी यरुशलेमच्या तटबंदीला भगदाड पडले. मग बाबेलच्या राजाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यरुशलेम नगरीत शिरले आणि मधल्या प्रवेशद्वाराजवळ बसले. समगारचा राज्यपाल नेर्गलशरेसर व नबो सर्सखीम हे मोठे अधिकारी आणि इतर महत्वाचे अधिकारी ह्यांचा त्यात समावेश होता.

सिद्कीया राजाने बाबेलच्या ह्या अधिकाऱ्यांना पाहिले आणि तो सैनिकांबरोबर पळून गेला. त्यांनी रात्री यरुशलेम सोडले ते राजाच्या बागेतून आणि तटबंदीच्या दोन भिंतीमधल्या दारातून बाहेर पळाले. ते वाळवंटाकडे गेले. खास्द्यांच्या सैन्याने सिद्कीयाचा व त्याच्याबरोबर असलेल्या सैनिकांचा पाठलाग केला आणि यरिहोच्या मैदानात त्याना त्यांनी पकडले. त्यांनी सिद्कीयाला पकडून बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्याकडे नेले तेव्हा नबुखद्नेस्सर हमाथ प्रांतातील रिब्ला येथे होता. सिद्कीयाचे काय करायचे हे नबुखद्नेस्सरने ठरविले. रिब्लामध्ये, सिद्कीयाच्या डोळ्यांदेखत, बाबेलच्या राजाने सिद्कीयाच्या मुलांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना मारले. मग नबुखद्नेस्सरने सिद्कीयाचे डोळे काढले आणि साखळ्यांनी बांधून बाबेलला नेले.

बाबेलच्या सैन्याने राजवाड्याला व यरुशलेम मधील घरांना आग लावली त्यांनी यरुशलेमची तटबंदी फोडली. बाबेलच्या राजाच्या विशेष संरक्षकांचा प्रमुख नबूजरदान हा होता. त्याने यरुशलेममध्ये राहिलेल्या लोकांना कैद केले. व बाबेलला नेले. त्याला अगोदरच शरण आलेल्यांना त्याने कैद केले. एकंदरीत त्याने येरुशलेममधील सर्व लोकांनाच कैद केले. 10 पण नबूजरदानने यहूदातील काही गरीब लोकांना सोडले. ह्या लोकांजवळ काहीही नव्हते म्हणून नबूजरदानने त्यांना द्राक्षमळे व जमीन दिली.

11 पण नबुखद्नेस्सरने यिर्मयाच्या बाबतीत, नबूजरदानला ताकीद दिली होती. नबूजरदान बाबेलच्या राजाच्या खास संरक्षकांचा प्रमुख होता. नबुखद्नेस्सरने अशी ताकीद दिली होती की. 12 “यिर्मयाला शोधून काढा व त्याची काळजी घ्या. त्याला इजा करु नका. तो मागेल ते त्याला द्या.”

13 म्हणून राजाच्या खास संरक्षकांचा प्रमुख नबूजरदान याने नबूशजबान या प्रमुख सेनाधिकाऱ्याला, नेर्गल सरेसर या मोठ्या अधिकाऱ्याला आणि सैन्यातील इतर अधिकाऱ्यांना यिर्मयाला शोधण्यासाठी पाठविले. 14 मंदिराच्या चौकात, यहूदाच्या राजाच्या पहाऱ्यात असलेल्या यिर्मयाला त्या लोकांनी सोडविले आणि गदल्याकडे सोपविले. गदल्या अहिकामचा व अहिकाम शाफानचा मुलगा होता. यिर्मयाला घरी पाठवावे असा गदल्याला हूकूम होता. म्हणून यिर्मयाला घरी नेले गेले व तो त्याच्या आप्तांमध्ये राहू लागला.

परमेश्वराचा एबद-मलेखला संदेश

15 यिर्मया मंदिराच्या चौकात पहाऱ्यात असताना त्याला परमेश्वराचा संदेश आला. तो असा होता: 16 “यिर्मया मूळ कुशचा रहिवासी असलेल्या एबद-मलेखला संदेश दे ‘सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव म्हणतो: माझे यरुशलेमबद्दलचे भाकीत मी लवकरच खरे ठरवीन. माझे संदेश अरिष्टावरुन खरे ठरतील, चांगल्या गोष्टी घडून नाही. सर्व गोष्टी खऱ्या ठरत असताना तू तुझ्या डोळ्यांनी पाहशील. 17 पण, एबद-मलेख, मी तुला त्या दिवशी वाचवीन.’ हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. तू ज्या लोकांना घाबरतोस, त्यांच्या स्वाधीन मी तुला करणार नाही. 18 तू युध्दात मरणार नाहीस, तर तू निसटशील आणि जगशील. तू माझ्यावर विश्वास ठेवलास, म्हणून हे घडेल.” हा परमेश्वराचा संदेश आहे.

स्तोत्रसंहिता 13-14

प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.

13 परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरुन जाणार आहेस?
    तू मला कायमचाच विसरणार आहेस का?
किती काळापर्यंत तू माझा स्वीकार करायला नकार देणार आहेस? [a]
तू मला विसरला आहेस की नाही याबद्दल मी किती काळ संभ्रमात राहू!
    माझ्या ह्रदयातले हे दुख: मी किती काळ सोसू?
माझे शत्रू माझ्यावर आणखी किती काळापर्यंत विजय मिळवणार आहेत?

परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ.
    माझ्या प्रश्नांचे उत्तर दे.
मला उत्तर कळू दे.
    नाही तर मी मरुन जाईन.
जर तसे घडले तर माझा शत्रू म्हणेले, “मी त्याच्यावर विजय मिळवला”
    माझ्या शत्रूने जर माझा पराभव केला तर तो खूष होईल.

परमेश्वरा, मी तुझ्या प्रेमाखातर तुझ्या मदतीची अपेक्षा केली.
    तू मला वाचवलेस आणि मला सुखी केलेस.
मी परमेश्वरासाठी आनंदाचे गाणे गातो
    कारण त्याने माझ्यासाठी कितीतरी चांगल्या गोष्टी केल्या आहेत.

14 दुष्ट माणूस मनातल्या मनात म्हणतो, “देव नाही”
    पापी लोक फार भयानक आणि कुजक्या गोष्टी करतात
    त्यांच्यातला एकही जण चांगल्या गोष्टी करीत नाही.

परमेश्वर स्वर्गातून खाली पाहात होता.
    त्याला शहाणे लोक शोधायचे होते
    शहाणेलोक मदतीसाठी देवाकडे वळतात.
परंतु प्रत्येकजण देवापासून दूर गेला आहे.
    सर्वलोक वाईट झाले आहेत.
एकही माणूस चांगली गोष्ट करत नव्हता.

दुष्टांनी माझ्या माणसांचा नाश केला.
    दुष्टांना देव माहीत नाही.
    त्यांच्याकडे खायला [b] खूप अन्न असते आणि ते परमेश्वराची उपासना करीत नाहीत.
त्या दुष्टांना गरीब माणसाच्या उपदेशाकडे लक्ष द्यायचे नव्हते.
    का? कारण तो गरीब माणूस देवावर अवलंबून होता.
परंतु देव त्याच्या चांगल्या माणसांबरोबर असतो.
    म्हणून वाईट लोकांना भीती वाटण्याजोगे बरेच काही असते.

सियोनमध्ये इस्राएलला कुणी वाचवले?
    परमेश्वरच इस्राएलला वाचवतो.
परमेश्वराच्या माणसांना दूर नेण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने कैदी बनवले गेले.
    परंतु परमेश्वर त्याच्या माणसांना परत आणील
    नतंर याकोब (इस्राएल) खूप आंनदी होईल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center