M’Cheyne Bible Reading Plan
अबीमलेखची कारकीर्द
9 यरुब्बाल (गिदोन) याचा अबीमलेख हा मुलगा. शखेम येथे तो आपल्या आजोळी गेला आणि मामांना व सर्व नातेवाईकांना म्हणाला, 2 “शखेम नगरातील वडीलधाऱ्यांना विचारा की, ‘यरुब्बालच्या सत्तर मुलांच्या सत्तेखाली राहणे चांगले की एकाच माणसाच्या आधिपत्याखाली असणे चांगले? मी तुमचा नातेवाईक आहे हे लक्षात ठेवा.’”
3 अबीमलेखच्या मामांनी शखेम नगरातील अधिकारी मंडळींना हा प्रश्न विचारला. त्यांनीही अबीमलेखला आपला पाठिंबा द्यायचे ठरवले. ते म्हणाले, “हा तर आमचा बंधू आहे.” 4 शखेमच्या या अधिकाऱ्यांनी बआल-बेरीथच्या मंदिरातून सत्तर रौप्यमुद्रा अबीमलेखला दिल्या. त्यातून अबीमलेखने काही रिकामटेकडी कसलाही मुलाहिजा नसलेली माणसे आपल्या पदरी बाळगली. ती सतत अबीमलेख बरोबर राहात असत.
5 अबीमलेख अफ्रा येथे आपल्या वडीलांच्या गावी आला व त्याने आपल्या सत्तर भावांची एकाचवेळी कत्तल केली. फक्त त्यातला सगळ्यात धाकटा लपून बसल्यामुळे बचावला. त्याचे नाव योथाम होते.
6 मग शखेम आणि मिल्लो येथील नेते एकत्र आले. शखेममधील स्तंभाजवळच्या एका वृक्षाखाली जमून त्यांनी अबीमलेखला आपला राजा म्हणून घोषित केले.
योथामची कहाणी
7 हे वर्तमान योथामने ऐकले तेव्हा तो गेला आणि गरिज्जीम डोंगरावर उभा राहून मोठयाने लोकांशी बोलू लागला.
“शखेम नगरातील अधिकाऱ्यांनो ऐका. मग परमेश्वरही तुमचे ऐकेल.
8 “एक दिवस, आपल्याला कोणीतरी राजा असावा असे सर्व झाडांच्या मनात आले. तेव्हा जैतून वृक्षाला ती झाडे म्हणाली, ‘तू आमचा राजा हो.’
9 “जैतून वृक्ष त्यांना म्हणाला, ‘सर्व माणसे आणि परमेश्वर माझ्यापासून जे तेल मिळते त्यासाठी माझी स्तुती करतात. ते तेल करायचे सोडून मी नुसता इतर झाडांवर डोलत राहू काय?’
10 “मग ती झाडे अंजीराच्या झाडाकडे गेली व म्हणाली, ‘तू आमचा राजा हो.’
11 “पण अंजीराच्या झाडाने उत्तर दिले, ‘माझी गोड आणि रसाळ फळे करायचे थांबवून मी इतर झाडांवर डोलत राहायला जाऊ की काय?’
12 “तेव्हा ती झाडे द्राक्षवेलीकडे जाऊन म्हणाली, ‘तू आम्हावर राज्य कर.’
13 “पण द्राक्षवेलीने उत्तर दिले, ‘माझ्या द्राक्षरसामुळे माणसे, राजेलोक संतुष्ट होतात. ते करायचे सोडून मी इतर झाडांवर हालत डोलत राहू का?’
14 “शेवटी ती सर्व झाडे काटेरी झुडुपाकडे जाऊन म्हणाली, ‘तू ये आणि आम्हावर राज्य कर.’
15 “ते काटेरी झुडूप त्यांना म्हणाले, ‘तुम्हाला खरोखरच मला राजा करायचे असेल तर माझ्या सावलीत आश्रयाला या. तसे केले नाहीत तर काटेरी झुडुपातून अग्नि निघून तो लबानोनचे गंधसरु भस्मसात करील.’
16 “आता, अबीमलेखला आपला राजा म्हणून घोषित करताना तुम्ही पूर्णपणे प्रमाणिक राहिला असलात तर त्याच्या कारकीर्दीत सुखात असा. यरुब्बाल आणि त्याचे कुटुंबीय यांच्याशी तुमचे वर्तन योग्य असेल तर ठीकच आहे. 17 पण माझ्या वडीलांनी तुमच्यासाठी काय केले ते आठवा ते तुमच्यासाठी झुंजले. मिद्यानापासून तुमचे रक्षण करताना त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. 18 पण आता तुम्ही त्यांच्या कुटुंबीयांकडे पाठ फिरवली आहे. तुम्ही माझ्या वडालांच्या सतर मुलांना एकाच वेळी [a] ठार केले आहे. अबीमलेखला तुम्ही शखेमचा राजा केले आहे. तो तुमचा नातेवाईक म्हणून तुम्ही असे केलेत पण तो निव्वळ दासीपुत्र आहे. 19 यरुब्बाल आणि त्याचे कुटुंबीय यांच्याशी तुम्ही खरोखरच प्रमाणिक असाल तर अबीमलेखच्या राज्यात सुखी असा. तो ही तुमच्यावर आंनदाने राज्य करो. 20 पण तुमचे हे वागणे बरोबर नसेल तर मात्र अबीमलेखच्या हातून शखेम आणि मिल्लो यांचा नाश होवो. तसेच अबीमलेखचाही नाश होवो!”
21 एवढे बोलून योथाम बैर या शहराला पळून गेला. अबीमलेखाच्या भीतीने तो तेथेच राहिला.
अबीमलेखची शखेमशी लढाई
22 अबीमलेखने इस्राएल लोकांवर तीन वर्षे राज्य केले. 23-24 अबीमलेखने यरुब्बालाच्या सत्तर मुलांची म्हणजे आपल्याच भावंडांची हत्या केली होती. या दुष्कृत्यात त्याला शखेमच्या अधिकाऱ्यांची साथ होती. तेव्हा अबीमलेख आणि हे अधिकारी यांच्यात परमेश्वराने वैमनस्य निर्माण केले. अबीमलेख विरुद्ध या अधिकाऱ्यांनी कपट कारस्थान करायला सुरुवात केली. 25 आता त्यांना अबीमलेख आवडेनासा झाला होता. त्यांनी वाटमारी करायला डोंगरांवर माणसे ठेवली. या लूटमारीच्या बातम्या अबीमलेखपर्यंत येऊन पोचल्या.
26 याच सुमाराला एबेदचा मुलगा गाल आपल्या भाऊ बंदांसह शखेम शहरी राहायला आला. तेव्हा शखेमच्या वडीलधाऱ्यांनी गालवर विश्वाेस टाकून राहायचे ठरवले.
27 एक दिवस शखेममधील लोक द्राक्ष खुडणीसाठी मव्व्यामध्ये गेले. त्यांनी द्राक्षरस काढला आणि त्यांच्या दैवतांच्या देवळात उत्सव केला. खाद्यपेयांची मेजवानी केली आणि अबीमलेखला शिव्याशाप दिले.
28 तेव्हा एबेदपुत्र गाल म्हणाला, “आपण शखेमचे लोक आपण त्याच्या राजवटीत का राहावे? तो कोण समजतो स्वतःला? यरुब्बालच्या मुलांपैकी तो एक, बरोबर? जबूलला अबीमलेखने अधिकारी केले आहे. खरे ना?आपण अबीमलेखला जुमानता कामा नये. आपण आपल्याच लोकांचे हमोरच्या लोकांचे ऐकले पाहिजे. (हमोर हा शखेमचा मूळ पुरुष.) 29 तुम्ही मला या लोकांचा सेनापती नेमले तर मी अबीमलेखला नेस्तनाबूत करीन. ‘आपल्या सैन्याची जमवाजमव कर आणि युध्दाला सज्ज हो’ असे मी त्याला आव्हान देईन.”
30 जबूल शखेम नगराचा अधिकारी होता त्याने हे ऐकले आणि तो संतापला. 31 त्याने अरुमा येथे दूत पाठवून अबीमलेखला हे वर्तमान पोचवले. तो संदेश असा:
“एबेदाचा मुलगा गाल आणि त्याचे भाऊबंद शखेम शहरात येऊन राहिले आहेत. ते तुला त्रास देण्यासाठी कारस्थान करत आहेत. त्यांनी सगव्व्या शहरवासियांना तुझ्याविरुद्ध फितवले आहे. 32 तेव्हा तू आणि तुझी माणसे रातोरात येऊन नगराच्या बाहेर शेतात लपून राहा. 33 सकाळी सूर्य वर येताच शहरावर हल्ला चढवा. गाल आणि त्याची माणसे तुझा प्रतिकार करायला येतील तेव्हा त्यांचा चांगला समाचार घ्या.”
34 तेव्हा अबीमलेख आणि त्याचे सैनिक रात्रीच निघून नगराकडे आले. चार तुकड्या करुन ते सैन्य शखेम बाहेर दबा धरून बसले. 35 इकडे एबेद पुत्र गाल बाहेर पडून नगराच्या वेशीपाशी उभा राहिला तेव्हा अबीमलेख आणि त्याचे सैन्य दबा धरुन बसले होते ते एकदम बाहेर आले.
36 गालने ते पाहिले व तो जबूलला म्हणाला, “ते पाहा डोंगरमाथ्यावरुन लोक उतरत आहेत.”
जबूल त्याला म्हणाला, “तू पाहातोस त्या डोंगराच्या सावल्या आहेत त्या तुला माणसांसारख्या वाटत आहेत.”
37 पण गाल पुन्हा म्हणाला, “ती पाहा तिकडून काही माणसे प्रदेशाची नाभी नानक जागा उतरुन येत आहेत. आणि जादूगाराच्या वृक्षाजवळही कोणाचे तरी डोके मी पाहिले आहे.” 38 तेव्हा जबूल गालला म्हणाला, “मग आता तुझे बढाया मारणे कुठे गेले? ‘अबीमलेख कोण? आम्ही त्याचे का ऐकावे’ असे तू म्हणत होतास नाही का? त्यांना तू हसण्यावारी नेलेस. आता आणि त्यांचा सामना कर.”
39 तेव्हा गाल शखेमच्या लोकांचे नेतृत्व करुन लढाईला बाहेर पडला. 40 अबीमलेखच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. ते मागे आपल्या नगराच्या वेशीच्या दिशेने पळत सुटले. गालची पुष्कळ माणसे तर तेथे पोहोंचायच्या आधीच मारली गेली.
41 तेव्हा अबीमलेख अरूमा या नगराला परतला. जबूलने गाल आणि त्याचे भाऊबंद यांना शखेम सोडून जायला भाग पाडले.
42 दुसऱ्या दिवशी शखेमचे लोक आपापल्या शेतीवाडीवर कामाला गेले असे अबीमलेखला कळले. 43 त्याने आपल्या सैन्याच्या तीन तुकडचा केल्या. शखेमच्या लोकांवर त्याला गनिमी काव्याने हल्ला करायचा होता म्हणून त्याने आपल्या सैन्याला शेतात दबा धरून बसायला सांगितले. लोक गावातून शेतावर जायला निघतात तोच त्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. 44 अबीमलेख एका तुकडी बरोबर शखेमच्या वेशीपाशी गेला. राहिलेल्या दोन तुकड्यांनी शेतातील लोकांवर हल्ला करुन त्यांना ठार केले. 45 दिवसभर लढाई चालली. अबीमलेखच्या सैन्याने शखेम शहरावर ताबा मिळवला, तेथील लोकांना ठार मारले. मग त्याने शहराची पूर्ण नासधूस करुन त्यावर मीठ पसरले.
46 शखेमच्या गढीमध्ये काही माणसे अजूनही होती. त्यांनी हे ऐकले तेव्हा एल-बरीथ परमेश्वराच्या मंदिराच्या सर्वात सुरक्षित खोलीमध्ये ती एकत्र जमली.
47 हे ही अबीमलेखच्या कानावर आले. 48 तेव्हा तो आपल्या माणसांना घेऊन सलमोन डोंगरावर गेला. तेथे त्याने कुऱ्हाडीने झाडांच्या काही फांद्या छाटल्या. त्या फांद्या खांद्यावर घेतल्या. बरोबरच्या लोकांनाही त्याने वेळ न दवडता तसेच करायला सांगितले. 49 तेव्हा त्यांनीही फांद्या तोडून घेतल्या व अबीमलेखच्या पाठोपाठ ते चालू लागले. एल-बरीथच्या तळघरासमोर त्या रचून ठेवल्या मग त्यांनी त्या ढिगाला आग लावली. त्या आगीत आतील सर्व माणसे जळून खाक झाली. शखेमच्या मनोऱ्याजवळ राहाणारी बायकापुरुष मिळून जवळ जवळ हजार माणसे त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
अबीमलेखचा मृत्यू
50 नंतर अबीमलेख आपल्या बरोबरच्या लोकांसह तेबेस या नगरी गेला. तेही नगर त्यांनी काबीज केले. 51 पण त्या नगराच्या आत एक मजबूत गढी होती. तिच्यात नगरातील बायका, पुरुष, अधिकारी आश्रयाला गेले. आत जाताच त्यांनी दरवाजा पक्का बंद केला. मग ते गढीच्या छतावर चढून बसले. 52 अबीमलेख व त्याची माणसे हल्ला करायला गढीपर्यंत आली. त्यांना गढीला आग लावायची होती. 53 पण अबीमलेख गढीच्या दरवाजाशी थांबलेला असताना, वर चढून बसलेल्या एका बाईने त्याच्या डोक्यावर जाते टाकले. अबिमलेखच्या डोक्याला त्यामुळे भयंकर मार लागला. 54 अबीमलेख आपल्या सशस्त्र नोकराला तेवढ्यात म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि मला ठार कर ‘एका बाईने अबीमलेखला मारले’ असे लोकांनी म्हणता कामा नये म्हणून तुझ्या हातून मला मरण येऊ दे.” तेव्हा त्याची शस्त्रे वाहून नेणाऱ्या सेवकाने त्याला तलवारीने भोसकले व अबीमलेख मरण पावला. 55 ते पाहिल्यावर इस्राएल लोक आपापल्या घरी परतले.
56 अशाप्रकारे, अबीमलेखला त्याच्या दृष्कृत्यांबद्दल परमेश्वराने सजा केली. आपल्या सत्तर भांवाना ठार करुन त्याने आपल्या वडीलांचा घोर अपराध केला होता. 57 शखेमच्या लोकांनाही त्यांच्या दुर्वर्तनाबद्दल परमेश्वराने शिक्षा केली. एकंदरीत योथामचा शाप खरा ठरला. (गिदोन यरुब्बालचा योथाम हा सर्वात धाकटा मुलगा.)
बर्णबा व शौल खास कामसाठी निवड होते
13 अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते. ते पुढीलप्रमाणे: बर्णबा, निग्र शिमोन, लूक्य कुरेनेकर, मनाएन (जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला), आणि शौल. 2 ही सर्व माणसे देवाची सेवा करीत असत व उपास करीत असत. पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौलाला माझ्याकडे द्या. एक खास काम त्यांच्याकडून मला करवून घ्यायचे आहे. हे काम करण्यासाठी मी त्यांना निवडले आहे”
3 म्हणून मंडळीने उपास व प्रार्थना केल्या, त्यांनी बर्णबा व शौल यांच्या डोक्यांवर हात ठेवून प्रार्थना केली, मग त्यांना पाठवून दिले.
कुप्र येथे बर्णबा व शौल
4 पवित्र आत्म्याच्या द्वारे बर्णबा व शौल यांना पाठविण्यात आले. ते सलुकीया शहराला गेले. नंतर ते समुद्रमार्गे कुप्र बेटावर गेले. 5 जेव्हा बर्णबा व शौल सलमीन शहरात आले, तेव्हा त्यांनी देवाचा संदेश यहूदी लोकांच्या सभास्थानात दिला. मार्क म्हटलेला योहान त्यांच्या मदतीला होता.
6 ते संपूर्ण बेट पार करुन पफे शहरास गेले. पफे येथे त्यांना एक यहूदी मनुष्य भेटला. तो जादूच्या करामती करीत असे. त्याचे नाव बर्येशू होते. तो खोटा संदेष्टा होता. 7 बर्येशू नेहमी सिर्ग्य पौल याच्या निकट राहण्याचा प्रयत्न करायचा. सिर्ग्य पौल राज्यपाल होता. व तो हुशार होता. त्याने बर्णबा व शौल यांना आपणाकडे बोलाविले. त्याला त्यांचा संदेश ऐकावयाचा होता. 8 परंतु अलीम जादूगार हा बर्णबा व शौल यांच्या विरुद्ध होता. (ग्रीक भाषेत बर्येशूसाठी अलीम शब्द वापरतात. त्याचा अर्थ तोच आहे.) राज्यपालाने येशूवर विश्वास ठेवू नये म्हणून अलीमने त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. 9 पण शौल आत्म्याने भरला होता. (शौलाचे दुसरे नाव पौल) पौलाने अलीमकडे (बर्येशूकडे) पाहिले व म्हणाला, 10 “सैतानाच्या पुत्रा! जे काही योग्य असेल त्या सर्वांचा तू शत्रू आहेस. तू दुष्टाईने व खोटेपणाने भरलेला आहेस. तू देवाचे सत्य नेहमी खोटेपणात बदलण्याचा प्रयत्न करतोस! 11 आता तुला देवाने स्पर्श करताच तू आंधळा होशील. भर दिवसाच्या उन्हातही तुला काही काळ दिसणार नाही.”
मग अलीमसाठी सर्व काही अंधकारमय झाले, चाचपडत तो इकडेतिकडे फिरु लागला. कोणीतरी मदतीला घेऊन त्याचा हात धरुन जाण्यासाठी प्रयत्न करु लागला. 12 जेव्हा राज्यपालाने ते पाहिले (सार्ग्य पौल) त्याने विश्वास ठेवला. प्रभूच्या शिक्षणाने तो चकित झाला.
पौल व बर्णबा कुप्र सोडतात
13 पौल व जे लोक त्याच्याबरोबर होते ते पफेकडून समुद्रमार्गे निघाले. ते पंफुल्यातील पिर्गा गावी आले. परंतु योहान (मार्क) त्यांना सोडून परत यरुशलेमला गेला. 14 त्यांनी त्यांचा प्रवास पुढे चालू ठेवला. पिर्गापासून पुढे ते अंत्युखियास गेले. (जे पिसीडीयाजवळ होते.)
अंत्युखियात असताना शब्बाथ दिवशी ते यहूदी सभास्थानात गेले आणि तेथे बसले. 15 पवित्र शास्त्रातील नियमशास्त्र आणि संदेष्टयांच्या लोखाणाचे वाचन झाले, मग सभास्थानच्या अधिकाऱ्यांनी पौल व बर्णबाला निरोप पाठविला: “बधूनो, येथील लोकांना काही मदत होईल असे काही तरी तुम्हांला सांगायचे असेल तर कृपा करुन बोला!”
16 पौल उभा राहिला. आणि आपला हात उंचावून (लोकांचे लक्ष वेधून घेऊन) म्हणाला, “माझ्या यहूदी बांधवानो व इतर लोकहो, जे तुम्ही खऱ्या देवाची उपासना करता, ते कृपा करुन माझे ऐका! 17 इस्राएलाच्या देवाने आपल्या वाडवडिलांची निवड केली. ते ज्या काळात इजिप्तमध्ये परकी म्हणून राहत होते, त्याकाळात देवाने त्यांना यशस्वी होण्यास मदत केली. मोठ्या सामर्थ्याने देवाने त्यांना त्या देशातून बाहेर आणले. 18 आणि देवाने अरण्यातील चाळीस वर्षांत त्यांना सहनशीलता दाखविली. 19 देवाने कनानच्या प्रदेशातील सात राष्ट्रांना नाश केला. देवाने त्यांच्या जमिनी त्याच्या लोकांना दिल्या. 20 हे सर्व साधारणपणे चारशेपन्रास वर्षांत घडले.
“त्यानंतर देवाने आपल्या लोकांना शास्ते (नेते) दिले. ते शमुवेल संदेष्टेयाच्या काळापर्यंत. 21 मग लोकांनी राजाची मागणी केली. देवाने त्यांना किशाचा पुत्र शौल याला दिले. शौल हा बन्यामिनाच्या वंशातील होता. तो चाळीस वर्षेपर्यंत राजा होता. 22 नंतर देवाने शौलाला काढून टाकले. देवाने दावीदाला त्यांचा राजा केले. दावीदाविषयी देव असे बोलला: दावीद, इशायाचा पुत्र, हा मला आवडला, मला ज्या गोष्टी पाहिजेत त्या सर्व तो करील.
23 “याच दाविदाच्या वंशजातून देवाने इस्राएल लोकांचा तारणारा आणिला. तो वंशज येशू आहे. देवाने हे करण्याचे अभिवचन दिले होते. 24 येशू येण्यापूर्वी सर्व यहूदी लोकांना योहानाने उपदेश केला. त्यांच्या अंतःकरणात बदल व्हावा म्हणून योहानाने लोकांना सांगितले की, त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे. 25 जेव्हा योहान आपले काम संपवत होता, तेव्हा तो म्हणाला, ‘मी कोण आहे असे तुम्हांला वाटते? मी ख्रिस्त नाही. तो नंतर येत आहे. त्याच्या वहाणांचे बंद सोडण्याची सुद्धा माझी लायकी नाही.’
26 “माझ्या बंधूनो, अब्राहामच्या कुटुंबातील पुत्रांनो, आणि तुम्ही यहूदी नसलेले पण खऱ्या देवाची उपासना करणारे, ऐका! या तारणाची बातमी आम्हांला सांगितली गेली. 27 जे यरुशलेममध्ये राहतात ते यहूदी व यहूदी पुढारी यांना जाणीव झाली नाही की, येशू हा तारणारा होता. येशूविषयी जे शब्द भविष्यवाद्यांनी लिहिले ते यहूदी लोकांसाठी प्रत्येक शब्बाथाच्या वारी वाचले गेले. परंतु त्यांना ते समजले नाही. यहूदी लोकांनी येशूचा धिक्कार केला, जेव्हा त्यांनी असे केले, तेव्हा त्यांनी भविष्यावाद्यांचे म्हणणे खरे ठरविले! 28 येशूने का मरावे याचे खरे कारण ते शोधू शकले नाहीत. पण त्यांनी पिलाताला सांगितले की त्याला जिवे मारावे.
29 “शास्त्रामध्ये येशूच्याबद्दल या गोष्टी लिहिल्या होत्या की, जे वाईट ते त्याच्याबाबतीत घडणारे होते. ते सर्व या यहूदी लोकांनी येशूला केले. मग त्यांनी येशूला वधस्तंभावरुन खाली घेतले. व त्याला कबरेत ठेवले. 30 पण देवाने त्याला मरणातून उठविले 31 यानंतर, पुष्कळ दिवसांपर्यंत जे त्याच्याबरोबर होते, त्यांना गालीला पासून यरुशलेमपर्यंत येशूने दर्शन दिले. ते लोक आता त्याचे शाक्षीदार म्हणून लोकांसमोर आहेत.
32 “आम्ही तुम्हांला देवाने जे अभिवचन आमच्या वाडवडिलांना (पूर्वजांना) दिले त्याविषयी सुवार्ता सांगतो. 33 आम्ही त्यांची लेकरे (वंशज) आहोत आणि देवाने हे अभिवचन आमच्या बाबतीत खरे करुन दाखविले. देवाने हे येशूला मरणातून पुन्हा उठविण्याद्वारे केले. आम्ही याविषयी स्तोत्रसंहितेमध्येसुद्धा वाचतो:
‘तू माझा पुत्र आहेस.
आज मी तुझा पिता झालो आहे.’ (A)
34 देवाने येशूला मरणातून उठविले. येशू पुन्हा कबरेत जाऊन माती बनणार नाही. म्हणून देव म्हणाला:
‘दाविदाला देण्यात आलेली पवित्र
व सत्यअभिवचने मी तुला देईन.’ (B)
35 पण दुसऱ्या ठिकाणी देव म्हणतो:
‘तू तुझ्या पवित्र पुरुषाला कबरेत कुजण्याचा अनुभव घडू देणार नाहीस.’ (C)
36 “ज्या काळात दाविद राहत होता तेव्हा त्याने देवाच्या इच्छेप्रमाणे केले. मग तो मेला. आपल्या वाडवडिलांशेजारी त्याला पुरले. आणि कबरेत त्याचे शरीर कुजले 37 पण ज्याला देवाने मरणातून पुन्हा उठविले, त्याला कुजण्याचा अनुभव आला नाही. 38-39 बंधूनो, आम्ही जे सांगत आहोत ते तुम्ही समजून घेतले पाहिजे: या एकाकडूनच तुमच्या पापांची क्षमा तुम्हांला मिळू शकते. मोशेचे नियमशास्त्र तुम्हांला तुमच्या पापांपासून मुक्त करणार नाही. पण प्रत्येक व्यक्ति जी त्याच्यावर विश्वास ठेवते, ती त्याच्याद्वारे त्या सर्वाविषयी न्यायी ठरविली जाते. 40 संदेष्टयांनी सांगितलेल्या काही गोष्टी घडतील, सावध राहा! या गोष्टी तुमच्याबाबत होऊ नयेत म्हणून जपा. भविष्यवादी म्हणाला:
41 ‘ऐका, जे तुम्ही संशय धरता!
तुम्ही चकित होता पण मग दूर जाता व मरता;
कारण तुमच्या काळामध्ये
मी (देव) काही तरी करीन ज्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही कोणी
ते स्पष्ट करुन सांगितले तरी
तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही.’” (D)
42 जेव्हा पौल व बर्णबा (सभास्थानातून) जाऊ लागले, तेव्हा लोक म्हणाले की, पुढील शब्बाथाच्या दिवशी परत या आणि आम्हाला याविषयी अधिक सांगा. 43 सभास्थानातील बैठक संपल्यावर अनेक यहूदी लोक आणि यहूदी मतानुसारी चालणारे इतर धार्मिक लोक पौल व बर्णबा यांच्यामागे गेले. पौल व बर्णबा यांनी त्या लोकांना देवाच्या कृपेत टिकून राहण्यास कळकळीची विनंति केली.
44 पुढील शब्बाथवारी शहरातील जवळ जवळ सर्व लोक देवाचे वचन ऐकण्यासाठी एकत्र आले. 45 यहूदी लोकांनी त्या सर्वांना तेथे पाहिले. त्यामुळे यहूदी लोकांना मत्सर वाटू लागला. तेही काही फार वाईट गोष्टी बोलले आणि जे पौल बोलला त्याविरुद्ध वाद उपस्थित केला. 46 पण पौल व बर्णबा फार धैर्याने बोलले. ते म्हणाले. “देवाचा संदेश तुम्हा यहूद्यांना प्रथम आम्हांला सांगितलाच पाहिजे. पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात. तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करुन घेत आहात. व अनंतकाळचे जीवन प्राप्त करुन घेण्यासाठी अपात्र ठरत आहात! म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशांतील यहूदीतर लोकांकडे जाऊ! 47 प्रभूने आम्हांला हे करण्यास सांगितले आहे. प्रभु म्हणाला:
‘दुसऱ्या देशांसाठी मी तुम्हाला प्रकाश असे केले यासाठी की,
तुम्ही पृथ्वीवरील सर्व लोकांना तारणाचा मार्ग दाखवू शकाल.’” (E)
48 जेव्हा यहूदी नसलेल्यांनी पौलाला असे बोलताना ऐकले तेव्हा ते फार आनंदित झाले, देवाच्या संदेशाचा त्यांनी बहुमान केला. आणि त्या लोकांपैकी पुष्कळांनी संदेशावर विश्वास ठेवला, कारण ते अनंतकाळच्या जीवनासाठी निवडले गेले होते.
49 आणि म्हणून देवाचा संदेश संपूर्ण देशात सांगितला गेला. 50 तेव्हा यहूदी लोकांनी शहरातील काही धर्मिक स्त्रिया व पुढारी यांना भडकावून दिले. त्या लोकांनी पौल व बर्णबा यांच्याविरुद्ध अनेक वाईट गोष्टी केल्या आणि त्यांना शहराबाहेर घालवून दिले. 51 मग पौल व बर्णबा यांनी आपल्या पायाची धूळ झटकली. व ते इकुन्या शहराला गेले. 52 पण अंत्युखियातील येशूचे अनुयायी आनंदाने व पवित्र आत्म्याने भरुन गेले होते.
पापी राजांविरुद्ध निवाडा
22 परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, राजवाड्यात जा आणि यहूदाच्या राजाला हा संदेश आवर्जून सांग: 2 ‘यहुदाच्या राजा, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐक. तू दावीदच्या सिंहासनावर बसून राज्य करतोस म्हणून हे ऐक, राजा, तू आणि तुझ्या अधिकाऱ्यांनी माझे म्हणणे ऐकलेच पाहिजे. यरुशलेमच्या प्रवेशद्वारावरुन जाणाऱ्या सर्व लोकांनी माझा संदेश ऐकलाच पाहिजे. 3 परमेश्वर म्हणतो, फक्त योग्य व न्याय्य गोष्टीच करा. लुटल्या जात असलेल्या लोकांचे लुटारुपासून रक्षण करा. अनाथ मुलाशी अथवा विधवांशी वाईट वागू नका अथवा त्यांना दुखवू नका. निरपराध्यांना मारु नका. 4 तुम्ही माझ्या ह्या आज्ञा पाळल्यात, तर काय होईल? दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे यरुशलेममध्ये, त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर व लोकांबरोबर, रथांतून आणि घोड्यावर स्वार होऊन आत येत राहतील. 5 पण जर तुम्ही आज्ञा पाळल्या नाहीत, तर परमेश्वर काय म्हणतो पाहा, मी, परमेश्वर, वचन देतो की राजवाड्याचा नाश होऊन येथे दगडविटांचा ढिगारा होईल.’”
6 यहूदाचा राजा राहत असलेल्या राजावाड्याबद्दल परमेश्वराने पुढील उद्गार काढले.
“गिलादच्या जंगलाप्रमाणे वा
लबानोनच्या पर्वताप्रमाणे राजवाडा उंच आहे.
पण ती त्याला वाळवंटाप्रमाणे करीन.
निर्जन शहराप्रमाणे तो ओसाड होईल.
7 मी राजवाड्याचा नाश करण्यास माणसे पाठवीन.
त्या प्रत्येकाच्या हातात शस्त्र असेल.
त्यांचा उपयोग ते राजवाडा नष्ट करण्यासाठी करतील.
ही माणसे, गंधसरुपासून बनविलेल्या भक्कम व सुंदर तुळया कापून जाळून टाकतील.
8 “अनेक राष्ट्रांतील लोक या नगरीजवळून जाताना एकमेकांना विचारतील ‘यरुशलेम ह्या भव्य नगरीच्या बाबतीत परमेश्वराने असे भयंकर कृत्य का केले?’ 9 ह्या प्रश्र्नाचे उत्तर पुढीलप्रमाणे असेल: ‘यहूदातील लोक परमेश्वर देवाबरोबर झालेल्या कराराप्रमाणे वागले नाहीत. त्यांनी अन्य दैवतांना पूजले आणि त्यांची सेवा केली, म्हणून देवाने यरुशलेमचा नाश केला.’”
राजा यहोआहाज (शल्लूम) ह्याच्याविरुद्ध निवाडा
10 मेलेल्या राजाकरिता [a] रडू नका.
त्याच्यासाठी शोक करु नका.
पण हे ठिकाण सोडून जावे लागणाऱ्या
राजासाठी मात्र मोठ्याने रडा [b]
कारण तो परत येणार नाही.
यहोआहाज त्याची जन्मभूमी पुन्हा कधीही पाहणार नाही.
11 योशीयाचा मुलगा शल्लूम (यहोआहाज) ह्याच्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो: (राजा योशीया यांच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शल्लूम यहूदाचा राजा झाला) “यहोआहाज यरुशलेम सोडून दूर गेला आहे. तो पुन्हा यरुशलेममध्ये येणार नाही. 12 मिसरच्या लोकांनी यहोआहाजला पकडून नेले आहे. तो तेथेच मरेल. त्याला परत ही भूमी दिसणार नाही.”
राजा यहोयाकीमविरुद्ध निवाडा
13 राजा यहोयाकीमचे वाईट होईल.
तो वाईट गोष्टी करीत आहे.
आपला महाल तो बांधू शकेल.
लोकांना फसवून त्यावर माड्या चढवू शकेल.
तो लोकांना काहीही न देता त्यांच्याकडून काम करवून घेतो, त्यांना कामाची मजुरी देत नाही.
14 यहोयाकीम म्हणतो,
“मी माझ्यासाठी मोठा वाडा बांधीन.
त्याला खूप मोठे मजले असतील.”
तो मोठ्या खिडक्या असलेले घर बांधतो.
तो तक्तपोशीसाठी गंधसरु वापरतो आणि तक्तपोशीला लाल रंग देतो.
15 यहोयाकीम, तुझ्या घरात खूप गंधसरु आहे
म्हणून त्यामुळे काही तू मोठा राजा होत नाहीस.
तुझे वडील योशीया अन्नपाण्यावरच समाधानी होते.
त्यांनी फक्त योग्य व न्याय्य गोष्टीच केल्या.
त्यांच्या ह्या कृत्यांमुळे त्यांच्याबाबतीत सर्व सुरळीत झाले.
16 योशीयाने गरीब व गरजू अशा लोकांना मदत केली.
त्यामुळे त्यांचे सर्व व्यवस्थित झाले.
यहोयाकीम, “देवाला ओळखणे ह्याचा अर्थ काय?”
ह्याचा अर्थ योग्य रीतीने जगणे व न्यायीपणाने वागणे.
मला ओळखणे ह्याचा अर्थ हाच होय.
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
17 “यहोयाकीम, तुला फक्त तुझा फायदाच दिसतो.
तू तुझ्यासाठी जास्तीत जास्त मिळविण्याचाच फक्त विचार करतोस.
निरापराध्यांना ठार मारण्यात व
दुसऱ्याकडून वस्तू चोरण्यातच तुझे मन जडले असते.”
18 योशीयाचा मुलगा राजा यहोयाकीम ह्यास परमेश्वर असे म्हणतो की
“यहोयाकीमसाठी यहूदातील लोक राहणार नाहीत.
‘हे माझ्या बंधू, मला यहोयाकीमबद्दल वाईट वाटते.’
असे ते एकमेकांना म्हणणार नाहीत.
यहोयाकीमबद्दल ते शोक करणार नाहीत.
‘हे स्वामी! हे राजा!
मला खूप वाईट वाटते! मला खूप दु:ख होते!’
असे ते म्हणणार नाहीत.
19 एखाद्या गाढवाला पुरावे तसे यरुशलेममधील लोक यहोयाकीमचे दफन करतील.
ते त्याचा मृत देह फरपटत नेऊन यरुशलेमच्या वेशीबाहेर फेकून देतील.
20 “यहूदा, लबानोनच्या डोंगरावर जाऊन मोठ्याने ओरड.
बाशानच्या डोंगरात तुझा आवाज ऐकू जाऊ देत.
अबारीमच्या डोंगरात तुझा आवाज ऐकू जाऊ देत.
अबारीमच्या डोंगरात जाऊन मोठ्याने ओरड.
का? कारण तुझ्या सर्व ‘प्रियकराचा’ नाश केला जाईल.
21 “यहूदा, तुला सुरक्षित वाटले.
पण मी तुला इशारा दिला होता.
पण तू माझे ऐकण्याचे नाकारलेस.
तू तरुण असल्यापासून अशीच वागत आलीस.
तू तरुण असल्यापासून माझ्या
आज्ञा पाळल्या नाहीस, यहूदा!
22 म्हणून मी दिलेली शिक्षा झंझावाताप्रमाणे येईल.
ती तुझ्या सर्व मेंढपाळांना लांब उडवून देईल.
तुला वाटले की दुसरी राष्ट्रे तुला मदत करतील.
पण त्या राष्ट्रांचाही पराभव होईल.
मग खरोखरच तू निराश होशील.
तू केलेल्या वाईट गोष्टींची तुला लाज वाटेल.
23 “राजा, तू तुझ्या उंच डोंगरावरच्या गंधसरुच्या लाकडापासून बनविलेल्या वाड्यात राहतोस!
म्हणजेच जणू काही जेथून हे लाकूड येते त्या लबानोनमध्येच राहतोस तुला वाटते की तू सुरक्षित आहेस!
कारण तू उंच डोंगरावर मोठ्या घरात राहतोस पण तुला शिक्षा झाल्यावर तू खरोखर विव्हळशील.
तुला प्रसूतिवेदनांप्रमाणे वेदना होतील.”
राजा यहोयाकीन (कोन्या) याच्याविरुध्द निवाडा
24 “मी निश्र्चितपणे आहे म्हणूनच हे तुझ्याबाबत घडेल” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे, “यहोयाकीन, यहोयाकीमच्या मुला, यहूदाच्या राजा, जरी तू माझ्या उजव्या हातातील मुद्रा असलास, तरीही मी तुला उखडून टाकले असते. तुझ्याबाबतीत असेच घडेल. 25 यहोयाकीन, मी तुला बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व खास्दी लोक ह्यांच्या हवाली करीन. तू त्या लोकांना घाबरतोस. ते तुला ठार मारु इच्छितात. 26 तुझी व तुझ्या आईची जन्मभूमी नसलेल्या देशात, मी, तुला व तुझ्या आईला फेकून देईन. तेथेच तुम्ही दोघे मराल. 27 यहोयाकीन, तू ह्या भूमीत परत यायला बघशील. पण तुला येथे परत येऊ दिले जाणार नाही.”
28 कोणीतरी फेकून दिलेल्या, फुटक्या भांड्याप्रमाणे कोन्या (यहोयाकीन) आहे.
कोणालाही नको असलेल्या भांड्याप्रमाणे तो आहे.
यहोयाकीन व त्याची मुले ह्यांना बाहेर का फेकले जाईल?
परक्या देशात त्यांना का फेकून देण्यात येईल?
29 यहूदाच्या हे भूमी, भूमी, भूमी,
परमेश्वराचा संदेश ऐक!
30 परमेश्वर म्हणतो, “यहोयाकीनबद्दल हे लिहून घे.
तो नि:संतान आहे,
‘तो त्याच्या आयुष्यात यशस्वी होणार नाही.
त्याचा कोणताही मुलगा दावीदच्या सिंहासनावर बसणार नाही
कोणताही मुलगा यहूदावर राज्य करणार नाही.’”
येशू चार हजारांपेक्षा अधिक लोकांना जेवू घालतो(A)
8 त्या दिवसात आणखी एका वेळी लोकांचा मोठा समुदाय जमला. त्यांच्याजवळ खावयास काही नव्हते. येशूने आपल्या शिष्यांस बोलाविले आणि त्यांना म्हणाला, 2 “मला या लोकांचा कळवळा येतो कारण तीन दिवसांपासून ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काही नाही. 3 मी जर त्यांना उपाशी घरी पाठविले तर ते रस्त्यातच शुद्ध हरपून पडतील. त्यांच्यातील काही फार दुरून आले आहेत.”
4 त्याच्या शिष्यांनी उत्तर दिले, “या निर्जन जागी एवढ्या लोकांना पुरतील इतक्या भाकरी कोण मिळवू शकेल काय?”
5 येशूने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?”
शिष्य म्हणाले, “आमच्याकडे सात भाकरी आहेत.”
6 नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसण्याची आज्ञा केली. त्याने सात भाकरी घेतल्या, आभार मानले व त्या मोडल्या व आपल्या शिष्यांजवळ त्या वाढण्यास दिल्या. नंतर त्यानी त्या लोकांना वाढल्या. 7 त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते मग त्याने त्यावर आभार मानले व त्यांना तेही वाढावयास दिले.
8 लोक जेवुन तृप्त झाले. उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या त्यांनी भरल्या. 9 तेथे सुमारे चार हजार पुरुष होते. नंतर त्याने त्यांना घरी पाठवले. 10 आणि लगेच तो आपल्या शिष्यांसह नावेत बसला व दल्मनुथा प्रांतात आला.
परूशी येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात(B)
11 मग परूशी आले व त्याला प्रश्न विचारू लागले. त्याची परीक्षा पाहावी म्हणून त्यांनी त्याला स्वर्गातून चिन्ह मागितले. 12 आपल्या आत्म्यात दीर्घ उसासा टाकून तो म्हणाला, “ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हांस सांगतो की, या पिढीला चिन्ह दिले जाणार नाही.” 13 नंतर त्याने त्यांना सोडले व तो नावेत जाऊन बसला व सरोवराच्या पलीकडच्या बाजूस गेला.
येशू यहूदी पुढाऱ्यांविरुद्ध इशारा देतो(C)
14 शिष्य भाकरी आणण्याचे विसरले होते. एका भाकरीशिवाय त्यांच्याकडे काही नव्हते. 15 येशूने त्यांना निक्षून सांगितले, “सांभाळा, परूश्यांचे खमीर व हेरोदाचे खमीर यापासून सावध राहा.”
16 मग ते आपसात चर्चा करू लागले की, “आपल्याजवळ भाकरी नाहीत म्हणून तसे बोलला की काय?”
17 ते काय बोलतात हे ओळखून येशू त्यास म्हणाला, “आपणाजवळ भाकरी नाहीत याविषयी चर्चा का करता? अजून तुमच्या लक्षात आले नाही काय व तुम्हांला समजत नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय? 18 तुमचे डोळे आंधळे आहेत काय? तुमचे कान बहिरे आहेत काय? आपल्याकडे पुरेशा भाकरी नसताना मी काय केले हे तुम्हांला आठवत नाही काय? 19 पाच हजारांसाठी मी पाच भाकरी मोडल्या तेव्हा जे खाल्ले गेले नाही अशा भाकरींच्या किती टोपल्या तुम्ही गोळा केल्या ते आठवा.”
शिष्यांनी उत्तर दिले, “बारा टोपल्या.”
20 “चार हजारांसाठी मी सात भाकरी मोडल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या गोळा केल्या?”
शिष्यांनी उत्तर दिले, “सात टोपल्या.”
21 मग येशू त्यांना म्हणाला, “अजूनही तुम्हांला समजत नाही काय?”
येशू बेथसैदा येथील आंधळ्याला बरे करतो
22 ते बेथसैदा येथे आले आणि काही जणांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व येशूने त्याला स्पर्श करावा अशी विनंति केली. 23 मग त्याने आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले मग येशू त्या आंधळ्याच्या डोळ्यात थुंकला व त्याच्यावर हात ठेवून त्याने विचारले, “तुला काही दिसते काय?”
24 त्याने वर पाहिले आणि म्हणाला, “मला माणसे दिसतात व सभोवताली झाडे चालत असल्यासारखी दिसतात.”
25 नंतर येशूने पुन्हा आपले हात त्या माणसाच्या डोळ्यावर ठेवले. त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला दृष्टी आली. त्याला सर्व काही स्पष्ट दिसु लागले 26 येशूने त्याला, “त्या गावात पाऊलदेखील टाकू नको” असे सांगून घरी पाठवून दिले.
पेत्र म्हणतो की येशू हा रिव्रस्त आहे(D)
27 मग येशू व त्याचे शिष्य फिलीप्पै कैसरीयाच्या आसपासच्या खेड्यात गेले. वाटेत त्याने त्याच्या शिष्यांस विचारले, “लोक मला कोण म्हणून ओळखतात?”
28 त्यांनी त्याला उत्तर दिले, “काही जण म्हणतात, तुम्ही बाप्तिस्मा करणारा योहान आहात तर इतर काही एलीया समजतात, तर दुसरे काही तुम्ही संदेष्ट्यांपैकी एक आहा असे म्हणतात.”
29 मग येशूने त्यांना विचारले, “तुम्हांला मी कोण आहे असे वाटते?”
पेत्राने उत्तर दिले, “तू रिव्रस्त आहेस.”
30 येशू शिष्यांना म्हणाला, “मी कोण आहे हे कोणालाही सांगू नका.”
येशू म्हणतो की त्याने मेलेच पाहिजे(E)
31 तो त्यांना शिकवू लागला, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दु:ख भोगावे. वडील, मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांजकडून नाकारले जावे, त्याला जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे हे होणे अगत्याचे आहे. 32 त्याने हे स्पष्टपणे सांगितले,
तेव्हा पेत्राने येशूला बाजूला घेतले व तो त्याला दटावू लागला. 33 परंतु येशूने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व पेत्राला धमकावून म्हटले, “अरे सैताना माझ्यापुढून निघून जा. देवाच्या गोष्टीविषयी तुला काही वाटत नाही. तुझे लक्ष देवाच्या गोष्टीकडे लागलेले नाही, तर फक्त मानवाच्या दृष्टिकोणातून महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टीकडे आहे.”
34 नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोकांना बोलाविले व त्यांना म्हणाला, “जर कोणाला माझ्या मागे यायचे आहे तर त्याने आत्मत्याग करावा. आपला वधस्तंभ घ्यावा व मला अनुसरावे. 35 जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जिवाला मुकेल व जो कोणी माइयासाठी व सुवार्तेसाठी जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. 36 मनुष्याने सर्व जग मिळविले व जिवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? 37 जिवाच्या मोबदल्यात मनुष्य काय देऊ शकेल? 38 या व्यभिचारी आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.”
2006 by World Bible Translation Center