Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
यहोशवा 23

यहोशवाचे लोकांना प्रोत्साहन

23 परमेश्वराने इस्राएल लोकांना भोवतालच्या शत्रूंपासून विसावा दिला. त्यांना सुरक्षित केले. अशी अनेक वर्षे लोटली, आता यहोशवा बराच वृध्द झाला होता. तेव्हा एकदा, इस्राएल लोकांमधील वडीलधारी मंडळी, कुटुंबप्रमुख, न्यायाधीश, अंमलदार या सर्वांना यहोशवाने भेटीसाठी एकत्र बोलावले. तो त्यांना म्हणाला, “मी आता म्हातारा झालो. परमेश्वराने आपल्या शत्रूंची काय परिस्थिती करुन टाकली ते तुम्ही पाहीले. आपल्याला मदत करण्याच्या उद्देशाने त्याने ते केले. तुमचा परमेश्वर देव तुमच्यासाठी लढला. यार्देन नदी आणि पश्चिमेला भूमध्य समुद्र यांच्या मधली जमीन तुम्ही काबीज करू शकता हे मी तुम्हाला सांगितल्याचे तुमच्या लक्षात असेलच. ती भूमी तुम्हाला द्यायचे मी वचन दिले आहे, पण अजून तुम्ही ती ताब्यात घेतली नाही. तेथील रहिवाश्यांना तुमचा परमेश्वर देव घालवून देईल. तुम्ही ती आपल्या ताब्यात घ्याल. तेथील. लोकांना परमेश्वर हुसकावून लावील. तुमच्यासाठी त्याने हे करायचे कबूल केले आहे.

“परमेश्वराने दिलेल्या आज्ञा तुम्ही कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. मोशेच्या नियमशास्त्रान जे जे लिहिले आहे त्या सर्वांचे पालन करा. त्याच्याकडे पाठ फिरवू नका. इस्राएल नसले लीही काही माणसे अजून आपल्यात आहेत. ती त्यांच्या दैवतांची पूजा करतात. अशा लोकांशी मैत्री करु नका. त्यांच्या दैवतांची सेवा किंवा पूजा करु नका. आपल्या परमेश्वर देवाचीच उपासना करा. पूर्वी तुम्ही हे केले आहे व पुढेही करत राहा.

“परमेश्वराने तुम्हाला तुमच्यापेक्षा बलाढ्य राष्ट्रांचा पराभव करायला मदत केली आहे. त्याने त्या लोकांना बाहेर पडायला भाग पाडले. कोणीही तुम्हाला आतापर्यंत पराभूत करु शकले नाही. 10 परमेश्वराच्या साहाय्याने, एक इस्राएल माणूस शत्रूच्या हजार सैनिकांना सळो की पळो करु शकतो. कारण खुद्द तुमचा परमेश्वर देवच तुमच्या वतीने लढतो. असे करायचा परमेश्राने शब्द दिला आहे. 11 तेव्हा तुम्ही आपल्या परमेश्वरावरच प्रेम करत राहा.

12 “आपल्या परमेश्वराच्या उपासनेत खंड पडू देऊ नका. इस्राएली, खेरीज इतर लोकांशी मैत्री करु नका. त्यांच्याशी लग्न संबंध ठेवू नका. पण या लोकांशी मैत्री ठेवलीत तर 13 शत्रूला पराभूत करायला तुमचा परमेश्वर देव तुम्हाला मदत करणार नाही. हे लोक तुमच्यासाठी सापळा ठरतील डोव्व्यांत धूर आणि धूळ जाऊन त्रास व्हावा तसा तुम्हाला या लोकांमुळे त्रास होईल. मग तुम्हाला ही चांगली भूमी सोडावी लागेल. परमेश्वराने तुम्हाला ती दिली. पण त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत तर तुम्ही देशोधडीला लागाल.

14 “माझी अखेर आता जवळ येऊन ठेपली आहे. परमेश्वराने तुमच्यासाठी बऱ्याच महान गोष्टी केल्या हे तुम्ही जाणता व खरोखरच त्यावर विश्वास ठेवता. त्याने दिलेला शब्द पाळण्यात कुठेही कसूर केली नाही हे तुम्हाला माहीत आहेच. आपल्याला दिलेले प्रत्येक वचन त्याने पुरे केले. 15 परमेश्वर देवाने आपल्याला जी काही चांगली वचने दिली ती सर्व प्रत्यक्षात आली. पण तसेच त्याचे दुसरे वचनही प्रत्यक्षात आल्याखेरीज राहणार नाही. आपण चुकीने वागलो तर आपल्यावर संकटे ओढवतील असाही त्याने शब्द दिला आहे. त्याने दिलेली ही चांगली सुपीक जमीन सोडून आपल्याला जावे लागेल असेही त्याने शपथपूर्वक उच्चारले आहे. 16 तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाशी केलेल्या कराराचा भंग केलात तर असे घडेल. इतर दैवतांच्या भजनी लागलात तर तुम्ही या जमीनीला मुकाल. तेव्हा त्या इतर दैवतांची चुकूनसुध्दा पूजा करु नका. तसे केलेत तर आपल्या परमेश्वराचा तुमच्यावर कोप होईल. आणि मग त्याने दिलेल्या या चांगल्या प्रदेशातून तो तुमची हकालपट्टी करेल.”

प्रेषितांचीं कृत्यें 3

पेत्र एका लंगड्या मनुष्याला बरे करतो

एके दिवशी पेत्र व योहान मंदिराकडे जात होते. त्यावेळी दुपारचे तीन वाजले होते. मंदिरातील प्रार्थनेची ती नेहमीची वेळ होती. जेव्हा ते मंदिरात जाऊ लागले, तेव्हा त्या ठिकाणी एक मनुष्य होता. हा मनुष्य जन्मापासूनचा लंगडा होता. त्याला चालता येत नव्हते. म्हणून काहीं मित्र त्याला उचलून घेऊन आले. दररोज त्याचे मित्र त्याला मंदिराकडे आणीत असत. ते त्या लंगड्या माणसाला मंदिराच्या एका दरवाजाजवळ ठेवीत असत. या दरवाजाचे नाव सुंदर दरवाजा असे होते. तेथे तो मनुष्य मंदिरात येणाऱ्या लोकांकडे भीक मागत असे. त्या दिवशी त्या लंगड्या मनुष्याने पेत्र व योहानाला मंदिरात जाताना पाहिले. त्याने त्यांच्याकडे पैसे मागितले.

पेत्र व योहान यांनी त्या माणसाकडे पाहिले व म्हटले. “आमच्याकडे पाहा!” त्या मनुष्याने त्यांच्याकडे पाहिले; त्याला वाटले ते त्याला काही पैसे देतील. परंतु पेत्र म्हणाला, “माझ्याकडे सोने किंवा चांदी काही नाही, परंतु माझ्याकडे दुसरे काही तरी आहे, ते मी तुला देतो: नासरेथच्या येशू ख्रिस्ताच्या नावाने ऊठ आणि चालू लाग!”

मग पेत्राने त्या माणासाचा उजवा हात धरला व त्याला उठविले. आणि ताबडतोब त्या मनुष्याच्या पायात व घोट्यात शक्ति आली. तो माणूस उडी मारुन उभा राहिला व चालू लागला. तो चालत, बागडत, आणि देवाचे गुणगान करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. 9-10 सर्व लोकांनी त्याला ओळखले. मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजापाशी भीक मागत बसत असे तो हाच म्हणून त्यांनी त्याला ओळखले. आता त्यांनी त्याच माणसाला चालताना व देवाची स्तुति करताना पाहिले. लोक आश्चर्यचकित झाले. हे कसे घडले हे त्यांना समजत नव्हते.

पेत्र लोकांच्या पुढे भाषण करतो

11 तो लंगडा मनुष्य पेत्र व योहान यांना बिलगून उभा होता. सर्व लोक आश्चर्यचकित झाले होते. कारण तो मनुष्य बरा झाला होता. ते पेत्र व योहान उभे असलेल्या शलमोनाच्या द्वारमंडपाकडे [a] धावत येऊ लागले.

12 जेव्हा पेत्राने हे पाहिले, तो लोकांना म्हणाला, “माझ्या यहूदी बंधूंनो, ह्यामुळे तुम्हांला आश्चर्य का वाटत आहे? तुम्ही आमच्याकडे असे पाहात आहात की जणू काय आमच्या सामर्थ्यानेच हा मनुष्य चालू लागला आहे. तुम्हांला असे वाटते का की, आमच्या चांगुलपणामुळे असे घडले? 13 नाही! देवाने हे केले! तो अब्राहामाचा देव आहे, इसहाकाचा देव आहे आणि तो याकोबाचा देव आहे, आमच्या पूर्वजांचा तो देव आहे. त्याचा खास सेवक येशू याला त्याने गौरव दिलेला. परंतु तुम्ही येशूला मारण्यासाठी दिले.पिलाताने येशूला मुक्त करण्याचा निर्णय घेतला, परंतु तुम्ही पिलाताला सांगितले की, तुम्हांला येशू नको. 14 येशू शुद्ध आणि चांगला (निष्पाप) होता. परंतु तुम्ही म्हणाला तुम्हाला तो नको, तुम्ही पिलाताला सांगितले की येशूऐवजी आम्हांला एक खुनी दे. 15 आणि म्हणून जो जीवन देतो त्याला तुम्ही मारले! परंतु देवाने त्याला मरणातून उठविले, आम्ही त्याचे साक्षी आहो. आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहिले.

16 “येशूच्या सामर्थ्यानेच हा लंगडा बरा झाला. आम्ही येशूच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला म्हणून हे घडले. तुम्ही या मनुष्याल पाहू शकता. आणि तुम्ही त्याला ओळखता. येशूवरील विश्वासाने तो पूर्णपणे बरा झाला. तुम्ही हे घडलेले पाहिले!

17 “माझ्या बंधूनो, तुम्ही येशूला जे केले ते तुम्ही अजाणता केले. (तुम्हांला समजत नव्हते, तुम्ही काय करीत आहात. तुमच्या नेत्यांनासुद्धा हे समजले नाही.) 18 देवाने सांगितले या गोष्टी घडतील. देवाने भविष्यवाद्यांकरवी हे सांगितले की, त्याचा ख्रिस्त दु:खसहन करील व मरेल. मी तुम्हांला सांगितलेले आहे की, देवाने हे कसे घडवून आणले. 19 म्हणून तुम्ही तुमची ह्रदये व जीवने बदलली पाहिजेत! देवाकडे परत या आणि तो तुमच्या पापांची क्षमा करील. 20 मग प्रभु (देव) तुम्हांला आध्यात्मिक विश्रांतीसाठी वेळ देईल. तो तुम्हाला येशू देईल, ज्याला त्याने ख्रिस्त म्हणून निवडले.

21 “परंतु देवाने त्याच्या पवित्र भविष्यवाद्यांच्या तोंडून ज्या गोष्टी आरंभापासूनच सांगितल्या त्या घडून येईपर्यंत त्याला स्वर्गातच राहिले पाहिजे. 22 मोशे म्हणाला, ‘प्रभु तुमचा देव तुम्हांला संदेष्टा देईल. तो संदेष्टा तुमच्या स्वतःच्या (यहूदी लोकांच्या) मधूनच देईल. [b] तो माझ्यासारखा भविष्यवादी असेल. तो जे तुम्हांला सांगेल ते सारे तुम्ही पाळा. 23 जो कोणी संदेष्ट्याची (भविष्यवादी) आज्ञा पाळणार नाही, त्याचे आपल्या बांधवांमधून मुळासकट उच्चाटन होईल.’

24 “शमुवेल व इतर संदेष्टे (भविष्यावादी) जे शमुवेलानंतर झाले, जे देवासाठी बोलले, ते या आताच्या काळाविषयी बोलले. 25 संदेष्टे ज्या गोष्टीविषयी बोलले, त्या गोष्टी तुम्हांला मिळाल्या आहेत. देवाने तुमच्या वाडवडिलांशी (पूर्वजांशी) जो करार केला तो तुम्हांला मिळाला आहे. देवाने तुमचा पिता अब्राहाम याला म्हटले, ‘तुझ्या कुटुंबामुळे पृथ्वीवरील राष्ट्रे आशीर्वादित होतील. [c] 26 देवाने आपला खास सेवक येशू याला प्रथम तुमच्याकडे पाठविले, तुमच्या वाईट मार्गापासून तुम्हांला परावृत करण्याकडून.’ तुम्हांला आशीर्वाद देण्यासाठी देवाने येशूला पाठविले.”

यिर्मया 12

यिर्मयाचे देवापाशी गाऱ्हाणे

12 परमेश्वरा, जेव्हा मी तुझ्याशी वाद घालतो,
    तेव्हा तुझेच म्हणणे बरोबर ठरते.
पण काही गोष्टी बरोबर वाटत नाहीत.
त्याबद्दल मला तुला विचारावेसे वाटते.
    दुष्ट लोकच यशस्वी का होतात?
    तू ज्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाहीस, अशांना सुखाचे आयुष्य का मिळते?
त्या दुष्टांना तूच इथे वसविलेस ती माणसे मजबूत मुळे असलेल्या झाडांप्रमाणे आहेत.
    ती वाढतात आणि फळे देतात.
तोंडाने, तू त्यांना जवळचा व प्रिय असल्याचे, ते सांगतात.
    पण मनाने ते तुझ्यापासून फार दूर आहेत.
पण, परमेश्वरा, तू माझे मन जाणतोस.
    तू मला पाहतोस आणि माझ्या मनाची परीक्षा घेतोस.
कत्तल करण्यासाठी मेंढ्यांना जसे फरपटत आणतात, तसे त्यांना फरपटत आण.
    कत्तलीच्या दिवसासाठी त्यांची निवड कर.
किती काळ जमीन कोरडी राहणार?
    किती काळ गवत वाळून मरणार?
त्या दुष्ट लोकांच्या चुकीमुळे प्राणी
    आणि पक्षी मरुन गेले.
तरीसुद्धा ते लोक म्हणतात,
    “आमचे काय होईल हे पाहण्याइतक्या
    दीर्घकाळ यिर्मया जगणार नाही.”

यिर्मयाला देवाने दिलेले उत्तर

“यिर्मया, माणसांबरोबर धावण्याच्या शर्यतीत जर तू दमतोस,
    तर मग घोड्यांशी तू कशी स्पर्धा करणार?
जर तू सुरक्षित ठिकाणी कंटाळलास,
    तर धोकादायक ठिकाणी काय करशील?
यार्देन नदीकिनारी वाढणाऱ्या कांटेरी झुडुंपात
    तू काय करशील?
ही सर्व माणसे तुझेच भाऊबंद आहेत.
    तुझ्याच कुटुंबातील माणसे तुझ्याविरुद्ध कट करीत आहेत.
    तुझ्याच घरातील माणसे तुझ्याविरुद्ध आवाज उठवीत आहेत.
जरी ते तुझ्याशी मित्रांसारखे बोलत असले,
    तरी तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस.”

परमेश्वर आपल्या लोकांना म्हणजेच यहूदाला झिडकारतो

“मी परमेश्वराचा माझ्या घराचा त्याग केला आहे.
    मी माझी मालमत्ता [a] सोडली आहे.
मी माझी प्रियतमा (यहूदा) तिच्या वैऱ्यांच्या ताब्यात दिली आहे.
माझे स्वतःचेच लोक जंगली सिंहाप्रमाणे माझ्याविरुद्ध उलटले.
ते माझ्याकडे पाहून डरकाळ्या फोडू
    लागल्याने मी त्यांच्याकडे पाठ फिरविली.
मरायला टेकल्यामुळे गिधाडांनी घेरलेल्या प्राण्याप्रमाणे
    माझ्या लोकांची स्थिती आहे.
गिधाडे तिच्याभोवती (यहूदाभोवती) घिरट्या घालतात.
    वन्य प्राण्यांनो, तुम्हीसुध्दा
    या आणि काही खाद्य मिळवा.
10 पुष्कळ मेंढपाळांनी (नेत्यांनी) माझ्या द्राक्षमळ्याचा नाश केला आहे.
    त्यांनी द्राक्षेवेली पायदळी तुडविल्या.
    त्यांनी माझ्या द्राक्षमळ्याचे वैराण वाळवंट केले.
11 त्यांनी माझा मळा उजाड केला.
    तो सुकून मरुन गेला.
    तेथे कोणीही राहत नाही.
सर्व देश म्हणजे एक निर्जन वाळवंट झाले आहे.
    त्या मळ्याची काळजी घेण्यासाठी एकही माणूस उरला नाही.
12 त्या रिकाम्या वाळवंटाच्या हिरवळीतून
    लूट करण्याकरिता सैन्य आले.
परमेश्वराने त्या सैन्याचा उपयोग
    त्या देशाला शिक्षा करण्यासाठी केला.
देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत राहणाऱ्या सर्वांना शिक्षा केली.
    कोणीही वाचला नाही.
13 लोकांनी गहू पेरला,
    तर तिथे काटे उगवतील.
लोक दमेपर्यंत खूप कष्ट करतील,
    पण या अफाट मेहनतीचे फळ त्यांना मिळणार नाही.
त्यांच्या पिकाबाबत ते खजिल होतील.
    परमेश्वराच्या कोपामुळे या गोष्टी घडतील.”

इस्राएलच्या शेजाऱ्यांना देवाचे वचन

14 देव काय म्हणतो ते पाहा: “इस्राएलच्या भोवती राहणाऱ्या लोकांसाठी मी काय करणार आहे, ते ती तुम्हाला सांगतो. ते लोक फार दुष्ट आहेत. मी इस्राएलच्या लोकांना दिलेल्या जमिनीचा त्या लोकांनी नाश केला. त्या पापी लोकांना, मी, खेचून काढीन व त्यांच्या देशाबाहेर त्यांना हाकलून देईन. त्यांच्याबरोबर यहूदाच्या लोकांनाही मी बाहेर खेचीन. 15 पण अशा रीतीने त्या लोकांना देशाबाहेर हाकलल्यावर मला त्यांची कणव येईल. मी प्रत्येक कुटुंब परत त्यांच्या देशात आणीन आणि त्यांची जमीन परत देईन. 16 ह्यातून त्या लोकांनी योग्य तो बोध घ्यावा असे मला वाटते. पूर्वी त्या लोकांनी, माझ्या माणसांना, बआलच्या नावाने वचन घ्यायला शिकविले होते. आता मी त्याच रीतीने त्यांना धडा शिकविणार. वचन घेताना माझे नाव घेण्यास त्यांनी शिकावे असे मला वाटते. ‘देव नक्कीच असेपर्यंत’ अशी सुरवात त्यांनी करावी अशी माझी इच्छा आहे. त्यांनी असे केले तर मी त्यांना यशस्वी करीन आणि माझ्या लोकांत राहू देईन. 17 पण जर एखाद्या राष्ट्राने माझा आदेश मानला नाही, तर त्या राष्ट्राचा मी समूळ नाश करीन. त्या राष्ट्राला मेलेल्या झाडाप्रमाणे उपटीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे.

मत्तय 26

यहूदी पुढारी येशूला जिवे मारण्याचा कट करतात(A)

26 येशूने या सर्व बोधकथा सांगण्याचे संपविल्यानंतर तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, “परवा वल्हांडणाचा सण आहे हे तुम्हांला माहीत आहे. आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळून जिवे मारला जाण्यासाठी शत्रूच्या हाती धरून दिला जाईल.”

मग मुख्य याजक आणि लोकांचे वडील, प्रमुख याजकाच्या घरी जमले. प्रमुख याजकाचे नाव कयफा होते. सभेत त्यांनी धूर्तपणे येशूला अटक करण्याचा आणि जिवे मारण्याच्या कट केला. तरीही ते म्हणत होते, “वल्हांडण सणाच्या दिवसात आपण येशूला धरू शकणार नाही, कारण लोकांमध्ये दंगा होईल.”

एक स्त्री काही तरी विशेष करते(B)

येशू बेथानीमध्ये होता, तो शिमोन कुष्ठरोग्याच्या घरात होता. येशू तेथे असताना एक बाई त्याच्याकडे आली. उंची अत्तराने भरलेली अलाबास्त्र कुपी तिच्याजवळ होती. येशू जेवत असता ही कुपी त्या बाईने त्याच्या डोक्यावर ओतली.

त्या बाईला हे करताना शिष्यांनी पाहिले, तेव्हा त्यांना राग आला. शिष्य विचारू लागले, “या अत्तराचा असा नाश का व्हावा? ते पुष्कळ पैशांना विकता आले असते आणि ते पैसे गोरगरिबांना देता आले असते.”

10 येशूला ते काय म्हणत आहेत हे माहीत होते, त्याने त्यांना विचारले, “तुम्ही त्या बाईला का त्रास देत आहा? तिने माझ्यासाठी फार चांगले काम केले आहे. 11 गरीब लोक तुमच्याबरोबर नेहमीच असतील पण मी तुमच्याबरोबर नेहमी असणार नाही. 12 या बाईने माझ्या शरीरावर हे अत्तर ओतले. मला पुरण्याच्या वेळेची तयारी तिने केली. 13 मी तुम्हांला खरे सांगतो, सर्व जगातील लोकांना सुवार्ता सांगितली जाईल आणि जेथे सुवार्ता सांगण्यात येईल तेथे या बाईने जे केले त्याचे वर्णन तिची आठवण म्हणून करण्यात येईल.”

यहूदा येशूचा शत्रु होतो(C)

14 बारा शिष्यांपैकी एक यहूदा इस्कार्योत मुख्य याजकांकडे गेला. 15 यहूदा म्हणाला, “मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही मला काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी दिली. 16 तेव्हापासून यहूदा येशूला धरून देण्याच्या संधीची वाट पाहू लागला.

येशू वल्हांडण सणाचे भोजन खातो(D)

17 बेखमीर भाकारीच्या सणाच्या पहिल्या दिवशी येशूचे शिष्य त्याच्याकडे आले. ते म्हणाले, “वल्हांडण सणाच्या जेवणाची सर्व तयारी आम्ही करणार आहोत. वल्हांडण सणाचे जेवण कोठे करावे अशी तुमची इच्छा आहे?”

18 येशू म्हणाला, “ज्याला मी ओळखतो अशा त्या माणसाकडे खेड्यात जा आणि त्याला म्हणा, ‘गुरूजी म्हणतातः माझी वेळ जवळ आली आहे. तुझ्या घरी मी माझ्या शिष्यांसह वल्हांडण सण साजरा करणार आहे.’” 19 येशूने जे सांगितले होते ते त्याच्या शिष्यांनी केले आणि त्यांनी वल्हांडण सणाचे जेवण तयार केले.

20 संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर मेजाशी जेवावयास बसला. 21 जेवण करीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो: तुमच्यापैकी एक जण माझा विश्वासघात करील.”

22 ते खूप दु:खी झाले आणि त्यांच्यातील प्रत्येक जण त्याला विचारु लागला, “तो मी नाही ना प्रभु?”

23 मग येशूने उत्तर दिले, “जो माझ्याबरोबर ताटात हात घालतो तोच माझा विश्वासघात करील. 24 जसे मनुष्याच्या पुत्राविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे, तसा मनुष्याच्या पुत्राचा शेवट होईल, पण जो त्याचा विश्वासघात करील त्याच्याविषयी मला दु:ख वाटते! तो जर जन्मला नसता तर त्याच्यासाठी ते बरे झाले असते.”

25 मग यहूदा, जो त्याचा विश्वासघात करणार होता, तो येशूकडे वळून म्हणाला, “तो मी आहे का, गुरूजी?”

येशू त्याला म्हणाला, “तू म्हणालास, तसेच आहे (म्हणजे होय तो तूच आहेस.”)

प्रभु भोजन(E)

26 ते जेवण करीत असताना येशूने भाकर घेतली. तिच्याबद्दल देवाचे उपकार मानले. आणि ती मोडली. त्याने ती भाकर आपल्या शिष्यांना दिली. तो म्हणाला, “हे घ्या आणी खा. हे माझे शरीर आहे.”

27 नंतर येशूने द्राक्षारसाचा प्याला घेतला. त्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि तो शिष्यांना दिला. येशू म्हणाला, “तुम्ही सर्वांनी यातील प्यावे. कारण हे माझे रक्त आहे, 28 हे नवा करार प्रस्थापित करते. ते पुष्कळ लोकांकरिता ओतले जात आहे. यासाठी की त्यांच्या पापांची क्षमा व्हावी. 29 मी तुम्हांला सांगतो: माझ्या पित्याच्या राज्यात आपण सर्व एकत्र येईपर्यंत मी नवा द्राक्षारस पिणार नाही.”

30 मग त्यांनी वल्हांडणाचे गीत गाईले. नंतर ते जैतूनाच्या डोंगरावर निघून गेले.

येशू म्हणतो त्याचे शिष्य त्याला सोडून जातील(F)

31 येशूने सांगितले, “आज रात्रीच तुमच्या मनात माझ्याविषयी शंकाकुशंका येतील आणि माझ्यावरील तुमचा विश्वास उडेल. पवित्र शास्त्रात असे लिहेले आहे:

‘मी मेंढपाळाचा वध करीन,
    कळपातील मेंढरांची दाणादाण होईल.’ (G)

32 पण मी मरणातून उठल्यानंतर, तुमच्या अगोदर गालीलात जाईन.”

33 उत्तर देताना पेत्र म्हणाला, “इतर सर्वांचा जरी तुमच्याविषयी गोंधळ झाला तरी माझा कधीही होणार नाही!”

34 येशू त्याला म्हणाला, “मी तुला खरे सांगतो: तू मला ओळखत नाहीस असे आज रात्री कोंबडा आरवण्यापूर्वा तू तीन वेळा म्हणशील.”

35 पेत्र म्हणाला, “तुम्हांला ओळखीत नाही असे मी कधीही म्हणणार नाही. मग मला तुमच्याबरोबर मरावे लागले तरी हरकत नाही.” आणि इतर शिष्यसुद्धा असेच म्हणाले.

येशू एकटाच प्रार्थना करतो(H)

36 नंतर गेथशेमाने नावाच्या जागी येशू आपल्या शिष्यांसह गेला. येशू त्यांना म्हणाला, “मी थोडा पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथेच थांबा.” 37 येशूने पेत्र आणि दोन जब्दीचे पुत्र यांना आपल्याबरोबर यायला सांगितले. यानंतर येशू मनातून फार दु:खी व व्याकूळ होऊ लागला. 38 येशू पेत्राला व जब्दीच्या दोघा पुत्रांना म्हणाला, “माझे दु:ख मला इतके झाले आहे की, ते मला मारून टाकील. येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.”

39 तो थोडे अंतर पुढे गेला आणि जमिनीवर ओणवून प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, शक्य झाले तर हा दु:खाचा प्याला माझ्यापुढून जाऊ दे, तथापि, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” 40 मग तो शिष्यांकडे परत गेला तेव्हा ते झोपी गेले आहेत असे त्याला आढळले. येशू पेत्राला म्हणाला, “तुम्हा लोकांना माझ्याबरोबर एखादा तासही जागे राहता येत नाही काय? 41 आपण परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा. आणि प्रार्थना करीत राहा. यासाठी की तुम्ही मोहात पडू नये. जे योग्य आहे ते तुमचा आत्मा करू इच्छितो, पण तुमचे शरीर अशक्त आहे.”

42 नंतर दुसऱ्यांदा जाऊन येशू प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, जर दु:खाचा हा प्याला पिणे मला अटळच आहे तर तुझी इच्छा असेल तसे होवो.”

43 नंतर येशू शिष्यांकडे परत गेला तेव्हा त्याला आढळून आले की, त्यांचे डोळे जड झाले होते व ते झोपी गेले आहेत कारण जागे राहणे त्यांना शक्य होत नव्हते. 44 नंतर येशू शिष्यांना पुन्हा सोडून तसाच पुढे गेला आणि त्याने प्रार्थना केली. तिसऱ्या वेळी प्रार्थना करताना त्याने पुन्हा हेच शब्द उच्चारले.

45 यानंतर येशू परत शिष्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही अजून झोप आणि विश्रांतिच घेत आहात का? ऐका! मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जाण्याची वेळ आली आहे. 46 उठा! आपल्याला निघालेच पाहिजे. हा पाहा, मला धरून शत्रूंच्या हाती देणारा येत आहे.”

येशूला अटक होते(I)

47 येशू हे बोलत असतानाच बारा जणांपैकी एक जो यहूदा, तो तेथे आला. त्याच्याबरोबर बरेच लोक होते. मुख्य याजक, लोकांचे वडीलजन यांनी त्यांना पाठविले होते. ते लोक तलवारी व सोटे घेऊन आले होते. 48 येशूला विश्वासघाताने धरून लोकांच्या हाती देणारा यहूदा याने हाच येशू आहे याविषयी एक खूण सांगितली होती. यहूदा म्हणाला, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन तोच येशू होय; त्याला तुम्ही धरा,” 49 मग यहूदा येशूकडे गेला आणि म्हणाला, “गुरूजी,” आणि यहूदाने येशूचे चुंबन घेतले.

50 येशू त्याला म्हणाला, “मित्रा, जे करण्यास आलास ते कर!”

मग ते येशूकडे आले. त्यांनी येशूवर हात टाकले व त्याला धरले. 51 हे झाल्यावर येशूबरोबर असलेल्या एका अनुयायाने तलवारीला हात घातला आणि ती उपसली. त्याने प्रमुख याजकाच्या नोकराचा कान कापला.

52 येशू त्या मनुष्याला म्हणाला, “तू आपली तलवार म्यानात ठेव. जे तलवारीचा वापर करतात ते तलवारीनेच मरतात. 53 मी माझ्या पित्याला सांगितले तर तो देवदूतांच्या बारापेक्षा अधिक पलटणी पाठवील, हे तुम्हांला कळत नाही काय? 54 परंतु हे अशाच रीतीने झाले पाहिले असा पवित्र शास्त्रात जो लेख आहे तो कसा काय पूर्ण होईल?”

55 यानंतर येशू सर्व लोकसमुदायाला म्हणाला, “जसा मी कोणी गुन्हेगार आहे, अशा रीतीने तुम्ही तलवारी व सोटे हाती घेऊन मला धरायला माझ्यावर चाल करून आला काय? मी दररोज मंदिरात शिक्षण देत असता तुम्ही मला धरले नाही. 56 परंतु या सर्व गोष्टी अशासाठी झाल्या आहेत की, संदेष्ट्यांनी जे लिहिले होते ते पूर्ण व्हावे.” नंतर येशूचे सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.

यहूदी पूढाऱ्यांपुढे येशू(J)

57 त्या लोकांनी येशूला धरले, त्यांनी त्याला प्रमुख याजक कयफा याच्या घरी नेले. तेथे नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडीलजन एकत्र जमले होते. 58 पेत्र काही अंतर ठेवून येशूच्या मागे चालला होता. पेत्र येशूच्या मागे मुख्य याजकाच्या आवारापर्यंत गेला आणि काय होते ते पाहण्यासाठी नोकरांसोबत बसला.

59 येशूला मरणदंड द्यावा म्हणून मूख्य याजक आणि सर्व यहूदी सभा त्याच्याविरूद्ध काही खोटे दोषारोप करता येईल काय याचा प्रयत्न करू लागले. खोटी साक्ष देणारे लोक सापडतात काय याचा शोध घेऊ लागले. 60 पुष्कळ लोक पुढे आले आणि येशूविरूद्ध साक्ष देऊ लागले. परंतु येशूला जिवे मारण्याचे काहीही कारण यहूदी सभेला सापडेना. शेवटी दोन माणसे पुढे आली, ती म्हणू लागली, 61 “हा मनुष्य असे म्हणाला की, देवाचे मंदिर मी पाडू शकतो आणि ते तीन दिवसात पुन्हा बांधू शकतो.”

62 तेव्हा प्रमुख याजक उठून येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्याविरूद्ध साक्ष देत आहेत, तुझ्यविरूद्ध जे आरोप आहेत, त्याविषयी तुला काही सांगायचे आहे का? हे सर्व खरे सांगत आहेत काय?”

63 पण येशूने काहीच उत्तर दिले नाही.

परत एकदा प्रमुख याजक येशूला म्हणाला, “जिवंत देवाच्या नावाची शपथ. मी तुला बजावून सांगतो की खरे काय ते तू सांग! तू देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस काय?”

64 येशू त्यांना म्हणाला, “होय, मी आहे. जसे तू म्हणालास. तरी मी तुम्हांला सांगतो: ह्यापुढे मनुष्याच्या पुत्राला तुम्ही ढगातून येताना पाहाल व त्याला देवाच्या उजवीकडे बसलेले पाहाल.”

65 जेव्हा प्रमुख याजकाने हे ऐकले, तेव्हा तो फार संतापला. आपले कपडे फाडून तो म्हणाला, “याने देवाविरूद्ध दुर्भाषण केले आहे! आम्हांला आणखी साक्षीदारांची गरज राहिली नाही. ह्याला देवाची निंदा करताना तुम्ही ऐकले! 66 तुम्हांला काय वाटते?”

यहूद्यांनी उत्तर दिले, “तो अपराधी आहे आणि त्याला मेलेच पाहिजे.”

67 तेव्हा ते त्याच्यावर थुंकले, त्यांनी त्याला मारले. दुसऱ्यांनी चपराका मारल्या. 68 ते म्हणाले, “ख्रिस्ता आमच्यासाठी भविष्य सांग! तुला कोणी मारले?”

आपण येशूला ओळखतो हे सांगायला पेत्र घाबरतो(K)

69 यावेळी पेत्र वाड्याच्या अंगणात बसला होता. प्रमुख याजकाच्या दासीपैंकी एक दासी पेत्राकडे आली. ती म्हणाली, “तू सुद्धा गालीलच्या येशूबरोबर होतास.”

70 पण पेत्राने सर्वांसमोर ते नाकारले. तो म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला माहीत नाही!”

71 मग तो अंगणातून निघून फाटकापाशी गेला. फाटकाजवळ दुसऱ्या एका दासीने त्याला पाहिले. ती तेथे असलेल्या लोकांना म्हणाली, “नासरेथकर येशूबरोबर हा होता.”

72 पुन्हा एकदा पेत्र शपथ घेऊन येशूला नाकारतांना, म्हणाला, “मी त्याला ओळखत नाही!”

73 काही क्षणानंतर तेथे असलेले लोक पेत्राकडे वळाले आणि त्याला म्हणाले, “तू खरोखर येशूच्या शिष्यांपैकी एक आहेस, हे आम्हांला माहीत आहे, तुझ्या बोलण्यावरून हे आम्हांला स्पष्ट दिसून येते.”

74 मग तो स्वतःला शाप देऊ लागला. तो जोराने म्हणाला, “मी देवाशपथ सांगतो, येशू हा मनुष्य कोण आहे हे मला माहीत नाही!” पेत्र असे म्हणाला तोच कोंबडा आरवाला. 75 नंतर येशू काय म्हणाला होता हे पेत्राला आठवले, “कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” यानंतर पेत्र तेथून बाहेर निघून गेला आणि दु:खतिशयाने रडला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center