M’Cheyne Bible Reading Plan
उर्वरीत प्रदेशाची वाटणी
18 सर्व इस्राएल लोक शिलोह येथे एकत्र जमले. तेथे त्यांनी सभामंडप उभारला. आता देश इस्राएल लोकांच्या हाती आला होता. त्यांनी त्या भागातील शत्रूना नामोहरण केले होते. 2 देवाने वचन दिल्या प्रमाणे इस्राएल वंशजातील सात कुळांना जमिनीचा हिस्सा अजून मिळाला नव्हता.
3 तेव्हा यहोशवा इस्राएल लोकांना म्हणाला, “तुम्ही आपली जमीन ताब्यात घ्यायला कोठवर थांबणार? तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवाने ती तुमच्या हवाली केली आहे. 4 आता प्रत्येक वंशातून तीन तीन जणांची निवड करा. त्यांना मी जमिनीची पाहणी करायला पाठवतो. त्यावरुन ते त्या जमिनीचे वर्णन काढतील व माझ्याकडे परत येतील. 5 त्यांनी जमीनीचे सात वाटे करावेत. दक्षिणे कडील भाग यहूदाच्या लोकांकडे आहे. तो तसाच राहील. आणि उत्तरेकडील जमीन योसेफाच्या लोकांकडे आहे ती तशीच राहील. 6 पण तुम्ही फक्त जमिनीचे वर्णन लिहून आणा आणि सात भाग पाडून माझ्याकडे या. कोणी कुठला वाटा घ्यायचा ते आपल्या परमेश्वर देवाच्या म्हणण्यानुसार ठरेल. 7 लेवींना जमिनीत वाटा नाही. याजक म्हणून परमेश्वराची सेवा करणे हाच त्यांचा वाटा. गादी, रऊबेनी आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक यांना त्यांचा वाटा मिळालेला आहेच. यार्देनच्या पूर्वेकडील भाग परमेश्वराचा सेवक मोशे याने त्यांना यापूर्वीच दिलेला आहे.”
8 तेव्हा या कामासाठी निवडलेली मंडळी जमिनीच्या पाहणीसाठी बाहेर पडली. त्या प्रदेशाचे वर्णन लिहून काढले व तो यहोशवाकडे परत आणण्यासाठी ती निघाली. यहोशवा त्या लोकांना म्हणाला, “जमिनीचे नीट निरीक्षण करुन त्यांचे वर्णन तयार करा. मग ते घेऊन शिलोह येथे मला येऊन भेटा. तेथे मी चिठ्ठ्या टाकीन. म्हणजे परमेश्वराच्या इच्छेनुसार जमिनीचे वाटप होईल.”
9 तेव्हा हे लोक तिकडे गेले. त्यांनी नीट पाहणी करून यहोशवासाठी तिचे वर्णन लिहून काढले. प्रत्येक नगराचा अभ्यास करुन त्यांनी त्या प्रदेशाच्या सात वाटण्या केल्या. वर्णन घेऊन मग ते शिलोह येथे यहोशवाला भेटायला आले. 10 यहोशवाने शिलोह येथे परमेश्वरासमोर चिठ्ठ्या टाकल्या. अशा प्रकारे जमिनीची विभागणी होऊन प्रत्येक वंशाला जमिनीत आपापला वाटा मिळाला.
बन्यामीनचा वाटा
11 यहूदा आणि योसेफ यांच्या मधला जमिनीचा हिस्सा बन्यामीनच्या वंशाला मिळाला. त्याच्या वंशातील प्रत्येक कुळाचा त्यात हिस्सा होता. त्यांना मिळालेली जमीन अशी. 12 तिची उत्तरेकडील हद्द यार्देन नदीशी सुरु होऊन यरीहोच्या उत्तर बाजूने जाते. मग ती पश्चिमेला डोंगराळ प्रदेशात जाऊन बेथ-आवेनच्या पूर्वेला भिडते. 13 तेथून ती दक्षिणेला लूज (म्हणजेच बेथेल) कडे वळते व खाली अटारोथ अद्दार येथवर जाते. अटारोथ-अद्दार हे बेथ-होरोनच्या दक्षिणेकडील टेकडीवर आहे. 14 तेथे ही हद्द दक्षिणेला वळून टेकडीच्या पश्चिम बाजूने जाते. किर्याथ-बाल (म्हणजेच किर्याथ-यारीम) येथे तिचा शेवट होतो. हे यहूदाच्या वंशजांचे नगर ही झाली पश्चिम बाजू.
15 दक्षिणेकडील हद्द किर्याथ-यारीम येथ सुरु होऊन नफ्तोह नदीपर्यंत जाते. 16 रेफाई खोऱ्याच्या उत्तरेकडील बेन हिन्नोमच्या खोऱ्यानजीकच्या डोंगर पायथ्याकडे ती उतरत जाते. तेथून यबूसी नगराच्या दक्षिणेला हिन्नोम खोऱ्यात उतरुन एन-रोगेल कडे जाते. 17 तेथे उत्तरेला वळून एन-शेमेश कडे जाते. तशीच ती गलीलोथ पर्यंत जाते. (गलीलोथ हे पर्वतांमधल्या अदुम्मीम खिंडीजवळ आहे) रऊबेनाचा पुत्र बोहन याचे नाव दिलेल्या मोठ्या थोरल्या खडकाकडे ही सीमा उतरते. 18 बेथ-अराबाच्या उत्तरेकडील प्रदेशात जाऊन मग ती अराबात खाली उतरते. 19 बेथ-हाग्लाच्या उत्तरेला जाऊन क्षार समुद्राच्या उत्तर किनाऱ्याशी तिचा शेवट होतो. येथे यार्देन नदी समुद्राला मिळते. ही झाली दक्षिण हद्द.
20 यार्देन नदी ही पूर्वेकडील हद्द. बन्यामिनाचा वंशजांना मिळाला तो भाग हा. आता सांगितली ती तिची सीमारेषा. 21 प्रत्येक कुटुंबाला जमीन मिळाली. त्यांची नगरे म्हणजे यरीहो, बेथ होग्ला, एमेक-केसास, 22 बेथ अराबा, समाराईम व बेथेल, 23 अव्वीम, पारा, आफ्रा, 24 कफर-अम्मोनी, अफनी, गेबा ही बारा नगरे व आसपासची गावे.
25 गिबोन, रामा, बैरोथ. 26 मिस्पा, कफीरा, मोजा 27 रेकेम, इपैल, तरला, 28 सेला, ऐलेफ, यबूसी (म्हणजेच यरूशलेम) गिबाथ आणि किर्याथ ही चौदा नगरे आणि आसपासची गावे सुध्दा बन्यामीनाच्या वंशजांना मिळाली.
शिमोनचा वाटा
19 नंतर शिमोन वंशजांच्या सर्व कुळांतील लोकांना यहोशवाने जमिनीतील हिस्सा दिला. यहूदाच्या वाटणीच्या जमिनी मध्येच यांचाही वाटा होता. 2 त्यांना मिळालेला भाग असा; बैरशेबा (म्हणजेच शेबा), मोलादा, 3 हसर-शुवाल, बाला, असेम, 4 एलतोलद, बधूल, हर्मा, 5 सिकलाग, बेथ-मर्कबोथ, हसर-सुसा 6 बेथ-लबवोथ, शारुहेन ही तेरा नगरे व आसपासचा भाग.
7 अईन, रिम्मोन एतेर व आशान ही चार नगरे व भोवतालची गावेही त्यांना मिळाली. 8 तसेच बालथ-बैर (म्हणजेच नेगेवमधील रामा) येथपर्यंत या नगरांच्या चहूकडची गावेही त्यांना मिळाली शिमोनच्या वंशजांना मिळालेला हा भूभाग. प्रत्येक कुळाला त्यात वाटणी मिळाली. 9 शिमोनचा प्रदेश यहादाच्या वाटच्या जमिनीच्या अंतर्गतच होता. यहूदाच्या लोकांची जमीन त्यांच्या गरजेच्या मानाने खूपच जास्त होती. म्हणून शिमोनच्या लोकांना त्यातच हिस्सा दिला.
जबुलूनचा वाटा
10 जबुलून हा आणखी एक वंश त्यांनाही कुळांप्रमाणे वाटा मिळाला. त्यांच्या जमिनीची हद्द सारीद पर्यंत होती. 11 ती पश्चिमेकडे वर मरल कडे जाऊन दब्बेशेथपर्यंत जेमतेम पोचली. मग यकनाम झऱ्याच्या बाजूबाजूने गेली. 12 तेथून पूर्वेला वळून सारीद पासून किसलोथ-ताबोर पर्यंत गेली. तेथून दाबरथ व पुढे याफीय येथपर्यंत गेली. 13 त्यानंतर ती सीमा पूर्वेकडे गथ-हेफेर आणि इजा-कासीनकडे गेली. आणि ती रिम्मोन येथे थांबली त्यानंतर ती वळण घेऊन नेया कडे गेली. 14 नेया येथे वळसा घालून उत्तरेला हन्नाथोनपर्यंत गेली व तिचा शेवट इफता एलाच्या खिंडीपाशी झाला. 15 कट्टाथ, नहलाल, शुम्रोन इदला आणि बेथलहेम ही नगरे या हद्दीच्या आत येत होती. ती एकंदर बारा नगरे व आसपासची खेडी होती.
16 जबुलूनच्या वाटणीची शहरे व भोवतालचा प्रदेश तो हाच त्याच्या कुळातील सर्वांना यात वाटा मिळाला.
इस्साखारचा वाटा
17 चौथा हिस्सा इस्साखाराच्या वंशजांना त्यांच्या कुळाप्रमाणे मिळाला. 18 त्याना मिळालेली जमीन या प्रमाणे: इज्रेल, कसुल्लोथ, शूनेम, 19 हफराईम, शियोन, अनाहराथ 20 रब्बीथ, किशोन, अबेस, 21 रेमेथ, एन-गन्नीम, एन-हद्दा आणि बेथ-पसेस.
22 त्यांच्या प्रदेशाची हद्द ताबोर, शहसुमा व बेथ शेमेश यांना लागून होती. यार्देन नदीशी ती थांबत होती. सर्व मिळून सोळा नगरे व त्यांच्या आसपासची खेडी एवढा त्यांचा भाग होता. 23 इस्साखाराच्या वंशजांना, त्यांच्यातील सर्व कुळांना मिळालेला हिस्सा तो हाच.
आशेराचा वाटा
24 पाचवा हिस्सा आशेरच्या वंशजांना मिळाला. त्याच्यातील सर्व कुळांचे त्यात वाटे होते. 25 त्यांना मिळालेली जमीन ही; हेलकथ, हली, बटेन, अक्षाफ 26 अल्लामेलेख, अमाद, मिशाल पश्चिमेला त्यांची हद्द कर्मेल व शिहोर-लिब्नाथ येथपर्यंत जाऊन 27 पुढे पूर्वेला वळली. बेथ दागोनकडे जाऊन जबुलूनला स्पर्श केला. आणि इफताह-एलच्या खोऱ्याला भिडली. नंतर बेथ एमेक आणि नियेल यांच्या उत्तरेला गेली काबूलच्या उत्तरेला गेली. 28 पुढे एब्रोन, रहोब, हम्मोन व काना येथपर्यंत जाऊन मोठ्या सीदोन पर्यंत गेली. 29 मग दक्षिणेला रामा व तिथून सोर नामक भक्क म तटबंदीच्या नगराकडे वळली. तेथून होसकडे जाऊन तिचा शेवट अकजीब, 30 उम्मा व अफेक व रहोब यांच्या जवळ समुद्रानजीक झाला.
नगरे व भोवतालचा प्रदेश मिळून ही बावीस होतात. 31 हा भाग आशेरच्या वंशजांना त्यांच्या कुळांबरहुकूम मिळाला.
नफतालीचा वाटा
32 सहावा हिस्सा नफतालीच्या वंशजांना, त्याच्यातील कुळांना मिळाला. 33 त्यांची सीमा साननीम जवळच्या विशालवृक्षा पासून सुरु होते. हा हेलेफच्या जवळ आहे. मग ही सीमा अदामी नेकेब व यबनेल यांच्यामधून लक्क म वरुन यार्देन नदीला भिडते. 34 मग पश्चिमेला अजरोथ ताबोर यांच्यातून हुक्कोकशी थांबते. दक्षिणेची हद्द जबुलूनला लागून आहे आणि पश्चिम हद्द आशेरला. पूर्वेला ही सीमा यार्देन नदीपासच्या यहुदापर्यंत आहे. 35 या हद्दीच्या आत काही मजबूत तटबंदीची शहरे आहेत. ती म्हणजे, सिद्दीम, सेर. हम्मथ, रक्कथ, किन्नेरेथ, 36 अदामा, राम, हासोर, 37 केदेश, एद्रई, एन-हासोर. 38 हरोन. मिग्दल-एल, हरेम, बेथ-अनाथ व बेथ-शेमेस. ही शहरे व त्याच्या आसपासचा भाग मिळून ही एकोणीस नगरे झाली.
39 नफतालीला त्यांच्या कुळांप्रमाणे ही सर्व शहरे व भोवतालची खेडी मिळाली.
दानचा वाटा
40 सातवा वाटा दानच्या वंशजांचा त्यांच्यातील प्रत्येक कुळाला जमिनीत हिस्सा मिळाला. 41 त्यांना मिळालेला 42 शालब्बीन, अयालोन, इथला, 43 एलोन, तिम्ना, एक्रोन, 44 एलतके गिब्बथोन, बालाथ, 45 यहूद, बने-बराक, गथ रिम्मोन, 46 मीयकोन, रक्कोन आणि याफोच्चा समोरचा प्रदेश.
47 आपल्या वाटणीचा प्रदेश ताब्यात घ्यायला दानच्या वंशजांना त्रास झाला. त्यांच्या शत्रूचे सामर्थ्य अधिक होते. दानच्या लोकांना त्यांचा सहजासहजी पराभव करता आला नाही. तेव्हा दानच्या लोकांनी इस्राएलाच्या उत्तर भागाकडे जाऊन लेशेमशी त्यांनी लढाई केली. लढाईत लेशेमला हरवून त्यांचे लोक मारले. अशाप्रकारे दानचे लोक लेशेममध्ये राहू लागले. त्यांनी लेशेम हे नाव बदलून त्या शहराला आपल्या पूर्वजांचे दान हे नाव दिले, 48 ही सर्व शहरे व भोवतालची खेडी दान वंशजांना मिळाली. त्यांच्यातील प्रत्येक कुटुंबाला हिस्सा मिळाला.
यहोशवाचा वाटा
49 अशाप्रकारे जमिनीची विभागणी आणि सर्व वंशांच्या लोकांना करायच्या वाटण्या हे काम प्रमुखांनी पार पाडले. ते झाल्यावर नूनीचा पुत्र यहोशवाला ही काही जमीन द्यायचे इस्राएलाच्या लोकांनी ठरवले. तशी परमेश्वराची आज्ञा होती. 50 त्याला ही जमीन मिळावी अशी परमेश्वराने आज्ञा दिली होती. तेव्हा त्यानी एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नथ-सेरह हे नगर यहोशवाला दिले. यहोशवाने ते नगर मागितले होते. तेव्हा ते नगर आणखी बळकट करुन तो तेथे राहू लागला.
51 अशाप्रकारे या जमिनीच्या वाटण्या इस्राएलच्या सर्व वंशांच्या लोकांमध्ये झाल्या. एलाजार हा याजक, नूनाचा पुत्र यहोशवा आणि वडील धारी मंडळी या कामासाठी शिलो येथे जमली होती. परमेश्वरासमोर सभामंडपाच्या प्रवेशद्वारात ते एकत्र जमले. अशाप्रकारे हे वाटपाचे काम समाप्त झाले.
149 परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वराने ज्या नवीन गोष्टी केल्या त्याबद्दलचे नवे गाणे गा.
ज्या सभेत त्याचे भक्त भेटतात त्या सभेत त्याचे गुणगान करा.
2 इस्राएलाच्या लोकांना त्यांच्या निर्मात्याबरोबर आनंदोत्सव साजरा करु द्या.
सियोनच्या लोकांना त्यांच्या राजाबरोबर आनंद उपभोगू द्या.
3 त्या लोकांना डफाच्या आणि
वीणेच्या तालावर नाच करुन देवाची स्तुती करु द्या.
4 परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर सुखी आहे.
देवाने त्याच्या विनम्र लोकांसाठी अद्भुत गोष्ट केली, त्याने त्याचा उध्दार केला.
5 देवाच्या भक्तांनो तुमच्या विजयाबद्दल आनंदी व्हा.
झोपी गेल्यावरही आनंदी राहा.
6 लोकांना देवाजवळ त्याचे गुणगान करु द्या
आणि त्यांना त्यांच्या तलवारी हातात घेऊ द्या.
7 त्यांना त्यांच्या शत्रूंना शिक्षा करु द्या.
त्यांना त्या लोकांना शिक्षा करु द्या.
8 देवाचे लोक त्या राजांना आणि
महत्वाच्या लोकांना साखळंदडाने बांधतील.
9 देवाने आज्ञा केल्याप्रमाणे देवाचे लोक त्यांना शिक्षा करतील.
देवाचे सगळे भक्त त्याला मान देतात.
परमेश्वराचे गुणगान करा.
150 परमेश्वराची स्तुती करा.
देवाची त्याच्या मंदिरात स्तुती करा.
त्याच्या सामर्थ्याची स्वर्गात स्तुती करा.
2 देव ज्या महान गोष्टी करतो त्याबद्दल त्याची स्तुती करा.
त्याच्या सर्व मोठेपणाबद्दल त्याची स्तुती करा.
3 तुतारी आणि कर्णा वाजवून देवाचे गुणगान करा.
सतारीवर आणि वीणेवर त्याचे गुणगान करा.
4 डफ वाजवून आणि नाचून देवाची स्तुती करा.
तंतुवाद्यावर आणि बासरीवर त्याचे गुणगान करा.
5 जोर जोरात टाळ वाजवून देवाची स्तुती करा.
झणझणणाऱ्या झांजांवर त्याचे गुणगान करा.
6 प्रत्येक जिवंत वस्तू परमेश्वराची स्तुती करो.
परमेश्वराची स्तुती कर.
9 जर माझे मस्तक पाण्याने भरलेले असते
आणि माझे डोळे अश्रूंचे झरे असते
तर मी माझ्या नाश पावलेल्या लोकांसाठी अहोरात्र रडलो असतो.
2 जर वाळवंटात माझी धर्मशाळा असती
तर मी माझ्या लोकांना सोडून त्यांच्यापासून खूप दूर जाऊ शकलो असतो.
का? कारण त्यांनी सर्वांनी देवाचा विश्वासघात केला आहे.
ते देवाच्या विरुद्ध गेले आहेत.
3 “ते त्यांच्या जिभा धनुष्यासारख्या वापरतात.
त्यातून खोट्याचे बाण उडतात.
ह्या भूमीवर, सत्य नव्हे, तर असत्य, खोटे बलवान झाले आहे,
हे लोक एका पापाकडून दुसऱ्या पापाकडे जातात.
त्यांना माझे ज्ञान नाही.”
परमेश्वर असे म्हणाला आहे.
4 “तुमच्या शेजाऱ्यावर नजर ठेवा.
तुमच्या स्वतःच्या भावावरसुध्दा विश्वास ठेवू नका का?
कारण प्रत्येक भाऊ लबाड आहे.
प्रत्येक शेजारी चहाडखोर आहे.
5 प्रत्येकजण आपल्या शेजाऱ्याशी खोटे बोलतो,
कोणीही खरे बोलत नाही.
यहूदाच्या लोकांनी आपल्या जिभांना
खोटे बोलण्यास शिकविले आहे
त्यांना परत येणे अशक्य होईपर्यंत
त्यांनी पाप केले.
6 एका वाईट गोष्टीमागून दुसरी वाईट गोष्ट आली.
खोट्यामागून खोटे आले.
लोकांनी मला जाणून घ्यायचे नाकारले.”
परमेश्वराने ह्या सर्व गोष्टी सांगितल्या.
7 म्हणून, सर्वशाक्तिमान परमेश्वर म्हणतो:
“धातू शुद्ध आहे की नाही हे बघण्यासाठी कामगार तो तापवितो.”
त्याप्रमाणे मी यहूदाच्या लोकांची परीक्षा घेईन.
मला दुसरा पर्याय नाही.
माझ्या लोकांनी पाप केले.
8 यहूदाच्या लोकांच्या जिभा टोकदार बाणाप्रमाणे आहेत.
ते खोटे बोलतात.
प्रत्येकजण शेजाऱ्याशी वरवर चांगले बोलतो.
पण गुप्तपणे तो शेजाऱ्यावर हल्ला करण्याचा बेत आखत आहे.
9 “मी आता यहूदाच्या लोकांना शिक्षा करावी.”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“मी शिक्षा करावी अशा प्रकारचे ते लोक आहेत हे तुम्हाला माहीत आहे.
त्यांना योग्य ती शिक्षा मी करावी.”
10 मी, यिर्मया, डोंगरासाठी आकांत करीन.
मी वैराण शेतांसाठी शोकगीत गाईन.
का? कारण सजीव सृष्टी नाहीशी केली गेली आहे.
तेथून आता कोणीही प्रवास करीत नाही.
गुरांचे हंबरणे ऐकू येत नाही.
पक्षी दूर उडून गेले आहेत.
प्राणी निघून गेले आहेत.
11 “मी, परमेश्वर, यरुशलेम नगरी म्हणजे कचऱ्याचा ढीग करीन.
मी कोल्ह्यांचे वसतिस्थान होईल.
मी यहूदातील नगरे नष्ट करीन.
मग तेथे कोणीही राहणार नाही.”
12 ह्या गोष्टी समजू शकण्याइतका सुज्ञ कोणी आहे का?
परमेश्वराकडून शिकविला गेलेला कोणी आहे का?
परमेश्वराच्या संदेशाचे स्पष्टीकरण कोणी करु शकेल का?
ह्या भूमीचा नाश का झाला?
जेथे कोणीही जात नाही अशा वाळवंटासारखी ती का केली गेली?
13 परमेश्वराने ह्या प्रश्नांची उत्तरे दिली.
तो म्हणाला, “माझ्या शिकवणुकीला अनुसरायचे यहूदाच्या लोकांनी सोडून दिले.
मी त्यांना पाठ दिले.
पण त्यांनी ऐकायचे नाकारले.
ते माझ्या शिकवणुकीप्रमाणे वागले नाहीत.
14 यहूदातील लोक त्यांच्या मर्जीप्रमाणे
जगले ते दुराग्रही होते.
बआल या खोट्या देवाला ते अनुसरले.
त्यांच्या वडिलांनी त्यांना खोट्या देवांना अनुसरायला शिकविले.”
15 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो,
“लवकरच मी यहूदाच्या लोकांना कडू अन्न खायला लावीन,
विषारी पाणी प्यायला लावीन.
16 मी यहूदाच्या लोकांना दुसऱ्या राष्ट्रांतून विखरु टाकीन
त्यांनी किंवा त्यांच्या वडिलांनी पूर्वी कधीही ज्यांच्याबद्दल
ऐकले नव्हते अशा परक्या देशांत ते राहतील.
मी तलवारी घेतलेले लोक पाठवीन.
ते यहूदाच्या लोकांना ठार मारतील.
सर्व लोकांचा नाश होईपर्यंत ते संहार करतील.”
17 सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो,
“आता या गोष्टींचा विचार करा.
प्रेतयात्रेच्या वेळी रडणाऱ्या भाडोत्री बायकांना बोलवा.
त्या कामात वाकबगार असलेल्या स्त्रियांना बोलवा.
18 लोक म्हणतात,
‘त्या बायकांना लवकर येऊन आमच्यासाठी रडू द्या
मग आमचे डोळे भरुन येतील
आणि अश्रूंचा पूर येईल.’
19 “सियोन मधून मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकायला येतो आहे.
‘आपला खरोखरच नाश झाला
आपली खरोखरच अप्रतिष्ठा झाली.
आता आपण आपली भूमी सोडलीच पाहिजे. कारण आपली घरे नष्ट केली गेली.
आता ती दगडधोंड्यांचा ढिगारा झाली आहेत.’”
20 आता, यहूदातील स्त्रियांनो, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐका.
परमेश्वराच्या तोंडचे शब्द ऐका.
देव म्हणतो, “तुमच्या मुलींना मोठ्याने रडायला शिकवा.
प्रत्येक बाईला शोकगीत गाता आलेच पाहिजे.
21 ‘मृत्यू आला आहे.
तो चढून खिडक्यातून आत आला.
मृत्यू राजवाड्यात आला.
रस्त्यांवर खेळणाऱ्या आमच्या मुलांकडे आला.
सार्वजनिक ठिकाणी जमणाऱ्या तरुणांकडे तो आला.’
22 “यिर्मया, या गोष्टी सांग:
परमेश्वर म्हणतो, ‘मृत शरीरे खताप्रमाणे शेतांत पडतील.
शेतकऱ्यांनी कापलेल्या धान्याप्रमाणे ती जमिनीवर पडतील.
पण त्यांना गोळा करणारे कोणीही नसेल.’”
23 परमेश्वर म्हणतो,
“शहाण्यांनी त्यांच्या शहाणपणाबद्दल,
बलवानांनी त्यांच्या बळाबद्दल
व श्रीमंतांनी त्यांच्या पैशाबद्दल
बढाई मारु नये.
असे परमेश्वर म्हणतो.
24 पण कोणाला बढाईच मारायची असेल तर त्याला ह्या गोष्टीसाठी मारु द्या.
तो मला ओळखायला शिकला म्हणून बढाई मारु द्या.
मी परमेश्वर आहे,
मी कृपाळू व न्यायी आहे,
जगात चांगल्या गोष्टी मी करतो
आणि त्या गोष्टी मला आवडतात हे कळल्याबद्दल त्याला बढाई मारु द्या.”
हा परमेश्वराचा संदेश आहे.
25 परमेश्वराचा संदेश असा आहे “ज्यांची फक्त शारीरिक सुंता झाली आहे, अशांना शिक्षा करण्याची वेळ येत आहे. 26 मिसर, यहुदा, अदोम, अम्मोन, मवाब यातील व वाळवंटात राहणाऱ्या इतर लोकांबद्दल मी बोलत आहे. ह्या देशातील लोकांची शारीरिक सुंताही खरोखरी झालेली नाही. पण इस्राएलच्या घराण्यातील लोकांच्या ह्दयाची सुंताही झालेली नाही.”
येशू धार्मिक पुढाऱ्यांवर टीका करतो(A)
23 मग येशू लोकांशी व त्याच्या शिष्यांशी बोलला, तो म्हणाला, 2 “नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांना मोशेच्या नियमशास्त्राचे स्पष्टीकरण करण्याचे अधिकार आहेत. 3 म्हणून ते जसे सांगतात तसे तुम्ही करा. पण ते जसे करतात तसे करू नका. मी असे म्हणतो याचे कारण ते बोलतात पण त्याप्रमाणे करत नाहीत. 4 वाहावयास अवघड असे ओझे ते बांधतात व ते ओझे लोकांच्या खांद्यांवर देतात व ते स्वतः ते ओझे उचलायला एक बोटदेखील लावत नाहीत.
5 “ते त्यांचे सर्व चांगले काम लोकांनी पाहावे म्हणून करतात. ते पवित्र शास्त्र लिहिलेल्या लहान पेट्या [a] मोठमोठ्या बनवितात आणि लोकांनी पाहावे म्हणून लांब झगे घालतात. 6 मेजवानीच्या ठिकाणी आपल्याला विशेष मानाची जागा मिळावी असे त्यांना वाटते. तसेच यहूद्यांचे सभास्थानात मोक्याच्या जागी बसायला त्यांना फार आवडते. 7 बाजारातील मुख्य रस्त्याने जाता येता लोकांनी आपल्याला मान द्यावा याची त्यांना फार आवड असते आणि लोकांनी त्यांना गुरुजी म्हणावे असे त्यांना वाटते.
8 “परंतु तुम्ही स्वतःला ‘गुरूजी’ म्हणवून घेऊ नका. तुम्ही सर्व एकमेकांचे बहीण भाऊ आहात, तुमचा गुरू एकच आहे. 9 आणि जगातील कोणालाही ‘पिता’ म्हणू नका. कारण तुमचा पिता एकच आहे व तो स्वर्गात आहे. 10 तुम्ही स्वतःला ‘मालक’ म्हणून घेऊ नका. तुमचा मालक ख्रिस्त आहे. 11 तुमच्यातील जो सेवक बनून तुमची सेवा करतो तो तुमच्यात सर्वात मोठा होय. 12 जो स्वतःला मोठा समजेल त्याला कमी लेखले जाईल. स्वतःला लहान समजणारा प्रत्येक जण मोठा गणला जाईल.
13 “अहो, परूश्यांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, हाय, हाय, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी खुला ठेवीत नाहीत. तुम्ही स्वतः तर आत जात नाहीच पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत. 14 [b]
15 “परूश्यांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनी, तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही समुद्र व जमिनीवरून प्रवास करून एक तरी शिष्य मिळतो का ते पाहाता आणि तुम्हांला तो मिळतो तेव्हा तुम्ही त्याला तुमच्याप्रमाणे नरकपुत्रासारखे करून टाकता.
16 “तुम्हांला दु:ख होईल. आंधळ्या वाटाड्यांनो, जे तुम्ही म्हणता, ‘जर एखादा मंदिराच्या नावाने शपथ घेतो तर त्याने ती पाळलीच पाहिजे याचे बंधन त्याच्यावर नाही, पण जर एखादा मंदिरातील सोन्याची शपथ घेऊन बोलतो, तर त्याने ती शपथ पाळलीच पाहिजे.’ 17 तुम्ही मूर्ख आंधळे आहात. सोने आणि मंदिर यांपैकी कोणते अधिक महत्त्वाचे? मंदिर त्या सोन्याला पवित्र बनविते.
18 “आणि तुम्ही असे म्हणता. जर एखादा वेदीची शपथ घेतो तर त्यात काही वावगे नाही. पण जर एखादा वेदीवरील अर्पणाची शपथ घेतो तर त्याने ती शपथ पाळलीच पहिजे. 19 तुम्ही आंधळे आहात. तुम्हांला काही दिसत नाही व कळत नाही! अर्पण मोठे की वेदी मोठी? वेदीमुळे अर्पण पवित्र होते म्हणून वेदी मोठी. 20 म्हणून जो वेदीची शपथ घेतो तो त्या वेदीबरोबर त्यावरच्या सर्वांची शपथ घेतो. 21 तसेच जो मंदिराची शपथ घेतो तो मंदिर व त्यात राहणाऱ्या देवाची देखील शपथ घेतो. 22 जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या आसनाची व त्यावर बसणाऱ्याचीही शपथ घेतो.
23 “परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुमचे जे काही आहे त्याचा दशांश तुम्ही देवाला देता- पुदिना, शेप, जिरे यांचा देखील दंशाश देता. पण नियमशास्त्राच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे- न्यायाने वागणे, दया दाखविणे व प्रामाणिकपणे वागणे हे तुम्ही पाळत नाही. या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत व तसेच इतरही केल्या पाहिजेत. 24 तुम्ही आंधळे वाटाडे आहात. जो पाण्याने भरलेल्या प्याल्यातून माशी बाजूला करतो व उंटासह पाणी पिऊन टाकतो त्याच्यासारखे तुम्ही आहात.
25 “अहो परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही आपल्या ताटवाट्या बाहेरून घासता पुसता पण लोकांना फसवून कमावलेला फायदा आणि असंयम यानी त्या आतून भरल्या आहेत. 26 अहो परुश्यांनो, तुम्ही आंधळे आहात! अगोदर तुमची वाटी आतून घासा व धुवा म्हणजे ती बाहेरून देखील खरोखर साफ होईल.
27 “अहो परुश्यांनो नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! रंगसफेदी केलेल्या कबरांसारखे तुम्ही आहात. त्या वरून चांगल्या दिसतात पण आतून मेलेल्या माणसांच्या हाडांनी भरल्या आहेत. 28 तुमचेही तसेच आहे. लोक तुमच्याकडे पाहतात आणि तुम्ही चांगले आहात असे त्यांना वाटते. पण तुम्ही आतून ढोंग व दुष्टपणा यांनी भरला आहात.
29 “अहो, परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही संदेष्ट्यांसाठी कबरा बांधता. आणि जे लोक धार्मिक जीवन जगले त्यांची थडगी सजवता. 30 आणि तुम्ही म्हणता जर आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात जिवंत असतो तर त्यांना या संदेष्ट्यांना जिवे मारण्यास मदत केली नसती. 31 पण ज्यांनी ज्यानी त्यांना जिवे मारले, त्यांचेच तुम्ही वंशज आहात याचा पुरावा तुम्ही देता. 32 पुढे व्हा आणि तुमच्या वाडवडिलांनी सुरू केलेली पापी कामे पूर्ण करा.
33 “तुम्ही साप आहात. विषारी सापाची पिल्ले आहात! तुम्ही देवाच्या हातून सुटू शकणार नाही. तुम्हा सर्वांना दोषी ठरविण्यात येईल. तुम्ही नरकात जाल. 34 मी तुम्हांला सांगतो की मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी लोक आणि शिक्षक पाठवीत आहे. त्यांच्यातील काहींना तुम्ही जिवे माराल. त्यांपैकी काहींना वधस्तंभावर खिळाल. त्यांच्यातील काहींना तुमच्या सभास्थानात मारहाण कराल. त्यांचा नगरानगरातून पाठलाग कराल.
35 “म्हणून ज्या चांगल्या लोकांचा वध या पृथ्वीवर झाला त्या सर्वांसाठी तुम्ही दोषी ठराल. हाबेल या चांगल्या मनुष्याच्या वधासाठी तुम्ही दोषी ठराल. आणि तुम्ही बरख्याचा पुत्र जखऱ्याला जिवे मारण्याविषयी दोषी ठराल. त्याला मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये मारले होते. हाबेलाच्या काळापासून ते जखऱ्याच्या [c] काळापर्यंत जे जे चांगले लोक मारण्यात आले, त्यांच्या वधाविषयी तुम्ही दोषी ठराल. 36 मी तुम्हांला खरे सांगतो; तुम्ही लोक जिवंत असेपर्यंत या गोष्टी घडतील.
यरूशलेमच्या लोकांना येशू सावध करतो(B)
37 “अगे, यरूशलेमे, यरूशलेमे, तू संदेष्ट्यांना जिवे मारतेस. देवाने तुझ्याकडे पाठविलेल्या लोकांना दगडमार करतेस. कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पंखाखाली एकवटते तसे तुझ्यातील लोकांना एकवटण्याचा पुष्कळ वेळा मी प्रयत्न केला पण तू मला तसे करू दिले नाहीस. 38 आता तुझे घर उजाड होईल. 39 मी तुला सांगतो, ‘प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. [d] असे म्हणेपर्यंत तू मला पाहणार नाहीस.’”
2006 by World Bible Translation Center