M’Cheyne Bible Reading Plan
14 एलाजार याजक, नूनाचा पुत्र यहोशवा आणि इस्राएलमधील सर्व वंशांचे प्रमुख यांनी जमिनीच्या वाटण्या कशा करायच्या ते ठरविले. 2 परमेश्वराने मोशेला याविषयी पूर्वीच आज्ञा दिली होती. तिला अनुसरुनच साडेनऊ वंशांच्या लोकांनी चिठ्ठ्या टाकून वाटे केले. 3 अडीच वंशातील लोकांना मोशेने आधीच यार्देन नदीच्या पूर्वेकडील जमीन दिली होती. पण लेवींना इतरांप्रमाणे जमिनीत वाटा नव्हता. 4 अशाप्रकारे बारा वंशातील लोकांना आपापल्या हिश्श्याची जमीन मिळाली. योसेफच्या वंशाची विभागणी मनश्शे व एफ्राईम अशा दोन वंशात झाली होती. त्यांनाही प्रत्येकी काही जमीन मिळाली. परंतु लेवीच्या वंशातील लोकांना जमिनीत हिस्सा मिळाला नाही. त्यांना राहण्याकरता काही गावे दिली गेली. प्रत्येक वंशाच्या वाठ्याच्या जमिनीत वस्तीसाठी गावे आणि गुराढोरांसाठी गायराने असा हिस्सा त्यांना मिळाला. 5 परमेश्वराने मोशेला जशी आज्ञा दिली तसेच याबाबतीत इस्राएल लोकांनी केले.
कालेबला त्याची जमीन मिळते
6 एकदा यहूदा वंशातील काही लोक गिलगाल येथे यहोशवाकडे आले. कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब हाही त्यांच्यात होता. तो यहोशवाला म्हणाला, “कादेश-बर्ण्या येथे परमेश्वर काय म्हणाला ते तुला आठवते ना? तो आपला सेवक मोशे याच्याशी बोलत होता. आपल्या दोघांविषयी ते बोलणे होते. 7 परमेश्वराचा सेवक मोशे याने देशाची टेहेळणी करायला मला पाठवले होते. मी तेव्हा चाळीस वर्षांचा होतो. मला त्या देशाविषयी काय वाटते ते मी परत आल्यावर मोशेला सांगितले. 8 माझ्याबरोबर आलेल्यांनी लोकांना असे काही सांगितले की लोक घाबरुन गेले. पण परमेश्वर आपल्याला हा देश देणार आहे यावर माझा पूर्ण विश्वास होता. 9 तेव्हा मोशेने मला त्यादिवशी वचन दिले. मोशे म्हणाला, ‘तू जेथे पाऊल ठेवलेस ती भूमी तुला मिळेल. तुझी मुलेबाळे तेथे कायमची राहतील. तू परमेश्वरावर निष्ठा ठेवलीस म्हणून तो प्रदेश मी तुला देईन.’
10 “आता परमेश्वराने शब्द दिल्याप्रमाणे मलाही पंचेचाळीस वर्षें जिवंत ठेवले आहे. एवढ्या कालावधीत आपण वाळवंटात भटकलो. आज मी पंच्याऐंशी वर्षांचा आहे. 11 पण मोशेने मला पूर्वी कामगिरीवर पाठवले तेव्हा इतकाच आजही मी धडधाकट आहे. लढण्याची माझ्यात ताकद आहे. 12 तेव्हा परमेश्वराने त्यावेळी कबूल केलेला डोंगराळ प्रदेश आता मला दे. मजबूत बांध्याचे अनाकी लोक तेथे राहतात, त्याची शहरे खूप मोठी असून चांगली सुरक्षित आहेत हे तू ऐकले आहेसच. पण परमेश्वराची साथ मला असेल तर त्याने सांगितल्याप्रमाणे मी त्यांना आजही हुसकावून लावू शकेन.”
13 यहोशवाने यफुन्नेचा मुलगा कालेब याला आशीर्वाद दिला. तसेच हेब्रोन हे शहर त्याला दिले. 14 आजही ते शहर कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब याच्या वंशजांचेच आहे. कारण त्याने इस्राएलच्या परमेश्वर देवाची आज्ञा पाळली व त्याच्यावर विश्वास ठेवला. 15 पूर्वी या शहराचे नाव किर्याथ-आर्बा असे होते. आर्बा हा अनाकी लोकांमधीक सर्वात थोर पुरुष. त्याच्यावरून हे नाव पडले होते.
नंतर या देशात शांतता नांदू लागली.
यहूदाचा प्रदेश
15 यहूदाला मिळालेल्या प्रदेशाच्या, त्या वंशातील कुळांप्रमाणे वाटण्या झाल्या. हा प्रदेश अदोमाच्या सीमेपर्यंत आणि तेमानलगतच्या सीन वाळवंटापर्यंत पार दक्षिणेपर्यंत पसरला होता. 2 दक्षिणेची सीमा क्षारसमुद्राच्या दक्षिणे कडील टोकाशी सुरु होत होती. 3 ती तशीच पुढे अक्राब्बीमच्या चढणीकडून सीन वाळवंटावरुन कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस जाऊन मग हेस्रोन वरुन अद्दार पर्यंत जाते. तिथे एक वळण घेऊन कर्काकडे जाते. 4 तेथून ती सीमा असमोनास जाऊन मिसरच्या ओढ्यापर्यंत निघते. तिचा शेवट भूमध्यसमुद्रापाशी होती. ही झाली दक्षिण सीमा.
5 यार्देन नदी समुद्राला मिळते तेथून क्षारसमुद्राच्या संपूर्ण(पश्चिम) किनाऱ्यापर्यंत पूर्वेकडील हद्द.
यार्देन क्षार समुद्राला मिळते तेथे या प्रदेशाची उत्तरेकडील हद्द सुरु होते. 6 बेथ-हाग्लाच्या चढणीवरुन बेथ-अराबाच्या उत्तरेकडे रऊबेनी बोहनच्या खडकापर्यंत ती जाते. 7 तेथून ती सीमा आखोर खोऱ्यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेला गिलगालकडे वळते. हे गिलगाल अदुम्मीमाच्या चढणीसमोर नदीच्या दक्षिणेला आहे. एन-शेमेश नावाच्या झऱ्याजवळून गेल्यावर या सीमेचा शेवट एन रोगेल येथे होतो. 8 तेथून ती सीमा हिन्नोम पुत्राच्या खोऱ्यातून यबूसी म्हणजेच यरुशलेमच्या दक्षिणेकडून पश्चिमेकडे हिन्नोमाच्या खोऱ्यासमोर आणि रेफाईम खोऱ्याच्या उत्तर टोकाला असलेल्या, पहाडाच्या माथ्यावर गेली आहे. 9 तेथून ती सीमा नफ्तोहाच्या झऱ्यापर्यंत जाते आणि एफ्रोन डोंगरातील नगरांवरुन निघून बाला म्हणजेच किर्याथ-यारीम येथपर्यंत पोचते. 10 मग बालापासून ही सीमा पश्चिमेला सेईर डोंगराकडे वळून यारीम डोंगर (म्हणजेच कसालोन) याच्या उत्तरेकडल्या भागाजवळून जाते आणि बेथ-शेमेशकडे उत्तरून तिम्नाकडे जाते. 11 मग एक्रोनच्या उत्तरेकडे असलेल्या टेकडीकडे आणि तेथून शिक्रोनापर्यंत पुढे जाऊन बाला डोंगराजवळून यबनेलास पर्यंत जाऊन भूमध्यसमुद्रापाशी तिचा शेवट होतो. 12 भूमध्यसमुद्र ही यहूदाच्या भूमीची पश्चिमेकडील हद्द. तेव्हा या चतु:सीमेच्या आतील प्रदेशात यहूदाचे यहूदाचे वंशज राहिले.
13 यफुन्नेचा मुलगा कालेब याला यहूदाच्या प्रदेशातील काही भूमी द्यायची परमेश्वराने यहोशवाला आज्ञा केली होती. त्या आज्ञेप्रमाणे यहोशवाने कालेबला किर्याथ-आर्बा (हेब्रोन) हे नगर दिले. (आर्बा हा अनाकचा पिता) 14 शेशय, अहीमान आणि तलमय या हेब्रोन मध्ये राहणाऱ्या तीन अनाकी कुटुंबांना कालेबने तेथून घालवून दिले. 15 मग दबीरा येथे राहणाऱ्यांवर कालेब चढाई करुन गेला. (दबीरला पूर्वी किर्याथ-सेफर असेही म्हणत.) 16 कालेब म्हणाला, “किर्याथ-सेफरचा मला पाडाव करायचा आहे. जो कोणी या शहरावर चढाई करुन त्याचा पराभव करील त्याला मी माझी मुलगी अखसा देईन. त्यांचे लग्न लावून देईन.”
17 कनाज याचा मुलगा अथनिएल याने हे शहर घेतले. तेव्हा कालेबने त्याचा अखसाशी विवाह करुन दिला. 18 अखसा अथनिएलकडे आली. तेव्हा अथनिएलने अखसाला आपल्या वडीलांजवळ आणखी जमीन मागायला सांगितले. अखसा वडीलांकडे निघाली. ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबने तिला विचारले “तुला काय हवे?”
19 अखसा म्हणाली, “मला एक भेट द्या. तुम्ही मला नेगेव मधील रखरखीत वाळवंटी जमीन दिलीत. आता पाणी असलेली जमीन द्या” तेव्हा कालेबने तिच्या मनाप्रमाणे केले. त्याने तिला त्या प्रदेशातील वरच्या व खालच्या बाजूचे झरे दिले.
20 यहूदाच्या वंशातील लोकांना परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे भूमी मिळाली. त्यांच्यातील प्रत्येक कुळाला वतन मिळाले.
21 नेगेवच्या दक्षीणभागातील, अदोमच्या सीमेजवळची सर्व नगरे त्यांना मिळाली. त्यांची यादी खालीलप्रमाणे;
कबसेल, एदेर, यागूर, 22 कीना, दीमोना, अदादा, 23 केदेश, हासोर, इथनान, 24 जीफ, टेलेम, बालोथ, 25 हासोर-हदत्ता, करीयोथ-हस्रोन म्हणजेच हासोर. 26 अमाम, शमा, मोलादा, 27 हसर-गादा, हेष्मोन व बेथ-पेलेट, 28 हसर-शुवाल, बैर-शेबा, बिजोथा, 29 बाला, ईयीम, असेम, 30 एल्तोलाद, कसील व हर्मा, 31 सिकलाग, मद्मान्ना सन्सन्ना, 32 लवावोथ, शिलहीम, अईन, रिम्मोन. सर्व मिळून ही एकोणतीस नगरे व त्या भोवतालची शेतजमीन.
33 पश्चिमेकडील डोंगरपायथ्यावरची नगरेही यहूदाच्या कुळातील लोकांना मिळाली. ती नगरे अशी.
एष्टावोल, सरा, अषणा. 34 जानोह, एन-गन्नीम, तप्पूहा, एनाम, 35 यर्मूथ अदुल्लाम, सोखो, अजेका, 36 शारईम, अदीथईम, गदेरा किवा गदेरोथईम ही चौदा गावे व भोवतालची शेतजमीन.
37 शिवाय ही गावे
सनान, हदाशा, मिग्दल गाद, 38 दिलान, मिस्पा, यकथेल, 39 लाखीश, बसकाथ, एग्लोन, 40 कब्बोन, लहमाम, किथलीश, 41 गदेरोथ, बेथ-दागोन, नामा व मक्केदा ही सोळा नगरे व भोवतालचे वावर.
42 लिब्ना, एथेर, आशान 43 इफताह, आष्णा, नसीब, 44 कईला, अकजीब आणि मारेशा ही नऊ नगरे व आसपासची जमीन ही मिळाली. 45-46 एक्रोन, त्या भोवतालची खेडी व जमीन तसेच एक्रोनच्या पश्चिमेकडील भाग आणि आश्दोद जवळची सर्व गावे व जमीन यहूदाच्या वंशजांना मिळाली. 47 आश्दोदच्या भोवतालचा प्रदेश व गावे याबरोबरच त्यांना गज्जा भोवतालचा प्रदेश व त्याच्या जवळची गावे ही मिळाली. मिसरची नदी व भूमध्य समुद्र किनाऱ्यालगतचा प्रदेश येथपर्यंत त्यांचा भूभाग पसरला होता.
48 आणि डोंगराळ प्रदेशातील
शामीर, यत्तीर, सोखो, 49 दन्ना, किर्याथ-सन्ना (म्हणजेच दबीर) 50 अनाब, एष्टमो, अनीम, 51 गोशेन, होलोन व गिलो ही अकरा नगरे व आसपासची गावे त्यांना मिळाली.
52 अराब, दूमा, एशान, 53 यानीम, बेथ-तप्पूहा, अफेका, 54 हुमटा, किर्याथ-अर्बा (म्हणजेच हेब्रोन) व सियोर ही नऊ नगरे व त्या भोवतालची खेडी त्यांना मिळाली. 55 मावोन कर्मेल जीफ, यूटा, 56 इज्रेल, यकदाम, जानोह, 57 काइन, गिबा तिम्ना ही दहा नगरे व आसपासची गावे,
58 हल्हूल, बेथ-सूर, गदोर, 59 माराथ, बेथ-अनोथ, एलतकोन ही सहा नगरे व त्या जवळची गावे ही सुध्दा मिळाली.
60 राब्बा व किर्याथ-बाल (म्हणजेच किर्याथ-यारीम) ही दोन शहरेही त्यांना मिळाली.
61 त्याचप्रमाणे वाळवंटातील काही गावेही. त्यांची यादी:
बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा, 62 निबशान, क्षारनगर व एन-गेदी ही सहानगरे व त्यांच्या भोवतालची खेडी.
63 तथापि, यरुशलेममधील यबूसी लोकांना यहूदाचे सैन्य बाहेर काढू शकले नाही. म्हणून यरुशलेम मध्ये आजही यहूदांबरोबर यबूसी लोक राहतात.
146 परमेश्वराची स्तुती करा.
माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर.
2 मी आयुष्यभर परमेश्वराची स्तुती करीन.
मी आयुष्यभर त्याचे गुणगान करीन.
3 तुमच्या नेत्यांवर मदतीसाठी अवलंबून राहू नका.
लोकांवर विश्वास टाकू नका.
का? कारण लोक तुम्हाला वाचवू शकत नाहीत.
4 लोक मरतात आणि त्यांचे दफन केले जाते
आणि नंतर मदतीच्या त्यांच्या सगळ्या योजनाही जातात.
5 पण जे लोक देवाला मदतीबद्दल विचारतात ते सुखी असतात.
ते लोक परमेश्वरावर, त्यांच्या देवावर अवलंबून असतात.
6 परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली.
परमेश्वराने समुद्र आणि त्यातल्या सर्व गोष्टी निर्माण केल्या.
परमेश्वर त्यांचे सदैव रक्षण करील.
7 जे लोक दु:खी कष्टी आहेत.
त्यांच्यासाठी परमेश्वर योग्य गोष्टी करतो.
तो भुकेल्यांना अन्न देतो.
तुरुंगात बंद असलेल्यांना तो सोडवतो.
8 परमेश्वर आंधळ्यांना पुन्हा दिसू लागण्यासाठी मदत करतो.
संकटात असलेल्या लोकांना परमेश्वर मदत करतो.
परमेश्वराला चांगले लोक आवडतात.
9 परमेश्वर आपल्या देशातल्या परक्यांचे रक्षण करतो.
परमेश्वर विधवांची आणि अनांथांची काळजी घेतो.
परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.
10 परमेश्वर सदैव राज्य करील
सियोन तुझा देव सदैव राज्य करीत राहील
परमेश्वराची स्तुती करा.
147 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा.
आपल्या देवाचे गुणगान करा.
त्याची स्तुती करणे चांगले आणि आल्हाददायक आहे.
2 परमेश्वराने यरुशलेम बांधले,
इस्राएलाच्या ज्या लोकांना कैदी म्हणून नेले होते.
त्यांना देवाने परत आणले.
3 देव त्यांच्या विदीर्ण ह्रदयावर फुंकर घालतो
आणि त्यांच्या जखमांना मलम पट्टी करतो.
4 देव तारे मोजतो आणि
त्याला प्रत्येक ताऱ्याचे नाव माहीत असते.
5 आपला प्रभु खूप मोठा आहे.
तो फार शक्तीवान आहे.
त्याला माहीत असलेल्या गोष्टींना मर्यादा नाही.
6 परमेश्वर नम्र लोकांना मदत करतो.
परंतु तो वाईट लोकांना अडचणीत टाकतो.
7 परमेश्वराला धन्यावाद द्या.
आपल्या देवाची वीणेवर स्तुती करा.
8 देव ढगांनी आकाश भरुन टाकतो.
देव पृथ्वीसाठी पाऊस निर्माण करतो.
देव डोंगरावर गवत उगवतो.
9 देव प्राण्यांना अन्न देतो,
देव लहान पक्ष्यांना अन्न भरवतो.
10 युध्दातले घोडे आणि बलवान सैनिक
त्याला आनंद देत नाहीत.
11 जे लोक त्याची प्रार्थना करतात त्यांच्या बरोबर परमेश्वर आनंदी असतो.
जे लोक त्याच्या खऱ्या प्रेमावर विश्वास ठेवतात त्यांच्याबरोबर देव आनंदी असतो.
12 यरुशलेम, परमेश्वराची स्तुती कर.
सियोन तुझ्या देवाची स्तुती कर.
13 यरुशलेम, देव तुझे दरवाजे बुलंद बनवतो
आणि देव तुझ्या शहरातल्या लोकांना आशीर्वाद देतो.
14 देवाने तुझ्या देशात शांती आणली.
म्हणून युध्दात शत्रूंनी तुझे धान्य नेले नाही.
आणि अन्न म्हणून तुझ्याकडे भरपूर धान्य आहे.
15 देव पृथ्वीला आज्ञा करतो
आणि ती त्या आज्ञा त्वरित पाळते.
16 जमीन लोकरी सारखी संपूर्ण पांढरी होई पर्यंत देव हिमवर्षाव करतो.
देव गोठलेले बर्फ धुळीसारखे हवेत उडू देतो.
17 देव, आकाशतून दगडाप्रमाणे गारांचावर्षाव करतो.
तो जी थंडी पाठवतो तिचा सामना कुणीही करु शकत नाही.
18 नंतर देव दुसरी आज्ञा देतो आणि पुन्हा गरम वारे वाहू लागतात.
बर्फ वितळायला लागते आणि पाणी वाहायला लागते.
19 देवाने याकोबाला (इस्राएल) त्याची आज्ञा दिली.
देवाने इस्राएलला त्याचे नियम दिले.
20 देवाने हे दुसऱ्या कोणत्याही देशासाठी केले नाही.
देवाने दुसऱ्या लोकांना त्याचे नियम शिकवले नाहीत.
परमेश्वराची स्तुती करा.
यिर्मयाचे मंदिरातील प्रवचन
7 यिर्मयासाठी परमेश्वराचा संदेश: 2 “यिर्मया, परमेश्वराच्या घराच्या दाराजवळ उभा राहा आणि हा उपदेश कर:
“‘यहूदातील सर्व लोकांनो, परमेश्वराचा संदेश ऐका. देवाची पूजा करण्यासाठी आत येणाऱ्या सर्व लोकांनो, ऐका! 3 परमेश्वर हा इस्राएलच्या लोकांचा देव आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो तुमची जगण्याची पद्ध् बदला आणि सत्कृत्ये करा. तुम्ही असे केल्यास मी तुम्हाला या ठिकाणी राहू देईन [a] 4 काही लोक खोटे बोलतात त्यावर विश्वास ठेवू नका. ते म्हणतात “हे परमेश्वराचे मंदिर आहे. परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर.” 5 तुम्ही तुमचा जीवनमार्ग बदललात आणि सत्कृत्ये केलीत तर मी तुम्हाला येथे राहू देईन. तुम्ही एकमेकांशी प्रामाणिक असले पाहिजे. 6 तुम्ही अपरिचिताशीसुध्दा प्रामाणिकपणे वागले पाहिजे. विधवांसाठी आणि अनाथांसाठी तुम्ही योग्य गोष्टी केल्या पाहिजेत. निरपराध्यांना मारु नका. दुसऱ्या देवांना अनुसरु नका. का? कारण ह्या गोष्टी तुमच्या आयुष्याचा नाश करतील. 7 तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्यात, तर मी तुम्हाला येथे राहू देईन. मी ही भूमी कायमची तुमच्या पूर्वजांना दिली.
8 “‘पण तुम्ही ज्या लबाड्यांवर विश्वास ठेवत आहात, त्या लबाड्या कवडीमोलाच्या आहेत. 9 तुम्ही चोरी आणि खून कराल का? तुम्ही व्यभिचाराचे पाप कराल का? तुम्ही दुसऱ्यांवर खोटे आरोप कराल का? तुम्ही बआल देवाची पूजा कराल का? तुम्हाला माहीत नसणाऱ्या इतर दैवतांना अनुसराल का? 10 तुम्ही ही अशी पापे केलीत तर तुम्ही माझ्या नावाच्या या घरात माझ्यासमोर उभे राहू शकाल असे तुम्हाला वाटते का? अशा भयंकर गोष्टी करुन तुम्ही माझ्यासमोर उभे राहून म्हणू शकाल का “आम्ही सुरक्षित आहोत?” 11 हे मंदिर माझ्या नावाचे आहे. तुमच्या दृष्टीने हे मंदिर म्हणजे दुसरे काही नसून लुटांरुनी लपण्याची जागा आहे का? मी तुमच्यावर नजर ठेवून आहे.’” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
12 “‘यहूदातील लोकांनो, आता तुम्ही शीलो गावात जा. माझ्या नावाचे पहिले घर मी जेथे बांधले, तेथे जा. इस्राएलमधील लोकांनीसुध्दा दुष्कृत्ये केली. त्याबद्दल मी काय केले, ते जाऊन पाहा. [b] 13 इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही ही सर्व दुष्कृत्ये करीत होता. हा परमेश्वराचा संदेश आहे! मी पुन्हा पुन्हा तुमच्याशी बोललो, पण तुम्ही माझे ऐकण्यास नकार दिला. मी तुम्हाला बोलाविले, पण तुम्ही ओ दिली नाही. 14 म्हणून, ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता व जे मी तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिले ते यरुशलेममधील माझ्या नावाचे घर मी नष्ट करीन. शिलोतील मंदिराप्रमाणे मी ह्या मंदिराचा नाश करीन. 15 एफ्राईममधील तुमच्या भावांना मी माझ्यापासून जसे दूर फेकले, तसे मी तुम्हाला फेकीन.’
16 “यिर्मया, तुला सांगतो, यहूदाच्या लोकांसाठी प्रार्थना करु नकोस. त्यांच्यासाठी याचना व आळवणी करु नकोस. त्यांच्या मदतीकरिता मला विनवू नकोस. तू त्यांच्याकरिता केलेली प्रार्थना मी ऐकणार नाही. 17 ते लोक यहूदांच्या गावांतून काय करीत आहेत, हे तू पाहतोस, हे मला माहीत आहे. यरुशलेमच्या रस्त्यावर ते काय करीत आहेत हे तुला दिसू शकते. 18 यहूदातील लोक काय करीत आहेत ते पाहा. मुले लाकडे गोळा करतात. वडील त्याचा उपयोग सरपण म्हणून करतात. ते विस्तव पेटवितात. बायका स्वर्गातील राणीला अर्पण करण्यासाठी भाकर तयार करतात. यहूदातील हे लोक इतर दैवतांची पूजा करताना दैवतांना अर्पण करण्यासाठी म्हणून पेय ओततात. ते मला संताप आणण्यासाठी हे करतात. 19 पण यहूदातील लोक खरोखर ज्याला दुखवीत आहेत, तो मी नाही.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “ते फक्त स्वतःला दुखवीत आहेत. ते स्वतःलाच लज्जित करीत आहेत.”
20 म्हणून परमेश्वर असे म्हणतो, “मी ह्या जागेवर माझा राग काढीन. मी माणसांना, प्राण्यांना, रानातील झाडांना आणि पिकांना शिक्षा करीन. माझा राग तप्त अग्नीप्रमाणे असेल. कोणीही तो विझवू शकणार नाही.”
परमेश्वराला बळींपेक्षा आज्ञापालन हवे आहे
21 सर्वशक्तिमान परमेश्वरा, इस्राएलचा देव म्हणतो, “जा आणि तुम्हाला हवी तितकी होमार्पणे करा. तुम्हाला पाहिजे तितके यज्ञ द्या. त्या यज्ञ दिलेल्या पशूंचे मांस तुम्हीच खा. 22 मी तुमच्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले. मी त्यांच्याशी बोललो. पण अर्पण करण्याच्या गोष्टींबद्दल व बळींबद्दल मी त्यांना आज्ञा दिली नाही. 23 मी त्यांना फक्त पुढील आज्ञा दिली. ‘माझी आज्ञा पाळा मग मी तुमचा देव होईन व तुम्ही माझी माणसे व्हाल. मी आज्ञा करीन ते करा म्हणजे तुमचे भले होईल.’
24 “पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. ते दुराग्रही होते आणि त्यांना पाहिजे त्याच गोष्टी त्यांनी केल्या. ते सज्जन झाले नाहीत. उलट जास्तच दुष्ट झाले. पुढे येण्याऐवजी ते मागे गेले. 25 तुमच्या पूर्वजांनी मिसर सोडला त्या दिवसापासून आजपावेतो मी माझे सेवक तुमच्याकडे पाठविले आहेत. माझे सेवक संदेष्टे आहेत. मी पुन्हा पुन्हा त्यांना तुमच्याकडे पाठविले. 26 पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. ते खूप दुराग्रही होते. त्यांनी त्यांच्या वडिलांपेक्षा वाईट कृत्ये केली.
27 “यिर्मया, यहूदाच्या लोकांना तू ह्या सर्व गोष्टी सांग पण ते तुझे ऐकणार नाहीत. तू त्यांना बोलाविलेस तरी ते तुला ओ देणार नाहीत. 28 म्हणून तू त्यांना पुढील गोष्टी सांगितल्या पाहिजेस. ह्या राष्ट्रांने परमेश्वराच्या म्हणजेच त्यांच्या देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्या राष्ट्रांतील लोकांनी देवाची शिकवण ऐकली नाही. त्यांना खरी शिकवण माहीत नाही.
संहाराची दरी
29 “यिर्मया, तुझे केस कापून दूर फेकून दे. [c] उजाड डोंगरमाथ्यावर जा आणि रड. का? परमेश्वराने माणसांच्या ह्या पिढीला नाकारले आहे. परमेश्वराने ह्या लोकांकडे पाठ फिरविली आहे. रागाच्या भरात तो त्यांना शिक्षा करील. 30 हे असे कर कारण यहूदाच्या लोकांना पापे करताना मी पाहिले आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “त्यांनी त्यांच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत. मी त्या मूर्तीचा तिरस्कार करतो. माझ्या नावाच्या मंदिरात त्यांनी त्या मूर्ती स्थापिल्या आहेत. त्यांनी माझे घर ‘अपवित्र’ केले आहे. 31 यहूदाच्या लोकांनी बेन हिन्नोमच्या दरीत तोफेतची उच्चस्थाने बांधली आहेत. त्या ठिकाणी लोक स्वतःच्या मुलामुलींना ठार मारतात आणि दैवताला अर्पण करण्यासाठी म्हणून जाळतात. अशी आज्ञा मी कधीही दिलेली नाही. असे काही माझ्या मनातही कधी आलेले नाही. 32 म्हणून मी तुम्हाला ताकीद देतो. असे दिवस येत आहेत.” हा परमेश्वराचा संदेश आहे, “लोक ह्या जागेला पुन्हा कधीही तोफेत वा बेन हिन्नोमची दरी असे म्हणणार नाहीत, तर तिला ते संहाराची दरी म्हणतील. असे नाव देण्याचे कारण हेच की आणखी एका मृतालाही पुरण्यास जागा राहणार नाही इतकी वेळ येईपर्यंत ते तोफेतमध्ये मृतांना पुरतील. 33 मग बाकी मृत शरीरे उघडीच जमिनीवर पडतील आणि गिधाडांचे भक्ष्य होतील. वन्य पशू ती शरीरे खातील. त्या गिधाडांना अथवा वन्य पशूंना हाकलायला तेथे कोणीही जिवंत राहणार नाही. 34 यहूदाच्या गावांतील व यरुशलेमच्या रस्त्यांवरील उल्हासाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. यहूदात किंवा यरुशलेममध्ये पुन्हा कधीही वधू वरांचा शब्द उमटणार नाही. ती भूमी ओसाड वाळवंट होईल.”
येशू यरुशलेममध्ये राजासारखा प्रवेश करतो(A)
21 येशू व त्याचे शिष्य यरुशलेमजवळ आले असता ते जैतूनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवर बेथफगे या जागी थांबले. येशूने त्याच्या दोन शिष्यांना 2 असे सांगून पाठविले की, “तुमच्या समोर असलेल्या गावात जा. तुम्ही गावात शिराल तेव्हा एक गाढवी बांधून ठेवलेली व तिच्या जवळ एक शिंगरु असलेले तुम्हांला आढळेल. ती दोन्ही गाढवे सोडून माझ्याकडे घेऊन या. 3 जर कोणी तुम्हांला विचारले की, ही गाढवे कशासाठी नेत आहात तर त्याला सांगा की, ‘येशूला यांची गरज आहे. तो ती लगेच माझ्याकडे पाठवील.’”
4 हे यासाठी घडले की संदेष्ट्यांपैकी एक जण जे बोलला होता ते पूर्ण व्हावे:
5 “सोयोनेच्या कन्येला सांग, पाहा,
‘तुझा राजा तुझ्याकडे येत आहे!
तो लीन आहे आणि नम्र होऊन गाढवावर बसून येत आहे,
होय शिंगरावर, कष्ट करणाऱ्या प्राण्याच्या शिंगरावर.’” (B)
6 त्याचे शिष्य गेले आणि जसे येशूने सांगितले होते तसे त्यांनी केले. 7 शिष्यांनी गाढवी व शिंगरू येशूकडे आणले. त्या गाढवावर त्यांनी आपले अंगरखे घातले आणि येशू त्यावर बसला. 8 पुष्कळ लोकांनी आपले अंगरखे येशूसाठी वाटेवर अंथरले. दुसऱ्या काही लोकांनी झाडांच्या फांद्या तोडल्या आणि त्या रस्त्यावर पसरल्या. 9 काही लोक येशूच्या पुढे चालू लागले. काही लोक येशूच्या मागून चालू लागले. ते लोक मोठ्याने जयघोष करु लागले,
स्वर्गीय देवाला होसान्ना!”
10 जेव्हा येशूने यरूशलेमेमध्ये प्रवेश केला तेव्हा संपूर्ण शहर ढवळून निघाले व लोक विचारत होते, “हा कोण आहे?”
11 जमाव उत्तर देत होता, “हा येशू संदेष्टा आहे, तो गालील प्रांतातील नासरेथचा आहे.”
येशू मंदिरात जातो(D)
12 मग येशूने मंदिराच्या आवारात प्रवेश केला तेव्हा तेथे जे लोक विक्री करीत होते व खरेदी करीत होते त्यांची मेजे त्याने उलथून टाकली आणि जे लोक कबूतरे विकत होते त्यांची बसण्याची बाके उलथून टाकली. 13 येशू त्यांना म्हणाला, “पवित्र शास्त्रात असे म्हटले आहे, ‘माझे घर प्रार्थनेचे घर म्हटले जाईल. [b] पण तुम्ही त्याला लुटारुंची गुहा केले आहे.’” [c]
14 काही आंधळे आणि पांगळे लोक मंदिरात येशूकडे आले. येशूने त्यांना बरे केले. 15 जेव्हा मुख्य याजक व नियमशास्त्राच्या शिक्षकांनी, येशूने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी आणि मंदिराच्या आवारात लहान मुलांना, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना.” अशी घोषाणा देताना पाहिले, तेव्हा या सर्व गोष्टींमुळे त्यांना राग आला.
16 त्यांनी त्याला विचारले, “ही मुले काय म्हणत आहे हे तुम्ही ऐकता ना?”
येशूने त्यांना उत्तर दिले, “होय, पवित्र शास्त्रात काय लिहिले आहे ते तुम्ही ऐकले नाही का? ‘तू बालके व तान्हुली यांना स्तुती करायला शिकविले आहेस.’h
17 नंतर येशू तेथून निघाला व बेथानीला गेला. तेथे तो रात्रभर राहिला.
येशू विश्वासाचे सामर्थ्य दर्शवितो(E)
18 दुसऱ्या दिवशी पहाटे तो यरूशलेमकडे पुन्हा येत असत त्याला भूक लागली. 19 रस्त्याच्या कडेला त्याला अंजिराचे एक झाड दिसले. अंजिर खायला मिळेल या आशेने तो झाडाजळ गेला. पण झाडावर त्याला एकही अंजिर दिसले नाही. त्याला फक्त पाने होती. येशू त्या झाडाला म्हणाला, “यापुढे तुला कधीही फळ न येवो!” आणि ते झाड लगेच वाळून गेले आणि मेले.
20 शिष्यांनी हे पाहिले, तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, “हे अंजिराचे झाड इतक्या लवकर वाळून कसे गेले आणि मेले?”
21 येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, जर तुम्हांला विश्वास असेल, आणि जर तुम्ही संशय धरला नाही तर मी जे अंजिराच्या झाडाबाबतीत केले तेच नव्हे तर या डोंगराला उठून समुद्रात पड असे म्हणालात तरी ते घडेल. 22 जर तुमचा विश्वास असेल तर जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते तुम्हांला मिळेल.”
यहूदी पुढारी येशूच्या अधिकाराविषयी शंका घेतात(F)
23 येशू मंदिरात गेला, येशू तेथे शिक्षण देत असताना मुख्य याजक व वडीलजन येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?”
24 येशू म्हणाला, “मी सुद्धा तुम्हांला एक प्रश्न विचारतो. जर तुम्ही मला उत्तर दिले तर मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मी तुम्हाला सांगेन. 25 तुम्ही मला सांगा, योहान लोकांना बाप्तिस्मा देत असे. तेव्हा त्याला तो देण्याचा अधिकार कोठून आला- देवाकडून की मनुष्यांकडून?”
येशूच्या या प्रश्नावर ते चर्चा करू लागले. ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा देवाकडून होता असे म्हणावे तर येशू म्हणले, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ 26 पण जर तो मनुष्यांकडून होता असे आपण म्हणालो तर सर्व लोक आपल्यावर रागावतील. आपल्याला लोकांची भीति आहे. कारण योहान हा एक संदेष्टा होता असे ते सर्व जण मानतात.”
27 म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, “योहानाचा अधिकार कोठून होता हे आम्हांला माहीत नाही.”
तेव्हा येशू म्हणाला, “मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हांला सांगणार नाही.
येशू दोन पुत्रांचा दाखला सांगतो
28 “याविषयी तुम्हांला काय वाटते ते मला सांगा. एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मनुष्य आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू माझ्या द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर.’
29 “मुलाने उत्तर दिले, ‘मी जाणार नाही.’ परंतु नंतर त्या मुलाने जायचे ठरविले व तो गेला.
30 “नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हणाले, ‘माझ्या मुला, आज तू जाऊन माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम कर.’ त्या मुलाने उत्तर दिले, ‘होय बाबा, मी जातो.’ पण तो गेला नाही.
31 “त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडीलांची आज्ञा पाळली?”
ते म्हणाले, “पहिल्या मुलाने.”
येशू त्यांना म्हणाला, “मी खरे सांगतो, जकातदार व वेश्या हे वाईट लोक आहेत असे तुम्हांला वाटते, पण ते तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील. 32 जीवनाचा खरा रस्ता कोणता हे तुम्हांला दाखवावे म्हणून योहान आला आणि तुम्ही योहानाला मानले नाही. जकातदार व वेश्या यांनी योहानावर विश्वास ठेवला हे तुम्ही पाहिले पण तरी देखील तुम्ही आपले मन बदलण्यास आणि योहानावर विश्वास ठेवण्यास तयार झाला नाही.
देव आपला पुत्र पाठवितो(G)
33 “ही बोधकथा ऐका: एक मनुष्य होता, त्याचे शेत होते. त्याने आपल्या शेतात द्राक्षे लावली. शेताच्या भोवती त्याने एक भिंत बांधली आणि द्राक्षे कुस्करून रस गाळण्याकरिता खड्डा करून एक घाणा तयार केला. आणि टेहळाणी करण्यासाठी एक मनोरा (माळा) बांधला. मग त्याने आपला मळा काही शेतकऱ्यांना करायला खंडाने दिला. मग तो परत गेला. 34 जेव्हा द्राक्षे तोडणीचा हंगाम जवळ आला, तेव्हा त्या मनुष्याने आपला वाटा आणण्याकरिता काही नोकर खंडकरी शेतकऱ्याकडे पाठविले.
35 “परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाला मार दिला तर दुसऱ्या नोकराला जिवे मारले. नंतर तिसऱ्याला दगडमार करून ठार केले. 36 मग शेतकऱ्यांकडे त्या मनुष्याने आणखी एकदा नोकर पाठविले. पहिल्यापेक्षा त्याने जास्त नोकर पाठविले पण त्या शेतकऱ्यांनी त्यांना तशीच वागणूक दिली. 37 नंतर, त्याने त्याच्या स्वतःच्या मुलाला त्यांच्याकडे पाठविले, तो म्हणाला, ‘निश्चितच ते माझ्या मुलाचा मान राखतील.’
38 “पण जेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला पाहिले तेव्हा ते एकमेकास म्हणू लागले, ‘हा तर मालकाचा मुलगा आहे. तो वारस आहे. चला आपण त्याला ठार करू व त्याचे वतन घेऊ.’ 39 त्यांनी त्याला धरले व मळ्याच्या बाहेर फेकले व त्याला ठार मारले.
40 “मग द्राक्षमळ्याचा मालक परत येईल तेव्हा या शेतकऱ्यांचे काय करील?” 41 यहूदी मुख्य याजक आणि पुढारी म्हणाले, “तो त्या लोकांना खात्रीने मरणदंड देईल. कारण ते दुष्ट होते. नंतर तो आपला मळा दुसऱ्यास खंडाने देईल. हंगामाच्या दिवसात जे त्याच्या पिकाची वाटणी देतील, अशांना तो ते देईल.”
42 येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही पवित्र शास्त्रात वाचले असलेच की.
‘बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला
दगड कोनशिला झाला आहे हे
प्रभूने केले आणि
आमच्यासाठी हे अदभुत आहे.’ (H)
43 “म्हणून मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल. देवाला आपल्या राज्यात पाहिजेत अशा गोष्टी जे लोक करतील, त्यांना ते देण्यात येईल. 44 जो कोणी या दगडावर पडेल, त्याचे तुकडे तुकडे होतील आणि जर हा दगड एखाद्या मनुष्यावर पडेल तर त्या मनुष्याचा चक्काचूर होईल.”
45 येशूने सांगितलेल्या या बोधकथा मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी ऐकल्या. येशू त्यांच्याविषयी बोलत आहे हे त्यांनी ओळखले. 46 त्यांना येशूला अटक करायचे होते. पण त्यांना लोकांचे भय वाटत होते, कारण लोक येशूला संदेष्टा मानीत होते.
2006 by World Bible Translation Center