M’Cheyne Bible Reading Plan
5 तेव्हा इस्राएल लोक नदी ओलांडून येईपर्यंत परमेश्वराने यार्देनचे पात्र कोरडे ठेवले हि हकीकत यार्देनच्या पश्चिमेकडील अमोऱ्यांच्या सर्व राजांनी तसेच भूमध्य समुद्राजवळील सर्व कनानी राजांनी ऐकली. आणि भीतीने त्यांचा थरकाप उडाला. त्यानंतर इस्राएल लोकांचा सामना करण्याचे धैर्य त्यांच्यात उरले नाही.
इस्राएल लोकांची सुंता
2 यावेळी परमेश्वराने यहोशवाला सांगितले, “गारेच्या दगडाच्या सुऱ्या करून इस्राएल लोकांची सुंता कर.”
3 तेव्हा यहोशवाने गारेच्या सुऱ्या केल्या आणि गिबअथहा-अरालोथ येथे इस्राएल लोकांची सुंता केली.
4-7 यहोशवाने त्यांची सुंता करण्याचे कारण असे; इस्राएल लोकांनी मिसर सोडले तेव्हा सर्व लढवय्या पुरूषांची सुंता झालेली होती. वाळवंटात असताना यापैकी बऱ्याच जणांनी परमेश्वराचे ऐकले नाही. तेव्हा धांन्याने संपन्न असा हा देश या लोकांना पाहायला मिळणार नाही असे परमेश्वराने शपथपूर्वक सांगितले हा देश आपल्याला देण्याचे परमेश्वराने आपल्या पूर्वजांना वचन दिले होते. पण या लोकांमुळे परमेश्वराने सर्वांना या वाळवंटात चाळीस वर्षे रखडवले. या काळात ही माणसे मरून जावीत म्हणूव अशा प्रकारे त्या लढण्यास पात्र अशा माणसांचा त्या काळात मृत्यू झाला आणि त्यांच्या मुलांनी त्यांची जागा घेतली. पण त्या प्रवासात, वाळवंटात जन्मलेल्या मुलांपैकी कोणाचीच सुंता झाली नव्हती म्हणून यहोशवाने हे काम केले.
8 यहोशवाने सर्वांची सुंता केल्यावर जखम भरून येईपर्यंत सर्वजण तेथेच राहिले.
कनानमधील पहिला वल्हांडणाचा सण
9 तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “तुम्ही मिसरमध्ये गुलाम होतात. आणि या गोष्टीची तुम्हाला लाज वाटत असे. पण आज मी हा कलंक धुवून काढला आहे.” म्हणून यहोशवाने त्या जागेचे नामकरण “गिलगाल” असे केले. आजही गिलगाल म्हणूनच तो भाग ओळखला जातो.
10 यरीहोच्या पठारावर गिलगाल येथे मुक्काम असताना इस्राएल लोकांनी वल्हांडणाचा सण साजरा केला. ती त्या महिन्याची चतुर्दशीची संध्याकाळ होती. 11 वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी तेथे त्यांनी पिकलेल्या धान्याचा हुरडा खाल्ला. तसेच बेखमीर भाकर त्यांनी खाल्ली. 12 दुसऱ्या दिवसापासून स्वर्गातील खास अन्न म्हणजेच मान्ना येणे बंद झाले. कनानातील भूमीत पिकलेले अन्न लोकांनी खाल्ल्यानंतर हे झाले त्यावेळेपासून इस्राएलांना स्वर्गातील खास अन्न मिळाले नाही.
13 यरीहोजवळ असताना यहोशवाने समोर पाहिले तर एक माणूस पुढे उभा असलेला त्याला दिसला. त्या माणसाच्या हातात तलवार होती. यहोशवाने पुढे होऊन त्याला विचारले, “तू आमच्या बाजूचा आहेस की शत्रूच्या गोटातील?”
14 त्यावर तो उत्तरला, “मी तुमचा शत्रू नव्हे. परमेश्वराच्या सैन्याचा सेनापती या नात्याने नुकताच येथे तुझ्यासमोर आलो आहे.”
यावर यहोशवाने त्याला जमिनीवर डोके टेकवून आदरपूर्वक अभिवादन केले आणि विचारले, “स्वामीची काय आज्ञा आहे? मी आपला सेवक आहे.”
15 परमेश्वराच्या सैन्याचा सेनापती म्हणाला, “तुझी पादत्राणे काढ कारण जेथे तू आत्ता उभा आहेस ती जागा पवित्र आहे.” यहोशवाने त्याचे ऐकले.
6 यरीहो शहराच्या वेशी बंद होत्या. इस्राएल लोक यरीहो जवळआल्यामुळे नगरातील लोक घाबरले होते. कोणी नगराच्या बाहेर पडत नव्हते की आत येत नव्हते.
2 तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “तुमच्या हातून मी यरीहो शहराचा पराभव करवीन. या शहराचा राजा आणि सर्व योध्दे याचा तुम्ही पराभव कराल. 3 रोज एकदा सर्व सैन्यासह शहराभोवती फेऱ्या घाला. असे सहा दिवस करा. 4 सात याजकांनी मेंढ्यांच्या शिंगापासून केलेली रणशिंगे घेऊन पवित्र करार कोशापुढे चालत जायला सांग. सातव्या दिवशी शहराभोवती सात फेऱ्या घाला. सातव्या दिवशी याजकांना रणशिंगे फुंकीत फेरी घालायला सांग. 5 याजक रणशिंगांचा एकच कर्णकटू ध्वनी करतील तेव्हा तो ध्वनी ऐकताच लोकांनाही मोठ्याने आरोळ्या मारायला सांगावे. तसे केल्याने शहराची तटबंदी कोसळून पडेल आणि लोक सरळ आत घुसतील.”
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र.
132 परमेश्वरा, दावीदाला किती त्रास झाला त्याची आठवण ठेव.
2 दावीदाने परमेश्वराला वचन दिले.
दावीदाने याकोबाच्या सर्वशक्तिमान देवाला खास वचन दिले.
3 दावीद म्हणाला “मी माझ्या घरात जाणार नाही.
मी माझ्या अंथरुणावर झोपणार नाही.
मी झोपणार नाही.
4 माझ्या डोळ्यांना विश्रांती घेऊ देणार नाही.
5 मी या पैकी कुठलीही गोष्टी, जो पर्यंत परमेश्वरासाठी,
याकोबाच्या सर्वशक्तिमान देवासाठी, घर सापडत नाही तो पर्यंत करणार नाही.”
6 आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले.
आम्हाला कराराची पेटी किरिआथ येआरिम मध्ये सापडली.
7 आपण पवित्र तंबूत जाऊ.
या देव ज्या पादासनावर आपले पाय विसाव्यासाठी ठेवतो त्या पादासनाजवळ आपण प्रार्थना करु या.
8 परमेश्वरा, तुझ्या विश्रांतीस्थानावरुन
तुझ्या शक्तिमान कोशासह उठ.
9 परमेश्वरा, तुझे याजक चांगुलपणा ल्याले आहेत.
तुझे भक्त खूप आनंदी आहेत.
10 तुझा सेवक दावीद याच्या भल्यासाठी,
निवडलेल्या राजाला नकार देऊ नकोस.
11 परमेश्वराने दावीदाला वचन दिले.
परमेश्वराने दावीदाशी प्रामाणिक राहाण्याचे वचन दिले.
राजे दावीदाच्या कुटुंबातूनच येतील असे वचन परमेश्वराने दिले.
12 परमेश्वर म्हणाला, “दावीद, जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला आणि
मी त्यांना शिकवलेले नियम पाळले तर तुझ्या कुटुंबातील कुणीतरी नेहमी राजा होईल.”
13 परमेश्वराने त्याच्या मंदिरासाठी सियोनपर्वत निवडला.
त्याच्या वस्ती साठी त्याला ती जागा पाहिजे होती.
14 परमेश्वर म्हणाला, “ही जागा सदैव माझी राहील,
मी माझ्यासाठी ही जागा निवडली. मी नेहमी इथे राहीन.
15 मी या शहराला भरपून अन्न मिळो असा आशीर्वाद देईन.
गरीब लोकांना देखील भरपूर खायला मिळेल.
16 मी याजकांना तारणाचे वस्त्र लेववीन.
आणि माझे भक्त इथे खूप आनंदी होतील.
17 मी या जागेवर दावीदाला बलवान बनवीन.
मी माझ्या निवडलेल्या राजाला दिवा देईन.
18 मी दावीदाच्या शत्रूंना लाजेने झाकून टाकीन
परंतु मी दावीदाचे राज्य वाढेल असे करीन.”
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे दावीदाचे स्तोत्र.
133 जेव्हा देवाचे लोक शांततेने एकत्र नांदतात,
तेव्हा ते खरोखरच खूप चांगले आणि आल्हाददायक असते.
2 ते गोड वास असलेल्या, याजकाच्या डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे,
अहरोनाच्या दाढीतून ओघळणाऱ्या तेलासारखे,
अहरोनाच्या खासकपड्यातून ओघळणाऱ्या तेलासारखे वाटते.
3 हर्मोन पर्वतावरुन सियोनवर पडणाऱ्या हळूवार पावसासारखे वाटते.
सियोन पर्वतावरच परमेश्वराने त्याचे आशीर्वाद, त्याचे शाश्वत जीवनाचे आशीर्वाद दिले.
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र.
134 परमेश्वराच्या सर्व सेवकांनो, त्याची स्तुती करा.
तुम्ही सेवकांनी मंदिरात रात्रभर सेवा केली.
2 सेवकांनो, तुमचे बाहू उभारा
आणि परमेश्वराचे स्तोत्र गा.
3 आणि परमेश्वर तुम्हाला सियोनवरुन आशीर्वाद देवो.
परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली.
सर्व लोकांना देवाचे ज्ञान होईल
65 परमेश्वर म्हणतो, “माझ्याकडे सल्ला मागण्याकरिता न आलेल्या लोकांनाही मी मदत केली. जे मला शोधत नव्हते, त्यांनाही मी सापडलो. माझे नाव धारण न करणाऱ्या राष्ट्रांबरोबर मी बोललो. मी म्हणालो, ‘मी येथे आहे! मी येथे आहे!’
2 “माझ्या विरूध्द् गेलेल्या लोकांना स्वीकारायच्या तयारीत मी उभा राहिलो. ते माझ्याकडे येतील म्हणून मी त्यांची वाट पाहत होतो. पण ते त्यांच्या वाईट मार्गाप्रमाणेच जगत राहिले. त्यांच्या मनांत आले ते त्यांनी केले. 3 ते लोक माझ्यासमोर असे वागून मला राग आणतात. ते त्यांच्या खास बागांत होमार्पण अर्पण करतात आणि धूप जाळतात. 4 ते थडग्यांजवळ बसून मृतांकडून संदेश येण्याची वाट पाहतात? एवढेच नाही तर, ते मृत शरीरांजवळ राहतात. ते डुकराचे मांस खातात. त्यांचे काटे आणि सुऱ्या कुजलेल्या मांसाने माखून घाण झाल्या आहेत.
5 “पण हे लोक दुसऱ्या लोकांना सांगतात, ‘माझ्याजवळ येऊ नकोस. मी तुला शुध्द् केल्याशिवाय मला शिवू नकोस.’ ते लोक माझ्या डोळ्यांत जाणाऱ्या धुराप्रमाणे आहेत. त्यांचा अग्नी सतत जळत असतो.”
इस्राएलला शिक्षा झालीच पाहिजे
6 “हे बघा, हा हिशेब चुकता केलाच पाहिजे. हा हिशेब, तुम्ही पापे करून अपराध केल्याचे दाखवितो. हा हिशेब चुकता केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि तुम्हाला शिक्षा करून मी हा हिशेब चुकता करीन.
7 “तुमची आणि तुमच्या वडिलांची पापे सारखीच आहेत.” परमेश्वर म्हणतो, “त्यांनी डोंगरावर धूप जाळून ही पापे केली. त्या टेकड्यांवर त्यांनी माझी अप्रतिष्ठा केली म्हणून मी त्यांना प्रथम शिक्षा केली. त्यांना मिळायला हवी होती तीच शिक्षा मी त्यांना दिली.”
देव इस्राएलचा संपूर्ण नाश करणार नाही
8 परमेश्वर म्हणतो, “द्राक्षांत जेव्हा नवा रस भरतो, तेव्हा लोक तो पिळून काढून घेतात, पण ते द्राक्षांचा संपूर्ण नाश करीत नाहीत. कारण ती द्राक्षे अजून उपयोगात येऊ शकतात. मी माझ्या सेवकांच्या बाबतीत असेच करीन. मी त्यांना संपूर्णपणे नष्ट करणार नाही. 9 मी याकोबच्या (इस्राएलच्या) काही लोकांना ठेवीन. यहूदातील काही लोकांना माझा डोंगर मिळेल. माझे सेवक तेथे राहतील. तेथे राहण्यासाठी मी लोकांची निवड करीन. 10 मग शारोन दरी मेंढ्यांचे चरण्याचे कुरण होईल. अखोरची दरी गुरांचे विसाव्याचे ठिकाण होईल. ह्या सर्व गोष्टी, माझ्या लोकांसाठी मला शोधणाऱ्या लोकांसाठी होतील.
11 “पण तुम्ही परमेश्वराचा त्याग केला म्हणून तुम्हाला शिक्षा होईल. माझ्या पवित्र डोंगराला तुम्ही विसरला. तुम्ही गादाची पूजा करायला सुरवात केली. तुम्ही मनीवर खोट्या देवावर विसंबता. 12 पण मी तुमचे भविष्य ठरवितो. आणि मी तुम्हाला तलवारीने मारायचे ठरविले आहे. तुम्ही सर्व मारले जाल का? कारण मी तुम्हाला बोलाविले आणि तुम्ही मला ओ द्यायचे नाकारले. मी तुमच्याशी बोललो पण तुम्ही माझे ऐकले नाही. मी ज्यांना पापे म्हणतो, त्या गोष्टी तुम्ही केल्या. मला आवडत नसलेल्या गोष्टी करायचे तुम्ही ठरविले.”
13 तेव्हा, परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला,
“माझ्या सेवकांना खायला मिळेल,
पण तुम्ही पापी भुकेले राहाल.
माझ्या सेवकांना पाणी मिळेल,
पण तुम्ही तहानलेले राहाल.
माझे सेवक सुखी होतील,
पण तुम्ही लज्जित व्हाल.
14 माझ्या सेवकांच्या हृदयांत चांगुलपणा असल्याने ते सुखी होतील.
पण तुम्ही दुष्ट प्रवृत्तीचे लोक रडाल,
कारण तुमच्या हृदयांत वेदना असतील, तुमचा तेजोभंग होईल,
आणि तुम्ही खूप दु:खी व्हाल.
15 माझ्या सेवकांना तुमची नावे शिव्यांसारखी वाटतील.”
परमेश्वर, माझा प्रभू, तुम्हाला ठार मारील तो
त्याच्या सेवकांना मात्र नव्या नावाने बोलावील.
16 “आता लोक भूमीचे आशीर्वाद मागतात.
पण भविष्यात ते खऱ्या देवाचे आशीर्वाद मागतील.
लोक आता शपथ घेताना भूमीच्या बळावर विश्वास टाकतात.
पण पुढील काळात ते खऱ्या देवावर विश्वास ठेवतील का?
कारण पूर्वीचे सर्व त्रास विसरले जातील.
माझ्या लोकांना पुन्हा कधीही त्या त्रासांची आठवण येणार नाही.”
नवीन काल येत आहे
17 “मी नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी निर्माण करीन.
लोक भूतकाळाची आठवण ठेवणार नाहीत.
त्यांना त्यातील एकही गोष्ट आठवणार नाही.
18 माझे लोक सुखी होतील.
ते अखंड आनंदात राहतील का?
मी जे निर्माण करीन त्यामुळे असे होईल.
मी यरूशेमला आनंदाने भरून टाकीन
आणि त्यांना सुखी करीन.
19 “मग यरूशलेमबरोबर मलाही आनंद होईल.
मी माझ्या लोकांबरोबर सुखी होईन.
त्या नगरीत पुन्हा कधीही आक्रोश
व दु:ख असणार नाही.
20 तेथे पुन्हा कधीही अल्पायुषी मुले जन्माला येणार नाहीत.
त्या नगरीत कोणीही माणूस अल्प वयात मरणार नाही.
आबालवृध्द् दीर्घायुषी होतील.
शंभर वर्षे जगणाऱ्याला तरूण म्हटले जाईल.
पण पापी माणूस जरी शंभर वर्षे जगला तरी त्याच्यावर खूप संकटे येतील.
21 “त्या नगरीत घर बांधणाऱ्याला त्या घरात राहायला मिळेल.
आणि द्राक्षाचा मळा लावणाऱ्याला त्या मळ्यातील द्राक्षे खायला मिळतील.
22 एकाने घर बांधायचे व त्यात दुसऱ्याने राहायचे किंवा
एकाने द्राक्ष मळा लावायचा व दुसऱ्याने
त्या मळ्यातील द्राक्षे खायची
असे तेथे पुन्हा कधीही होणार नाही.
माझे लोक वृक्षांएवढे जगतील.
मी निवडलेले लोक, त्यांनी स्वतः तयार केलेल्या गोष्टींचा, आनंद लुटतील.
23 स्त्रियांना बाळंतपणाचा त्रास कधीच होणार नाही.
बाळंतपणात काय होईल ह्याची त्यांना भिती वाटणार नाही.
परमेश्वर माझ्या सर्व लोकांना व त्यांच्या मुलांना आशीर्वाद देईल.
24 त्यांनी मागण्या आधीच त्यांना काय पाहिजे ते मला समजेल.
आणि त्यांचे मागणे पुरे होण्याआधीच मी त्यांना मदत करीन.
25 लांडगे आणि कोकरे,
सिंह आणि गुरे एकत्र जेवतील.
माझ्या पवित्र डोंगरावरील कोणाही माणसाला जमिनीवरचा साप घाबरविणार नाही.
अथवा चावणार नाही.”
परमेश्वराने ह्या सर्व गोष्टी सांगितल्या.
बी पेरणाऱ्याची बोधकथा(A)
13 त्याच दिवशी येशू घराबाहेर पडून सरोवराच्या काठी जाऊन बसला. 2 पुष्कळ लोक त्याच्याभोवती जमले, म्हणून येशू नावेत जाऊन बसला व सर्व लोकसमुदाय किनाऱ्यावर उभा राहिला. 3 तेव्हा त्याने त्यांना गोष्टीरूपाने बोध केला. तो म्हणाला,
“एक शेतकरी बी पेरायला निघाला. 4 तो पेरीत असता काही बी रस्त्यावर पडले, पक्षी आले व त्यांनी ते खाऊन टाकले. 5 काही बी खडकाळ जमिनीवर पडले. तेथे पुरेशी माती नव्हती. तेथे बी फार झपाट्याने वाढले. पण जमीन खोलवर नव्हती, 6 म्हणून जेव्हा सूर्य उगवाला तेव्हा रोपटे वाळून गेले. कारण त्याला खोलवर मुळे नव्हती. 7 काही बी काटेरी झुडपावर पडले. काटेरी झुडूप वाढले आणि त्याने रोपाची वाढ खुंटविली. 8 काही बी चांगल्या जमिनीवर पडले, ते रोप वाढले व त्याला धान्य आले. आणि कोठे शंभरपट, कोठे साठपट. कोठे तीसपट असे त्याने पीक दिले. 9 ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.”
येशूने बोधकथांचा वापर का केला(B)
10 मग शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्यांनी विचारले, “तुम्ही त्यांना गोष्टीरूपाने बोध का करता?”
11 तेव्हा त्याने उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये तुम्ही समजू शकता, पण त्यांना ते समजणार नाही. 12 कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व ते त्याला पुष्कळ होईल, परंतु ज्या कोणाकडे नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याकडून काढून घेतले जाईल. 13 म्हणून मी त्यांना गोष्टीरूपाने बोध करतो, कारण ते पाहत असताना ही त्यांना दिसत नाही आणि ऐकत असतांनाही त्यांना समजत नाही. 14 तेव्हा हे लोक दाखवून देत आहेत की, त्यांच्यासंबंधी यशयाने पूर्वी जे लिहून ठेवले ते खरे आहे. ते असे,
‘तुम्ही लक्ष द्याल,
ऐकाल पण तुम्हांला समजणार नाही,
तुम्ही पाहाल आणि निरीक्षण कराल
पण तुम्हांला काहीच दिसणार नाही.
15 कारण या लोकांचे अंतःकरण कठीण झाले आहे
त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही.
त्यांनी आपले डोळे मिटले आहेत.
यासाठी की, या लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहू नये,
आपल्या कानांनी ऐकू नये
आपल्या अंतःकरणाने समजू
नये व मागे फिरू नये, आणि मी त्यांना बरे करू नये.’ (C)
16 पण तुमचे डोळे धन्य आहेत कारण ते पाहतात, तुमचे कान धन्य आहेत कारण ते ऐकातात. 17 मी तुम्हांला खरे सांगतो, तुम्ही ज्या गोष्टी पाहत आहा त्या पाहण्यासाठी अनेक संदेष्टे व नीतिमान लोक आतुरतेने वाट पाहत होते. तरी त्यांना त्या पाहता आल्या नाहीत, आणि तुम्ही ज्या गोष्टी ऐकत आहात त्या ऐकण्याची त्यांची खूप इच्छा होती तरी त्यांनी त्या ऐकल्या नाहीत.
येशू बीयांविषयी स्पष्टीकरण करतो(D)
18 “पेरणाऱ्याच्या बोधकथेचा अर्थ काय हे समजून घ्या,
19 “कोणी राज्याची गोष्ट ऐकतो पण ती त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट (सैतान) येतो व त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते घेतो, वाटेवर पेरलेला तो हाच आहे.
20 “खडकाळ जागेवर पेरलेला तो असा आहे की, तो वचन ऐकतो व लगेच आनंदाने स्वीकारतो. 21 तरी त्याच्यामध्ये मूळ नसल्याने तो थोडा काळच टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा कोणी छळ केला, व त्रास झाला म्हणजे तो लगेच अडखळतो.
22 “आणि काटेरी झाडांमध्ये पेरलेला असा आहे की, तो वचन ऐकतो पण जगिक गोष्टीविषयीचा ओढा, संपत्तीचा मोह ही वचनाला वाढू देत नाहीत आणि तो निष्फळ होतो.
23 “चांगल्या जमिनीवर पेरलेला असा आहे की, तो वचन ऐकतो, ते समजतो व तो निश्चितपणे पीक देतो. कोणी शंभरपट, कोणी साठपट, कोणी तीसपट असे पीक देतो.”
गहू आणि निदण यांची बोधकथा
24 नंतर येशूने त्यांना दुसरी बोधकथा सांगितली. तो म्हणाला, “स्वर्गाचे राज्य हे एखाद्या मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरण्यासारखे आहे. 25 पण लोक झोपेत असता त्या मनुष्याचा शत्रू आला व गव्हामध्ये निदण पेरून गेला. 26 पण जेव्हा रोपे वाढली व दाणे आले तेव्हा निदणही दिसू लागले. 27 मग त्या माणसाचे नोकर त्याच्याकडे आले व म्हणाले, मालक आपण आपल्या शेतात चांगले बी पेरले ना? मग त्यात निदण कोठून आले?
28 “तो त्यांना म्हणाला, ‘कोणीतरी शत्रूने हे केले आहे.’
“त्याच्या नोकरांनी विचारले, ‘आम्ही जाऊन ते उपटून टाकावे अशी आपली इच्छा आहे काय?’
29 “पण तो मनुष्य म्हणाला, ‘नको तुम्ही निदण जमा करीत असताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. 30 कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की पहिल्याने निदण जमा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा. पण गहू माझ्या गोदामात साठवा.’”
येशूच्या आणखी काही बोधकथा(E)
31 मग येशूने त्यांना आणखी एक बोधकथा सांगितली. तो म्हणाला, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो एका माणसाने घेऊन आपल्या शेतात पेरला. 32 मोहरीचा दाणा सर्व दाण्यांहून लहान आहे. पण तो त्याचे झाड मात्र खूप मोठे येते. इतके की, आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यांवर राहतात.”
33 मग येशूने लोकांना आणखी एक दाखला सांगितला, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेतले व तीन मापे पिठामध्ये ठेवले तेव्हा ते सर्व पीठ फुगले.”
34 लोकांना बोध करण्यासाठी येशूने नेहमीच गोष्टींचा उपयोग केला. 35 ते यासाठी की, संदेष्ट्यांनी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की,
“गोष्टी सांगायला मी आपले तोंड उघडीन,
जगाच्या स्थापनेपासून गुप्त राहिलेल्या गोष्टी मी बोलेन.” (F)
येशू बोधकथा समजावून सांगतो
36 मग येशू लोकांना सोडून घरात गेला. त्याच्याकडे त्याचे शिष्य आले आणि म्हणाले, “शेतातील निदणाची बोधकथा आम्हांला नीट समजावून सांगा.”
37 येशूने उत्तर दिले, “शेतामध्ये चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. 38 आणि शेत हे जग आहे. चांगले बी हे देवाच्या राज्यातील मुले आहेत आणि निदण हे दुष्टाचे (सैतानाचे) मुलगे आहेत. 39 हे निदण पेरणारा शत्रू हा सैतान आहे आणि कापणी या काळाची समाप्ति आहे व कापणी करणारे देवदूत आहेत.
40 “म्हणून जसे निदण गोळा करून अग्नीत टाकतात त्याप्रमाणे या काळाच्या शेवटी होईल. 41 मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील आणि ते त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व गोष्टी आणि अन्याय करणारे यांना बाजूला काढतील. 42 आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दात खाणे चालेल. 43 तेव्हा नीतिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐका.
गुप्त ठेवी आणि मोती यांच्या बोधकथा
44 “स्वर्गाचे राज्य हे जणू काय शेतामध्ये लपवून ठेवलेल्या ठेवीसारखे आहे. एके दिवशी एका मनुष्याला ती ठेव सापडली. त्यामुळे त्या मनुष्याला खूप आनंद झाला. तो ती गुप्त ठेव पुन्हा त्याचा शेतात लपवून ठेवतो व आपले सर्व काही विकून ते शेत विकत घेतो.
45 “आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध घेणाऱ्या व्यापाऱ्यासारखे आहे, 46 एक दिवस त्याला एक अत्यंत सुंदर मोती सापडतो. तेव्हा तो जाऊन आपले सर्व काही विकतो आणि तो मोती विकत घेतो.
माशाच्या जाव्याविषयीची बोधकथा
47 “तसेच, स्वर्गाचे राज्य पाण्यात टाकलेल्या जाळ्यासारखे आहे. जाळ्यात सर्व प्रकारचे मासे सापडतात. 48 ते भरल्यावर माणसांनी ते ओढून किनाऱ्यावर आणले व बसून जे चांगले ते भांड्यात भरले व जे वाईट ते फेकून दिले. 49 या काळाच्या शेवटी असेच होईल. देवदूत येतील आणि वाईटांना नितीमान लोकांतून वेगळे करतील. 50 वाईट लोकांना अग्नीत फेकून देण्यात येईल. तेथे रडणे व दात खाणे चालेल.”
51 येशूने शिष्यांना विचारले, “तुम्हांला या सर्व गोष्टी समजल्या काय?”
तेव्हा ते म्हणाले, “होय.”
52 तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “प्रत्येक नियमशास्त्राचा शिक्षक ज्याला स्वर्गाच्या राज्याविषयी शिकविण्यात आले आहे तो घरमालकासारखा आहे. त्याच्याकडे अनेक जुन्या व नव्या गोष्टी घरातील तिजोरीत ठेवलेल्या आहेत.”
येशू आपल्या गावी जातो(G)
53 येशूने लोकांना बोध करण्याचे व गोष्टी सांगून शिकविण्याचे संपवल्यानंतर तो निघून गेला. 54 त्याने आपल्या गावी येऊन त्यांच्या सभास्थानामध्ये असे शिकविले की, ते चकित होऊन म्हणाले, “हे ज्ञान व ही सामर्थ्याची कृत्ये याला कशी आली? 55 हा त्या सुताराचा मुलगा ना? याच्या आईला मरीया म्हणतात ना? आणि याकोब व योसेफ आणि शिमोन व यहूदा याचे भाऊ आहेत ना? 56 याच्या सर्व बहिणी आपल्यात आहेत ना? मग याला या सर्व गोष्टी कशा आल्या असे ते त्याच्याविषयी गोंधळात पडले.” 57 त्यांनी त्याला मानण्याचे नाकारले. पण येशू त्यांना म्हणाला, “इतर लोक संदेष्ट्याचा सन्मान करतात. पण त्याच्या स्वतःच्या गावात किंवा घरात त्याचा सन्मान होत नाही.” 58 तेथील लोकांच्या अविश्वासामुळे त्याने तेथे जास्त चमत्कार केले नाहीत.
2006 by World Bible Translation Center