Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
अनुवाद 32

32 “हे आकाशा, ऐक मी काय म्हणतो ते.
    वसुंधरे ऐक शब्द माझ्या मुखातले.
पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाचा वर्षाव होईल.
    तो बोध असेल जमिनीवरुन खळाळणाऱ्या पाण्यासारखा.
हिरवळीवर झिमझिमणाऱ्या पावसासारखा.
    झाडाझुडुपांवर पडणाऱ्या पावसाच्या सरींसारखा.
घोषणा [a] करीन मी परमेश्वराच्या नावाची.
    तुम्हीही परमेश्वराची महती गा!

“तो आहे दुर्ग
    आणि त्याची कृती परिपूर्ण!
    कारण चोखाळतो तो उचित मार्ग!
देवच खरा आणि विश्वासू
    न्यायी आणि सरळ.
तुम्ही त्याची मुले नाहीत.
    तुमची पापे त्याला मळीन करतील.
    तुम्ही लबाड आहात.
मूर्ख आणि निर्बुद्ध जन हो,
    परमेश्वराशी असे वागता?
तो तर तुमचा पिता,
    निर्माता कर्ता आणि धर्ता तोच.

“आठवा पूर्वी काय घडले
    ते अनेक वर्षा पूर्वी काय काय झाले
ते ध्यानात आणा आपल्या बापाला विचारा, तो सांगेल.
    महाजनांना विचारा, ते सांगतील.
परात्पर देवाने लोकांची विभागणी केली, राष्ट्रा राष्ट्रांमध्ये.
    प्रत्येक राष्ट्राला स्वतंत्र भूभाग दिला.
देवाने इस्राएल सीमा आखल्या.
    देवदूतांइतकी राष्ट्रे त्याने बनविली.
परमेश्वराचा वाटा त्याचे लोक होय.
    याकोब परमेश्वराचा आहे.

10 “याकोब (इस्राएल) त्याला सापडला वाळवंटात
    भणभणत्या वाऱ्याच्या वैराण प्रदेशात.
परमेश्वराने त्याला आपल्या कवेत घेतले
    आणि डोळ्यात तेल घालून त्याला सांभाळले.
11 इस्राएलाला परमेश्वर गरुडासारखा आहे.
    गरुड पक्षीण आपल्या पिलांना उडायला शिकवताना घरट्यातून ढकलते.
त्यांच्या संरक्षणार्थ त्यांच्याबरोबर तीही उडते.
    पिले पडली झडली तर धरता यावे म्हणून पंख पसरते
आणि पंखावर बसवून त्यांना सुरक्षित जागी आणते.
    तसा परमेश्वर इस्राएलला जपतो.
12 परमेश्वरानेच इस्राएलला पुढे आणले.
    दुसरा कोणी देव मदतीला नव्हता.
13 परमेश्वराच्याच पुढाकाराने त्याने या डोंगराळ प्रदेशाचा ताबा घेतला.
    मग याकोबाने शेतात भरपूर पीक घेतले.
परमेश्वराने त्याला खडकातून मध दिला,
    त्या कठीण खडकातून त्याच्यासाठी तेलही काढले.
14 गाईम्हशींचे, शेळ्यामेंढ्याचे लोणी, आणि दूध, पुष्ट मेंढ्या व कोकरे,
    बाशानचे उत्तम प्रतीचे बकरे,
उत्कृष्ट गहू हे परमेश्वराने त्यांना दिले.
    द्राक्षाची लाल मदिराही इस्राएलांनो, तुम्ही प्यायलात.

15 “पण यशुरुन (इस्राएल) माजला आणि उन्मत्त बैलासारखा लाथा झाडू लागला.
    खाऊन पिऊन तो धष्ट पुष्ट झाला!
आणि त्याने आपल्या कर्त्या देवाचा त्याग केला!
    आपले तारण करणारा दुर्गासारखा परमेश्वर तुच्छ मानला.
16 परमेश्वराच्या या प्रजेने इतर दैवतांची पूजा करायला सुरुवात केली आणि परमेश्वराची इर्ष्या जागवली.
    मूर्ती त्याला मान्य नाहीत, तर या लोकांनी मूर्ती केल्या व परमेश्वराचा कोप ओढवला.
17 खरे देव नव्हेत अशा दैवतांना त्यांनी यज्ञार्पणे केली.
    अपरिचित दैवतांची पूजा केली.
    आपल्या पूर्वजांना पूर्वी कधी माहीत नसलेल्या दैवतांची पूजा केली.
18 आपल्या निर्माणकर्त्याचा दुर्गाचा त्यांनी त्याग केला.
    जीवनदायी परमेश्वराला ते विसरले.

19 “परमेश्वराने हे पाहिले व आपल्या प्रजेचा धिक्कार केला.
    कारण प्रजेनेच त्याला क्रुद्ध केले होते!
20 तो म्हणाला, ‘मी आता त्यांच्यापासून तोंड फिरवतो.
    त्यांचा शेवट कसा होणार आहे
    ते मला माहीत आहे.
ही माणसे बंडखोर आहेत.
    अभ्यास न करणाऱ्या मुलांप्रमाणे आहेत.
21 मूर्तीपूजा करुन यांनी माझा कोप ओढवला.
मूर्ती म्हणजे देव नव्हेत.
    क्षुल्लक मूर्ती करुन त्यांनी मला क्रुद्ध केले.
तेव्हा त्यांना मत्सर वाटेल असे मी करीन.
    जे एकसंध राष्ट्र नाही अशा लोकांमार्फत, मूढ राष्ट्राच्या योगे मी यांना इर्ष्येस पेटवीन.
22 माझा क्रोध धगधगणाऱ्या अग्नीप्रमाणे आहे.
    अधोलोकाच्या तळापर्यंत तो जाळत जातो.
पृथ्वी व तिच्यावरील वनस्पती,
    पर्वतांचे पायथे यांनाही तो भस्मसात करतो.

23 “‘मी इस्राएलांवर संकटे आणील.
    त्यांच्यावर मी माझ्या बाणांचा नेम धरीन.
24 भुकेने ते कासावीस होतील.
    भयंकर रोगराईने ते नेस्तनाबूत होतील.
वन्यपशू त्यांच्यावर सोडीन.
    विषारी साप व सरपटणारे प्राणी त्यांना दंश करतील.
25 रस्त्यावर सैन्य त्यांना मारेल
    व घरात ते भयभीत होतील.
तरुण पुरुष, स्त्रिया, लहानमुले
    व वृद्ध सर्वांना सैन्य ठार करेल.

26 “‘लोकांच्या स्मृतीतून ते पुसले जातील इतका मी
    या इस्राएलांचा नाश केला असता.
27 पण त्यांचा शत्रू काय म्हणेल हे
    मला माहीत आहे.
आम्ही आमच्या सामर्थ्याने जिंकलो.
    “इस्राएलांचा नाश काही परमेश्वरामुळे झाला नाही,
    अशी ते बढाई मारतील.”’

28 “इस्राएल राष्ट्र विचारशून्य आहे,
    त्याला समज म्हणून नाहीच.
29 ते शहाणे असते
    तर त्यांना समजले असते.
    त्यांनी पुढच्या परिणामांचा विचार केला असता.
30 एक माणूस हजारांचा पाठलाग करु शकेल काय?
    दोघेजण दहाहजारांना सळो की पळे करुन सोडू शकतील का?
परमेश्वरानेच या जमावला आपल्या
    शत्रूच्या हवाली केले तरच ते शक्य आहे.
खंद्या दुर्गासमान असणाऱ्या परमेश्वराने
    त्यांना गुलामांसारखे विकले तरच असे घडेल.
31 आपल्या शत्रूंचा ‘दुर्ग’ म्हणजे परमेश्वर आपल्या अभेद्य किल्यासारख्या परमेश्वराच्या तोडीचा नाही
    हे तेही कबूल करतात.
32 सदोम आणि गमोरा येथल्याप्रमाणे शत्रूंचे द्राक्षमळे
    आणि शेते जमिनदोस्त केली जातील.
33     त्यांची द्राक्षे कडू जहर आणि द्राक्षारस सापाच्या विषारी गरळासमान आहे.

34 “परमेश्वर म्हणतो, ‘अर्थात ही शिक्षा सध्या मी राखून ठेवली आहे.
    माझ्या भांडारात ती बंदिस्त ठेवली आहे.
35 अनवधानाने त्यांच्याहातून काही
    दुष्कृत्ये घडायची मी वाट पाहात आहे.
त्यांनी काही वावगे केले की
    त्यांचा संकटकाळ आलाच म्हणून समजा मी त्यांना शिक्षा करीन.’

36 “परमेश्वर आपल्या प्रजेची कसोटी पाहील.
    आपल्या सेवकांवर दया दाखवील.
पण गुलाम तसेच स्वतंत्र यांना तो सत्ताहीन,
    असहाय्य करुन सोडील.
37 परमेश्वर म्हणेल, ‘कोठे आहेत ते खोटे देव?
    तुम्ही आश्रयासाठी ज्याच्याकडे धाव घेतलीत तो कुठे आहे तुमचा “दुर्ग?”
38 त्या खोट्या दैवतांनी
    तुमच्या यज्ञातील लोणी तेवढे गट्ट केले,
तुम्ही अर्पण केलेल्यातील द्राक्षारस प्राशन केला.
    तेव्हा त्या दैवतांनीच उठून याव तुमच्या रक्षणाला!

39 “‘तेव्हा आता पाहा, मीच खरा आणि एकमेव देव आहे.
    अन्य कोणी नाही.
लोकांचा तारक मी
    आणि मारकही मीच,
त्यांना घायाळ करणारा
    मी आणि त्यातून बरे करणाराही मीच.
    माझ्या समर्थ हातांमधून कोणीही कोणालाही सोडवू शकत नाही!
40 आकाशाकडे बाहू उभारुन मी हे वचन देत आहे.
    मी सनातन आहे हे सत्य असेल तर या गोष्टी ही खऱ्या होतील.
41 माझी लखलखती
    तलवार परजून
मी शत्रूंना शासन करीन.
    ते याच शिक्षेला पात्र आहेत.
42 माझे शत्रू ठार होतील.
    त्यांचा पाडाव होईल ते कैद होतील.
    माझ्या बाणांची टोके त्यांच्या रक्ताने माखतील आणि माझे तलवारीचे पाते शत्रू सैन्याचा शिरच्छेद करील.’

43 “समस्त राष्ट्रांनो, देवाचा प्रजेचा जयजयकार करा.
    कारण हा देव आपल्या सेवकांच्या बाजूने उभा राहतो.
आपल्या सेवकांचा संहार करु पाहणाऱ्यांना शासन करतो.
    शत्रूला योग्य अशी सजा देतो.
    आणि आपली प्रजा आणि प्रदेश निर्मळ करतो.”

मोशे गीत शिकवतो

44 मोशेने या गीताचे शब्द सर्व इस्राएलांना ऐकू जातील असे ऐकवले. नूनचा पुत्र यहोशवाही मोशेबरोबर होता. 45 ही शिकवण देऊन झाल्यावर 46 मोशे लोकांना म्हणाला, “मी ज्या गोष्टी आज सांगतो त्या लक्षपूर्वक ऐका. आपल्या मुलाबाळांनाही या नियमशास्त्राचे काटेकोरपणे पालन करायला सांगा. 47 त्यांचे महत्व कमी लेखू नका. या आज्ञांवरच तुमचे जीवन अंवलबूंन आहे. त्यायोगेच तुम्ही आपल्याला मिळणार असलेल्या त्या यार्देन नदीपलीकडच्या प्रदेशात दीर्घकाळ वास्तव्य कराल.”

नबो पर्वतावर मोशे

48 त्याच दिवशी परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, 49 “मवाब देशात, यरीहो शहराच्या समोर अबारीम पर्वतांमध्ये जो नबो डोंगर आहे त्या डोंगरावर जा. मी इस्राएलांना जो कनान देश देणार आहे तो तू तेथून पाहू शकशील. 50 या डोंगरावर तुझे निधन होईल. तुझा भाऊ अहरोन हा जसा होर डोंगरावर मृत्यू पावल्यावर स्वजनांना मिळाला तसेच तुझे होईल. 51 कारण तुम्ही दोघांनीही माझ्याविरुद्ध पाप केले आहे. कादेश जवळच्या मरीबा झऱ्यापाशी तुम्ही होता. सीन वाळवंटातील ही गोष्ट आहे. तेथे इस्राएलांसमोर तुम्ही माझा मान राखला नाही तसेच मला पवित्र मानले नाही. 52 तेव्हा मी इस्राएलांना देणार असलेली भूमी तू पाहू शकतोस पण तुझे तेथे जाणे होणार नाही.”

स्तोत्रसंहिता 119:121-144

ऐन

121 जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच मी केले परमेश्वरा,
    ज्या लोकांना मला त्रास द्यायची इच्छा आहे त्याच्या हाती मला सोडून देऊ नको.
122 माझ्याशी चांगला वागशील असे मला वचन दे.
    परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे.
    त्या गर्विष्ठ लोकांना मला त्रास द्यायला लावू नकोस.
123 परमेश्वरा, तुझ्या मदतीची आणि
    तुझ्या चांगल्या शब्दाची वाट बघून माझे डोळे आता शिणले आहेत.
124 मी तुझा सेवक आहे.
    मला तुझे खरे प्रेम दाखव. मला तुझे नियम शिकव.
125 मी तुझा सेवक आहे,
    मला समजून घ्यायला मदत कर म्हणजे मला तुझा करार समजू शकेल.
126 परमेश्वरा, आता काही तरी करायची तुझी वेळ आली आहे.
    लोकांनी तुझे नियम मोडले आहेत.
127 परमेश्वरा, शुध्दातल्या शुध्द सोन्यापेक्षा मला
    तुझ्या आज्ञा आवडतात.
128 मी काळजी पूर्वक तुझ्या सर्व आज्ञा पाळतो. [a]
    मला खोटी शिकवण आवडत नाही.

पे

129 परमेश्वरा, तुझा करार अद्भुत आहे
    म्हणूनच मी तो पाळतो.
130 जेव्हा लोक तुझा शब्द समजून घ्याला सुरुवात करतात तेव्हा
    ते त्यांना योग्य तऱ्हेने जीवन कसे जगायचे ते सांगणाऱ्या प्रकाशासारखे असते.
    तुझे शब्द अगदी साध्या लोकांना देखील शहाणे करतात.
131 परमेश्वरा, मला खरोखरच तुझ्या आज्ञांचा अभ्यास करायचा आहे.
    मी जोर जोरात श्वासोच्छवास करणाऱ्या
    आणि अधीरतेने वाट बघणाऱ्या माणसासाखा आहे.
132 देवा, माझ्याकडे बघ आणि माझ्याशी दयाळूपणे वाग.
    जे लोक तुझ्या नावावर प्रेम करतात त्यांच्यांसाठी योग्य गोष्टी कर.
133 परमेश्वरा, कबूल केल्याप्रमाणे मला मार्गदर्शन कर.
    माझे काहीही वाईट होऊ देऊ नकोस.
134 परमेश्वरा, जे लोक मला त्रास देतात त्यांच्यापासून मला वाचव
    आणि मी तुझ्या आज्ञा पाळीन.
135 परमेश्वरा, तुझ्या सेवकाचा स्वीकार कर
    आणि मला तुझे नियम शिकव.
136 लोक तुझ्या शिकवणुकी प्रमाणे वागत नाहीत
    म्हणून मी अश्रूंच्या नद्या वाहवल्या आहेत.

त्सादे

137 परमेश्वरा, तू चांगला आहेस
    आणि तुझे नियम योग्य आहेत.
138 तू आम्हाला करारात चांगले नियम दिलेस
    त्यावर आम्ही खरोखरच विश्वास ठेवू शकतो.
139 माझ्या तीव्र भावना माझा नाश करीत आहेत.
    माझे शत्रू तुझ्या आज्ञा विसरले म्हणून मी फारच अस्वस्थ झालो आहे.
140 परमेश्वरा, आम्ही तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवू शकतो
    याबद्दलचा पुरावा आमच्याजवळ आहे आणि मला ते आवडते.
141 मी एक तरुण आहे आणि लोक मला मान देत नाहीत.
    पण मी तुझ्या आज्ञा विसरत नाही.
142 परमेश्वरा, तुझा चांगलुपणा सदैव राहो
    आणि तुझ्या शिकवणुकीवर विश्वास ठेवणे शक्य आहे.
143 माझ्यावर खूप संकटे आली आणि
    वाईट वेळाही आल्या परंतु मला तुझ्या आज्ञा आवडतात.
144 तुझा करार नेहमीच चांगला असतो.
    तो समजण्यासाठी मला मदत कर म्हणजे मी जगू शकेन.

यशया 59

पाप्यांनी आपले जीवन बदलावे

59 हे पाहा, परमेश्वराचे सामर्थ्य तुम्हाला वाचवायला पुरेसे आहे. तुम्ही त्याची मदत मागता. ते तो ऐकू शकतो. तुमच्या पापांनी देवाचे तोंड लपवले आहे. त्यामुळे तो तुमचे बोलणे ऐकत नाही. तुमचे हात घाणेरडे आहेत. ते रक्ताने माखले आहेत. तुमची बोटे अपराधांमुळे झाकली गेली आहेत. तुमची तोंडे खोटे बोलतात. तुमची जीभ वाईट गोष्टी बोलते. कोणीही दुसऱ्याबद्दल खरे सांगत नाही. लोक न्यायालयात एकमेकांविरूध्द् फिर्याद गुदरतात आणि ते दावा जिंकण्यासाठी खोट्या वादांवर विसंबतात. ते एकमेकांबद्दल खोटे सांगतात. ते संकटांनी घेरलेले आहेत. ते पापाला जन्म देतात. विषारी सर्पाच्या अंड्यातून विषारी सर्पच निघतो. तसेच ते पापाला जन्म देतात. विषारी सर्पाचे अंडे तुम्ही खाल्ले तर तुम्ही मराल आणि ते तुम्ही फोडले तर त्यातून सर्पच निघेल.

लोक खोट्या गोष्टी सांगतात-ह्या खोट्या गोष्टी कोळंयाच्या जाळ्याप्रमाणे असतात. त्यांनी बनविलेल्या जाळ्याचा उपयोग कपड्यांसाठी होऊ शकत नाही. तुम्ही तुमचे अंग त्याने झाकू शकत नाही.

काही लोक दुष्कृत्ये करतात आणि दुसऱ्यांना इजा करण्यासाठीच आपल्या हाताचा उपयोग करतात. आपल्या पायांचा उपयोग ते पापांकडे पळण्यासाठी करतात. निष्पाप लोकांना मारण्याची त्यांना घाई असते. ते दुष्ट विचार करतात. मारामारी आणि चोरी हेच त्यांच्या जगण्याचे मार्ग असतात. त्यांना शांतीचा मार्ग माहीत नसतो. त्यांच्या जीवनात अजिबात चांगुलपणा नसतो. त्यांचे मार्ग प्रामाणिक नसतात त्यांच्याप्रमाणे जीवन जगणाऱ्या कोणालाही कधीही जीवनात शांतता लाभणार नाही.

इस्राएलचे पाप संकट आणते

सगळा प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा गेला आहे.
आमच्याभोवती फक्त अंधार आहे.
    म्हणून आम्ही उजेडासाठी थांबले पाहिजे.
आम्ही तेजस्वी प्रकाशाची आशा करतो.
    पण आम्हाला फक्त अंधारच मिळाला आहे.
10 आम्ही डोळे नसलेल्याप्रमाणे आहोत.
    आंधळ्यांप्रमाणे आम्ही भिंतीपाशी धडपडतो.
रात्री अडखळून पडावे तसे आम्ही पडतो.
    दिवसासुध्दा् आम्ही पाहू शकत नाही.
    दुपारी आम्ही मेलेल्या माणसांप्रमाणे पडतो.
11 आम्ही सर्व, फार दु:खी आहोत.
    आम्ही दु:खाने पारवे व अस्वले यांच्याप्रमाणे कण्हतो.
लोक प्रामाणिक होण्याची आम्ही वाचविले जाण्याची वाट पाहत आहोत.
    पण अजून तरी कोठे प्रामाणिकपणा नाही.
आम्ही वाचविले जाण्याची वाट पहात आहोत.
    पण तारण अजून खूप दूर आहे.
12 का? कारण आम्ही देवाविरूध्द् वागून खूप खूप पापे केली.
    आपली पापे आम्ही चुकलो ते दाखवितात.
ह्या गोष्टी करून आम्ही अपराध केला हे आम्हाला माहीत आहे.
13 आम्ही पाप केले
    आणि परमेश्वराविरूध्द् गेलो.
आम्ही त्याच्यापासून दूर गेलो आम्ही त्याला सोडले.
    आम्ही देवाच्याविरूध्द् दुष्ट बेत केले.
आम्ही वाईट गोष्टींचा विचार केला
    व मनात दुष्ट बेत केले.
14 न्याय आमच्यापासून दूर गेला आहे.
    प्रामाणिकपणा दूर उभा आहे.
सत्य रस्त्यात पडले आहे
    चांगुलपणाला शहरात प्रवेश नाही.
15 सत्य गेले
    आणि सत्कृत्य करण्याचा प्रयत्न करणारे लुबाडले गेले.

परमेश्वराने पाहिले पण त्याला कोठेच चांगुलपणा सापडला नाही.
    परमेश्वराला हे आवडले नाही.
16 परमेश्वराने पाहिले पण त्याला कोणीही ठामपणे उभा
    राहून लोकांना मदत करताना दिसला नाही.
म्हणून परमेश्वराने स्वतःचे सामर्थ्य
    आणि चांगुलपणा वापरला आणि लोकांना वाचविले.
17 परमेश्वराने युध्दा्ची तयारी केली.
    त्याने चांगुलपणाचे चिलखत घातले,
तारणाचे शिरस्त्राण घातले, शिक्षेचे कपडे घातले.
    दृढ प्रेमाचा अंगरखा घातला.
18 परमेश्वर त्याच्या शत्रूवर रागावला आहे.
    म्हणून परमेश्वर त्यांना त्यांच्या लायकीप्रमाणे शिक्षा करील.
परमेश्वर त्याच्या शत्रूंवर रागावला असल्यामुळे सर्व देशांतील लोकांना तो शिक्षा करील.
    त्यांच्या पात्रतेप्रमाणे तो त्यांना शिक्षा देईल.
19 नंतर पक्ष्चिमेकडील लोक घाबरतील आणि परमेश्वराला मान देतील.
    पूर्वेकडचे लोक घाबरतील आणि देवाच्या गौरवांचा आदर करतील.
देवाने सोडलेल्या झंझावातामुळे,
    वेगाने वाहणाऱ्या नदीप्रमाणे, देव जलद गतीने येईल.
20 मग तारणारा सियोनला येईल आधी पाप केलेल्या
    पण नंतर देवाला शरण आलेल्या याकोबाच्या लोकांकडे तो येईल.

21 परमेश्वर म्हणतो, “मी त्या लोकांबरोबर एक करार करीन. मी तुमच्यात घातलेला माझा आत्मा आणि तुमच्या तोंडात घातलेले माझे शब्द कधीही तुम्हाला सोडून जाणार नाहीत, असे मी तुम्हाला वचन देतो. ते पिढ्यान् पिढ्या तुमच्याबरोबर राहतील ते आताही तुमच्याबरोबर असतील आणि चिरकाल तुमच्याबरोबर राहतील.”

मत्तय 7

इतरांचा न्याय करण्याविषयी येशूची शिकवण(A)

“तुमचा न्याय करण्यात येऊ नये म्हणून तुम्ही इतरांचा न्याय करु नका. कारण ज्या न्यायाने तुम्ही इतरांचा न्याय करता त्याच न्यायाने तुमचा न्याय केला जाईल, आणि ज्या मापाने तुम्ही माप घालता त्याच मापाने तुम्हांला परत माप घालतील.

“तू आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न घेता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस? किंवा ‘तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे’ असे तुझ्या भावाला कसे म्हणू शकतोस? कारण पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्यांदा तू आपल्या डोळ्यातील मुसळ काढ म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढायला तुला स्पष्ट दिसेल.

“जे पवित्र ते कुत्र्यांना टाकू नका, ती उलटून तुम्हांला फाडतील आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका; टाकाल तर ती त्यांना पायदळी तुडवतील.

तुमच्या सर्व गरजा देवाला सांगा(B)

“मागा म्हणजे तुम्हांला ते देण्यात येईल. शोधा आणि तुम्हांला ते सापडेल, ठोका आणि तुमच्यासाठी दार उघडले जाईल, कारण प्रत्येकजण जो मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते, आणि जो ठोकावतो, त्याच्यासाठी दार उघडले जाते.

“तुमच्यापैकी असा कोण मनुष्य आहे की, जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला दगड देईल? 10 किंवा मासा मागितला, तर त्याला साप देईल? 11 वाईट असूनही जर तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे कळते तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जे मागतात, त्यांच्या गरजा तो किती चांगल्या प्रकारे भागवील?

अति महत्त्वाचा नियम

12 “यासाठी ज्या गोष्टी लोकांनी तुमच्यासाठी कराव्या असे तुम्हांला वाटते त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी करा. कारण नियमशास्त्राच्या व संदेष्टेयांच्या शिकवणीचे सार हेच आहे.

स्वर्गाकडे जाणारा मार्ग आणि नरकाकडे जाणारा मार्ग(C)

13 “अरूंद दरवाजाने आत जा. कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रूंद आहे, व मार्ग पसरट आहे. आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. 14 पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरूंद व मार्ग अडचणीचा आहे, आणि फारच थोडयांना तो सापडतो.

लोक काय काय करतात ते पाहा(D)

15 “खोट्या संदेष्ट्याविषयी सावध असा. ते गरीब मेंढराचे रूप घेऊन तुमच्याकडे येतात. पण प्रत्यक्षात ते क्रूर लांडग्यांसारखे आहेत. 16 त्यांच्या करणीवरून तुम्ही त्यांस ओळखाल. ज्याप्रमाणे काटेरी झाडाला द्राक्षे लागत नाहीत, किंवा रिंगणीच्या झाडाला अंजिरे येत नाहीत, त्याचप्रमाणे वाइटाला चांगले फळ येत नाही. 17 प्रत्येक चांगले झाड चांगली फळे देते, पण वाईट झाड वाईट फळे देते. 18 चांगल्या झाडाला वाईट फळे येणार नाहीत, आणि वाईट झाडाला चांगली फळे येणार नाहीत. 19 जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडण्यात येते व अग्नीत टाकले जाते. 20 म्हणून अशा धोकेबाज लोकांना तुम्ही त्यांच्या फळांवरून ओळखाल.

21 “जो कोणी मला वरवर प्रभु, प्रभु म्हणतो, तो प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागेल तोच स्वर्गाच्या राज्यात जाईल. 22 त्या दिवशी मला अनेक जण म्हणतील, ‘हे प्रभु, आम्ही तुझ्या नावाने भूते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले.’ 23 तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मी तुम्हांला ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा.

शहाणा मनुष्य व मूर्ख मनुष्य(E)

24 “जो कोणी माझ्या सांगण्याप्रमाणे आचारण करतो तो शहाण्या माणसासारखा आहे, अशा सुज्ञ माणसाने आपले घर खडकावर बांधले. 25 मग जोराचा पाऊस झाला आणि पूर आला. जोराचा वारा आला. वादळात घर सापडले, पण ते पडले नाही. कारण त्याचा पाया खडकावर बांधला होता.

26 “जो कोणी माझे हे शब्द ऐकून त्याप्रमाणे आचरण करीत नाही तो कोणा एका मूर्ख माणासासारखा आहे, त्याने आपले घर वाळूवर बांधले. 27 मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला. जोराचा वारा सुटला. वादळवाऱ्यात ते घर सापडले आणि कोसळून पडले.”

28 जेव्हा ह्या बोधकथा सांगण्याचे येशूने संपविले तेव्हा लोकांचा समुदाय त्याच्या शिकवण्याने थक्क झाला. 29 कारण येशू त्यांना त्यांच्या धर्मशिक्षकांप्रमाणे नव्हे, तर अधिकारवाणीने शिकवीत होता.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center