M’Cheyne Bible Reading Plan
नवा नेता यहोशवा
31 मग मोशेने सर्व इस्राएलांना ह्या गोष्टी सांगितल्या. 2 तो म्हणाला, “मी आता एकशेवीस वर्षाचा आहे. माझ्याने आता तुमचे नेतृत्व होत नाही. शिवाय ‘यार्देन नदीपलीकडे जायचे नाही असे,’ परमेश्वरानेही मला सांगितले आहे. 3 तुमचा देव परमेश्वर हा तुम्हांला साथ देईल. तुमच्यासाठी तो इतर राष्ट्रांना पराभूत करील. त्यांच्याकडून तुम्ही त्या प्रदेशाचा ताबा घ्याल. पण परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे यहोशवा तुमचे नेतृत्व करील.
4 “अमोऱ्यांचे राजे सीहोन आणि ओग यांचा परमेश्वराने संहार केला. तसेच तो याही वेळी तुमच्यासाठी करील. 5 या राष्ट्रांचा पराभव करण्यात परमेश्वराचे तुम्हाला साहाय्य होईल. पण त्यावेळी, मी सांगितले तसे तुम्ही वागले पाहिजे. 6 शौर्य दाखवा. खंबीर पणाने वागा. त्या लोकांची भीती बाळगू नका! कारण प्रत्यक्ष तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तो तुम्हाला अंतर देणार नाही, तुमची साथ सोडणार नाही”
7 मग मोशेने यहोशवाला बोलावले. सर्वांसमक्ष त्याला सांगितले, “खंबीर राहा आणि शौर्य गाजव. या लोकांच्या पूर्वजांना परमेश्वराने जी भूमी द्यायचे कबूल केले आहे, तेथे तू त्यांना नेणार आहेस. ती काबीज करायला या इस्राएलांना तू मदत कर. 8 परमेश्वर तुमच्या सोबतीला तुमच्यापुढेच चालणार आहे. तो तुम्हाला सोडून जाणार नाही, तुम्हाला अंतर देणार नाही. तेव्हा खचून जाऊ नका आणि निर्भय व्हा.”
मोशे शिकवण लिहून काढतो
9 नंतर मोशेने सर्व नियमशास्त्र लिहून याजकांना दिले. हे याजक लेवी वंशातील होते. परमेश्वराच्या कराराचा पवित्र कोश वाहण्याचे काम त्यांचे होते. इस्राएलच्या वडिलधाऱ्या लोकांनाही मोशेने हे नियमशास्त्र दिले. 10 मग मोशे वडीलधाऱ्या लोकांशी बोलला. तो म्हणाला, “दर सात वर्षांच्या अखेरीला म्हणजेच कर्ज माफीच्या ठराविक वर्षी मंडपाच्या सणाच्या वेळी ही शिकवण तुम्ही सर्वांना वाचून दाखवा. 11 यावेळी सर्व इस्राएलांनी तुमचा देव परमेश्वर ह्याने त्याच्यासाठी निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जमावे. तेव्हा त्यांना ऐकू जाईल अशा पद्धतीने तुम्ही हे नियमशास्त्र वाचून दाखवावे. 12 पुरुष, बायका, लहान मुले, गावातील परकीय अशा सर्वांना यावेळी एकत्र आणावे. त्यांनी ही शिकवण ऐकावी, परमेश्वर देवाचा आदर करावा. शिकवणीचे जीवनात आचरण करावे. 13 ज्या पुढच्या पिढीला ही शिकवण माहीत नव्हती त्यांना ती माहीत होईल. लौकरच तुम्ही जो देश आपलासा करायला चालला आहात तेथे ही मुलेबाळेही तुमचा देव परमेश्वर ह्यच विषयी आदर बाळगतील.”
परमेश्वराचे मोशे व यहोशवाला बोलावतो
14 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा मृत्यू आता समीप आला आहे. यहोशवाला घेऊन दर्शनमंडपात ये. म्हणजे मी त्याला आज्ञा देईन.” तेव्हा मोशे व यहोशवा दर्शन मंडपात गेले.
15 दर्शन मंडपाच्या प्रवेशद्वारी असलेल्या मेघस्तंभात परमेश्वर प्रगट झाला. 16 तो मोशेला म्हणाला, “तू आता लौकरच मरण पावशील व आपल्या पूर्वजांना भेटशील. तेव्हा हे लोक माझ्यापासून परावृत्त होतील. ते माझ्याशी केलेला पवित्र करार मोडतील. माझी साथ सोडून त्या देशातील इतर खोट्या दैवतांची पूजा करायला लागतील. 17 तेव्हा माझा त्यांच्यावर कोप होऊन मी त्यांना सोडून जाईन. मी त्यांना मदत करायचे नाकारल्याने त्यांचा नाश होईल. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यांच्यावर संकटे कोसळतील. तेव्हा ते म्हणतील की आपल्याला परमेश्वराची साथ नाही म्हणून आपल्यावर आपत्ती येत आहेत. 18 पण त्यांनी इतर दैवतांची पूजा केल्याने, दुष्कृत्ये केल्यामुळे मी त्यांना मदत करणार नाही.
19 “तेव्हा तुम्ही हे गीत लिहून घ्या व इस्राएल लोकांना शिकवा. त्यांच्याकडून ते तोंडपाठ करुन घ्या. म्हणजे इस्राएल लोकांविरुद्ध ही माझ्याबाजूने साक्ष राहील. 20 त्यांच्या पूर्वजांना कबूल केलेल्या भूमीत मी त्यांना नेणार आहे. ही भूमी दुधामधाने समृद्ध आहे. तेथे त्यांची अन्नधान्याची चंगळ होईल. ते संपन्न जीवन जगतील. पण मग ते इतर दैवतांकडे वळतील व त्यांची पूजा करतील. माझ्यापासून ते परावृत होतील व कराराचा भंग करतील. 21 त्यामुळे त्यांच्यावर आपत्ती कोसळतील. त्यांना अनेक अडचणी येतील. त्याही वेळी हे गीत त्यांच्यामुखी असेल आणि त्यांच्या चुकीची साक्ष त्यांना पटेल. मी त्यांना त्या भूमीत अजून नेलेले नाही. पण त्यांच्या मनात तेथे गेल्यावर काय काय करायचे या बद्दल जे विचार चालू आहेत ते मला अगोदरच माहीत आहेत.”
22 तेव्हा त्याचदिवशी मोशेने ते गीत लिहून काढले, आणि इस्राएल लोकांना ते शिकवले.
23 मग नूनचा मुलगा यहोशवा याला परमेश्वर म्हणाला, “हिंमत धर, खंबीर राहा. मी वचनपूर्वक देऊ केलेल्या प्रदेशात तू या इस्राएलांना घेऊन जाशील. मी तुझ्याबरोबर राहील.”
मोशे इस्राएलांना सावध करतो
24 मोशेने सर्व शिकवण काळजीपूर्वक लिहून काढल्यावर 25 लेवींना आज्ञा दिली. (लेवी म्हणजे परमेश्वर कराराचा कोश वाहणारे लोक.) मोशे म्हणाला, 26 “हा नियमशास्त्राचा ग्रंथ घ्या आणि परमेश्वराच्या कराराच्या कोशात ठेवा. तुमच्याविरुद्ध हा साक्ष राहील. 27 तुम्ही फार ताठर आहात हे मला माहीत आहे. तुम्ही आपलाच ठेका चालवता. मी तुमच्याबरोबर असतानाही तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड केले आहे. तेव्हा माझ्यामागेही तुम्ही तेच कराल. 28 तुमच्या कुळातील अंमलदार व महाजन यांना येथे बोलवा. स्वर्ग आणि पृथ्वीच्या साक्षीने त्यांना मी चार गोष्टी सांगीन. 29 माझ्या मृत्यूनंतर तुम्ही दुराचरण करणार आहात हे मला माहीत आहे. मी सांगितलेल्या मार्गापासून तुम्ही ढळणार आहात. त्यामुळे भविष्यात तुमच्यावर संकटे कोसळतील. कारण परमेश्वराने निषिद्ध म्हणून सांगितलेल्या गोष्टी तुम्ही करणार आहात. तुमच्या दुष्कृत्याने तुम्ही परमेश्वराचा राग ओढवून घ्याल.”
मोशेचे गीत
30 सर्व इस्राएल लोक एकत्र जमल्यावर मोशेने हे संपूर्ण गीत त्यांच्यासमोर म्हटले
मेम
97 परमेश्वरा, मला तुझी शिकवण खूप आवडते.
मी सतत तिच्याबद्दल बोलत असतो.
98 परमेश्वरा, तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा शहाणे करतात.
तुझे नियम नेहमी माझ्याजवळ असतात.
99 मी माझ्या सगळ्या शिक्षकांपेक्षा शहाणा आहे.
कारण मी तुझ्या कराराचा अभ्यास करतो.
100 जुन्या पुढाऱ्यांपेक्षा मला जास्त
कळते कारण मी तुझ्या आज्ञा सांभाळतो.
101 तू मला प्रत्येक पावलाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून
दूर ठेवतोस म्हणून परमेश्वरा, मी तू जे सांगशील ते करु शकतो.
102 परमेश्वरा, तू माझा गुरु आहेस
म्हणून मी तुझे नियम पाळणे बंद करणार नाही.
103 माझ्या तोंडात तुझे शब्द
मधापेक्षाही गोड आहेत.
104 तुझी शिकवण मला शहाणा करते.
त्यामुळे मी चुकीच्या शिकवणीचा तिरस्कार करतो.
नून
105 परमेश्वरा, तुझे शब्द दिव्याप्रमाणे
माझा मार्ग उजळतात.
106 तुझे नियम चांगले आहेत.
मी ते पाळायचे वचन देतो आणि मी दिलेले वचन पाळीन.
107 परमेश्वरा, मी खूप काळ दुख: भोगले आहे.
कृपा करुन आज्ञा दे आणि मला पुन्हा जगू दे.
108 परमेश्वरा, माझ्या स्तुतीचा स्वीकार कर
आणि मला तुझे नियम शिकव.
109 माझे आयुष्य नेहमीच धोक्यात असते
पण मी तुझी शिकवण विसरलो नाही.
110 दुष्ट लोक मला जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात.
पण मी तुझ्या आज्ञा मोडल्या नाहीत.
111 परमेश्वरा, मी सदैव तुझ्या कराराप्रमाणे वागेन
त्यामुळे मला खूप आनंद होतो.
112 मी अगदी नेहमी प्रयत्नपूर्वक
तुझे नियमपाळायचा प्रयत्न करीन.
सामेख
113 परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत
त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते.
114 मला लपव आणि माझे रक्षण कर.
परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.
115 परमेश्वरा, वाईट लोकांना माझ्याजवळ फिरकू देऊ नकोस
आणि मी माझ्या देवाच्या आज्ञा पाळीन.
116 परमेश्वरा, कबूल केल्याप्रमाणे तू मला आधार दे आणि मग मी जगेन.
माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून माझी निराशा करु नकोस.
117 परमेश्वरा, मला मदत कर म्हणजे माझा उध्दार होईल.
मी नेहमीच तुझ्या आज्ञांचा अभ्यास करीन.
118 परमेश्वरा, तुझे नियम मोडणाऱ्या प्रत्येकाला तू परत पाठव.
का? कारण जेव्हा त्यांनी तुझ्या सांगण्या प्रमाणे वागायचे कबूल केले तेव्हा ते खोटे बोलले.
119 परमेश्वरा, तू वाईट लोकांना पृथ्वीवर कचऱ्याप्रमाणे फेकून दे.
म्हणजे मग मी तुझ्या करारावर सदैव प्रेम करीन.
120 परमेश्वरा, मला तुझी भीती वाटते,
मी घाबरतो आणि तुझ्या नियमांना मान देतो.
देवाला अनुसरण्यास लोकांना सांगितले पाहिजे
58 तुम्हाला शक्य असेल तेवढ्या जोरात ओरडा.
थांबू नका.
रणशिंगाच्या आवाजाप्रमाणे मोठ्याने ओरडा.
लोकांनी केलेल्या चुका त्यांना सांगा.
याकोबाच्या वंशजांपुढे त्यांच्या पापांचा पाढा वाचा.
2 म्हणजे माझी उपासना करायला ते रोज येतील.
माझे मार्ग जाणून घ्यायची लोकांना इच्छा होईल.
योग्यरीतीने जगणारे ते राष्ट्र होईल.
देवाच्या चांगल्या आज्ञांचे पालन करण्याचे ते सोडणार नाहीत.
त्यांना योग्य न्याय देण्यास ते मला सांगतील.
न्याय निर्णयासाठी त्यांना देवाकडे जावेसे वाटेल.
3 आता ते लोक म्हणतात, “तुझ्याबद्दल आदर दाखविण्यासाठी आम्ही उपास करतो. तू आमच्याकडे का पाहत नाहीस? तुझा न राखण्यासाठी आम्ही आमच्या शरीरांना क्लेश करून घेतो. तू आमची दखल का घेत नाहीस?”
पण परमेश्वर म्हणतो, “विशेष दिवशी उपास करून तुम्ही तुम्हालाच पाहिजे ते करता. [a] तुम्ही तुमच्या शरीराला क्लेश देत नाही तर तुमच्या नोकरांना शिक्षा करता. 4 तुम्ही भुकेले आहात. पण ती भूक अन्नाची नाही, भाकरीची नाही तर भांडणाची आणि लढाईची आहे. तुमच्या पापी हातांनी लोकांना मारण्यासाठी तुम्ही भुकेले आहात. तुम्ही माझ्याकरिता उपास करीत नाही. माझी स्तुती करण्याची तुमची इच्छा नाही. 5 त्या विशेष दिवसांत उपास करून आपल्या शरीरांना लोकांनी क्लेश दिलेले पाहण्याची माझी इच्छा आहे असे तुम्हाला वाटते का? मला लोकांना दु:खी असलेले पाहावेसे वाटते असे तुम्हाला वाटते का? लोकांनी वाळलेल्या झाडांप्रमाणे माना झुकवाव्या व शोकप्रदर्शक कपडे घालावे अशी माझी इच्छा आहे; असे तुम्हाला वाटते का? लोकांनी राखेत बसून त्यांचे दु:ख मला दाखवावे अशी माझी इच्छा आहे, असे तुम्हाला वाटते का? विशेष दिवसांत उपास करून तुम्ही हे सर्व करता, परमेश्वराला हेच पाहिजे असे तुम्हाला वाटते का?
6 “मला कोणत्या प्रकारचा दिवस अभिप्रेत आहे ते मी तुम्हाला सांगीन. तो दिवस लोकांच्या मुक्ततेचा असावा, त्या दिवशी लोकांची ओझी तुम्ही हलकी करावी, अडचणीत असलेल्या लोकांना त्यातून सोडवावे, त्यांच्या खांद्यावरची ओझी तुम्ही उतरवावी. 7 भुकेलेल्यांना तुम्ही आपल्या घासातील घास द्यावा, बेघरांना शोधून तुमच्या घरात त्यांना आसरा द्यावा, उघड्या माणसाला तुम्ही तुमचे कपडे द्यावे अशी माझी इच्छा आहे. अशा लोकांना मदत करताना मागे-पुढे पाहू नका. ती तुमच्यासारखीच माणसे आहेत.”
8 तुम्ही ह्या केल्यात तर पहाटेच्या प्रकाशाप्रमाणे तुमचे भाग्य उजळेल. तुमच्या जखमा भरून येतील. तुमचा “चांगुलपणा” (देव) तुमच्या पुढे चालेल आणि परमेश्वराचे गौरव तुमच्या पाठीमागून येईल. 9 नंतर तुम्ही परमेश्वराला हाक मारल्यास परमेश्वर तुमच्या हाकेला ओ देईल. तुम्ही त्याचा धावा केल्यास तो म्हणेल, “हा मी येथे आहे.”
लोकांना त्रास देण्याचे व त्यांच्या दु:खाचे ओझे वाढविण्याचे तुम्ही थांबवावे. तुम्ही लोकांना कटू शब्द वापरू नयेत आणि प्रत्येक गोष्टीबद्दल दोष देऊ नये. 10 भुकेलेल्यांची तुम्हाला दया यावी व त्यांना तुम्ही अन्न द्यावे. संकटात असलेल्यांना तुम्ही मदत करावी. त्यांच्या गरजा भागवाव्या. मग अंधकारातून तुमचे भाग्य चमकून उठेल. तुम्हाला कसलेही दु:ख होणार नाही. मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे तुमचे भाग्य तळपेल.
11 परमेश्वर नेहमीच तुम्हाला मार्गदर्शन करील. ओसाड प्रदेशात तो तुमचा आत्मा तृप्त करील. तो तुमची हाडे मजबूत करील. भरपूर पाणी मिळणाऱ्या बागेप्रमाणे तुम्ही व्हाल. सतत वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे तुम्ही असाल.
12 पुष्कळ वर्षे तुमच्या शहरांचा नाश झाला. पण नवीन शहरे वसविली जातील आणि त्या शहरांचा पाया अनेक वर्षे टिकून राहील. तुम्हाला “कुंपण पक्के करणारा आणि रस्ते व घरे बांधणारा” असे नांव मिळेल.
13 तुम्ही देवाच्या शब्बाथाच्या नियमाविरूध्द् वागून पाप करण्याचे थांबवाल आणि विशेष दिवशी स्वतःच्या खुषीकरिता काही करण्याचे टाळाल तेव्हा हे घडून येईल. तुम्ही शब्बाथाला आनंदाचा दिवस मानावे. परमेश्वराच्या विशेष दिवसाचा तुम्ही मान राखावा. रोज तुम्ही जे करता आणि जे बोलता ते करण्याचे वा बोलण्याचे टाळून तुम्ही त्या दिवसाचा मान राखावा. 14 मग तुम्ही परमेश्वराजवळ त्याच्या कृपेची मागणी करू शकता. परमेश्वर तुम्हाला पृथ्वीवर उच्च जागी नेईल आणि तुमचे वडील याकोब यांच्या मालकीच्या सर्व गोष्टी तो तुम्हाला देईल. परमेश्वरानेच हे सर्व सांगितले असल्यामुळे हे सर्व घडून येईल.
दान देण्याविषयी येशूची शिकवण
6 “जेव्हा तुम्ही चांगली कृत्ये करता तेव्हा ती गाजावाजा न करता करा. लोकांच्या नजरेत भरावी म्हणून जर तुम्ही सत्कृत्ये करणार असाल तर लक्षात ठेवा, तुमच्या स्वर्गातील पित्याकडून तुम्हाला तुमचे प्रतिफळ मिळणार नाही.
2 “जेव्हा तुम्ही गरिबांना देता तेव्हा त्याचा गाजावाजा करू नका. मी खरे तेच सांगतो. ढोंगी लोक तसेच करतात. दान देण्यापूर्वी कर्णा फुंकून लोकांचे लक्ष वेधून घेतात. सभास्थानात व रस्त्यावर ते जाहीरपणे अशी कामे करतात, कारण इतर लोकांनी त्यांना मोठेपणा द्यावा अशी त्यांची इच्छा असते. मी तुम्हांस सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. 3 म्हणून जेव्हा तुम्ही गरिबाला द्याल, तेव्हा गुपचूप द्या. तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू नये. 4 दान गुप्त असावे, कारण तुमच्या पित्याला ते कळते व तो त्याचे फळ देतो.
प्रार्थनेविषयी येशूची शिकवण(A)
5 “जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका. कारण आपण लोकांस दिसावे म्हणून सभास्थानांमध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला खरे सांगतो की, त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे. 6 पण तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा आतल्या खोलीत जा, दार लावून घ्या. व जो तुमचा पिता गुप्त आहे त्याची प्रार्थना करा. मग तुमचा पिता, ज्याला कोणी पाहू शकत नाही तो तुम्हांला प्रतिफळ देईल.
7 “आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ज्यांना देव माहीत नाही अशासारखे होऊ नका. ते निरर्थक बडबड करतात. कारण आपण फार बोलल्याने आपले म्हणणे ऐकले जाईल असे त्यांना वाटते. 8 त्यांच्यासारखे होऊ नका. तुम्हाला कशाची गरज आहे हे तुम्ही सांगण्यापूर्वी तुमच्या पित्याला ठाऊक असते. 9 म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना करता. तेव्हा तुम्ही अशी प्रार्थना करावी.
‘हे आमच्या स्वर्गातील पित्या,
तुझे नाव पवित्र मानले जावो.
10 तुझे राज्य येवो,
जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
11 आमची रोजची भाकर आज आम्हांला दे.
12 जसे आमच्याविरूद्ध केलेल्या वाईटाची आम्ही क्षमा करतो
तसे आम्ही केलेल्या पापांची आम्हाला क्षमा कर,
13 आम्हांला परीक्षेत आणू नकोस
तर आम्हांला त्या दुष्टापासून सोडीव.’
14 कारण जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा कराल तर तुमचा स्वर्गातील पिताही तुम्हांला क्षमा करील; 15 पण जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा करणार नाही, तर तुमचा पिताही तुम्हांला क्षमा करणार नाही.
उपासाविषयी येशूची शिकवण
16 “जेव्हा तुम्ही उपास करता तेव्हा तुम्ही ढोंग्यांसारखे चेहरा उदास करू नका. कारण आपण उपास करीत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हांला खरे सांगतो. त्यांना त्यांचे प्रतिफळ मिळाले आहे. 17 तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा आपल्या डोक्याला तेल लावा आणि आपले तोंड धुवा. 18 यासाठी की, तुम्ही उपास करता हे लोकांना दिसू नये तर तुमच्या गुप्त पित्याला दिसावे. मग तुमचा गुप्त पिता तुम्हांला प्रतिफळ देईल.
पैशापेक्षा देव अधिक महत्त्वाचा आहे(B)
19 “येथे पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका. येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल. आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील. 20 म्हणून स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा. 21 जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.
22 “डोळा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुमचे सर्व शरीर प्रकाशमय होईल. 23 पण जर तुमचे डोळे वाईट असतील, तर तुमचे सर्व शरीर पापाने अंधकारमय होईल. जर तुम्हाठायी असणारा अंधकार वास्तविक अंधकार आहे, तर खरोखरचा अंधार कितीतरी अंधकारमय असेल.
24 “कोणालाही दोन धन्यांची चाकरी एकावेळी करणे शक्य नाही. तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्याशी निष्ठा राखील. किंवा तो एका धन्याचे ऐकेल व दुसऱ्याचे ऐकणार नाही. तसेच तुम्हांला देवाची आणि पैशाची (धनाची) सेवा एकाच वेळी करता येणार नाही.
देवाच्या राज्याला प्रथमस्थान द्या(C)
25 “म्हणून मी तुम्हांला सांगतो की, काय खावे आणि काय प्यावे अशी आपल्या जीवाविषयी, किंवा काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी चिंता करू नका. जीव अन्नापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे आणि शरीर वस्त्रापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. 26 आकाशातील पाखरांकडे पाहा. ती पेरीत नाहीत वा कापणी करीत नाहीत किंवा गोदामात साठवूनही ठेवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खावयास देतो आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात, हे तुम्हांला माहीत आहे. 27 आणि चिंता करुन आपले आयुष्य थोडे देखील वाढवणे कोणाला शक्य आहे का?
28 “आणि तुम्ही वस्त्राविषयी का काळजी करता? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात? ती कष्ट करीत नाहीत, आणि ती कातीतही नाहीत, 29 तरी मी तुम्हांला सांगतो की, शलमोन राजादेखील त्याच्या भर ऐश्र्वर्याच्या काळात यांतील एखाद्या प्रमाणेही सजू शकला नव्हता. 30 तर अहो अल्पविश्वासी लोकांनो, आज आहे तर उद्या भट्टीत पडते, अशा रानफुलांना जर देव असा पोशाख घालतो तर त्याहीपेक्षा विशेष असा पोशाख तुम्हांला घालणार नाही काय?
31 “चिंता करू नका आणि असे म्हणू नका की, ‘आम्ही काय खावे?’ किंवा ‘आम्ही काय प्यावे?’ किंवा ‘आम्ही काय पांघरावे?’ 32 सर्व लोक ज्यांना देव माहीत नाही, ते सुध्दा या गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करतात, काळजी करू नका. कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हांला या गोष्टींची गरज आहे हे माहीत आहे. 33 तर पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हांला मिळतील. 34 म्हणून उद्याची चिंता करू नका. कारण प्रत्येक दिवस काही ना काही चिंता घेऊनच उगवतो. म्हणून उद्याची चिंता उद्यासाठी दूर ठेवा.
2006 by World Bible Translation Center