Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
अनुवाद 16

वल्हांडण सण

16 “अबीब महिन्यात लक्षात ठेवून तुमचा देव परमेश्वराप्रित्यर्थ वल्हांडण हा सण साजरा करा. कारण याच महिन्यात तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला रात्रीच्या वेळी मिसरमधून बाहेर काढले. परमेश्वराने आपल्या निवासासाठी निवडलेल्या जागी जा. तेथे वल्हांडणाचा यज्ञपशू परमेश्वराला अर्पण करा. शेळ्या मेंढ्या किंवा गाय बैल यापैकी हा पशू असावा. त्यावेळी खमीर घातलेली भाकर खाऊ नका. बेखमीर भाकरी तुम्ही सात दिवस खावी. ही भाकरी म्हणजे ‘संकटाची भाकर’ होय. त्याने तुम्हाला मिसरमधील संकटांची जन्मभर आठवण राहील. किती गडबडीने तुम्हाला तो देश सोडावा लागला होता! त्याचा तुम्ही आमरण विसर पडू देऊ नका. तेव्हा या सात दिवसात देशभर कुणाच्याही घरी खमीर असता कामा नये. तसेच पहिल्या दिवशी संध्याकाळी जो बळी द्याल तो उजाडायाच्या आत खाऊन संपवून टाका.

“वल्हांडणाच्या पशूचे यज्ञार्पण तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला वस्तीसाठी दिलेल्या कोणत्याही नगराच्या आत करु नका. देव आपले निवासस्थान निवडील तेथेच व सुर्य अस्त होण्याच्या वेळीच ते केले पाहिजे. मिसरमधून परमेश्वराने तुम्हाला बाहेर काढल्याप्रित्यर्थ हा सण आहे. परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच हा यज्ञपशू शिजवून खा. मग सकाळी आपापल्या घरी परत जा. सहा दिवस खमीर विरहीत भाकर खा. सातव्या दिवशी कोणतेही कामकाज करु नये. या दिवशी सर्वांनी एकत्र येऊन तुमचा देव परमेश्वर ह्याप्रित्यर्थ पवित्र मेळा भरवावा.

सप्ताहांचा (किंवा पन्नासाव्या दिवसाचा) सण

“पीक काढल्यापासून सात आठवडे मोजा. 10 मग, आपल्या इच्छेनुसार एखादी विशेष भेटवस्तू आणून आपला देव परमेश्वर याच्यासाठी सप्ताहांचा सण साजरा करा. आपल्याला परमेश्वर देवाच्या कृपेने किती मिळाले याचा अंदाज घेऊन किती द्यायचे ते ठरवा. 11 परमेश्वराने निवडलेल्या त्याच्या विशेष निवासस्थानी जा. तेथे तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात सहकुटुंब सहपरिवार आनंदात वेळ घालवा. आपली मुलेबाळे, दास, लेवी गावातील पांथस्थ, अनाथ, विधवा या सर्वांना बरोबर घ्या. 12 तुम्ही मिसरमध्ये दास होता हे विसरु नका. तेव्हा हे नियम न चुकता पाळा.

मंडपाचा सण

13 “खळयातील आणि द्राक्षकुंडांमधील उत्पन्न जमा केल्यावर सात दिवसांनी मंडपाचा सण साजरा करा. 14 हा सणही मुलंबाळं, नोकरचाकर, लेवी, शहरातील वाटसरु, अनाथ, विधवा, यांच्यासह साजरा करा. 15 तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या निवासस्थानी, त्याच्या सन्मानार्थ सात दिवस हा सण साजरा करा. तुमच्या पिकांवर आणि तुम्ही घेतलेल्या कष्टांवर तुमचा देव परमेश्वर याची कृपादृष्टि आहे. तेव्हा आनंदात राहा.

16 “तुमचा देव परमेश्वर याच्या पवित्र निवासस्थानी तुम्हातील सर्व पुरुषांनी वर्षातून तीनदा एकत्र जमले पाहिजे. बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मंडपाचा सण हे ते तीन प्रसंग होत. येताना प्रत्येकाने भेटवस्तू आणली पाहिजे. 17 प्रत्येकाने यथाशक्ति दिले पाहिजे परमेश्वराने आपल्याला काय दिले याचा विचार करुन आपण काय द्यायचे ते ठरवावे.

लोकांसाठी न्यायाधीश व अधिकारी

18 “तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिलेल्या नगरांमध्ये आपापल्या वंशाप्रमाणे न्यायाधीश व अधिकारी यांच्या नेमणुका कराव्यात. या व्यक्तींनी नीतीने न्यायदान करावे. 19 त्यांनी नेहमी नि:पक्षपाती असले पाहिजे. त्यांनी लाच घेऊन न्यायनिवाडा करता कामा नये. पैसे पाहून भल्या भल्यांचेही डोळे फिरतात व ते निरपराध लोकांच्या म्हणण्याचा विपर्यास करतात. 20 चांगुलपणा आणि नि:पक्षपातीपणा यांचीच नेहमी कास धरावी. म्हणजे तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिलेला हा प्रदेश संपादन करुन तेथे तुम्ही सुखाने राहाल.

परमेश्वर मूर्तीचा तिरस्कार करतो

21 “जेव्हा तुमचा देव परमेश्वर यासाठी तुम्ही वेदी उभाराल तेव्हा तिच्याशेजारी अशेरा देवीच्या सन्मानार्थ लाकडी स्तंभ उभारु नका. 22 कोणत्याही खोट्या दैवतांसाठी स्तंभ उभारु नका. तुमचा देव परमेश्वर ह्याला अशा गोष्टींचा तिरस्कार वाटतो.

स्तोत्रसंहिता 103

दावीदाचे स्तोत्र

103 माझ्या आत्म्या परमेश्वराचा जयजयकार कर.
    माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करु दे.
माझ्या आत्म्या, परमेश्वराचा जयजयकार कर आणि
    तो खरोखरच दयाळू आहे हे विसरु नकोस.
देवा, आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल क्षमा कर.
    तो आमचे सर्व आजार बरे करतो.
देव थडग्यापासून आमचे आयुष्य वाचवतो आणि
    तो आम्हांला प्रेम आणि सहानुभूती देतो.
देव आम्हाला खूप चांगल्या गोष्टी देतो.
    तो आम्हाला गरुडासारखे परत तरुण बनवतो.
परमेश्वर न्यायी आहे. जे लोक इतरांकडून दु:खी झाले आहेत
    त्यांना देव न्याय देतो, त्यांच्यासाठी देव न्याय आणतो.
देवाने मोशेला नियम शिकवले,
    देव ज्या सामर्थ्यशाली गोष्टी करु शकतो त्या त्याने इस्राएलला दाखवल्या.
परमेश्वर सहानुभूतिपूर्ण आणि दयाळू आहे.
    देव सहनशील आणि प्रेमाचा सागर आहे.
परमेश्वर नेहमीच टीका करीत नाही.
    परमेश्वर आमच्यावर सदैव रागावलेला राहात नाही.
10 आम्ही देवाविरुध्द पाप केले
    पण त्याने आम्हाला त्या पापाला साजेशी शिक्षा केली नाही.
11 देवाचे त्याच्या भक्तांबद्दलचे प्रेम
    हे स्वर्ग पृथ्वीवर जितक्या उंचीवर आहे तितके आमच्यावर आहे.
12 आणि देवाने आमची पापे
    पूर्व आणि पश्चिम एकमेकींपासून जितक्या अंतरावर आहेत तितक्या अंतरावर नेऊन ठेवली.
13 वडील मुलांच्या बाबतीत जितके दयाळू असतात
    तितकाच दयाळू परमेश्वर त्याच्या भक्तांच्या बाबतीत असतो.
14 देवाला आमच्याबद्दल सारे काही माहीत असते.
    आम्ही धुळीपासून निर्माण झालो आहोत हे देवाला माहीत आहे.
15 आमचे आयुष्य कमी आहे हे देवाला माहीत आहे.
    त्याला माहीत आहे की आम्ही गवताप्रमाणे आहोत.
16 आम्ही एखाद्या छोट्या रानफुलासारखे आहोत हे देवाला माहीत आहे.
    ते फूल लवकर वाढते.
    गरम वारा वाहायला लागला की ते मरते आणि थोड्याच वेळात ते फूल कुठे वाढत होते ते देखील कुणी सांगू शकत नाही.
17 परंतु परमेश्वराने त्याच्या भक्तांवर नेहमीच प्रेम केले
    आणि तो सदैव त्याच्या भक्तांवर प्रेम करीत राहाणार आहे.
देव त्यांच्या मुलांशी आणि
    मुलांच्या मुलांशीदेखील चांगला वागणार आहे.
18 जे लोक देवाचा करार पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो.
    जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो.
19 देवाचे सिंहासन स्वर्गात आहे
    आणि तो सर्वांवर राज्य करतो.
20 देवदूतांनो, परमेश्वराची स्तुती करा.
    देवदूतांनो, तुम्ही देवाची आज्ञा पाळणारे सामर्थ्यवान सैनिक आहात.
    तुम्ही देवाचे ऐकता आणि त्याची आज्ञा पाळता.
21 परमेश्वराच्या सगळ्या सैन्यांनो देवाची स्तुती करा.
    तुम्ही त्याचे सेवक आहात.
    देवाला जे हवे ते तुम्ही करा.
22 परमेश्वराने सगळीकडच्या सर्व वस्तू केल्या.
    देव चराचरावर राज्य करतो. आणि त्या सगळ्यांनी परमेश्वराची स्तुती केली पाहिजे.
माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर.

यशया 43

देव नेहमीच त्याच्या लोकांबरोबर असतो

43 याकोबा, परमेश्वराने तुला जन्म दिला. इस्राएला, परमेश्वराने तुला निर्मिले. आता देव म्हणतो, “भिऊ नकोस मी तुझे रक्षण करीन. मी तुला निवडले आहे. तू माझा आहेस. जेव्हा तू अडचणीत असतोस, तेव्हा मी तुझ्या पाठीशी असतो. जेव्हा तू नद्या ओलांडशील तेव्हा इजा होणार नाही. आगीमधून चालताना तुला भाजणार नाही. ज्वाळा तुला पोळणार नाहीत. का? कारण मी स्वतः तुझा परमेश्वर आहे. मी, इस्राएलचा पवित्र देव तुझा तारणहार आहे. मी तुझ्या मोबदल्यात मिसर देश दिला. तुला माझा करण्यासाठी मी इथिओपिआ व सेबा यांचे दान केले. तू माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहेस. म्हणून मी तुझा आदर करतो. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्यासाठी मी सर्व लोक आणि सर्व राष्ट्रे दान करीन.

“म्हणून घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या सर्व मुलांना गोळा करून तुझ्याकडे आणीन, मी त्यांना पूर्व आणि पश्चिम दिशेकडून गोळा करीन. मी उत्तरेला म्हणेन: माझे लोक मला परत दे. मी दक्षिणेला सांगेन, माझ्या लोकांना तुरूंगात ठेवू नको. दूरदूरच्या ठिकाणांहून माझ्या मुलांमुलींना माझ्याकडे परत आण. जी माणसे माझी आहेत, जी माझे नाव लावतात, त्या सर्वांना माझ्याकडे आण. मी त्या लोकांना माझ्यासाठी निर्मिले आहे मीच त्यांना घडविले व ते माझे आहेत.”

देव म्हणतो, “डोळे असून आंधळे व कान असून बहिरे असणाऱ्यांना लोकांना बाहेर आणा. सर्व लोकांनी आणि सर्व राष्ट्रांनीसुध्दा् एकत्र जमावे. त्यांच्यातील एखादा खोटा देव, आरंभी काय घडले याबद्दल कदाचित सांगू इच्छित असेल, त्यांनी आपल्याबरोबर साक्षीदार आणावेत. साक्षीदारांनी सत्य सांगावे त्यावरून ते बरोबर आहेत हे सिध्द् होईल.”

10 परमेश्वर म्हणतो, “तुम्ही लोक माझे साक्षीदार आहात. मी निवडलेले तुम्ही लोक माझे सेवक आहात माझ्यावर विश्वास ठेवायला लोकांना तुम्ही मदत करावी म्हणून मी तुम्हाला निवडले आहे. ‘मीच तो आहे,’ मीच खरा देव आहे. हे तुम्हाला कळावे म्हणून मी तुमची निवड केली. माझ्याआधी कोणी देव नव्हता आणि माझ्यानंतर कोणी देव नसेल. 11 मी स्वतःच परमेश्वर आहे मी एकमेव आहे. दुसरा कोणीही तारणकर्ता नाही. मीच एकटा आहे. 12 तुमच्याशी बोलला तो मीच होतो. मी तुम्हाला वाचवले मी तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्या आहेत. तुमच्या पाठीशी कोणी परका नव्हता. तुम्हीच माझे साक्षीदार आहात. मी देव आहे.” (परमेश्वर स्वतःच हे बोलला.) 13 “मीच अक्षय असतो. मी जे काही करतो, ते कोणीही बदलू शकत नाही. माझ्या सामर्थ्यापासून लोकांना कोणीही वाचवू शकत नाही.”

14 परमेश्वर, इस्राएलचा पवित्र देव तुमचे रक्षण करतो. देव म्हणतो, “मी तुझ्यासाठी बाबेलला सैन्य पाठवीन. खूप लोकांना बंदी केले जाईल. त्या खास्दी (खाल्डियन) लोकांना त्यांच्याच नावांतून दूर नेले जाईल. (खास्दयांना (खाल्डियन लोकांना) त्यांच्या नावांचा फार गर्व आहे.) 15 मी परमेश्वर तुमचा पवित्र देव आहे. मी इस्राएल निर्मिले. मी तुमचा राजा आहे.”

देव त्याच्या लोकांचे पुन्हा रक्षण करील

16 परमेश्वर समुद्रातून मार्ग काढील. त्याच्या लोकांकरिता खवळलेल्या पाण्यातून तो रस्ता तयार करील. देव म्हणतो, 17 “जे लोक रथ, घोडे व सैन्ये यांच्यानिशी माझ्याशी लढतात त्यांचा परा़भव होईल. ते पुन्हा उठणार नाहीत त्यांचा नाश होईल. पण त्यातील ज्योत मावळावी तसे ते नाहीसे होतील. 18 म्हणून आरंभी घडलेल्या गोष्टी आठवू नका. फार पूर्वी घडलेल्या गोष्टींचा विचार करू नका. 19 का? कारण मी आता नव्या गोष्टी घडवून आणीन. आता तुम्ही कोवळ्या रोपटयाप्रमाणे वाढाल. हे सत्य आहे, हे नक्कीच तुम्हाला माहीत आहे. मी खरोखरच वाळवंटातून रस्ता तयार करीन. कोरड्या भूमीवर नद्या निर्माण करीन. 20 हिंस्र पशुसुध्दा् माझे आभार मानतील. मोठे प्राणी आणि पक्षी मला मान देतील. मी जेव्हा वाळवंटात पाणी आणि कोरड्या जमिनीवर नद्या निर्माण करीन तेव्हा ते माझा आदर करतील. मी निवडलेल्या. माझ्या लोकांना पाणी मिळावे म्हणून मी हे करीन. 21 ह्या लोकांना मी निर्मिले आहे. ते माझी स्तुतिस्तोत्रे गातील.

22 “याकोबा, तू माझी प्रार्थना केली नाहीस का? कारण इस्राएल मला विटला आहे. 23 तू तुझ्या मेंढ्या होमबलि देण्यासाठी माझ्याकडे आणल्या नाहीस तू माझा मान राखला नाहीस. तू मला बळी अर्पण केले नाहीस. मला होमबलि अर्पण करावे म्हणून मी तुला बळजबरी केली नाही. तू तुला वीट येईपर्यंत धूप जाळावा असा आग्रह मी धरला नाही. 24 मला तृप्त करण्यासाठी लागणाऱ्या अर्पणांसाठी आणि धुपासाठी तू स्वतःचा पैसा वापरला नाहीस. उलट तुझ्या पापांचे ओझे माझ्यावर लादलेस तुझ्या दुष्कृत्यांचा मला वीट येईपर्यंत तू पाप केलेस.

25 “मी, आणि फक्त मीच तुझी पापे धुतो. मी हे माझ्या आनंदासाठी करतो. मी तुझी पापे लक्षात ठेवणार नाही. 26 पण तू मात्र माझी आठवण ठेवावीस आपण एकत्र येऊन योग्य काय ते ठरवावे. तू केलेल्या गोष्टी तू सांगाव्यास आणि त्या योग्य आहेत हे दाखवावे. 27 तुझ्या पूर्वजांनी पाप केले आणि तुझे शिक्षक माझ्याविरूध्द् वागले. 28 म्हणून मी तुझ्या पवित्र राज्यकर्त्यांना अपवित्र करीन. मी याकोबाला संपूर्णपणे माझा होण्यास भाग पाडीन. [a] इस्राएलमध्ये वाईट घडेल.”

प्रकटीकरण 13

दोन प्राणी

13 मग मी एक श्र्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. त्याला दहा शिंगे आणि सात डोकी होती. त्याच्या शिंगांवर दहा मुकुट होते आणि प्रत्येक डोक्यावर देवनिंदाव्यंजक नाव लिहिले होते. हा पशू चित्त्यासारखा दिसत होता. त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे होते. त्याला सिंहाच्या तोंडासारखे तोंड होते. त्या प्रचंड सापाने त्या प्राण्याला त्याची शक्ति, त्याचे सिंहासन आणि मोठा अधिकार दिला.

त्या प्राण्याच्या डोक्यांपैकी एक डोके जबर जखमी झालेले दिसत होते. पण ती जखम बरी झाली. जगातील सर्व लोक चकित झाले आणि ते सर्व त्या श्र्वापदाच्या मागे गेले. लोकांनी त्या प्रचंड सापाची उपासना केली कारण त्याने त्याची शक्ति त्या श्र्वापदाला दिली होती. लोकांनी त्या प्राण्याची उपासना केली. त्यांनी विचारले, “या प्राण्याइतका सामर्थ्यशाली कोण आहे? त्याच्याविरुद्ध कोण लढाई करु शकेल?”

त्या श्र्वापदाला मोठ्या अवास्तव गोष्टी बोलण्याची मुभा देण्यात आली व देवाविरुद्ध अनेक दुर्भाषणयुक्त गोष्टी तो बोलला. त्या प्राण्याला बेचाळीस महिने त्याचे सामर्थ्य वापरण्यास सांगण्यात आले. त्या प्राण्याने देवाविरुद्ध वाईट गोष्टी बोलण्यासाठी तोंड उघडले. त्या प्राण्याने देवाच्या नावाविरुद्धसुद्धा वाईट गोष्टी बोलण्यास कमी केले नाही. व देव राहतो त्या ठिकाणाबद्दल सुध्दा वाईट गोष्टी तो बोलला. व जे सर्व स्वर्गात राहतात त्यांच्याविषयी वाईट गोष्टी बोलल्या. देवाच्या पवित्र लोकांविरुद्ध युद्ध करण्यास व त्यांना पराभूत करण्यास त्या प्राण्याला शक्ति देण्यात आली. त्या प्राण्याला प्रत्येक वंश, जमात, भाषा आणि राष्ट्रांतील लोकांवर अधिकार देण्यात आला आहे. आणि जगाच्या निर्मितीपासून ज्यांची नावे वधलेल्या कोकऱ्याच्या जीनवाच्या पुस्तकात लिहिली नाहीत, ते सर्व त्या पशूची भक्ति करतील.

ज्याला कान आहेत तो ऐको.

10 जर एखादा मनुष्य दुसऱ्यास कैदी बनवतो तर
    तो मनुष्यही कैदी बनविण्यात येतो.
जर एखादा मनुष्य तलवारीने मरतो तर
    त्या मनुष्याला तलवारीनेच मारण्यात येते.

याचा अर्थ असा की देवाच्या पवित्र लोकांनी धीर व विश्वास धरला पाहिजे.

पृथ्वीतून येणारे श्वापद

11 मग मी एक दुसरे श्र्वापद पृथ्वीतून वर येताना पाहिले. त्याला कोकऱ्यासारखी दोन शिंगे होती. पण ते प्रचंड सापासारखे बोलत होते. 12 हा प्राणी पहिल्या प्राण्यासमोर उभा राहतो व पहिल्या प्राण्याकडे जी शक्ति होती तीच तो वापरतो. पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांनी पहिल्या प्राण्याची उपासना करावी यासाठी तो आपली शक्ति वापरतो. पहिला प्राणी असा होता की त्याला प्राणघातक अशी जखम होती जी बरी झाली होती. 13 हे दुसरे श्र्वापद मोठी चिन्हे करते. लोक पाहत असताना तो स्वर्गातून पृथ्वीवर अग्नीसुद्धा येईल असे करतो 14 आणि त्याला पहिल्या श्वापदासमोर चिन्हे करण्याचा अधिकार दिला होता म्हणून ते म्हणजे जे श्र्वापद जखमी होऊनही वाचले, त्याची मूर्ति बनवून त्याची भक्ति करावी अशी पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना आज्ञा करतो. 15 दुसऱ्या प्राण्याला पहिल्या प्राण्याच्या मूर्तीला जीवन देण्यासाठी शक्ति देण्यात आली. मग ती मूर्ती बोलेल व जे लोक तिची भक्ति करीत नाहीत त्यांना ठार मारण्याची आज्ञा देईल. 16 दुसऱ्या प्राण्याने सर्व लोकांना-लहान मोठ्या, श्रीमंत आणि गरीब, स्वतंत्र व दास-बळजबरी केली की, त्यांनी त्यांच्या उजव्या हातावर किंवा कपळावर चिन्ह करुन घ्यावे. 17 यासाठी की, चिन्ह असल्याशिवाय कोणीही व्यक्तीने विकू नये किंवा विकत घेऊ नये. हे चिन्ह म्हणजे त्या प्राण्याचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे. 18 ज्या माणसाला समजबुद्धी आहे, त्याने त्या प्राण्याच्या संख्येचा अर्थ शोधावा. ही संख्या मनुष्यांची संख्या आहे. त्यांची संख्या आहे 666.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center