M’Cheyne Bible Reading Plan
इस्राएल म्हणजे देवाची पवित्र प्रजा
7 “जो देश वतन करुन घ्यायला तुम्ही निघाला आहात तेथे तुमचा देव परमेश्वर तुम्हाला नेईल. आणि हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी, यबूसी अशा तुमच्यापेक्षा मोठ्या आणि बलाढ्य अशा सात राष्ट्रांना तेथून घालवून देईल. 2 तुमचा देव परमेश्वर त्यांना तुमच्या अधिपत्याखाली आणेल आणि तुम्ही त्यांचा पराभव कराल तेव्हा तुम्ही त्यांचा समूळ विध्वंस करा. त्यांच्याशी कुठलाही करार करु नका. त्यांना दया दाखवू नका. 3 त्यांच्याशी सोयरीक जुळवू नका. आपल्या मुली त्यांना देऊ नका. त्याच्या मुली आपल्या मुलांना करुन घेऊ नका. 4 कारण हे लोक तुमच्या मुलांना माझ्यापासून विचलीत करतील. त्यामुळे तुमची मुले अन्य दैवतांचे भजनपूजन करतील. अशाने परमेश्वराचा तुमच्यावर कोप होईल व तो तात्काळ तुमचा नाश करील.
खोट्या देवांचा नाश करा
5 “त्या देशात तुम्ही असे करा. त्यांच्या वेद्या पाडून टाका. त्यांचे स्मारकस्तंभ फोडून टाका. अशेरा दैवताचे स्तंभउपटून टाका, मूर्ती जाळून टाका. 6 कारण तुम्ही परमेश्वराची पवित्र प्रजा आहात. जगाच्या पाठीवरील सर्व लोकांमधून त्याने आपली खास प्रजा म्हणून तुमचीच निवड केली आहे. 7 परमेश्वराने प्रेमाने तुम्हालाच का निवडले? तुम्ही एखाद्या मोठ्या राष्ट्रातील होता म्हणून नव्हे. उलट तुम्ही संख्येने सगळ्यात कमी होता. 8 पण सर्व सामर्थ्यानिशी तुम्हाला दास्यातून मुक्त करुन परमेश्वराने तुम्हाला मिसर बाहेर आणले, फारोच्या अंमलातून सुटका केली. याचे कारण हेच की तुमच्यावर त्याचे प्रेम आहे आणि तुमच्या पूर्वजांना दिलेले वचन त्याला पाळायचे होते.
9 “तेव्हा लक्षात ठेवा तुमचा देव परमेश्वर हाच एक देव आहे. त्यावर विश्वास ठेवा. तो आपला करार पाळतो. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्याच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांवर व त्यांच्या पुढच्या हजार पिढ्यांवर तो दया करतो. 10 पण त्याचा द्वेष करणाऱ्यांना तो शासन करतो. तो त्यांचा नाश करील. त्याचा द्वेष करणाऱ्यांना शासन करण्यास तो विलंब करणार नाही. 11 जेव्हा ज्या आज्ञा व विधी, नियम आज मी सांगितले त्यांचे काळजीपूर्वक पालन करा.
12 “हे नियम तुम्ही नीट ऐकून त्यांचे काटेकोर पालन केलेत तर तुमच्या पूर्वजांशी केलेला प्रेमाचा पवित्र करार तो पाळेल. 13 तो तुमच्यावर प्रेम करील, तुम्हाला आशीर्वाद देईल. तुमच्या राष्ट्राची तो वाढ करील. तो तुमच्या मुलाबाळांना आर्शीवाद देईल. तुमची शेते पिके तो आशीर्वादीत करील. तो तुम्हाला धान्य, नवीन द्राक्षारस व तेल देईल. तुमची गाया बैले, वासरे, मेंढ्या व कोंकरे ह्यांना तो आशीर्वाद देईल. तुमच्या पूर्वजांना वचन दिलेल्या प्रदेशात हे सर्व आशीर्वाद तो तुम्हाला देईल.
14 “इतरांपेक्षा तुम्ही जास्त आशीर्वादीत व्हाल. प्रत्येक दांपत्याला मुलंबाळं होतील. गाई वासरांना जन्म देतील. 15 परमेश्वर सर्व आजार काढून टाकील. मिसर देशात तुम्हाला माहीत असलेली कोणतीही भयंकर रोगराई इथे होणार नाही. हे रोग परमेश्वर तुमच्या शत्रूंवर आणील. 16 तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हाती सोपवलेल्या सर्वांचा तुम्ही पराभव करुन विध्वंस करा. त्यांच्याबाबतीत वाईट वाटून घेऊ नका. त्यांच्या दैवतांची पूजा करु नका. कारण ती दैवते म्हणजे तुम्हाला अडकवणारा सापळा आहे. त्याने तुमच्या आयुष्याचा नाश होईल.
परमेश्वराचे मदतीचे वचन
17 “हे देश आपल्यापेक्षा बलवान आहेत, त्यांना आम्ही कसे घालवून देऊ असा विचारही मनात आणू नका. 18 त्यांची मुळीच भीती बाळगू नका. आपल्या परमेश्वर देवाने फारोचे आणि मिसर देशाचे काय केले ते आठवा. 19 त्यांच्यावर कशी भयंकर संकटे आणली, काय चमत्कार केले हे तुम्ही पाहिलेले आहे. तुम्हाला मिसरबाहेर काढतानाचे त्याचे प्रताप व सामर्थ्य तुम्हाला माहीत आहेत. ज्या लोकांची तुम्हाला भीती वाटते आहे त्यांच्याविरुध्द तुमचा देव परमेश्वर असेच सामर्थ्य वापरील.
20 “याशिवाय, जे तुमच्या तावडीतून निसटतील, लपून बसतील त्यांच्या मागावर परमेश्वर आपला देव गांधील माश्या पाटवील. त्यामुळे त्यांचाही नाश होईल. 21 तेव्हा त्यांना घाबरु नका. कारण परमेश्वर आपला देव तुमच्या बरोबर आहे. तो महान आणि भययोग्य देव आहे. 22 त्या राष्ट्रांना आपला देव परमेश्वर हळूहळू घालवून देईल. त्यांचा तुम्ही एकाच वेळी विध्वंस करणार नाही. कारण तसे झाले तर वन्यपशूंची संख्या प्रमाणाबाहेर वाढेल. 23 पण त्या राष्ट्रांचा बिमोड करण्यात तुमचा देव परमेश्वर तुम्हाला साहाय्य करील. युद्धात त्यांच्यात गोंधळ माजवील आणि शेवटी त्यांचा नाश होईल. 24 परमेश्वराच्या मदतीने तुम्ही त्यांच्या राजांचा पराभव कराल, त्यांना ठार कराल आणि जगाच्या आठवणीतूनही ते पुसले जातील. कोणीही तुम्हांला अडवू शकणार नाही. तुम्ही सर्वांचा विध्वंस कराल!
25 “त्यांच्या दैवतांच्या मूर्ती तुम्ही आगीत टाकून जाळून टाका. त्या मूर्तीवरच्या चांदीसोन्याचा मोह धरु नका, ते घेऊ नका. कारण तो सापळाच आहे. त्याने तुमचे आयुष्य बरबाद होईल. परमेश्वर आपला देव मूर्तिद्वेष्टा आहे. 26 त्या अमंगळ, हानिकारक मूर्ती तुम्ही घरीही आणू नका. त्यांची घृणा बाळगा आणि त्या नष्ट करुन टाका.
भाग चौथा
(स्तोत्रसंहिता 90-106)
देवाचा माणूस मोशे याची प्रार्थना
90 प्रभु तू सदैव आमचे घर बनून राहिला आहेस.
2 देवा, पर्वत जन्मण्याआधी आणि
पृथ्वी व जग निर्माण होण्याआधी तूच देव होतास देवा,
तू पूर्वी होतास आणि पुढे देखील असशील.
3 तूच लोकांना या जगात आणतोस आणि
तूच त्यांची पुन्हा माती करतोस.
4 तुझ्यासाठी हजारो वर्षे
म्हणजे कालचा दिवस, कालची रात्र.
5 तू आम्हाला झाडून टाकतोस. आमचे आयुष्य स्वप्नासारखे आहे.
सकाळ झाली की आम्ही मेलेलो असतो.
आम्ही गवतासारखे आहोत.
6 गवत सकाळी उगवते आणि
संध्याकाळी ते वाळते व मरणाला टेकते.
7 देवा, तू रागावतोस तेव्हा आमचा नाश होतो.
आम्हाला तुझ्या रागाची भीती वाटते.
8 तुला आमच्या सर्व पापांची माहिती आहे.
देवा, तू आमचे प्रत्येक गुप्त पाप पाहतोस.
9 तुझा राग आमचे आयुष्य संपवू शकतो एखाद्या कुजबुजी सारखे
आमचे आयुष्य विरुन जाऊ शकते.
10 आम्ही कदाचित् 70 वर्षे जगू आणि
जरा सशक्त असलो तर 80 वर्षे.
आमचे आयुष्य कठोर परिश्रम आणि दु:ख यांनी भरलेले आहे
आणि नंतर आमचे आयुष्य अवचित् संपते आणि आम्ही उडून जातो.
11 देवा, तुझ्या रागाच्या संपूर्ण शक्तीची कुणालाच जाणीव नाही.
परंतु देवा, आमची भीती आणि तुझ्याबद्दलचा आदर तुझ्या रागाइतकाच महान आहे.
12 आमचे आयुष्य खरोखरच किती छोटे आहे
ते आम्हाला शिकव म्हणजे आम्ही खरेखुरे शहाणे बनू शकू.
13 परमेश्वरा, नेहमी आमच्याकडे परत
ये तुझ्या सेवकाशी दयेने वाग.
14 तुझ्या प्रेमाने आम्हांला रोज सकाळी न्हाऊ घाल.
आम्हाला सुखी होऊ दे आणि समाधानाने आयुष्य जगू दे.
15 तू आम्हाला आयुष्यात खूप संकटे आणि खिन्नता दिलीस.
आता आम्हांला सुखी कर.
16 तू तुझ्या सेवकांसाठी कोणत्या अद्भुत गोष्टी करु
शकतोस ते त्यांना बघू दे.
17 देवा, प्रभु, आमच्यावर दया कर.
आम्ही जे जे करतो त्यात आम्हाला यश दे.
देव त्याच्या लोकांचे सांत्वन करील
35 शुष्क वाळवंट सुखी होईल. वाळवंट आनंदी होईल आणि फुलासारखे फुलेल. 2 वाळवंट फुलणाऱ्या फुलांनी भरून जाईल आणि आपला आनंद दाखवेल. त्या वेळी वाळवंट जणू आनंदाने नाचत असल्याचे भासेल. लेबानोनचे बन, कर्मेलची टेकडी व शारोनची दरी ह्यांच्याप्रमाणे ते सुंदर होईल. सर्व लोकांनी परमेश्वराचे गौरव पाहिल्यामुळे हे सर्व घडेल. लोक आमच्या देवाचे लावण्य पाहतील.
3 दुर्बल हात बळकट करा. दुर्बळ पाय घट्ट करा. 4 लोक घाबरले व गोंधळले आहेत. त्यांना सांगा, “सामर्थ्यवान व्हा. भीऊ नका.” तुमचा देव येऊन तुमच्या शत्रूला शिक्षा करील. तो येईल आणि तुमच्या वर कृपा करील. परमेश्वर तुमचे रक्षण करील. 5 मग आंधळे पुन्हा डोळस होतील. त्यांचे डोळे उघडतील. बहिरे ऐकू शकतील. त्यांना श्रवणशक्ती मिळेल. 6 पंगु हरणांप्रमाणे नाचतील. मुके आनंदगीते गाऊ लागतील. वाळवंटात झरे वाहू लागतील, तेव्हा असे होईल. कोरड्या जमिनीतून झरे वाहतील. 7 आता लोक मृगजळे पाहतात. पण त्या वेळेला खऱ्या पाण्याची तळी दिसतील. कोरड्या जमिनीत विहिरी खोदलेल्या असतील. जमिनीतून पाणी वाहील. जेथे एकेकाळी जंगली जनावरे वावरले, तेथे मोठ्या पाणवनस्पती वाढतील.
8 त्या वेळेला तेथे रस्ता असेल. ह्या महामार्गाला “पवित्र मार्ग” असे नाव मिळेल. पापी लोकांना त्या रस्त्यावरून जाण्यास परवानगी नसेल. कोणीही मूर्ख त्या मार्गाकडे जाणार नाही. फक्त सज्जन माणसेच त्या मार्गावरून चालतील. 9 त्या मार्गावर कोणताही धोका असणार नाही. तेथे लोकांना मारणारे सिंह नसतील, हिंस्त्र श्वापदे नसतील. देवाने रक्षिलेले त्या मार्गावरून चालतील.
10 देव त्याच्या लोकांना मुक्त करील आणि ते लोक त्याला शरण येतील. सियोनमध्ये येताना लोक गात येतील. त्यांना कायमचा आनंद मिळेल. तो आनंद त्यांच्या डोक्यावरील मुकुटाप्रमाणे असेल. ते आनंदाने व हर्षांने भारून जातील. दु:ख आणि शोक दूर सरेल.
गुंडाळी उघडण्यास कोण पात्र आहे?
5 मग मी, जो सिंहासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातात गुंडाळी पाहिली. गुंडाळीवर दोन्ही बाजूंनी लिहिले होते. आणि ती गुंडाळी सात शिक्के मारुन बंद केली होती. 2 आणि मी एक सामर्थ्यशाली देवदूत पाहिला. तो देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला, “गुंडाळीचे शिक्के तोडून ती उघडण्यास कोण पात्र आहे.?” 3 परंतु स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ते शिक्के तोडण्यास आणि त्यामध्ये पाहण्यास समर्थ नव्हता. 4 मी खूप रडलो कारण ती गुंडाळी उघडून आतमध्ये काय आहे हे पाहण्याच्या योग्यतेचे कोणीही नव्हते. 5 पण वडीलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! पहा, यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर हा विजयी झाला आहे. तो गुंडाळी उघडण्यास व तिचे सात शिक्के उघडण्यास समर्थ आहे.”
6 मग मी एक कोकरा पाहिला. सिंहासनाच्या मध्यभागी उभा असलेला व त्याच्या भोवती चार जिवंत प्राणी असलेले मी पाहिले. व वडीलही त्याच्याभोवती होते. कोकरा बांधल्यासारखा दिसत होता. त्याला सात शिंगे आणि सात डोळे होते. आणि हे जणू देवाचे सात आत्मे असून ते सर्व जगभर पाठविले होते. 7 कोकरा आला आणि त्याने जो, सिंहासनावर बसला होता, त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. 8 आणि जेव्हा त्याने ती घेतली तेव्हा चार जिवंत प्राणी व चोवीस वडीलजन कोकऱ्यासमोर उपडे पडले. प्रत्येकाजवळ वीणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक उदाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. या वाट्या म्हणजे देवाच्या लोकांच्या प्रार्थना होत्या. 9 आणि त्यांनी नवे गाणे गाईले:
“तू गुंडाळी घेण्यास
आणि तिचे शिक्के उघडण्यास समर्थ आहेस,
कारण तुला वधण्यात आले
आणि तू आपल्या रक्ताने मनुष्यांना
प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या जमातीतून, आणि राष्टांतून विकत घेतले.
10 तू त्यांना राज्य आणि पृथ्वीवर आपल्या देवासाठी याजक बनविले
आणि नंतर ते पृथ्वीवर सत्ता गाजवितील.”
11 मग मी पाहिले सिंहासन आणि, चार जिवंत प्राणी व वडीलजन यांच्या सभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली, त्यांची संख्या अयुतांची अयुते व हजारो हजार होती. 12 देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले,
“जो वधलेला कोकरा होता तो सामर्थ्य,
संपत्ति, शहाणपण आणि शक्ति,
सन्मान, गौरव
आणि स्तुतीस पात्र आहे!”
13 प्रत्येक निर्माण केलेली वस्तु आकाशात व पृथ्वीवर, पृथ्वीखाली व समुद्रातील अवघ्यांना मी असे गाताना ऐकले की,
“जो सिंहासनावर बसतो त्याला
व कोकऱ्याला स्तुति, सन्मान, गौरव
आणि सामर्थ्य अनंतकाळपर्यंत असो!”
14 चार जिवंत प्राणी म्हणाले, “आमेन!” मग वडीलजनांनी खाली पडून त्याला अभिवादन केले.
2006 by World Bible Translation Center