M’Cheyne Bible Reading Plan
रानात इस्राएलांनी कंठलेली वर्षे
2 “मग परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे आपण मागे फिरुन तांबड्या समुद्राच्या वाटेने रानात निघालो आणि बरेच दिवस सेईर डोंगराभोवती फिरत राहिलो. 2 परमेश्वर तेव्हा मला म्हणाला, 3 ‘या डोंगराभोवती तुम्ही फार दिवस फिरत राहिला आहात. आता उत्तरेकडे वळा. 4 आणि लोकांना आणखी एक सांग. म्हणावे, की तुम्हाला वाटेत सेईर लागेल. ती भूमी एसावच्या वंशाजांची, तुमच्या भाऊबंदांची आहे. त्यांना तुमची भीती वाटेल. तेव्हा सांभाळा. 5 त्यांच्याशी भांडू नका. त्यांच्यातली तसूभरही जमीन मी तुम्हाला देणार नाही. कारण सेईर डोंगर मी एसावला वतन म्हणून दिला आहे. 6 तुमच्या अन्नपाण्याचा खर्च तुम्ही त्यांना द्या. 7 तुमच्या सर्व कार्यात तुमचा देव परमेश्वर याचे तुम्हाला आशीर्वाद आहेत. तुमच्या या रानातील वाटचालीकडे त्याचे लक्ष आहे. गेली चाळीस वर्षे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला साथ दिली आहे. तुम्हाला कशाचीही वाण पडली नाही.’
8 “तेव्हा एसावचे वंशज राहात असलेल्या सेईर वरुन आपण गेलो. एलाथ आणि एसयोन-गेबर वरुन येणारा अराबाचा मार्ग आपण सोडला आणि मवाबच्या रानातल्या रस्त्याला आपण वळलो.
इस्राएल लोक आर येथे येतात
9 “परमेश्वराने मला सांगितले, ‘मवाबाला उपद्रव पोचू देऊ नका. त्यांना युद्धाला प्रवृत करु नका. त्यांच्यातली जमीन मी तुम्हाला देणार नाही. कारण आर नगर मी लोटच्या वंशजांना इनाम दिले आहे.’”
10 (पूर्वी तेथे एमी लोक राहात असत. ते बहुसंख्य, धिप्पाड व अनाकी लोकांप्रमाणे महाकाय होते. 11 या एमींना लोक अनाकी यांच्यासारखे रेफाई समजत असत. पण मवाबी लोक त्यांना एमी म्हणतात. 12 पूर्वी सेईरात होरी लोकही राहात असत. पण एसावांनी त्यांची जमीन बळकावली, होरींचा संहार केला व तेथे स्वतः वस्ती केली. परमेश्वराने त्यांना दिलेल्या देशाचे इस्राएलांनी जसे केले तसेच त्यांनी इथे केले.)
13 “मग परमेश्वराने मला जेरेद ओढ्यापलीकडे जायला सांगितले. त्याप्रमाणे आपण जेरेद ओढ्यापलीकडे गेलो. 14 कादेश-बर्णाया सोडून जेरेद ओढ्यापलीकडे पोहोंचेपर्यंत अडतीस वर्षे उलटली होती. तोपर्यंत आपल्या गोटातील सर्व लढवय्ये मरण पावले होते. परमेश्वराने हे भाकित केलेच होते. 15 त्यांचे समूळ उच्चाटन होईपर्यंत परमेश्वराचा त्यांच्यावर कोप होता.
16 “ती पिढी नामशेष झाल्यावर 17 परमेश्वर मला म्हणाला, 18 ‘तुला आज मवाबची सीमा ओलांडून आर नगरापलीकडे जायचे आहे. 19 तेथे अम्मोनी लोक भेटतील. त्यांना उपद्रव देऊ नको. त्यांच्याशी युध्द करु नको. त्यांच्या जमिनीतील वाटा मी तुला देणार नाही. कारण ते लोटाचे वंशज असून त्यांना मी ती वतन दिली आहे.’”
20 त्या भागाला रेफाईम देश असेही म्हणतात. पूर्वी तेथे रेफाई लोकांची वस्ती होती. अम्मोनी त्यांना जमजुम्मी म्हणत. 21 जमजुम्मी संख्येने पुष्कळ व सशक्त होते. अनाकी लोकांप्रमाणे ते धिप्पाड होते. पण त्यांचा संहार करायला अम्मोनी लोकांना परमेश्वराचे साहाय्य होते. आता त्या जमिनीचा ताबा घेऊन अम्मोनी तेथे राहतात. 22 एसावाच्या वंशजांनाही देवाचे असेच पाठबळ होते. पूर्वी सेईर येथे होरी लोक राहात असत. पण एसावाच्या वंशजांनी होरींचा संहार केला व आजतागायत ते तेथे राहतात. 23 कफतोरी लोकांबद्दलही हेच म्हणता येईल. त्यांचा कफतोराहून आलेल्या लोकांनी उच्छेद करुन त्यांची भूमी बळकावली आणि आता ते तेथे राहात आहेत.
अमोरींशी सामना
24 “पुढे परमेश्वर मला म्हणाला, ‘आता उठा व आर्णोनचे खोरे ओलांडून जा. हेशबोनचा अमोरी राजा सीहोन याच्याबरोबरच्या युद्धात मी तुम्हाला यश देईन. त्याचा देश ताब्यात घ्या. 25 तुमच्याविषयी मी सर्व लोकांच्या मनात दहशत निर्माण करीन. तुमचे नाव ऐकताच ते भयभीत होतील.’
26 “मग मी कदेमोथच्या रानातून हेशबोनचा राजा सीहोन याच्याकडे दूतांकरवी सलोख्याचा निरोप पाठवला की, 27 तुमच्या देशातून आम्हाला जाऊ दे. आमची वाट सोडून आम्ही डावी उजवीकडे वळणार नाही. आम्हाला खायला प्यायला लागेल ते आम्ही चांदीच्या मुद्रा देऊन विकत घेवू. 28 आम्हाला फक्त इथून पलीकडे जाऊ दे. 29 यार्देनपलीकडे आमचा देव परमेश्वर आम्हाला देणार असलेल्या जमिनीपर्यंत आम्हाला जायचे आहे. सेईरच्या एसाव लोकांनी आणि आर येथील मवाबी लोकांनी आम्हाला जाऊ दिले तसेच तूही कर.
30 “पण हेशबोनचा राजा सीहोन आपल्या देशातून जाऊ देईना. आपण त्याला पराभूत करावे म्हणूनच तुमचा देव परमेश्वर ह्याने त्याला अडेलतट्टू केले. आज तुम्ही पाहातच आहात की तो देश आपल्या हाती आहे.
31 “परमेश्वर मला म्हणाला, ‘सीहोन राजा आणि त्याचा देश हे मी तुमच्या हवाली करत आहे. त्यांचा ताबा घ्या.’
32 “आणि अशा वेळी सीहोन व त्याची प्रजा याहस येथे लढाईसाठी सज्ज झाले. 33 पण आमच्यावर परमेश्वर देवाची कृपा होती म्हणून आम्ही त्याचा, त्याच्या मुलांचा व प्रजेचा पराभव करु शकलो. 34 त्याच्या कक्षेतील सर्व नगरांचा आम्ही ताबा घेतला.पुरुष,स्त्रिया,मुलेबाळे कोणालाही जिवंत ठेवले नाही. 35 तेथील पशुधन आणि मौल्यवान चिजा मात्र आम्ही आमच्यासाठी घेतल्या. 36 आर्णोन खोऱ्याच्या कडेला वसलेले अरोएर नगर, खोऱ्याच्या मध्यावरील एकनगर तसेच आर्णोन खोरे ते गिलाद या टापूतील सर्व नगरे, परमेश्वर आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही जिंकून घेतली. आम्हाला दुर्गम असे एकही नगर नव्हते. 37 अम्मोन्यांचा प्रदेश वगळता फक्त यब्बोक नदीच्या किनाऱ्यावर तसेच डोंगराळ प्रदेशातील नगरांकडे आम्ही मोर्चा वळवला नाही. कारण आमच्या परमेश्वराने तेथे जाण्यास बंदी केली होती.
आसाफाचे स्तोत्र
83 देवा, गप्प राहू नकोस.
तुझे कान बंद करु नकोस.
देवा, कृपा करुन काही तरी बोल.
2 देवा, तुझे शत्रू तुझ्याविरुध्द योजना आखत आहेत.
ते लवकरच हल्ला करतील.
3 ते तुझ्या लोकांविरुध्द गुप्त योजना आखत आहेत.
ते तू ज्या माणसांवर प्रेम करतोस त्या माणसांविरुध्दच्या योजनाची चर्चा करत आहेत.
4 ते शत्रू म्हणत आहेत, “या त्यांचा पूर्णनिपात करु.
यानंतर कोणालाही ‘इस्राएल’ या शब्दाची आठवण सुध्दा येणार नाही.”
5 देवा, ते सगळे लोक तुझ्याविरुध्द आणि
तू आमच्याशी केलेल्या करारा विरुध्द लढण्यासाठी एकत्र आले.
6-7 ते शत्रू आमच्याशी लढण्यासाठी एकत्र आले,
अदोम आणि इश्माएलीचे लोक, मवाब आणि हागारचे वंशज गाबाल,
अम्मोन अमालेकचे लोक, पलेशेथ आणि सोरचे लोक.
ते सगळे लोक आमच्याशी लढायला एकत्र आले.
8 अश्शूरही त्यांना मिळाले.
त्यांनी लोटाच्या वंशजांना खूप बलशाली बनवले.
9 देवा, तू जसा मिद्यानचा, सीसरा व याबीन यांचा
किशोन नदीजवळ पराभव केलास तसाच तू शत्रूचा पराभव कर.
10 तू त्यांचा एन-दोर येथे पराभव केलास
आणि त्यांची प्रेते जमिनीवर कुजली आणि त्यांचे खत बनले.
11 देवा, शत्रूच्या प्रमुखाचा पराभव कर.
तू ओरेब व जेब यांचे जे केलेस तेच त्यांचेही कर जेबह व सलमुन्ना यांचे जे केलेस तसेच त्यांचे ही कर.
12 देवा, ते लोक आम्हाला जबरदस्तीने तुझ्या वस्तीवरुन जायला सांगत होते
म्हणजे त्यांना तिचा ताबा घेता येईल.
13 देवा, तू त्यांना गवतासारखे वाऱ्यावर उडवून लाव वाऱ्याने
वाळलेलं गवत इतरत्र पसरतं तस तू त्यांना पसरवून दे.
14 अग्नी जसा जंगलाचा व डोंगराचा नाश करतो
तसा तू शत्रूचा नाश कर.
15 देवा, वादळात धूळ जशी उडून जाते, तसे तू त्या लोकांचा पाठलाग करुन त्यांना उडवून लाव.
त्यांना गदगदा हलव आणि तुफानात उडवून दे.
16 देवा, आपण खरोखरच अशक्त आहोत हे त्यांना कळून येऊ दे.
नंतर त्यांना तुझ्या नावाचा धावा करायची इच्छा होईल.
17 देवा, त्या लोकांना खूप घाबरवून सोड आणि त्यांना कायमचे लज्जित कर.
त्यांना काळीमा फास आणि त्यांचा नाश कर.
18 नंतर त्यांना तू देव आहेस हे कळेल.
तुझे नाव यहोवा आहे हे त्यांना कळेल.
तू सर्वशक्तिमान देवच सर्व जगाचा देव आहेस
हे ही त्यांना कळेल.
प्रमुख गायकासाठी गित्तीथच्या चालीवर बसवलेले कोरहाच्या मुलांचे स्तुतिगीत.
84 सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझे मंदिर खरोखरच सुंदर आहे.
2 परमेश्वरा, मला वाट पहाण्याचा मनस्वी कंटाळा आला आहे.
मला तुझ्या मंदिरात यायचे आहे.
माझ्यातला कण कण जिवंत देवाजवळ जायला उत्सुक आहे.
3 सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, चिमण्यांना
आणि पाकोळ्यांना देखील घरे असतात.
ते पक्षी तुझ्या सिंहासनाजवळ त्यांचे घरटे बांधतात
आणि तिथे त्यांना पिल्ले होतात.
4 तुझ्या मंदिरात राहाणारे लोक खूप सुखी असतात.
ते नेहमी तुझी स्तुती करतात.
5 जे लोक तुला त्यांच्या शक्तीचा स्त्रोत मानतात ते खूप सुखी असतात,
ते तुला त्यांचे नेतृत्व करु देतात. [a]
6 ते बाका दरीतून जातात तेव्हा देव तिला
झऱ्याचे शिशिरातल्या पावसाने निर्माण
केलेल्या जलाशयांचे स्वरुप देतो. [b]
7 लोक देवाला भेटण्यासाठी सियोनाला जाताना
एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात.
8 सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक
याकोबाच्या देवा, माझे ऐक.
9 देवा, आमच्या रक्षणकर्त्याचे रक्षण कर.
तू निवडलेल्या राजाला दया दाखव.
10 तुझ्या मंदिरातला एक दिवस इतर ठिकाणच्या हजार दिवसांपेक्षा चांगला आहे.
माझ्या देवाच्या प्रवेशद्वारापाशी उभे राहाणे हे वाईट माणसाच्या घरात राहाण्यापेक्षा चांगले आहे.
11 परमेश्वर आमचा रक्षणकर्ता आणि आमचा गौरवशाली राजा आहे.
देव आम्हाला दयेचा आणि गौरवाचा आशीर्वाद देतो
जे लोक परमेश्वराची प्रार्थना करतात
आणि त्याचे ऐकतात त्यांना परमेश्वर प्रत्येक चांगली गोष्ट देतो.
12 सर्वशक्तिमान परमेश्वरा,
जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात ते खरोखरच सुखी असतात.
इस्राएलने देवावर विश्वास ठेवावा, मिसरवर नाही
30 परमेश्वर म्हणतो, “ह्या मुलांकडे पाहा! ती माझ्या आज्ञा पाळत नाहीत. ते योजना करतात, पण माझी मदत मागत नाहीत. ते इतर लोकांबरोबर मैत्रीचा करार करतात. पण माझ्या आत्म्याला तो नको असतो. हे लोक त्यांच्या पापात आणखी भर घालीत आहेत. 2 ही मुले मिसरकडे मदत मागायला जात आहेत. पण ते जे करीत आहेत, ते योग्य आहे का; असे मला विचारावे, असे त्यांना वाटत नाही. फारो त्यांचा बचाव करील असे त्यांना वाटते. मिसरने त्यांचे रक्षण करावे अशी त्यांची इच्छा आहे.
3 “पण मी सांगतो की मिसरमध्ये लपण्याने तुमचा काही फायदा होणार नाही. मिसर तुमचे रक्षण करू शकणार नाही. 4 तुमचे नेते सोअनला आणि तुमचे राजदूत हानेसला गेले आहेत. 5 पण त्यांची निराशा होईल. त्यांना मदत करू न शकणाऱ्या देशावर ते विसंबले आहेत. मिसर काहीच उपयोगाचा नाही. मिसर काही मदत करणार नाही. उलट तो तुम्हाला लज्जित व ओशाळवाणे करील.”
यहुदाविषयी देवाचा संदेश
6 नेगेवमधल्या प्राण्यांविषयी शोक संदेश:
नेगेव ही धोकादायक जागा आहे. ही भूमी सिंह, फुरसे व उडणारे साप ह्यांनी व्यापलेली आहे. पण काही लोक नेगेवमधूनच प्रवास करीत आहेत. ते मिसरला जात आहेत. त्यांनी आपली धन संपत्ती गाढवांवर व उटांवर लादली आहे. ह्याचा अर्थ त्यांना मदत न करू शकणाऱ्या राष्ट्रांवर ते विसंबले आहेत. 7 मिसरला काही अर्थ नाही. मिसरच्या मदतीला काही किंमत नाही. म्हणून मी मिसरला “स्वस्थ बसणारा रहाब” असे म्हणतो.
8 आता तू हे पाटीवर लिही म्हणजे सर्व लोकांना ते दिसेल आणि हे तू पुस्तकातही लिही म्हणजे भविष्यात दूर असलेल्या शेवटच्या दिवसांसाठी ते उपयोगी पडेल.
9 पालकांचे न ऐकणाऱ्या मुलांसारखे हे लोक आहेत. ते खोटे बोलतात आणि परमेश्वराच्या शिकवणुकीकडे लक्ष देण्यास नकार देतात. 10 ते संदेष्ट्यांना म्हणतात, “आम्ही काय करावे हे तुम्ही दिव्य दृष्टीने पाहू नका. आम्हाला सत्य सांगू नका. आम्हाला बऱ्यावाटतील, आवडतील अशाच गोष्टी सांगा, आमच्यासाठी फक्त चागंल्याच गोष्टी तुमच्या दिव्य दृष्टीने बघा. 11 खऱ्या घडणाऱ्या गोष्टी बघायचे टाळा. आमच्या रस्त्यातून दूर व्हा. इस्राएलच्या पवित्र देवाबद्दल आमच्याशी बोलू नका.”
यहुदाला फक्त देवाकडूनच मदत मिळते
12 इस्राएलचा पवित्र देव म्हणतो, “परमेश्वराने दिलेला संदेश तुम्ही स्वीकारायचे नाकारले आहे. तुम्ही लोक जुलूम व कपट यांवर विसंबून राहता. 13 लढाया व खोटेपणा करून तुम्ही अपराध केला आहे म्हणून तडे गेलेल्या उंच भिंतीप्रमाणे तुमची स्थिती होईल ही भिंत पडेल व तिचे तुकडे तुकडे होतील. 14 तुमची स्थिती मातीच्या बरणीप्रमाणे होईल. ही बरणी फुटल्यास तिचा चक्काचूर होतो. हे बारीक तुकडे काही उपयोगाचे नसतात. ह्या तुकड्यांनी तुम्ही विस्तवातले निखारे काढू शकत नाही. किंवा डोहातले पाणी काढू शकत नाही.”
15 परमेश्वर, माझा प्रभू, इस्राएलचा पवित्र देव म्हणतो, “तुम्ही मला शरण आलात, तर तुम्ही वाचाल. शांतता आणि विश्वास हीच तुमची शक्ती आहे.”
पण तुम्हाला हेच नको आहे. 16 तुम्ही म्हणता, “नाही! आम्हाला पळून जायला घोडे हवेत.” ते खरेच आहे. तुम्हाला घोड्यांवरून पळून जावे लागेल. पण शत्रू तुमचा पाठलाग करील. शत्रूचा वेग तुमच्यापेक्षा जास्त असेल. 17 शत्रूपक्षातील एकाने धमकी दिल्यास तुमची हजारो माणसे पळून जातील. पाचजणांनी धमकी दिल्यास तुमचे सर्वच लोक पळून जातील. तुमच्या सैन्यातील फक्त एकच गोष्ट शिल्लक राहील. व ती म्हणजे टेकडीवरचा ध्वजस्तंभ.
देव त्याच्या लोकांना मदत करील
18 तुमच्यावर दया करण्याची परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वर वाट पाहत आहे. परमेश्वराला प्रकट होऊन तुमचे सांत्वन करायचे आहे. परमेश्वर देव न्यायी आहे. त्याच्या मदतीची इच्छा करणाऱ्या प्रत्येक माणसाला तो आशीर्वाद देईल.
19 यरूशलेमच्या सियोन डोंगरावर परमेश्वराची माणसे राहतील. तुमचा शोक थांबेल तुमचे रडणे परमेश्वर ऐकेल व तुमचे सांत्वन करील. परमेश्वर तुमचे म्हणणे ऐकेल आणि तुम्हाला मदत करील.
20 माझ्या प्रभूने, देवाने, पूर्वी तुम्हाला दु:ख व यातना दिल्या. त्या रोजच्या भाकरीसारख्या व पाण्यासारख्याच होत्या. देव तुमचा शिक्षक आहे आता यापुढे तो तुमच्यापासून लपून शहाणार नाही. तुम्ही त्याला तुमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहाल. 21 नंतर, जर तुम्ही चुकलात आणि चुकीच्या मार्गाने गेलात (डावीकडे वा उजवीकडे) तर तुमच्या मागून आवाज येईल, “हा मार्ग बरोबर आहे. तुम्ही ह्या मार्गाने जावे.”
22 तुमच्या मूर्ती सोन्या-चांदीने मढविलेल्या आहेत. ह्या खोट्या देवांनी तुम्हाला पापांच्या घाणीत लोटले आहे. पण तुम्ही त्यांची पूजा करण्याचे सोडून द्याल. तुम्ही त्या देवांना कचऱ्याप्रमाणे वा विटाळाच्या कपड्यांप्रमाणे फेकून द्याल. [a]
23 त्या वेळेला परमेश्वर पाऊस पाडील. तुम्ही बी पेराल आणि भूमी तुम्हाला अन्न देईल. त्या वेळी पीक मुबलक येईल. तुमच्या गुरांना भरपूर चारा मिळेल. मेंढ्यांना चरायला खूप मोठे रान मिळेल. 24 तुमच्या गुरांना आणि गाढवांना भरपूर आंबोण मिळेल. सगळीकडे अन्नधान्याचा सुकाळ होईल. गुरांपुढे आंबोण पसरण्यासाठी तुम्हाला कुदळफावड्याचा उपयोग करावा लागेल. 25 प्रत्येक डोंगरावरून, प्रत्येक टेकडीवरून पाण्याचे झरे वाहतील. पुष्कळ लोक मारले गेल्यावर आणि बुरूज ढासळल्यावर हे सर्व घडून येईल.
26 त्या वेळी, चंद्राचा प्रकाश सूर्यप्रकाशाप्रमाणे प्रखर होईल आणि सूर्यप्रकाश आतापेक्षा सातपट प्रखर होईल. एकादिवसाचा सूर्यप्रकाशआठवड्यातील सूर्यप्रकांशाइतका असेल. परमेश्वर जेंव्हा त्याच्या जखमी लोकांना मलमपट्टी करील आणि माराने झालेल्या त्यांच्या जखमा बऱ्या करील तेव्हा असे घडेल.
27 पाहा! परमेश्वराचे नाव दुरवरून येत आहे, दाट धुराचे ढग पसरविणाऱ्या आगीप्रमाणे त्याचा राग आहे. परमेश्वराचे तोंड रागाने भरले आहे. त्याची जीभ ज्वालेप्रमाणे दिसत आहे. 28 परमेश्वराचा श्वास (आत्मा), पाणी वाढत जाऊन गळ्यापर्यंत पोहोचणाऱ्या एखाद्या मोठ्या नदीप्रमाणे आहे. परमेश्वर राष्ट्रांचा न्याय करील. हा न्याय कसा असेल? तर “नाशाच्या चाळणीतून” राष्ट्रांना चाळून काढल्याप्रमाणे तो असेल. जसे लगाम घालून जनावरांना ताब्यात ठेवले जाते तसे लोकांना लगाम घालून परमेश्वर नियंत्रणात ठेवील.
29 त्या वेळेला तुम्ही आनंदगीते गाल. सुट्टीच्या दिवसांतील रात्रीप्रमाणे हा काळ असेल. परमेश्वराच्या डोंगरावर जाताना तुम्हाला आनंद वाटतो, इस्राएलच्या खडकाकडे जाताना (परमेश्वराच्या उपासनेला जाताना) बासरीचा स्वर ऐकून तुम्हाला हर्ष होतो, तसाच हा आनंद असेल.
30 परमेश्वर आपला प्रचंड आवाज लोकांना ऐकायला भाग पाडील. परमेश्वराचा शक्तिशाली हात रागाने खाली पृथ्वीवर येताना पाहण्यास परमेश्वर लोकांना भाग पाडेल. सर्व जाळून टाकणाऱ्या अग्नीप्रमाणे हा हात असेल. मुसळधार पाऊस व गारपीट करणाऱ्या वादळाप्रमाणे देवाचे सामर्थ्य असेल. 31 परमेश्वराचा आवाज ऐकून अश्शूर घाबरून जाईल. परमेश्वर दंडाने अश्शूरला मारील. 32 डफावर व सारंगीवर संगीत वाजवावे तसे परमेश्वर अश्शूरला मारील. आपल्या हाताने शक्तीने परमेश्वर अश्शूरचा पराभव करील.
33 पूर्वीपासून तोफेत तयार करून ठेवले आहे. ते राजासाठी तयार केले आहे. ते पुष्कळ खोल आणि रूंद केले आहे. त्यात लाकडाचा ढीग आणि विस्तव आहे. परमेश्वराचा श्वास (आत्मा) जळत्या गंधकाच्या प्रवाहाप्रमाणे येऊन ते जाळून टाकील.
1 येशू ख्रिस्ताचा सेवक आणि याकोबाचा भाऊ असलेल्या यहूदाकडून, देवाने ज्या तुम्हांला पाचारण केले आहे त्यांस, देवपिता तुमच्यावर प्रीती करतो व येशू ख्रिस्ताद्वारे तुम्ही सुरक्षित ठेवले जात आहात.
2 देवाची करुणा, शांति आणि प्रीती तुम्हांला अधिकाधिक लाभो.
जे चुका करतात त्यांना देव शिक्षा करील
3 प्रिय मित्रांनो, जरी मली तुम्हांला आपल्या समाईक तारणाविषयी लिहिण्याची आतुरतेने तयारी करीत होतो तरी एका गोष्टीविषयी मला लिहावेसे वाटते. ते म्हणजे देवाने आपल्या संतांना, एकदा दिलेला विश्वास टिकविण्यासाठी लढत राहा. 4 याचे कारण ज्यांच्याविषयी पवित्र शास्त्रात फार पूर्वीच लिहिले आहे की अशी माणसे तुमच्यात चोरुन शिरली आहेत, ते अधार्मिक लोक आहेत. अनीतीने वागण्यासाठी देवाची दया हे निमित आहे असे ते मानतात. आणि आमचा प्रभु व एकमेव धनी अशा प्रभु येशू ख्रिस्ताला ते मानत नाहीत. जी शिक्षेसाठी यापूर्वीच नेमलेली होती, अशी ही माणसे आहेत.
5 जरी तुम्हांला या गोष्टी माहीत असल्या तरी मला तुम्हांला आठवण करुन द्यावीशी वाटते की, ज्या प्रभूने आपल्या लोकांना एकदा इजिप्त देशातून सोडवून आणल्यानंतर ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवण्याचे नाकारले; अशांचा त्याने नंतर नाश केला, 6 तसेच ज्या देवदूतांनी आपली सार्वभौम सत्ता टिकवली नाही, परंतु आपली रहाण्याची जागा सोडून दिली, त्यांची देखील तुम्हाला आठवण करुन द्यायला पाहिजे. देवाने त्यांना सर्वकालच्या बंधनांनी जखडून काळोखात ठेवले यासाठी की शेवटच्या महान दिवशी त्यांचा न्याय करता यावा. 7 त्याचप्रमाणे, या देवदूतांसारखीच सदोम व गमोरा आणि त्या शहराच्या आसपासच्या नगरांनी लैंगिक अनीतीचे आचरण केले आणि अस्वभाविक लैंगिक संबंधांच्या मागे ती लागली. अनंतकाळच्या अग्निच्या शिक्षेसाठी ती राखून ठेवली आहेत. एक उदाहरण म्हणून ती आपल्यासमोर ठेवली आहेत. 8 अगदी तशाच प्रकारे, हे लोक जे तुमच्या गटात आले ते स्वप्नांनी बहकले व त्यांनी आपली शरीरे विटाळली आहेत. ते प्रभूचा अधिकार बाजूला ठेवतात व ते गौरवी थोरामोठ्यांविरुद्ध (देवदूतांविरुद्ध) निंदानालस्तीची भाषा वापरतात. 9 मीखाएल जो मुख्य देवदूत, याने जेव्हा मोशेच्या शरीराविषयी सैतानाबरोबर वाद घातला तेव्हा त्यानेसुद्धा त्याच्याविरुद्ध अपमानस्पद आरोप करण्याचे धाडस केले नाही. तो फक्त म्हणाला, “प्रभू तुला धमकावो.”
10 पण हे लोक, ज्या गोष्टी त्यांना समजत नाहीत त्यांची हे निंदा करतात. आणि जनावरासारखे केवळ मूळ स्वभावाला अनुसरुन जे काही त्यांना समजते. अगदी त्याच गोष्टीमुळे ते नाश पावतात. 11 या लोकांसाठी हे फार वाइट आहे! काईनाने जो मार्ग धरला तोच यांनी धरलेला आहे. आपला फायदा व्हावा म्हणून ते बलामाप्रमाणे गोंधळून मोकाट धावत सुटले आहेत आणि कोरहाच्या बंडाळीत भाग घेणाऱ्या लोकांचा नाश झाला तसाच या लोकांचा देखील नाश होत आहे.
12 हे लोक तुमच्या भातामध्ये दडलेले धोकादायक खडे, असल्यासारखे आहेत. ते खुशाल तुमच्याबरोबर जेवणखाणे करतात, ते फक्त स्वतःच चरत राहाणारे असे मेंढपाळ आहेत, ते पाणी नसलेल्या ढगांसारखे असून ते वाऱ्यामुळे वाहवत जातात. ते लोक म्हणजे हिवाळ्यातील फळहीन व समूळ उपटली गेलेली आणि दोनदा मेलेली झाडे आहेत. 13 ते लोक आपल्या लज्जास्पद कामामुळे फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटांप्रमाणे आहेत, ते जणू काळ्याकुटृ अंधारात दडलेले तारे असे आहेत.
14 हनोख, आदामापासूनचा सातवा मनुष्य यानेसुद्धा या लोकांविषयी असेच भाकीत केले आहे: “पाहा हजारो पवित्र देवदूतांसह प्रभु येत आहे. 15 तो अखिल जगातील लोकांचा न्याय करील आणि सर्व लोकांना त्यांनी केलेल्या अधर्माच्या कामासाठी आणि देवाची चाड न बाळगणाऱ्या पापी लोकांनी त्याच्याविरुद्ध जे कठोर, वाईट शब्द आपल्या तोंडावाटे काढले त्याकरीता तो त्यांना दोषी ठरवील.”
16 हे लोक कुरकुर करणारे व दोष दाखविणारे आहेत, ते आपल्या वासनांप्रमाणे चालणारे आणि आपल्या तोंडाने बढाया मारणारे लोक आहेत, ते आपल्या फायद्यासाठी इतरांशी तोंडपूजेपणा करतात.
सावधानतेचा इशारा आणि करावयाच्या गोष्टी
17 पण, तुम्ही प्रियजनहो, आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेले शब्द आठवा. 18 त्यांनी सांगितले, “काळाच्या शेवटी देवाविषयी थट्टेने बोलणारे लोक असतील, ते त्यांच्या स्वतःच्याच अधार्मिक इच्छांच्या मागे जातील.” 19 असे लोक फूट पाडतात. ते त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे चालतात. त्यांना आत्मा नाही.
20 पण तुम्ही प्रिय मित्रांनो, आपल्यापवित्र शिकविण्यात आलेल्या विश्वासात परस्परांना आध्यात्मिक रीतीने बळकट करा. पवित्र आत्म्याने युक्त होऊन प्रार्थना करा. 21 आणि तुम्हांला अनंतकाळच्या जीवनात घेऊन जाणाऱ्या आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या कृपेची वाट पाहत, देवाच्या प्रीतीत स्वतःला राखा.
22 विश्वासात डळमळीत असलेल्या लोकांवर दया करा. 23 त्यांना अग्नीतून ओढून काढून वाचवा. पण दया दाखविण्याच्या वेळी काळजी घ्या. आणि त्यांच्या दैहिक पापामुळे मळीन झालेल्या कपड्यांचा तिरस्कार करा.
देवाची स्तुति करा
24 आता, तुम्ही पडू नये म्हणून तुम्हाला राखावयास जो समर्थ आहे आणि तुम्हाला आपल्या गौरवी समक्षतेत शुद्ध असे सादर करायला जो मोठ्या आनंदाने तयार आहे, त्याला आणि आपले तारण करणारा जो 25 एकच देव आहे, त्याला आपला प्रभु येशू ख्रिस्त याच्याद्वारे गौरव, मान, पराक्रम आणि अधिकार काल, आज आणि अनंतकाळ असो. आमेन.
2006 by World Bible Translation Center