M’Cheyne Bible Reading Plan
सलाफहादच्या मुलींची जमीन
36 मनश्शे योसेफचा मुलगा होता. माखिर मनश्शेचा मुलगा होता. गिलाद माखिरचा मुलगा होता. गिलादच्या कुटुंबातील प्रमुख लोक मोशेशी व इस्राएलच्या कुटुंबातील प्रमुखांशी बोलायला गेले. 2 ते म्हणाले, “परमेश्वराने आम्हाला चिठ्या टाकून आमची जमीन घेण्याची आज्ञा केली आहे. आणि परमेश्वराने सलाफहादची जमीन त्याच्या मुलींना द्यायची आज्ञा केली आहे. सलाफहाद आमचा भाऊ होता. 3 कदाचित दुसऱ्या कुटुंबातील एखादा माणूस सलाफहादच्या एका मुलीशी लग्न करील तर ती जमीन आमच्या कुटुंबातून जाईल. ती जमीन त्या दुसऱ्या कुटुंबाकडे जाईल का? चिठ्या टाकून मिळालेली आमची जमीन आम्हाला दुरावणार का? 4 लोक त्यांची जमीन विकतील सुद्धा. पण पन्नासव्या वर्षात सर्व जमीन ज्या कुटुंबाची होती त्या कुटुंबाला परत केली जाते त्यावेळी सलाफहादची जमीन कोणाला मिळेल? ती जमीन आमच्या कुटुंबाकडून कायमचीच जाईल का?”
5 मोशेने इस्राएल लोकांना ही आज्ञा केली: ही परमेश्वराची आज्ञा होती, “योसेफच्या कुटुंबातील ह्या लोकांचे म्हणणे बरोबर आहे. 6 सलाफहादच्या मुलींसाठी परमेश्वराची ही आज्ञा आहे: जर तुम्हाला कोणशी लग्न करायचे असेल तर तुम्ही तुमच्या कुळातील कोणाशी तरी लग्न करा. 7 यामुळे इस्राएल लोकांमध्ये जमीन एका कुळाकडून दुसऱ्या कुळाकडे जाणार नाही. आणि प्रत्येक इस्राएली माणसाला त्याच्या पूर्वजांकडून मिळालेली जमीन ठेवता येईल. 8 आणि जर एखाद्या स्त्रीला तिच्या वडिलांकडून जमीन मिळाली तर तिने तिच्या कुळातील एखाद्याशीच लग्न केले पाहिजे. यामुळे प्रत्येकाला पूर्वजांकडून मिळालेली जमीन ठेवता येईल. 9 तेव्हा इस्राएल लोकांमध्ये जमीन एक कुळाकडून दुसऱ्या कुळाकडे जाऊ शकणार नाही. प्रत्येक इस्राएली माणूस त्याच्या पूर्वजांकडून मिळालेली जमीन जवळ बाळगू शकेल.”
10 सलाफहादच्या मुलींनी परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञांचे पालन केले. 11 म्हणून सलाफहादच्या महाला, तिरसा, होग्ला, मिल्का व नोआ यांनी त्यांच्या चुलत भावांशी लग्न केले. 12 त्यांचे नवरे मनश्शेच्या कुळातील होते. म्हणून त्याची जमीन त्यांच्या वडिलांच्या कुळाकडेच राहिली.
13 परमेश्वराने यार्देन नदीजवळ मवाबमधील पलीकडे मोशेला दिलेल्या या आज्ञा आहेत.
प्रमुख गायकासाठी “भूकमळे” या चालीवर बसवलेले आसाफाचे स्तोत्र.
80 इस्राएलाच्या मेंढपाळा, माझे ऐक.
तू योसेफाच्या मेंढ्यांना (माणासांना) मार्ग दाखवतोस.
राजा म्हणून तू करुबांच्या आसनावर बसतोस.
आम्हाला तुला बघू दे.
2 इस्राएलाच्या मेंढपाळा, तुझे मोठेपण एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर दाखव.
ये आणि आम्हाला वाचव.
3 देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर
आणि आम्हाला वाचव.
4 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, तू आमच्या प्रार्थना कधी ऐकशील?
आमच्यावर तू सदैव रागावलेलाच राहाणार आहेस का?
5 तू तुझ्या लोकांना अन्न म्हणून अश्रू दिलेस.
तेच त्यांचे प्यायचे पाणी होते.
6 तू आम्हाला आमच्या शेजाऱ्यांच्या भांडणाचे निमित्त केलेस.
आमचे शत्रू आम्हाला हसतात.
7 सर्वशक्तिमान देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर.
आमचा स्वीकार कर आणि आम्हाला वाचव.
8 भूतकाळात तू आम्हाला अतिशय महत्वाच्या वनस्पती सारखे वागवलेस.
तू तुझी ही “वेल” मिसर देशाच्याबाहेर आणलीस.
तू इतर लोकांना ही जमीन सोडून जायला भाग पाडलेस
आणि तू तुझी “वेल” इथे लावलीस.
9 तू त्या “वेलीसाठी” जमीन तयार केलीस.
त्या “वेलीची” मुळं जोमाने वाढावीत म्हणून प्रयत्न केलेस.
थोड्याच अवधीत ती वेल सर्व देशभर पसरली.
10 तिने डोंगरांना आच्छादून टाकले,
मोठ्या देवदारुच्या वृक्षांवर सुध्दा तिच्या पानांनी छाया घातली.
11 तिच्या वेली भूमध्य समुद्रापर्यंत पसरल्या,
तिचे कोंब युफ्रेटस नदीपर्यंत गेले.
12 देवा, तुझ्या “वेलीचे” रक्षण करणाऱ्या भिंती तू का पाडून टाकल्यास?
आता जो कोणी तिथून जातो तो तिची द्राक्षे तोडतो.
13 रानडुकरे येऊन तुझ्या “वेलीवर” चालतात.
रानटी पशू येतात आणि तिची पाने खातात.
14 सर्वशाक्तिमान देवा, परत ये स्वर्गातून खाली
तुझ्या “वेलीकडे” बघ आणि तिचे रक्षण कर.
15 देवा, तू तुझ्या हाताने कापलेल्या “वेलीकडे” बघ.
तू वाढवलेल्या तुझ्या लहान वेलाकडे बघ.
16 तुझी “वेल” वाळलेल्या शेणाप्रामाणे (गोवरीप्रमाणे) आगीत जळून गेली
तू तिच्यावर रागावला होतास आणि तू तिचा नाश केलास.
17 देवा, तुझ्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
तू वाढवलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
18 तो तुला सोडून परत जाणार नाही.
त्याला जगू दे आणि तो तुझ्या नावाचा धावा करेल.
19 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, आमच्याकडे परत ये.
आमचा स्वीकार कर. आम्हाला वाचव.
उत्तर इस्राएलला इशारा
28 शोमरोनकडे पाहा.
एफ्राइममधील मद्यप्यांना त्या शहराचा फार गर्व आहे.
आजूबाजूला सुपीक दरी असलेल्या टेकडीवर ते शहर वसले आहे.
शोमरोनमधील रहिवाशांना आपले शहर फुलांच्या सुंदर मुकुटाप्रमाणे वाटते.
पण ते मद्यपान करून धुंद झाले आहेत
आणि हा “सुंदर मुकुट” सुकून चालला आहे.
2 पाहा! माझ्या प्रभूकडे एक सशक्त व शूर वीर आहे.
तो गारपिटीप्रमाणे व पावसाच्या झडीप्रमाणे येईल.
वादळाप्रमाणे किंवा महापुराप्रमाणे तो या देशात येईल
आणि हा मुकुट (शोमरोन) धुळीत फेकून देईल.
3 एफ्राइममधील मद्यप्यांना “सुंदर मुकुटाप्रमाणे” असलेल्या त्यांच्या शहराचा अभिमान आहे,
पण ते शहर पायाखाली तुडविले जाईल.
4 सभोवती सुपीक दरी असलेल्या टेकडीवर ते शहर वसले आहे.
पण तो “सुंदर फुलांचा मुकुट” सुकत चालला आहे.
उन्हाळ्यात झाडावर प्रथम आलेल्या अंजिरांप्रमाणे ह्या शहराची स्थिती होईल.
जेव्हा माणूस झाडांवर अंजिरे पाहतो तेव्हा तो त्यांपैकी एक तोडतो आणि खाऊन टाकतो.
5 त्या वेळेला, सर्वशक्तिमान परमेश्वर स्वतः “सुंदर फुलांचा मुकुट” होईल. जे काही देवाला अनुसरणारे लोक म्हणजेच देवाचे लोक मागे उरले असतील, त्यांच्याकरिता देव “सुंदर फुलांचा मुकुट” होईल. 6 परमेश्वर, त्याच्या लोकांवर राज्य करणाऱ्या न्यायाधीशांना सद्बुध्दी देईल. वेशीपाशी लढणाऱ्या लोकांना परमेश्वर सामर्थ्य देईल. 7 पण सध्या ते नेते मद्याने धुंद झाले आहेत. याजक व संदेष्टे सर्वच जण द्राक्षरस व मद्य पिऊन धुंद झाले आहेत. ते अडखळून पडतात. संदेष्टे आपली स्वप्ने पाहताना मद्याच्या नशेत असतात. न्यायाधीश न्यायनिवाडा करताना मद्याच्या धुंदीत असतात. 8 सर्व मेज ओकारीने भरलेले आहेत. कोठेही स्वच्छ जागा राहिलेली नाही.
स्वतःच्या लोकांना मदत करण्याची देवाची इच्छा
9 लोकांना धडा शिकविण्याचा परमेश्वर प्रयत्न करीत आहे. त्याची शिकवण लोकांच्या लक्षात यावी म्हणून तो प्रयत्नशील आहे. पण लोक परवा परवापर्यंत आईचे दूध पिणाऱ्या तान्ह्या मुलांप्रमाणे वागतात; 10 म्हणून परमेश्वर लहान बाळांशी बोलावे तसा त्यांच्याशी बोलतो.
“एक हुकूम इकडे, एक हूकूम तिकडे;
एक नियम इकडे, एक नियम तिकडे,
एक धडा इकडे, एक धडा तिकडे.”j
11 परमेश्वर ह्या लोकांशी वेगळ्याच पध्दतीने बोलेल किंवा त्यांच्याशी वेगळ्याच भाषेचा वापर करील.
12 पूर्वीच्या काळी, देव लोकांना म्हणाला, “येथे विश्रांतीची जागा आहे. ही शांत जागा आहे. थकलेल्यांना येथे येऊन विश्रांती घेऊ द्या. ही शांतीची जागा आहे.”
पण लोकांनी देवाचे ऐकले नाही. 13 लोकांना देवाचे बोलणे परक्या भाषेसारखे अनाकलनीय वाटले.
“एक हुकूम इकडे, एक हुकूम तिकडे,
एक नियम इकडे, एक नियम तिकडे,
एक धडा इकडे; एक धडा तिकडे.”
लोकांनी स्वतःला पाहिजे ते केले. म्हणून ते मागे पडून पराभूत झाले, ते सापळ्यात अडकले आणि पकडले गेले.
देवाचा न्याय कोणाला चुकला नाही
14 यरूशलेमच्या नेत्यांनो, तुम्ही परमेश्वराचा संदेश ऐकावा पण सध्या तुम्ही त्याचे ऐकायचे नाकारता. 15 तुम्ही लोक म्हणता, “आम्ही मृत्यूबरोबर करारनामा केला आहे. अधोलोकाशी आम्ही करार केला आहे म्हणून आम्हांला शिक्षा होणार नाही. शिक्षा आमचे काही वाकडे करू शकणार नाही. कारण आम्ही कपट व असत्य यांच्यामागे लपून बसू.”
16 यासाठी परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “सियोनमध्ये मी कोनशिला बसवीन. हा एक अमूल्य दगड असेल. ह्या महत्वाच्या दगडावर सर्व बांधकाम उभारले जाईल. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची निराशा होणार नाही.
17 “भिंतीचा सरळपणा पाहण्यासाठी लोक जसा ओळंबा वापरतात, तसाच योग्य गोष्ट दाखविण्यासाठी मी न्यायबुध्दी व चांगुलपणा ह्यांचा वापर करीन.
“तुम्ही पापी, तुमच्या कपटाच्या व असत्याच्या मागे लपण्याचा प्रयत्न करता, पण तुम्हांला शिक्षा होईल. मी वादळाप्रमाणे अथवा पुराप्रमाणे येऊन तुमच्या लपायच्या जागा नष्ट करीन. 18 तुमचा मृत्यूशी असलेला करारनामा पुसला जाईल. अधोलोकाशी तुमचा झालेला करार तुम्हांला उपयोगी पडणार नाही.
“कोणीतरी येईल आणि तुम्हाला शिक्षा करील. तुमचा कचरा करून तुम्हाला पायाखाली तुडवील. 19 तो माणूस येऊन तुम्हाला घेऊन जाईल. तुमची शिक्षा भयंकर असेल. ती सकाळी सुरू होईल व रात्री उशिरापर्यंत चालू राहील.
20 “मग तुम्हांला पुढील कथा समजेल. एक माणूस त्याच्या उंचीच्या मानाने खूपच आखूड असलेल्या अंथरूणावर झोपायचा प्रयत्न करत होता. त्याचे पांघरूणसुध्दा त्याला पूर्ण पणे पांघरता येईल इतपत रूंद नव्हते. त्याचे अंथरूण आणि पांघरूण दोन्ही निरूपयोगी होती. अगदी त्याप्रमाणे तुमचे करार निरूपयोगी ठरलेले आहेत.”
21 परासीम डोंगरावरच्या प्रमाणे परमेश्वर लढाई करील. गीबोन दरीत ज्याप्रमाणे तो रागावला होता त्याप्रमाणे तो रागावेल. [a] नंतर परमेश्वर त्याला पाहिजे ते घडवून आणील. तो काही विलक्षण गोष्टी करील, पण तो त्याचे काम तडीस नेईल. परमेश्वराचे कार्य अगाध आहे. 22 आता तुम्ही त्या गोष्टीविरूध्द् लढू नका. लढलात तर तुमच्या भोवतीची फास अधिक आवळला जाईल.
मी ऐकलेल्या शब्दांत फरक होणार नाही. सर्वशक्तिमान परमेश्वराच्या, पृथ्वीच्या नियंत्याच्या, तोंडचे हे शब्द आहेत म्हणून त्या गोष्टी घडून येतीलच.
देव योग्य शिक्षा करतो
23 मी सांगत असलेला संदेश लक्षपूर्वक ऐका. 24 शेतकरी सतत शेत नांगरतो का? नाही. तो सतत मशागत करतो का? नाही. 25 तो जमिनीची मशागत करतो आणि मग पेरणी करतो. तो निरनिराळ्या बियांची पेरणी निरनिराळ्या तऱ्हेने करतो. तो बडिशेप विखरून टाकतो, जिरे शेतात फेकतो तर गहू ओळीत पेरतो. तो सातू विशिष्ट जागेत पेरतो तर शेताच्याकडेला काठ्या गहू पेरतो.
26 तुम्हाला शिकविण्यासाठी आमचा देव उदाहरणे देत आहे. ह्यावरून दिसून येईल की देव विवेकबुध्दीने लोकांना शिक्षा करतो. 27 मोठ्या दातेरी फळीने शेतकरी बडिशेप मळतो का? नाही. मोहरी मळण्यासाठी शेतकरी त्यावरून गाडीचे चाक फिरवितो का? नाही. शेतकरी बडिशेप व मोहरी मळण्यासाठी लहान काठी वापरतो. 28 पाव करताना बाई पीठ मळते पण सारखी सारखी ते तिंबत नाही. परमेश्वर लोकांना शिक्षा करताना असेच करतो. तो गाडीचे चाक अंगावर घालण्याची त्यांना भीती दाखविल पण पूर्णपणे चिरडून टाकणार नाही. तो घोड्यांच्या टापांखाली त्यांना तुडवू देणार नाही. 29 हा धडा सर्वशक्तिमान परमेश्वराने स्वतः दिला आहे. देव चांगलाच सल्ला देतो. तो खरोखरच ज्ञानी आहे.
1 वडिलाकडून, [a] देवाने निवडलेल्या बाईना [b] व तिच्या मुलांना, सत्यात सहभागी असलेल्या लोकांप्रमाणे ज्यांच्यावर मी प्रीति करतो, आणि तुमच्यावर प्रीति करणारा मी एकटाच नाही, तर ज्यांची सत्याशी ओळख झाली आहे असे सर्वजणसुद्धा प्रीति करतात. 2 या सत्यामुळे जे आमच्यामध्ये असते, ते आमच्यामध्ये अनंतकाळपर्यंत राहील.
3 देवपित्यापासून आणि पित्याचा पुत्र प्रभु येशू ख्रिस्त याजपासून कृपा, दया व शांति ही सत्यात व प्रीतित आपणबरोबर राहोत.
4 पित्याने आपल्याला दिलेल्या आज्ञेप्रमाणे तुमची काही मुले सत्यात चालतात असे मला दिसून आले म्हणून मला फार आनंद झाला. 5 आणि आता, बाई, कुरिया, मी तुला नम्रपणे विनंति करतो की, आपण एकमेकांवर प्रीति करावी. मी ही तुला नवी आज्ञा करतो असे नाही, तर जी प्रारंभापासून तुला देण्यात आलेली होती, 6 आणि त्याच्या आज्ञेत राहणे म्हणजेच प्रीति करणे होय. हीच आज्ञा आहे जी तुम्ही सुरुवातीपासून ऐकली आहे: की तुम्ही प्रीतीचे जीवन जगावे.
7 येशू मानवी देह धारण करुन या जगात आला या गोष्टीवर विश्वास न ठेवणारे अनेक फसवे भोंदू लोक जगात निघाले आहेत. असा फसविणारा भोंदू मनुष्य हाच ख्रिस्तविरोधी होय. 8 सावध असा! यासाठी की ज्यासाठी आम्ही काम केले ते तुम्ही हातचे जाऊ देऊ नये तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हांला मिळावे.
9 जो मनुष्य ख्रिस्ताविषयीच्या शिकवणुकीप्रमाणे चालत नाही, तर तिचे उल्लंघन करतो, त्याला देव मिळाला नाही. जो कोणी ख्रिस्ताविषयीच्या शिकवणुकीप्रमाणे चालतो त्याला देवपिता व पुत्र असे दोन्ही मिळाले आहेत. 10 जर एखादा मनुष्य तुमच्या घरी आला आणि ख्रिस्ताची शिकवण आचरणात आणीत नसला तर त्याला आपल्या घरात घेऊ नका. किंवा त्याला सलामही करु नका. 11 कारण अशा मनुष्याला जो कोणी सलाम करतो तो त्याच्या वाईट कामांमध्ये सहभागी होतो.
12 मला जरी अनेक गोष्टी तुम्हांला लिहायच्या आहेत तरी त्या तुम्हांला मी शाई व लेखणीने लिहू इच्छित नाही. तर त्याऐवजी तुम्हांला भेटावे व प्रत्यक्ष सर्व काही बोलावे अशी आशा मनात बाळगून आहे. म्हणजे आपला आनंद त्यामुळे परिपूर्ण होईल. 13 देवाने निवडून घेतलेल्या तुमच्या बहिणीची [c] मुले तुम्हांला सलाम सांगतात.
2006 by World Bible Translation Center