M’Cheyne Bible Reading Plan
इस्राएल लोक पौरला जातात
25 इस्राएल लोक शिद्दीमात रहात असताना त्यांनी मवाबच्या बायकांबरोबर लैंगिक पाप करायला सुरुवात केली. 2-3 मवाबच्या स्त्रियांनी पुरुषांना आमंत्रण दिले आणि त्यांच्या खोट्या देवतेच्या अर्पणात त्यांना भाग घ्यायला सांगितले. म्हणून इस्राएलचे लोक त्या खोट्या देवतेच्या उपासनेत भाग घेऊ लागले. त्या जागेत, इस्राएल लोकांनी बआल पौरट्ठ्या खोट्या देवताची उपासना करायला सुरुवात केली आणि परमेश्वर त्यांच्यावर खूप रागावला.
4 परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्या सर्व लोकांच्या पुढाऱ्यांना आण, नंतर त्यांना मारून टाक म्हणजे सर्व लोकांना दिसेल. [a] त्यांची प्रेते परमेश्वरासमोर ठेव. नंतर परमेश्वर सर्व इस्राएल लोकांना त्याचा राग दाखवणार नाही.”
5 मोशे इस्राएलच्या न्यायधिशांना म्हणाला, “तुमच्यापैकी प्रत्येकाने अशा कुटुंब प्रमुखाला शोधले पाहिजे की ज्याने लोकांना बआलपौरट्ठ्या खोट्या देवताची उपासना करायला भाग पाडले. नंतर तुम्ही त्या माणसांना मारून टाका.”
6 त्यावेळी मोशे आणि इस्राएलची वडीलधारी मंडळी (पुढारी) दर्शन मंडपाच्या प्रवेशद्वाराशी जमले होते. एका इस्राएली माणसाने एक मिद्यानी स्त्री त्यांच्यासमोर आपल्या भाऊंच्या घरी आणली. मोशे आणि इतर वडील धारी (पुढारी) यांनी ते पाहिले आणि ते खूप दु:खी झाले. 7 फिनहास हा एलाजारचा मुलगा आणि याजक अहरोन याचा नातू होता. फिनहासने या माणसाला त्या स्त्रीला आणताना पाहिले. म्हणून फिनहासने तंबू सोडला व त्याने त्याची बरची घेतली 8 त्याने त्या इस्राएली माणसाचा त्याच्या तंबूपर्यंत पाठलाग केला. नंतर त्याने त्या इस्राएली माणसाला व मिद्यानी स्त्रीला तिच्या मंडपात [b] मारण्यासाठी बरचीचा उपयोग केला. त्याने बरची त्या दोघांच्या शरीरात खुपसली. त्यावेळी इस्राएल लोकांमध्ये खूप मोठा आजार पसरला होता. पण फिनहासने त्या दोघांना मारल्यानंतर त्या आजाराचा प्रसार थांबला. 9 या आजारामुळे एकून 24,000 लोक मेले.
10 परमेश्वर मोशेला म्हणाला, 11 “माझ्या लोकांविषयी माझ्या भावना तीव्र आहेत. ते फक्त माझेच असावेत असे मला वाटते. एलाजारच्या मुलांने याजक अहरोनच्या नातवाने इस्राएल लोकांना माझ्या रागापासून वाचवले. माझ्या लोकांबद्दलच्या त्या भावना दाखवून त्याने हे केले म्हणून मला आधी वाटत होते त्याप्रमाणे मी आता त्या लोकांना मारणार नाही. 12 फिनिहासला सांग की मी त्याच्याबरोबर शांतिचा करार करीत आहे. 13 तो करार हा आहे: तो आणि त्याच्या नंतरचे त्याचे वंशज याजक होतील. कारण आपल्या देवाबद्दलच्या त्याच्या भावना खूप तीव्र होत्या. आणि त्याने ज्या गोष्टी केल्या त्यामुळे इस्राएलचे लोक शुद्ध झाले.”
14 मिद्यानी स्त्री बरोबर जो इस्राएली माणूस मारला गेला होता त्याचे नाव जिम्री होते. तो सालूचा मुलगा होता. तो शिमोनी वंशातील एका घराण्याचा प्रमुख होता. 15 आणि मारल्या गेलेल्या मिद्यानी स्त्रीचे नाव कजबी [c] होते. ती सूरची मुलगी होती. सूर मिद्यानी कुटुंबाचा प्रमुख होता व पुढारी होता.
16 परमेश्वर मोशेला म्हणाला: 17 “तू त्यांना ठार मारले पाहिजेस. मिद्यानचे लोक तुझे शत्रू आहेत. 18 तू त्यांना ठार मारले पाहिजेस. त्यांनी अगोदरच तुम्हाला त्यांचे शत्रू केले आहे त्यांनी तुला पिओर येथे फसवले आहे. आणि त्यांनी तुला कजबीच्या बाबतीतही नीचपणाने फसवले. ती मिद्यानच्या पुढाऱ्याची मुलगी होती. पण इस्राएल लोकांमध्ये आजार पसरला तेव्हा ती मारली गेली. बआल पौर या खोट्या देवतेची लोकांना फसवून उपासना करायला लावली म्हणून तो आजार इस्राएल लोकांमध्ये पसरला होता.”
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तुतिगीत
68 देवा, ऊठ आणि तुझ्या वैऱ्यांची दाणादाण उडव.
त्याचे सगळे वैरी त्याच्यापासून दूर पळोत.
2 तुझे वैरी वाऱ्यावर दूरवर जाणाऱ्या धुरासारखे दूरवर जावोत.
आगीत वितळणाऱ्या मेणाप्रमाणे तुझ्या वैऱ्यांचा सर्वनाश होवो.
3 परंतु चांगले लोक आनंदात आहेत.
चांगल्या लोकांचा देवाबरोबर आनंदात वेळ जातो.
चांगले लोक आनंदात जगतात आणि सुखी होतात.
4 देवासाठी गाणे म्हणा त्याच्या नावाचे गुणगान करा,
देवासाठी रस्ता तयार करा.
तो त्याच्या रथात बसून वाळवंटातून जातो त्याचे नाव याह आहे.
त्याच्या नावाची स्तुती करा.
5 देव त्याच्या पवित्र मंदिरात अनाथांचा बाप होतो.
तो विधवांची काळजी घेतो.
6 देव एकाकी लोकांना घर देतो,
देव त्याच्यामाणसांना तुंरुगातून बाहेर काढतो, ते फार आनंदी आहेत.
परंतु जे लोक देवाच्या विरुध्द जातात ते त्याच्या आगीसारख्या तुरुंगात राहातील.
7 देवा, तू तुझ्या माणसांना मिसरमधून बाहेर काढलेस.
तू वाळवंटातून चालत गेलास.
8 आणि भूमी थरथरली.
देव, इस्राएलचा देव सिनाय डोंगरावर आला आणि आकाश वितळायला लागले.
9 देवा, थकलेल्या जीर्ण झालेल्या भूमीला पुन्हा
शक्ती येण्यासाठी तू पाऊस पाठवलास.
10 तुझे प्राणी पुन्हा त्या ठिकाणी आले.
देवा, तू तिथल्या गरीब लोकांना बऱ्याच चांगल्या वस्तू दिल्यास.
11 देवाने आज्ञा केली
आणि बरेच लोक चांगली बातमी सांगण्यासाठी गेले.
12 शक्तिमान राजांची सैन्ये पळून गेली.
सैनिकांनी युध्दातून घरी आणलेल्या वस्तूंची विभागणी बायका घरी करतील.
जे लोक घरीच राहिले होते ते ही संपत्तीत वाटा घेतील.
13 त्यांना कबुतराचे चांदीने मढवलेले पंख मिळतील.
त्यांना सोन्याने मढवलेले आणि चकाकणारे पंख मिळतील.
14 देवाने साल्मोन डोंगरावर शत्रूंच्या राजाची दाणादाण उडवली
त्यांची अवस्था पडणाऱ्या हिमासारखी झाली.
15 बाशानचा पर्वत उंच सुळके असलेला मोठा पर्वत आहे.
16 बाशान, तू सियोन पर्वताकडे तुच्छेतेने का पाहतोस?
देवाला तो पर्वत (सियोन) आवडतो.
परमेश्वराने कायमचे तिथेच राहाणे पसंत केले.
17 परमेश्वर पवित्र सियोन पर्वतावर येतो.
त्याच्या मागे त्याचे लाखो रथ असतात.
18 तो उंच पर्वतावर गेला,
त्याने कैद्यांची पलटण बरोबर नेली.
त्याने माणसांकडून जे त्याच्या विरुध्द होते,
त्यांच्याकडूनही नजराणे घेतले.
परमेश्वर, देव तेथे राहाण्यासाठी गेला.
19 परमेश्वराची स्तुती करा.
तो रोज आपल्याला आपले ओझे वाहायला मदत करतो
देव आपल्याला तारतो.
20 तो आपला देव आहे आपल्याला तारणारा तोच तो देव आहे.
परमेश्वर, आपला देव आपल्याला मरणापासून वाचवतो.
21 देवाने त्याच्या शत्रूंचा पराभव केला हे तो दाखवून देईल. [a]
जे त्याविरुध्द लढले. त्यांना देव शिक्षा करील.
22 माझा धनी म्हणाला, “मी शत्रूला बाशान पर्वतावरुन परत आणीन.
मी शत्रूला पश्चिमेकडून परत आणीन.
23 म्हणजे तुम्हाला त्यांच्या रक्तातून चालत जाता येईल.
तुमच्या कुत्र्यांना त्यांचे रक्त चाटता येईल.”
24 विजयाच्या मिरवणुकीचे नेतृत्व करणाऱ्या देवाला लोक बघतात.
माझा देव, माझा राजा विजयांच्या मिरवणुकीचे नेतृत्व करीत आहे, ते लोक बघतात.
25 गायक वाजत गाजत पुढे येतील.
नंतर तरुण मुली खंजिऱ्या वाजवतील.
त्यांच्या नंतर वाद्य वाजवणारे असतील.
26 मोठ्या मंडळात देवाचा जय जयकार करा.
इस्राएलाच्या लोकांनो परमेश्वराची स्तुती करा.
27 छोटा बन्यामीन त्यांचे नेतृत्व करीत आहे
आणि तेथे यहूदाचे मोठे कुटुंब जबुलूनाचे नेते
आणि नफतालीचे नेते आहेत.
28 देवा, आम्हाला तुझी शक्ती दाखव.
तू पूर्वी आमच्यासाठी तुझी शक्ती वापरलीस ती दाखव.
29 राजे त्यांची संपत्ती तुझ्याकडे आणतील,
तुझ्या यरुशलेममधील प्रासादात ती आणतील.
30 त्या “प्राण्यांनी” तुला हवे ते करावे
म्हणून तू तुझ्या काठीचा उपयोग करत्या देशातील “बैलांना”
आणि “गायींना” तुझ्या आज्ञेचे पालन करायला लाव.
तू त्या देशांचा युध्दात पराभव केला आहेस
आता त्यांना तुझ्यासाठी चांदी आणायला सांग.
31 त्यांना मिसरमधून संपत्ती आणायला सांग देवा,
इथिओपियातल्या लोकांना त्यांची संपत्ती तुझ्याकडे आणायला भाग पाड.
32 पृथ्वीवरच्या राजांनो, देवासाठी गाणे म्हणा,
त्याच्यासाठी स्तुतिगीते गा.
33 देवासाठी गाणे म्हणा देव पुरातन आकाशातून त्याचा रथ नेतो,
त्याचा जोरदार आवाज ऐका.
34 तुमच्या इतर देवांपेक्षा हा देव अधिक शक्तिमान आहे.
इस्राएलाचा देव त्याच्या लोकांना
अधिक शक्तिमान बनवतो.
35 देव त्याच्या मंदिरात भीतिदायक दिसतो.
इस्राएलचा देव त्याच्या लोकांना शक्ती आणि सामर्थ्य देतो.
देवाचे गुणगान करा.
मवाबला देवाचा संदेश
15 मवाबबद्दल ही शापवाणी.
एका रात्रीत आर मवाब लुटले गेले.
त्या रात्री शहराचा नाश केला गेला.
एका रात्री सैन्याने कीर मवाब लुटले.
त्या रात्री शहराचा नाश केला गेला.
2 राजघराणे व दीबोनमधील लोक गाऱ्हाणे गायला पूजास्थानाला जात आहेत.
नबो व मेदबा यांच्यासाठी मवाबचे लोक रडत आहेत.
आपले दु:ख प्रकट करण्यासाठी सर्वांनी मुंडन केले आहे व दाढी केली आहे.
3 मवाबमधील सर्वांनी घरादारातील सर्वांनी
काळे कपडे घातले आहेत
व ते रडत आहेत.
4 हेशबोन व एलाले येथील लोक एवढ्यामोठ्याने रडत आहेत की
त्यांचा आवाज दूरच्या याहसा शहरापर्यंत ऐकू येत आहे.
एवढेच काय पण सैनिकही गर्भगळीत
होऊन भीतीने कापत आहेत.
5 मवाबच्या दु:खाने माझे मन रडत आहे.
लोक बचावासाठी धावत आहेत.
ते दूर सोअर व एगलाथ शलिशीयापर्यंत पळतात.
लूहीथच्या चढणीवर
ते रडत रडत चढत आहेत.
होरोनाइमच्या वाटेवर लोक मोठ्याने
आक्रोश करीत जात आहेत.
6 पण निम्रीमाचे पाणी आटले आहे.
सर्व झाडेझुडपे वाळली आहेत.
कोठेच हिरवेपणा नाही.
7 म्हणून लोक स्वतःची संपत्ती गोळा करून मवाब सोडतात.
ते ही संपत्ती घेऊन वाळुंजच्या खाडीपलीकडे जातात.
8 मवाबमध्ये सगळीकडे रडणे ऐकू येत आहे.
लांब असलेल्या एग्लाइममधील लोक रडत आहेत
आणि बैर-एलिममध्येही आक्रोश सुरू आहे.
9 दीमोनचेपाणी सक्ताने लालभडक झाले आहे.
मी परमेश्वर दीमोनवर आणखी संकटे आणीन,
मवाबमधील काही थोडी माणसे शत्रूच्या हातातून निसटली आहेत
पण मी त्यांच्यावर त्यांना खाऊन टाकण्यासाठी सिंह पाठवीन.
पत्नी आणि पती
3 त्याचप्रमाणे, पत्नींनो, आपल्या पतींच्या अधीन असा. यासाठी की, त्यांच्यापैकी काहींनी जर देवाची आज्ञा पाळली नाही तर काही न बोलताही आपल्या सदवर्तनाने त्यांची मने जिंकता येतील. 2 जेव्हा ते तुमचे शुद्ध आणि आदरयुक्त वागणे पाहतील 3 तुमची सुंदरता बाह्यस्वरुपाची नसावी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे केस सुशोभित करण्याने, सोन्याचे दागिने वापरण्याने किंवा चांगले कपडे घातल्याने आलेली नसावी. 4 त्याऐवजी तुमची सुंदरता अंतःकरणाची, जी कधीही नाश पावत नाही, अशी असली पाहिजे ती सौम्य, शांत स्वभावाची असली पाहिजे जी देवाच्या दृष्टीने अतिमौल्यवान आहे.
5 पूर्वीच्या काळातील ज्या पवित्र स्त्रिया होऊन गेल्या, त्यांनी अशाच प्रकारे आपल्या सर्व आशा देवावर केन्द्रीत करुन आपली स्वतःची सुंदरता वाढीस लावली त्या स्त्रिया आपल्या पतींच्या अधीन असत. 6 साराने अब्राहामाची आज्ञा पाळली आणि अब्राहामाला आपला मालक मानले. जर तुम्ही चांगली कामे करता व कशाचीही भिति मनात बाळगत नाही तर तुम्ही तिच्या म्हणजे सारेच्या मुली आहात.
7 तसेच पतींनो, तुम्ही आपल्या पत्नींबरोबर समंजसपणाने राहा. त्या जरी अबला असल्या तरी त्या देवाच्या कृपेमध्ये तुमच्याबरोबरच वारस आहेत हे लक्षात घेऊन त्यांच्याविषयी आदर बाळगा, म्हणजे तुम्ही ज्या प्रार्थना देवाला सादर करता त्यात कसलीही बाधा येणार नाही.
चांगल्या कामासाठी दु:ख सोसणे
8 शेवटी सारांश हा की, तुम्ही सर्वजण एकमेकांशी विचार व भावना यांच्या ऐक्याने, सहानुभूतीने आपल्या भाऊबहिणींशी प्रेमाने, दयाळूपणे आणि नम्रतेने राहा. 9 वाइटाची परतफेड वाइटाने करु नका, किंवा अपमानाची फेड अपमानाने करु नका. उलट, त्या व्यक्तीसाठी देवाकडे आशीर्वाद मागा. कारण देवाने तुम्हाला हे करण्यासाठीच बोलाविले होते. यासाठी की, तुम्हाला देवाचा आशीर्वादाचा वारसा मिळावा. 10 पवित्र शास्त्र म्हणते,
“ज्याला जीवनाचा आनंद उपभोगायचा आहे,
व चांगले दिवस पहावयाचे आहेत,
त्याने आपली जीभ वाईट बोलण्यापासून आवरली पाहिजे,
आणि त्याने आपल्या ओठांनी खोट्या गोष्टी बोलू नयेत.
11 दुष्टतेपासून त्याने दूर व्हावे व चांगले ते करावे.
त्याने शांतीचा शोध करुन ती मिळविली पाहिजे
12 जे नीतिमान लोक आहेत त्यांच्यावर प्रभुची नजर असते
आणि त्यांच्या प्रार्थना तो कान देऊन ऐकतो
पण जे वाईट गोष्टी करतात त्यांच्याकडे प्रभु पाठ फिरवितो.” (A)
13 जे चांगले ते करण्यास तुम्ही उत्सुक असाल तर अशी कोण व्यक्ती आहे जी तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न करील? पण, 14 जे योग्य ते करुनसुद्धा जर तुम्हांला दु:ख सहन करावे लागते, तर तुम्ही धन्य आहात. म्हणून “त्या लोकांची भीति बाळगू नका किंवा गर्भगळित होऊ नका” [a] 15 पण आपल्या अंतःकरणात ख्रिस्त हा प्रभु आहे असा आदर बाळगा तुमच्यामध्ये जी आशा आहे, तिच्याविषयी तुम्हांला कोणी विचारले तर त्याचे समर्थन करण्यास सदैव तयार राहा. 16 पण हे सौम्यतेने व आदराने करा. ख्रिस्तामध्ये जगत असताना तुमच्या चांगल्या वागणुकीवर जे आरोप करतात त्यांना लाज वाटेल, अशा रीतीने तुम्ही आपली विवेकबुद्धी शुद्ध राखा.
17 कारण चांगले काम करुनदेखील आपण दु:ख सोसावे अशी जर देवाची इच्छा असेल तर वाईट करुन दु:ख भोगण्यापेक्षा ते अधिक चांगले.
18 ख्रिस्तदेखील आपल्या पापांसाठी
एकदाच मरण पावला.
एक नीतिमान दुसऱ्या
अनीतिमानांसाठी मरण पावला.
यासाठी की, तुम्हाला देवाकडे जाता यावे.
त्याच्या आत्म्यासंबंधी म्हटले
तर त्याला पुन्हा जीवन दिले गेले.
19 आत्मिक रुपाने देखील ख्रिस्त बंदिवासात असलेल्या आत्म्यांकडे गेला व सुवार्ता सांगितली. 20 फार पूर्वी नोहाच्या काळात जेव्हा जहाज बांधले जात होते आणि देव धीराने वाट पाहत होता, त्यावेळी ज्यांनी देवाची आज्ञा पाळली नाही, तेच हे आत्मे होत. फक्त थोडकेच म्हणजे आठ लोकच जहाजात गेले व त्यांचा पाण्यापासून बचाव झाला. 21 ते पाणी आत्मा चिन्हात्मकरीत्या बाप्तिस्म्याचे ज्यामुळे आता तुमचे तारण होते त्याचे प्रतीक आहे. बाप्तिस्मा म्हणजे शरीरावरील धूळ काढणे नव्हे, तर तो देवाकडे शुद्ध विवेक मिळावा म्हणून केलेला करार आहे. हे सर्व येशू ख्रिस्ताच्या मरणातून पुन्हा उठण्यामुळे घडू शकले. 22 तो स्वर्गात गेलेला आहे आणि देवाच्या उजव्या हाताशी बसला आहे. देवदूत, अधिकार आणि सामर्थ्य हे सर्व त्याच्या अधीन आहेत.
2006 by World Bible Translation Center