Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
गणना 22

बालाम आणि मवाबचा राजा

22 नंतर इस्राएल लोक मवाबमधल्या यार्देन नदीच्या खोऱ्याकडे निघाले. यरिहोच्या पलिकडे असलेल्या यार्देन नदीजवळ त्यांनी तळ दिला.

2-3 सिप्पोराच्या मुलाने, बालाक याने इस्राएल लोकांनी अमोरी लोकांचे काय केले ते पाहिले होते. मवाबचा राजा खूप घाबरला कारण इस्राएलचे लोक खूप होते. मवाब त्यांना खरोखरच भीत होता.

मवाबचा राजा मिद्यानींच्या नेत्यांना म्हणाला, “गाय जशी शेतातले सगळे गवत खाऊन टाकते तसेच हे लोक आपला नाश करतील.”

त्यावेळी सिप्पोराचा मुलगा बालाक मवाबचा राजा होता. त्याने बौराचा मुलगा बलाम ह्याला बोलवायला काही माणसे पाठवली. बलाम फरात नदीकाठी पथोर शहरात रहात होता. इथेच बलामचे लोक रहात असत. बालाकाचा निरोप हा होता:

“एका नवीन राष्ट्राचे लोक मिसर मधून आले आहेत. ते इतके आहेत की ते सगळा प्रदेश व्यापून टाकतात. त्यांनी माझ्याजवळच तळ ठोकला आहे. ये आणि मला मदत कर. मला एकट्याला हे लोक खूप भारी आहेत. तुझ्याजवळ खूप शक्ति आहे हे मला माहीत आहे. जर तू एखाद्याला आशीर्वाद दिलास तर त्याच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतात. आणि जर एखाद्याला शाप दिलास तर त्याच्या बाबतीत वाईट गोष्टी घडतात. म्हणून ये आणि या लोकांविरुद्ध बोल. कदाचित त्यानंतर मी त्यांचा पराभव करु शकेन. मी त्यांना माझा देश सोडायला भाग पाडू शकेन.”

मवाब आणि मिद्यानचे पुढारी बलामशी बोलायला गेले. त्याच्या कामाचा [a] मोबदला म्हणून त्यांनी बरोबर पैसै नेले. नंतर त्यांनी बालाक काय म्हणाला ते बलामाला सांगितले.

बलाम त्यांना म्हणाला, “रात्री इथे रहा. मी परमेश्वराशी बोलेन आणि तो काय उत्तर देतो ते तुम्हाला सांगेन.” मवाबचे पुढारी त्या रात्री बलामबरोबर राहिले.

देव बलामकडे आला आणि त्याने विचारले, “तुझ्याकडे हे कोण लोक आले आहेत?”

10 बलाम देवाला म्हणाला, “सिप्पोरचा मुलगा बालाकने, मवाबच्या राजाने यांना माझ्याकडे एक निरोप देऊन पाठवले आहे. 11 तो निरोप हा: एका नवीन राष्ट्राचे लोक मिसरमधून आले आहेत. ते इतके आहेत की ते सगळा प्रदेश व्यापून टाकतात. म्हणून ये आणि त्या लोकांविरुद्ध बोल. नंतर कदाचित मी त्या लोकांचा पराभव करु शकेन. आणि त्यांना माझ्या देशातून जायला भाग पाडू शकेन.”

12 पण देव बलामला म्हणाला, “त्यांच्याबरोबर जाऊ नकोस. तू त्या लोकांविरुद्ध बोलू नकोस. ती माझा आशीर्वाद मिळालेली माणसे आहेत.”

13 दुसऱ्या दिवशी बलाम उठला आणि बालाकच्या पुढाऱ्यांना म्हणाला, “तुम्ही तुमच्या देशात परत जा. परमेश्वर मला तुमच्या बरोबर जाऊ देणार नाही.”

14 त्यामुळे मवाबचे पुढारी बालाककडे परत गेले आणि त्यांनी त्याला हे सांगितले. ते म्हणाले, “बलामने आमच्या बरोबर यायला नकार दिला.”

15 म्हणून बालाकने बलामकडे दुसरे पुढारी पाठवले. यावेळी त्याने पहिल्या वेळेपेक्षा खूप जास्त पुढारी पाठवले. हे पुढारी पहिल्या पुढाऱ्यांपेक्षा अधिक महत्वाचे होते. 16 ते बलामकडे गेले आणि म्हणाले, “बालाक, सिप्पोराचा मुलगा तुला हे सांगतो: तुझ्या इथे येण्याच्या आड कुठलीही गोष्ट येऊ देवू नको. 17 मी जे सांगतो ते तू केलेस तर मी तुला नक्कीच मान देईन आणि तू मला जे काही विनवशिल ते मी करीन [b] पण तू ये व या लोकांविरुद्ध माझ्यासाठी बोल.”

18 बलामने बालाकाच्या पुढाऱ्यांना उत्तर दिले. तो म्हणाला, “मी माझ्या देवाची, परमेश्वराची आज्ञा पाळली पाहिजे. मी त्याच्या आज्ञे विरुद्ध काहीही करु शकत नाही. परमेश्वराने सांगितल्या खेरीज मी कुठलीही लहान-मोठी गोष्ट करणार नाही. बालाकाने मला त्याचे सुंदर घर सोन्या चांदीने भरुन दिले तरीही मी काही करणार नाही. 19 परंतु आजच्या रात्रीपुरते तुम्ही इथे मागच्या सारखे राहू शकता. आणि परमेश्वर मला काय सांगतो ते मला रात्रीतून कळू शकेल.”

20 त्या रात्री देव बलामकडे आला. देव म्हणाला, “तुला घेऊन जाण्यासाठी हे लोक पुन्हा आले आहेत. म्हणून तू त्यांच्या बरोबर जाऊ शकतोस. पण मी जे सांगेन तेवढेच तू कर.”

बलाम आणि त्याचे गाढव

21 दुसऱ्या दिवशी सकाळी बलाम उठला आणि त्याने आपल्या गाढवीवर खोगीर घातले. नंतर तो मवाबच्या पुढाऱ्यांबरोबर चालला. 22 बलाम त्याच्या गाढवीवर बसला होता. त्याचे दोन नोकर त्याच्याबरोबर होते. बलाम प्रवास करीत होता तेव्हा देव त्याच्यावर रागावला. परमेश्वराचा दूत रस्त्यावर बलामपुढे येऊन उभा राहिला. देवदूत बलामला थांबवणार [c] होता.

23 बलामच्या गाढवीने परमेश्वराच्या दूताला रस्त्यात उभे असलेले पाहिले. देवदूताने हातात तलवार घेतली होती. म्हणून गाढवी रस्ता सोडून शेतात गेली. बलामला देवदूत दिसू शकला नाही. म्हणून तो गाढवीवर खूप रागावला. त्याने गाढवीला मारले आणि जबरदस्तीने रस्त्यावर आणले.

24 नंतर परमेश्वराचा दूत रस्ता जिथे अरुंद होता तिथे थांबला. हा दोन द्राक्षांच्या मव्व्यांच्या मधला भाग होता. रस्ताच्या दोन्ही बाजूला भिंती होत्या. 25 गाढवीने पुन्हा परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून ती एका भिंतीला चिकटून चालू लागली त्यामुळे बलामचा पाय भिंतीला लागून चिरडला गेला. म्हणून बलामने गाढवीला पुन्हा मारले.

26 नंतर परमेश्वराचा दूत दुसऱ्या ठिकाणी उभा राहिला. अरुंद रस्ता असलेले हे दुसरे ठिकाण होते. येथे वळायला सुद्धा मुळीच जागा नव्हती गाढवीला त्याला वळसा घालून जाणे शक्य नव्हते. 27 गाढवीने परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून बलाम तिच्यावर बसला असतानाच ती खाली बसली त्यामुळे बलाम खूप रागावला आणि त्याने गाढवीला त्याच्या चालण्याच्या काठीने मारायला सुरुवात केली.

28 नंतर परमेश्वराने गाढवीला बोलते केले. गाढवी बलामला म्हणाली, “तू माझ्यावर का रागावला आहेस? मी तुला काय केले आहे? तू मला तीन वेळा मारलेस.”

29 बलामने गाढवीला उत्तर दिले, “तू मला मूर्ख बनवलेस. जर माझ्या हातात तलवार असती तर मी तुला मारुन टाकले असते.”

30 पण गाढवी बलामला म्हणाली, “बघ मी तुझीच गाढवी आहे. खूप वर्षे तू माझ्यावर बसत आला आहेस. आणि या पूर्वी मी असे काही केले नाही हे तुला माहीत आहे.”

“हे खरे आहे” बलाम म्हणाला.

31 नंतर परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले, तेव्हा त्याला परमेश्वराचा दूत दिसला. तो रस्त्यात तलवार घेऊन उभा होता. त्याने परमेश्वराच्या दूताला रस्त्यात जमिनीपर्यंत वाकून नमस्कार केला.

32 परमेश्वराच्या दूताने बलामला विचारले, “तू तुझ्या गाढवीला तीनदा का मारलेस? तुला थांबवण्यासाठी मी आलो आहे. पण अगदी ऐनवेळी [d] 33 तुझ्या गाढवीने मला पाहिले आणि ती दूर गेली. असे तीन वेळा घडले. जर गाढवी वळली नसती तर आतापर्यंत मी तुला मारले असते आणि तुझ्या गाढवीला जिवंत राहू दिले असते.”

34 तेव्हा बलाम परमेश्वराच्या दूताला म्हणाला, “मी पाप केले आहे. तू रस्त्यात उभा आहेस हे मला माहीत नव्हते. मी जर चूक करीत असेन तर मी घरी परत जाईन.”

35 तेव्हा परमेश्वराचा दूत बलामला म्हणाला, “नाही! तू या लोकांबरोबर जाऊ शकतोस. पण सावध रहा. मी जे सांगेन तेच शब्द बोल.” म्हणून बलाम बालाकाने पाठवलेल्या पुढाऱ्यांबरोबर गेला.

36 बलाम येत असल्याचे बालाकाला समजले. म्हणून तो बलामला भेटायला अर्णोन नदी जवळच्या मवाबच्या शहरात गेला. ते त्याच्या देशाच्या उत्तर सरहद्दीवर होते. 37 जेव्हा बालाकाने बलामला पाहिले तेव्हा तो त्याला म्हणाला, “मी तुला आधीच यायला सांगितले होते. हे खूप खूप महत्त्वाचे आहे असे मी तुला सांगत होतो. तू माझ्याकडे का आला नाहीस? आता मी तुला कदाचित पैसे देऊ शकणार नाही.”

38 बलामने उत्तर दिले, “पण आताच मी येथे आलो आहे. मी आलो आहे पण तू सांगितलेल्या गोष्टी मला कदाचित करता येणार नाहीत. परमेश्वर देव जेवढे सांगेत तेवढेच मी बोलू शकतो.”

39 नंतर बलाम बालाकाबरोबर किर्याथ-हसोथ येथे गेला. 40 बालाकाने काही गुरे व मेंढ्या बळी म्हणून मारल्या. त्याने थोडे मास बलामला दिले आणि थोडे त्याच्याबरोबर असलेल्या पुढाऱ्यांना दिले.

41 दुसऱ्या दिवशी सकाळी बालाक बलामला घेऊन बामोथबाल शहरी गेला. तेथून त्यांना इस्राएल लोकांच्या तळाचा शेवटचा भाग दिसू शकत होता.

स्तोत्रसंहिता 62-63

प्रमुख गायकासाठी यदूथूनाच्या चालीवरचे दावीदाचे स्तोत्र.

62 देवाने माझा उध्दार करावा म्हणून मी धीराने वाट पहात आहे.
    माझे तारण त्याच्याकडूनच येते.
देव माझा किल्ला आहे.
    तो मला तारतो.
देव माझी उंच डोंगरावरची सुरक्षित जागा आहे.
    खूप मोठे सैन्यदेखील माझा पराभव करु शकणार नाही.

किती काळ तू माझ्यावर चाल करुन येणार आहेस?
    मी एका बाजूला कललेल्या भिंतीसारखा आहे,
    केव्हाही पडणाऱ्या कुंपणासारखा आहे.
ते लोक माझा नाश करण्याच्या योजना आखत आहेत.
    ते माझ्याबद्दल खोटंनाटं सांगतात.
ते लोकांमध्ये माझ्याबद्दल चांगल बोलतात
    पण गुप्तपणे ते मला शाप देतात.

मी अगदी धीर धरुन देवाने मला वाचवण्याची वाट बघत आहे.
    देव माझी एकुलती एक आशा आहे.
देव माझा किल्ला आहे. देव मला तारतो,
    देव माझी उंच डोंगरावरील सुरक्षित जागा आहे.
माझा गौरव आणि माझा विजय देवाकडूनच येतो
    तो माझा भक्कम किल्ला आहे तो माझी सुरक्षित जागा आहे.
लोक हो! देवावर सदैव विश्वास ठेवा.
    तुम्ही देवाला तुमच्या सर्व समस्या सांगा.
    देव आपली सुरक्षित जागा आहे.

लोक खरोखरच मदत करु शकत नाहीत.
    तुम्ही मदतीसाठी लोकांवर खरोखरच विश्वास टाकू शकत नाही.
देवाशी तुलना करता ते हवेतल्या
    फुंकरीसारखे न गण्य आहेत.
10 बळजबरीने वस्तू हिसकावून घेण्यात शक्तीवर विसंबून राहू नका.
    चोरी केल्यामुळे तुमच्या पदरात काही पडणार आहे
असे समजू नका ,आणि तुम्ही श्रीमंत झाल्यामुळे तुमची श्रीमंती आता
    तुमच्या कामी येईल याचाही भरंवसा ठेवू नका.
11 फक्त एकाच गोष्टीवर भरवसा ठेवण्यासारखा आहे
    असे देव म्हणतो “शक्ती देवापासून येते.”

12 प्रभु, तुझे प्रेम खरे आहे.
    माणूस ज्या गोष्टी करतो त्या नुसार तू त्याला बक्षिस देतोस वा शिक्षा करतोस.

दावीदाचे एक स्तोत्र तो यहुदाच्या रानात होता त्या वेळचे

63 देवा, तू माझा देव आहेस
    आणि तू मला खूप हवा आहेस.
माझा आत्मा आणि माझे शरीर तुझ्यासाठी शुष्क,
    बरड आणि पाणी विरहित जमिनी प्रमाणे तहाननेले आहे.
होय, मी तुला तुझ्या मंदिरात पाहिले.
    मी तुझी शक्ती आणि तुझे गौरव पाहिले.
तुझे प्रेम आयुष्यापेक्षा चांगले आहे.
    माझे ओठ तुझी स्तुती करतात.
होय, मी जीवनात तुझी स्तुती करीन
    तुझ्या नावासाठी मी माझे बाहू प्रार्थनेत उभारीन.
चांगले अन्न खाल्ल्याप्रमाणे मी तृप्त होईन,
    आणि माझे तोंड तुझी स्तुती करील.
अंथरुणावर झोपल्यावर मला तुझी आठवण येईल,
    मध्यरात्री मी तुझी आठवण काढेन.
तू मला खरोखरच मदत केली आहेस.
    तू माझे रक्षण केलेस म्हणून मी आनंदी आहे.
माझा आत्मा तुला धरुन ठेवतो
    आणि तू माझा हात धरतोस.

काही लोक मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.
    परंतु त्यांचा नाश होईल.
    ते खाली त्यांच्या थडग्यात जातील.
10 त्यांना तलवारीने मारले जाईल.
    रानटी कुत्री त्यांची प्रेते खातील.
11 परंतु राजा त्याच्या देवाबरोबर आनंदात असेल
    आणि ज्या लोकांनी त्यांच्या आज्ञा पाळायचे वचन दिले ते त्याची स्तुती करतील का?
    कारण त्याने त्या खोटे बोलणाऱ्यांचा पराभव केला.

यशया 11-12

शांतीचा राजा येत आहे

11 इशायाच्या बुंध्याला (वंशाला) अंकुर (मूल) फुटून वाढू लागेल. ती फांदी इशायाच्या मुळाची असेल. परमेश्वराचा आत्मा त्या मुलात असेल. तो आत्मा त्याला सुज्ञपणा, समजूत, मार्गदर्शन आणि सामर्थ्य देईल. हा आत्मा परमेश्वराला जाणून घेण्यास व श्रध्दा ठेवण्यास त्या मुलाला शिकवील. परमेश्वराचे भय वाटण्यातच त्या मुलाला आनंद वाटेल. तो त्याच्या डोळ्यांना जे दिसते वा कानांनी जे ऐकू येते, त्याच्यावरून निर्णय घेणार नाही.

हा मुलगा गोष्टी जशा दिसतात त्या वरून लोकांची पारख करणार नाही. तो जे ऐकेल त्यावरून लोकांची परीक्षा करणार नाही. 4-5 तो गरिबांना प्रामाणिकपणे व सरळपणे न्याय देईल. ह्या देशातील गरिबांसाठी ज्या गोष्टी करण्याचे त्याने ठरविले असेल त्या तो न्यायबुध्दीने करील. त्याने जर काही लोकांना फटकावयाचे ठरविले तर तो तशी आज्ञा देईल आणि त्या माणसांना फटके बसतील. त्याने दुष्टांना मारायचे ठरविले, तर त्याच्या आज्ञेने त्यांना ठार मारले जाईल. चांगुलपणा व प्रामाणिकपणा ह्या मुलाला सामर्थ्य देईल. ते त्याचे संरक्षक कवच असतील.

त्या वेळेला लांडगे मेंढरांबरोबर सुखशांतीने राहतील, वाघ कोकरांबरोबर शांतपणे झोपेल. वासरे, सिंह, आणि बैल शांततेने एकत्र राहतील आणि एक लहान मुलगा त्यांना वळवील. गायी आणि अस्वले एकत्र गुण्यागोविंदाने राहतील. सगळ्यांची पिल्ले एकत्र राहतील आणि कोणीच कोणाला इजा करणार नाही. सिंह गाईसारखे चारा खातील. एवढेच नव्हे तर सापही माणसाला दंश करणार नाहीत. तान्हे मूलसुध्दा नागाच्या वारूळाजवळ खेळू शकेल. ते सापाच्या बिळात त्याचा हात घालू शकेल.

ह्या सगळ्या गोष्टीवरून, तेथे शांती नांदेल, हेच दिसते. कोणीही माणूस दुसऱ्याला दुखविणार नाही. माझ्या पवित्र डोंगरावर राहणारे लोक वस्तूंचा नाश करू इच्छिणार नाहीत. का? कारण लोकांना परमेश्वराची खरी ओळख पटेल. समुद्रात जसे अथांग पाणी असते, तसेच त्यांना परमेश्वराबद्दल खूपच ज्ञान झालेले असेल.

10 त्या वेळेला इशायाच्या घराण्यात एक विशेष व्यक्ती असेल ती व्यक्ती ध्वजाप्रमाणे असेल हा “ध्वज” सर्व राष्ट्रांना त्याच्याभोवती जमण्याचे आवाहन करील. सर्व राष्ट्रे, त्यांनी करायच्या कार्याबद्दल ह्या “ध्वजाकडे” विचारणा करतील तो जेथे असेल तेथे वैभव नांदेल.

11 त्या वेळेला माझा प्रभू (देव) मागे राहिलेल्या लोकांपर्यंत पुन्हा पोहोचेल. असे तो दुसऱ्यांदा करील. आणि त्यांना बाहेर आणील. अश्शूर, उत्तर मिसर, दक्षिण मिसर, इथिओपिया, एलाम, बॉबिलॉन, हमाथ आणि पृथ्वीवरील दूरची सर्व राष्ट्रे येथे असलेल्या ह्या त्याच्या लोकांना तो बाहेर आणील. 12 देव “तो ध्वज” सर्व लोकांची निशाणी म्हणून उभारेल. इस्राएल व यहुदा येथील लोकांना बळजबरीने देशाच्या बाहेर घालवून देण्यात आले ते पृथ्वीवरील दूरदूरच्या देशात विखुरले. पण देव त्यांना एकत्र आणील.

13 तेव्हा एफ्राइमला (इस्राएलला) यहुदाचा मत्सर वाटणार नाही. यहुदाला कोणी शत्रूच राहणार नाहीत. यहुदा एफ्राइमला (इस्राएलला) काही त्रास देणार नाही. 14 पण एफ्राइम (इस्राएल) व यहुदा दोघे मात्र पलिष्ट्यांवर हल्ला करतील. आकाशात उडणाऱ्या दोन पक्ष्यांनी जमिनीवरील किड्याकाटकावर झडप घालावी तसेच हे दोन देश पलिष्ट्यांवर तुटून पडतील. दोघे मिळून पूर्वेकडच्या लोकांना लुटतील व अदोम, मवाब, व अम्मोन ह्यांच्यावर राज्य करतील.

15 पूर्वी परमेश्वराला राग आला व त्याने समुद्र दुभंगून आपल्या माणसांना मिसरमधून बाहेर काढले आता पण तसेच होईल परमेश्वर युफ्राटिस नदी दुभंगवेल. तो नदीवर हातातील दंड मारील आणि तिचे सात लहान नद्यांत विभाजन करील. त्या नद्या खोल नसतील. लोक त्या चालत सहज पार करू शकतील. 16 ह्यामुळे अश्शूरमध्ये मागे राहिलेल्या त्याच्या लोकांना अश्शूर सोडून जाता येईल. हे देवाने मिसरमधून इस्राएली लोकांना बाहेर काढले, त्या वेळे प्रमाणेच असेल.

देवाचे स्तुतिस्तोत्र

12 त्या वेळेला तू म्हणशील:
“परमेश्वरा, मी तुझे स्तवन करतो
    तू माझ्यावर रागावला होतास
पण आता राग सोड
    तुझ्या प्रेमाची प्रचिती दे.
देव माझा तारक आहे माझी त्याच्यावर श्रध्दा आहे.
    मी निर्भय आहे तो मला तारतो.
परमेश्वर हीच माझी शक्तीआहे.
    तो मला तारतो म्हणूनच मी त्याचे स्तुतिस्तोत्र गातो.”

3-4 तारणाच्या झऱ्यातून तुम्ही पाणी घ्या
    म्हणजे सुखी व्हाल
आणि म्हणाल,
    “परमेश्वराची स्तुती असो.
त्याच्या नावाची उपासना करा.
    त्याच्या करणीची माहिती लोकांना सांगा.”
परमेश्वराचे स्तुतिस्तोत्र गा कारण
    त्याने महान कार्य केले आहे.
देवबद्दल ही वार्ता सर्व जगात
    पसरवा, सर्व लोकांना हे कळू द्या.
सीयोनवासीयांनो, तुम्ही गजर करा.
    कारण इस्राएलचा एकमेव पवित्र देव समर्थपणे तुमच्यामध्ये आहे.
    तेव्हा आनंदी व्हा.

याकोब 5

स्वार्थी श्रीमंत लोकांना शिक्षा होईल

श्रीमंत लोकहो ऐका! तुमच्यावर जी संकटे येत आहेत त्याबद्दल रडा व आक्रोश करा. तुमची संपति नाश पावली आहे. व तुमच्या कपड्यांना कसर खाऊन टाकीत आहेत. तुमच्या सोन्याचांदीवर गंज चढला आहे. त्याच्यावर चढलेला गंज तुमच्याविरुद्ध साक्ष देईल आणि तुमचे शरीर अग्नीसारखे खाऊन टाकील. अशा युगामध्ये तुम्ही तुमचे धन साठवून वेगळे ठेवले आहे, ज्याचा शेवट जवळ आला आहे! पहा! तुमच्या शेतात कापणी करणाऱ्या मजुरांची मजुरी जी तुम्ही अडवून धरलीत ती ओरडून दु:ख करीत आहे आणि कापणी करणाऱ्यांचे रडणे प्रभु परमेश्वराच्या सैन्याच्या कानी पोहोंचले आहे.

जगात असताना तुम्ही ऐषरामात जगला आणि मन मानेल तसे वागला. वधावयाच्या दिवासासाठी खाऊनपिऊन तयार केलेल्या पशूसारखे तुम्ही पुष्ट झालात. जे लोक तुम्हांला काहीही विरोध करीत नाही अशा निरपराध लोकांना तुम्ही दोषी ठरविले आहे आणि त्यांची हत्या केली आहे.

धीर धरा

यासाठी बंधूंनो, प्रभूच्या येण्यापर्यंत धीर धरा, लक्षात ठेवा की, शेतकरी आपल्या शेतातील मोलवान पिकाची वाट पाहतो. तो धीराने त्याची वाट पाहतो. पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत वाट पाहतो. तुम्हीसुद्धा धीराने वाट पाहिली पाहिजे. धैर्य धरा, कारण प्रभूचे दुसरे आगमन जवळ आले आहे. बंधूंनो, एकमेकांविरुद्ध कुरकुर करण्याचे थांबवा, यासाठी की तुम्ही दोषी ठरू नये. पहा! न्यायाधीश दाराजवळ आत येण्यासाठी तयारीत उभा आहे.

10 बंधूंनो, दु:ख सहन करीत देवाच्या नावाने लोकांशी धीर धरून बोलणाऱ्या संदेष्ट्याचे उदाहरण तुम्ही आपल्यासमोर ठेवा. 11 त्यांनी दु:ख सहन केले म्हणून आपण त्यांना धन्य समजतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि तुम्हांला माहीत आहे की, प्रभूने ईयोबाच्या वतीने त्याचा शेवट कसा केला. प्रभु दयाळू आणि खूप कनवाळू आहे, ह्या गोष्टीचे त्याने प्रात्यक्षिक दाखविले.

Be Careful What You Say

12 याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे बंधूंनो, स्वर्गाच्या किंवा पृथ्वीच्या नावाने शपथ वाहायचे थांबवा किंवा इतर कोणत्याही प्रकारची शपथ वाहू नका. तुमचे “होय” हे “होयच” असू द्या. तुमचे “नाही” हे “नाहीच” असू द्या, यासाठी की तुम्ही देवाच्या परीक्षेत येऊ नये.

प्रार्थनेचे सामर्थ्य

13 तुमच्यातील कोणी संकटात आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय? त्याने स्तुतिगान करावे. 14 तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीतील वडिलांना बोलवावे व त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे, आणि प्रभूच्या नावाने त्याच्यावर तेल लावावे 15 विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्याला बरे करील व प्रभु त्याला उठविल. जर त्याने पापे केली असतील तर प्रभु त्याची क्षमा करील.

16 म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते. 17 एलीया हा आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. पाऊस पडू नये म्हणून त्याने कळकळीने प्रार्थना केली आणि नंतरची साडेतीन वर्षे देशात पाऊस पडला नाही. 18 मग त्याने पुन्हा प्रार्थना केली व आकाशाने पाऊस दिला आणि पृथ्वीने आपले धान्य उपजविले.

Helping People When They Sin

19 माझ्या बंधूंनो, जर तुमच्यापैकी कोणी चुकला किंवा सत्यापासून दूर भटकला असेल आणि जर कोणी त्याला परत आणले तर पापी मनुष्याला चुकीच्या मार्गावरून तो परत आणतो. 20 तो त्याचा जीव मरणाच्या दाढेतून सोडवितो. आणि त्याच्या पुष्कळ पापांची क्षमा होते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center