M’Cheyne Bible Reading Plan
मिर्याम मरण पावते
20 इस्राएलचे लोक सीनच्या वाळवंटात पहिल्या महिन्यात आले. त्यांनी कादेशला मुक्काम केला. मिर्याम तेथे मरण पावली आणि तिला तेथेच पुरण्यात आले.
मोशे चूक करतो
2 त्या ठिकाणी लोकांना पुरेसे पाणी नव्हते. म्हणून ते मोशे आणि अहरोनजवळ तक्रार करण्यासाठी एकत्र आले. 3 लोकांनी मोशेशी वाद घातला. ते म्हणाले, “आमचे भाऊ जसे परमेश्वरा समोर मेले तसेच आम्हीरी मरायला हवे होते. 4 तू परमेश्वराच्या लोकांना या वाळवंटात का आणलेस? आम्ही आणि आमची जनावरे इथे मरावी असं तुला वांटत का? 5 तू आम्हाला मिसर देशातून का आणलेस? तू आम्हाला या वाईट ठिकाणी का आणलेस? इथे धान्य नाही. इथे अंजीर, द्राक्षे किंवा डाळिंबही नाहीत आणि इथे पिण्यास पाणीही नाही.”
6 म्हणून मोशे आणि अहरोन लोकांची गर्दी सोडून दर्शन मंडपाच्या प्रवेशद्वाराशी गेले. त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला आणि त्यांना परमेश्वराचे तेज दिसले.
7 परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला: 8 “चालण्याची खास काठी घे. तुझा भाऊ अहरोन याला आणि त्या लोकांना बरोबर घे आणि खडकाजवळ जा. लोकांसमोर खडकाशी बोल. नंतर त्या खडकातून पाणी वाहू लागेल आणि तू ते पाणी त्या लोकांना आणि त्यांच्या जनावरांना देऊ शकशील.”
9 चालण्याची काठी पवित्र निवास मंडपात परमेश्वरासमोर होती. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने काठी घेतली. 10 मोशे आणि अहरोन यांनी लोकांना त्या खडकासमोर भेटायला सांगितले. नंतर मोशे म्हणाला, “तुम्ही लोक नेहमी तक्रारी करीत असता. आता माझे ऐका. मी आता या खडकातून पाणी काढीन.” 11 मोशेने आपला हात वर उचलला आणि काठीने खडकावर दोन वार केले. खडकातून पाणी बाहेर वाहू लागले आणि माणसे व जनावरे ते पाणी पिऊ लागली.
12 पण परमेश्वर मोशेला आणि अहरोनला म्हणाला, “इस्राएलचे सगळे लोक एकत्र जमले होते. पण तू मला मान दिला नाहीस. पाणी निर्माण करण्याची शक्ती माझ्यामुळे आली हे तू लोकांना दाखवले नाहीस. तुझा माझ्यावर विश्वास आहे हे तू लोकांना दाखवले नाहीस. मी वचन दिल्याप्रमाणे त्या लोकांना तो प्रदेश देईन. पण तू त्यांना तिथे घेऊन जाणार नाहीस.”
13 त्या जागेला मरीबा असे नांव पडले. इस्राएल लोकांनी परमेश्वराबरोबर जिथे वाद घातला तीच ती जागा होती. याच जागेवर परमेश्वराने त्यांना तो किती पवित्र आहे ते दाखवले होते.
अदोम इस्राएल लोकांना आपल्या हद्दीतून जाऊ देत नाही
14 मोशे कादेशला होता तेव्हा त्याने अदोमच्या राजाकडे काही लोकांना एक निरोप देऊन पाठवले. तो निरोप होता:
“तुझे भाऊ, इस्राएलचे लोक तुला म्हणतातः आमच्यावर जी जी संकटे आली त्याबद्दल तुला माहिती आहेच. 15 खूप खूप वर्षापूर्वी आमचे पूर्वज मिसर देशात गेले. आणि तिथे आम्ही अनेक वर्षे राहिलो. मिसर देशाचे लोक आमच्याशी फार दुष्टपणे वागले. 16 पण आम्ही परमेश्वराकडे मदतीची याचना केली. परमेश्वराने आमची प्रार्थना ऐकली आणि आमच्या मदतीसाठी देवदूताला पाठविले. परमेशवराने आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले.
“आता आम्ही कादेशमध्ये आहोत. इथे तुझा प्रदेश सुरु होतो. 17 कृपा करुन आम्हाला तुझ्या प्रदेशातून जाऊ दे. आम्ही कोठल्याही शेतातून वा द्राक्षाच्या मव्व्यातून जाणार नाही. आम्ही तुझ्या विहिरीचे पाणी पिणार नाही. आम्ही राजरस्त्यांच्या बाजूने फक्त जाऊ. आम्ही रस्ता सोडून डावीकडे अथवा उजवीकडे वळणार नाही. तुझ्या देशातून बाहेर येईपर्यंत आम्ही रस्त्यावरच राहू.”
18 परंतु अदोमच्या राजाने उत्तर दिले, “तुम्ही आमच्या देशातून जाणार नाही. जर तुम्ही आमच्या देशातून जायचा प्रयत्न केला तर आम्ही येऊन तुमच्याशी तलवारीने युद्ध करु.”
19 इस्राएल लोकांनी उत्तर दिले, “आम्ही मुख्य रस्त्यावरुन जाऊ. जर आमची जनावरे तुमचे पाणी प्यायले तर आम्ही तुम्हाला त्याचा मोबदला देऊ. आम्हाला फकत तुमच्या देशातून जायचे आहे. आम्हाला तो प्रदेश आमच्यासाठी घ्यायची इच्छा नाही.”
20 पण अदोमने पुन्हा उत्तर दिले, “आम्ही तुम्हाला आमच्या देशातून जाण्याची परवानगी देणार नाही.”
नंतर अदोमच्या राजाने मोठी आणि शक्तिशाली सेना गोळा केली आणि तो इस्राएल लोकांशी लढण्यासाठी गेला. 21 अदोमाने इस्राएल लोकांना त्याच्या देशातून जाण्याची परवानगी दिली नाही. आणि इस्राएलचे लोक तोंड फिरवून दुसऱ्या रस्त्याने निघून गेले.
अहरोन मरतो
22 इस्राएलचे सर्व लोक कादेशहून होर पर्बताकडे गेले. 23 होर पर्वत अदोमच्या सरहद्दीजवळ होता. परमेश्वर मोशेला आणि अहरोनला म्हणाला, 24 “अहरोनची मरण्याची आणि त्याच्या पूर्वजांजवळ जाण्याची वेळ आली आहे. मी इस्राएल लोकांना ज्या प्रदेशात नेण्याचे वचन दिले होते तिथे अहरोन जाणार नाही. मोशे मी हे सांगत आहे कारण तुम्ही मी मरिबाच्या पाण्याजवळ दिलेल्या आज्ञा पूर्णपणे पाळल्या नाहीत.
25 “आता अहरोनला आणि त्याचा मुलगा एलाजार यांना घेऊन होर पर्वतावर जा. 26 अहरोनाचे खास कपडे त्याच्या जवळून घे आणि ते कपडे त्याचा मुलगा एलाजार याला घाल. अहरोन तिथे त्या पर्वतावर मरुन पडेल आणि तो त्याच्या पूर्वजांकडे जाईल.”
27 मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली. मोशे, अहरोन आणि एलाजार होर पर्वतावर गेले. इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्यांना जाताना पाहिले. 28 मोशेने अहरोनाचे खास कपडे काढले व ते एलाजारला घातले. नंतर अहरोन पर्वतावर मेला. मोशे आणि एलाजार पर्वतावरुन खाली आले. 29 इस्राएलाच्या सर्व लोकांना अहरोन मेला हे कळले. म्हणून त्यांनी 30 दिवस दुखवटा पाळला.
प्रमुख गायकासाठी “नष्ट करु नको” या चालीवर आधारित दावीताचे मिक्ताम
58 न्यायाधीशांनो, तुम्ही तुमच्या निर्णयात न्यायी आहात काय?
तुम्ही लोकांचा न्यायाने निवाडा करीत आहात काय?
2 नाही, तुम्ही फक्त वाईट गोष्टी करण्याचाच विचार करता.
तुम्ही या देशात हिंसक कृत्ये करीत आहात.
3 त्या वाईट लोकांनी जन्मल्याबरोबर दुष्कर्म करायला सुरुवात केली.
ते जन्मापासूनच खोटारडे होते.
4 ते सापासारखेच भयंकर आहेत आणि नागाप्रमाणे त्यांना ऐकू येत नाही.
ते सत्य ऐकायला नकार देतात.
5 नागाला गारुड्याचे संगीत वा गाणे ऐकू येत नाही
आणि ती दुष्ट माणसे या सारखी आहेत.
6 परमेश्वरा, ती दुष्ट माणसे सिंहासारखी आहेत.
म्हणून परमेश्वरा तू त्यांचे दात पाड.
7 ते लोक वाहून जाणाऱ्या पाण्याप्रमाणे नाहीसे होवोत.
ते रस्त्यातल्या गवताप्रमाणे तुडवले जावोत.
8 चालताना विरघळून जाणाऱ्या गोगलगायी प्रमाणे ते विरघळून जावोत.
जन्मत: मेलेल्या व दिवसाचा प्रकाश न पाहिलेल्या बाळा प्रमाणे त्यांचे होवो.
9 भांडे तापविण्यासाठी काट्या पेटवितात.
तेव्हा त्यात चटकन् जळणाऱ्या काट्यांप्रमाणे त्यांचे होवो.
10 वाईट लोकांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल जर त्यांना शिक्षा झाली
तर चांगल्या माणसाला आनंद होईल,
तो त्या दुष्टांच्या रक्तात आपले पाय धुवेल.
11 असे जेव्हा घडेल तेव्हा लोक म्हणतील “चांगल्या माणसांना त्यांचे फळ मिळाले,
जगाला न्याय देण्यासाठी देव खरोखर आहे.”
प्रमुख गायकासाठी “नष्ट करु नकोस” या चालीवर आधारलेले दावीदाचे मिक्ताम दावीदला मारण्यासाठी शौलाने त्याच्या घरावर नजर ठेवायला माणसे पाठविली त्या वेळचे.
59 देवा, मला माझ्या शत्रूंपासून वाचव माझ्याशी लढायला जे लोक आले आहेत
त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी मला मदत कर.
2 वाईट कृत्ये करणाऱ्यांपासून मला वाचव.
मला त्या खुन्यांपासून वाचव.
3 बघ, ते बलवान लोक माझी वाट पहात आहेत.
ते मला मारण्यासाठी थांबले आहेत.
परंतु मी पाप केले नाही किंवा कुठला गुन्हा केला नाही.
4 ते माझा पाठलाग करीत आहेत परंतु मी काहीही चूक केली नाही.
परमेश्वरा, ये आणि स्वत:च बघ.
5 तू सर्वशक्तिमान परमेश्वर आहेस.
इस्राएलचा देव आहेस.
ऊठ आणि त्या लोकांना शिक्षा कर.
त्या दुष्ट देशद्रोह्यांना अजिबात दयामाया दाखवू नकोस.
6 ते दुष्ट लोक संध्याकाळच्या वेळी गावात
येणाऱ्या कुत्र्यांसारखे गुरगुरत आणि शहरातून फिरत येतात.
7 त्यांच्या धमक्या आणि अपमानित करणारे शब्द ऐक.
ते अतिशय दुष्ट गोष्टी बोलतात
आणि कुणी ते ऐकेल याची त्यांना पर्वा नसते.
8 परमेश्वरा, त्यांना हास,
त्या सर्वांचा उपहास कर.
9 देवा, तू माझी शक्ती आहेस.
मी तुझी वाट पाहात आहे देवा, तू माझी उंच पर्वातावरील सुरक्षित जागा आहेस.
10 देव माझ्यावर प्रेम करतो.
आणि तो मला जिंकण्यासाठी मदत करतो.
तो मला माझ्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी मदत करील.
11 देवा, तू त्यांना फक्त मारुन टाकू नकोस नाही तर माझे लोक त्यांना विसरुन जातील.
माझ्या रक्षणकर्त्या तू त्यांची दाणादाण उडव आणि तुझ्या शक्तीने त्यांचा पराभव कर.
12 ते दुष्ट लोक शाप देतात आणि खोटे बोलतात.
ते ज्या गोष्टी बोलले त्याबद्दल त्यांना शिक्षा कर.
त्यांचा अंहकार त्यांना सापळ्यात अडकवू दे.
13 रागाने तू त्यांचा नाश कर,
त्यांचा सर्वनाश कर.
नतंर लोकांना कळेल की देव याकोबाच्या लोकांवर आणि सर्व जगावर राज्या करतो.
14 ते दुष्ट लोक गुरगुरणाऱ्या कुत्र्यांप्रमाणे
रात्री शहरातून हिंडत येतात.
15 ते खाण्यासाठी अन्न शोधतील पण त्यांना काही मिळणार नाही
आणि झोपायला जागाही मिळणार नाही.
16 परंतु मी तुझी स्तुती करणारे गाणे गाईन.
रोज सकाळी मी तुझ्या प्रेमाचा आनंद घेईन का?
कारण तू माझी उंच पर्वतावरची सुरक्षित जागा आहेस
आणि संकटात मी तुझ्याकडे धाव घेऊ शकतो.
17 मी तुझे गुणवर्णन करणारे गाणे गाईन.
का? कारण तू माझी उंच पर्वतावरील सुरक्षित जागा आहेस.
माझ्यावर प्रेम करणारा देव तूच आहेस.
देव इस्राएलला शिक्षा करील
8 याकोबाच्या (इस्त्राएलच्या) लोकांविरूध्द माझ्या परमेश्वराने आज्ञा दिली आहे. ती खरी ठरेल. 9 मग एफ्राइमच्या (इस्राएलच्या) प्रत्येक माणसाला, एवढेच नव्हे तर शोमरोनच्या नेत्यांना कळून चुकेल की देवाने आपल्याला शिक्षा केली आहे.
सध्या ती माणसे गर्विष्ठ व बढाईखोर झाली आहेत, ते म्हणतात. 10 “ह्या विटा पडल्या तर आम्ही पुन्हा बांधकाम करू आणि तेही भक्कम दगडांचे, ही लहान झाडे कापली जातील पण आम्ही त्यांच्या जागी उंच व भक्कम असे नवे वृक्ष लावू.”
11 म्हणून परमेश्वर इस्राएलच्याविरूध्द लढण्यासाठी लोकांना समर्थ करील. परमेश्वर रसीनच्या शत्रूंना इस्राएलविरूध्द् उठवील. 12 परमेश्वर पूर्वेकडून अरामी लोकांना व पश्चिमेकडून पलिष्ट्यांना आक्रमण करायला लावील. हे शत्रू आपल्या सैन्यबळावर इस्राएलचा पराभव करतील. पण एवढे झाले तरी परमेश्वराचा इस्राएलवरचा राग शांत होणार नाही. परमेश्वर लोकांना आणखी शिक्षा करण्याच्या विचारात असेल.
13 देवाने लोकांना शिक्षा केली तरी ते पाप करायचे थांबवणार नाहीत. ते देवाला शरण येणार नाहीत. ते सर्वशक्तिमान परमेश्वराला अनुसरणार नाहीत. 14 म्हणून परमेश्वर इस्राएलचे डोके व शेपूट कापून टाकील. एका दिवसात परमेश्वर फांदी व देठ कापून टाकील. 15 (इस्राएलचे डोके म्हणजे तेथील वडीलधारी मंडळी व प्रतिष्ठित नेते आणि शेपूट म्हणजे असत्य कथन करणारे तोतये संदेष्टे.)
16 लोकांचे नेतृत्व करणारे त्यांना चुकीच्या मार्गाने नेतात आणि त्यांच्या मागून जाणाऱ्या लोकांचा नाश होतो. 17 सर्वच लोक पापी आहेत. म्हणून परमेश्वर तरूणांवर प्रसन्न नाही आणि परमेश्वर त्यांच्या विधवांवर व अनाथांवरही दया करणार नाही.
ते सर्व देव सांगतो त्याच्या विरूध्द् वागतात. ते खोटे बोलतात. त्यामुळे देवाचा क्रोध शमणार नाही. व देव त्यांना शिक्षा करीतच राहील.
18 कुकर्म हे ठिणगीसारखे असते. प्रथम, ते तण व काटेकुटे जाळते. नंतर रानातील झाडेझुडपे पेट घेतात आणि शेवटी त्याचा वणवा होऊन सगळेच त्याचे भक्ष्य होते.
19 सर्वशक्तिमान परमेश्वर रागावला आहे म्हणून सर्व भूमी जाळली जाईल. सर्व माणसेही त्यात जाळली जातील. कोणीही आपल्या भावाला वाचविण्याचा प्रयत्न करणार नाही. 20 माणसे उजवीकडचे काही तरी पकडून खायला बघतील, पण त्यांची भूक भागणार नाही. मग ते डावीकडचे काही तरी खातील पण त्यांची भूक तरीही भागणार नाही. मग प्रत्येक जण वळेल आणि स्वतःचेच शरीर खाईल. 21 (मनश्शे एफ्राईमशी आणि एफ्राईम मनश्शेशी लढेल व नंतर दोघेही युहदाच्या विरोधात उभे राहतील.)
परमेश्वर अजूनही इस्राएलवर रागावला आहे. तो तेथील लोकांना शिक्षा करण्याच्या तयारीत आहेत.
10 अन्यायकारक कायदे करणाऱ्यांकडे पाहा घातक निर्णय लिहिणाऱ्या लेखकांकडे पाहा, लोकांना जगणे कठीण होईल असे कायदे ते करतात. 2 ते गरिबांशी न्यायाने वागत नाहीत. गरिबांचे हक्क ते डावलतात. विधवांना व अनाथांना लुबाडण्यास ते लोकांना मुभा देतात.
3 कायदे करणाऱ्यांनो, तुम्हाला तुमच्या कृत्यांचा जाब द्यावा लागेल, तेव्हा तुम्ही काय सांगाल? दूरच्या देशातून तुमचा विध्वंस येत आहे. तेव्हा मदतीसाठी कोठे धावाल? तुमची धनसंपत्ती तेव्हा उपयोगी पडणार नाही. 4 कैद्याप्रमाणे तुम्हाला वाकावे लागेल, मृताप्रमाणे तुम्हाला जमिनीवर पडावे लागेल. पण एवढ्यानेही भागणार नाही. कारण अजूनही देवाचा राग शांत झाला नसेल. अजूनही देव शिक्षा करण्याच्या तयारीत असेल.
ज्या गोष्टी आपण बोलतो त्यावर ताबा ठेवणे
3 माझ्या बंधूंनो, तुमच्यापैकी पुष्कळजण शिक्षक होऊ पाहत नाहीत काय? तुम्हांला माहीत आहे की, जे आपण शिक्षक आहोत त्या आपला काटेकोरपणे न्याय होईल.
2 मी तुम्हाला सावध करीत आहे, कारण आपण पुष्कळ पापे करतो आणि जर कोणी त्याच्या बोलण्यात चुका करीत नाही तर तो परिपूर्ण मनुष्य आहे. 3 आपण घोड्यांच्या तोंडांना लगाम घालतो यासाठी की, त्यांनी आपल्या आज्ञा पाळाव्यात. आणि अशा प्रकारे आपण त्यांचे संपूर्ण शरीर नियंत्रणात ठेऊ शकतो. 4 किंवा जहाजाचे उदाहरण घ्या. जरी ते खूप मोठे असले व जोरदार वाऱ्यामुळे चालविले जाते तरी ते लहान सुकाणूद्वारे ताब्यात ठेवता येते व सुकाणूधर नावाड्याच्या इच्छेला येईल तिकडे नेता येते. 5 त्याचप्रकारे जीभ ही शरीराचा लहानसा भाग आहे, पण ती मोठमोठ्या गोष्टी केल्याची बढाई मारते.
फक्त विचार करा, कितीतरी मोठे जंगल लहानशा आगीन पेट घेते! 6 होय, जीभ ही ज्वाला आहे. आपल्या शरीराच्या सर्व अवयवामध्ये वाईट गोष्टींची ती खाणच आहे. जीभ ही आपल्या सर्व शरीराला विटाळविणारी आहे. ती आपल्याला अपवित्र करते. आपल्या सर्व अस्तित्वालाच ती आग लावते. ती नरकाच्या ज्वालांनी जीवन पेटवते.
7 पशू, पक्षी, सरपटणारे जीवजंतु, साप आणि समुद्रातील निरनिराळ्या जातीचे जीव माणूस पाळू शकतो आणि प्रत्यक्षात त्याने तसे केले आहे. 8 पण कोणताही मनुष्य आपली जीभ ताब्यात ठेवू शकत नाही. ती फार चंचल, भयंकर, हिंस्र, दुराचारी आणि जहाल विषाने भरलेली असते. 9 आपला प्रभु आणि स्वर्गीय पिता याची स्तुति आपण आपल्या जिभेने करतो आणि जे मानव देवाच्या प्रतिमेचे बनविलेले आहेत, त्यांना जिभेने शापही देतो! 10 एकाच तोंडातून आशीर्वाद निघतात व शापही निघतात. माझ्या बंधूंनो, हे असे असू नये. 11 एकाच झऱ्यातून गोड व कडू पाणी येऊ शकत नाही. 12 माझ्या बंधूंनो, अंजिराच्या झाडाला जैतुनाची फळे येतील काय? किंवा द्राक्षवेलीला अंजिर लागतील काय? कधीच नाही. तसेच खारट पाण्याच्या झऱ्यातून गोड पाणी येऊ शकणार नाही.
खरे शहाणपण
13 तुमच्यामध्ये कोण शहाणा व ज्ञानाने भरलेला आहे? त्याने त्याचे शहाणपण त्याच्या चांगल्या वागणुकीने दाखवावे. नम्रतेने केल्या जाणाऱ्या कृतीद्वारे त्याने आपले शहाणपण दाखवावे. 14 पण जर तुमच्या ह्रदयात कटूरता, मत्सर व स्वार्थी उद्देश असतील तर तुम्ही तुमच्या शहाणपणाची फुशारकी मारू शकणार नाही. कारण तसे करणे म्हणजे खोटेपणाच्या आड सत्य लपविण्यासारखे आहे. 15 कारण अशा प्रकारचे शहाणपण वरून, स्वर्गातून आलेले नाही, तर ते पृथ्वीवरचे आहे. अधार्मिक आणि सैतानी आहे. 16 कारण जेथे मत्सर व स्वार्थी ध्येये आढळतात तेथे अव्यवस्थितपणा व सर्व प्रकारचे वाईट व्यवहारही आढळतात. 17 पण वरून लाभलेले शहाणपण मुळात शुद्ध, शांतिदायक, समजूतदारपणाचे आणि मनमोकळे असून ते दयेचे व चांगली कामे यांना उत्तेजन देणारे असते. तसेच ते पक्षपात न करणारे व कळकळीचे असते. 18 जे लोक शांततेच्या मार्गाने शांति स्थापन करण्याचा प्रयत्न करतात त्यांना सरळ, नीतिपूर्ण वागण्यामुळे मिळणाऱ्या चांगल्या गोष्टींचा लाभ होतो.
2006 by World Bible Translation Center