M’Cheyne Bible Reading Plan
कोणी नेते मोशे विरुद्ध उठले
16 कोरह, दाथान, अबीराम आणि ओन मोशेच्या विरुद्ध गेले. (कोरह इसहारचा मुलगा होता. इसहार कहाथचा मुलगा होता आणि कहाथ लेवीचा मुलगा होता. दाथान आणि अबीराम भाऊ होते आणि ती अलीयाबाची मुले होती ओन पेलेथचा मुलगा होता. दाथान, अबीराम आणि ओन रऊबेन वंशातील होते.) 2 या चार माणसांनी इस्राएल मधून 250 माणसे एकत्र जमविली आणि ते मोशेविरुद्ध उठले. ते लोकांनी निवडलेले नेते होते, हे सर्व लोकांना माहीत होते. 3 ते मोशे विरुद्ध बोलण्यासाठी समुहाने आले. ते लोक मोशेला आणि अहरोनला म्हणाले, “तुम्ही फारच अधिकार दाखवता आता पुरे झाले! इस्राएलचे इतर लोक ही पवित्र आहेत. त्यांच्यात अजूनही परमेश्वर राहतो. तुम्ही परमेश्वराच्या इतर लोकांपेक्षा स्वतःला अधिक महत्वाचे समजत आहात.”
4 जेव्हा मोशेने या गोष्टी ऐकल्या तेव्हा त्याने त्याचे तोंड जमिनीपर्यंत लवविले. तो गार्विष्ठ नाही हे त्याला दाखवायचे होते. 5 मग मोशे कोरह व त्याच्या सर्व अनुयायांना म्हणाला, “उद्या सकाळी परमेश्वर कोण खरोखर त्याचा माणूस आहे ते दाखवील. कोण खरा पवित्र आहे ते परमेश्वर दाखवील आणि परमेश्वर त्या माणसाला त्याच्या जवळ आणिल. परमेश्वर त्या माणसाची निवड करील आणि त्याला स्वतः जवळ आणिल. 6 म्हणून कोरह तू आणि तुझ्या अनुयायांनी हे करायला हवे: 7 उद्या अग्नी आणि ऊद-धूप काही खास भांड्यात ठेवा. नंतर ती भांडी परमेश्वरासमोर आणा. खरोखरच जो पवित्र असेल त्याची परमेश्वर निवड करील. लेवीच्या वंशजांनो तुम्ही फार पुढे गेलात. तुम्ही चूक केलीत.”
8 मोशे कोरहला आणखी म्हणाला, “लेवीच्या वंशजांनो तुम्ही माझे ऐका 9 तुमची निवड इस्राएलच्या देवाने केली आहे आणि तुम्हाला खास दर्जा दिला आहे म्हणून तुम्ही आनंदी असायला हवे. तुम्ही इस्राएलच्या इतर लोकांपेक्षा वेगळे आहात. परमेश्वराने तुम्हाला खास कामासाठी, इस्राएल लोकांना परमेश्वराची भक्ती करायला मदत व्हावी म्हणून त्याच्या पवित्र निवास मंडपात त्याच्या जवळ आणले. हे पुरेसे नाही का? 10 परमेश्वराने लेवीच्या वंशजांना याजकांच्या मदतीसाठी जवळ आणले. परंतु आता तुम्हीच याजक व्हायचा प्रयत्न करीत आहात. 11 तुम्ही आणि तुमचे अनुयायी एकत्र आलात आणि परमेश्वराच्या विरुद्ध गेलात. अहरोनाने काही चूक केली का? नाही. मग तुम्ही अहरोनाविरुद्ध का तक्रार करीत आहात.”
12 नंतर मोशेने दाथान, अबीराम, ह्या अलियावाच्या मुलांना बोलावले पण ते दोघे म्हणाले, “आम्ही येणार नाही. 13 तू आम्हाला वाळवंटात दूध आणि मध असलेल्या प्रदेशातून आणले आहेस. तू आम्हाला वाळवंटात ठार मारायला आणले आहेस. आणि आता आमच्यावर तुझी अधिक सत्ता आहे हे तुला दाखवायचे आहे. 14 आम्ही तुझ्या मागे का यावे? तू आम्हाला चांगल्या गोष्टींनी समृद्ध असलेल्या नवीन प्रदेशात आणले नाहीस. देवाने कबूल केलेला प्रदेश तू आम्हाला दिला नाहीस. तू आम्हाला शेते व द्राक्षमळे दिले नाहीस तू ह्या लोकांना गुलाम करणार आहेस का? नाही. आम्ही येणार नाही.”
15 म्हणून मोशेला खूप राग आला. तो परमेश्वराला म्हणाला, “मी या लोकांच्या बाबतीत काहीही वाईट केले नाही. मी त्यांच्या कडून काहीही घेतले नाही-साधा गाढव देखील नाही! परमेश्वरा, त्यांची अर्पणे स्विकारु नकोस.”
16 नंतर मोशे कोरहला म्हणाला, “उद्या तू आणि तुझे अनुयायी परमेश्वरापुढे उभे राहतील. तिथे तू अहरोन आणि तुझे अनुयायी असतील. 17 तुम्ही प्रत्येकाने एक भांडे आणावे त्यात ऊद-धूप टाकावा आणि ते परमेश्वराला द्यावे. नेत्यांसाठी 250 भांडी असतील आणि एकेक भांडे तुझ्यासाठी व अहरोनासाठी असेल.”
18 म्हणून प्रत्येकाने भांडे आणले आणि त्यात उद धूप जाळला, नंतर ते दर्शन मंडपाच्या दारात उभे राहिले. मोशे आणि अहरोनसुद्धा तिथे उभे राहिले. 19 कोरहनेसुद्ध तंबूच्या दारात लोक जमा केले. नंतर प्रत्येकाला परमेश्वराची प्रभा दिसली.
20 परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला, 21 “या लोकांपासून दूर जा. मला आता त्यांचा नाश करायचा आहे.”
22 पण मोशे आणि अहरोन जमिनीवर पालथे पडले आणि ओरडले, “कृपा करुन या सगळयांवर रागावू नकोस, सर्वाच्या आत्म्यांच्या देवा! फकत एका माणसाने पाप केले आहे!”
23 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, 24 “सर्व लोकांना कोरह, दाथान, व अबीराम यांच्या तंबूपासून दूर जायला सांग.”
25 मोशे उभा राहिला आणि दाथान व अबीराम यांच्याकडे गेला. इस्राएलचे सर्व वडिलधारी त्याच्या मागे गेले. 26 मोशेने सर्व लोकांना बजावले, “या दुष्टांच्या तंबू पासून दूर जा. त्यांच्या कोणत्याही वस्तूला हात लावू नका. जर तुम्ही हात लावला तर त्यांच्या पापामुळे तुमचाही नाश होईल.”
27 म्हणून लोक कोरह, दाथान व अबीराम यांच्या तंबू पासून दूर गेले. दाथान आणि अबीराम त्यांच्या तंबूकडे गेले. ते त्यांच्या तंबू बाहेर आपल्या बायका, मुले आणि तहान्या मुलांबरोबर उभे राहिले.
28 नंतर मोशे म्हणाला, “परमेश्वराने मला मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी करायला पाठवले आहे या बद्दलचा पुरावा मी तुम्हांला दाखवीन. या गोष्टी करण्याची कल्पना माझी नव्हती हेही मी तुम्हांला दाखवीन. 29 हे इथले लोक मरतील. पण ते जर सामान्य रीतीने मेले-जशी माणसे नेहमी मरतात-तर त्यावरून असे दिसेल की परमेश्वराने मला खरंच पाठवल नाही. 30 पण जर परमेश्वराने या लोकांना वेगव्व्या नव्या रीतीने मारले-तर तुम्हांला कळेल की त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले होते. हा पुरावा आहे: धरती दुभागेल आणि त्या लोकांना आपल्या पोटात घेईल. ते जिवंतपणीच त्यांच्या कबरेत जातील. आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जाईल.”
31 जेव्हा मोशेचे बोलणे संपले तेव्हा त्या लोकांच्या पायाखालची जमीन दुभागली. 32 धरतीने जणू आपले तोंड उघडून त्यांना गिळून टाकले. कोरहची सगळी माणसे, त्याचे संपूर्ण घराणे आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जमिनीत गेली. 33 ते लोक जिवंतपणी कबरेत गेले आणि त्यांची सगळी चीजवस्तूही त्यांच्या बरोबर गेली. नंतर जमीन पूर्ववत झाली. ते नष्ट झाले-लोकांतुन नाहीसे झाले.
34 इस्राएल लोकांनी नाश होत असलेल्या लोकांचे आक्रोश ऐकले म्हणून ते सर्व सैरावैरा धावू लागले आणि म्हणाले, “पृथ्वी आपल्यालासुद्धा गिळून टाकील.”
35 नंतर परमेश्वराकडून अग्नी आला. त्याने उद-धूप जाळणाऱ्या 250 लोकांचा नाश केला.
36 परमेश्वर मोशेला म्हणाला: 37-38 “याजक अहरोन याचा मुलगा एलाजार याला उदा-धूपाची सगळी भांडी अग्नी जवळून घ्यायला सांग. त्याला कोळसा आणि राख पसरावयाला सांग. त्या लोकांनी माझ्याविरुद्ध पाप केले आणि त्यांच्या पापामुळे त्यांना प्राण गमवावे लागले. पण उदा-धुपाची भांडी अजूनही पवित्र आहेत. ही भांडी पवित्र आहेत कारण ती परमेश्वराला अर्पण केली होती. भांडी ठोकून त्याचा पत्रा कर. या पत्र्याचा उपयोग वेदी झाकायला कर. इस्राएलाच्या सर्व लोकांना हा ताकीदीचा इशारा असेल.”
39 म्हणून याजक एलाजारने लोकांनी आणलेली काशाची [a] सर्व भांडी गोळा केली. ते सगळे लोक जळून गेले पण त्यांची भांडी मात्र होती. नंतर एलाजारने काही माणसांना भांडी ठोकून त्यांचा पत्रा करायला सांगितले. नंतर त्याने धातूचा पत्रा वेदीवर ठेवला. 40 परमेश्वराने मोशेला जशी आज्ञा केली होती तसेच त्याने केले. अहरोनच्या वंशातीलच कोणी तरी परमेश्वरासमोर उद-धूप जाळू शकतो, दुसऱ्या कोणी परमेश्वरासमोर उद-धूप जाळला तर तो कोरह आणि त्याच्या अनुयायांप्रमाणे मरेल. हे इस्राएल लोकांनी लक्षात ठेवायची ही एक खूण होती.
अहरोन लोकांचे रक्षण करतो
41 दुसऱ्या दिवशी इस्राएलच्या सर्व लोकांनी मोशे आणि अहरोनविरुद्ध तक्रार केली. ते म्हणाले, “तुम्ही परमेश्वराची माणसे मारली.”
42 मोशे आणि अहरोन दर्शन मंडपाच्या दारात उभे होते. लोक मोशे आणि अहरोन विरुद्ध तक्रार करायला एकत्र जमले. पण जेव्हा त्यांनी दर्शन मंडपाकडे पाहिले तेव्हा ढंगानी त्याला झाकून टाकले आणि तिथे परमेश्वराचे तेज दिसू लागले. 43 नंतर मोशे आणि अहरोन तंबूच्या पुढच्या भागात आले.
44 परमेश्वर मोशेला म्हणाला, 45 “त्या लोकांपासून दूर जा म्हणजे मी त्यांचा नाश करीन ताबोडतोब. मोशे आणि अहरोन यांनी त्यांचे चेहरे जमिनीपर्यंत लववून दंडवत घातले.”
46 नंतर मोशे अहरोनला म्हणाला, “तुझे तांब्याचे भांडे आणि थोडासा अग्नी वेदीवरुन घे. नंतर त्यावर उद-धूप टाक. लवकर लोकांकडे जा आणि त्यांना शुद्ध करण्यासाठी काहीतरी कर. परमेश्वर त्यांच्यावर रागावला आहे. आजार पसरायला सुरुवात झाली होती.”
47-48 म्हणून अहरोनाने मोशेने जे सांगितले ते केले. अहरोनाने अग्नी व धूप घेतला आणि मग तो लोकांमध्ये धावत गेला. परंतु लोकात आजाराची लागण झाली होती म्हणून अहरोन मेलेल्या आणि अजून जिंवत असलेल्या लोकांच्या मध्ये जाऊन उभा राहिला अहरोनाने लोकांना पवित्र करण्यासाठी प्रायश्चित केले. आणि आजार तिथेच थांबला. 49 पण त्या आजारामुळे 14,700 लोक मेले. यात कोरहमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा समावेश नाही. 50 भयानक आजार थांबला आणि अहरोन दर्शन मंडपाच्या दाराशी असलेल्या मोशेकडे गेला.
प्रमुक गायकासाठी दावीदाचे मास्कील (बोधपर स्तोत्र) “दावीद अहीमलेखाच्या घरी आला आहे” असे देवगअदोमीने शौलाकडे येऊन सांगितले त्यावेळचे स्तोत्र
52 बलवान पुरुषा, तू तुझ्या दुष्कर्मांची बढाई का करीत आहेस?
तू देवाला एक कलंक आहेस.
तू दिवसभर वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतोस.
2 तू मूर्खासारख्या योजना आखतोस आणि तुझी जीभ धारदार वस्तऱ्यासारखी भयंकर आहे.
तू नेहमी खोटे बोलतोस आणि कुणाची तरी फसवणूक करण्याच्या बेतात असतोस.
3 तू चांगल्यापेक्षा वाईटावर अधिक प्रेम करतोस.
तुला खरे बोलण्यापेक्षा खोटे बोलणे अधिक आवडते.
4 तुला आणि तुझ्या खोटे बोलणाऱ्या जिभेला लोकांना त्रास द्यायला आवडते.
5 म्हणून देव तुझा कायमचा नाश करेल.
तो तुला पकडून तुझ्या घरातून बाहेर खेचेल.
तो तुला मारुन टाकेल आणि तुझा निर्वंश करेल.
6 चांगले लोक ते बघतील आणि त्यावरुन.
ते देवाला घाबरायला आणि त्याचा आदर करायला शिकतील.
ते तुला हसतील.
7 व म्हणतील, “जो देवावर अवलंबून नव्हता त्याचे काय झाले पाहा त्याची संपत्ती आणि
त्याचे खोटे बोलणे त्याला वाचवू शकेल असे त्याला वाटत होते.”
8 पण देवाच्या मंदिरात मी हिरव्यागार व दीर्घकाळ जगणाऱ्या जैतून झाडासारखा आहे.
मी देवाच्या प्रेमावर सदैव विश्र्वास ठेवतो.
9 देवा, तू केलेल्या गोष्टींबद्दल मी सर्वकाळ तुझी स्तुती करतो.
तुझ्या इतर भक्तांप्रमाणे मी ही तुझ्या नावावर विश्वास ठेवतो.
प्रमुख गायकासाठी महलथ् [a] सुरांवर बसवलेले दावीदाचे मास्कील (शिक्षण).
53 केवळ मूर्ख माणूसच देव नाही असा विचार करतो.
तसले लोक भ्रष्टाचारी, वाईट, द्वेषपूर्ण असतात
आणि ते कसले ही सत्कृत्य करीत नाहीत.
2 देव खरोखरच स्वर्गात आहे आणि तो आपल्यावर नजर ठेवतो.
देवाला शोधणाऱ्या शहाण्या लोकांच्या शोधात देव आहे.
3 परंतु प्रत्येक जण देवापासून दूर गेला आहे.
प्रत्येक जण वाईट आहे.
कोणीही काही सत्कृत्य करीत नाही,
अगदी एकही नाही.
4 देव म्हणतो, “त्या दुष्टांना सत्य माहीत आहे.
पण ते माझी प्रार्थना करीत नाहीत.
दुष्ट लोक अन्न खायला जसे तत्पर असतात तसेच
ते माझ्या लोकांचा नाश करायला तत्पर झाले आहेत.”
5 परंतु त्या दुष्टांना भीती वाटेल,
पूर्वी कधीही भ्याले नव्हते इतके ते भीतील.
ते दुष्ट लोक इस्राएलचे शत्रू आहेत.
देवाने त्या दुष्टांना नाकारले आहे.
म्हणून देवाची माणसे त्यांचा पराभव करतील.
आणि देव त्या दुष्टांची हाडे इतस्तत फेकेल.
6 सियोनातून इस्राएलला कोण विजय मिळवून देईल?
देव त्यांना विजय मिळवण्यात मदत करेल,
देव त्याच्या माणासांना हद्दपारीतून परत आणेल
याकोबाला हर्ष होईल आणि इस्राएलखूप आनंदी होईल.
प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे दावीदाचे मास्कील यावेळी जिफी लोक शौलाकडे येऊन म्हणाले, “दावीद आमच्या लोकांत लपला आहे असे आम्हाला वाटते.”
54 देवा, तुझ्या अधिकाराचा उपयोग करुन मला वाचव.
तुझे महान सामर्थ्य वापर आणि मला मुक्त कर.
2 देवा, माझी प्रार्थना ऐक मी
काय म्हणतो ते ऐक.
3 जे देवाची उपासना करत नाहीत असे परके माझ्या विरुध्द गेले आहेत
आणि शक्तिशाली लोक मला मारायला निघाले आहेत.
4 पाहा, माझा देव मला मदत करेल.
माझा मालक मला साहाय्य करेल.
5 जे लोक माझ्याविरुध्द गेले आहेत त्यांना देव शिक्षा करेल.
देव माझ्याशी प्रमाणिक असेल आणि तो त्या लोकांचा नाश करेल.
6 देवा, मी तुला खुशीने अर्पणे देईन.
परमेश्वरा, मी तुझ्या चांगल्या नावाची स्तुती करेन.
7 परंतु मी तुला सर्व संकटांतून सोडवण्याची विनंती करीत आहे.
माझ्या शत्रूंचा पराभव झाल्याचे मला पाहू दे.
देव यशयाला संदेष्टा होण्यास बोलावतो
6 उज्जीया राजाच्या मृत्यूच्या वर्षीच मी माझ्या प्रभूला पाहिले. तो एका उच्च व विलक्षण सुंदर सिंहासनावर बसला होता. त्याच्या पायघोळ पोशाखाने सर्व मंदिर भरून गेले होते. 2 देवदूत परमेश्वराभोवती उभे होते. प्रत्येक देवदूताला सहा पंख होते. त्यातील दोन पंखांनी ते चेहरा झाकीत. दोनने पाय झाकीत व उरलेल्या दोन पंखांनी उडत. 3 ते देवदूत एकमेकांशी बोलत होते. ते म्हणत होते, “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वशक्तिमान परमेश्वर परमपवित्र आहे. त्याची प्रभा सगळ्या पृथ्वीला व्यापून राहिली आहे.” देवदूतांचे आवाज फार मोठे होते. 4 त्यांच्या आवाजाने मंदिराच्या दाराची चौकट हादरली नंतर मंदिर धुराने भरून गेले.
5 मी फारच घाबरलो. मी म्हणालो, “हाय रे देवा! आता माझा नाश होणार देवाशी संवाद करण्याइतका मी पवित्र किंवा शुध्द नाही आणि मी ज्या माणसांत राहतो, तीही देवाशी प्रत्यक्ष बोलण्याइतकी शुध्द् नाहीत. [a] तरीसुध्दा् राजाधिराज, सर्वशक्तिमान परमेश्वराला मी पाहिले आहे.”
6 तेथे वेदीवर अग्नी प्रज्वलित केलेला होता एका सराफ देवदूताने चिमट्याने त्यातील निखारा उचलला. सराफ देवदूत तो निखारा घेऊन माझ्याकडे उडत आला. 7 त्या निखांऱ्याचा स्पर्श त्याने माझ्या तोंडाला केला नंतर तो देवदूत म्हणाला, “हे बघ! ह्या निखाऱ्याच्या स्पर्शाने तुझी सर्व दुष्कृत्ये नाहिशी झाली आहेत. तुझी पापे आता पुसली गेली आहेत.”
8 नंतर मला माझ्या परमेश्वराचा आवाज ऐकू आला. परमेश्वर म्हणाला, “मी कोणाला पाठवू! आमच्यासाठी कोण जाईल?”
मग मी म्हणालो, “हा मी तयार आहे, मला पाठव.”
9 नंतर परमेश्वर म्हणाला, “जा आणि ह्या लोकांना सांग: ‘काळजीपूर्वक ऐका पण समजून घेऊ नका. काळजीपूर्वक पाहा पण शिकू नका.’ 10 लोकांना गोंधळात टाक, लोक जे ऐकतील आणि पाहतील ते त्यांना समजणार नाही असे कर. तू असे केले नाहीस तर कदाचित् लोक जे कानांनी ऐकतील आणि डोळ्यांनी पाहतील, तेच खरे समजतील. असे जर झाले तर ते मला शरण येतील आणि बरे होतील.”
11 नंतर मी विचारले, “प्रभू, मी हे असे किती दिवस करू?”
परमेश्वर उत्तरला, “लोक पळून जाऊन शहरे निर्जन होईपर्यंत, आता भरलेली घरे निर्मनुष्य होईपर्यंत, किंबहुना ही सर्व भूमी उजाड व वैराण होईपर्यंत तू असे कर.”
12 परमेश्वर लोकांना दूर पळवून लावील ह्या देशात खूप मोठी ओसाड जमीन तयार होईल. 13 पण लोकसंख्येचा दहावा हिस्सा ह्या भूमीवर राहतील. त्यांचा नाश होणार होता तरीही ते परमेश्वराकडे परत येतील. हे लोक एलाच्या झाडाप्रमाणे असतील. एलाचे झाड कापले तरी बुडखा शिल्लक राहतोच. हे राहिलेले लोक त्या बुडख्याप्रमाणे असतील. हे लोक खास बीज म्हणजेच देवाची लाडकी लेकरे असतील.
Worship That Pleases God
13 ख्रिस्तामध्ये एकमेकांवर अखंडपणे बंधु व भगिनीसारखी प्रीति करा. 2 पाहुणचार करण्याचे विसरू नका. असे करण्याने काहींनी त्यांच्या नकळत देवदूतांचे स्वागत केले आहे. 3 तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर तुरुंगात होता असे समजून जे तुरुंगात आहेत त्यांची आठवण करा. तुम्हीही देहात असल्याने जे दु:ख भोगीत आहेत त्यांची आठवण ठेवा.
4 सर्वांनी लग्नाचा आदर करावा. व वैवाहिक अशुद्धता असू नये. कारण जे व्यभिचारी व विषयवासनेबद्दल भ्रष्ट आहेत अशा लोकांचा देव न्याय करील. 5 आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यातच समाधान माना. कारण देवाने असे म्हटले आहे.
“मी कधीही तुला सोडणार नाही,
मी कधीही तुला त्यागणार नाही” (A)
6 म्हणून आपण खात्रीने म्हणू शकतो,
“देव माझा सहाय्यकर्ता आहे,
मी भिणार नाही.
मनुष्य माझे काय करणार?” (B)
7 ज्यांनी तुम्हांला देवाचा संदेश दिला त्या पुढाऱ्यांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनातील निष्पत्ती पाहा. आणि त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. 8 येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुगे सारखाच आहे. 9 निरनिराळ्या तऱ्हेच्या विचित्र शिकवणुकींमुळे बहकून जाऊ नका. अन्नाच्या विधीने नव्हे, तर देवाच्या कृपेने आपली ह्रदये बळकट केलेली फार बरी. कारण अन्नाच्या विधींचे पालन करण्याने कोणाचेही हित झालेले नाही.
10 ज्या वेदीवरील अन्न खाण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार मंडपात सेवा करणाऱ्यांनाही नाही, अशी वेदी आपल्याकडे आहे. 11 यहूदी मुख्य याजक प्राण्यांचे रक्त परमपवित्रस्थानात पापाचे अर्पण म्हणून घेऊन जातात. परंतु केवळ प्राण्यांची शरीरे छावणीच्या बाहेर नेऊन जाळतात. 12 म्हणून येशूने सुद्धा स्वतःच्या रक्ताने लोकांना शुद्ध करावे यासाठी नगराच्या वेशी बाहेर दु:ख सोसले, 13 म्हणून आपण छावणीच्या बाहेर जाऊ आणि येशूच्या अपमानाचे वाटेकरी होऊ. 14 कारण कायमस्वरूपी असे नगर आपल्याला येथे नसले तरी भविष्याकाळात येणारे जे नगर आहे त्याच्याकडे आपण पाहत आहोत. 15 तर मग आपण येशूच्या द्वारे स्तुतीचा यज्ञ सातत्याने करू या. म्हणजे त्याचे नाव आपल्या ओठांनी सतत घेऊ या 16 आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका. कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो.
17 आपल्या पुढाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन असा. ज्यांना हिशेब द्यावयाचा असतो त्यांच्याप्रमाणे तुमच्या जीवासंबंधाने ते जागरूक असतात, त्यांच्या आज्ञा पाळा यासाठी की, त्यांनी त्यांचे काम दु:खाने न करता आनंदाने करावे.
18 आमच्यासाठी प्रार्थना करा. आमची सदसदविवेक बुध्दि शुद्ध आहे याविषयी आमची खात्री आहे आणि सर्व बाबतीत जे नेहमी बरोबर आहे तेच सदैव करीत राहावे अशी आमची इच्छा आहे. 19 मी तुम्हांला विनंति करतो की, देवाने मला लवकरच तुमच्याकडे परत पाठवावे म्हणून प्रार्थना करा.
20-21 ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा (म्हणजे आपल्या लोकांचा) मेंढपाळ, आपला प्रभु येशू ख्रिस्त याला रक्ताच्या युगानुयुगाच्या नव्या कराराद्वारे उठविले. त्याची इच्छा पूर्ण करायला तुम्हांला चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याला संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो. त्याला युगानुयुगे गौरव असो. आमेन.
22 बंधुजनहो, हा जो बोधपर संदेश मी थोडक्यात लिहिला आहे, तो धीर धरून ऐका अशी विनंति तुम्हांला करतो. 23 आपला बंधु तीमथी हा तुरुंगातून सुटला आहे. जर तो लवकर माझ्याकडे आला, तर जेव्हा मी तुम्हाला भेटायला येईन तेव्हा तो मजकडे येईल.
24 तुमच्या सर्व पुढाऱ्यांना व देवाच्या सर्व संतांना सलाम सांगा, इटली येथील सर्वजण तुम्हांला सलाम सांगतात.
25 देवाची कृपा तुम्हां सर्वांबरोबर असो. आमेन.
2006 by World Bible Translation Center