M’Cheyne Bible Reading Plan
इस्राएल लोक पुन्हा तक्रार करतात
11 मग इस्राएल लोक आपल्या त्रासाबद्दल परत तक्रार करु लागले. ती परमेश्वराने ऐकली व ती ऐकल्यावर त्याचा राग भडकला. परमेश्वरापासूनचा अग्नि त्यांच्यात पेटला आणि त्याने छावणीच्या कडेचा काही भाग जाळून टाकिला. 2 तेव्हा लोकांनी मोशेकडे मदतीसाठी आरडाओरड केली. मोशेने परमेश्वराला विनंती केली तेव्हा अग्नि शमला. 3 त्यामुळे त्या ठिकाणाचे नांव तबेरा असे पडले. लोकांनी त्या ठिकाणाला तसे नांव दिले कारण परमेश्वराच्या अग्निमुळे छावणीचा भाग जळून गेला.
अधिक वयाचे सत्तर नेते
4 जे विदेशी इस्राएल लोकाबरोबर राहात होते, त्यांना इतर काही पदार्थ खावेसे वाटू लागले. लवकरच इस्राएल लोकांनी पुन्हा कुरकुर करण्यास सुरवात केली. लोक म्हणाले, “आम्हांला मांस खावयास पाहिजे. 5 मिसरमध्ये असताना खाल्लेल्या माश्यांची आम्हाला आठवण येते; तेथे ते आम्हाला फुकट खावयास मिळत. त्याचप्रमाणे तेथे आम्हाला काकड्या, खरबूजे, भाजी, कांदे, लसूण असा चांगला भाजीपाला मिळत आसे. 6 परंतु आता आम्ही कमजोर झालो आहोत. मान्न्याशिवाय आम्हाला येथे काही ही खावयास मिळत नाही!” 7 (हा मान्ना लहान धण्यासारखा होता, आणि तो झाडाच्या डिंकासारखा दिसे. 8 लोक तो गोळा करीत, तो उखळात कुटीत, किंवा भांड्यात शिजवीत किंवा दळीत व त्याच्या भाकरी करी. उत्तम तेलात भाजलेल्या गोड पुऱ्या सारखी त्याची चव लागे. 9 रात्री दव पडल्यामुळे जमीन ओली झाल्यावर मान्ना जमिनीवर पडत असे.)
10 मोशेने लोकांची कुरकुर ऐकली. प्रत्येक कुटुंबातील लोक आपापल्या तंबूसमोर बसून कुरकुर करीत होते. त्यामुळे परमेश्वराचा राग भयंकर भडकला आणि त्यामुळे मोळे खिन्न झाला. 11 मोशेने परमेश्वराला विचारले, “परमेश्वरा, तू माझ्यावर हे संकट का आणिले? मी तुझा दास आहे. माझे काय चुकले? तुला एवढे रागावण्यासारखे मी काय केले? ह्या सर्व लोकांची जबाबदारी तू माझ्यावर का टाकलीस? 12 तुला माहीत आहे की मी काही ह्या सर्व लोकांचा बाप नाही, की मी ह्यांना जन्म दिला नाही. परंतु परिचारिका-जशी लहान बाळाला छातीशी धरते तशी मी त्यांची काळजी घेतली पाहिजे अशी सक्ति तू माझ्यावर का करतोस? तू आमच्या वाडबडिलांना वचन दिलेल्या देशात त्यांना घेऊन जाण्याची सक्ति माझ्यावर का करतोस? 13 एवढ्या लोकांना पुरेल एवढे मांस माझ्याजवळ नाही! आणि त्यांची तर माझ्यामागे कुरकुर चालूच आहे. ते म्हणतात, ‘आम्हाला खावयास मांस दे!’ 14 मी एकटा ह्या सर्वांची काळजी घेऊ शकत नाही. हे ओझे माझ्यासाठी फारच जड आहे. 15 त्यांचा त्रास मी सहन करण्याचे काम चालू ठेवावे असा जर तुझा विचार असेल तर मग तू आजच मला मारुन टाक. तू मला दास समजत असशील तर मग आता मला मरु दे. मग माझ्या मागचा सर्व त्रास संपून जाईल!”
16 तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल मंडळीतील सत्तर वडील मजकडे आण. मंडळीचे नेते असलेल्या ह्या लोकांना दर्शनमंडपाच्या दारापाशी आण; व तुझ्याबरोबर त्यांना उभे कर. 17 मग मी खाली येऊन तेथे तुझ्याशी बोलेन. मग तुझ्यावर असलेल्या आत्म्यातून काही भाग मी त्यांनाही देईन. मग लोकांची काळजी घेण्यास ते तुला मदत करतील. ह्या प्रकारे इस्राएल लोकांची जबाबदारी केवळ तुझ्या एकट्यावर राहणार नाही.
18 “तू ह्या गोष्टी लोकांना सांग: उद्या तुम्ही स्वतः शुद्ध राहा म्हणजे तुम्हाला मांस खावयास मिळेल. परमेश्वराने तुमचे रडगाणे ऐकले आहे. ‘आम्हाला मांस खाण्यास पाहिजे! आम्ही मिसरमध्ये होतो ते बरे होते,’ असे तुम्ही म्हणाला ते शब्दही परमेश्वराने ऐकले आहेत. तेव्हा आता परमेश्वर तुम्हाला मांस देईल आणि तुम्ही ते खाल. 19 तुम्ही ते एक, किंवा दोन, किंवा पाच, किंवा दहा दिवसच नव्हे तर वीस दिवस देखील खाल. 20 येवढेच नव्हे तर तुम्ही ते पूर्ण महिनाभर खाल. तुम्हाला त्याचा तिटकारा येईपर्यंत ते खाल. हे असे होईल कारण तुम्ही आपल्या परमेश्वराविरुद्ध कुरकुर केली. परमेश्वर तुम्हामध्ये राहतो आणि तुम्हाला काय पाहिजे ते त्याला माहीत आहे; परंतु तुम्ही त्याच्या विरुद्ध ओरड केली आणि म्हणाला, ‘आम्ही का बरे मिसर सोडले?’”
21 मोशे म्हणाला, “परमेश्वरा येथे सहा लाख लोक आहेत आणि तू म्हणतोस की ‘ह्याना पूर्ण महिनाभर पुरेल एवढे मांस मी खावयास देईन!’ 22 आम्ही जरी सर्व शेरडेमेंढरे व गुरेढोर कापली तरी ह्या सर्व लोकांना महिनाभर खाण्यास तेवढेही पुरे पडणार नाहीत.”
23 परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “परमेश्वराचा हात असमर्थ तोकडा पडला आहे काय? मी माझे म्हणणे खरे करुन दाखवीन हे तुला दिसेल.”
24 तेव्हा मोशे लोकांशी बोलण्याकरिता बाहेर गेला. परमेश्वर जे बोलला ते त्याने त्यांना सांगितले. मग मोशेने मंडळीच्या सत्तर वडिलांना (नेत्यांना) एकत्र जमविले; त्याने त्यांना तंबू भोंवती उभे राहण्यास सांगितले. 25 मग परमेश्वर ढगातून खाली आला आणि मोशेशी बोलला. मोशेवर परमेश्वराचा आत्मा होता. त्यातून काही घेऊन परमेश्वराने ते त्या सत्तर वडिलावर (नेत्यावर) ठेवला. तो आत्मा आल्यावर ते संदेश सांगू लागले. परंतू त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगीतला नाही.
26 त्यातील दोन वडील (नेते) एलदाद व मेदाद छावणीच्या बाहेर गेले नाहीत. त्यांची नांवे वडीलांच्या (नेत्यांच्या) यादीत होती. परंतु ते छावणीतच राहिले; त्यामुळे आत्मा त्यांच्यावरही आला आणि ते छावणीतच संदेश सांगू लागले. 27 तेव्हा एका तरुणाने पळत जाऊन मोशेला हे सांगितले. तो म्हणाला, “एलदाद व मेदाद हे छावणीत संदेश सांगत आहेत.”
28 तेव्हा नूनाचा मुलगा यहोशवा मोशेला म्हणाला, “मोशे, माझे स्वामी तुम्ही त्यांना बंदी घाला.” (यहोशवा तरुण असल्यापासून मोशेचा मदतनीस होता.)
29 मोशेने त्याला उत्तर दिले, “ह्याच्या योगाने माझ्या नेतेपणाला कमीपणा येईल असे तुला वाटते काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने त्या सर्वांवर आपला आत्मा ठेविला असता तर किती बरें होते.” 30 मग मोशे व इस्राएलांचे नेते छावणीमध्ये परत गेले.
परमेश्वर लावे पक्षी पाठवितो
31 मग परमेश्वराने समुद्रावरुन जोरदार वारा वाहावयास लाविला. त्या वाऱ्याने लावे पक्षी त्या भागात वाहून आणिले. ते लावे पक्षी सर्व छावणीच्या भोंवती उडत राहिले. ते इतके होते की छावणीचे अंगण व सारा परिसर त्यांनी भरुन गेला. त्यांचा जमिनीपासून तीन फूट वरपर्यंत थर साचला. माणूस एक दिवसभरात जितका दूर चालत जाईल तेथ पर्यंत तो थर होता. 32 लोक बाहेर पडले व त्यांनी दिवसभर व रात्रभर लावे पक्षी गोळा केले आणि त्यांनी पूर्ण दुसरा दिवसभरही ते गोळा केले. कोणत्याही माणसाने गोळा केलेले पक्षी कमीत कमी साठ बुशेल भरले. मग लोकांनी लावे पक्षांचे मांस सर्व छावणी सभोंवती पसरवले.
33 लोकांनी मांस खाण्यास सुरवात केली परंतु परमेश्वराचा राग भयंकर भडकला. ते मांस त्यांच्या तोंडात होते तोच म्हणजे ते पूर्ण खाऊन होण्यापूर्वी परमेश्वराने त्यांना भयंकर आजारी पाडले व मारुन टाकिले. 34 म्हणून लोकांनी त्या ठिकाणाला किब्रोथ-हत्तव्वा असे नांव दिले. कारण ह्याच ठिकाणी, ज्या लोकांना मांस खाण्याची अतिशय कडक इच्छा झाली होती त्यांना पुरण्यात आले.
35 किब्रोथ हत्तव्वापासून लोकांनी हसेरोथपर्यंत प्रवास केला व तेथे त्यांनी मुक्काम केला.
एक गाणे कोरहाच्या मुलांचे स्तोत्र
48 परमेश्वर थोर आहे आपल्या देवाच्या शहरात,
त्याच्या पवित्र पर्वतावर लोक त्याची स्तुति करतात.
2 देवाचे पवित्र शहर सुंदर आहे.
त्याचे सौंदर्य सर्व पृथ्वीवर आनंद आणते
सियोन पर्वत सगळ्यात उंच आणि पवित्र पर्वत आहे.
हे त्या महान राजाचे शहर आहे.
3 इथे त्या शहराच्या राजवाड्यांत
देवाला किल्ला म्हणतात.
4 एकदा काही राजे भेटले.
त्यांनी या शहरावर हल्ला करायची योजना आखली
ते सगळे चालून आले.
5 त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले.
ते घाबरले आणि पळत सुटले.
6 भयाने त्यांना घेरले,
भीतीने त्यांचा थरकाप झाला.
7 देवा, तू पूर्वेकडच्या जोरदार वाऱ्याचा उपयोग केलास
आणि त्यांची मोठी जहाजे मोडलीस.
8 होय, आम्ही ती गोष्ट ऐकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या शहरात,
आमच्या देवाच्या शहरात घडत असलेले पाहिले.
देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो.
9 देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमळ दयेचा लक्षपूर्वक विचार करतो.
10 देवा तू प्रसिध्द आहेस.
पृथ्वीवर सगळीकडे लोक तुझी स्तुती करतात
तू किती चांगला आहेस ते प्रत्येकाला माहीत आहे.
11 देवा, सियोन पर्वत आनंदी आहे
यहूदाची शहरे तुझ्या चांगल्या निर्णयामुळे उल्हासित झाली आहेत.
12 सियोन भोवती फिरा,
शहर बघा, बुरुज मोजा.
13 उंच भिंती बघा, सियोनच्या राजवाड्याचे कौतुक करा.
नंतर तुम्ही पुढच्या पिढीला त्याबद्दल सांगू शकाल.
14 देव खरोखरच नेहमी आपला देव असेल.
तो आपल्याला सदैव मार्गदर्शन करेल.
1 आमोजचा मुलगा यशया ह्याला पुढीलप्रमाणे देवाचा दृष्टान्त झाला आणि यहूदा व यरूशलेम येथे पुढे घडणाऱ्या गोष्टी देवाने यशयाला दाखविल्या उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया या यहूदी राजांच्या काळात घडून येणाऱ्या गोष्टी यशयाने पाहिल्या.
देवाची स्वतःच्याच लोकांविरूध्द तक्रार
2 हे स्वर्गा आणि हे पृथ्वी, परमेश्वर काय म्हणतो ते ऐका. परमेश्वर म्हणतो,
“मी माझ्या मुलांचे पालनपोषण केले त्यांना लहानाचे मोठे केले.
पण तीच मुले माझ्यावर उलटली.
3 गाय आपल्या मालकाला ओळखते.
गाढवालासुध्दा, आपला मालक आपल्याला कोठे खायला देणार ते, कळते.
पण इस्राएल लोक मला जाणत नाहीत.
माझ्या लोकांना काही समजत नाही.”
4 इस्राएल हे राष्ट्र पापांनी भरले आहे. अन्याय, दुष्कृत्ये ह्यांचा बोजा त्यांच्यावर पडला आहे. पापी कुटुंबातील दुर्वर्तनी मुलांप्रमाणे इस्राएल लोक वागत आहेत. त्यांनी परमेश्वराचा त्याग केला आहे. इस्राएलच्या पवित्र देवाचा त्यांनी अपमान केला आहे. त्यांनी त्याचा त्याग केला व त्याला एखाद्या परक्या माणसाप्रमाणे वागवले.
5 देव म्हणतो, “मला तुम्हाला सतत शिक्षा कां करावी लागावी? मी तुम्हाला शिक्षा केली तरी तुम्ही सुधारत नाही. तुम्ही माझ्याविरूध्द बंड करीतच राहता. सध्या प्रत्येकाचे डोके व हृदय कमकुवत झाले आहे. 6 तुमच्या पायापासून डोक्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर जखमा, घाव व वाहते व्रण आहेत. त्या वाहत्या व्रणांची तुम्ही काळजी घेतली नाही. तुमच्या जखमा तेल सोडून नरम केल्या नाहीत आणि त्यावर पट्टीही बांधली नाही.
7 तुमच्या देशाचा नाश झाला आहे. तुमची शहरे जाळली गेली आहेत. तुमच्या शत्रूंनी तुमचा देश काबीज केला आहे. सैन्यांनी एखादा देश उद्ध्वस्त करावा तशी तुमची भूमी झाली आहे.
8 सीयोनची मुलगी (यरूशलेम) द्राक्षांच्या बागेतील रिकाम्या खोपटाप्रमाणे झाली आहे. तिची अवस्था काकडीच्या शेतातील जुन्या घराप्रमाणे झाली आहे. शत्रूने पराभूत केलेल्या नगराप्रमाणे ती दिसते. 9 सर्व शक्तिमान परमेश्वराने काही लोकांना जिवंत ठेवले नसते तर सदोम अथवा गमोरा ह्या शहरांप्रमाणे आपला संपूर्ण नाश झाला असता.
10 सदोमच्या नेत्यांनो, परमेश्वराचा संदेश ऐका गमोराच्या लोकांनो, देवाच्या शिकवणुकीकडे लक्ष द्या. 11 देव म्हणतो, “तुम्ही माझ्यापुढे सतत यज्ञबलि का करता? मला तुमच्या मेंढ्यांच्या, वासरांच्या चरबीच्या, आणि बैल, कोकरे आणि बकऱ्यांच्या यज्ञबलिंचा आता वीट आला आहे. 12 तुम्ही माझ्या दर्शनाला येता तेव्हा माझ्या अंगणातील प्रत्येक गोष्ट तुडविता. असे करायला तुम्हाला कोणी सांगितले?
13 “माझ्यासाठी निरर्थक यज्ञबलि देणे थांबवा. माझ्यापुढे जळणाऱ्या धुपाचा मला वीट आला आहे. चंद्रदर्शन शब्बाथ व सुटी यांच्या निमित्ताने होणाऱ्या मेजवान्या मला आवडत नाहीत. धार्मिक सभेत तुम्ही करीत असलेली दुष्कृत्ये मला अजिबात पसंत नाहीत. 14 तुमच्या मासिक सभा व मेळावे यांची मला मनापासून घृणा वाटते. ह्या सभांचे मला ओझे झाले आहे. मी ह्याला कंटाळलो आहे.
15 “प्रार्थना करण्यासाठी उचललेल्या तुमच्या हाताकडे मी लक्ष देणार नाही. तुम्ही कितीही प्रार्थना केली तरी ऐकणार नाही. का? कारण तुमचे हात रक्ताने माखले आहेत.
16 “शुचिर्भूत व्हा. स्वच्छ व्हा. तुमची दुष्कृत्ये थांबवा. मला वाईट गोष्टी बघायच्या नाहीत. चुकीचे वागू नका. 17 चांगल्या गोष्टी करायला शिका. दुसऱ्यांशी न्यायाने वागा. जे दुसऱ्यांना क्लेष देतात त्यांना शासन करा. अनाथ मुलांना मदत करा. विधवांना साहाय्य करा.”
18 परमेश्वर म्हणातो, “या, आपण या गोष्टींची चर्चा करू या. तुमची पातके कितीही काळीकुट्ट (शब्दश: शेंदरासारखी लाल) असली तरी ती धुता येतील आणि तुम्ही हिमाप्रमाणे पांढरेशुभ्र व्हाल. जरी तुमची पापे लाल असली तरी तुम्ही शुभ्र लोकरीसारखे व्हाल.
19 “तुम्ही माझे म्हणणे ऐकाल तर ह्या देशातील चांगल्या वस्तू तुम्हाला प्राप्त होतील. 20 माझे म्हणणे न ऐकणे हे माझ्याविरूध्द जाण्यासारखे होईल आणि शत्रू तुमचा नाश करेल.”
स्वतः परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या.
यरूशलेमची देवावर श्रध्दा नाही
21 देव म्हणतो, “यरूशलेमेकडे पाहा. ही नगरी माझ्यावर श्रध्दा् ठेवणारी आणि माझ्या मताप्रमाणे वागणारी होती. आताच तिला असे वारांगनेप्रमाणे वागायला काय झाले? आता ती माझ्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही. यरूशलेमला प्रामाणिक बनवली पाहिजे. यरूशलेममध्ये राहणाऱ्या लोकांनी देवाच्या इच्छेप्रमाणे राहिले पाहिजे. पण सध्या तेथे खुनी लोक राहतात.
22 “चांगुलपणा हा चांदीसारखा असतो. पण तुझ्या चांदीला काहीही मोल राहिलेले नाही. तुझ्या द्राक्षरसात (चांगुलपणात) पाणी मिसळल्याने तो पातळ झाला आहे. 23 तुझे सत्ताधीश बंडखोर व चोरांचे साथीदार झाले आहेत. तुझे सगळे सत्ताधीश लाच मागतात. चुकीच्या गोष्टी करण्यासाठी ते पैसे घेतात. लोकांना फसविण्यासाठी ते पगार घेतात. ते अनाथ मुलांना मदत करीत नाहीत आणि विधवांच्या गरजांकडे लक्ष देत नाहीत.”
24 यामुळे प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा सामर्थ्यवान ईश्वर म्हणतो, “माझ्या शत्रूंनो, मी तुम्हाला शिक्षा करीन. तुम्ही मला जास्त त्रास देऊ शकणार नाही. 25 चांदी स्वच्छ करण्यासाठी लोक एक रसायन वापरतात. मी तसेच करीन आणि तुझी दुष्कृते धुवून काढीन. मी तुझ्यातील सर्व निरर्थक गोष्टी काढून टाकीन. 26 सुरूवातीला होते त्याप्रमाणे मी न्यायाधीश नेमीन. पूर्वीप्रमाणेच मंत्री नेमीन मग तुला सर्वजण ‘चांगली व निष्ठावंत नगरी म्हणतील.’”
27 देव कल्याण करणारा आहे आणि तो योग्य त्याच गोष्टी करतो. म्हणूनच सीयोनचा व जे त्याला शरण येतील अशा लोकांचा, देव उध्दार करेल. 28 पण सर्व गुन्हेगारांचा आणि पापी लोकांचा नाश होईल. (हे लोक परमेश्वराचे ऐकणारे नाहीत.)
29 भविष्यात, ज्या ओकच्या झाडांची लोक पूजा करतात व ज्या खास बागांमध्ये जाऊन मूर्तींची पूजा करतात, त्या झाडांची व बागांची लोकांना लाज वाटेल. 30 असे होण्याचे कारण तुम्ही त्या पाने गळून जाणाऱ्या ओकच्या झाडांप्रमाणे किंवा पाणी नसल्याने सुकत चाललेल्या बागांप्रमाणे व्हाल. 31 बलाढ्य माणसे लहानशा वाळलेल्या लाकडाच्या ढलपीप्रमाणे होतील. त्यांची कर्मे आग लावणाऱ्या ठिणगीसारखी असतील. ती बलाढ्य माणसे व त्यांची कर्मे ह्यांना एकदमच आग लागेल आणि ती आग कोणीही विझवू शकणार नाहीत.
जुन्या कराराप्रमाणे उपासना
9 पहिल्या करारात उपासनेसंबंधी काही नियम होते आणि मनुष्यांनी बनविलेले एक पवित्रस्थान होते. 2 कारण दीपस्तंभ व अर्पणाच्या विशेष भाकरी ठेवण्यासाठी पहिल्या मंडपामध्ये एक मेज ठेवण्यात आला होता. हा जो पहिला मंडप होता त्याला पवित्र स्थान असे म्हणतात. 3 दुसऱ्या पडद्यामागे एक खोली (मंडप) होती, त्याला परमपवित्रस्थान म्हणत [a] 4 त्यामध्ये ऊद जाळण्यासाठी सोन्याची वेदी होती. आणि कराराची पेटी (कोष). [b] ही पेटी (कोष) संपूर्ण सोन्याने मढवलेली होती त्या पेटीत (कोषात) एका सोन्याच्या भांड्यात मान्रा होता, तसेच अहरोनाची काठी जिला पाने फुटलेली होती व कराराच्या दगडी पाट्या होत्या. 5 या पेटीवर (कोषावर) गौरवाचे करूबीम दयासनावर [c] सावली करीत होते. परंतु या गोष्टींबाबत सविस्तर चर्चा आता आपण करू शकत नाही.
6 या व्यवस्थेनुसार याजकगण आपल्या कर्तव्यकर्मासाठी पहिल्या मंडपात प्रवेश करीत असत. 7 पण केवळ एकटा मुख्य याजकच वर्षातून एकदाच दुसऱ्या खोलीत (मंडपात) जाई, शिवाय तो रक्त घेतल्याशिवाय आत जात नसे. ते रक्त तो स्वतःसाठी (स्वतःच्या पापांसाठी) व लोकांच्या अज्ञानाच्या पापांसाठी अर्पण करायला आत जात असे.
8 याद्वारे पवित्र आत्मा हे दर्शवितो की, पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परमपवित्रस्थानात जाण्याचा मार्ग खुला नाही. 9 हे सर्व आजच्या काळात प्रतिकात्मक आहे. याचा अर्थ असा की, देवाला दिलेली दाने व त्याला वाहिलेली अर्पणे यामुळे उपासकाची सदसदविवेकबुद्धि परिपूर्ण होऊ शकत नाही. 10 हे विधी केवळ बाह्य बाबी म्हणजे अन्न व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या औपचारिक धुण्याबाबत संबंधित आहेत.
नव्या करारामप्रमणे उपासना
11 पण आता ख्रिस्त हा घडून आलेल्या चांगल्या गोष्टींचा मुख्य याजक म्हणून आला आहे. तो मनुष्याच्या हातांनी बांधला नव्हता अशा महान तसेच सर्व दृष्टींनी परिपूर्ण अशा मंडपामध्ये, या निर्मितीमधील, 12 बकरे किंवा वासरू यांचे रक्त घेऊन नव्हे, तर आपले स्वतःचेच रक्त घेऊन परमपवित्रस्थानात गेला; व त्याने सर्व काळासाठी स्वतःच एकदाच अर्पण करून आपल्याला कायमचे तारण मिळवून दिले.
13 कारण बकरे व बैल यांचे रक्त; तसेच कालवडीची राख त्यांच्यावर शिंपडले तर त्याची अपवित्र शरीरे शुद्ध होतात, 14 तर ख्रिस्ताचे रक्त देवासाठी त्याहून कितीतरी अधिक परिणामकारक अर्पण ठरू शकेल! ख्रिस्ताने सदाजीवी आत्म्याद्वारे आपल्या स्वतःचे डागविरहित आणि परिपूर्ण असे अर्पण केले. त्याचे रक्त आपल्या निर्जीव कर्मामुळे मरून गेलेली आपली सदसदविवेकबुद्धि शुद्ध करील. आशासाठी की, आपण जिवंत देवाची उपासना करू शकू.
15 पहिल्या काळात ज्या चुका झाल्या, त्या चुकांपासून सुटका व्हावी म्हणून देव आपल्या वचनानुसार अनंतकालच्या वतनासाठी ज्या लोकांना बोलावितो, त्यांच्याकरिता ख्रिस्त हा नवीन कराराचा मध्यस्थ झाला आहे.
16 जेथे मृत्यूपत्र केलेले आहे तेथे ते करून ठेवणाराचा मृत्यू झाला आहे, हे सिद्ध होणे जरुरीचे असते. 17 कारण मृत्युपत्र करणारा जिवंत आहे तोपर्यंत मृत्युपत्र अंमलात येऊ शकत नाही. 18 म्हणून रक्त सांडल्याशिवाय पहिला करारदेखील अंमलात आला नव्हता. 19 कारण नियमशास्त्राची प्रत्येक आज्ञा सर्व लोकांसमोर जाहीर केल्यानंतर मोशेने पाण्याबरोबर वासराचे व बकऱ्याचे रक्त तसेच किरमीजी लोकर आणि एजोबाच्या फांद्या हे सर्व बरोबर घेतले; आणि ते त्याने नियमशास्त्राच्या पुस्तकावर आणि सर्व लोकांवर शिंपडले. 20 तो म्हणाला, “जो करार पाळण्याची देवाने तुम्हाला आज्ञा केली होती त्या कराराचे हे रक्त आहे.” 21 त्याचप्रमाणे त्याने मंडपावर व उपासनेसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तूंवर ते रक्त शिंपडले. 22 खरे पाहता, नियमशास्त्राप्रमाणे जवळजवळ प्रत्येक गोष्ट रक्ताने धुतलीच पाहिजे आणि रक्त सांडल्याशिवाय क्षमा मिळत नाही.
ख्रिस्ताचे अर्पण पाप नाहीसे करते
23 म्हणून स्वर्गातील गोष्टींच्या नमुन्याप्रमाणे असलेल्या वस्तू यज्ञाच्या द्वारे शुद्ध करणे जरुरीचे होते. पण त्याहूनही अधिक चांगल्या यज्ञाने स्वर्गीय गोष्टीच्या प्रतिमा शुद्ध केल्या जातात. 24 कारण ख्रिस्ताने मानवी हातांनी केलेल्या पवित्रस्थानात पाऊल ठेवले असे नाही, तर ते स्थान खऱ्या वस्तूची केवळ प्रतिमाच आहे. देवाच्या समोर हजर होण्यासाठी खुद्द स्वर्गात त्याने प्रवेश केला.
25 जे त्याचे स्वतःचे नाही असे रक्त घेऊन जसा मुख्य याजक परमपवित्रस्थानात दरवर्षी जातो तसा ख्रिस्त पुन्हा पुन्हा परमपवित्रस्थानात गेला नाही. 26 तसे असते तर ख्रिस्ताला जगाच्या स्थापनेपासून स्वतःचे अर्पण पुष्कळ वेळा करावे लागले असते. परंतु आता युगाच्या शेवटी आपल्या स्वतःला अर्पण करून पाप नाहीसे करण्यासाठी तो एकदाच प्रकट झाला आहे.
27 आणि जसे लोकांना एकदाच मरण व नंतर न्यायासनासमोर येणे नेमून ठेवलेले असते, 28 तसाच ख्रिस्त पुष्कळ लोकांची पापे नाहीशी करण्याकरिता अर्पणरूपाने केवळ एका वेळेस दिला गेला आणि परत एकदा, दुसऱ्या वेळेस, त्यांची पापे नाहीशी करावी म्हणून नव्हे, परंतु जे त्याची आतुरतेने वाट पाहतात त्यांच्यासाठी दिसेल.
2006 by World Bible Translation Center