M’Cheyne Bible Reading Plan
देवाच्या आज्ञापालनाबद्दल मिळणारी आशीर्वादाची फळे
26 “तुम्ही आपणासाठी मूर्ती करु नका; तसेच कोरीव मूर्ती किंवा स्मारक स्तंभ आठवणींचा बुरुज-उभारु नका अथवा पूजा करण्यासाठी आपल्या देशात, कोरीव पाषाण स्थापन करु नका; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे!
2 “तुम्ही माझ्या पवित्र विसाव्याच्या दिवसांची पवित्र शब्बाथांची-आठवण ठेवून ते पाळावे आणि माझ्या पवित्र स्थांनाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे!
3 “तुम्ही आठवण ठेवून माझ्या नियमाप्रमाणे चालावे व माझ्या आज्ञा पाळाव्या! 4 तुम्ही असे कराल तर मी तुमच्यासाठी योग्य वेळी पाऊस पाडीन; जमीन आपले पीक देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील. 5 तुम्ही द्राक्षांच्या हंगामापर्यंत धान्याची मळणी करीत राहाल आणि पेरणीच्या दिवसापर्यंत द्राक्षांची तोडणी करीत राहाल. मग खाण्याकरिता तुम्हाजवळ भरपूर अन्न असेल, आणि तुम्ही आपल्या देशात सुरक्षित राहाल. 6 मी तुमच्या देशाला शांतता देईन; तुम्ही शांतीने झोपी जाल; तुम्हाला कोणाची भीती वाटणार नाही, मी हिंस्र पशूंना तुमच्या देशाबाहेर ठेवीन आणि तुमच्या देशावर कोणी सैन्य चाल करुन येणार नाही.
7 “तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल व त्यांचा पराभव कराल. तुम्ही तुमच्या तलवारींनी त्यांचा वध कराल. 8 तुमच्यातील पांच जण शंभरांना व शंभरजण दहा हजारांना पळवून लावतील. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल, व तुमच्या तलवारीने त्यांना ठार माराल.
9 “मग मी तुमच्याकडे वळेन व तुम्हाला भरपूर संतती देईन आणि तुमच्याशी केलेला माझा करार पक्का करीन; 10 तुम्हाला मुबलक धान्य मिळेल व ते वर्षभर पुरुन उरेल. तुम्हाला नवीन धान्य आल्यावर जुने बाहेर काढावे लागेल! म्हणजे नवीन धान्य ठेवावयास जागा मिळेल. 11 आणखी मी तुम्हामध्ये माझा पवित्र मंडप टाकून वस्ती करीन; तुम्हापासून मी जाणार नाही! 12 मी तुमच्याबरोबर चालेन आणि तुमचा देव होईन, आणि तुम्ही माझे लोक व्हाल. 13 मी परमेश्वर तुमचा देव आहे. मिसर देशात तुम्ही गुलाम होता. मी तुम्हाला मिसर देशातून बाहेर काढले; गुलाम म्हणून काम करताना जड वजनांचा भार वाहून तुम्ही वाकून गेला होता. परंतु तुमच्या खांद्यावरील जोखड मोडून मी तुम्हाला पुन्हा ताठ चालवले आहे!
देवाच्या आज्ञाभंगाबद्दल मिळणारी शिक्षा
14 “परंतु जर तुम्ही माझे ऐकले नाही व माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत तर मग ह्या वाईट गोष्टी तुम्हावर येतील. 15 तुम्ही जर माझे नियम मानण्यास व माझ्या आज्ञा पाळण्यास नकार द्याल तर मग तुम्ही माझा करार मोडाल. 16 तुम्ही तसे कराल तर मग तुम्हावर भयंकर संकटे येतील असे मी करीन; क्षयरोग व ताप ह्यांनी मी तुम्हाला पीडीन; ती तुमची दृष्टी नष्ट करतील, व तुमचा जीव घेतील; तुम्ही बियाणे पेराल पण तुम्हाला यश मिळणार नाही-तुम्हाला पीक मिळणार नाही-आणि तुमचे शत्रू तुमचे धान्य खाऊन टाकतील. 17 मी तुमच्याविरुद्ध होईन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील; आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल.
18 “ह्या नंतरही जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार नाही; तर तुमच्या पापाबद्दल मी तुम्हाला सातपट शिक्षा करीन. 19 मी तुमच्या बळाचा गर्व मोडून टाकीन; तुमचे आकाश लोखंडासारखे व तुमची जमीन पितळेसारखी करीन. 20 तुम्ही खूप कष्ट कराल पण त्याचा काही उपयोग होणार नाही; कारण तुमची जमीन पीक [a] देणार नाही व तुमची झाडे फळे देणार नाहीत.
21 “तरी सुध्दा अद्याप तुम्ही माझ्याविरुद्ध वागाल व माझ्या आज्ञा पाळण्यास नकार द्याल तर मी तुम्हाला तुमच्या पापांच्या मानाने सातपट अधिक ताडण करीन! तुम्ही जेवढी अधिक पापे कराल तेवढी अधिक शिक्षा पावाल! 22 मी तुमच्यावर हिंस्त्र पशू पाठवीन आणि ते तुमच्या मुलांबाळांना तुमच्यापासून घेऊन जातील; ते तुमच्या गुराढोरांचा नाश करतील; ते तुमच्या अनेक लोकांना मारुन टाकतील, व त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील!
23 “एवढे करुनही तुम्हाला अद्दल घडली नाही आणि तुम्ही माझ्याविरुद्धच वागलात, 24 तर मीही तुमच्याविरुद्ध होईन आणि मी, होय मी परमेश्वर तुमच्या पापाबद्दल तुम्हाला सातपट ताडण करीन. 25 तुम्ही माझा करार मोडला म्हणून मी तुम्हाला शिक्षा करीन; तुमच्यावर सैन्ये चालून येतील असे मी करीन; सुरक्षिततेसाठी तुम्ही तुमच्या नगरात जाल पण तेव्हा मी तुमच्यावर मरीचा रोग पसरवीन; तुमचे शत्रु तुमचा पराभव करतील. 26 मी तुम्हाला धान्याचा फार थोडा वाटा देईन; तेव्हा दहा स्त्रीया एकाच चुलीवर तुमची भाकर भाजतील व ती तुम्हाला तोलून देतील; ती तुम्ही खाल तुमचे पोट भरणार नाही-तुम्ही भुकेलेच राहाल!
27 “एवढे सर्व करुनही तुम्ही माझे ऐकले नाही व तुम्ही माझ्याविरुद्ध वागला, 28 तर मात्र खरोखर मी माझा राग तुम्हाला दाखवीन! मी, होय मी परमेश्वर तुमच्या पापाबद्दल तुम्हाला सातपट शिक्षा करीन! 29 तुमच्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची तुम्हावर पाळी येईल. 30 तुमच्या पुजेची उच्चस्थाने मी नष्ट करीन; तुमच्या धूपवेद्या फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तीच्या मढ्यांवर तुमची मढी टाकीन; मला तुमचा वीट येईल. 31 मी तुमची नगरे नष्ट करीन, तुमची पवित्र स्थळे ओसाड करीन. तुमच्या सुवासिक अर्पणांचा वास घेणे मी बंद करीन. 32 मी तुमचा देश ओसाड करीन; हे पाहून तुमच्या देशात राहाण्यास येणारे तुमचे शत्रू चकित होतील. 33 परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी माझी तलवार उपसून तुमचा नायनाट करीन; तुमचा देश ओसाड होईल आणि तुमच्या शहरांचा नाश होईल.
34 “तुम्हाला तुमच्या शत्रूच्या देशात नेतील; तुमचा देश ओसाड होईल. तेव्हा अखेरीस तुमच्या देशाला विसावा मिळेल. तो शब्बाथाचा विसावा उपभोगील. 35 देश ओसाड असे पर्यंत तुम्ही राहात असताना तुमच्या शब्बाथांनी त्याला दिला नाही इतका विसावा त्याला मिळेल. 36 तुमच्यातील जे जगूनवाचूंन उरतील त्यांचे धैर्य आपल्या शत्रूंच्या देशात खचेल; त्यांना प्रत्येक गोष्टीची भीती वाटेल; वाऱ्याने उडविल्या जाणाऱ्या पानाप्रमाणे ते इकडे तिकडे संभोवार पळतील; कोणी तलवार घेऊन पाठीस लागल्याप्रमाणे ते पळतील. कोणी पाठीस लागले नसतानाही ते पळतील. 37 कोणी तलवार घेऊन पाठीस लागल्याप्रमाणे ते पळतील व कोणी त्यांच्यामागे लागले नसतानाही पळाल्यामुळे ते अडखळून एकमेंकावर पडतील.
“तुमच्या शत्रूविरुद्ध उभे ठाकण्याइतके बळ तुमच्यात नसणार. 38 राष्ट्राराष्ट्रात पांगून तुमच्या शत्रूंच्या देशात तुम्ही नाहीसे व्हाल. 39 तेव्हा जगूनवाचून उरलेले त्यांच्या शत्रूंच्या देशात आपल्या पापामुळे खंगत जातील आणि त्यांचे वाडवडील ज्याप्रमाणे त्यांच्या पापात खंगले त्याप्रमाणे ते आपल्या पापात खंगत जातील.
माणसाला नेहमी आशा असते
40 “परंतु कदाचित् ते आपली पापे व आपल्या वाडवडीलांची पापे कबूल करतील. ते माझ्याविरुद्ध गेले हेही ते कदाचित् कबूल करतील. त्यांनी माझ्याविरुद्ध पाप केले हेही ते कदाचित् मान्य करतील. 41 मी, त्यांच्याविरुद्ध होऊन, त्यांना त्यांच्या शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करतील आणि त्यांचे अशुद्ध-बेसुनत-हृदय लीन होऊन ते आपल्या पापाबद्दलची शिक्षा मान्य करतील. 42 तेव्हा मग मी याकोब, इसहाक व अब्राहाम ह्यांच्याशी केलेल्या कराराची आठवण करीन व त्या देशाचीही आठवण करीन.
43 “त्यांचा देश त्यांच्यावाचून ओस पडेल आणि ओस असे पर्यंत तो आपल्या शब्बाथांचा विसावा उपभोगीत राहील; मग जगूनवाचून राहिलेले आपल्या पापाबद्दलची शिक्षा मान्य करतील; त्यांनी माझ्या नियमांना व विधींना तुच्छ लेखून ते पाळले नाहीत म्हणून त्यांच्या दुष्टतेबद्दल त्यांना शिक्षा झाली हे त्यांना समजेल. 44 त्यांनी खरोखर पाप केले; पण त्यांच्यापासून मी आपले तोंड फिरवणार नाही; ते आपल्या शत्रूंच्या देशात असले तरी मी त्यांचे ऐकेन. मी त्यांना समूळ नष्ट करणार नाही. त्यांच्याशी केलेला करार मी मोडणार नाही, कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे! 45 त्यांच्याकरिता मी त्यांच्या वाडवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन, कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून त्यांच्या वाडवडिलांना मिसर देशातून बाहेर आणले आणि हे सर्व इतर राष्ट्रांनी पाहिले आहे. मी परमेश्वर आहे!”
46 हे विधी, नियम व निर्बध परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी दिले. हे नियम परमेश्वर व इस्राएल लोक ह्यांच्यामधील करार आहे. हे नियम परमेश्वराने सीनाय पर्वतापाशी मोशेला दिले ते हेच होत मोशेने हे नियम इस्राएल लोकांना सांगितले.
33 चांगले लोकहो! परमेश्वरापाशी आंनद व्यक्त करा.
न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा.
2 वीणा वाजवून परमेश्वराचे स्तवन करा.
दहा तारांच्या वीणेवर परमेश्वराचे गुणगान गा.
3 त्याच्यासाठी नवे गाणे गा.
आनंदी होउन चांगल्या रीतीने वाजवा.
4 देवाचा शब्द खरा असतो तो जे काही करतो
त्यावर तुम्ही विसंबून राहू शकता.
5 देवाला चांगलुपणा आणि न्यायी वृत्ती आवडते.
परमेश्वराने पृथ्वी त्याच्या प्रेमाने भरुन टाकली.
6 परमेश्वराने आज्ञा केली आणि जगाची निर्मिती झाली
देवाच्या तोंडातल्या श्वासाने पृथ्वीवरील सर्व गोष्टी निर्माण झाल्या.
7 देवाने समुद्रातील पाणी एका ठिकाणी आणले.
तो समुद्राला त्याच्या जागेवर ठेवतो.
8 पृथ्वीवरील प्रत्येकाने परमेश्वराची भीती बाळगली पाहिजे
आणि त्याला मान दिला पाहिजे या जगात राहणाऱ्या प्रत्येकाने त्याला भ्यायला पाहिजे.
9 का? देव फक्त आज्ञा करतो आणि त्याप्रमाणे गोष्टी घडतात.
आणि त्याने जर “थांब” म्हटले तर ती गोष्ट थांबते.
10 राष्ट्रांचा उपदेश कवडी मोलाचा आहे
तो त्यांच्या सगळ्या योजनांचा नाश करु शकतो.
11 परंतु परमेश्वराचा उपदेश सदैव चांगला असतो
त्याच्या योजना पिढ्यानपिढ्या चांगल्या असतात.
12 ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते लोक सुखी आहेत.
देवाने त्यांची विशेष माणसं म्हणून निवड केली.
13 परमेश्वराने स्वर्गातून खाली पाहिले.
त्याला सर्व लोक दिसले.
14 त्याने त्याच्या सिंहासनावरुन
पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांकडे पाहिले.
15 देवाने प्रत्येकाचे मन निर्माण केले.
प्रत्येक जण काय विचार करतो ते देवाला माहीत असते.
16 राजा त्याच्या स्वःतच्या सामर्थ्याने सुरक्षित राहू शकत नाही.
शूर सैनिक त्याच्या स्वःतच्या शक्तीमुळे सुरक्षित राहू शकत नाही.
17 घोडे युध्दात विजय मिळवू शकत नाहीत.
त्यांची शक्ती तुम्हाला पळून जायला मदत करु शकत नाही.
18 परमेश्वर त्याच्या भक्तांवर नजर ठेवतो आणि त्यांची काळजी घेतो.
जे लोक त्याची भक्ती करतात त्यांचे तो रक्षण करतो.
19 देव त्यांना मरणापासून वाचवतो ते भुकेले असतील
तेव्हा त्यांना तो शक्ती देतो.
20 म्हणून आपण परमेश्वरासाठी थांबू.
तो आपली मदत आणि ढाल आहे.
21 देव आपल्याला आनंदी करतो.
आम्ही त्याच्या पवित्र नावावर खरोखरच विश्वास ठेवतो.
22 परमेश्वरा, आम्ही मनापासून तुझी उपासना करतो
म्हणून तू तुझे महान प्रेम आम्हाला दाखव.
मृत्यू न्याय्य आहे का?
9 मी या सगळ्या गोष्टींचा काळजीपूर्वक विचार केला. चांगल्या आणि शहाण्या माणसांचे काय होते आणि त्यांनी काय करावे हे सर्व देवाच्या हातात असते. आपला तिरस्कार केला जाईल की आपल्यावर प्रेम केले जाईल याबद्दल लोकांना काहीही माहीत नसते. आणि भविष्यात काय होणार या बद्दल ही त्यांना काही माहीत नसते.
2 पण एक गोष्ट मात्र सर्वांच्या बाबतीत घडते ती म्हणजे आपण सर्व मरतो. मरण वाईट माणसांना आणि चांगल्या माणसांनाही येते. जी माणसे शुध्द आहेत त्यांनाही मरण येते आणि जी शुध्द नाहीत त्यांनाही येते. जे लोक यज्ञ करतात त्यांनाही मरण येते आणि जे यज्ञ करत नाहीत त्यांनाही मरण येते. चांगला माणूस पापी माणसासारखाच मरेल. जो माणूस देवाला काही खास वचने देतो, जो अशी वचने द्यायला घाबरतो तो त्या माणसासारखाच मरेल.
3 या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्यातली सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे सर्वांचा शेवट सारखाच होतो. लोक नेहमी दुष्ट आणि मूर्खपणाचा विचार करतात. ही गोष्ट सुध्दा वाईटच आहे हे विचार मरणाकडे नेतात. 4 जो माणूस अजून जिवंत आहे त्याच्याबाबतीत आशेला जागा आहे. तो कोण आहे याला महत्व नाही. पण हे म्हणणे खरे आहे:
“जिवंत कुत्रा मेलेल्या सिंहापेक्षा चांगला असतो.”
5 जिवंत माणसांना ते मरणार आहेत हे माहीत असते. पण मेलेल्यांना काहीच माहीत नसते. मेलेल्यांना कुठलेच बक्षिस मिळत नाही. लोक त्यांना लवकरच विसरतात. 6 माणूस मेल्यानंतर त्याचे प्रेम. त्याचा द्वेष, मत्सर हे सर्व जाते. आणि मेलेला माणूस पृथ्वीवर घडणाऱ्या गोष्टीत कधीच भाग घेणार नाही.
जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत आयुष्याचा उपभोग घ्या
7 तेव्हा आता जा, तुमचे अन्न खा आणि त्याचा आनंद उपभोगा. द्राक्षारस (मद्य) प्या आणि आनंदी व्हा. तुम्ही या गोष्टी केल्या तर देवाला ते बरेच वाटेल. 8 चांगले कपडे घाला आणि चांगले दिसा. 9 प्रेम असलेल्या पत्नीबरोबर आयुष्य आनंदात घालवा. तुमच्या छोट्याशा आयुष्यातील प्रत्येक दिवसाचा आनंद लुटा. देवाने तुम्हाला पृथ्वीवर छोटे आयुष्य दिले आहे आणि फक्त तेव्हढेच तुमच्याकडे आहे हे जाणून या आयुष्यात तुम्हाला जे काम करायचे आहे त्याचा आनंद लुटा. 10 प्रत्येक वेळी जे काम असेल ते उत्तम प्रकारे करा. कबरेत काम नसते. तिथे विचार नसतात. ज्ञान नसते आणि शहाणपणही नसते. आणि आपण सर्व त्या मृत्युलोकात जाणार आहोत.
चांगले नशीब? वाईट नशीब? आपण काय करू शकतो?
11 मी या आयुष्यात योग्य नसलेल्या आणखीही काही गोष्टी पाहिल्या. सगळ्यात जोराने धावणारा धावपटू शर्यत जिंकत नाही: सर्वशक्तीमान सैन्य नेहमीच लढाई जिंकते असे नाही. सर्वांत शहाण्या माणसाला त्याने कमावलेले अन्न नेहमीच खाता येते असे नाही. खूप हुशार असलेल्या माणसाला संपत्ती मिळते असे नाही आणि सुशिक्षित माणसाला त्याच्या योग्य अशी स्तुती नेहमी लाभत नाही. वेळ आली की त्या सर्वांच्या बाबतीत वाईट गोष्टी घडतात.
12 पुढच्या क्षणी काय घडणार आहे ते माणसाला कळत नाही. तो जाळ्यात अडकलेल्या माश्यासारखा असतो. माशालाही काय घडणार आहे ते माहीत नसते. तो सापळ्यात अडकलेल्या पक्ष्यासारखा असतो. पक्ष्यालाही पुढे काय घडणार आहे ते माहीत नसते. त्याच प्रमाणे माणूसही अचानक घडणाऱ्या वाईट गोष्टींच्या सापळ्यात अडकतो.
शहाणपणाचे सामर्थ्य
13 मी या आयुष्यात शहाणपणाची गोष्ट करणारा माणूस पाहिला. आणि ते मला फार महत्वाचे वाटते. 14 थोडे लोक असलेले एक लहान शहर होते. एक महान राजा त्या शहराविरुध्द् लढला आणि त्याने त्याचे सैन्य त्या शहराभोवती ठेवले. 15 पण त्या शहरात एक विद्वान होता. तो विद्वान गरीब होता. पण त्याने आपल्या शहाणपणाचा उपयोग शहर वाचवण्यासाठी केला. सगळे काही संपल्यानंतर लोक त्या गरीब माणसाला विसरुन गेले. 16 पण मी अजूनही म्हणेन की शहाणपण शक्तीपेक्षा चांगले आहे. ते लोक त्या गरीबाचे शहाणपण विसरून गेले. आणि तो जे काही म्हणाला त्याकडे लक्ष देणेही त्यांनी सोडून दिले. पण तरीही शहाणपण चांगले असते यावर माझा अजूनही विश्वास आहे.
17 विद्वान माणसाने शांतपणे उच्चारलेले काही शब्द
हे मूर्ख राजाने [a] ओरडून सांगितलेल्या शब्दांपेक्षा चांगले असतात.
18 शहाणपण हे युध्दा्तल्या तलवारी आणि भाले यापेक्षा चांगले असते.
पण एक मूर्ख अनेक चांगल्यांचा नाश करू शकतो.
1 देवाचा सेवक व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल याजकडून, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासात त्यांना मदत करण्यासाठी मला पाठविण्यात आले. त्या लोकांना सत्याची ओळख करवून देण्यासाठी मला पाठविले. व ते सत्य लोकांना देवाची सेवा कशी करायची हे दाखविते. 2 तो विश्वास आणि ते ज्ञान अनंतकाळच्या जीवनाच्या आमच्या आशेमुळे येते. काळाची सुरुवात होण्यापूर्वी देवाने त्या जीवनाचे अभिवचन आम्हांला दिले. आणि देव खोटे बोलत नाही. 3 देवाने आपल्या योग्य वेळी त्या जीवनाविषयीचा संदेश जगाला प्रकट केला. देवाने ते काम माझ्यावर सोपविले. त्या गोष्टीविषयी मी संदेश दिला कारण आमच्या तारणाऱ्या देवाने मला तसे करण्याची आज्ञा केली होती.
4 विश्वासातील माझा खरा मुलगा तीत याला मी लिहीत आहे.
देव पिता व ख्रिस्त येशू आपला तारणारा याजकडून तुला कृपा, दया व शाति असो.
तीताचे क्रेतातील कार्य
5 मी तुला क्रेत येथे सोडून या कारणासाठी आलो: की जे अजून अपूर्ण राहिले होते ते तू व्यवस्थित करावेस व मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे प्रत्येक गावी वडील नेमावेत. 6 ज्याच्यावर दुराचरणाचा दोष नसेल, ज्याला एकच पत्नी असेल, ज्याला मुले असून ती विश्वासणारी असतील. ज्याच्यावर स्वैर जीवन जगल्याचा आरोप नसेल, अशा प्रकारच्या व्यक्तीस नेमावे. 7 कारण अध्यक्ष (सर्वांगीण काळजीवाहक) हा देवाचा कारभारी असल्यामुळे तो दोषी नसावा. तो उद्धट नसावा, त्याला लवकर राग येऊ नये; तो मद्यपान करणारा नसावा, तो भांडणाची आवड नसणारा, अप्रामाणिकपणे पैसे मिळविण्याची आवड नसणारा असावा. 8 तर तो आदरातिथ्य करणारा, चांगुलपणावर प्रेम करणारा, शहाणा, नीतिमान, भक्तीशील व स्वतःवर संयम ठेवणारा असावा. 9 विश्वसनीय संदेश जसा तो शिकविला गेला त्याला दृढ धरून राहावे यासाठी की, हितकारक शिक्षणाने लोकांना बोध करण्यास समर्थ असावे. व जे विरोध करतात, त्यांची चूक कौशल्याने त्यांना पटवून द्यावी.
10 हे महत्त्वाचे आहे कारण पुष्कळ लोक बंड करणारे आहेत. जे व्यर्थ गोष्टीविषयी बडबड करतात व लोकांना फसवितात. मी विशेषेकरून, जे सुंता झालेले आहेत त्यांना संबोधून बोलत आहे. 11 त्यांची तोंडे बंद केलीच पाहिजेत, ज्या गोष्टी शिकवू नयेत त्या ते शिकवीत आहेत. ते हे यासाठी करीत आहेत की, अयोग्य मार्गाने पैसे मिळवावेत. अशा रीतीने ते संपूर्ण घराण्याचा नाश करीत आहेत. 12 त्यांच्यापैकीच एक क्रेतीय संदेष्टा (भविष्यवादी) स्वतःम्हणाला, ʇक्रेतीय नेहमीच खोटारडे आहेत. दुष्ट पशू आणि आळशी, खादाड आहेत.ʈ 13 हे वाक्य खरे आहे. म्हणून नेहमीच त्यांना कडक रीतीने धमकाव. यासाठी की, त्यांनी विश्वासात खंबीर व्हावे. 14 आणि यहूदी भाकडकथा व जे सत्य नाकारतात अशा लोकांच्या आज्ञांकडे लक्ष देऊ नये.
15 शुद्ध असणाऱ्या सर्वांना, सर्व गोष्टी शुद्ध आहेत; पण ज्यांचे विचार व विवेकभाव ही दोन्हीही पापाने भ्रष्ट झाली आहेत व जे विश्वास ठेवीत नाहीत त्यांना काहीच शुद्ध नाही. 16 ते देवाला ओळखत असल्याचा दावा करतात, पण ते त्यांच्या कृत्यांनी देवाला ओळखल्याचे नाकारतात. ते अमंगळ व आज्ञा मोडणारे, व कोणतेच चांगले कृत्य करण्यास लायक नसलेले असे त्यांचे त्यांनीच दाखवून दिले आहे.
2006 by World Bible Translation Center