M’Cheyne Bible Reading Plan
मोशे याजकांना तयार करतो
8 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “तू अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे ह्यांना आणि त्यांची वस्त्रे अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोऱ्या दोन मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली घेऊन, 3 दर्शनमंडपाच्या दाराजवळ सर्व मंडळीला एकत्र जमवून आण.”
4 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले. लोक दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराशी जमले. 5 मग मोशे लोकांना म्हणाला, “परमेश्वराने जे करावयाची आज्ञा दिली आहे, ते हे.”
6 मग मोशेने अहरोन व त्याच्या मुलांना आणवून पाण्याने आंघोळ घातली. 7 मग त्याने अहरोनाला विणलेला सदरा घातला, त्याच्या कमरेला कमरबंद बांधला; मग त्याला झगा घातला, नंतर त्याच्यावर एफोद चढवला आणि अहरोनावर नक्षीदार सुंदर पट्टी आवळून बांधली. 8 मग मोशेने त्याच्यावर न्यायाचा ऊरपट बांधला आणि त्याच्यात उरीम व थुम्मीम ठेवले; 9 नंतर त्याच्या डोक्यावर फेटा ठेवला; आणि फेट्याच्या पुढल्या भागावर सोन्याची पट्टी म्हणजे पवित्र मुकुट ठेवला; परमेश्वराने जसे करण्यास सांगितले होते, तसेच मोशेने केले.
10 मग मोशेने अभिषेकाचे तेल घेतले आणि पवित्र निवास मंडपावर व त्यातील सर्व वस्तूंवर ते शिंपडून त्यांना पवित्र केले. 11 अभिषेकाच्या तेलातून थोडे घेऊन त्याने ते वेदीवर सात वेळा शिंपडले आणि वेदी, तिची सर्व उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक यांच्यावरही त्याने अभिषेकाचे तेल शिंपडले. अशा रीतीने त्याने ते सर्व अभिषेकाने पवित्र केले. 12 मग मोशेने थोडे अभिषेकाचे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतले व अशा प्रकारे त्याने अभिषेक करुन त्याला पवित्र केले. 13 मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणले, त्यांना विणलेले सदरे घातले, कमरेस कमरबंद घातले व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
14 मग मोशेने पापार्पणाचा गोऱ्हा आणला आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले. 15 मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त घेऊन आपल्या बोटाने वेदीच्या सर्व शिंगांना ते लावले, अशाप्रकारे त्याने वेदी शुद्ध केली आणि ते रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतले, अशा रीतीने लोकांनी यज्ञे अर्पण करावीत म्हणून ती पवित्र करण्यासाठी त्याने प्रायश्चित केले. 16 गो-ह्याच्या आंतड्यावरील सर्व चरबी, काळजावरील चरबीचा पडदा आणि चरबीसहित दोन्ही गुरदे घेऊन मोशेने वेदीवर त्यांचा होम केला. 17 परंतु गोऱ्हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण ही सर्व छावणीबाहेर नेऊन अग्रीत जाळून टाकली, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केले.
18 मग त्याने होमापर्णाचा मेंढा आणला. अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले. 19 मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त त्याने वेदीवर व सभोंवती शिंपडले. 20-21 मग त्याने त्या मेंढ्याचे कापून तुकडे केले, मग त्याची आंतडी व पाय पाण्याने धुतले व ते घेऊन, तसेच त्याचे डोके, तुकडे व चरबी हे सर्व घेऊन संपूर्ण मेंढ्याचा त्याने वेदीवर होम केला. ते परमेश्वराकरिता अग्नीद्वारे केलेले अर्पण झाले. त्याच्या सुवासाने परमेश्वराला आनंद झाला. परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
22 मग मोशेने दुसरा मेंढा आणला; तो अहरोन व त्याची मुले यांची याजक म्हणून नेमणूक झाली हे दाखवण्याकरिता होता. अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात त्या मेंढ्याच्या डोक्यावर ठेवले. 23 मोशेने त्याचा वध केला व त्याचे थोडे रक्त घेऊन अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला: उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावले. 24 मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणून त्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला, काही रक्त लावले व मग ते रक्त त्याने वेदीवर व सभोंवती शिंपडले. 25 मोशेने चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यावरील सर्व चरबी काळजावरील चरबीचा पडदा, दोन्ही गुरदे, त्यांच्यावरील चरबी व उजवी मांडी घेतली; 26 दररोज एक बेखमीर भाकरीची टोपली देवासमोर ठेवली जात असे मोशेने त्यातून एक बेखमीर पोळी, तेल लावलेली एक भाकर व एक पापडी घेऊन त्या, चरबीवर व मागच्या बाजूच्या उजव्या मांडीवर ठेवल्या. 27 हे सर्व त्याने अहरोन व त्याच्या मुलांच्या हातावर ठेवले आणि परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ते ओवाळले. 28 मग मोशेने ते त्यांच्या हातातून घेऊन वेदीवरील होमार्पणासहित त्यांचा होम केला; अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचे याजक म्हणून समर्पण करण्यासाठी हे अर्पण केले. हे होमार्पण होते परमेश्वराला त्यामुळे संतोष झाला. 29 मोशेने मेढ्याच्या उराचा भाग घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून तो परमेश्वरासमोर ओवाळला; याजकाच्या समर्पणासाठी असलेल्या मेंढ्याचा हा भाग मोशेच्या वाट्याचा होता; परमेश्वराने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोशेने हे केले.
30 मग मोशेने अभिषेकाचे काही तेल व वेदीवरील काही रक्त घेऊन अहरोन व त्याची वस्त्रे, व त्याच्यासहित त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे ह्यांच्यावर शिंपडले आणि अहरोन व त्याची वस्त्रे व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे पवित्र केली.
31 मोशे अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना म्हणाला, “मी सांगितल्याप्रमाणे, ‘अहरोन व त्याच्या मुलांनी हे मांस खावे;’ तेव्हा ही भाकरीची टोपली व याजकाच्या समर्पणासाठीचे हे मांस घ्या; दर्शनमंडपाच्या दारापाशी ते शिजवा आणि मी सांगितल्याप्रमाणे मांस व भाकर तेथेच खा. 32 मांस व भाकर ह्यातून काही उरले तर ते अग्नीत जाळून टाका; 33 तुमच्या समर्पणाचा विधी सात दिवस चालेल; ते सात दिवस पूर्ण होईपर्यंत तुम्ही दर्शनमंडपाच्या बाहेर जाऊ नये. 34 परमेश्वराने आज्ञा केली आहे की आज केल्याप्रमाणे तुमच्यासाठी प्रायश्चित करावे. 35 तेव्हा दर्शनमंडपाच्या दारापाशी तुम्ही सात दिवस व रात्री राहा, ही परमेश्वराची आज्ञा तुम्ही पाळली नाही तर तुम्ही मराल; कारण परमेश्वराने मला तशी आज्ञा दिली आहे.”
36 तेव्हा मोशेच्याद्वारे परमेश्वराने ज्या गोष्टी विषयी आज्ञा दिली होती त्या सर्व अहरोन व त्याच्या मुलांनी केल्या.
प्रमुक गायकासाठी मूथ लाब्येन या सुरावर बसवलेले दावीदाचे स्तोत्र.
9 मी अगदी मनापासून परमेश्वराची स्तुती करतो.
परमेश्वरा, तू ज्या अद्भुत गोष्टी केल्या आहेस त्याबद्दल मी सांगेन.
2 तू मला खूप सुखी करतोस. सर्वशक्तिमान देवा,
मी तुझ्या नामाचा महिमा गातो.
3 माझे शत्रू तुझ्यापासून दूर जाण्यासाठी पळाले.
परंतु ते पडले आणि त्यांचा नाश झाला.
4 तू सगळ्यात न्यायी आहेस तू तुझ्या सिंहासनावर न्यायाधीश म्हणून बसलास.
परमेश्वरा, तू माझे गाऱ्हाणे ऐकलेस आणि तू माझा न्यायनिवाडा केलास.
5 तू दुसऱ्या लोकांवर टीका केलीस.
परमेश्वरा, तू त्यांचा नाश केलास.
तू त्यांची नावे जिवंत माणसांच्या यादीतून कायमची पुसून टाकलीस.
6 शत्रूचा निपात झाला परमेश्वरा, तू त्यांच्या शहरांचा नाश केलास.
आता केवळ पडकी घरे उभी आहेत
त्या दुष्ट लोकांच्या आठवणी खातर आता काहीही शिल्लक उरले नाही.
7 परंतु परमेश्वर अनंत काळ राज्य करतो.
त्याने त्याचे राज्य सामर्थ्यवान बनवले आहे, हे त्याने जगात न्यायव्यवस्था यावी म्हणून केले.
8 परमेश्वर पृथ्वीवरील सर्वांनाच न्यायाने वागवतो
आणि सर्व देशांनाही तो एकाच मापाने तोलतो.
9 खूप लोक सापळ्यात अडकले
आणि दुखी झाले कारण त्यांच्या पुढे असंख्य संकटे होती.
संकटांच्या ओझ्याखाली ते लोक चेंगरले गेले आहेत.
परमेश्वरा, त्यांना आश्रय देणारी एक चांगली जागा तू बन.
10 ज्या लोकांना तुझे नाव माहीत आहे
ते तुझ्यावर विश्वास ठेवतात.
परमेश्वरा, जर लोक तुझ्याकडे आले,
तर त्यांना मदत केल्याशिवाय परत पाठवू नकोस.
11 सीयोनमध्ये राहाणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वराने ज्या महान गोष्टी केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा.
12 जे परमेश्वराकडे मदतीसाठी गेले [a]
त्यांची आठवण त्याने ठेवली
त्या गरीब लोकांनी मदतीची याचना केली
आणि परमेश्वर त्यांना विसरला नाही.
13 मी देवापाशी ही प्रार्थना केली “परमेश्वरा माझ्यावर दया कर,
बघ माझे शत्रू मला त्रास देत आहेत.
माझे ‘मृत्यूच्या दारा’ पासून रक्षण कर.
14 नंतर यरुशलेमच्या द्वारात परमेश्वरा, मी तुझी स्तुती गाईन.
तू माझे रक्षण केलेस म्हणून मी खूप आनंदात असेन.”
15 ती इतर राष्ट्रे दुसऱ्या लोकांना सापळ्यात पकडण्यासाठी खड्डे खणतात.
परंतु ते स्वतच त्या खड्यांत पडले.
दुसऱ्यांना पकडण्यासाठी त्यांनी जाळे लावले.
परंतु ते स्वतच त्या जाळ्यात अडकले.
16 परमेश्वराने त्या वाईट लोकांना पकडले.
परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतो हे ते शिकले हिग्गायोन. [b]
17 जे लोक देवाला विसरतात ते वाईट असतात.
ते लोक मृत्युलोकात जातील.
18 कधी कधी देव संकटात असलेल्यांना विसरतो असे वाटते.
त्या गरीबांना काही आशा नाही असेही वाटते.
परंतु देवत्यांना कायमचा कधीच विसरत नाही.
19 परमेश्वरा, ऊठ आणि राष्ट्रांचा न्याय कर.
आपण सामर्थ्यवान आहोत असा विचार लोकांना करु देऊ नकोस.
20 लोकांना धडा शिकव.
आपण केवळ माणसे आहोत हे त्यांना कळू दे.
— 6 —
23 जेव्हा तुम्ही महत्वाच्या लोकांबरोबर बसता आणि खाता तेव्हा तुम्ही कुणाबरोबर आहात याचे भान ठेवा. 2 जरी तुम्हाला खूप भूक लागलेली असली तरी कधीही जास्त खाऊ नका. 3 आणि तो जे चांगले पदार्थ वाढतो तेही जास्त खाऊ नका. तो कदाचित् एखादा डाव असू शकेल.
— 7 —
4 श्रीमंत होण्याचा प्रयत्न करताना तब्येतीची हेळसांड करु नका. तुम्ही शहाणे असाल तर धीर धराल. 5 पैसा फार लवकर जातो. जणूकाही त्याला पंख फुटतात आणि तो पक्ष्यासारखा उडून जातो.
— 8 —
6 स्वार्थी माणसाबरोबर खाऊ नका. आणि त्याला जे खास भोजन आवडते त्यापासून दूर राहा. 7 जो नेहमी किंमतीचा विचार करणारा माणूस आहे. तो कदाचित् तुम्हाला म्हणेल, “खा आणि प्या” पण त्याला ते खरोखरच हवे आहे असे नाही. 8 आणि तुम्ही जर त्याचे अन्न खाल्ले तर तुम्ही आजारी पडाल आणि तुम्हाला शरम वाटेल.
— 9 —
9 मूर्खाला शिकवायचा प्रयत्न करु नका. तो तुमच्या शहाणपणाच्या शब्दांची थट्टा करील.
— 10 —
10 जुनी जमीन जायदादीची रेषा कधीही सरकवू नका. आणि निराधार मुलाची जमीन कधीही बळकावू नका. 11 परमेश्वर तुमच्या विरुध्द जाईल. परमेश्वर शक्तिशाली आहे आणि तो त्या निराधार मुलाचे रक्षण करील.
— 11 —
12 तुमच्या शिक्षकाचे ऐका आणि जेवढे शिकता येईल तेवढे शिका.
— 12 —
13 गरज पडेल तेव्हा मुलाला नेहमी शिक्षा करा. तुम्ही त्याला चापट मारली तर त्याला ती लागणार नाही. 14 चापटी मारुन तुम्ही त्याला मृत्यूपासून वाचवू शकाल.
— 13 —
15 मुला, तू जर शहाणा झालास तर मी खूप आनंदी होईन. 16 तू योग्य गोष्टी बोलू लागलास, तू योग्य गोष्टी बोलताना मी ऐकले तर मला खूप आनंद होईल.
— 14 —
17 दुष्ट लोकांचा मत्सर करु नका. पण परमेश्वराचा आदर करण्यासाठी नेहमीच प्रयत्नांची पराकाष्ठा करा. 18 आशेला नेहमीच जागा असते. आणि ती आशा अमर आहे.
— 15 —
19 म्हणून मुला, लक्ष दे आणि शहाणा हो. योग्य रीतीने जगण्याची काळजी घे. 20 खूप खाणाऱ्या आणि खूप द्राक्षारस पिणाऱ्या लोकांशी मैत्री करु नकोस. 21 जे लोक खूप खातात आणि पितात ते गरीब होतात. ते फक्त खातात, पितात आणि झोपतात आणि लवकरच त्यांच्याजवळ काहीही उरत नाही.
— 16 —
22 तुझे वडील तुला ज्या गोष्टी सांगतात त्या ऐक. तुझ्या वडिलांशिवाय तू कधीही जन्माला आला नसतास. तुझी आई म्हातारी झाली तरी तिचा आदर कर. 23 सत्य, शहाणपण, शिक्षण आणि समजूतदारपणा या गोष्टी पैसे मोजून घेण्याइतक्या मौल्यवान आहेत. आणि त्यांचे मूल्य त्या विकून टाकता न येण्याइतके अधिक आहे. 24 चांगल्या माणसाचे वडील खूप आनंदी असतात. एखाद्याचे मूल जर शहाणे असेल तर ते खूप आनंद देते. 25 म्हणून तुमच्या आई-वडिलांना तुमच्याबरोबर आनंदी होऊ द्या. तुमच्या आईला आनंद घेऊ द्या.
— 17 —
26 मुला, मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. माझे आयुष्य तुझ्यासमोर उदाहरणादाखल राहू दे. 27 वेश्या आणि वाईट स्त्रिया म्हणजे सापळे आहेत. त्या खोल विहिरीसारख्या आहेत. त्यातून कधीही बाहेर पडता येत नाही. 28 वाईट स्त्री चोरासारखी तुमची वाट बघत असते. आणि ती पुष्कळ पुरुषांना पाप करायला लावते.
— 18 —
29-30 जे लोक खूप द्राक्षारस पितात आणि कडक मद्य घेतात, त्यांच्याकरता ते खूप वाईट आहे. ते लोक खूप भांडणे आणि वाद-विवाद करतात. त्यांचे डोळे पण लाल असतात. ते अडखळतात आणि पडतात. ही सगळी संकटे त्यांना टाळता आली असती.
31 म्हणून द्राक्षारसापासून सावध राहा. तो सुंदर आणि लाल दिसतो. तो पेल्यात चकाकतो आणि तुम्ही पिता तेव्हा तो अगदी सरळपणे जातो. 32 पण शेवटी तो सापासारखा चावतो.
33 द्राक्षारसामुळे तुम्ही चित्रविचित्र गोष्टी बघायला लागता. तुमचे मन गोंधळून जाते. 34 तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुम्ही खवळलेल्या समुद्रावर आहात असे तुम्हाला वाटेल आपण जहाजावर झोपलो आहोत असे तुम्हाला वाटेल. 35 तुम्ही म्हणाल, “त्यांनी मला मारले पण मला ते कळलेसुध्दा नाही. त्यांनी मला खूप मारले पण मला ते आठवत नाही. आता मी जागा होऊ शकत नाही. मला आणखी प्यायला द्या.”
पौलाचे थेस्सलनीकातील कार्य
2 बंधूंनो, तुमचे तुम्हांलाच माहीत आहे की, आम्ही तुम्हाला दिलेली भेट व्यर्थ झाली नाही. 2 पण तुम्हाला माहीत आहे की, आम्हांला मागे फिलिप्पै येथे त्रास आणि अपमान सहन करावा लागला. पण देवाच्या साहाय्याने मोठा विरोध झाला असताना देवाकडून येणारी सुवार्ता सांगण्यासाठी आम्हांला धैर्य प्राप्त झाले. 3 खरोखर आमची घोषणा आमच्याकडून झालेल्या चुकांमुळे किंवा अशुद्ध हेतूने किंवा भ्रमाने येत नाही. 4 उलट, ज्याप्रमाणे देवाने पसंत केलेले, सुवार्तेचे कार्य सोपविलेले असे आम्ही आहोत म्हणून आम्ही बोलतो. आम्ही मनुष्याला संतुष्ट करण्यासाठी नाही, तर देवाला, जो आमच्या उद्दिष्टांची परीक्षा घेतो
5 खरोखर, तुम्हांला माहीत आहे की, आम्ही तुमच्यासमोर खुशामत करणाऱ्या शब्दांनी बोललो नाही, किंवा आमचे उपदेश करणे हे आमचा लोभ झाकण्याचे खोटे कारण नव्हते, कारण देव आमचा साक्षी आहे! 6 किंवा आम्ही लोकांकडून, तुमच्याकडून किंवा दुसऱ्या कोणाकडून सन्मान मिळावा म्हणून अपेक्षा करीत नव्हतो. ख्रिस्ताचे प्रेषित या नात्याने, जरी आम्हांला आमचा अधिकार तुमच्यावर दाखविता आला असता.
7 तरीही आम्ही तुमच्यामध्ये आई जशी प्रेमाने तिच्या मुलाला स्वतःचे दूध पाजते आणि काळजी घेते, तसे आम्ही तुमच्यात सौम्य होतो. [a] असे लिहिले आहे. 8 कारण आम्हाला तुमच्याविषयी इतके प्रेम वाटले की, आम्ही तुमच्याबरोबर देवाकडून येणारी सुवार्ताच नव्हे तर आमचे स्वतःचे जीवनसुद्धा देण्यास तयार होतो. याचे कारण म्हणजे, तुम्ही आमच्यासाठी प्रिय झाला होता. 9 बंधूंनो, आम्ही देवाकडून आलेली सुवार्ता सांगत असताना, तुम्हाला आठवत असेल की आम्ही रात्रंदिवस किती कष्ट केले. आमचे कष्ट आणि श्रम तुम्ही जाणता ते यासाठी केले की, तुम्ही कोणावरही भार पडू नये.
10 तुम्ही साक्षी आहात आणि देवसुद्धा साक्षी आहे की, आम्ही किती धार्मिकतेने, न्यायाने आणि निर्दोष रीतीने तुम्हा विश्वासणाऱ्यांबरोबर वागलो. 11 आणि तुम्हाला हे चांगले माहीत आहे की, जसा पिता आपल्या मुलांना वागवितो तसे आम्ही तुम्हातील प्रत्येकाला वागविले आहे. 12 अशा प्रकारे आम्ही तुम्हांला उत्तेजन दिले, सांत्वन केले. आणि तुम्हांला साक्ष दिली की, देवाला आवडेल अशा प्रकारे वागा. जो त्याच्यात व गौरवात तुम्हाला बोलावितो.
13 आणि, या कारणासाठी आम्हीसुद्धा देवाचे सातत्याने आभार मानतो, कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून देवाचा संदेश ऐकला, तेव्हा तुम्ही तो मनुष्याकडून आलेला म्हणून स्वीकारला नाही, तर देवापासून आलेला जसा खरा होता तसाच स्वीकारला. देवाचा संदेश, जो तुम्हा विश्वास णाऱ्यांच्यामध्ये सुद्धा कार्य करीत आहे. 14 कारण बंधूनो, तुम्ही येशूमध्ये देवाच्या ज्या मंडळ्या यहूदीयात आहेत त्याचे अनुकरण करणारे झाला आहात, कारण त्यांनी यहूद्यांच्या हातून जसे दु:ख सोसले, तसेच तुम्ही तुमच्या देशबांधवांकडून दु:ख सोसले. 15 त्यांनी प्रभु येशूला आणि संदेष्ट्यांना मारले, त्यांनी आम्हांला बाहेर हाकलून लावले, ते देवाला संतोष देत नाहीत आणि ते सर्व लोकांच्या विरुद्ध आहेत. 16 यहूदीतर लोकांचे तारण होण्यासाठी आम्ही त्यांच्याशी बोलायला हवे, परंतु ते आम्हांला मना करुन एक प्रकारे पापच करीत आहेत. ते या पापाद्वारे जे ते नेहमी करीत आले आहेत आपल्या पापाचे माप भरत आले आहेत. आणि आता शेवटी आणि पूर्णतेने देवाचा क्रोध त्यांच्यावर ओढवला आहे.
पौलाची त्यांना पुन्हा भेटण्याची इच्छा
17 बंधूंनो, आमच्यासाठी, आम्ही तुमच्यापासून थोड्या वेळासाठी वेगळे झालो होतो. आम्ही शरीराने वेगळे झालो होतो, विचाराने नाही आणि आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी फार अधीर झालो होतो. आणि तुम्हांला भेटण्याची फार इच्छा होती. 18 होय, तुमची भेट घेण्याचा खरोखर आम्ही प्रयत्न केला होता. खरोखर मी पौलाने एकदा दोनदा प्रयत्न केला परंतु सैतानाने असे करण्यापासून आम्हाला परावृत केले. 19 शेवटी, जेव्हा आपला प्रभु येशू दुसऱ्यांदा येईल, तेव्हा त्याच्यासमोर उभे राहू तेव्हा आमची आशा, किंवा आनंद किंवा मुकुट काय असेल, ज्याचा आम्हांला अभिमान वाटेल? ते तुम्हीच नाही का? 20 होय, तुम्ही आमचा गौरव व आनंद आहात!
2006 by World Bible Translation Center