M’Cheyne Bible Reading Plan
दोषार्पणे
7 “दोषार्पणाविषयी जे नियम आहेत, ते हे: हे अर्पण परमपवित्र आहे. 2 ज्या जागीं होमबलीचा वध करावयाचा त्याच जागी दोषार्पणाच्या बळीचा वध करावा, आणि याजकाने त्या बळीचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.
3 “त्याची सर्व चरबी याजकाने अर्पावी; त्याचे चरबीदार शेपूट, आंतड्यावरील चरबी, 4 दोन्ही गुरदे, त्यंच्यावरील कमरेजवळील चरबी व गुरद्यापर्येतचा काळजावरील चरबीचा पडदा, 5 ह्या सर्वाचा याजकाने होम करावा; हे परमेश्वरासाठी होमार्पण आहे. हेच दोषार्पण होय.
6 “याजक वर्गातील प्रत्येक पुरुषाला हे दोषार्पण बळी खाण्याचा अधिकार आहे; ते परमपवित्र आहे म्हणून ते पवित्र स्थानींच बसून खावे. 7 दोषार्पण पापार्पणसारखेच आहे; त्या दोघांचे विधि एकच आहेत; जो याजक ह्या होमबलीच्याद्वारे प्रायश्चित करील त्याचा त्या अर्पणावर हक्क राहील. 8 प्रायश्चित करणाऱ्या याजकाचा त्या बळीच्या कातड्यावरही अधिकार असेल. 9 भटृत भाजलेले कढईत किंवा तव्यावर तळलेले सर्व अन्नार्पण, ते अर्पण करणाऱ्या याजकाचे होईल. 10 प्रत्येक तेल मिश्रित किंवा कोरडे अन्नार्पण ते अर्पण करणाऱ्या याजकाचे-अहरोनाच्या मुलांचे आहे; त्या सर्वाचा त्यांच्यावर सारखाच अधिकार आहे.
शांत्यर्पणे
11 “परमेश्वरासाठी कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याचा विधि असा: 12 त्याला तो शांत्यर्पणाचा यज्ञ उपकारस्तुतीसाठी करावयाचा असेल तर त्याने तेलात मळलेल्या, बेखमीर पोळया तेल लावलेल्या बेखमीर चपात्या आणि तेलात मळलेल्या मैद्याच्या तळलेल्या पोळया शांत्यर्पणाच्या यज्ञासोबत अर्पाव्या. 13 शांत्यर्पण हे देवाकरिता शांत्यर्पणाच्या यज्ञासारखेच आहे म्हणून त्यासोबत त्याने खमीर घातलेल्या भाकरीही अर्पाव्या 14 ह्या प्रत्येक अर्पणातून परमेश्वरासाठी एक एक पोळी अर्पावी; शांत्यर्पणाचे रक्त शिंपडणाऱ्या याजकाटचा त्या पोळीवर हक्क आहे. 15 शांत्यर्पणासाठी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस त्याने अर्पण करण्याच्या दिवशीच खावे; त्यातील काहीही सकाळपर्यत ठेवू नये.
16 “यज्ञबलीचे अर्पण स्वखुशीचे किंवा नवसाचे असेल तर ज्या दिवशी तो ते अर्पील त्या दिवशी त्याने ते खावे आणि जर त्यातून काही उरले तर ते त्याने दुसऱ्या दिवशी खावे. 17 परंतु त्या यज्ञबलीचे काही मांस तिसऱ्या दिवसापर्यत उरले तर ते अग्नीत जाळूत टाकावे. 18 शांत्यर्पणाच्या यज्ञबलीच्या मांसातून तिसऱ्या दिवशी मांस जर तो खाईल तर परमेश्वराला ते आवडणार नाही, व तो ते अर्पण मान्य करणार नाही; ते अर्पण अमंगळ होईल; त्या पापाबद्दल भोगाव्या लागणाऱ्या शिक्षेस तो स्वतः जबाबदार राहील.
19 “त्याचप्रमाणे ज्या मांसाला कोणत्याही अशुद्ध वस्तूचा स्पर्श झाला असेल ते कोणी खाऊ नये; ते अग्नीत जाळून टाकावे. शुद्ध असणाऱ्यानेच शांत्यर्पण खावे; 20 परंतु जर कोणी अशुद्ध असून परमेश्वराला अर्पिलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस खाईल तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
21 “एखादा माणूस जर एखाद्या अशुद्ध वस्तूला स्पर्श करील मग ती अशुद्धता माणसाची, पशूची किंवा दुसऱ्या कोणत्या अमंगळ पदार्थाची असो, तर तो अशुद्ध होईल आणि परमेश्वराला अर्पण केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे जर तो मांस खाईल तर त्याला स्वजनातून बाहेर टाकावे.”
22 परमेश्वर मोशेला म्हणाला, 23 “इस्राएल लोकांना असे सांग: तुम्ही बैलाची मेंढराची किंवा बकऱ्याची चरबी खाऊ नये. 24 मेलेल्या जनावराची चरबी किंवा इतर पशूनी फाडून टाकलेल्या जनावराची चरबी तुम्ही इतर कामासाठी वापरू शकता पण ती मुळीच खाऊ नये. 25 परमेश्वरला अर्पिलेल्या पशूची चरबी जर कोणी खाईल तर त्याला स्वजनातून बाहेर टाकावे.
26 “तुम्ही कोठेही राहात असला तरी आपल्या घरात पक्ष्याचे किंवा जनावराचे रक्त तुम्ही कधीही खाऊ नये. 27 जर कोणी कोणतेहि रक्त खाईल तर त्याला स्वजनातून बाहेर टाकावे.”
ओवाळणीच्या अर्पणाचे नियम
28 परमेश्वर मोशेला म्हणाला, 29 “इस्राएल लोकांना असे सांग: जर कोणी परमेश्वरासमोर आपल्या शांत्यर्पणाचा यज्ञबली अर्पील तर त्याने त्या अर्पणातून काही भाग परमेश्वराकडे आणावा. 30 त्याने आपल्या हाताने परमेश्वरासाठी अर्पणे आणावी; त्याने चरबी व ऊर याजकाकडे आणावा; ते ऊर परमेश्वरासमोर ओवाळले जाईल; हे ओवाळणीचे अर्पण होय. 31 मग याजकाने त्या चरबीचा होम करावा परंतु ऊर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा होईल. 32 तसेच तुम्ही आपल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीची उजवी मांडीही समर्पित केलेला अंश म्हणून याजकाला द्यावी. 33 अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांत्यर्पणाचे रक्त व चरबी अर्पील त्याचा त्या मांडीवर हक्क असावा. 34 मी परमेश्वर इस्राएल लोकांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीतून ओवाळणीचा ऊर व उजवी मांडी काढून घेऊन अहरोन याजक व त्याचे मुलगे ह्यांना दिली आहे; हा इस्राएल लोकांकडून त्यांना मिळणारा नेहमीचा हिस्सा आहे. इस्राएल लोकांनी हा निरंतरचा विधी म्हणून पिढ्यान्पिढ्या पाळावा.”
35 परमेश्वरा करिता अर्पिलेल्या अर्पणातून हे भाग अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना देण्यात आलेले आहेत; जेव्हा जेव्हा ते याजक म्हणून परमेश्वराची सेवा करतात तेव्हा तेव्हा त्या समर्पणातून ते भाग त्यांना मिळावेत. देवाची सेवा करणारे याजक म्हणून ज्या दिवशी त्यांची नेमणूक करण्यात आली त्याच दिवसापासून असे ठरले आहे. 36 परमेश्वराने ज्या दिवशी त्यांना अभिषेक केला त्या दिवशी त्याने इस्राएल लोकांकडून हा भाग त्यांना मिळावा अशी आज्ञा दिली म्हणून पिढ्यान्पिढ्या हा त्यांचा कायमचा हक्क ठरला आहे.
37 होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याजकाच्या समर्पणाच्या वेळेच अर्पण आणि शांत्यर्पण ह्या विषयींचे विधि असे; 38 इस्राएल लोकांनी परमेश्वराकरिता काय काय अर्पणे आणावीत ह्या विषयी त्याने त्यांना सीनाय रानात आज्ञा दिली त्यावेळी त्याने मोशेला ह्याप्रमाणे सीनाय पर्वतावर हे विधीनियम लावून दिले.
दावीदाने परमेश्वरापाशी गायलेले स्तोत्र हे स्तोत्र बन्यामीनी कुटुंबातील कुशाचा मुलगा शौल याच्या संबंधी आहे.
7 परमेश्वरा, माझ्या देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
माझा पाठलाग करणाऱ्या लोकांपासून मला वाचव मला सोडव.
2 तू जर मला मदत केली नाहीस तर सिंहाच्या तावडीत सापडलेल्या एखाद्या प्राण्यासारखी माझी अवस्था होईल
मला दूर नेले जाईल आणि कुणीही मला वाचवू शकणार नाही.
3 परमेश्वर देवा मी काहीही चूक केलेली नाही.
मी चूक केली नसल्याबद्दल खात्रीपूर्वक सांगतो.
4 मी माझ्या मित्रांशी दुष्टावा केला नाही
आणि मी मित्रांच्या शत्रूंना मदतही केली नाही.
5 जर हे खरे नसेल तर मला शिक्षा कर.
शत्रू माझा पाठलाग करो, मला पकडो व मला मारो.
त्याला माझे जीवन जमिनीत तुडवूदे आणिमाझा जीव मातीत ढकलू दे.
6 परमेश्वरा ऊठ, आणि तुझा क्रोध दाखव माझा शत्रू रागावलेला आहे
म्हणून तू त्याच्या पुढे उभा राहा आणि त्याच्या विरुध्द् लढ.
परमेश्वरा ऊठ आणि न्यायाची मागणी कर.
7 परमेश्वरा लोकांचा निवाडा कर.
सगळे देश तुझ्याभोवती गोळा कर आणि लोकांचा निवाडा कर.
8 परमेश्वरा, माझा निवाडा कर.
मी बरोबर आहे हे
सिध्द् कर मी निरपराध आहे हे सिध्द् कर.
9 वाईटांना शिक्षा कर आणि चांगल्यांना मदत कर.
देवा तू चांगला आहेस आणि तू लोकांच्या ह्रदयात डोकावून बघू शकतोस.
10 ज्याचे ह्रदय सच्चे आहे अशांना देव मदत करतो
म्हणून तो माझे रक्षण करेल.
11 देव चांगला न्यायाधीश आहे
आणि तो त्याचा क्रोध केव्हाही व्यक्त करु शकतो.
12-13 देवाने एकदा निर्णय घेतल्यानंतर
तो त्याचे मन बदलत नाही.
देवाकडे लोकांना शिक्षा करायची शक्ती आहे. [a]
14 काही लोक सतत वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत असतात.
ते गुप्त योजना आखतात आणि खोटे बोलतात.
15 ते दुसऱ्यांना जाळ्यात पकडतात आणि त्यांना इजा करतात.
परंतु ते स्वत:च्याच जाळ्यात अडकतील आणि त्याना कुठली तरी इजा होईल.
16 त्यांना योग्य अशी शिक्षा मिळेल.
ते इतरांशी फार निर्दयपणे वागले.
त्यांनाही योग्य अशीच शिक्षा मिळेल.
17 मी परमेश्वराची स्तुती करतो, कारण तो चांगला आहे
मी त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाची स्तुती करतो.
प्रमुख गायकासाठी गित्तीथ सुरावर [b] बसवलेले दावीदाचे स्तोत्र.
8 परमेश्वरा, माझ्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील नावात सर्वात चांगले आहे, थोर आहे.
तुझ्या नावाने तुला स्वर्गात गौरव प्राप्त करुन दिला आहे.
2 मुला बाळांच्या मुखातून तुझे गुणगान ऐकू
येते तुझ्या शंत्रूना गप्प बसवण्यासाठी तू हे सारे करतोस.
3 परमेश्वरा, तू तुझ्या हातांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे मी बघतो तू केलेल्या चंद्र आणि ताऱ्यांकडे मी बघतो.
आणि मला आश्चर्य वाटते.
4 लोक तुला इतके महत्वाचे का वाटतात?
तू त्यांची आठवण तरी का ठेवतोस?
लोक [c] तुझ्यासाठी इतके महत्वाचे का आहेत?
तू त्यांची दखल तरी का घेतोस?
5 परंतु लोक तुला महत्वाचे वाटतात.
तू त्यांना जवळ जवळ देवच बनवलेस आणि तू लोकांना गौरवाचे आणि मानाचे मुकुट चढवितोस.
6 तू लोकांना तू निर्माण केलेल्या
सर्व गोष्टींचे अधिपत्य दिलेस.
7 लोक मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशू यांच्यावर राज्य करतात.
8 ते आकाशातल्या पक्ष्यांवर
आणि सागरात पोहणाऱ्या माशावर राज्य करतात.
9 परमेश्वरा, आमच्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील सर्व नावात अतिशय चांगले आहे, अद्भुत आहे.
22 आदरणीय असणे हे श्रीमंत असण्यापेक्षा अधिक चांगले. चांगले नाव असणे हे सोन्या चांदीपेक्षा अधिक महत्वाचे आहे.
2 गरीब लोक आणि श्रीमंत लोक सारखेच असतात. सर्वांना परमेश्वरानेच निर्माण केले आहे.
3 शहाण्या लोकांना संकट येताना दिसते आणि ते वाटेतून बाजूला होतात. पण मूर्ख लोक सरळ संकटात जातात आणि त्यामुळे सोसत राहातात.
4 परमेश्वराला मान द्या आणि विनम्र राहा. नंतर तुम्हाला संपत्ती, मान आणि खरे जीवन मिळेल.
5 वाईट लोक अनेक संकटांच्या जाळ्यात अडकले आहेत. पण जो माणूस आपल्या आत्म्याची काळजी करतो तो संकटांपासून दूर राहातो.
6 लहान मुलाला जगण्याचा योग्य मार्ग लहानपणीच शिकवा. मग तो जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याच मार्गांने जगेल.
7 गरीब लोक श्रीमंतांचे गुलाम असतात. जो माणूस कर्ज घेतो तो जो कर्ज देतो त्याचा गुलाम असतो.
8 जो माणूस संकटे पसरवतो तो संकटांचे पीक घेतो. आणि शेवटी त्या माणसाचा नाश होईल त्याने इतरांना दिलेल्या त्रासांमुळेच त्या माणसाचा नाश होईल.
9 जो मनुष्य स्वखुशीने आनंदाने देतो त्याला आशीर्वाद मिळेल. कारण तो आपले अन्न गरिबांबरोबर वाटून खातो.
10 जर एखादा माणूस स्वतःला इतरांपेक्षा चांगला समजत असेल तर त्याला जबरदस्तीने जायला भाग पाडा. जेव्हा तो माणूस जाईल तेव्हा त्याच्याबरोबर संकटही जाईल. नंतर वाद आणि फुशारक्याही बंद होतील.
11 जर तुम्ही शुध्द् मनावर आणि प्रेमळ शब्दांवर प्रेम करीत असाल तर राजाही तुमचा मित्र होईल.
12 जे लोक परमेश्वराला ओळखतात त्यांच्यावर तो नजर ठेवतो आणि त्यांचे रक्षण करतो. पण जे त्याच्याविरुध्द् जातात त्यांचा तो नाश करतो.
13 आळशी माणूस म्हणतो, “मी आता कामाला जाऊ शकत नाही. बाहेर सिंह आहे आणि तो मला खाईल.”
14 व्यभिचाराचे पाप हा एक सापळा आहे. जो माणूस या सापळ्यात अडकतो त्याच्यावर परमेश्वर खूप रागावतो.
15 मुले मूर्खपणाच्या गोष्टी करीत असतात. पण तुम्ही जर त्यांना शिक्षा केली तर त्या गोष्टी न करायलाही ते शिकतील.
16 या दोन गोष्टी तुम्हाला गरीब बनवतील. स्वतःला श्रीमंत बनवण्यासाठी गरीबांना त्रास देणे आणि श्रीमंतांना नजराणे देणे.
शहाणपणाच्या तीस म्हणी
17 मी काय सांगतो ते ऐका. मी तुम्हाला विद्वानांनी जे सांगितले ते शिकवतो. या शिकवणीपासून शिका. 18 तुम्ही जर या म्हणी लक्षात ठेवल्या तर ते तुमच्या दृष्टीने फार चांगले होईल. तुम्ही जर हे शब्द म्हणू शकलात तर तुम्हाला त्यांची मदत होईल. 19 मी तुम्हाला आता या गोष्टी शिकवेन. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवावा अशी माझी इच्छा आहे. 20 मी तुमच्यासाठी तीस म्हणी लिहिल्या. हे शब्द म्हणजे उपदेश आणि शहाणपण आहे. 21 हे शब्द तुम्हाला खऱ्या आणि महत्वाच्या गोष्टी सांगतील. नंतर तुम्ही तुमच्याकडे पाठवलेल्यांना ज्यांनी तुम्हाला विचारले त्यांना तुम्ही चांगली उत्तरे देऊ शकता.
— 1 —
22 गरिबांची चोरी करणे सोपे असते. पण ते करु नका आणि न्यायालयात या गरीब लोकांचा फायदा घेऊ नका. 23 परमेश्वर त्यांच्या बाजूला आहे. तो त्यांना साहाय्य करतो आणि त्यांच्याकडून ज्यांनी वस्तू घेतल्या त्या वस्तू तो परत घेईल.
— 2 —
24 जो खूप लवकर रागावतो त्या माणसाशी मैत्री करु नका. जो पटकन् वेडा होतो त्या माणसाजवळ जाऊ नका. 25 जर तुम्ही गेलात तर तुम्ही त्याच्यासारखेच व्हायला शिकाल. आणि तुमच्यावरही त्याच्यावर येतात तशीच संकटे येतील.
— 3 —
26 दुसऱ्याच्या कर्जासाठी जामीन राहाण्याचे वचन देऊ नका. 27 जर तुम्ही त्याचे कर्ज फेडू शकला नाही, तर तुम्ही तुमच्या जवळचे सर्व घालवून बसाल. तुमचे झोपायचे अंथरुण तुम्ही का घालवता?
— 4 —
28 खूप पूर्वी तुमच्या पूर्वजांनी जमीन-जायदादीची आखून दिलेली रेषा पुसू नका.
— 5 —
29 जर एखादा माणूस त्याच्या कामात तरबेज असला तर तो राजांची चाकरी करण्यायोग्य असतो. त्याला बिनमहत्वाच्या लोकांसाठी काम करावे लागणार नाही.
1 पौल, सिल्वान आणि तीमथ्य यांच्या द्वारे देव जो पिता त्यामध्ये तसेच प्रभु येशू ख्रिस्तामध्ये दृढ असलेल्या थेस्सलनीकाच्या मंडळीस,
देवाची कृपा व शांति लाभो.
थेस्सलनीकाकरांचा विश्वास आणि जीवन
2 आम्ही नेहमीच प्रार्थनामध्ये तुमची आठवण करुन तुम्ही सर्वांसाठी देवाचे आभार मानतो. 3 आम्ही आमचा देव व पित्यासमोर तुमचे विश्वासाचे कार्य, तुम्ही प्रेमाने केलेले श्रम, आणि आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावरील दृढ आशेने सोशिकपणे धरलेला धीर याची सतत आठवण करतो.
4 माझ्या बंधूनो, देवाने प्रीतित केलेली तुमची निवड ही आम्हाला माहीत आहे. 5 कारण आमची सुवार्ता तुमच्याकडे केवळ शब्दांनी आली नाही तर पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने आली हे तुम्हांला माहीत आहे, आम्ही तुमच्यामध्ये कसे राहिलो तुम्हांला माहीत आहे. ते तुमच्या फायद्यासाठी होते. 6 आणि तुम्ही आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला, पवित्र आत्म्याकडून मिळणाऱ्या आनंदात तुम्ही मोठ्या कष्टाने संदेश स्वीकारलात.
7 त्याचा परिणाम म्हणजे तुम्ही सर्व विश्वासणाऱ्यासाठी जे मासेदोनियात व अखियात होते त्यांच्यासाठी आदर्श असे झालात 8 कारण तुमच्याकडून गाजविण्यात आलेला संदेश केवळ मासेदिनिया आणि अखियातच ऐकला गेला असे नाही तर तुमचा देवावरील विश्वास सगळीकडे माहीत झाला आहे. म्हणून आम्हांला काही सांगण्याची गरज नाही. 9 कारण ते स्वतःच आमच्याविषयी सांगत आहेत म्हणजे कशा प्रकारे तुम्ही आमचे स्वागत केले तसेच तुम्ही मूर्तिपासून देवाकडे कसे वळलात व खऱ्या आणि जिवंत देवाची सेवा करण्यासाठी कसे वळलात. 10 आणि आता ज्याला देवाने मेलेल्यांतून उठविले त्या त्याच्या स्वर्गातून येणाऱ्या पुत्राची तुम्ही वाट पाहत आहात. तोच येशू देवाच्या येणाऱ्या क्रोधापासून आपले रक्षण करतो.
2006 by World Bible Translation Center