M’Cheyne Bible Reading Plan
आज्ञापटाचा कोश
37 मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा एक पवित्र कोश (पेटी) बनविला; तो पंचेचाळीस इंच लांब, सत्तावीस इंच रुंद व सत्तावीस इंच उंच होता. 2 त्याने तो आतून बाहेरून शुद्ध सोन्याने मढविला आणि त्याच्या सभोवती सोन्याचा काठ केला. 3 त्याने सोन्याच्या चार कड्या केल्या व त्या चारी कोपऱ्यांना लावल्या पेटी उचलून नेण्यासाठी त्यांचा उपयोग झाला प्रत्येक बाजूला दोन कड्या होत्या. 4 मग कोश वाहून नेण्याकरता त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करुन ते शुद्ध सोन्याने मढविले. 5 ते दांडे कोशाच्या दोन्ही बाजूंच्या कड्यात घातले. 6 नंतर त्याने शुद्ध सोन्याचे दयासन बनविले; ते पंचेचाळीस इंच लांब व सत्तावीस इंच रुंद होते. 7 मग त्याने सोने घडवून दयासनाच्या दोन्ही टोकासाठी दोन करुब दूत बनविले. 8 त्याने एक करूब दूत एका टोकासाठी व दुसरा करूब दूत दुसऱ्या टोकासाठी बनवून असे जडविले की करुब दूत व दयासन हे सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यापासून बनविलेले दिसू लागले 9 करुबांचे पंख वर आकाशाकडे पसरवलेले होते व त्या पंखांनी दयासन झाकले होते; करुब दूतांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली होती.
पवित्र (विशेष) मेज
10 त्याने बाभळीच्या लाकडाचे मेज बनविले, ते छत्तीस इंच लांब, अठरा इंच रुंद व सत्तावीस इंच उंच होते. 11 त्याने ते शुद्ध सोन्याने मढविले व त्याच्या सभोवती सोन्याचा काठ केला; 12 आणि त्याने त्याच्यासाठी तीन इंच रुंदीची एक पाळ केली व त्या पाळीस सभोवती सोन्याचा काठ केला. 13 त्याच्यासाठी सोन्याच्या चार गोल कड्या करुन त्याच्या पायावरच्या चार कोपऱ्यांना त्या लावल्या. 14 ह्या गोल कड्या त्या पाळीजवळ ठेवल्या, त्या मेज उचलावयाच्या दांड्यासाठी होत्या. 15 मग मेज उचलण्यासाठी त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढविले; 16 नंतर त्याने मेजावरची पात्रे म्हणजे तबके, चमचे, धूपपात्रे व पेयार्पणे ओतण्यासाठी कटोरे व सुरया ही सर्व शुद्ध सोन्याची बनविली.
दीपवृक्ष
17 मग त्याने शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनविला; हा दीपवृक्ष त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या फुलासारख्या वाट्या, त्याच्या कव्व्या व पाकव्व्या ही सर्व एकाच अखंड तुकड्याची घडविली. 18 त्या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा होत्या. 19 प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलासारख्या तीन तीन वाट्या, कव्व्या व पाकव्व्यासहित होत्या. 20 दीपवृक्षाच्या दांड्याला आणखी चार, बदामाच्या फुलांसारखी फुले, कव्व्या पाकव्व्या होत्या. 21 ह्या दीपवृक्षावर दांड्याच्या एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा होत्या; जेथे शाखा मुख्य दांड्याला जोडलेली होती त्या प्रत्येक जोडाखाली कव्व्या व पाकव्व्यासहित एक फूल होते. 22 शाखा व फूले असलेला हा संपूर्ण दीपवृक्ष शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यातून घडविलेला होता. 23 ह्या दीपावृक्षावर त्याने सात दिवे बनविले; मग त्याने दिवे मालवण्याचे चिमटे व त्यांच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची बनविली. 24 हा दीपवृक्ष व त्याच्या बरोबरची सर्व उपकरणे एक किक्कार म्हणजे सुमारे चौतीस किलोग्रम शुद्ध सोन्याची त्याने बनविली.
धूप जाळावयाची वेदी
25 मग त्याने बाभळीच्या लाकडाची एक चौरस वेदी केली; ती अठरा इंच लांब, अठरा इंच रुंद व छत्तीस इंच उंच होती; वेदीवर प्रत्येक कोपऱ्याला एक याप्रमाणे चार शिंगे होती. ती वेदीला अशी जोडली होती की वेदी व शिंगे एका अखंड तुकड्याची बनविलेली दिसत होती. 26 त्याने त्या वेदीचा वरचा भाग, तिच्या चारही बाजू व तिची शिंगे सोन्याने मढविली व तिला सभोवती सोन्याचा काठ केला; 27 त्या काठाच्याखाली तिच्या दोन्ही बाजूस, त्याने वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालण्याकरता सोन्याच्या दोन दोन गोल कड्या केल्या. 28 त्याने बाभळीच्या लोकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढविले.
29 नंतर त्याने अभिषेकाचे पवित्र तेल तसेच सुगंधी शुद्ध धूप सुंगधीलोक बनवितात त्या प्रमाणे बनविला.
16 “मी हे सर्व तुम्हांला सांगितले आहे ते यासाठी की, तुम्ही माझ्यावरील विश्वासविषयी भुलविले जाऊ नये. 2 ते तुम्हांला सभास्थानाच्या बाहेर काढतील; खरे पाहता अशी वेळ येत आहे की, जो कोणी तुमचा जीव घेईल त्याला वाटेल की, आपण देवाची सेवाच करीत आहोत. 3 आणि ते तुम्हांला असे जरूर करतील कारण त्यांना पिता किंवा मी माहीत नाही. 4 मी तुम्हांला आता या गोष्टी सांगितल्या आहेत, म्हणून या गोष्टी घडण्याची वेळ येईल.
पवित्र आत्म्याचे कार्य
“तेव्हा मी तुम्हांला त्यांच्यविषयी सावध केले होते हे तुमच्या लक्षात येईल. 5 परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडे आता मी जातो. ‘तरी तू कोठे जातोस’ असे तुम्हांतील कोणी मला विचारीत नाही. 6 पण या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या आहेत म्हणून तुमचे अंतःकरण दु:खाने भरले आहे. 7 तरी तुम्हांस खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या हिताचे आहे कारण मी गेलो नाही तर साहाय्यकर्ता तुमच्याकडे येणार नाही. पण जर मी गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन.
8 “आणि तो येऊन पाप, धार्मिकता आणि न्याय याविषयी जग दोषी आहे हे सिद्य करील. 9 मी पापाविषयी सांगितले तर, लोक माझ्यावर विश्वास ठेवीत नाहीत. साहाय्यकर्ता (पवित्र आत्मा) त्यांना त्यांची जाणीव करून देईल 10 नीतिमत्वाविषयी मी पित्याकडे जात आहे. मी देवाशी प्रामाणिक असण्याचे तो साहाय्यकर्ता (पवित्र आत्मा) त्यांना पटवून देईल 11 हा साहाय्यकर्ता जगाला न्यायाचे सत्य पटवून देईल. कारण या जगाच्या अधिपतीचा (सैतान) न्याय होऊन चुकला आहे.
12 “मला आणखी पुष्कळ सांगावयाचे आहे. तुम्हांला झेपणार नाही इतके सांगायचे आहे. 13 पण जेव्हा तो सत्याचा आत्मा येतो, तेव्हा तो तुम्हांला सर्व सत्यात मार्गदर्शन करील, तो त्याचे स्वतःचे असे काही बोलणार नाही, तो जे ऐकतो तेच तो बोलेल, आणि जे अजून यावयाचे आहे, त्याविषयी तो तुम्हांला सांगेल. 14 जे माझे आहे त्यातून घेऊन आणि ते तुम्हांला कळवून तो माझे गौरव करील. 15 जे सर्व पित्याचे आहे, ते माझे आहे. या कारणासाठीच मी म्हणालो, की आत्मा जे माझे आहे त्यातून घेईल आणि ते तुम्हांला कळवील.
दु:ख आनंदामध्ये बदलेल
16 “थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही, नंतर थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.”
17 त्याच्या शिष्यांतील काही जण एकमेकांस म्हणाले, “तो असे म्हणतो याचा अर्थ काय? थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही. मग थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. कारण मी पित्याकडे जात आहे!” 18 ते विचारतच राहिले, “‘थोड्या वेळाने याचा अर्थ काय?’ तो काय म्हणत आहे हे आम्हांला समजत नाही.”
19 येशूने पाहिले की, याविषयी त्यांना काही विचारायचे आहे. म्हणून तो त्यांना म्हणाला, “तुम्ही एकमेकांना हे विचारीत आहात काय की, जेव्हा मी म्हणालो, ‘थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही, आणि मग थोडया वेळाने तुम्ही मला पाहाल?’ 20 मी तुम्हांला खरे सांगतो. जग आनंद करीत असताना तुम्ही रडाल आणि शोक कराल, तुम्ही दु:खी व्हाल, पण तुमचे दु:ख आनंदात बदलेल.
21 “जन्म देणाऱ्या स्त्रीला वेदना होतात कारण तिची वेळ आलेली असते. पण जेव्हा बाळ जन्मते तेव्हा ती सर्व वेदना विसरते. कारण एक बाळ या जगात जन्म घेते. 22 त्याप्रमाणे तुम्हाला आता खरोखर दु:ख आहे, पण मी तुम्हांला पुन्हा भेटेन, आणि तुम्ही आनंद कराल आणि कोणीही तुमचा आनंद हिरावून घेणार नाही. 23 त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे काही मागणार नाही, मी खरे सांगतो. माझ्या नावाने जे काही तुम्ही मागाल ते माझा पिता तुम्हांला देईल. 24 आतापर्यंत तुम्ही माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल आणि तुमचा आनंद परिपूर्ण होईल.
जगावर विजय
25 “जरी मी तुम्हांला रूपकाच्या भाषेत या गोष्टी सांगितल्या आहेत, तरी मी आणखी अशा प्रकारची भाषा बोलणार नाही, पण साधेपणाने पित्याविषयी तुम्हांला सांगेन. 26 त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल, आणि मी तुमच्यासाठी पित्याकडे विनंति करीन असे मी म्हणत नाही. 27 कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीति करतो कारण तुम्ही माझ्यावर प्रीति केली व माझ्यावर विश्वास ठेवला की, मी देवापासून आलो. 28 मी पित्यापासून आलो आणि जगात प्रवेशलो आणि आता मी जग सोडत आहे, आणि पित्याकडे पुन्हा जात आहे.”
29 मग येशूचे शिष्य म्हणाले, “आता तुम्ही स्पष्टपणे बोलत आहात आणि रूपकाची भाषा वापरीत नाही. 30 आता आम्हांला पक्के समजले की, तुम्हांला सर्व माहीत आहे. आणि तुम्हाला कोणी प्रश्न विचारण्याचीसुद्वा आवश्यकता नाही, यामुळे आमचा विश्वास बसतो की, आपण देवापासून आला आहात.”
31 येशूने उत्तर दिले, “आता तुम्ही विश्वास धरू लागला काय? 32 पण अशी वेळ येत आहे आणि आली आहे, जेव्हा तुमची पांगापांग होईल. प्रत्येक जण त्याच्या घरी जाईल. तुम्ही मला एकटेच सोडाल, तरीही मी एकटा नाही कारण माझा पिता मजबरोबर आहे.”
33 “मी तुम्हांला या गोष्टी सांगितल्या आहेत. यासाठी की माझ्यामध्ये तुम्हांला शांति मिळावी, या जगात तुम्हांला त्रास होईल, पण धीर धरा! मी जगावर मात केली आहे.”
13 शहाण्या माणसाला त्याचे वडील काही सांगत असले तर तो लक्षपूर्वक ऐकतो. पण अभिमानी माणूस लोक त्याला योग्य ते सांगायला लागले तर तो ते ऐकत नाही.
2 चांगल्या माणसांना चांगले बोलल्याबद्दल फळ मिळते. पण दुष्ट माणसांना नेहमी चुकाच करायच्या असतात.
3 जो माणूस आपल्या बोलण्याबद्दल काळजी घेतो तो त्याचा जीव वाचवतो. पण जो विचार न करता बोलतो त्याचा नाश होतो.
4 आळशी माणसाला गोष्टी हव्या असतात पण त्या त्याला कधीही मिळणार नाहीत. पणे ते खूप कष्ट करतात त्यांना हव्या असलेल्या गोष्टी मिळतील.
5 चांगले लोक खोट्याचा तिरस्कार करतात. दुष्टांना लाज वाटायला लावली जाईल.
6 चांगुलपण चांगल्या, इमानी माणसाचे रक्षण करतो. पण ज्या माणसाला पाप करायला आवडते त्याचा दुष्टपणा नाश करतो.
7 काही लोक श्रीमंतीचा आव आणतात पण त्यांच्या जवळ मात्र काहीच नसते. दुसरे लोक आपण गरीब आहोत असे भासवतात पण ते खरोखरच श्रीमंत असतात.
8 श्रीमंत माणसाला जीव वाचवण्यासाठी पैसे मोजावे लागतात पण गरीबांना अशा धमक्या कधीच मिळत नाहीत.
9 चांगला माणूस हा दैदीप्यमान दिव्यासारखा असतो. पण दुष्ट माणूस चटकन् विझणाऱ्या दिव्यासारखा असतो.
10 जे लोक स्वतःला इतरांपेक्षा शहाणे समजतात ते संकटे ओढवून घेतात. पण जे लोक दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून घेतात ते शहाणे असतात.
11 जर एखादा माणूस पैसे मिळवण्यासाठी फसवाफसवी करील तर त्याचे पैसे लवकरच जातील. पण जो माणूस कष्ट करुन पैसे मिळवतो त्याचे पैसे वाढतात.
12 आशा नसली की ह्रदय दु:खी असते. तुम्हाला हवी असलेली गोष्ट मिळाली की तुम्हाला खूप आनंद होतो.
13 जर एखाद्या माणसाने इतर लोक त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत असतील तेव्हा त्यांचे ऐकले नाही तर त्याच्यावर संकटे येतील पण जो माणूस दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा मान राखतो त्याला त्याचे फळ मिळते.
14 शहाण्या माणसाची शिकवण आयुष्य देते. ते शब्द तुम्हाला मृत्यूचा फास चुकवायला मदत करतील.
15 लोकांना चांगली अक्कल असलेला माणूस आवडतो. पण ज्या माणसावर विश्वास टाकणे शक्य नसते त्याचे आयुष्य कठीण असते.
16 शहाणा माणूस कृती करण्याआधी विचार करतो. परंतु मूर्ख माणूस त्याच्या कृतीने तो मूर्ख आहे हे दर्शवितो.
17 जर दूतावर विश्वास ठेवणे शक्य नसेल तर त्याच्याभोवती संकटे येतील. पण जर माणसावर विश्वास ठेवणे शक्य झाले तर तिथे शांती नांदेल.
18 जर एखाद्याने त्याच्या चुकांपासून शिकायला नकार दिला तर तो गरीब आणि लाज वाटणारा होईल. पण जर एखाद्याने त्याच्या वरील टीकेकडे लक्ष दिले तर त्याला त्याचा फायदा होईल.
19 जर एखाद्या माणसाला काही हवे असले आणि नंतर ते त्याला मिळाले तर त्याला खूप आनंद होईल. पण मूर्खांना फक्त दुष्टावा हवा असतो. ते बदलायला तयार नसतात.
20 शहाण्या लोकांशी मैत्री करा म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल. पण जर तुम्ही मूर्खांशी मैत्री केली तर तुम्ही संकटात सापडाल.
21 पापी जिथे जातील तिथे संकटे त्यांचा पाठलाग करतात. पण चांगल्या माणसांच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतात.
22 चांगल्या माणसाकडे त्याच्या मुलांना आणि नातवंडांना द्यायला संपत्ती असेल. आणि शेवटी चांगल्या माणसाला दुष्ट लोकांकडचे सर्व काही मिळेल.
23 गरीब माणसाकडे खूप धान्य पिकवणारी चांगली जमीन असू शकते. पण तो वाईट निर्णय घेतो आणि उपाशी राहातो.
24 जर एखाद्याचे आपल्या मुलांवर खरोखच प्रेम असेल तर तो त्यांचे चुकल्यावर त्यांना काठीने मारायलाही कमी करणार नाही. ते चुकीने वागल्यावर तो त्यांना शिस्त लावेल. जर तुमचे तुमच्या मुलावर प्रेम असेल तर तुम्ही त्याला योग्य वेळी काळजीपूर्वक शिकवाल.
25 चांगल्या लोकांना समाधान होईपर्यंत खायला मिळेल. चांगल्या लोकांना त्यांना हव्या असलेल्या गोष्टी खरोखरच मिळतील. पण दुष्ट लोकांचे पोट रिकामेच राहील. दुष्ट लोकांना महत्वाच्या गोष्टींशिवाय राहावे लागेल.
मुले आणि आईवडील
6 मुलांनो, प्रभूशी प्रामणिक राहून आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळा. कारण ते योग्य आहे. 2 “तुझ्या वडिलाचा व आईचा मान राख.” [a] 3 अभिवचनाबरोबरची ही पहिली आज्ञा असल्याने, “तुझ्यासाठी सर्व काही चांगले असावे आणि पृथ्वीवर तुला दीर्घ आयुष्य लाभावे.” [b]
4 आणि वडिलांनो, आपल्या मुलांना राग येईल असे करु नका. उलट, देवापासून जी माहिती व शिक्षण येते त्यान त्यांना वाढवा.
गुलाम आणि मालक
5 गुलामांनो, तुमच्या पृथ्वीवरील मालकांची आज्ञा आदराने, थरथर कांपत, आणि तुमच्या अंतःकरणाच्या प्रामाणिकतेने पाळा. ज्याप्रमाणे तुम्ही ख्रिस्ताची आज्ञा पाळता तशी पाळा. 6 जेव्हा माणसे तुमच्याकडे पाहत असतील तेव्हाच फक्त काम करु नका. मनुष्याला पसंत पडावे यासाठी प्रयत्न करु नका. उलट ख्रिस्ताच्या गुलामासारखे काम करा, कारण (ख्रिस्ताचे गुलाम) देवाची इच्छा आपल्या अंतःकारणापासून पूर्ण करतात. 7 गुलाम म्हणून उत्साहाने जणू काय माणसांची नव्हे, तर प्रभुची सेवा करीत आहात, असे काम करा. 8 लक्षात ठेवा की, तुम्हांतील प्रत्येकजण जर काही चांगले करतो तर तो गुलाम असो किंवा स्वतंत्र असो, ते त्याला प्रभूकडून परत मिळेल.
9 आणि मालकांनो, तुम्हीही त्यांच्याशी तसेच वागा आणि धमकाविण्याचे सोडून द्या. लक्षात ठेवा की तुमचा आणि त्यांचा धनी स्वर्गात आहे. आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही.
देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा
10 शेवटी, प्रभूमध्ये तुम्ही त्याच्या महान शक्तीसामर्थ्याने सशक्त व्हा. 11 देवाने दिलेले संपूर्ण चिलखत धारण करा. यासाठी की तुम्हांला सैतानाच्या दुष्ट योजनांविरुद्ध उभे राहता यावे. 12 कारण आपले झगडणे, रक्तमांसाबरोबर नाही, तर सताधीशांविरुद्ध, अधिकान्याविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या सामर्थ्याबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्यांविरुद्ध आहे. 13 म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्रसामग्री घ्या. म्हणजे तुम्हाला सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल व वाईट दिवस आल्यावर तुम्हाला प्रतिकार करता येईल.
14 म्हणून भक्क मपणे उभे राहा! सत्याने आपली कंबर बांधा, नीतीमत्त्वाचे उररत्राण धारण करा. 15 आणि सुवार्ता व शांती यांची घोषणा करण्यासाठी सज्जतेच्या वहाणा पायी घाला. 16 या सर्व गोष्टींबरोबर ढाल म्हणून विश्वास घ्या. ज्यामुळे त्या दुष्टाने मारलेले सर्व जळते बाण तुम्हांला विझविणे शक्य होईल. 17 आणि तारणाचे शिररत्राण घ्या, आणि आत्म्याची तलवार जो देवाचा संदेश आहे, तो घ्या. 18 प्रत्येक प्रंसांगी सर्व प्रकारे प्रार्थनापूर्वक विनंति करुन आत्म्यात प्रार्थना करा. चिकाटी व प्रार्थनेसह सर्व संतांसाठी प्रार्थना करीत जागृत राहा.
19 आणि माझ्यासाठी प्रार्थना करीत राहा. कारण जेव्हा मी तोंड उघडेन तेव्हा मला संदेश प्राप्त व्हावा. यासाठी की धैर्याने मला सुवार्तेचे रहस्य माहीत करुन देणे शक्य व्हावे. 20 त्याच्या वतीने मी साखळदंडनी बांधलेला राजदूत म्हणून सेवा करीत आहे. धैर्याने मला ती सांगता यावी म्हणून प्रार्थना करा.
शेवटच्या शुभेच्छा
21 यासाठी तुम्हाला हे कळावे की मी कसा आहे आणि काय करीत आहे, म्हणून तुखिक तुम्हांला सर्व काही सांगेल. तो आमचा प्रिय भाऊ आणि प्रभूमध्ये विश्वासू सेवक आहे. 22 मी त्याला केवळ या कारणासाठीच तुमच्याकडे पाठवीत आहे की माझ्याविषयीचे वर्तमान तुम्हांला कळावे आणि तुमच्या अंतःकरणाचे समाधान व्हावे.
23 देवपिता आणि प्रभु येशू ख्रिस्तापासून आता बंधु बहिणींना विश्वासासह प्रीति आणि शांति लाभो. 24 जे सर्व जण आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावर अविनाशी प्रीति करतात, त्या सर्वाबरोबर देवाची कृपा असो.
2006 by World Bible Translation Center