M’Cheyne Bible Reading Plan
“मी तुमच्या बरोबर येणार नाही”
33 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आणि तुझ्या बरोबर मिसर देशातून तू आणलेले लोक, तुम्ही येथून पुढच्या प्रवासास निघा; आणि जो देश मी तुझ्या संततीला देईन अशी मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना शपथ वाहिली होती त्या देशाला तुम्ही जा. 2 तुमच्यापुढे चालण्यास मी माझ्या दूताला पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी लोकांचा मी पराभव करीन व त्यांना तुमचा देश सोडावयास भाग पाडीन. 3 तेव्हा तुम्ही दुधामधाच्या देशास जा; मी तुमच्याबरोबर येणार नाही कारण तुम्ही फार ताठमानेचे लोक आहात जर मी तुमच्या बरोबर आलो तर तुम्ही मला रागाला आणाल. कदाचित मी जर मी आलो तर रस्त्यातच तुम्हाला नष्ट करीन.”
4 ही वाईट बातमी ऐकल्यावर लोक फार दु:खी झाले आणि त्यानंतर कोणीही आपल्या अंगावर दागदागिने घातले नाहीत; 5 कारण परमेश्वर मोशेला म्हणला, “तू इस्राएल लोकांस असे सांग, ‘तुम्ही फार ताठमानेचे लोक आहात; मी तुमच्या बरोबर थोडा वेळ जरी प्रवास केला तरी मी तुम्हाला नष्ट करीन; म्हणून तुम्ही तुमचे दागदागिने काढून ठेवा; मग तुमचे काय करावयाचे ते मी ठरवीन.’” 6 म्हणून होरेब पर्वतापासून (सीनाय पर्वतापासून) पुढे इस्राएल लोकांनी दागदागिने घालणे बंद केले.
दर्शन मंडप
7 मोशे छावणी बाहेर बऱ्याच अंतरावर तंबू लावत असे. मोशेने त्याला “दर्शन मंडप” असे नांव दिले होते; ज्या कोणाला परमेश्वराला काही विचारावयाचे असेल तो छावणीबाहेरील दर्शन मंडपाकडे जाई. 8 ज्या ज्या वेळी मोशे छावणीतून दर्शन मंडपाकडे जाई त्या त्यावेळी सर्व लोक आपापल्या तंबूच्या दारात उभे राहात आणि मोशे दर्शन मंडपात जाईपर्यत त्याला बघत. 9 जेव्हा मोशे तंबूत जाई तेव्हा उंच ढग खाली उतरून येई आणि दर्शन मंडपाच्या दारापाशी तो उभा राही; ह्याप्रमाणे परमेश्वर मोशेशी बोलत असे. 10 जेव्हा लोक दर्शन मंडपाच्या दारात ढग बघत तेव्हा ते आपापल्या तंबूच्या दारात उभे राहून देवाला नमन करीत.
11 ज्याप्रमाणे एखादा माणूस आपल्या मित्राशी बोलतो त्याप्रमाणे परमेश्वर मोशेबरोबर समोरासमोरबोलत असे. परमेश्वराशी बोलल्यानंतर मोशे नेहमीआपल्या छावणीत माघारी जाई तरी मोशेचा मदतनीस. नूनाचा मुलगा यहोशवा हा तरुण मंडप सोडून बाहेर येत नसे.
मोशे परमेश्वराचे तेज पाहातो
12 मोशे परमेश्वराला म्हणाला, “ह्या लोकांना घेऊन जाण्यास तू मला सांगितलेस, परंतु तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार ते तू सांगितले नाहीस; तू मला म्हणालास, ‘मी तुला तुझ्या नांवाने ओळखतो आणि तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.’ 13 जर मी तुला खरोखर संतोष दिला असेल तर तू मला तुझे मार्ग शिकव. तुला जाणून घेण्याची माझी इच्छा आहे मग तुला सतत संतोष देणे मला जमेल. हे सर्व लोक तुझे आहेत याची तू आठवण ठेव.”
14 परमेश्वराने उत्तर दिले, “मी स्वतः तुझ्या बरोबर येईन व तुला विसावा देईन.”
15 मग मोशे परमेश्वराला म्हणाला, “जर तू आमच्याबरोबर येणार नाहीस तर मग आम्हाला या ठिकाणापासून पुढे पाठवू नकोस. 16 तसेच तू माझ्या विषयी व लोकांविषयी संतुष्ट आहेस ते आम्हाला कसे कळेल? जर तू आमच्याबरोबर येशील तर मग मात्र आम्हाला खातरीने कळेल! जर तू आमच्याबरोबर येणार नाहीस तर मग मी व हे लोक त्यांच्यात आणि पृथ्वीवरल कोणत्याही लोकात काही फरक राहणार नाही.”
17 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मागतोस त्याप्रमाणे मी करीन, कारण मी तुजवर संतुष्ट आहे आणि मी तुला तुझ्या नांवाने ओळखतो.”
18 नंतर मोशे म्हणाला, “आता कृपा करून मला तुझे तेज दाखव.”
19 मग परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; मी परमेश्वर आहे आणि हे माझे नांव मी जाहीर करीन म्हणजे तू ते ऐकशील कारण मी निवडलेल्या कोणावरही दया करीन व त्यांच्यावर प्रेम करीन. 20 परंतु तू माझा चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण माझा चेहरा पाहिलेला कोणीही माणूस जगणार नाही.
21 “माझ्याजवळ ह्या ठिकाणी एक खडक आहे; तू त्यावर उभा राहा. 22 माझे तेज त्या जागेजवळून पुढे जाईल तेव्हा मी तुला त्या खडकातील मोठ्या भेगेत ठेवीन; आणि मी निघून जाईपर्यत माझ्या हाताने तुला झाकीन; 23 नंतर मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठपाहाशील; परंतु तू माझा चेहरा पाहाणार नाहीस.”
येशू आपल्या मित्रांबरोबर बेथानी येथे(A)
12 मग येशू वल्हांडण सणाच्या अगोदर सहा दिवस असताना बेथानीस आला. येशूने ज्याला मेलेल्यातून उठविले होते तो लाजर तेथे होता. 2 म्हणून तेथे त्यांनी त्याच्यासाठी संध्याकाळचे भोजन आयोजित केले. मार्था जेवण वाढत होती आणि लाजर त्यांच्याबरोबर जेवायला बसला होता. 3 तेव्हा मरीयेने अर्धा किलो शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या पायावर ओतले व आपल्या केसाने त्याचे पाय पुसले व सर्व घर त्या सुवासाने भरले.
4 पण त्याच्या शिष्यांपैकी एक, यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर त्याचा विश्वासघात केला होता, त्याने विरोध केला. म्हणून तो म्हणाला, 5 “हे सुगंधी द्रव्य विकून आलेले पैसे गरिबांना का देण्यात आले नाहीत? ते तेल चांदीच्या तीनशे रुपयाच्या किमतीचे होते.” 6 गरिबांचा कळवळा आला म्हणून त्याने असे म्हटले नाही, तर तो चोर होता आणि त्याच्याजवळ पेटी होती व तिच्यात जे पैसे टाकण्यात येत, ते तो चोरून घेई म्हणून तो असे म्हणाला.
7 “तिला एकटे सोडा,” येशूने उत्तर दिले, “मला पुरण्याच्या दिवसासाठी ते तेल राखून ठेवण्यात आले. 8 तुमच्यात गरीब नेहमीच असतील, पण मी तुमच्यात नेहमी असणार नाही.”
लाजराविरुद्ध कट
9 मग तो तेथे आहे हे यहूदीयांतील बऱ्याच जणांना कळले. तेव्हा फक्त येशूसाठीच नव्हे तर ज्याला त्याने मेलेल्यातून उठविले होते त्या लाजराला पाहावे म्हणून ते आले. 10 तेव्हा मुख्य याजकांनी लाजराला मारण्याचा कट केला. 11 कारण त्याच्यामुळे पुष्कळ लोक येशूकडे जात होते व त्याच्यावर विश्वास ठेवीत होते.
येशू यरुशलेमात प्रवेश करतो(B)
12 दुसऱ्या दिवशी सणासाठी आलेल्या मोठ्या जमावाने ऐकले की येशू यरुशलेमकडे येत आहे. 13 त्यांनी खजुरीच्या झाडाच्या फांद्या घेतल्या आणि त्याला भेटण्यास गेले. ते ओरडून जयघोष करीत होते.
“‘होसान्ना!’
‘प्रभूच्या नावाने येणारा धन्यावदित असो!’ (C)
इस्राएलचा राजा धन्यवादित असो!”
14 येशूला एक शिंगरु दिसले त्यावर तो बसला. आणि संदेष्ट्यांनी लिहिल्याप्रमाणे हे झाले. ते असे:
15 “सीयोनेच्या कन्ये, भिऊ नको;
पहा, तुझा राजा येत आहे;
गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.” (D)
16 सुरवातीला शिष्यांना या गोष्टी समजल्या नाहीत पण येशूचे गौरव झाल्यावर त्यांना जाणीव झाली की, त्याच्याविषयी या गोष्टी लिहिल्या होत्या आणि त्यांनी या गोष्टी त्याच्यासाठी केल्या.
17 मग जो जमाव त्याने लाजरला कबरेतून आणलेले व मरणातून उठविलेले पाहत होता तो जमाव सातत्याने त्याच्याविषयी सांगत होता. 18 पुष्कळ लोक त्याला जाऊन भेटले कारण त्याने तो चमत्कार केला होते हे त्यांनी ऐकले होते. 19 म्हणून परुशी एकमेकांस म्हणाले, “पहा, याच्यापुढे आपले काही चालत नाही. सगळे जग त्याच्यामागे चालले आहे!”
येशू जीवन आणि मरण याविषयी बोलतो
20 आता सणाच्या वेळी उपासनेसाठी जे लोक वर गेले होते त्यांच्यात काही ग्रीक होते. 21 ते फिलिप्पाकडे आले, जो गालीलातील बेथसैदा येथील होता, त्यांनी विनंति केली, “महाराज, येशूला पाहावे अशी आमची इच्छा आहे.” 22 फिलिप्प अंद्रियाकडे हे सांगण्यास गेला; नंतर अंद्रिया व फिलिप्प यांनी येशूला सांगितले.
23 येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. 24 मी तुम्हांला खरे सांगतो, गव्हाचा दाणा भूमीत पडून मेला नाही, तर एकटाच राहतो, पण तो मेला तर पुष्कळ फळ देतो. 25 जो आपल्या जिवावर प्रीति करतो तो त्याला गमावेल पण जो या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो तो त्याला अनंतकाळाच्या जीवनासाठी राखील. 26 जो कोणी माझी सेवा करतो त्याने मला अनुसरले पाहिजे. जेथे मी असेन तेथे माझे सेवकही असतील. जो माझी सेवा करतो त्याचा सन्मान माझा पिता करील.”
येशू त्याच्या मरणाविषयी बोलतो
27 “माझे अंतःकरण व्याकूळ झाले आहे. आणि मी आता काय सांगू? ‘पित्या माझी या घटकेपासून सुटका कर?’ केवळ याच कारणासाठी या वेळेला मी आलो. 28 पित्या, तुझे गौरव कर!”
तेव्हा आकाशातून वाणी झाली की, “मी त्याचे गौरव केले आहे व पुन्हाही त्याचे गौरव करीन.”
29 जो जमाव तेथे होता त्याने हे ऐकले व म्हटले, “गडगडाट झाला.”
दुसरे म्हणाले, “देवदूत त्याच्याशी बोलला.”
30 येशू म्हणाला, “हा आवाज तुमच्यासाठी होता. माझ्यासाठी नव्हे. 31 या जगाचा न्याय होण्याची आता वेळ आली आहे. या जगाच्या राजकुमारला हाकलून देण्यात येईल. 32 परंतु मी, जेव्हा पृथ्वीपासून वर उचलला जाईन, तेव्हा मी सर्व लोकांना माझ्याकडे ओढीन.” 33 त्याने हे यासाठी म्हटले की कोणत्या प्रकारच्या मरणाने तो मरणार आहे हे त्याला दाखवायचे होते.
34 जमाव म्हणाला, “ख्रिस्त सर्वकाळ राहतो असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे तुम्ही का म्हणता? मनुष्याचा पुत्र कोण आहे?”
35 मग येशू त्यांना म्हणाला. “आणखी थोडा वेळ प्रकाश तुमच्यामध्ये असणार आहे. तुमच्यामध्ये प्रकाश आहे तोपर्यंत तुम्ही चाला. यासाठी की अंधाराने तुमच्यावर मात करु नये. कारण जो अंधारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही. 36 तुम्ही प्रकाशाची मुले व्हावे म्हणून तुम्हांला प्रकाश आहे तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवा.” येशू या गोष्टी बोलला, मग तो निघून गेला. आणि त्यांच्यापासून गुप्त राहिला.
यहूदी येशूवर विश्वास ठेवण्याचे नाकारतात
37 येशूने इतके चमत्कार त्यांच्यासमोर केलेले असतानाही ते त्याच्यावर विश्वास ठेवीनात. 38 यासाठी की, यशया संदेष्ट्याचे वचन पूर्ण व्हावे:
“प्रभु, आमच्या संदेशावर कोणी विश्वास ठेवला आहे.
आणि प्रभूचा हस्तप्रताप कोणास प्रगट झाला आहे?” (E)
39 या कारणासाठी त्यांनी विश्वास ठेवला नाही, जसे यशया एके ठिकाणी म्हणतो,
40 “त्यांनी डोळ्यांनी पाहू नये,
व अंतःकरणाने समजू नये,
फिरू नये व मी त्यांना बरे करू नये म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले
आणि त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे.” (F)
41 यशया असे म्हणाला, कारण त्याने त्याचे गौरव पाहिले आणि तो त्याच्याविषयी बोलला.
42 तरीही अधिकाऱ्यातील पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आपणांस सभास्थानाच्या बाहेर घालवू नये म्हणून परुश्यांमुळे त्यांनी हे पत्करले नाही. 43 कारण त्यांना देवाच्या गौरवापेक्षा मनुष्याकडील गौरव अधिक आवडले.
येशूची शिकवण लोकांचा न्याय करील
44 तेव्हा येशू मोठ्याने बोलला, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवतो असे नाही, तर ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो. 45 आणि जो मला पाहतो, तो ज्याने मला पाठविले त्याला पाहतो. 46 मी प्रकाश असा जगात आलो आहे. यासाठी की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये.
47 “आणि जो कोणी माझी वचने ऐकून पाळीत नाही, त्याचा न्याय मी ठरवीत नाही. कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी आलो नाही, तर जगाच्या तारणासाठी आलो आहे. 48 जो माझा स्वीकार करीत नाही व माझ्या वचनाप्रमाणे वागत नाही त्याचा न्याय करणारा कोणी एक आहे, जे वचन मी बोललो तेच शेवटच्या दिवशी त्याचा न्याय करील. 49 कारण मी स्वतःहून बोललो असे नाही तर मी काय सांगावे व काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठविले, त्यानेच मला आज्ञा केली आहे. 50 आणि त्याची आज्ञा अनंतकाळचे जीवन आहे. हे मला ठाऊक आहे, म्हणून जे काही मी बोलतो ते जसे पित्याने मला सांगितले तसेच बोलतो.”
ज्ञानरुपी स्त्री आणि मूर्खता
9 ज्ञानरुपी स्त्रीने आपले घर बांधले, त्यात तिने सात खांब [a] ठेवले. 2 तिने (ज्ञानरुपी स्त्रीने) मांस शिजवले आणि द्राक्षारस तयार केला. तिने अन्न तिच्या टेबलावर ठेवले. 3 नंतर तिने आपल्या नोकरांकरवी शहरातील लोकांना तिच्याबरोबर टेकडीवर भोजन करण्यासाठी येण्याचे आमंत्रण पाठविले. ती म्हणाली, 4 “ज्या लोकांना शिकण्याची आवश्यकता वाटते त्यांनी यावे.” तिने मूर्ख लोकांनाही बोलावले. ती म्हणाली, 5 “या माझ्या ज्ञानाचे अन्न खा. आणि मी तयार केलेला द्राक्षारस प्या. 6 तुमचे जुने, मूर्खपणाचे मार्ग सोडून द्या. मग तुम्हाला आयुष्य मिळेल. समजूतदारपणाचा मार्ग अनुसरा.”
7 जर तुम्ही गर्विष्ठ माणसाला तो चुकत आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला तर तो तुमच्यावर केवळ टीका करेल. तो माणूस देवाच्या शहाणपणाची चेष्टा करतो. जर तुम्ही दुष्ट माणसाला तो चुकत आहे असे सांगितले तर तो तुमची चेष्टा करेल. 8 म्हणून जर एखादा माणूस तो इतरांपेक्षा चांगला आहे असे म्हणत असेल तर त्याला तो चुकतो आहे असे सांगू नका. तो त्या बद्दल तुमचा तिरस्कार करेल. पण जर तुम्ही शहाण्या माणसाला मदत करण्याचा प्रयत्न केलात तर तो तुमचा आदर करेल. 9 जर तुम्ही शहाण्या माणसाला शिकवलेत तर तो अधिक शहाणा होईल. जर तुम्ही शहाण्या माणसाला शिकवलेत तर तो अधिक शिकेल.
10 परमेश्वराचा आदर करणे ही ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी आहे. परमेश्वराविषयी ज्ञान मिळवणे ही समजूतदारपणा मिळवण्याची पहिली पायरी आहे. 11 जर तुम्ही शहाणे असाल तर तुमचे आयुष्य अधिक वाढेल. 12 जर तुम्ही शहाणे होत असाल तर तुमच्या भल्यासाठीच शहाणे होत असता. पण जर तुम्ही गर्विष्ठ झालात आणि दुसऱ्या लोकांची चेष्टा करु लागलात तर तुमच्यावर येणाऱ्या संकटांबद्दल तुम्हीच जबाबदार ठरता.
13 मूर्ख माणूस हा कर्कश बोलणाऱ्या वाईट स्त्रीसारखा असतो. तिच्याजवळ ज्ञान नसते. 14 ती तिच्या घराच्या दाराजवळ बसते. ती शहारातल्या टेकडीवर तिच्या खुर्चीवर बसते. 15 आणि जेव्हा लोक तिथून जातात तेव्हा ती त्यांना बोलावते. त्या लोकांना तिच्यात काही रस नसतो. तरीही ती म्हणते, 16 “या ज्या लोकांना शिकणे आवश्यक आहे त्यांनी या.” तिने मूर्ख लोकांनाही बोलावले. 17 पण ती (मूर्खता) म्हणते, “जर तुम्ही पाणी चोरले तर ते पाणी तुमच्या पाण्यापेक्षा अधिक चवदार लागते. जर तुम्ही भाकर चोरली तर ती तुम्ही केलेल्या भाकरीपेक्षा अधिक चवदार लागते.” 18 आणि त्या मूर्ख गरीब लोकांना हे माहीत नव्हते की तिचे घर फक्त भूतांनी भरलेले आहे. तिने (मूर्खता) त्यांना मृत्युलोकातल्या अगदी खोल भागात बोलावले होते.
मरणाकडून जीवनाकडे
2 पूर्वी तुम्ही आपले अपराध आणि पातके यांमुळे आध्यात्मिक रीतीने मेला होता. 2 ज्यामध्ये तुम्ही पूर्वी जगत होता, जगातील दुष्ट मार्गाचे अनुकरण करीत होता, आणि आपल्याला न दिसणारे आध्यात्मिक सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्या सताधीशाचे अनुकरण करीत होता. जे देवाच्या आज्ञा पाळीत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये हाच आत्मा कार्य करीत आहे. 3 एके काळी आम्हीसुद्धा त्यांच्यामध्ये आमच्या मानवी देहाच्या दुष्ट इच्छांचे समाधान करीत होतो आणि आमच्या मानवी मनाच्या दुष्ट वासनांची पूर्तंता करीत होतो. तसेच जगातील इतरांप्रमाणेच आम्ही त्याच्या क्रोधाची मुले झालो होतो.
4 पण देव खूप दयाळू आहे. त्याच्या महान प्रीतिने त्याने आमच्यावर प्रेम केले. 5 आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या आमच्या पापांमध्ये मेलेले असतानाच त्याने आम्हांला ख्रिस्ताबरोबर जीवन दिले. (तुमचे तारण देवाच्या कृपने झाले आहे.) 6 देवाने आम्हांला ख्रिस्ताबरोबर नविन जीवनात उठविले आणि स्वर्गाच्या राज्यात त्याच्याबरोबर त्याच्या आसनावर बसविले, कारण आम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहोत. 7 देवाने हे केले यासाठी की, येणाऱ्या युगात त्याच्या अतुलनीय कृपेची संपत्ती दाखविता यावी आणि ख्रिस्त येशूमध्ये आम्हांविषयीची ममता व्यक्त करावी.
8 कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आणि ते तुमच्याकडून झाले नाही, तर ते देवापासूनचे दान असे आहे. 9 आणि एखादा काही काम करतो त्याचा परिणाम म्हणून नव्हे. यासाठी कोणी बढाई मारु नये. 10 कारण आम्ही देवाच्या हाताने घडविलेले आहोत. ख्रिस्तामध्ये आम्हांला चांगल्या कामासाठी निर्माण केले, जे देवाने अगोदरच तयार केले होते. यासाठी की, त्यामध्ये चालणे आम्हांला शक्य व्हावे.
ख्रिस्तामध्ये एक
11 म्हणून, आठवा की एके काळी, तुम्ही यहूदीतर म्हणून जन्मला होता आणि त्यांना (विदेश्यांना) सुंता न झालेले असे, ज्यांची सुंता झालेली होती ते यहूदी लोक म्हणत होते. 12 आठवा की, त्यावेळी तुम्ही ख्रिस्तविरहित, देवाचे लोक जे इस्राएल त्या समाजातून तुम्हाला बहिष्कृत केले होते, आणि देवाच्या अभिवचनाशी निगडित अशा कराराशी तुम्ही परके असे होता, तुम्ही या जगात आशेशिवाय आणि देवाशिवाय जगला. 13 पण आता, ख्रिस्तामध्ये जे तुम्ही एके काळी देवापासून दूर होता, ते तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने त्याच्याजवळ आणलेले आहात.
14 कारण त्याच्याद्वारे आम्हांला शांतीचा लाभ झाला आहे. त्याने दोन्ही गोष्टी एक केल्या आणि आपल्या शरीराने त्याने वैराचा, दुभागणाऱ्या भिंतीचा अडथळा पाडून टाकला. 15 त्याने नियमशास्त्र त्याच्या नीतिनियमांसहित रद्द केले. यासाठी की स्वतःमध्ये दोघांचा एक मानव निर्माण करुन शांति करणे त्याला शक्य व्हावे. 16 आणि त्याच्या वधस्तंभावरील मरणाद्वारे देवाबरोबर एका शरीरात त्या दोघांमध्ये समेट घडवून आणता यावा, ज्यामुळे या दोन गोष्टीतील वैमनस्य संपवता येईल. 17 म्हणून तो आला आणि त्याने जे तुम्ही देवापासून दूर होता व जे तुम्ही देवाजवळ होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली, 18 कारण त्याच्या द्वारे, आम्हा दोघांचा एका आत्म्याच्या द्वारे देवाजवळ प्रवेश होतो.
19 यामुळे, तुम्ही आता परके आणि यहूदीतर नाहीत. तर तुम्ही देवाच्या लोकांबरोबरचे सहनागरिक आणि देवाचे कुटुंबीय आहात. 20 तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे या पायावर बांधलेली इमारत आहा, आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे. 21 संपूर्ण इमारात त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभुमध्ये एक पवित्र मंदिर होण्यासाठी वाढत आहे. 22 त्याच्यामध्ये तुम्हीही इतरांबरोबर आत्म्याच्या द्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र रचले जात आहात.
2006 by World Bible Translation Center