M’Cheyne Bible Reading Plan
दूसरे नियम व आज्ञा
21 मग देव मोशेला म्हणाला, “जे इतर नियम तू इस्राएल लोकांना लावून द्यावेत ते हे:
2 “तुम्ही जर एखादा इस्राएली गुलाम विकत घेतला तर त्याने फक्त सहा वर्षे काम करावे; सहा वर्षानंतर सातव्या वर्षी तो मुक्त होऊन स्वतंत्र होईल; भरपाई म्हणून तो तुझे काही देणे लागणार नाही. 3 जर तो सडा आला असेल तर त्याने मुक्त होताना एकटेच निघून जावे; परंतु जर तो त्याची बायको घेऊन आला असेल तर त्याने त्याच्या बायकोला घेऊन जावे. 4 जर तो सडा आला असेल तर त्याच्या मालकाने त्याला बायको करून द्यावी; तिला मुले किंवा मुली झाल्या असतील तर त्याची बायको व तिची मुलेबाळे मालकाच्या मालकीची राहतील; आपली सेवा पूर्ण करताच त्याला एकट्याला मुक्त केले जाईल.
5 “पण जर कदाचित आपल्या मालकाबरोबर राहाण्याचे तो ठरविल तर मग ‘मी माझ्या मालकावर व माझ्या बायकोमुलांवर प्रेम करतो, मी मुक्त होऊ इच्छित नाही, मी मालकाकडेच राहातो,’ असे त्याने म्हटले पाहिजे. 6 असे झाले तर त्याच्या मालकाने त्याला देवासमोर अथवा न्यायधीशासमोर आणावे; त्याने त्याला दाराजवळ किंवा दरवाजाच्या लाकडी चौकटीजवळ न्यावे आणि अरीच्या अणकुचीदार टोकाने त्याचा कान टोचावा; मग तो गुलाम त्या मालकाची आयुष्यभर चाकरी करील.
7 “एखाद्या माणसाने आपली मुलगी गुलाम म्हणून विकण्याचे ठरविले तर तिच्या मुक्ततेचे नियम पुरुषगुलामाच्या मुक्तते सारखे नाहीत. 8 जर मालक तिच्यावर खूष नसेल तर त्याने तिला परत तिच्या बापाला विकावे; जर त्याने तिच्याबरोबर लग्न करावयाचे कबूल केले असेल तर तिला परक्याला विकण्याचा त्याला अधिकार नाही. 9 तिला आपल्या मुलाशी लग्न करून देण्यासाठी ठेवून घ्यावयाचे असेल तर त्याने तिला गुलामस्त्रीप्रमाणे नव्हे तर मुलीप्रमाणे वागवावे.
10 “मालकाने दुसऱ्या स्त्रीशी लग्न केले तर त्याने पहिल्या बायकोस अन्नवस्त्र कमी पडू देऊ नये तसेच तिला लागणाऱ्या इतर वस्तू देणे व तिच्याशी बायको या नात्याने व्यवहार करणे चालू ठेवावे कारण तसा तिला त्याच्याविरुद्ध हक्क आहे. 11 ह्या तीन गोष्टी त्याने तिच्यासाठी कराव्यात आणि त्या केल्या नाहीत तर मग ती त्याला काही खंडणी न देता मुक्त होईल; ती त्याचे काही देणे लागणार नाही.
12 “कोणी एखाद्याला मारले व त्यामुळे तो मेला तर त्याला अवश्य जिवे मारावे. 13 परंतु जाणूनबुजून न ठरविता, अपघाताने एखाद्याचे हातून कोणी मेले तर देवाने हे घडू दिले असे समजावे. लोक सुराक्षिततेसाठी जाऊ शकतील अशा काही खास जागा मी निवडीन तो माणूस आपल्या सुरक्षिततेसाठी मी निवडलेल्या विशेष ठिकाणापैकी एके जागी पळून जाऊ शकेल. 14 परंतु जर कोणी एकाने जाणूनबुजून व ठरवून रागाने किंवा द्वेषाने दुसऱ्या माणसाला ठार मारले तर मात्र त्याला शिक्षा करावी; त्याला वेदीपासून खेचून आणून ठार मारावे.
15 “जो माणूस आपल्या आईबापास मारहाण करील त्याला अवश्य ठार मारावे.
16 “जो कोणी एखाद्याला चोरून नेऊन गुलाम म्हणून विकेल किंवा गुलाम म्हणून स्वतःकडे ठेवेल तर त्याला अवश्य जिवे मारावे.
17 “जो कोणी आपल्या बापाला किंवा आईला शिव्याशाप देईल त्या माणसाला अवश्य जिवे मारावे.
18 “दोघे जण भांडत असताना एकाने दुसऱ्याला दगड किंवा ठोसा मारला आणि त्यामुळे जर दुसरा मेला नाही तर मारणाऱ्याला जिवे मारु नये. 19 जर मारलेल्या माणसाला काही दिवस बिछान्यात पडून राहावे लागले तर मारणाऱ्याने त्याला त्याच्या वाया गेलेल्या वेळेबद्दल नुकसान भरपाई द्यावी व तो माणूस बरा होईपर्यंत त्याच्यासाठी लागणारा खर्च द्यावा.
20 “काही वेळा लोक आपल्या गुलामाला किंवा गुलाम स्त्रीला छडीने मारहाण करतात त्यामुळे जर तो गुलाम किंवा ती गुलाम स्त्री मेली तर त्यांना मारणाऱ्याला अवश्य शिक्षा करावी; 21 आणि जर तो गुलाम किंवा गुलाम स्त्री मेली नाही आणि काही दिवसांनी तो किंवा ती बरी झाली तर त्यांना मारणाऱ्याला खुना बद्दलची शिक्षा होणार नाही कारण मालकाने त्यांना किमत देऊन विकत घेतले आहे; आणि ते त्याचे गुलाम आहेत.
22 “दोघे जर मारामारी करीत असतील व त्यांचा धक्का एखाद्या गरोदर बाईला लागला आणि त्या बाईचा गर्भपात झाला पण तिला इतर कोणतीही इजा झाली नाही तर ज्याचा धक्का तिला लागला तिचा नवरा न्यायाधीशांच्या सल्ल्याने जो दंड ठरवील तो दंड त्याने द्यावा. 23 परंतु त्या बाईला जास्त इजा झाली असेल तर त्या माणसाला शिक्षा करावी; जर एखाढ्या माणसाला ठार मारण्यात आले असेल तर त्या कृत्याला जबाबदार असणाऱ्या माणसाला ठार मारावे. म्हणजे जिवाबद्दल जीव. 24 डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय, 25 चटक्याबद्दल चटका, ओरखड्याबद्दल ओरखडा, व जखमेबद्दल जखम असा बदला घ्यावा.
26 “जर एखाद्याने आपल्या गुलामाच्या किंवा गुलाम स्त्रीच्या डोळ्यावर मारल्यामुळे त्याचा किंवा तिचा डोळा गेला तर त्या मालकाने त्याला मुक्त करून जाऊ द्यावे कारण त्याने आपला डोळा देऊन खंडणी भरली आहे. गुलाम किंवा गुलामस्त्रीला हा नियम सारखाच लागू आहे. 27 एखाद्या मालकाने आपल्या गुलामाच्या किंवा गुलाम स्त्रीच्या तोंडावर मारल्यामुळे त्याचा किंवा तिचा दात पडला तर मारणाऱ्याने गुलामाला मुक्त करून जाऊ द्यावे कारण त्याने आपला दात देऊन खंडणी भरली आहे. गुलाम किंवा गुलामस्त्रीला हा नियम सारखाच लागू आहे.
28 “एखाद्याच्या बैलाने एखाद्या पुरुषाला किंवा बाईला हुंदडून जिवे मारले तर त्या बैलास दगडमार करून जिवे मारावे, त्या बैलाचे मांस कोणी खाऊ नये, परंतु त्या बैलाचा मालक दोषी ठरणार नाही. 29 परंतु त्या बैलाने पूर्वी काहीजणांना मारले असेल आणि त्याविषयी त्याच्या मालकाला जर सूचना दिली असेल तर मग तो मालक दोषी आहे कारण त्याने त्या बैलाला बांधून ठेवले नाही किंवा गोठ्यात त्याच्या जागी बंद करून ठेवले नाही आणि म्हणून मोकळा ठेवल्यामूळे त्या बैलाने जर कोणाला जिवे मारले तर त्याबद्दल त्याचा मालक दोषी आहे, त्या बैलाला धोंडमार करुन जिवे मारावे व त्याच्या मालकासही जिवे मारावे. 30 परंतु मेलेल्या माणसाच्या कुटुंबातील लोकांना त्या मालकाच्या जिवाबद्दल खंडणी पाहिजे असल्यास त्या बैलाच्या मालकास जिवे मारू नये पण त्याने आपला जीव वाचविण्यासाठी न्यायाधीश ठरवील ती खंडणी द्यावी.
31 “बैलाने एखाद्या मुलाला किंवा मुलीला हुंदडून जिवे मारले तर त्याबाबतीत हाच नियम लागू करावा. 32 एखाद्या बैलाने जर गुलामाला हुंदडून ठार मारले तर त्या बैलाच्या मालकाने त्या गुलामाच्या मालकाला चांदीची तीस नाणी [a] द्यावी आणि त्या बैलालाही दगडाने जिवे मारावे; गुलाम किंवा गुलाम स्त्री म्हणजे गुलाम पुरुष किंवा स्त्री यांना हा नियम सारखाच लागू राहील.
33 “एखाद्या माणसाने विहिरीवरचे झाकण काढून घेतले असेल किंवा त्याने खड्डा खणून त्यावर झाकण ठेवले नसेल आणि जर एखाद्याचे जनावर म्हणजे बैल, गाढव वगैरे त्या खड्यात पडून मेले तर खड्याचा मालक दोषी आहे; 34 त्याने त्या जनावराच्या मालकाला भरपाई म्हणून त्याची किंमत द्यावी आणि ते मेलेले जनावर घेऊन जावे.
35 “जर एखाद्याच्या बैलाने दुसऱ्या बैलाला हुंदडून मारून टाकले तर जिवंत राहिलेला बैल विकून आलेले पैसे दोघा मालकांनी निम्मे वाटून घ्यावेत आणि मेलेला बैलही अर्धा अर्धा वाटून घ्यावा. 36 परंतु त्या बैलाने पूर्वी इतर बैलांना हुंदडून जिवे मारले असेल तर आपल्या मारक्या बैलाला मोकळे सोडल्याबद्दल मालक दोषी ठरेल; त्याने बैलाबद्दल बैल द्यावा व मेलेला बैल घ्यावा.
येशू मरणातून उठला आहे(A)
24 आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या स्त्रिया अगदी पहाटेस कबरेकडे आल्या, आणि त्यांनी स्वतः तयार केलेले मसाले आणले. 2 त्यांना दगड कबरेवरुन लोटलेला आढळला. 3 त्या आत गेल्या, परंतु त्यांना प्रभु येशूचे शरीर सापडले नाही. 4 यामुळे त्या अवाक् झाल्या असतानाच, अचानक लखलखीत कपडे घातलेले दोन पुरुष त्यांच्या बाजूला उभे राहिले. 5 अतिशय भयभीत होऊन त्यांनी आपले चेहरे जमिनीकडे वळविले. ते दोन पुरुष त्यांना म्हणाले, “जो जिवंत आहे त्याचा शोध तुम्ही मेलेल्यांमध्ये का करता? 6 तो येथे नाही; तो उठला आहे! तो गलीलात असताना त्याने तुम्हांला काय सांगितले याची आठवण करा. 7 तो असे म्हणाला की, मनुष्याच्या पुत्राला धरुन पापी लोकांच्या हाती द्यावे, त्याला वधस्तंभावर खिळावे आणि तिसऱ्या दिवशी त्याने उठावे.” 8 नंतर स्त्रियांना येशूच्या शब्दाची आठवण झाली.
9 त्या कबरेपासून परतल्या आणि त्यांनी या सर्व गोष्टींचे वर्तमान अकरा प्रेषितांना व इतर सर्वांना सांगितले. 10 त्या स्त्रिया मरीया मग्दालिया, योहान्न, आणि याकोबाची आई मरीया ह्या होत्या. त्या आणि इतर स्त्रियांसुद्धा ज्या त्यांच्याबरोबर होत्या, प्रेषितांना या गोष्टी सांगत होत्या. 11 पण प्रेषितांना त्यांचे सांगणे मूर्खपणाचे वाटले. आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. 12 पण पेत्र उठला आणि कबरेकडे पळाला. त्याने खाली वाकून पाहिले पण त्याला तागाच्या गुंडाळण्याच्या वस्त्राशिवाय काही आढळले नाही. जे घडले त्याविषयी तो स्वतःशीच आश्चर्य करीत दूर गेला.
अम्माऊसच्या वाटेवर(B)
13 त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे शिष्य यरुशलेमापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. 14 ते एकमेकांशी या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी बोलत होते. 15 ते बोलत असताना आणि या गोष्टींची चर्चा करीत असताना येशू स्वतः आला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला. 16 पण त्यांचे डोळे त्याला ओळखण्यापासून बंद करण्यात आले होते. 17 येशू त्यांना म्हणाला, “चालत असताना तुम्ही एकमेकांबरोबर बोलत आहात त्या गोष्टी कोणत्या आहेत?”
चालता चालता ते थांबले. ते अतिशय दु:खी दिसले. 18 त्यांच्यातील एकजण ज्याचे नाव क्लयपा होते, तो त्याला म्हणाला, “ह्या दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नसलेले असे यरुशलेमात राहणारे तुम्ही एकटेच आहात काय?”
19 येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या मते कोणत्या गोष्टी?”
ते त्याला म्हणाले, “नासरेथकर येशूविषयीच्या सर्व गोष्टी. हाच तो मनुष्य जो आपल्या कृत्यांनी आणि शब्दांनी देवासमोर आणि मनुष्यांसमोर एक महान संदेष्टा झाला. 20 आणि आम्ही चर्चा करीत होतो की, कसे आमच्या प्रमुख याजकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्याला मरणदंड भोगण्यासाठी स्वाधीन केले. आणि त्यांनी त्याला वधस्तंभी खिळले. 21 आम्ही अशी आशा केली होती की, तोच एक आहे जो इस्राएलाची मुक्तता करील.
“आणि या सगळ्याशिवाय हे सर्व घडून गेलेल्या गोष्टीला आज तीन दिवस झालेत. 22 आणि आमच्या परिवारातील काही स्त्रियांनी आम्हांला थक्क केले आहे: आज अगदी पहाटे त्या कबरेकडे गेल्या, परंतु त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. 23 त्यांनी येऊन आम्हांला सांगितले की, त्यांना देवदूतांचा दृष्टांत घडला आणि देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे. 24 तेव्हा आमच्यातील काही कबरेकडे गेले, आणि स्त्रियांनी जसे सांगितले होते, तसेच त्यांना आढळले, पण त्यांनी त्याला पाहिले नाही.”
25 मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात. 26 ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?” 27 आणि म्हणून त्याने मोशेपासून सुरुवात करुन आणि सर्व संदेष्ट्यापर्यंत सांगून, पवित्र शास्त्रात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करुन सांगितले.
28 ज्या खेड्याकडे ते जात होते, त्याच्याजवळ ते आले आणि येशूने असा बहाणा केला की, जणू काय तो पुढे जाणार आहे. 29 परंतु जास्त आग्रह करुन ते म्हणाले, “आमच्या बरोबर राहा. कारण जवळजवळ संध्याकाळ झालीच आहे. आणि दिवसही जवळजवळ मावळला आहे.” मग तो त्यांच्याबरोबर राहावयास आत गेला.
30 जेव्हा तो त्यांच्याबोरबर जेवायला मेजासभोवती बसला, त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले. नंतर त्याने ती मोडली व ती त्यांना तो देऊ लागला. 31 तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्याला ओळखले. पण तो त्यांच्यातून अदृश्य झाला. 32 मग ते एकमेकांना म्हणू लागले, “तो वाटेवर आपणाशी बोलत असताना व पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्ट करुन सांगत असताना आपली अंतःकरणे आतल्या आत उकळत नव्हती काय?”
33 मग ते लगेच उठले, व यरुशलेमेस परत गेले. तेव्हा त्यांना अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर असलेले इतर एकत्र जमलेले आढळले. 34 प्रेषित आणि इतरजण म्हणाले, “खरोखर प्रभु उठला आहे! आणि शिमोनाला दिसला आहे.”
35 नंतर त्या दोन शिष्यांनी वाटेत काय घडले ते त्याला सांगितले आणि तो भाकर मोडत असताना त्यांनी त्याला कसे ओळखले ते सांगितले.
येशू त्याच्या अनुयायांना दर्शन देतो(C)
36 ते या गोष्टी त्यांना सांगत असतानाच येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यांस म्हणाला, “तुम्हांस शांति असो.”
37 ते दचकले आणि भयभीत झाले. त्यांना असे वाटले की, ते भूत पाहत आहेत. 38 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही असे अस्वस्थ का झालात? तुमच्या मनात शंका का निर्माण झाल्या? 39 माझे हात व पाय पाहा. तुम्हाला मी दिसतो तोच मी आहे. मला स्पर्श करा आणि पाहा की, मला आहे तसे हाडमांस भुताला नसते.”
40 असे बोलून त्याने त्यांस आपले हातपाय दाखवले. तरीही त्यांच्या आनंदामुळे त्यांना ते खरे वाटेना. 41 ते आश्चर्यचकित झाले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “येथे तुमच्याजवळ खाण्यासाठी काय आहे?” 42 खरे त्यांनी त्याला भाजलेला माशाचा तुकडा दिला. 43 त्याने तो घेतला व त्यांच्यासमोर खाल्ला.
44 तो त्यांना म्हणाला, “ह्याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हांबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, भविष्यवादी आणि स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.”
45 नंतर पवित्र शास्त्र समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली. 46 मग तो त्यांना म्हणाला, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख भोगावे आणि मेलेल्यांतून तिसऱ्या दिवशी उठावे. 47 आणि यरुशलेमापासून सुरुवात करुन सर्व राष्ट्रांस माझ्या पित्याने जे वचन दिले आहे ते पाठवीन. पापक्षमेसाठी पश्चात्तापाची घोषणा करावी. 48 या गोष्टींचे तुम्ही साक्षी आहात. 49 आता मी तुम्हांला माझ्या पित्याने जे वचन दिले आहे ते पाठविन. परंतु जोपर्यंत तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने भरले जात नाही तोपर्यंत तुम्ही या शहरातच राहा.”
येशू परत स्वर्गात जातो(D)
50 नंतर तो त्यांना बाहेर दूरवर बेथानीपर्यंत घेऊन गेला आणि त्याने हात वर करुन आशीर्वाद दिला. 51 तो त्यांना आशीर्वाद देत असतानाच तो त्यांना सोडून गेला. आणि त्याला स्वर्गात घेण्यात आले. 52 नंतर त्यांनी त्याची उपासना केली व ते मोठ्या आनंदाने यरुशलेमाला परतले. 53 आणि देवाची सतत स्तुति करीत ते मंदिरात राहिले.
39 “ईयोबा, पहाडी बकऱ्या कधी व्यायतात ते तुला माहीत आहे का?
हरिणी आपल्या बछड्याला जन्म देताना तू पाहिले आहेस का?
2 ईयोबा पहाडी बकरी आणि हरिणी किती महिने आपल्या पिलांना पोटात वाढवतात ते तुला माहीत आहे का?
त्यांची जन्माला यायची वेळ कोणती ते तुला माहीत आहे का?
3 ते प्राणी लोळतात प्रसूतिवेदना सहन करतात
आणि त्यांची पिल्ले जन्माला येतात.
4 ती बछडी शेतात मोठी होतात.
नंतर ती आपल्या आईला सोडून जातात आणि पुन्हा कधीही परतून येत नाहीत.
5 “ईयोबा, रानटी गाढवांना कोणी सोडून दिले?
त्यांची दोरी सोडून त्यांना कोणी मोकळे केले?
6 मी (देव) रानटी गाढवांना वाळवंटात घर दिले.
मी त्यांना राहण्यासाठी क्षारभूमी दिली.
7 रानटी गाढवे गजबजलेल्या शहरांना हसतात (त्यांना शहरातला गजबजाट आवडत नाही)
आणि त्यांना कुठलाही माणूस आव घालू शकत नाही.
8 रानगाढवे डोंगरात राहतात.
तेच त्यांचे कुरण आहे.
ते आपले अन्न तिथेच शोधतात.
9 “ईयोबा, गवा (रानटी बैल) तुझी सेवा करायला तयार होईल का?
तो रात्री तुझ्या खळ्यावर राहील का?
10 ईयोबा, गवा तुला त्याच्या गळ्यात दोरी बांधू देईल का?
आणि तू त्याला तुझे शेत नांगरायला लावू शकशील का?
11 गवा खूप बलवान असतो,
परंतु तो तुझे काम करील असा विश्वास तुला वाटतो का?
12 तो तुझे धान्य शेतातून गोळा करेल
आणि खळ्यात नेईल असा भरवसा तुला वाटतो का?
13 “शहामृगी आपले पंख आनंदाने फडफडवते.
परंतु तिला उडता येत नाही.
तिचे पंख आणि पिसे करकोचाच्या पंखासारखी नाहीत.
14 शहामृगी आपली अंडी जमिनीत घालते
आणि ती वाळूत उबदार होतात.
15 आपल्या अंड्यांवरुन कुणी चालत जाईल
किंवा रानटी प्राणी ती फोडतील हे ती विसरते.
16 शहामृगी आपल्या पिलांना सोडून जाते.
ती जणू स्वतःची नाहीतच असे ती वागते.
तिची पिल्ले मेली तरी तिला त्याची पर्वा नसते.
काम निष्कळ झाल्याचे सुखदु:ख तिला नसते.
17 का? कारण मी (देव) शहामृगीला शहाणे केले नाही.
शहामृगी मूर्ख असते. मीच तिला तसे केले आहे.
18 परंतु शहामृगी जेव्हा पळण्यासाठी उठते तेव्हा ती घोड्याला आणि घोडेस्वाराला हसते,
कारण ती कुठल्याही घोड्यापेक्षा जोरात पळू शकते.
19 “ईयोबा, तू घोड्याला त्याची शक्ती दिलीस का?
तू त्याच्या मानेवर त्याची आयाळ ठेवलीस का?
20 ईयोबा, तू घोड्याला टोळाप्रमाणे लांब उडी मारायला सांगितलेस का?
घोडा जोरात फुरफुरतो [a] आणि लोक त्याला घाबरतात.
21 घोडा बलवान आहे म्हणून आनंदात असतो.
तो आपल्या खुराने जमीन उकरतो आणि धावत युध्दभूमीवर जातो.
22 घोडा भीतीला हसतो, तो कशालाही भीत नाही.
तो युध्दातून कधीही पळ काढीत नाही.
23 सैनिकाचा भाता घोड्याच्या बाजूला हलत असतो.
त्याचा स्वार जे भाले आणि इतर शस्त्रे बाळगतो ते उन्हात चमकतात.
24 घोडा फार अनावर होतो.
तो जमिनीवर [b] जोरात धावतो.
तो जेव्हा रणशिंग फुकलेले ऐकतो तेव्हा तो एका जागी स्थिर राहू शकत नाही.
25 रणशिंग ऐकू येते तेव्हा घोडा घाई करतो.
त्याला दुरुनही लढाईचा वास येतो.
सेनापतींनी दिलेल्या आज्ञा आणि युध्दातले इतर अनेक आवाज त्याला ऐकू येतात.
26 “ईयोबा, तू ससण्याला पंख पसरुन दक्षिणेकडे [c] उडायला शिकवलेस का?
27 ईयोबा, गरुडाला आकाशात उंच उडायला शिकवणारा तूच का?
तूच त्याला त्याचे घरटे उंच पहाडावर बांधायला सांगितलेस का?
28 गरुड उंच सुळक्यावर राहातो.
तीच त्याची तटबंदी आहे
29 गरुड त्याच्या तटबंदीवरुन आपले भक्ष्य शोधतो.
गरुडाला एवढ्या उंचीवरुन आपले भक्ष्य दिसू शकते.
30 गरुड प्रेताभोवती गोळा होतात
आणि त्यांची पिल्ले रक्त पितात.”
ख्रिस्ती बांधवांकरिता मदत
9 या संताच्या सेवेसाठी मी तुम्हांला काही लिहावे याची गरज भासत नाही. 2 कारण मदत करण्याबद्दलची तुमची उत्सुकता मला माहीत आहे. आणि मी मासेदोनियातील लोकांना याविषयी अभिमानाने सांगत होतो की, गेल्या वर्षापासून अखयातील तुम्ही लोक देण्यासाठी तयार आहात आणि तुमच्या जोशामुळे पुष्कळ जण कृति करण्यास आवेशाने पुढे आले आहेत. 3 परंतु मी भावांना यासाठी पाठवीत आहे की, आमचा तुमच्याविषयी या बाबतीत अभिमान पोकळ ठरु नये. पण जसे आम्ही तुम्हांला सांगितले तसे तुम्ही तयार असावे. 4 कारण कोणी मासेदोनियाचा मनुष्य माझ्याबरोबर आला, आणि जर त्याने तुम्हांला तयार नसलेले पाहिले, तर तुम्ही लज्जित व्हाल असे आम्हाला म्हणायचे नाही. तर आम्ही लज्जित होऊ. 5 म्हणून मला हे आवश्यक आहे की, बंधूनी आम्हांला आगाऊ भेट देण्यासाठी त्यांना विंनति करावी आणि उदार देणगी जी तुम्ही देण्याचे अभिवचन दिले आहे, तिच्याविषयीची व्यावस्था संपवावी. मग ती उदारहस्ते दिलेली देणगी ठरेल व कुरकुर करीत दिलेले दान ठरणार नाही.
6 हे लक्षात ठेवा: जो हात राखून पेरतो तो त्याच मापाने कापणी करील, आणि जो उदार हाताने पेरील तो त्याच मापाने कापणी करील. 7 प्रत्येक माणसाने अंतःकरणात ठरविल्याप्रमाणे द्यावे, खेदाने किंवा बळजबरीने देणे भाग पडते म्हणून देऊ नये. कारण आनंदाने देणाऱ्यावर देव प्रेम करतो. 8 आणि देव तुम्हाला कृपेने विपुल देण्यास समर्थ आहे. यासाठी की सर्व गोष्टीत सर्व वेळी, तुम्हांला विपुलता मिळेल आणि चांगल्या कामसाठी अधिक तत्पर व्हाल. 9 असे लिहिले आहे:
“तो गरीबांना उदारहस्ते देतो,
त्याची दया अनंतकाळपर्यंत राहील.” (A)
10 जो पेरणाऱ्याला बी व खाणऱ्याला अन्न पुरवितो, तो तुम्हाला पेरायला बी पुरवील आणि ते अनेकपट करील. आणि तुमच्या नीतिमत्वाची फळे वाढवील. 11 सर्व प्रकारच्या उदारपणाकरिता प्रत्येक गोष्टीत धनवान व्हाल. यामुळे तुम्हीदेखील उदारपणे द्यावे ज्यामुळे देवाची स्तुति होईल.
12 कारण या अर्पणकार्याची ही सेवा संताच्या गरजा पुरविते. इतकेच केवळ नाही तर देवाला अनेक गोष्टी दिल्याने विपुलता येते. 13 कारण या सेवेमुळे तुम्ही स्वतःला योग्य शाबित करता, आणि ते देवाचे गौरव करतात, तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता त्या ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला अधीन असल्याने तुमचे स्वीकारणे. 14 आणखी ते तुम्हाकरिता प्रार्थना करीत असता तुम्हावर देवाने जी विपुल कृपा केली आहे, त्यामुळे तुमची भेट व्हावी अशी उत्कंठा ते धरतात. 15 देवाच्या अनिर्वाच्य देणग्यांबद्दल त्याचे आभार मानतो.
2006 by World Bible Translation Center