Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
निर्गम 9

शेती-पशूमध्ये मरीची पीडा

नंतर परमेश्वराने मोशेला फारोकडे जाऊन असे बोलाण्यास सांगितले, “इस्राएलांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांना जाऊ दे!’ तू जर त्यांना जाण्यापासून सतत असाच अडवीत राहशील व त्यांना जाऊ देणार नाहीस. तर शेतावरील पशूंविरुद्ध परमेश्वर आपल्या सामर्थ्याचा वापर करील. परमेश्वर तुझे घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे व शेरडेमेंढरे यांना भयंकर आजाराने त्रस्त करील. परंतु तो इस्राएल लोकांच्या व मिसरच्या लोकांच्या पशूत भेद करील; इस्राएल लोकांच्या पशूपैकी एकही पशू मरणार नाही. याकरिता परमेश्वराने वेळही नेमलेली आहे. ह्या देशात उद्या हे सर्व घडून येईल.”

दुसऱ्या दिवशी सकाळी मिसरमधील शेतीवरील सर्व पशू मेले. परंतु इस्राएल लोकांच्या मालकीच्या पशूंपैकी एकही मेला नाही. इस्राएल लोकांच्या पशूपैकी एखादा मेला काय हे पाहण्यासाठी फारोने माणसे पाठवली. परंतु त्यांच्या पशूंपैकी एकही मेला नाही. तरीपण फारो हट्ट व कठीण मनाचाच राहिला. त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.

गळवांची पीडा

नंतर परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, “मोशेने ओंजळभर भट्टीची राख घेऊन फारो देखत आकाशाकडे उधळावी. त्या राखेचा धुराळा बनेल व तो सगळ्या मिसरभर पसरेल आणि त्याच्या स्पर्शाने माणसांना व गुरांना फोड येऊन गळवे होतील.”

10 तेव्हा मोशे व अहरोन यांनी भट्टीतून राख घेतली व ते फारो राजासमोर उभे राहिले. मोशेने ती राख हवेत उधळली आणि त्यामुळे माणसांना व जनावरांना फोड व गळवे येऊ लागली. 11 जादूगार मोशेला तसे करण्यापासून अडवू शकले नाहीत कारण त्यांनाही गळवे आली होती. सर्व मिसरभर ही गळवे आली. 12 परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही, व लोकांना जाऊ दिले नाही. परमेश्वराने पूर्वीच सांगितले होते त्याप्रमाणे हे झाले.

गारांची पीडा

13 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू सकाळी उठ व फारोकडे जा; आणि त्याला सांग की इस्राएल लोकांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांना जाऊ दे! 14 तू हे केले नाहीस तर मग मी माझे सारे सामर्थ्य तुझ्याविरुद्ध तुझे सेवक व तुझ्या लोकांच्याविरुद्ध वापरीन. तेव्हा मग तुला माहीत होईल की या जगात माझ्यासारखा दुसरा देव नाही. 15 मी माझे सगळे सामर्थ्य वापरून असा आजार तुम्हावर पाठवू शकतो की त्यामुळे तू व तुझी प्रजा या पृथ्वीवरून नष्ट व्हाल. 16 परंतु मी तुला एका हेतूने ठेवले आहे की मी तुला माझे सामर्थ्य दाखवावे. मग सर्व जगाला मी कोण आहे हे कळेल. 17 तू अजूनही माझ्या लोकांविरुद्ध आहेस. तू त्यांना अजूनही मोकळे करून जाऊ देत नाहीस. 18 म्हणून उद्या ह्याच वेळेस मी गारांचा असा काही वाईट वादळी वर्षाव मिसरवर आणीन की असा गारांचा वादळी वर्षाव मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून कधी आला नाही. 19 तेव्हा आता तू तुझी गुरेढोरे सुरक्षित जागी ठेवलीच पाहिजेस; शेतात तुझ्या मालकीचे काही असल्यास ते सुरक्षित जागी ठेवलेच पाहिजेस, कारण जर एखादा माणूस किंवा पशू शेतात राहील तर तो मारला जाईल. जे जे तुम्ही तुमच्या घरात गोळा करून ठेवणार नाही त्यांवर गारांचा भडीमार पडेल.’”

20 फारोच्या सेवकापैकी काहींनी परमेश्वराच्या संदेशाचा मान ठेवून लगेच आपली गुरेढोरे व गुलाम यांना आसऱ्याला घरी आणले व सुरक्षित जागी ठेवले. 21 परंतु इतर सेवकांनी परमेश्वराच्या संदेशाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे रानांतील त्यांचे सर्व दास व गुरेढोरे, शेरडेमेंढरे मरून गेली.

22 परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपले हात आकाशाकडे उगार आणि मग सर्व मिसरभर गारांच्या वर्षावाला सुरवात होईल. गारांचा मारा सर्व लोकांवर, गुराढोरांवर आणि मिसर देशातील सर्व शेतांवर होईल.”

23 तेव्हा मोशेने आपली काठी आकाशाकडे उगारली आणि मग परमेश्वराने मेघगर्जना, लखलखणाऱ्या विजा व गारा यांचा पृथ्वीवर वर्षाव केला. अशा प्रकारे परमेश्वराने मिसर देशावर भडीमार केला. 24 गारांचा मारा व त्यासोबत विजांच्या अग्नीचा लोळ जमिनीवर आला. मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून गारांचे असे भयंकर व वाईट वादळ मिसरवर कधी आले नव्हते. 25 त्या गारांच्या वादळाच्या माऱ्याने मिसरमधील शेतात जे होते ते सर्व नष्ट केले. तसेच माणसे, जनावरे व झाडे झुडपे नष्ट केली; आणि मोठमोठी झाडे मोडून पडली. 26 गारांच्या वर्षावाच्या तडाख्यापासून वाचलेला भाग एकच आणि तो म्हणजे इस्राएली लोक राहात असलेला गोशेन प्रांत; तेथे गारांचा वर्षाव झाला नाही.

27 फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, “ह्यावेळी मी पाप केले आहे. परमेश्वराचे खरे आहे; मी व माझे लोक, आम्ही चुकलो आहोत. 28 हा देवाकडून झालेला गारांचा मारा व मेघांचा गडगडाट फार भयंकर झाला! हे वादळ थांबविण्यास देवाकडे विनंती करा आणि मग मी तुम्हाला जाऊ देतो.”

29 मोशेने फारोला सांगितले, “जेव्हा मी हे शहर सोडून जाईन तेव्हा माझे हात पसरून मी परमेश्वरापुढे विनंती करीन आणि मग ही मेघगर्जना व हा गारांचा मारा थांबेल; तेव्हा तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे. 30 परंतु तू व तुझे सेवक अजूनही परमेश्वराचे भय बाळगीत नाहीत हे मला माहीत आहे.”

31 यावेळी सातूचे दाणे तयार होऊन तो कापणीला आला होता व जवसाला बोंडे आली होती. ह्या पिकांचा आता नाश झाला. 32 परंतु साधा गहू व जर्मन गहू इतर धान्यापेक्षा उशीरा पिकतात; त्याची उशीरा पेरणी झाल्यामुळे ते अजून उगवले नव्हते, म्हणून त्यांचा नाश झाला नाही.

33 मोशे फारोपुढून निघून नगराबाहेर गेला. त्याने परमेश्वराकडे हात पसरून प्रार्थना केली. आणि मेघगर्जना व गारांचा वर्षाव थांबला आणि पृथ्वीवर पाऊस पडणे बंद झाले.

34 पाऊस, गारा व मेघांचा गडगडाट बंद झाल्याचे फारोने पाहिले तेव्हा फारो व त्याचे सेवक यांनी मन पुन्हा कठोर केले. 35 फारोने आपण दिलेल्या वचनाप्रमाणे करण्याचे नाकारले व इस्राएल लोकांना मोकळे करून त्याने जाऊ दिले नाही. परमेश्वराने मोशेद्वारे सांगितल्याप्रमाणे हे झाले.

लूक 12

परुश्यांसारखे होऊ नका

12 आणि म्हणून हजारो लोकांचा समुदाय जमला होता. इतके लोक जमले होते की, ते एकमेकांना तुडवू लागले, तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांशी बोलला: “परुश्यांच्या खमिराविषयी जपा, म्हणजे जे ढोंग आहे त्याविषयी जपा. उघड केले जाणार नाही असे काहीच झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीच गुप्त नाही. यास्तव जे काही तुम्ही अंधारत बोलाल ते उजेडात ऐकले जाईल आणि जे काही तुम्ही कोणाच्या कानात एकांतात सांगाल ते घराच्या छपरावरुन घोषित केले जाईल.”

फक्त देवाची भीति बाळगा(A)

“परंतु माझ्या मित्रांनो, मी तुम्हांला सांगतो, जे शरीराला मारतात त्यांना तुम्ही भिऊ नये, कारण त्यानंतर त्यापेक्षा जास्त त्यांना काही करता येत नाही. तुम्ही कोणाची भीति बाळगावी हे मी तुम्हांला सांगतो. तुम्हांला ठार मारल्यांनतर तुम्हांस नरकात टाकून देण्यास जो समर्थ आहे, त्याची भीति धरा. होय, मी तुम्हांस सांगतो त्यालाच भ्या.

“पाच चिमण्या दोन पैशांना विकतात की नाही? आणि त्यातील एकीचाही देवाला विसर पडत नाही. पण तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील त्याने मोजलेले आहेत. भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही मूल्यवान आहात.”

येशूची लाज बाळगू नका(B)

“प्रत्येक जण जो मला इतर लोकांसमोर स्वीकारतो, त्या मनुष्याला देवाच्या दूतासमोर मनुष्याचा पुत्रही स्वीकारील. परंतु जो मला इतर लोकांसमोर नाकारतो, तो देवदूतांसमोरही नाकारला जाईल.

10 “प्रत्येक मनुष्य जो मनुष्याच्या पुत्राविरुद्ध बोलतो, त्याला क्षमा केली जाईल. परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्याला क्षमा केली जाणार नाही.

11 “जेव्हा ते तुम्हांला सभास्थान, सरकार, अधिकारी यांच्यासमोर आणतील तेव्हा तुम्ही काय बोलावे किंवा स्वतःचा बचाव कसा करावा याविषयी आधीच चिंता करीत बसू नका. 12 कारण तुम्ही काय बोलावे हे पवित्र आत्मा त्यावेळी तुम्हांला शिकवील.”

येशू स्वार्था विरुद्ध सूचना देतो

13 नंतर लोकसमुदायातील एक जण त्याला म्हणाला, “गुरुजी, माझ्या भावाला वतन विभागून माझे मला द्यायला सांगा!”

14 परंतु येशू त्याला म्हणाला, “मनुष्या, मला तुमच्यावर मध्यस्थ किंवा न्यायाधीश म्हणून कोणी नेमले?” 15 मग येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतःला दूर ठेवा. कारण जेव्हा एखाद्या माणसाजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती म्हणजे त्याचे जीवन असे होत नाही.”

16 नंतर त्याने त्यास एक बोधकथा सांगितली: “कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीत फार उत्तम पीक आले. 17 तो स्वतःशी विचार करुन असे म्हणाला, ‘मी काय करु, कारण धान्य साठवायला माझ्याकडे जागा नाही?’

18 “मग तो म्हणाला, ‘मी असे करीन की धान्याची कोठारे पाडून मोठी बांधीन, मी माझे सर्व धान्य व माल तेथे साठवीन. 19 आणि मी माझ्या जिवाला म्हणेन, जिवा, तुझ्यासाठी पुष्कळ चांगल्या गोष्टी अनेक वर्षे पुरतील इतक्या आहेत. आराम कर, खा, पी आणि मजा कर.’

20 “पण देव त्याला म्हणतो, ‘मूर्खा, जर आज तू मेलास तर तू मिळविलेल्या गोष्टी कोणाला मिळतील?’

21 “जो कोणी स्वतःसाठी संपत्ती जमा करतो परंतु देवाच्या दृष्टीने जो धनवान नाही, अशा मनुष्यासारखे हे आहे.”

देवाच्या राज्याला प्रभम स्थान देणे(C)

22 मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “म्हणून मी तुम्हांस सांगतो, स्वतःच्या जीवनाविषयी किंवा तुम्ही काय खावे याविषयी चिंता करु नका. किंवा तुमच्या शरीराविषयी म्हणजे कोणते कपडे घालावेत याविषयी चिंता करु नका. 23 कारण अन्नापेक्षा जीव आणि कपड्यापेक्षा शरीर महत्त्वाचे आहे. 24 कावळ्यांचा विचार करा. ते पेरीत नाहीत व कापणीही करीत नाहीत. त्यांना कोठार नाही व कणगीही नाही. तरीही देव त्याचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मोलवान आहात! 25 चिंता करुन तुम्हांपैकी कोण स्वतःच्या आयुष्यात एका तासाची भर घालू शकेल? 26 ज्याअर्थी तुम्ही ही लहान गोष्ट करु शकत नाही, तर इतर गोष्टीविषयी चिंता का करता?

27 “रानफुले कशी वाढतात याचा विचार करा. ते कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत. तरी मी तुम्हांला सांगतो शलमोनानेसुद्धा आपल्या सर्व वैभवात त्यांच्यातील एकासारखाही पोशाख घातला नव्हता. 28 जर देवाने जे आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाईल अशा त्या रानातील गवताला असा पोशाख घातला आहे, तर तुम्ही जे अल्पविश्वासू त्या तुम्हांला तो कितीतरी अधिक (चांगला) पोशाख घालणार नाही काय!

29 “आणि तुम्ही काय खावे व काय प्यावे याविषयी खटपट करु नका. या गोष्टीविषयी चिंता करु नका. 30 कारण जगातील सर्व लोक हे मिळविण्याची खटपट करतात पण या गोष्टींची गरज तुम्हांला आहे, हे तुमच्या पित्याला माहीत आहे. 31 त्याऐवजी प्रथम त्याचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे याही गोष्टी तुम्हांला दिल्या जातील.

धनावर विश्वास ठेवू नका

32 “लहान कळपा भिऊ नको, कारण तुम्हांला त्याचे राज्य द्यावे हे दयाळू पित्याला समधानाचे वाटते. 33 तुमच्याकडे असलेले सर्व विका आणि गरिबांना पैसे द्या. जुन्या न होणाऱ्या व स्वर्गातही न संपणाऱ्या अशा थैल्या स्वतःसाठी करा. जेथे चोर जाऊ शकणार नाही व कसरही त्याचा नाश करु शकणार नाही. 34 कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.

सदैव तयार असा(D)

35 “तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लागलेले असू द्या. 36 लग्नाच्या मेजवानीवरुन त्यांचा मालक परत येईल अशी वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा. यासाठी की जेव्हा तो येतो व दार ठोठावतो तेव्हा त्याच्यासाठी ते ताबडतोब दार उघडतील. 37 धन्य ते नोकर जे त्यांचा मालक परत आल्यावर त्याला जागे व तयारीत असलेले आढळतील. मी तुम्हांला खरे सांगतो, तो स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल, त्यांना मेजावर बसायला सांगून त्यांची सेवा करील. 38 तो मध्यरात्री येवो अगर त्यांनतर येवो. जर ते त्याला असे तयारीत आढळतील तर ते धन्य.

39 “परंतु याविषयी खात्री बाळगा; जर घराच्या मालकाला चोर केव्हा येणार हे माहीत असते तर त्याचे घर त्याने फोडू दिले नसते. 40 तुम्हीही तयार असा कारण तुम्ही अपेक्षा करणार नाही अशा कोणत्याही क्षणी मनुष्याचा पुत्र येईल.”

विश्वासू नोकर कोण आहे(E)

41 मग पेत्र म्हणाला, “प्रभु, तुम्ही ही बोधकथा आम्हांलाच सांगत आहात की सर्वांना?”

42 तेव्ह प्रभु म्हणाला, “असा कोण शहाणा व विश्वासू कारभारी आहे की, ज्याला प्रभु त्याच्या नोकरांना त्याचे धान्य योग्य वेळी देण्यासाठी त्याची नेमणूक करील? 43 त्याचा मालक येईल त्यावेळी असे करताना जो नोकर आढळेल तो धन्य. 44 मी तुम्हांला खरे सांगतो, मालक त्या नोकराला त्याच्या सर्व मालमत्तेवर अधिकारी म्हणून नेमील.

45 “पण जर तो नोकर मनात म्हणतो, ‘माझा मालक येण्यास फार विलंब लावतो.’ व तो त्याच्या स्त्री व पुरुष नोकरांना मारहाण करतो व खाण्यापिण्यास सुरुवात करतो. 46 ज्या दिवसाची तो वाट पाहत नाही त्या दिवशी त्या नोकराचा मालक येईल व अशा वेळी येईल की ती वेळ त्याला माहीत असणार नाही. आणि तो त्याचे वाभाडे वाभाडे काढील व तो त्याला अविश्वासू लोकांबरोबर ठेवील.

47 “ज्या नोकराला आपल्या मालकाची इच्छा माहीत असते व जो तयार राहत नाही, किंवा जो आपल्या मालकाच्या इच्छेप्रमाणे करीत नाही, त्या नोकराला खूप मार मिळेल. 48 परंतु कसलाही वाईट हेतू न बाळगता मालकाला न आवडणारे जर त्याने केले असेल तर त्याला कमी मार बसेल. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याकडून पुष्कळाची अपेक्षा केली जाईल. ज्यांच्याजवळ जास्त ठेवले आहे त्यांच्याकडून जास्त मागितले जाईल.

लोक येशूविषयी सहमत होणार नाहीत(F)

49 “मी पृथ्वीवर आग लावण्यास आलो आहे. मला असे वाटते की ती अगोदरच पेटली असती तर किती बरे झाले असते. 50 माझ्याकडे बाप्तिस्मा आहे व तो मला घ्यावयाचा आहे. आणि तो होईपर्यंत मी किती अस्वस्थ आहे! 51 तुम्हांला असे वाटते का की मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करण्यास आलो आहे? नाही, मी तुम्हांला सांगतो मी तुमच्यात फूट पाडण्यासाठी आलो आहे. 52 मी असे म्हणतो कारण आतापासून घरातील पाच जणात एकमेकाविरुद्ध फूट पडेल. तिघे दोघांविरुद्ध व दोघे तिघांविरुद्ध अशी फूट पडेल.

53 त्यांच्यात पित्याविरुद्ध मुलगा
    व मुलाविरुद्ध पिता अशी फूट पडेल,
आईविरुद्ध मुलगी
    व मुलीविरुद्ध आई अशी फूट पडेल,
सासूविरुद्ध सून
    व सुनेविरुद्ध सासू अशी त्यांच्यात फूट पडेल.”

समय ओळखणे(G)

54 तो लोकसमुदायाला म्हणाला, “तुम्ही जेव्हा पश्चिमेकडून ढग येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता की, ‘पाऊस पडेल’ आणि तेच घडते. 55 जेव्हा दक्षिणेकडचा वारा वाहतो, तेव्हा तुम्ही म्हणता ‘उकाडा होईल’ आणि तसे घडते. 56 अहो ढोंग्यांने! तुम्ही पृथ्वीवरील व आकाशातील स्थित्यंतरे पाहून अनुमान काढता, पण सध्याच्या काळाचा अर्थ तुम्हांला का काढता येत नाही?

तुमच्या समस्या सोडवा(H)

57 “आणि काय योग्य आहे हे तुमचे तुम्ही स्वतःच का ठरवीत नाही? 58 तुम्ही तुमच्या वाद्याबरोबर न्यायालयात जात असता वाटेतच त्यांच्याशी समेट करा नाही तर तो तुम्हांला न्यायाधीशासमोर नेईल, आणि न्यायाधीश तुम्हांला दंडाधिकाऱ्याच्या स्वाधीन करील. आणि अधिकारी तुम्हांला तुरुंगात टाकील. 59 मी तुम्हांला सांगतो, तुम्ही पै न पै देईपर्यंत तेथून बाहेर पडू शाकणार नाही.”

ईयोब 27

27 नंतर ईयोब आपले बोलणे पुढे चालू ठेवत म्हणाला:

“खरोखरच देव आहे.
आणि तो आहे हे जसे खरे आहे
    तसेच तो माझ्या बाबतीत अन्यायी होता हे ही खरे आहे.
होय, त्या सर्वशक्तिमान देवाने माझे जीवन कडू करुन टाकले.
    परंतु जोपर्यंत माझ्यात जीव आहे
    आणि देवाचा जिवंत श्वास माझ्या नाकात आहे तोपर्यंत,
माझे ओठ वाईट गोष्टी बोलणार नाहीत
    आणि माझी जीभ खोटे सांगणार नाही.
तुम्ही बरोबर आहात हेही मी कधी मान्य करणार नाही.
    मी निरपराध आहे हेच मी मरेपर्यंत सांगत राहीन.
मी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्यांना मी चिकटून राहीन.
    चांगले वागणे मी कधीही सोडणार नाही.
    मरेपर्यंत माझे मन मला कधीही खाणार नाही.
लोक माझ्याविरुध्द उभे राहिले.
    वाईट माणसांना जशी शिक्षा होते तशी माझ्या शत्रूंना व्हावी अशी मी आशा करतो.
जर एखादा माणूस देवाला मानत नसेल तर तो मेल्यावर त्याला कसलीच आशा राहाणार नाही.
    देव त्याचे आयुष्य संपवतो तेव्हा त्याला आशा करायला जागा नसते.
त्या दुष्ट माणसावर संकटे येतील
    आणि तो देवाच्या मदतीसाठी रडेल.
    पण देव त्याचे ऐकणार नाही.
10 त्याने सर्वशक्तिमान देवाशी बोलून आनंद मिळवायला हवा होता.
    त्याने नेहमी देवाची प्रार्थना करायला हवी होती.

11 “मी तुम्हाला देवाच्या सामर्थ्याविषयी सांगू शकेन.
    सर्वशक्तिमान देवाच्या योजना मी तुमच्या पासून लपवणार नाही.
12 तुम्ही देवाचे सामर्थ्य तुमच्या डोळ्यांनी पाहिले आहे.
    मग तुम्ही असे निरर्थक का बोलता?

13 “देवाने वाईट लोकांसाठी हीच योजना आखली होती.
    आणि सर्वशक्तिमान देवाकडून दुष्टांना हेच मिळाले होते.
14 दुष्ट माणसाला खूप मुले असतील परंतु त्याची मुले लढाईत मरतील.
    दुष्ट माणसाच्या मुलांना पुरेसे खायला मिळणार नाही.
15 त्याची सर्व मुले मरतील
    आणि त्याच्या विधवेला दु:ख वाटणार नाही.
16 दुष्ट माणसाला इतकी चांदी मिळेल की ती त्याला मातीमोल वाटेल,
    त्याला इतके कपडे मिळतील की ते त्याला मातीच्या ढिगाप्रमाणे वाटतील.
17 परंतु चागंल्या माणसाला त्याचे कपडे मिळतील
    आणि निरपराध्याला त्याची चांदी मिळेल.
18 दुष्ट माणूस घर बांधेल परंतु ते जास्त दिवस टिकणार नाही.
    ते कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे किंवा रखवालदाराच्या तंबूप्रमाणे असेल.
19 दुष्ट माणूस झोपी गेल्यावर श्रीमंत होईल.
    परंतु जेव्हा तो डोळे उघडेल तेव्हा त्याची श्रीमंती नष्ट झालेली असेल.
20 तो घाबरेल, महापुराने आणि वादळाने सर्वकाही वाहून न्यावे तसे होईल.
21 पूर्वेचा वारा त्याला वाहून नेईल आणि तो जाईल.
    वादळ त्याला त्याच्या घरातून उडवून लावेल.
22 दुष्ट माणूस वादळाच्या शक्तीपासून पळून जाण्याचा प्रयत्न करील
    परंतु कसलीही दयामाया न दाखवता वादळ त्याच्यावर आदळेल.
23 दुष्ट माणूस पळून गेला म्हणून लोक टाळ्या वाजवतील.
    तो आपल्या घरातून पळून जात असता लोक शिट्या मारतील.”

1 करिंथकरांस 13

प्रीति

13 मी माणसांच्या जिभांनी बोललो व देवदूतांच्यासुद्धा भाषेत बोलणे मला शक्य असेल, माझ्या ठायी प्रीति नसली तर मी वाजणारी थाळी किंवा मोठा आवाज करणारी झांज आहे. जर मला देवासाठी संदेश देण्याची शक्ति असली आणि मला सर्व रहस्ये माहीत असली, सर्व दैवी ज्ञान असले आणि डोंगर ढळविता येतील असा दृढ विश्र्वास असला, परंतु माझ्या ठायी प्रीति नसली, तर मी काहीच नाही. आणि मी जर माझे सर्व धन गरजवांताच्या अन्नदानासाठी दिले आणि मी माझे शरीर जाळण्यासाठी दिले पण जर माझ्या ठायी प्रीति नसली.

तरी मी काहीच मिळवीत नाही. प्रीति गर्व करीत नाही. प्रीति सहनशील आहे, प्रीति दयाळू आहे, ती हेवा करीत नाही. प्रीति बढाई मारीत नाही. ती गर्वाने फुगत नाही. ती अयोग्य रीतीने वागत नाही. ती स्वार्थी नाही, ती चिडत नाही. तिच्याविरुद्ध केलेल्याची नोंद ती ठेवीत नाही, वाईटात ती आनंद मानीत नाही. परंतु सत्याविषयी इतरांबरोबर ती आनंद मानते. सर्व काही खरे मानण्यास सिध्द असते

ती नेहमी विश्वास ठेवते. आशा धरते. नेहमी सहन करते. प्रीति कधी संपत नाही. पण भविष्य सांगण्याची दाने ती बाजूला केली जातील. इतर भाषा बोलण्याचे दान असेल तर ते थांबेल. ज्ञानाचे दान असेल तर ते बाजूला केले जाईल. कारण आमचे ज्ञान अपूर्ण आहे, आम्ही देवासाठी बोलतो (भविष्य सांगतो). आम्ही अपूर्ण भविष्य सांगतो. 10 पण जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा जे अपूर्ण आहे ते नाहीसे केले जाईल.

11 जेव्हा मी मूल होतो, तेव्हा मूलासारखा बोलत असे, मी मूलासारखा विचार करीत असे. मुलासारखा उहापोह करीत असे. परंतु जेव्हा मी मोठा झालो, तेव्हा मी लहानपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. 12 आता आपण आरशात अस्पष्ट प्रतिबिंब पाहतो, परंतु जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा आपण समोरासमोर पाहू. आता मला अंशतःकळते, परंतु ती वेळ येईल तेव्हा देव मला ओळखतो, तसा मी पूर्णपणे ओळखीन, 13 सारांश, या तीन गोष्टी राहतात: विश्वास, आशा आणि प्रीति पण यातील सर्वांत महान प्रीति आहे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center