Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
निर्गम 5

फारोसमोर मोशे व अहरोन

मोशे व अहरोन इस्राएल लोकांशी बोलल्यानांतर फारोकडे गेले व त्याला म्हणाले, “इस्राएल लोकांचा देव [a] म्हणतो, ‘माझ्या लोकांना माझ्या सन्मानाकरिता उत्सव करावयास रानात जाऊ द्यावे.’”

परंतु फारो म्हणाला, “हा परमेश्वर कोण आहे? आणि मी त्याचे का ऐकावे? मी इस्राएल लोकांना का जाऊ द्यावे? तुम्ही परमेश्वर म्हणता तो कोण आहे हे मला माहीत नाही. म्हणून इस्राएल लोकांस मी जाऊ देत नाही.”

मग अहरोन व मोशे म्हणाले, “इब्री लोकांचा म्हणजे इस्राएल लोकांचा देव आम्हाशी बोलला आहे. म्हणून आम्हाला रानात तीन दिवसांच्या वाटेवर जाऊ द्यावे आणि तेथे आमचा देव परमेश्वर या करिता यज्ञार्पण करु द्यावे अशी आम्ही आपणाला विनंती करतो. आणि आम्ही जर असे केले नाही तर कदाचित् त्याला फार राग येईल व तो रोगराईने किंवा तलवारीने आमचा नाश करेल.”

परंतु फारो त्यांना म्हणाला, “हे मोशे, हे अहरोना, तुम्ही त्रास निर्माण करून घेत आहात! तुम्ही लोकांना काम करू देत नाही; तुम्ही त्यांच्या कामात अडथळा आणीत आहात! त्या गुलामांना आपल्या कामावर माघारी जाण्यास सांगा! येथे खूप कामगार आहेत आणि त्यांना काम करण्यापासून तुम्ही रोखत आहात!”

फारो लोकांना शिक्षा देतो

त्याच दिवशी इस्राएल लोकांचे काम अधिक खडतर करण्यासाठी फारोने मुकादमांना व नायकांना आज्ञा दिली. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही ह्या लोकांना विटा बनविण्याकरिता आज पर्यंत सतत गवत दिलेले आहे. परंतु आता त्यांना लागणारे गवत त्यांना स्वतः शोधून आणण्यास सांगा. तरी परंतु पूर्वी इतक्याच विटा त्यांनी बनविल्या पाहिजेत. ते आळशी झाले आहेत आणि म्हणूनच त्यांच्या देवाला यज्ञ करण्यासाठी त्यांना जाऊ देण्याविषयी ते मला विचारत आहेत. तेव्हा त्यांच्यावर अधिक काम लादून त्यांना सतत कामात ठेवा. म्हणजे मग मोशेच्या खोट्या गोष्टी ऐकण्यास त्यांना वेळ मिळणार नाही.”

10 म्हणून मिसरचे मुकादम व इस्राएली किंवा इब्री नायक इस्राएल लोकांकडे जाऊन म्हणाले, “फारोने तुम्हाला विटा बनविण्यासाठी लागणारे गवत न देण्याचे ठरवले आहे. 11 तेव्हा तुम्हाला लागणारे गवत तुम्ही स्वतःच आणले पाहिजे म्हणून आता जाऊन तुमच्यासाठी गवत आणा परंतु पूर्वीइतक्याच विटा तुम्ही बनविल्या पाहिजेत.”

12 म्हणून मग इस्राएल लोक गवत शोधण्याकरिता सर्व मिसर देशभर पांगले. 13 त्यांच्यावर नेमलेले मुकादम त्यांच्याकडून अधिक काम करवून घेऊन पूर्वी इतक्याच विटा तयार करण्याकरिता त्याच्या मागे सतत तगादा लावीत. 14 मिसरच्या मुकादमांनी लोकांवर इब्री म्हणजे इस्राएली नायक नेमले होते. लोकांनी केलेल्या कामासाठी त्यांना जबाबदार धरले जाई. मिसरचे मुकादम इस्राएली नायकांना मारीत व म्हणत, “तुम्ही पूर्वी जेवढ्या विटा बनवीत होता तेवढ्या आता का बनवीत नाही? तुम्ही जर त्यावेळी तेवढ्या विटा करीत होता तर मग आताही तेवढ्याच विटा करु शकला पाहिजे!”

15 मग इस्राएली नायक तक्रार घेऊन फारोकडे गेले व म्हणाले, “आम्ही जे तुमचे सेवक त्या आमच्याशी तुम्ही अशाप्रकारे का वागत आहा? 16 तुम्ही आम्हाला गवत देत नाही परंतु पूर्वी इतक्याच विटा बनविण्याचा हुकूम करता. आणि आता आमचे मुकादम आम्हाला मारतात. अशा रीतीने तुमचे लोक जे करीत आहेत ते चुकीचे आहे.”

17 फारोने उत्तर दिले, “तुम्ही लोक आळशी आहा. तुम्हाला काम करायला नको आणि म्हणूनच तुम्हाला जाऊ देण्याविषयी तुम्ही मला विचारता आणि त्या करिताच तुम्हाला येथून निघून जायला आणि तुमच्या परमेश्वराला यज्ञ करावयास पाहिजे. 18 आता आपल्या कामावर माघारी जा. आम्ही तुम्हाला गवत देणार नाही परंतु पूर्वी इतक्याच विटा तुम्ही केल्या पाहिजेत.”

19 आपण संकटात आहोत हे इस्राएली नायकांना समजले. कारण पूर्वी इतक्याच विटा करून देणे त्यांना शक्य नव्हते.

20 फारोच्या भेटीनंतर परत जाताना त्यांना मोशे व अहरोन भेटले; ते नायकांसाठीच थांबले होते. 21 तेव्हा ते मोशे व अहरोनास म्हणले, “आम्हाला जाऊ द्यावे असे फारोला विचारून तुम्ही मोठे वाईट केले. फारो व त्याचे अधिकारी यांच्या मनात आमच्या विरुद्ध द्वेष निर्माण केल्याबद्दल परमेश्वर तुम्हाला शिक्षा करो. आम्हास मारून टाकण्यास तुम्ही त्यांना चांगले निमित्त दिले आहे.”

मोशे देवाकडे तक्रार करतो

22 मग मोशे परमेश्वराची प्रार्थना करीत म्हणाला, “प्रभु तुझ्या लोकांसाठी ही वाईट गोष्ट तू का केलीस? तू मला इकडे का पाठवलेस? 23 मी फारोकडे जाऊन तू मला सांगितलेल्या गोष्टी त्याला सांगितल्या. परंतु त्या वेळेपासून तो लोकांशी अधिक कठोरपणे वागत आहे. आणि त्यांच्या मदतीकरिता तू काहीच केले नाहीस!”

लूक 8

येशूबरोबरचे लोक

यानंतर असे झाले की, येशू सर्व गावांतून आणि खेड्यामधून उपदेश करीत व देवाच्या राज्यासंबंधीची सुवार्ता सांगत जात होता. आणि बारा प्रेषित त्याच्याबरोबर होते. ज्यांच्यामधून भुते काढली होती व ज्यांना आजारातून बरे केले होते अशा काही स्त्रियाही त्याच्याबरोबर होत्या: मरीया जिला मग्दालिया म्हणत, तिच्यातून सात भुते बाहेर पडली होती. हेरोदाच्या घराचा कारभारी खुजा याची पत्नी योहान्ना, सूसान्ना आणि इतर अनेक स्त्रिया होत्या, या स्त्रिया त्यांच्याकडे जे होते, म्हणजे त्यांच्या उत्पन्नातून येशू व त्याच्या शिष्यांना देत असत.

पेरणी करणाऱ्याची बोधकथा(A)

जेव्हा मोठा जनसमुदाय जमत असे व प्रत्येक गावातून लोक त्याच्याकडे येत असत, तेव्हा येशू बोधकथांचा उपयोग करुन बोलत असे:

“एक शेतकरी आपले बी पेरायला गेला. तो पेरत असताना काही बी रस्त्यावर पडले व ते तुडविले गेले. आकाशातील पक्ष्यांनी ते खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीवर पडले आणि उगवल्यावर वाळून गेले कारण त्यात ओलावा नव्हता. काही बी काटेरी झुडुपात पडले. काटेरी झुडुपे त्याच्याबरोबर वाढली व त्याची वाढ खुंटविली. काही बी चांगल्या जमिनीवर पडले. ते उगवले, वाढले व जे पेरले होते त्यापेक्षा शंभर पट पीक जास्त आल.” या बोधकथा सांगत असता तो मोठ्याने म्हणाला,

“ज्याला ऐकण्यास कान आहेत, त्याने ऐकावे!”

त्याच्या शिष्यांनी या बोधकथेचा अर्थ काय असे विचारले.

10 म्हणून तो म्हणाला, “तुम्हांला देवाच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचा अधिकार दिलेला आहे. पण इतरांच्यासाठी ते बोधकथेमध्ये दिले आहे.

‘यासाठी की, जरी ते पाहत असले,
    तरी त्यांना दिसू नये आणि
ऐकत असले तरी
    त्यांना समजू नये.’ (B)

येशू बियाच्या बोधकथेचे स्पष्टीकरण करतो(C)

11 “बोधकथेचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे. बी हे देवाचा संदेश आहे. 12 आणि जे बी वाटेवर पडले ते जे ऐकतात त्याचे दर्शक आहेत. नंतर सैतान येतो आणि त्यांच्या हृदयातील बी घेऊन जातो, यासाठी की त्यांनी विश्वास ठेवू नये व त्यांचे तारण होऊ नये. 13 जे बी खडकावर पडते ते असे आहे की, ते ऐकतात आणि आनंदाने संदेश ग्रहण करतात. पण त्यांना मूळ नसते. ते काही वेळ विश्वास ठेवतात पण परीक्षेच्या वेळी देवापासून दूर जातात. 14 जे बी काटेरी झुडुपात पडलेले असते ते दर्शविते की, ते ऐकतात परंतु आपल्या मार्गाने जात असता काळजी, श्रीमंती, जीवनातील सुखे यांनी ते खुंटविले जाते, ते पक्व फळ देत नाही. 15 चांगल्या जमिनीतील बी दर्शविते की, ते चांगल्या व प्रामाणिक अंतःकरणाचे आहेत ते वचन ऐकतात, ग्रहण करतात व धीराने फळ देतात.

तुमच्या समजबुद्धीचा उपयोग करा(D)

16 “कोणीही दिवा लावून तो भांड्याने झाकून ठेवीत नाही, किंवा खाटेखाली ठेवीत नाहीत, तर तो दिवठणीवर ठेवतात, यासाठी की जे आत येतात त्यांना प्रकाश दिसावा. 17 लक्षात ठेवा, असे काहीही लपविलेले नाही, जे उघड होणार नाही. प्रत्येक रहस्य सर्वांना सांगितले जाईल आणि ते प्रकाशात येईल. 18 म्हणून तुम्ही कसे ऐकता याविषयी काळजी घ्या कारण ज्याच्याजवळ आहे त्याला अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडे जे आहे असे वाटते तेदेखील काढून घेतले जाईल”.

येशूचे शिष्य हेच त्याचे खरे कुटुंब(E)

19 येशूची आई व त्याचे भाऊ त्याच्याकडे आले. पण गर्दीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येईना. 20 म्हणून त्याला असे सांगण्यात आले की, “तुझी आई व तुझे भाऊ बाहेर उभे आहेत, त्यांना तुला भेटायचे आहे.”

21 पण त्याने त्यांना उत्तर दिले, “जे देवाचे वचन ऐकतात व त्याप्रमाणे करतात तेच माझी आई व माझे भाऊ आहेत.”

शिष्य येशूचे सामर्थ्य पाहतात(F)

22 त्या दिवसात एकदा असे झाले की, येशू त्याच्या शिष्यांसह नावेत बसला. आणि तो त्यांना म्हणाला, “आपण सरोवराच्या पलीकडच्या बाजूला जाऊ या.” 23 आणि ते निघाले. ते जात असता येशू झोपी गेला. सरोवरावर तुफान वादळी वारे सुरु झाले व नावेत पाणी जाऊ लागले. ते अतिधोकादायक स्थितीत सापडले. 24 म्हणून त्यांनी त्याला उठविले, ते त्याला म्हणाले, “गुरुजी, गुरुजी, आपण बुडत आहोत!”

मग तो उठला. त्याने वारा व लाटा यांना दटाविले. ते थांबले. व सर्वत्र शांतता पसरली. 25 येशू त्यांना म्हणाला, “तुमचा विश्वास कोठे आहे?”

पण ते भयचकित आणि विस्मित झाले व एकमेकांना म्हणाले, “हा आहे तरी कोण? कारण तो वारा आणि लाटा यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात?”

भुते अंगात असलेला माणूस(G)

26 नंतर ते गालील सरोवरापलीकडील गरसेकरांच्या प्रदेशात गेले. 27 जेव्हा तो किनाऱ्यावर उतरला, तेव्हा नगरातला एक मनुष्य त्याला भेटला. त्या माणसामध्ये अनेक भुते होती. बराच काळपर्यंत त्याने कपडे घातले नव्हते व तो घरातही राहिला नव्हता. तो कबरांमध्ये राहत होता.

28-29 जेव्हा त्याने येशूला पाहिले, तेव्हा तो मोठ्याने ओरडला व त्याच्यापुढे पडला. तो मोठ्या आवाजात म्हणाला, “येशू, सर्वोच्च देवाच्या पुत्रा, तुला माझ्यापासून काय पाहिजे? मी तुला विनंति करतो की, मला त्रास देऊ नको.”तो असे म्हणाला कारण येशूने भुताला त्याच्यातून बाहेर येण्याची आज्ञा केली होती. कारण त्याने त्याला पुष्कळ वेळ धरले होते. त्याला त्यावेळी साखळ्यांनी बांधले होते. पायात बेड्या होत्या व त्याला पहाऱ्यात ठेवले होते परंतु तो नेहमी साखळ्या तोडीत असे व भुते त्याला एकांतात घेऊन जात असत.

30 येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय आहे?”

तो म्हणाला, “सैन्य,” कारण त्याच्यात अनेक भुते शिरली होती. 31 भुतांनी येशूला विनवणी केली की, आम्हांला अनंतकाळच्या अंधारात [a] जाण्याची आज्ञा करु नको. 32 डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. भुतांनी त्याला विनंति केली, “आम्हांला त्या डुकरांच्या मध्ये जाऊ दे.” आणि येशूने त्यांना तसे करण्याची परवानगी दिली. 33 मग भुते त्या मनुष्यातून बाहेर आली आणि डुकरात शिरली. नंतर डुकरांचा कळप सरोवराकडे जोरात पळाला आणि तो सारा कळप सरोवरात बुडून मेला.

34 जेव्हा डुकरांचा कळप राखणाऱ्यांनी हे पाहिले, तेव्हा ते दूर पळाले व त्यांनी नगरात व त्या प्रदेशात हे वर्तमान सांगितले. 35 काय झाले हे पाहण्यासाठी लोक बाहेर आले. ते येशूकडे आले आणि त्यांनी ज्या माणसाच्या अंगातून भुते निघाली होती, त्याला येशूच्या पायाजवळ बसलेला त्यांनी पाहिले. त्याने नीट कपडे घातले होते व तो पूर्ण शुद्धीवर होता. या घटनेचे त्यांना भय वाटले. 36 ज्यांनी हे पाहिले त्यांनी तो भूत लागलेला मनुष्य कसा बरा झाला हे त्यांना सांगितले. 37 तेव्हा गरसेकर प्रदेशातील सर्व लोकांनी येशूला त्यांना सोडून जाण्यास सांगितले. कारण ते सर्व फार घाबरले होते.

मग येशू नावेत बसून परत गेला. 38 ज्याच्या अंगातून भुते तिघाली होती तो त्याच्याबरोबर जाण्यासाठी विनवणी करु लागला. पण येशूने त्याला परत जायला सांगितले आणि म्हणाला, 39 “घरी जा आणि देवाने तुझ्यासाठी जे केले आहे ते सांग.”

तेव्हा तो मनुष्य गेला आणि येशूने त्याच्यासाठी जे काही केले ते नगारातील सर्व लोकांना त्याने सांगितले.

येशू मेलेल्या मुलीला जिवंत करतो व आजारी स्त्रीला बरे करतो(H)

40 नंतर जेव्हा येशू परत आला तेव्हा लोकांनी त्याचे स्वागत केले, कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. 41 त्याचवेळी याईर नावाचा एक मनुष्य आला. तेथील सभास्थानाचा तो अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंति केली. 42 कारण त्याला बारा वर्षांची एक मुलगी होती आणि ती मरावयास टेकली होती.

येशू जात असता लोकांची गर्दी झाली होती व तो चेंगरला जात होता. 43 आणि एक स्त्री तेथे होती. तिला बारा वर्षे रक्तस्राव होत होता. तिच्याकडे जे काही पैसे होते ते सर्व तिने वैद्यांसाठी खर्च केले पण कोणीही तिला बरे करु शकले नाही. 44 ती त्याच्या मागोमाग आली. व तिने त्याच्या वस्त्राच्या टोकाला स्पर्श केला आणि ताबडतोब तिचा रक्तस्राव थांबला. 45 मग येशू म्हणाला, “मला कोणी स्पर्श केला?”

ते सर्व जण नाकारीत असताना पेत्र म्हणाला, “सर्व जण आपल्याभोवती गर्दी करीत आहेत आणि तुम्हांला चेंगरीत आहेत.”

46 परंतु येशू म्हणाला, “कोणी तरी मला स्पर्श केला आहे. कारण मला माहीत आहे की, माझ्यातून शक्ति निघाली आहे.” 47 आपण येशूच्या नजरेतून सुटू शकणार नाही हे जेव्हा त्या स्त्रीने पाहिले तेव्हा ती थरथर कांपत आली आणि त्याच्या पाया पडली. तेथे तिने सर्व लोकांसमोर आपण त्याला का स्पर्श केला व आपण कसे बरे झालो ते सांगितले. 48 तेव्हा तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा.”

49 तो हे बोलत असतानाच कोणी तरी सभास्थानाच्या अधिकार्याच्या घरुन आले आणि म्हणाले, “तुमची मुलगी मरण पावली आहे. आता गुरुजींना त्रास देऊ नका.”

50 येशूने हे ऐकले व तो सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नको, फक्त विश्वास ठेव आणि ती मरणातून वाचविली जाईल.”

51 जेव्हा येशू त्या घरी आला, त्याने आपणाबरोबर पेत्र, योहान, याकोब आणि मुलीचे आईवडील यांच्याशिवाय कोणालाही आत येऊ दिले नाही. 52 सर्व लोक तिच्यासाठी रडत होते. येशू म्हणाला, “रडणे थांबवा, ती मेलेली नाही, ती झोपेत आहे.”

53 पण ते त्याला हसले. कारण त्यांना माहीत होते की ती मेली आहे. 54 परंतु त्याने तिचा हात धरला आणि मोठ्याने म्हणाला, “मुली, ऊठ!” 55 मग, तेव्हा तिचा आत्मा पुन्हा आला आणि ती लगेच उभी राहिली. नंतर त्याने तिला खाण्यास देण्याची आज्ञा केली. 56 तेव्हा तिचे आईवडील आश्चर्याने थक्क झाले, परंतु जे घडले त्याबद्दल कोणालाही सांगू नका अशी त्याने त्यांना आज्ञा केली.

ईयोब 22

अलीफज उत्तर देतो

22 मग तेमानीच्या अलीफजने उत्तर दिले:

“देवाला आपल्या मदतीची गरज आहे का? नाही.
    अतिशय विद्वान माणसाचा सुध्दा देवाला फारसा उपयोग नाही.
तुमचे योग्य तऱ्हेने जगणे देवाला काही मदत करते का? नाही.
    तुम्ही त्या सर्वशक्तिमान देवाचे अनुसरण केलेत तर त्यातून त्याला काही मिळते का? नाही.
ईयोब, देवाने तुला दोषी ठरवून शिक्षा का द्यावी?
    तू त्याला भितोस तू त्याची भक्ती करतोस म्हणून?
नाही. तो तसे करतो कारण तू खूप पाप केले आहेस.
    ईयोब, तू पाप करणे कधीच थांबवले नाहीस.
कदाचित् तू तुझ्या भावाला काही पैसे दिले असशील आणि त्याने ते परत करावे म्हणून त्याच्याकडून एखादी वस्तू गहाण ठेवून घेतली असशील.
    कदाचित् तू गरीबाकडून त्याची वस्त्रे पैशासाठी गहाण ठेवून घेतली असशील.
    तसे करण्याला कदाचित् काही सबळ कारणही नसेल.
तू कदाचित् थकलेल्या आणि भुकेल्या लोकांना पाणी
    आणि अन्न दिले नसशील.
ईयोबा, तुझ्याकडे पुष्कळ शेतजमीन आहे
    आणि लोक तुला मान देतात.
पण कदाचित् तू विधवांना काहीही न देता घालवून दिले असशील,
    ईयोबा, तू कदाचित पोरक्या मुलांची फसवणूक केली असशील.
10 म्हणूनच तुझ्या भोवती सापळे आहेत
    आणि अचानक आलेल्या संकटांनी तू घाबरुन जात आहेस.
11 म्हणूनच सर्वत्र इतका अंधार आहे की तुला काही दिसत नाही
    आणि तू पुराच्या पाण्याने चहुबाजूंनी वेढला आहेस.

12 “देव स्वर्गाच्या सर्वात उंच भागात राहतो.
    तारे किती उंचावर आहेत ते बघ.
    देव सर्वात उंच ताऱ्यांमधून खाली वाकून बघतो,
13 पण ईयोबा, तू कदाचित् म्हणशील देवाला काय समजते?
    देव काळ्याकुटृ ढातून आपल्याकडे बघून निवाडा करु शकतो का?
14 आकाशाच्या किनाऱ्यावरुन चालताना त्याने आपल्याला बघू
    नये म्हणून दाट ढग त्याला आपल्यापासून लपवतात.

15 “ईयोब, दुष्ट लोक पूर्वी ज्या जुन्या वाटेवरुन चालत गेले
    त्याच वाटेवरुन आज तू चालतो आहेस.
16 त्या दुष्टांची मरणघटिका जवळ येण्यापूर्वीच त्यांचा नाश करण्यात आला.
    ते पुरात वाहून गेले.
17 त्या लोकांनी देवाला सांगितले, ‘आम्हाला एकटे सोड
    तो सर्वशक्तिमान देव आम्हाला काहीही करु शकत नाही.’
18 आणि देवानेच त्याची घरे चांगल्या वस्तूंनी भरली होती.
    नाही मी दुष्टांच्या उपदेशाचे पालन करु शकत नाही.
19 चांगले लोक दुष्टांचे निर्दालन झालेले पाहतील आणि संतोष पावतील.
    भोळे लोक वाईट लोकांना हसतात.
20 ‘खरोखरच आमच्या शत्रूंचा नाश झाला आहे.
    त्यांची संपत्ती आगीत नष्ट होत आहे.’

21 “ईयोब, तू आता देवाला शरण जा. त्याच्याशी सलोखा कर.
    तू हे केलेस तर तुला खूप चांगल्या गोष्टी मिळतील.
22 त्यांच्या वचनांचा स्विकार कर.
    तो काय म्हणतो त्याकडे नीट लक्ष दे.
23 ईयोब, तू सर्वशक्तिमान देवाकडे परत ये म्हणजे तुझी स्थिती पूर्ववत् होईल.
    परंतु तू तुझ्या घरातून वाईट गोष्टींचे उच्चाटन केले पाहिजेस.
24 तू तुझ्या जवळ असलेल्या सोन्याला मातीमोल मानले पाहिजेस.
    तू तुझ्या सर्वात चांगल्या सोन्याला दरीतल्या दगडाएवढी किंमत दिली पाहिजेस.
25 सर्वशक्तिमान देवच तुझे सोने असू दे.
    त्यालाच तुझा चांदीचा ढीग समज.
26 नंतर तू सर्वशक्तिमान देवाला अनुभवू शकशील.
    तू त्याच्याकडे बघू शकशील.
27 तू त्याची प्रार्थना करशील आणि तो तुझे ऐकेल
    आणि ज्या गोष्टी करण्याचे तू वचन दिले होतेस त्या गोष्टी तू करशील.
28 तू जर काही करायचे ठरवलेस तर तू त्यात यशस्वी होशील.
    आणि तुझा भविष्यकाळ खरोखरच उज्ज्वल असेल.
29 देव अहंकारी लोकांना मान खाली घालायला लावतो.
    परंतु विनम्र लोकांना तो मदत करतो.
30 नंतर तू चुका करणाऱ्या लोकांना मदत करु शकशील.
    तू देवाजवळ प्रार्थना केलीस तर तो त्या लोकांना क्षमा करेल.
    का? कारण तू अतिशय पवित्र असशील.”

1 करिंथकरांस 9

Rights That Paul Has Not Used

मी मुक्त नाही का? मी प्रेषित नाही का? आमचा प्रभु येशू याला मी पाहिले नाही का? तुम्ही माझे प्रभूमधील काम नाही का? जरी मी इतरांच्यासाठी प्रषित नसलो तरीही तुमच्यासाठी मी एक आहे. कारण तुम्ही प्रभूमध्ये असलेल्या माझ्या प्रेषितपणाचा शिक्का आहात.

जे माझी परीक्षा घेऊ पाहतात, त्यांच्याविरुद्ध माझा बचाव असा आहे. मला खाण्याचा आणि पिण्याचा हक्क नाही काय? इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ आणि पेत्र यांच्यासारखे एखाद्या विश्वासणाऱ्या व्यक्तीला पत्नी करुन घेण्याचा मला हक्क नाही काय? का फक्त बर्णबा व मलाच आमच्या उपजीविकेकरिता काम न करण्याचा हक्क आहे? स्वतःच्या खर्चाने सैनिक म्हणून सेवा करणारा असा कोण आहे? द्राक्षमळा लावून द्राक्षे खात नाही असा कोण आहे? किंवा मेढ्यांचे कळप पाळून कळपाचे काही दूध पित नाही असा कोण आहे?

फक्त मानवी दैनंदिन व्यवहारानुसार मी हे सांगत नाही. तर नियमशास्त्रसुद्धा हेच सांगत नाही का? मोशेच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे, “मळणी करीत असताना बैलाला मुसके घालू नकोस.” [a] देव बैलांची काळजी करीत नाही, 10 तो खात्रीने आमच्याविषयीच सांगत नाही काय? होय, ते आमच्यासाठीच लिहिले होते, कारण जो नांगरतो त्याने अपेक्षेने नांगरावे. आणि जो मळणी करतो त्याने पिकात वाटा असावा या हेतूने मळणी करावी. 11 जर आम्ही तुमच्या फायद्यासाठी आध्यात्मिक बी पेरले, तर तुमच्यापासून ऐहिक गरजांची कापणी केली तर ती मोठी गोष्ट आहे काय? 12 जर इतरही तुमच्यापासून ऐहिक गोष्टींची कापणी करण्याच्या या अधिकारात सहभागी होत असतील तर तसे करण्याचे आम्हालाही यापेक्षा अधिक मोठे कारण नाही काय? परंतु आम्ही हा अधिकार बजावला नाही. त्याऐवजी ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या मार्गात अडथळ येऊ नये म्हणून आम्ही सर्व गोष्टी सहन करतो. 13 तुम्हाला माहीत नाही काय मंदिरात जे काम करतात ते त्यांचे अन्र मंदिरातून घेतात, आणि जे नियमितपणे वेदीची सेवा करतात, ते वेदीवर जे अर्पण केले जाते त्यात सहभागी होतात. 14 त्याचप्रकारे, प्रभूने आज्ञा केली आहे की, जे सुवार्ता गाजवितात त्यांनी त्या सुवार्ता गाजविण्याकडून आपला चरितार्थ चालवावा.

15 परंतु मी या कोणत्याही अधिकाराचा वापर केला नाही. आणि माझ्या बाबतीत असे घडावे म्हणूनही मी हे लिहिले नाही. कारण माझे अभिमान बाळगण्याचे कारण कोणी हिरावून घेण्यापेक्षा मी मरण पत्करीन, 16 कारण जर मी सुवार्ता गाजवितो, तर मला अभिमान बाळगण्याचे काही कारण नाही, कारण मला ते करणे आवश्यक आहे. आणि जर मी सुवार्ता गाजविली नाही तर माझ्यासाठी ते किती वाईट असेल! 17 कारण जर मी हे स्वेच्छेने करतो तर मी बक्षिसास पात्र आहे, पण जर एखादे कार्य माझ्यावर सोपविले आहे जे माझ्या आवडीने नव्हे 18 तर माझे बक्षीस कोणते? ते हे की मी फुकट सुवार्ता सांगावी यासाठी की, सुवार्ता सांगत असताना मी वेतन मिळण्याच्या अधिकाराचा पूर्ण उपयोग करु नये.

19 कारण, जरी मी सर्व लोकांपासून मुक्त असलो तरी मी स्वतःला सर्व लोकांचा गुलाम करुन घेतले आहे. 20 यासाठी की, मी अधिक मिळवावे. यहूदी लोकांना जिंकण्यासाठी यहूदी लोकांसाठी मी यहूदी झालो. जे नियमशास्त्राधीन आहेत त्यांच्यासाठी 21 मी नियम शास्त्राधीन असणाऱ्या लोकांसारखा झालो. (जरी मी नियमशास्त्राधीन नाही तरी तसा झालो). यासाठी की जे नियमशास्त्रविरहीत आहेत त्यांना मी नियमशास्त्रविरहीत असा झालो. (जरी मी देवाच्या नियमशास्त्राशिवाय नाही) तरी मी ख्रिस्ताच्या नियमाधीन आहे. यासाठी की, जे नियमशास्त्रविरहीत आहेत त्यांना जिंकता यावे. 22-23 जे दुर्बल आहेत त्यांच्यासाठी मी दुर्बल झालो यासाठी की दुर्बलांना मला जिंकता यावे. मी सर्वांसाठी सर्व काही झालो आहे यासाठी की त्या आशीर्वादाचा वाटेकरी मला होता यावे.

24 तुम्हांला माहीत नाही का मैदानातील शर्यतीत धावणारे सर्व धावतात, परंतु एकालाच बक्षिस मिळते? अशा प्रकारे धावा की तुम्ही ते जिंकाल. 25 प्रत्येक जण जो शर्यतीत धावतो तो सर्व बाबतीत कडक रीतीने प्रशिक्षण घेतो (आत्मसंयमन करतो.) ते नाशवंत गौरवाचा मुगुट मिळविण्यासाठी असे करतात, परंतु आम्ही अविनाशी मुगुट मिळविण्यासाठी करतो. 26 यास्तव मी अनिश्चितपणे नाही तर ज्याला ध्येय आहे अशासारखा धावतो, तसेच जो कोणी नुसताच वाऱ्यावर प्रहार करीत नाही, तसे मी मुष्टीयुद्ध करतो. 27 त्याऐवजी मी आपल्या शरीराला कठोरपणे वागवितो आणि त्याला ताब्यात आणतो म्हणजे दुसऱ्यांना उपदेश केल्यानंतर देवाकडून मी नाकारला जाऊ नये.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center